तत्त्वज्ञानाचे धडे गिरवताना संकल्पनांशी बौद्धिक कबड्डी खेळावी लागते. अनेक संकल्पना बुद्धीच्या कचाट्यात आरामात सापडतात. काही संकल्पना मात्र अश्या असतात की त्या काही केल्या सापडत नाहीत. याची दोन कारणे असू शकतात. पहिले म्हणजे, प्रथमदर्शनी अस्तित्वात आहे असे वाटणारी एखादी संकल्पना जवळून ऊहापोह केल्यावर मृगजळाप्रमाणे नाहीशी होऊ शकते. दुसरे म्हणजे, त्या संकल्पनेचे अस्तित्व आपल्याला नाकारता येऊ शकत नाही, पण तिच्या एकसंधतेवर प्रश्नचिन्ह निर्माण केले जाऊ शकते. म्हणजे एक नव्हे तर अनेक संकल्पना तेथे असू शकतात. अश्या संकल्पना एवढ्या एकसंध नसतील की त्या ‘एक संकल्पना’ म्हणून हातात सापडाव्या, किंवा त्या जरी एकसंध असल्या तरी इतक्या लवचिक असतात की सहजपणे निसटून जाव्यात. हा निबंध म्हणजे ‘बुद्धिप्रामाण्यवादी नास्तिक्य’ या संकल्पनेसोबत तत्त्वज्ञानाच्या नजरेतून खेळलेला बौद्धिक कबड्डीचा एक डाव आहे.
एकीकडे नास्तिक्य म्हणजे नक्की काय, आणि दुसरीकडे अशा नास्तिक्यात काय अभिप्रेत आहे, हे दोन मुद्दे मांडणे हे या निबंधाचे ध्येय आहे. एकीकडे मी वैदिक धर्माप्रमाणे नास्तिकतेची व्याख्या आणि तिच्यातील त्रुटि पाहणार आहे. या मुद्द्याची मांडणी करताना मला नास्तिक्याबद्दल थोडे अधिक काटेकोरपणे बोलता येईल. त्याचे स्वरूप काय असावे, यावर भाष्य करता येईल. दुसरीकडे या आदर्श नास्तिक्यात अभिप्रेत असणारा बुद्धिप्रामाण्यवाद म्हणजे नक्की काय, याचा ऊहापोह केला जाणार आहे. याने मला त्या ‘वादात’ काय अभिप्रेत आहे, यावर सविस्तर भाष्य करता येईल.
मनुस्मृति २.११ प्रमाणे नास्तिकांची व्याख्या “नास्तिको वेदनिन्दकः” अशी आहे. मनुस्मृतीने नास्तिकाची व्याख्या वेदांच्याआधारे केलेली आहे. त्यांच्या मते वेदांवर श्रद्धा व विश्वास नसणारे, वेदांची निंदा करणारे सगळे नास्तिक असतात. या वेदकेंद्री विचाराला तत्त्वज्ञानात ‘वेदप्रामाण्य’ म्हटले जाते. या विचारानुसार वेद हे प्रमाण आहेत, अंतिम वाक्य आहेत. वेदांमध्ये जे ज्ञान आहे ते सर्वश्रेष्ठ ज्ञान आहे आणि त्यांच्या ज्ञानापलीकडे कुठलेही ज्ञान नाही. वेदांनी जे प्रमाणित केले आहे, तेच फक्त ज्ञान आहे. आपल्या आयुष्यातील आणि विचारविश्वातील वेदांचे केंद्रस्थान नाकारणे म्हणजे वैदिक धर्मच नाकारणे होय. धर्माचे आणि वेदांचे प्रामाण्य नाकारणारे असे सगळे वरील व्याख्येप्रमाणे नास्तिक ठरतात.
माझ्या मते ही व्याख्या नास्तिकत्वाचा गाभा मांडण्यास असमर्थ ठरते. त्याची दोन कारणे आहेत. पहिले असे की, या व्याख्येनुसार बौद्ध व जैन पंथीही नास्तिक ठरतात. माझ्या मनातील आदर्श नास्तिकत्व या दोन पंथियांपेक्षा वेगळे आहे. किंबहुना, माझ्या मते हे दोन पंथ मुळात नास्तिक नाहीतच. दुसरे असे की, मनुस्मृतीच्या मते नास्तिकत्व हा प्रामाण्याचा, म्हणजेच ज्ञानाचा प्रश्न आहे. मी जर कुठल्या एका स्रोतामधून होणारे ज्ञान नाकारत असेन, तर मी नास्तिक, असे त्या व्याख्येचे प्रारूप आहे. मला नास्तिकत्वाचे असे ज्ञानाधिष्ठित आकलन चुकीचे वाटते.
आपण आधी मनुस्मृतीच्या व्याख्येत माझ्या मते झालेली एक गल्लत पाहूया. त्यासाठी थोडे तत्त्वज्ञान समजून घेऊया. तत्त्वज्ञानाच्या प्रमुख शाखांपैकी दोन म्हणजे सत्ताशास्त्र आणि ज्ञानशास्त्र (ज्ञानमीमांसा/ प्रमाणशास्त्र). सत्ताशास्त्रात ‘काय (अस्तित्वात) आहे?, काय सत् (चिरंतन/कायम) आहे?, काय खरे आहे?’ अशा प्रश्नांची उत्तरे शोधली जातात. ज्ञानशास्त्रात ‘ज्ञान शक्य आहे का?, असले तर ज्ञान कशाला म्हणावे?, ज्ञानाचे कुठले स्रोत असू शकतात?, त्यातले कुठले स्रोत हे ज्ञानासाठी प्रमाण मानले जाऊ शकतात?’ अशा प्रश्नांची उत्तरे शोधली जातात. जे तत्त्वज्ञ या दोहोंमध्ये पाय रोवू इच्छितात ते ‘जे काही अस्तित्वात आहे त्या सगळ्याचे ज्ञान आपल्याला होऊ शकते का?, आपल्याला ज्या सगळ्याचे ज्ञान होते ते सर्व अस्तित्वात असतेच का?’ या व अशा प्रश्नांची उत्तरे शोधतात. मला हा ऊहापोह गरजेचा वाटतो कारण माझ्या मते मनुस्मृतीने या दोन विषयांच्या प्रश्नांमध्येच मुळात गल्लत केलेली दिसते.
एका उदाहरणामधून आपण ही गल्लत समजून घेऊया. फेर्ख्माचा शेवटचा सिद्धान्त असे म्हणतो की २ या पूर्णांकापेक्षा मोठ्या कुठल्याच धन पूर्णांकाने ‘ण’ ची जागा घेतल्यास आपल्याला पुढील समीकरणाची ळ, क्ष आणि ज्ञ साठीची उकल मिळणार नाही: ळण + क्षण = ज्ञण. या सिद्धांताची सिद्धता १९९४ साली अँड्रू वाएल्स नावाच्या गणितज्ज्ञाने दिली. आता अशी कल्पना करा की आपण १९९३ सालात जगत आहोत. फेर्ख्माने दिलेल्या सिद्धांताची सिद्धता आपल्याला (मनुष्यजातीला) ज्ञात नाही, म्हणजेच आपल्यातल्या कोणालाच त्याचे प्रमाणित ज्ञान नाही. पण, आपल्याला एक गोष्ट मात्र ज्ञात आहे, ती ही की एकतर फेर्ख्मा बरोबर आहे किंवा तो चुकला आहे. तो जरी बरोबर असेल, तरी त्या सत्याचे आपल्याला ज्ञान नाही, आणि तो चुकला असेल, तर त्याही सत्याचे आपल्याला ज्ञान नाही. पण फेर्ख्मा काहीतरी निरर्थक बडबड नक्कीच करत नव्हता, म्हणजेच तो जे काही म्हणत होता ते एकतर सत्य आहे किंवा असत्य आहे, हे नक्की. फक्त ते काय (म्हणजेच दोघांपैकी कुठले) आहे, याचे ज्ञान मात्र आपल्याला सद्यःस्थितीत (१९९३ मध्ये) नाही.
आता कल्पना करा की जग १९९४ मध्ये सरकलेले आहे, आणि काही दिवसांपूर्वीच अँड्रूने फेर्ख्माला खरे ठरवले आहे. १९९४ साली अँड्रूने जगन्निर्मात्या केशवाच्या अवताराप्रमाणे या ग्लानी आलेल्या धरणीला अज्ञानाच्या काजळी कोपर्यातून तेजाकडे नेण्याचे काम केले आणि आपल्या ज्ञानात भर पडली. यातून एक स्पष्ट होते की आपल्या ज्ञानाच्या कक्षा सदा रुंदावणार्या असतात. पण, एक बाब जी बरेच वेळा दुर्लक्षिली जाते ती म्हणजे सत्याच्या कक्षा मात्र बर्यापैकी स्थिर असतात. आपल्या ज्ञानाने सत्यावर काहीही परिणाम होत नाही. आपल्याला १९९३ मध्ये फेर्ख्माच्या सिद्धांताबद्दल कुठल्याही बाजूने (म्हणजेच एकतर तो सत्य आहे किंवा असत्य आहे) दृढ विश्वास वाटत असो, आपल्या विश्वासाने त्याचे सत्य ठरणार नव्हते. त्याचे सत्य ठरलेलेच होते. अँड्रूकृपेने आपल्या ज्ञानभांडारात १९९४ मध्ये त्या सत्याची भर पडली, एवढेच.
आपले ज्ञान प्रवाही असते, त्यात सतत भर पडत असते. काही ज्ञान बदललेदेखील जाते. जसे की जगाच्या प्रतलावरील पृथ्वीच्या केंद्रस्थानाबद्दलचे आपले जुने ज्ञान आपण सापाच्या कातीप्रमाणे टाकून नवीन ज्ञान अंगीकारले. पण, त्याने सत्यावर (म्हणजेच सत् किंवा अस्तित्वाच्या प्रश्नावर) काहीही फरक पडला नाही. म्हणजेच, ज्ञानशास्त्राचा सत्ताशास्त्रावर काहीही परिणाम झाला नाही.
सध्या २०२० सालात गोल्ड्बाखची अटकळ (conjecture) हे असेच न ज्ञात असलेले एक सत्य आहे. न ज्ञात असलेल्या अश्याच गोष्टींच्या धर्तीवर मी असेही प्रतिपादन करू शकतो की आपल्यापासून एक दशलक्ष प्रकाशवर्ष दूर एका ग्रहावर माझी देवी वसते. या दाव्यात मी मुख्यतः काय (अस्तित्वात) आहे, ते सांगतोय; मला कशाचे ज्ञान आहे, हे नव्हे. हा एक सत्ताशास्त्रीय दावा आहे, ज्ञानशास्त्रीय नव्हे. त्यामुळे जोपर्यंत आपण त्या ग्रहापर्यंत पोहोचू शकत नाही, तोपर्यंत आपल्याला या दाव्यातील सत्याचे उत्तर मिळणे शक्य नाही. पण त्याचे उत्तर मात्र या क्षणीच ठरलेले आहे, माझ्या ज्ञानाचा त्या उत्तराच्या सत्यतेवर काहीही परिणाम नाही. असे अनेक दावे करून करोडो ज्ञानशास्त्रीय कोडी निर्माण केली जाऊ शकतात. जे जे आपल्याला ज्ञात नाही, म्हणजेच ज्या सत्यांचे आपल्या सद्यःस्थितीतील ज्ञानभांडारात स्थान नाही, त्या सगळ्यावर आधारून अशी कोडी निर्माण केली जाऊ शकतात. ती निर्माण करणे निरर्थक असते.
याच न्यायाने कुठेतरी स्वर्ग आहे, आणि तेथे माणसासमान (किंवा थोडेफार वेगळी असलेली) मंडळी वसतात, आणि ते या समस्त जगाचा रहाटगाडा हाकतात, अश्या श्रद्धा निरर्थक आहेत. त्यासोबतच, एकच ईश्वर आहे, तो म्हणजे अल्लाह, अश्याही सर्व श्रद्धा निरर्थक असतात. ज्या काळात या सगळ्या श्रद्धा प्रस्थापित झाल्या त्या काळात आपल्याला फार काही ज्ञात नव्हते. आपले ज्ञानभांडार फार छोटे होते. हबल दुर्बिणीला फार दूरवर शोधूनही अशी कुठलीही वसाहत किंवा अल्लाह सापडलेला नाही. आपण या प्रश्नावर फार वेळ आणि बौद्धिक श्रम खर्च करणे गरजेचे नाही, कारण तो प्रश्न ज्ञानशास्त्रीय आहे. आपण मात्र सत्याच्या शोधात मग्न राहावे.
पुनश्च मनुस्मृतीकडे वळून पाहताना असे लक्षात येते की नास्तिक्याचा प्रश्न हा सत्ताशास्त्रीय आहे, मनुस्मृतीने सादर केलेले त्याचे ज्ञानशास्त्रीय आकलन अमान्य करायला हवे. जे सत्य म्हणून प्रमाणित झाले आहे, त्यास मानावे. दैनंदिन जीवन त्याप्रमाणे जगावे. पण जे असत्य म्हणून प्रमाणित झाले आहे, त्यासही प्रमाण म्हणून मानावे, हा विचार घातक आहे. असा विचार केल्याने दैनंदिन जीवनात काहीतरी भयंकर घडू शकते. आणि ज्या सत्याचे प्रामाण्य तपासण्यात आलेले नाही किंवा प्रमाणित केले गेलेले नाही, त्यास प्रमाणित सत्य मानणे म्हणजे तर मूर्खपणाचे लक्षण. असे केल्याने दैनंदिन जीवनात आपण फार मोठा धोका पत्करत असतो.
आपण जरी वेदप्रामाण्य मान्य केले, तरी त्याचा सत्याशी काहीही संबंध नाही. म्हणजेच नास्तिकतेचा प्रश्न हा खरा कुठल्याही प्रमाणव्यवस्थेचा किंवा प्रामाण्याचा नाही, असे मला वाटते. आपण सत्ताशास्त्रीय प्रश्नावर आपले नास्तिक्य उभे करणे गरजेचे आहे. त्या विचाराचा आधारस्तंभ बुद्धिप्रामाण्य हा असावा. आता मला अभिप्रेत असणारे बुद्धिप्रामाण्य म्हणजे तरी नक्की काय, या प्रश्नाकडे वळूया.
ज्ञानशास्त्रीय दावे तपासून पाहण्याच्या, म्हणजेच प्रामाण्याच्या पद्धतीवर फार ऊहापोह झालेला आहे. त्यासंबंधी थोडे जाणून घेऊया. युरोपीय तत्त्वज्ञानात पूर्व-अर्वाचीन काळात एक ‘बुद्धिवाद (विवेकवाद/rationalism) विरुद्ध अनुभववाद (empiricism)’ असा विचारांचा सामना रंगला. बुद्धिवादी तत्त्वज्ञा म्हणत की सर्व (किंवा पर्यायाने, सर्वोच्च) ज्ञान हे बुद्धीने होते. आपल्या इंद्रियांची विश्वासार्हता अबाधित असते, या तत्त्वावर साशंकता व्यक्त करण्याचा तो एक मार्ग होता. आपल्याला सतत अनेक भास होत असतात, उदा. मृगजळ. यामुळे आपण इंद्रियांना प्रमाण मानणे चूक आहे, असे त्यांचे मत होते.
अनुभववादी तत्त्वज्ञ मात्र इंद्रियांद्वारे झालेल्या अनुभवांवर आधारित ज्ञानाला सर्वस्व मानत (किंवा पर्यायाने सर्वोच्च स्थान देत). का? कारण माझी बुद्धी मी गहाण ठेवू शकतो. कुठल्या तरी अल्लाहने २ + २ = ५ असे संगितले, आणि मी त्या अल्लाहचा पाइक असेन, तर त्या दिवसापासून माझ्यासाठी २ + २ बरोबर ५ होतात, आणि दुसरे काहीही असूच शकत नाही. मला माझ्या इंद्रियांकरवी त्याविरोधातले कितीही अनुभव आले तरीही माझा विश्वास अल्लाहवर, आणि अनुक्रमे ५ या संख्येवर, दृढ राहील. असे प्रतिपादन करून अनुभववाद्यांकडून बुद्धीच्या प्रमाण असण्यावर प्रश्नचिन्ह उभे केले गेले.
येथे चर्चिलेल्या बुद्धिवादाचा आणि मला अभिप्रेत असणार्या बुद्धिवादाचा काही संबंध आहे का? या लेखाच्या शीर्षकात वापरलेला ‘बुद्धिवाद’ हा येथे ऊहापोह केलेल्या बुद्धिवादापेक्षा थोडा वेगळा आहे, किंवा बुद्धी विरुद्ध अनुभव याआधारे त्या बुद्धिवादाची व्याख्या करणे चूक आहे, असे मला वाटते. वर चर्चिलेल्या बुद्धिवादाला आपण ‘तात्त्विक/तत्त्वज्ञानीय बुद्धिवाद’ म्हणूया (कारण त्याची चर्चा शक्यतो तत्त्वज्ञानात झाली आहे), आणि मला अभिप्रेत असणार्या बुद्धिवादाला ‘सामान्य बुद्धिवाद’ म्हणूया, कारण तो आपले दैनंदिन आयुष्य सार्थक करण्यास मदत करतो.
दैनंदिन आयुष्यात विज्ञानाचे महत्त्व पटवून देण्याची गरज नसावी, असे मी गृहीत धरतो. आपण ज्या उपकरणावर हे वाचत आहात, ते विज्ञानाचीच देण आहे. विज्ञान हे अनुभवांद्वारेच पुढे जाऊ शकते. अनुभवविरहित विज्ञान शक्य नाही. मला आदर्श वाटणार्या नास्तिक्यात विज्ञानावर भर आहे, म्हणजेच अनुभवांवरही भर आहे. याअर्थाने बुद्धी-अनुभव या दोघांपैकी कुठल्यातरी एकाच प्रमाणव्यवस्थेच्या आधारे चालण्याची गरज मला अभिप्रेत असलेल्या सामान्य बुद्धिप्रामाण्यात नाही. त्यात विवेकाचे व अनुभवाचेही ज्ञानातले योगदान मान्यताप्राप्त आहे. हे झाले सामान्य बुद्धिप्रामाण्याचे पहिले लक्षण.
मनुस्मृतीप्रमाणे इतरही काही पंथ नास्तिक ठरतात. आता त्यांच्याकडे, म्हणजेच बौद्ध व जैन पंथांकडे वळूया. तात्त्विकदृष्ट्या अनेक विचारप्रवाहांमध्ये दोन प्रकारची मूलतत्त्वे मान्य केलेली असतात. एक जडतत्त्व, दुसरे चेतनातत्त्व. त्यांनाच आलटून-पालटून पुरुष-प्रकृती (matter-spirit) अशी नावे दिली जातात. माझ्या मते नास्तिक असणे म्हणजे खरेतर सार्या जगाचा गाडा एकाच तत्त्वावर हाकला जातो, हे मान्य करणे होय. ते एक तत्त्व म्हणजे जडतत्त्व. त्या एकमेव जडतत्त्वावरचा विश्वास हे आणखी एक सामान्य बुद्धिप्रामाण्याचे लक्षण.
येथे गैरसमज न व्हावा म्हणून स्पष्ट करू इच्छितो की जगाचा गाडा जडतत्त्वावर चालतो, म्हणजे तो ‘विचारांच्या’ जोरावर चालत नाही, असे माझे मुळीच म्हणणे नाही. विचार ही शेवटी सुपीक मानवी मनाची फळेच की! त्या न्यायाने विचारही जडतत्त्वापासूनच उत्पन्न होतात. जडतत्त्वाची अविरत उकल करत राहणे हे विज्ञानाचे परम (आणि एकमेव) कर्तव्य आहे. ही उकल करण्याची पद्धत अनुभववादी असली तरी त्या अनुभवांवर आधारलेले निष्कर्ष काढणे म्हणजे तात्त्विक बुद्धिवाद/विवेकवाद होय.
आता आपण विचारू शकता की त्या दुसर्या मूलतत्त्वाचे, म्हणजेच चेतनेचे काय? तर नास्तिक लोक त्या तत्त्वाला वेगळ्या जोडीच्या परिप्रेक्ष्यातून पाहू शकतात. ती म्हणजे भौतिक-मानसिक ही जोडी. अनेक लोक अध्यात्मातून त्यांचे जीवन सुखकर करतात, त्याचे काय? मानसिक जगाचा विस्तार फार मोठा आहे. आध्यात्मिक वाटाव्या अश्या सगळ्या बाबींची उकल मनाच्या उद्यमशीलतेतून केली जाऊ शकते. आध्यात्मिक वाटावे असे सारे काही शेवटी मानवी मनाची उपज आहे, हे आपल्या सामान्य बुद्धिप्रामाण्यवादी नास्तिक्याचे आणखी एक महत्त्वाचे लक्षण. अध्यात्मात काहीतरी गूढ आहे, हे आपण नाकारले पाहिजे.
आपण पाहिले की जडतत्त्वाचे नियम शोधणे हे विज्ञानाचे काम आहे. पण आध्यात्मिक तत्त्वाच्या नियमांचे काय? ते सगळे ठरते ते आपल्या मानसिक संकल्पनांच्या नियमांप्रमाणे. मी जर आपल्याला हरी कुंभार त्याच्या झाडूवर उडत क्विडिच खेळत आहे अशी कल्पना करायला लावली, तर ती कल्पना करणे आपल्याला सहज शक्य होईल. भौतिकदृष्ट्या अशक्य असले तरीही प्रकाशाच्या वेगापेक्षा अधिक वेगाने जाणार्या अणूची कल्पना करणे शक्य आहे. पण मी जर आपल्याला आवाहन केले की आपण एक अशा वाघाची कल्पना करा, ज्याच्या अंगावरती ‘गोल-आणि-चौकोनी’ पट्टे आहेत, म्हणजे प्रत्येक पट्टा हा एकाचवेळी गोल आणि चौकोन हे दोन्हीही आहे, तर ते आपल्याला शक्य होणार नाही. आपण तो कल्पनेतला वाघ तर बघू शकत असाल, पण त्याचे पट्टे नक्कीच बघू शकत नसाल. म्हणजेच कल्पनाविश्वाला काही परिसीमा आहेत. त्याच परिसीमा आध्यात्मिक विश्वालादेखील बंदिस्त करतात. कोणीही अध्यात्मात कितीही तरबेज असले तरी ‘गोल-आणि-चौकोन’ अश्या वस्तूची कल्पना करू शकत नाही.
धार्मिक विश्वातील एक प्रचलित तत्त्व म्हणजे कर्मसिद्धान्त. भारतीय परिप्रेक्ष्यात नास्तिक असणे म्हणजे या व अश्या सगळ्या आध्यात्मिक भासणार्या गोष्टींचा त्याग करणे. बौद्ध व जैन पंथ या वा आध्यात्मिक तत्त्वावर आधारित अश्या अनेक गोष्टींवर आपले तत्त्वज्ञानाचे आणि पंथांचे नियम उभे करतात. त्यामुळे माझ्या नजरेत ते नास्तिक नाहीत. यापलीकडे जाऊन आत्मा, पुनर्जन्म व इतर अनेक विज्ञानविरोधी गोष्टींना अंगीकारणे म्हणजे नास्तिकत्वाला तिलांजली देण्यासमान आहे. मनुस्मृतिकर्त्याला जरी वाटत असले, तरीही हे पंथ नक्कीच नास्तिक नाहीत. त्याचे कारण म्हणजे सामान्य बुद्धिप्रामाण्याच्या कसोटीवर आध्यात्मिक गोष्टी तग धरू शकत नाहीत.
शेवटचा (आणि माझ्या मते सर्वांत महत्त्वाचा) प्रश्न उरतो तो श्रद्धेच्या वस्तुसंबंधीचा. आस्तिक लोकांची श्रद्धा कुठल्यातरी गोष्टीप्रति उद्देशून असते. श्रद्धा असते ती कुठल्यातरी गोष्टीबद्दल, मग ती कुठली (भौतिक/मानसिक) वस्तू असू शकते (उदा. देव/देवी/अल्लाह), किंवा कुठला नियम असू शकतो (उदा. कर्मसिद्धांत), किंवा आणखी काही असू शकते. श्रद्धेला अर्थ प्राप्त होण्यासाठी श्रद्धेची काहीतरी वस्तू असणे गरजेचे असते हे मात्र नक्की. बिना वस्तूची, म्हणजेच कशासही उद्देश न करणारी श्रद्धा असणार तरी कशी?
यातला एक महत्त्वाचा पैलू म्हणजे मुळात त्यांची श्रद्धा कशाबद्दल आहे, हे आस्तिक लोकांना फारसे स्पष्ट नसते. त्याबद्दल त्यांच्यावर प्रश्नांचा भडिमार सुरू केला की लवकरच या सगळ्या प्रकारातला सावळा गोंधळ समोर यायला लागतो. यातूनच त्यांच्या ज्ञानशास्त्रात गोंधळ नसला तरी सत्ताशास्त्रात नक्कीच काहीतरी गौडबंगाल आहे, हे कळून येते. यासंबंधी थोडे सखोल विश्लेषण बघूया.
भविष्यात कधी असे एखादे अंतराळयान निर्माण झाले जे मला एक दशलक्ष प्रकाशवर्ष दूरच्या माझ्या देवीच्या वारीवर घेऊन जाऊ शकते, तर मी त्या यानाद्वारे आवर्जून तेथे जाऊ इच्छितो. अशी कल्पना करा की मी तेथे पोहोचलो आणि मला कळले की अशी कुठलीतरी देवी नक्कीच अस्तित्वात आहे. आता पुढचा महत्त्वाचा प्रश्न आहे तो कार्यकारणभावाचा किंवा कारण-सिद्धांताचा (causality). आपल्याला असा प्रश्न पडला पाहिजे की ती देवी असं नक्की काय-काय घडवून आणू शकते? ती अश्या कोणत्या सगळ्या गोष्टींसाठी कारण ठरू शकते? तिच्यात एक वस्तू म्हणून असलेली कारकता नेमकी किती? हे प्रश्न विचारणे महत्त्वाचे आहे कारण तिच्या अस्तित्वाची सत्ताशास्त्रीय उकल आपल्याला तेव्हाच होईल जेव्हा आपल्याला अशा सगळ्या प्रश्नांची समर्पक उत्तरे मिळतील. फक्त ज्ञानशास्त्रीय उत्तरे शोधणे येथे तोकडे ठरते.
माझ्या मते आपण अश्या दूर वसलेल्या दैवी गोष्टींचे अस्तित्व ना मानण्यात काही अर्थ आहे, ना नाकारण्यात! माझ्या मते ही चर्चाच निरर्थक आहे. या जगातील मूल्यवान संसाधने, मग ती भौतिक असो किंवा मानसिक, अश्या गोष्टींवर खर्च करणे म्हणजे सदसद्विवेकबुद्धीकडे कानाडोळा करणे आहे. खरे तर आपण या सगळ्यासंबंधी पुढीलप्रमाणे विचार करायला हवा: जरी अश्या काही गोष्टी कुठे असतील, तरीही त्या काय करू शकतात? त्या कशासाठी कारणीभूत ठरू शकतात, यावर आपण भर दिला पाहिजे. म्हणजेच आपण ‘दैवी गोष्टी (अस्तित्वात) असतात का?’ ऐवजी ‘दैवी (भासणार्या) गोष्टी (अस्तित्वात) असल्या तरी नक्की त्यांचे दैवत्व कशातून सिद्ध होते?’ या प्रश्नावर भर द्यायला हवा. ते पाण्याऐवजी बेडकांचा पाऊस पाडू शकतात का, हा मला हल्ली सतावत असलेला असाच एक प्रश्न. कर्मसिद्धांताच्या अस्तित्वाबद्दलही असेच प्रश्न उपस्थित केले जाऊ शकतात.
येथे स्पष्ट करू इच्छितो की ही देवी सध्या अस्तित्वात असणार्या कुठल्याही धर्माशी/पंथाशी संलग्न नाही. ती मी निर्माण केलेली देवी आहे. त्यामुळे तिचा आणि सध्या अस्तित्वात असणार्या कुठल्याही धर्माचा किंवा पंथाचा काहीही संबंध नाही. आजच्या जगातील कुठल्याही पंथियांनी तिला विचारलेल्या प्रश्नांबद्दल गैरसमज करून घेऊ नये. माझी देवी आपल्यापैकी कोणाचेच श्रद्धास्थान नाही.
या विश्लेषणातून मला नास्तिक्यामधल्या ‘बुद्धिप्रामाण्यवादी’ या शब्दातले प्रामाण्य या घटक शब्दाचे, आणि अनुक्रमे प्रमाणव्यवस्थेचे महत्त्व कमी करायचे होते. नास्तिक्याचा संबंध बुद्धी आणि प्रामाण्य या दोघांशी असला तरीही सामान्य बुद्धिप्रामाण्यवादी नास्तिक्याची जडणघडण ही माझ्या मते पुढील सत्ताशास्त्रीय विचारस्तंभांवर उभी आहे:
१. एकच मूलतत्व आहे, आणि ते म्हणजे जडतत्त्व.
२. त्या जडतत्त्वाचे सगळे नियम शोधण्याचे काम विज्ञानाचे आहे.
३. आध्यात्मिक भासणार्या सगळ्या गोष्टींची उकल मानसिक विचारविश्वाच्या नियमांप्रमाणे केली जाऊ शकते.
४. नास्तिक्य हे ज्ञानशास्त्रीय नसून ते सत्ताशास्त्रीय विचारांवर उभे आहे.
५. या विचारांप्रमाणे उद्या आपल्याला नवीन काही ज्ञात झाले (कशाचे ज्ञान झाले, प्रामाण्य मिळाले, प्रमाणित झाले), तरीही त्याला आस्तिक्य जोडण्याची आवश्यकता नाही.
जे लोक स्वतःला या तत्त्वांशी एकरूप समजतात, त्यांनाच आपण खरे तर नास्तिक असे संबोधले पाहिजे. आणि त्यांची नास्तिकता ही नुसती जगाचा निर्माता (किंवा निर्माती) नाकारणारी नसून कुठल्याही स्वरूपातला(ली) करता(ती)-करविता(ती) देखील नाकारणारी आहे. त्यामुळे अशा नास्तिक्याला बुद्धिप्रामाण्यवादाचे बिरुद जोडावे. माझ्या मते हीच खरी बुद्धिप्रामाण्यवादी नास्तिक्याची एकसंध संकल्पना होय. ती माझ्या मनाच्या कचाट्यात सापडली, असा मला विश्वास वाटतो आहे. हा कबड्डीचा डाव कोणी जिंकला, हे वाचकवर्गाने ठरवावे.
धन्यवाद, स्पष्ट संकल्पना, उत्कृष्ट मांडणी
धन्यवाद, डॉक्टर साहेब!
लेख विचारप्रवर्तक. पण सत्ताशास्त्रीय विचारस्तंभांत मनाचे काय? ते जड की चेतन? जडाची व्याख्या कशी करणार?
धन्यवाद!
आपला या अंकातील लेख महितीपूर्ण आणि उत्तम आहे.
मन जड की चेतन?
जड. चर्च्लंड दांपत्याच्या कार्यानंतर मनासंबंधी जडवादाला सुगीचे दिवस आले. विषय तिथेच थांबला नसून सध्या ‘देहमय मन (embodied mind)’ ही उपपत्ति प्रचलित होत आहे. विचारबाजारात जडवाडी मनाचे अनेक पर्याय उपलब्ध आहेत. माझ्या माहितीनुसार डॉकिन्सला चेतनेचा प्रश्न महत्वाचा वाटतो. त्या प्रश्नाला वरील उपपत्ति निर्णायक उत्तर देत नसतील तरी समर्पक उत्तर नक्कीच देतात.
जड: ते जे अवकाशात विस्तीर्ण असते.
धन्यवाद!
आपण दिलेल्या जडाच्या व्याख्येत मन बसते का? तसे मानणार असाल तर जड पदार्थांना लागू होणारे वैज्ञानिक नियम मनाला कसे काय लागू होतात (किंवा होत नाहीत) हे समजावून सांगण्याची जबाबदारी येते. तसे सांगणारी (अ) जडवादी गृहितप्रमेये आहेत तशी (आ) चेतनावादी आणि मानसवादी गृहितप्रमेये सुद्धा आहेत. ही (आ) प्रमेये सर्वसामान्य अभिप्रेत आस्तिक-नास्तिक चौकटीत बसणारी नाहीत. Churchland, Dennett वगैरेंचा Eliminative Materialism हा कित्येकांना समर्पक वाटत नाही! तत्वज्ञांमधे सुद्धा त्याला फारशी मान्यता नाही. मन, भावना यांना नाकारायचे असेल तर वेदांत किंवा माध्यमक काय वाईट? अर्थात इतर जडवादी पर्याय आहेत. पण ते पदार्थ विज्ञानात समानेय (reducible) नाहीत. त्यामुळे २१व्या शतकातले शरीर-मन या संबंधीचे आकृतीबंध असमानेयता मान्य करून पुन्हां (आ) कडे झुकू लागलेत. यातल्या एका नवीन पर्यायाचा उल्लेख मी माझ्या लेखात केला आहे.
मला वाटत या निबंधाचा पार्ट २ यायला हवा . बर्याच प्रश्नांचि सुरवात झाली …. धन्यवाद .
राजेंद्र अ. वैद्य .
आपल्याला कोणत्या प्रश्नांवर आणखी वाचायला आवडेल, ते कळवावे.
धन्यवाद!
लेखाची शैली, प्रवाह, शब्दांची निवड.. अप्रतिम आहेत ..
सामान्य बुद्धिवाद यासाठी मी प्रज्ञावाद असा पर्यायी शब्द सुचवतो..
सत्ता शास्त्र आणि ज्ञान शास्त्र त्यांच्यातील परस्परसंबंधांची उकल होणे हे आवश्यक आहे…
धन्यवाद कॉम्रेड!
प्रज्ञावाद हा शब्द मान्य. तो सुचवल्याबद्दल आभार!
आपण नोंदवलेले निरीक्षण महत्वाचे आहे. माझी भूमिका सत्ताशास्त्राला पाया मानणारी असल्यामुळे सत्ताशास्त्रावर ज्ञानशास्त्र उभे राहावे असे मला वाटते. म्हणजे सत्ताशास्त्रीय सीमा या ज्ञानशास्त्रीय सीमंपेक्षा महत्वाच्या ठरतात. त्यांच्या परस्परसंबंधांवर लवकरच लिहिण्याचा प्रयत्न करेन.
भारतीय तत्त्वज्ञानात प्रज्ञा ही संकल्पना (!) महत्त्वाची. पहा.. प्रज्ञानं ब्रह्म (ऐतरेय उपनिषद). वेदांत-सांख्यात शरीर-मन-बुद्धी हे सर्व जड (मिथ्या, प्राकृतिक) मानल गेलय.. इथपर्यंत ठीक, पण चेतनेला (प्रज्ञा-ब्रह्म, पुरूष) मूलभूत, मूलाधार मानल गेलंय त्याच काय? या संकल्पनातीत (!) चेतनेच्या संन्निकर्षाने शरीराला चैतन्याची, मनाला भावनेची, आणि बुद्धीला विवेकाची आणि प्रतिभेची प्राप्ती होते.. विवेकबुद्धी, न्यायबुद्धी, किंवा प्रतिभा या अर्थाने जरी प्रज्ञा ही संकल्पना घेतली तरी त्यात चैतन्याचा अंश किंवा चेतनेचा मूलाधार आहेच! हे सर्व “कॉम्रेड”ना आणि “जडवादी” लेखकांना मान्य होईल का नाही याची कल्पना नाहीं !
सत्ताशास्त्र आणि ज्ञानशास्त्र यांचा अन्योन्य संबंध आहे आणि म्हणूनच त्याचा संपूर्ण उलगडा होणे अशक्य वाटते. त्याच अर्थाने जीवशास्त्र पदार्थ विज्ञानात समानेय होणे किंवा शरीर-मन द्वैताचे पूर्णपणे आकलन होणे अशक्य वाटते… मग Churchland वगैरेंचा Plato’s Camera कितीही घनदाट आकृतीबंध दाखवो. याचा अर्थ आकलनाचे प्रयत्न थांबवावेत असे मात्र नाही!
भारतीय तत्त्वज्ञानात प्रज्ञा ही संकल्पना (!) महत्त्वाची. पहा.. प्रज्ञानं ब्रह्म (ऐतरेय उपनिषद). वेदांत-सांख्यात शरीर-मन-बुद्धी हे सर्व जड (मिथ्या, प्राकृतिक) मानल गेलय.. इथपर्यंत ठीक, पण चेतनेला (प्रज्ञा-ब्रह्म, पुरूष) मूलभूत, मूलाधार मानल गेलंय त्याच काय? या संकल्पनातीत (!) चेतनेच्या संन्निकर्षाने शरीराला चैतन्याची, मनाला भावनेची, आणि बुद्धीला विवेकाची आणि प्रतिभेची प्राप्ती होते.. विवेकबुद्धी, न्यायबुद्धी, किंवा प्रतिभा या अर्थाने जरी प्रज्ञा ही संकल्पना घेतली तरी त्यात चैतन्याचा अंश किंवा चेतनेचा मूलाधार आहेच! हे सर्व “कॉम्रेड”ना आणि “जडवादी” लेखकांना मान्य होईल का नाही याची कल्पना नाहीं !
सत्ताशास्त्र आणि ज्ञानशास्त्र यांचा अन्योन्य संबंध आहे आणि म्हणूनच त्याचा संपूर्ण उलगडा होणे अशक्य वाटते. त्याच अर्थाने जीवशास्त्र पदार्थ विज्ञानात समानेय होणे किंवा शरीर-मन द्वैताचे पूर्णपणे आकलन होणे अशक्य वाटते… मग Churchland वगैरेंचा Plato’s Camera कितीही घनदाट आकृतीबंध दाखवो. याचा अर्थ आकलनाचे प्रयत्न थांबवावेत असे मात्र नाही!