जावेद अख्तर यांना ‘रिचर्ड डॉकिन्स अवॉर्ड’ देण्यात येणार असल्याची घोषणा नुकतीच जून महिन्यात ‘सेंटर फॉर एन्क्वायरी’ या संस्थेने केली. विज्ञान, धर्मनिरपेक्षता आणि बुद्धिप्रामाण्यवाद या मूल्यांसाठी त्यांनी घेतलेल्या भूमिकेबद्दल त्यांना हा पुरस्कार मिळणार आहे.
एक गीतकार, पटकथाकार म्हणून जावेद अख्तर यांची ओळख प्रत्येक भारतीयाला आहेच. त्यांच्या व्यक्तिमत्वाच्या तार्किक अंगाची ओळख या ठिकाणी करून देण्याचा माझा प्रयत्न आहे.
जावेद अख्तर यांचा जन्म एका अशा कुटुंबात झाला ज्या घराला साहित्य, कला यांची परंपरा तर होतीच पण शिवाय देशप्रेमाचीही मोठी परंपरा होती. त्यांचे आजोबा फ़जल-हक़-खैरबादी यांनी १८५७च्या उठावात मुस्लिमांनी सहभाग घ्यावा म्हणून फतवा काढला होता. यासाठी त्यांना काळ्यापाण्याची शिक्षा झाली व अंदमानला पाठवले गेले, जिथे त्यांनी मरेपर्यंत ती शिक्षा भोगली. जावेद अख्तर यांचे आई-वडील दोघेही स्वातंत्र्यलढ्यात सक्रियपणे सहभागी होते.
एका मुलाखतीत जावेद अख्तर सांगतात की माझ्या लहानपणी माझ्या संपूर्ण कुटुंबात माझे नाना-नानी (आईकडील आजोबा-आजी) सोडले, तर इतर कोणाला मी प्रार्थना करताना बघितले नाही. माझे बहुतेक कुटुंबीय हे एकतर धर्माबाबत उदासीन होते, नाहीतर रोखठोक नास्तिक होते. आई-वडील स्वातंत्र्यलढ्यात सहभागी असल्याने बहुतेक वेळ घरी नसत. अश्यावेळी, माझा बहुतेक सांभाळ हा माझ्या या धार्मिक नाना-नानींनी केला. ते दोघेही न चुकता पाच वेळा नमाज वाचत असत. मी ८ वर्षांचा असताना माझे नाना मला कुराणातील एक आयत पाठ करण्यासाठी आठ आणे देत. त्याकाळी आठ आणे म्हणजे एका लहान मुलासाठी चांगली चंगळच होती. मग मी आयतीमागून आयती पाठ करण्याचा सपाटाच लावला. एके दिवशी ही गोष्ट माझ्या नानींना कळली. स्वतः धार्मिक असलेली नानी या गोष्टीमुळे मात्र नानांवर चांगलीच नाराज झाली. तिने नानांना खडसावले, “तुम्हांला वाटते का की जी शिकवण तुम्ही या मुलाला देत आहात, ती शिकवण त्याचे आई-वडील जर इथे असते तर त्यांनी त्याला दिली असती म्हणून? तो केवळ आपल्या आश्रयाला आहे म्हणून आपण आपली धार्मिक शिकवण त्याच्यावर लादू शकत नाही.” नानांनीही यातून योग्य तो बोध घेत त्यांच्यावर कुठलेही धार्मिक संस्कार टाकणे थांबविले. पुढे जावेद अख्तर म्हणतात, “मला वाटतं, ही माझ्या आयुष्यातील फार महत्त्वाची घटना आहे. माझ्या धार्मिक नानीच्या विवेकाने माझ्या आयुष्याला एक वेगळे वळण लागण्यापासून वाचवले.” अख्तर यांना घराघरातून लहान मुलांना दिले जाणारे धार्मिक शिक्षण, संस्कार हे त्या मुलांचे शोषणच वाटते. त्यांच्या मते लहान मुलांना, जोपर्यंत ते सज्ञान होत नाहीत तोपर्यंत, कुठल्याही धर्माचे शिक्षण देऊ नये किंवा कोणत्याही धर्माचा संस्कार त्यांच्यावर करू नये. आणि एकदा ते मूल सज्ञान झाले की त्याच्यासमोर सर्व धर्मांचे पर्याय ठेवून हवा तो धर्म निवडायचे स्वातंत्र्य त्याला द्यायला हवे. “अश्या पद्धतीने जर कोणत्याही प्रकारच्या ब्रेनवॉशिंगपासून स्वतंत्र वातावरणात मुलांची वाढ झाली तर अशी मुले कुठलाच धर्म न स्वीकारता नक्कीच निधर्मी राहणे पसंत करतील”, असे ते म्हणतात.
याच मुलाखतीत श्रोत्यांपैकी एकाने नास्तिकांना नेहमी विचारल्या जाणाऱ्या प्रश्नांपैकी एक प्रश्न विचारला. तो म्हणजे “ज्याप्रमाणे पुराव्याचा अभाव हा काही पुरावा मानला जाऊ शकत नाही, त्याचप्रमाणे देवाच्या अस्तित्वाच्या पुराव्याचा अभाव हा काही देवाचे अस्तित्व नाकारण्यामागचा तर्क असू शकत नाही. यावर तुमचे काय मत आहे?” यावर जावेद अख्तर रसेलच्या चहाच्या किटलीचा तर्क प्रभावीपणे मांडतात. ते म्हणतात, “उद्या जर मी असं म्हटलं की एक चहाची किटली आहे, जी पृथ्वी आणि मंगळ यांच्यामध्ये सतत फिरत असते. अश्यावेळी ती किटली खरंच तिथे आहे, हे सिद्ध करण्याची जवाबदारी अर्थातच माझी असेल. आणि ती किटली तिथे आहे याचा पुरावा माझ्याकडे नसला तरी तुमच्याकडे तरी कुठे ती तिथे नसण्याचा पुरावा आहे? म्हणून मग तुम्ही ती तिथे आहे हे खरं माना, असे जर मी म्हटले तर चालेल का? अर्थातच, अश्यावेळी ती किटली खरंच तिथे आहे हे सिद्ध करण्याची जवाबदारी माझी असेल. ती तिथे नाही आहे हे सिद्ध करणे तुमची जवाबदारी नाही. अगदी तसंच, देव नाही हे सिद्ध करणे माझी जवाबदारी नाही, कारण तो आहे हा तुमचा दावा आहे.”
विश्वास आणि श्रद्धा यांमधील फरक सांगताना जावेद अख्तर म्हणतात, “ह्या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत. उदाहरणार्थ, माझा विश्वास आहे की पृथ्वीला एक उत्तरध्रुव आहे. आता तुम्ही असं म्हणाल का की ‘ही माझी श्रद्धा आहे?’ मी उत्तरध्रुवावर गेलेलो नाही, मी उत्तरध्रुव बघितलेला नाही, पण तरीही मला माहीत आहे की उत्तरध्रुव आहे, कारण असे बरेच लोक आहेत की जे उत्तरध्रुवावर गेलेले आहेत. मला जर तपासून बघायचे असेल तर मी स्वतः उत्तरध्रुव बघायला जाऊ शकतो ही शक्यतापण खुली आहे. म्हणून उत्तरध्रुव आहे हे मला खरे वाटते. त्या निष्कर्षाप्रत मी पोचतो. पण, तुम्ही जर एखाद्या निष्कर्षावर, गोष्टीवर कुठलाही पुरावा, साक्ष, तर्क किंवा कार्यकारणभाव नसताना विश्वास ठेवत असाल तर त्याला तुमचा ‘विश्वास’ आहे असे म्हणता येणार नाही, तर ती तुमची ‘श्रद्धा’ आहे असं म्हणावं लागेल. बऱ्याचदा, आपण अंधश्रद्धा हा शब्द वापरतो, पण मला असा वेगळा शब्द वापरणे चुकीचे वाटते. कारण शेवटी प्रत्येक श्रद्धा ही अंधश्रद्धाच आहे. प्रत्येक श्रद्धा ही अंधपणेच स्वीकारली जाते त्यामुळे श्रद्धा आणि अंधश्रद्धा ह्या वेगवेगळ्या नसून एकच आहेत. एका व्यक्तीने जर एखाद्या गोष्टीवर कुठल्याही पुराव्याशिवाय, तर्काशिवाय विश्वास ठेवला तर त्याला मूर्ख ठरविण्यात येते. पण हेच जेव्हा लाखो लोक करतात, तेव्हा त्याला ‘श्रद्धा’ हे गोंडस नाव देण्यात येते. उद्या मी जर असे म्हटले की ‘मी बिल गेट्स यांचा चुलतभाऊ आहे अशी माझी श्रद्धा आहे. या श्रद्धेमुळे मला प्रचंड मानसिक समाधान मिळते’, तर तुम्ही मला वेडं ठरवाल. मला प्रश्न विचाराल, पुरावे मागाल. पण तेच उद्या जर काही लाख लोकांनी बिल गेट्ससोबत असं नातं सांगितलं किंवा असाच एखादा बिनबुडाचा दावा केला तर त्यांना वेडं ठरवणं दूरच तुम्ही त्यांना कुठलाही प्रश्न विचारू शकत नाही किंवा पुरावा मागू शकत नाही. आजही आपल्या आजूबाजूला लाखो-करोडो लोक बिल गेट्सऐवजी मृत व्यक्ती, अदृश्य शक्ती यांच्याशी आपले असेच नाते असल्याचा दावा करतात. आपण त्यांना धार्मिक म्हणतो. एखाद्या वेडगळ समजुतीवर एका व्यक्तीऐवजी लाखो लोकांनी विश्वास ठेवला तर अचानक तिला श्रद्धेचे स्वरूप प्राप्त होते.”
उर्दू भाषेविषयी विचार मांडताना जावेद अख्तर सांगतात की बऱ्याच लोकांना उर्दू ही या देशाबाहेरील आणि फक्त मुसलमानांची भाषा आहे असे वाटते. पण इतर कुठल्याही भारतीय भाषेइतकीच उर्दू ही भारतीय भाषा आहे. उर्दूचे वैशिष्ट्य असे की तिच्या जन्मापासूनच ती निधर्मी आहे. कारण जगातील प्रत्येक भाषेत जेव्हा काव्यनिर्मिती झाली तेव्हा ती देव, धर्म यांची स्तुती करण्यासाठीच झाली. याउलट उर्दू ही एकमेव भाषा अशी आहे की ज्यात काव्यनिर्मीतीची सुरुवातच मुळी देव, धर्म सोडून मानवी जीवनातील सुख-दुःख सांगण्यासाठी झाली. एवढेच नाही, तर सुरुवातीच्या उर्दू शायरीत धर्माला खलनायकी भूमिकेत रंगवण्यात आले आहे. कुराणचे पहिले उर्दू भाषांतर १७९८ मध्ये झाले. त्याच्या ७०० वर्षांपूर्वी कुराण हे सिंधी भाषेत उपलब्ध होते. आणि हे भाषांतर ज्यावेळी झाले त्यावेळी “पवित्र कुराण या कमी दर्जाच्या भाषेत का आणले? उर्दू ही काफ़िरांची भाषा आहे” अशी धर्मगुरूंची भूमिका होती. केवळ आणि केवळ द्विराष्ट्रसिद्धांताची गरज म्हणून उर्दू ही फक्त मुसलमानांची भाषा आहे असा गैरसमज पसरवला गेला असे जावेद अख्तर म्हणतात.
धर्माविषयी बोलताना जावेद अख्तर म्हणतात, “माझ्या दृष्टीने सर्व धर्म सारखेच आहेत, सारखेच… चुकीचे! नास्तिकांचा कुठल्याच धर्मावर विश्वास नसतो म्हणून धार्मिकांना आश्चर्य वाटतं. पण माझ्या मते प्रत्येक धार्मिक व्यक्ती ही ९०% नास्तिकच असते कारण स्वतःचा धर्म सोडला तर इतर सर्व धर्म व त्या धर्मांतील ईश्वरकल्पना त्यांनी नाकारलेल्याच असतात. नास्तिक लोक इतर धर्मांसोबत स्वतःचा धर्म व देव पण नाकारतात एवढेच. धर्मावर विश्वास असणारे जेवढ्या चिकित्सकपणे इतरांच्या धर्मांचा विचार करतात तेवढा जर ते स्वतःच्या धर्माचा करू शकले तर त्यांचाही स्वतःच्या धर्मावरचा विश्वास उडेल.”
‘रिचर्ड डॉकिन्स अवॉर्ड’ मिळणारे जावेद अख्तर हे पहिले भारतीय असतील. आतापर्यंत जेम्स रँडी, क्रिस्तोफर हिचेन्स, बिल माहेर, स्टिव्हन पिंकर अशी आपापल्या क्षेत्रातील प्रचंड यशस्वी, प्रसिद्ध नावे असून असून विज्ञान, धर्मनिरपेक्षता आणि बुद्धिप्रामाण्यवाद या मूल्यांसाठी जाहीर भूमिका घेणाऱ्या जगभरातील मान्यवरांना हा पुरस्कार मिळाला आहे. हा पुरस्कार म्हणजे जावेद अख्तर यांच्या योगदानाची पावती तर आहेच पण आपला देश आत्ता ज्या अवस्थेतून जात आहे त्यावेळी या पुरस्काराला विशेष अर्थ प्राप्त होतो. आज देशातील बहुसंख्याकांचा आरोप असतो की – अल्पसंख्याक हे कसे आमच्यापेक्षा अधिक अपरिवर्तनीय आहेत, अधिक प्रतिगामी आहेत. अश्यावेळी कुणा जावेदची निवड ही देशातील बुद्धिप्रामाण्यवादाचा आवाज म्हणून होणे हे फार फार महत्त्वाचे आहे.
मोबाईल : ९३२५२०६०९४
खूप छान….जावेद अख्तरांबाबत खूप बांग्ला माहिती वाचायला मिळाली.
खूप*
जावेद अख्तरांसाठी ही खूप मोठी archivement.
त्यांचे खूप खूप अभिनंदन.
Excellent my hearty congratulations 💕💐🌹,Javed Akhtar saheb has always been a source of inspiration and guiding spirit for indian masses as a social activist and great human being.
आँक्टोबरच्या अंकातील ‘रँशनल जावेद अख्तर’ हा रवि आमले यांचा लेख वाचला. जावेद अख्तर यांची तुलना हमीद दलवाईंशी होऊ शकते. त्यांना मिळालेल्या ‘रिचर्ड डाँकिन्स आवार्ड’ बद्दल त्यांचे मन:पूर्वक अभिनंदन! पण त्यांचे श्रध्दा व अंधश्रध्दा या विषयीचे विधान न पटण्यासारखे वाटते. त्या दोन्ही एकच असे म्हणणे योग्य वाटत नाही. श्रध्दा हा माणसाच्या जीवनाचा आधार आहे. आई,वडील, गुरुजी, वा इतर आदरणीय व्यक्तिंवरील श्रध्देमुळेच माणूस घडत असतो हे नाकारुन चालणार नाही. ईश्वराचे अस्तित्व आजच्या कलीयुगात प्रत्यक्ष पुराव्यानिशी सिध्द करता येत नसले; तरी त्याचे न असणेही पुराव्यानिशी सिध्द करता आलेले नाही. पण जीवनात अनेक वेळा असे प्रसंग उद्भवतात ज्यामुळे माणूस हतबुध्द होतो, पण श्रध्दाळू माणसाच्या प्रार्थनेने तो त्या प्रसंगातून निभाऊन निघतो. अकस्मितरित्या त्याला मदत मिळते. माझ्या स्वत:च्या जीवनात मला असे अनेक प्रसंग
घडलेले आहेत व मी स्वत: अनुभवलेले आहेत. पण ते सर्व लिहिले तर माझ्या प्रतिक्रियेचा खूपच विस्तार होईल. पण माझे स्पस्ट मत आहे की सश्रध्द माणसाला त्याची प्रचिती मिळत असते.