देवाची भीती काढून घेतली तर काय होईल?

मी नास्तिक आहे. सध्याचे प्रचलित धर्म जे शिकवतात तसा कुठलाही ईश्वर/अल्ला/प्रभू अस्तित्वात नाही, तसेच स्वर्ग-नरक अस्तित्वात नाही असंच माझं मत आहे. स्वर्ग-नरकाच्या कल्पनेतून मांडलेल्या पाप-पुण्याच्या थोतांडावर माझ्यासह हजारो नास्तिकांचा विश्वास नाही. पण प्रश्न इथेच संपत नाही. 

माझ्या सभोवती कित्येक श्रद्धावान लोक आहेत ज्यांच्याकडे तर्कावर जगण्याइतकी विचारक्षमता आणि त्याद्वारे तयार होणारी सारासार विवेकबुद्धी नाही. जीवन व्यतीत करण्यासाठी कशावर तरी श्रद्धा ठेवणे ही त्यांची मानसिक गरज आहे. अशा भोळ्याभाबड्या लोकांचा ईश्वररूपी आधार काढून घेतला तर त्यांचं जगणं असह्य होईल, असं मला नेहमी सुचवलं जातं. लोकांच्या भावनांचा प्रश्न आहे म्हटलं की कित्येक विवेकवाद्यांना हात टेकावे लागतात.

दुसरा मुद्दा म्हणजे, समाजात असे अनेक लोक अनैतिक काम करू इच्छित असतात पण मनातली ईश्वराची भीती त्यांना तसं करण्यापासून रोखत असते. आणि धर्मातल्या पाप-पुण्याच्या कल्पनाच माणसाला अपराध करण्यापासून रोखत असतात, असं बहुतांश श्रद्धाळू लोकांचं म्हणणं असतं. आपण ती भीती त्यांच्या मनातून काढून टाकली तर त्यांच्या अनैतिक कृत्यांना कसलाच धरबंद राहणार नाही, असं त्यांचं मत असतं.

ईश्वर प्रत्यक्षात असो वा नसो, पण लोकांच्या मनातला ईश्वर जर त्यांना मानसिक आधार देत असेल किंवा अनैतिक कृत्ये करण्यापासून रोखत असेल तर त्यांच्या मनातून ईश्वर काढून टाकून तुम्ही त्यांचे आणि पर्यायाने समाजाचे नुकसान करत आहात असे तुम्हांला वाटत नाही का? असा प्रश्न प्रत्येक नास्तिकाला नेहमी विचारला जातो.

या लेखात दोन्ही प्रश्नांची उत्तरे देण्याचा मी प्रयत्न केला आहे. खरंतर याचं उत्तर व्यक्तीच्या जडणघडणीच्या पद्धतीत आहे आणि ते मानसिक पातळीवरून शोधावे लागेल.

माणसाला कुठल्याही गोष्टीची तयार आणि सोपी उत्तरं नेहमीच आकर्षित करत आलेली आहेत. कारण मानवाचा इतिहास हा कष्ट वाचवण्याच्या धडपडीतूनच साकारलेला आहे. नवनवीन शोधांचा वापरदेखील माणसाने कष्ट वाचवण्याच्या धडपडीसाठीच केल्याचे दिसते. कष्ट हे जसे शारीरिक असतात, तसेच ते बौद्धिकदेखील असतात.

शिक्षणातून माणसाची सारासार विचारशक्ती विकसित व्हावी असं अपेक्षित असतं, पण तसं होत नाही. शिक्षण आपल्याला ज्ञान (knowledge) देतं, पण शहाणपण (wisdom) मात्र आपल्याला स्वतःलाच मिळवावं लागतं.

तेवढी मेहनत घेण्याची तयारी नसली की सोप्या आणि तयार उत्तरांचा ‘साचा’ घेऊन बसलेले लोक तुमचं ‘मानसिक अपहरण’ करतात. तुम्हांला तयार उत्तरं आणि साचेबद्ध विचार पुरवतात. अशा वैचारिक/मानसिक अपहरणांपासून आपल्याला आपला तर्क अथवा विवेकबुद्धीच वाचवत असते. जसं शरीराच्या रक्षणासाठी ‘प्रतिकारशक्ती’ असते तसं मनाच्या रक्षणासाठी आपली विवेकबुद्धी असते.

विवेकबुद्धी म्हणजे सारासार विचार करण्याची पद्धत. तर्काच्या आधारावर आपल्याला समजणाऱ्या गोष्टी पारखून घेण्याची पद्धत. ही विचारप्रक्रिया आपले पालक आणि समाज आपल्याला आपण लहान असल्यापासून शिकवत असतात आणि आपण ती ग्रहण करीत असतो. ती ‘उपजत’ नसते. उपजत असतात त्या प्रेरणा! त्यातल्याच एका प्रेरणेचा वापर विवेकबुद्धीला आकार देण्यासाठी होतो. ‘भीती’ ही एक उपजत प्रेरणा (Basic Instinct) आहे, आणि माणसाच्या सुरक्षित जगण्यात हिचा खूपच मोठा सहभाग असतो. वाचून तुम्हांला विशेष वाटेल, पण हे मानसशास्त्रीय सत्य आहे. लहान बाळ भीतीतूनच शिकते. आगीची भीती, वेदनेची भीती, उंचीची भीती, अश्या अनेक भीतीतून लहान बाळ स्वतःचे संरक्षण करायला शिकत असते. हे झालं शारीरिक बचावाच्या बाबतीत. मानसिक पातळीवर प्रेम न मिळण्याची भीती, वेगळं पडण्याची भीती, नाकारलं जाण्याची भीती अश्या अनेक भीतीतून विवेकबुद्धीची निर्मिती व्हायला हवी.

मूल लहान असल्यापासून आपण त्याला भीतीतून शिस्त लावत असतो. उदाहरणार्थ, ‘वस्तू फेकून फोडू नकोस’, ‘मोठ्यांना उलट बोलू नकोस’ वगैरे. प्रत्यक्षात, कसं शिकवणं आदर्श ठरेल? तर ‘असे वागणे योग्य नाही. शहाणी मुलं असं वागत नसतात. शहाणं व्हायचं असेल तर आपण असं वागू नये’. अश्या पद्धतीने आपण मुलांना लहानपणापासून शिकवू शकतो. त्या मुलांच्या मनात एका ‘आदर्श मुलाची’ प्रतिमा तयार करून त्याच्याशी त्याला स्वतःची तुलना करायला लावून त्याला नैतिक भीतीतून शिस्त लावू शकतो. आम्ही म्हणतो तसं तू वागलास तर तू आम्हांला आवडतोस, नाहीतर आम्ही कट्टी करू, अशा ‘कौतुक वा निंदा’ पद्धतीने शिकवायला हवं.

थोडं मोठं झाल्यावर, त्याच्या कोणत्याही अशोभनीय वागण्याचं विश्लेषण करायला लावून ‘तुझ्या बाबतीत असं कोणी केलं तर तुला ते चालेल का?’ अशा सोप्या तर्कातून सुरुवात करून देऊ शकतो. चांगल्या वागण्याचं कौतुक तर वाईट वागण्याची निंदा (म्हणजेच, Reward and punishment theory) याद्वारे त्याच्या व्यक्तिमत्वाला आकार देऊ शकतो.

पण तेवढं करण्यासाठी पालकांना वेळ नसतो किंवा तेवढी त्यांची मानसिक कुवतदेखील नसते. म्हणून मग होतं काय? तर, ‘असं नको करू देवबाप्पा शिक्षा देईल, तसं नको करू देवबाप्पा कान कापेल, पटकन एवढं खाऊन टाक नाहीतर राक्षस येईल, तिकडे अंधारात नको जाऊ नाहीतर भूत धरेल’, अश्या पद्धतीचे भय आपण त्याच्या मनात पेरतो. थोडं मोठं झाल्यावर, ‘चांगलं काम का करायचं’ तर, त्याने पुण्य लागतं आणि स्वर्ग मिळतो आणि वाईट कृत्य केल्यावर नरकात जावं लागतं, असं सांगतो. आपल्या समाजातली आजुबाजुची परिस्थिति पण पौराणिक कथा, धर्मग्रंथ, सप्ताह, प्रवचन, पोथ्यापुराणांचं पठण आणि टीव्ही सिरियल्स, पिक्चर्स यांतून अशा प्रकारचीच मांडणी ठसवतो. देवाला नावं ठेवणारा नास्तिक चित्रपटाच्या शेवटी एकतर पश्चाताप होऊन आस्तिक बनतो, किंवा तो मरतो. हे असे नकळतपणे आपल्या मनात ठसते. एखाद्याचा अपघात झाला, तर तो काही वेगळ्या मार्गाने काळा पैसा कमावतो म्हणून अपघात झाला असे कार्यकारणभावाचा आधार नसलेले विचित्र तर्क कळतनकळत लहानपणापासून आपल्या मनावर आदळत असतात. अश्या रीतीने लहान मुलांच्या मानसिक विकासाच्या काळात त्यांची मानसिक प्रतिकारशक्ती ही विवेकबुद्धीने विकसित न करता ती आपण देवाधर्माच्या आणि भुताखेतांच्या भीतीच्या आधाराने विकसित करतो. त्यामुळेच मग माणसाला पुढे आयुष्यभर ईश्वराचा आधार लागतो.

असे लोक जेंव्हा स्वतः मानसिक अस्थिरतेच्या गर्तेत जातात तेंव्हा सारासार विवेकबुद्धीने निर्णय घेण्यापेक्षा देवघरात डोकं टेकवणं त्यांना गरजेचं वाटतं, आणि जास्त सुखावूनही जातं. मंदिरात गेल्यावर त्याला हलकं वाटतं, परिस्थितीवरच्या उपायांसाठी त्याला ईश्वराच्या एजंट्सकडे जावंसं वाटतं आणि अंगारा/धूप/नवस/जप/यज्ञ अशा सोप्या आणि तयार उत्तरांनी त्याचं मन हलकं होतं. संकटावर मात करण्याच्या ठोस उपायांपेक्षा (किंवा उपायांसोबत) हे असे मन हलकं करणारे उपाय तो आजमावतो. आपली नोकरी गेली, तर देवाधर्माचं काही करायचं आपल्या हातून राहून गेलंय का? अशा अतार्किक विचारांचं प्राबल्य त्याच्यावर असतं. मग असे लोक देवाच्या एजंट्सच्या आणि धर्माच्या दुकानदारांच्या हातात अलगद सापडतात. पण हे उपाय तात्पुरते आणि उसने असतात आणि परत परत त्याला त्यांची गरज पडत राहते. दुःख हलकं करण्यासाठी दारू पिणे आणि मनाच्या अस्थिरतेच्या काळात विवेकबुद्धीला डावलून इतर उपायांत ‘मानसिक शांती’ शोधणे हे दोन्ही प्रकार तौलनिकदृष्ट्या सारखेच आहेत. त्यांच्यामुळं मिळणाऱ्या बधिरतेलाच आपण ‘मानसिक शांती’ समजतोय हे त्यांच्या ध्यानात येत नाही. त्यामुळेच धर्म ही नशा आहे असं म्हटलं जातं, कारण तो ठोस उपाय देत नाही, तर तो केवळ दुःख हलकं करायला मदत करतो. आणि इतर नशील्या पदार्थांसारखा माणूस त्याचा आश्रित बनतो. या बधिरतेच्या अंमलाखाली लोक स्वतःवर ओढवलेल्या परिस्थितीचा कार्यकारणभाव तर्काच्या आधारे न शोधता, त्याला ‘नशिबाचे भोग’, ‘पूर्वजन्मीच्या पापांचे फळ’ असले शिक्के मारून मोकळे होतात. मग एकदा का आपल्या परिस्थितीसाठी ‘नशिबाचे भोग’ किंवा आपल्या हातात नसलेलं दुसरं काहीतरी ‘अतर्क्य’ कारणीभूत आहे असं मानलं तर मग त्यातून बाहेर पडायची धडपड करायच्या नैतिक जबाबदारीतून आपली सुटका होते. मग “ठेविले अनंते तैसेचि राहावे, चित्ती असो द्यावे समाधान।” हे तत्त्वज्ञान आपल्याला मानसिक उभारी देते.

कित्येक शोषितांना आणि पिचलेल्या वर्गाला आहे त्या परिस्थितीतच सडत राहण्याचं कारणबळ धर्मानं दिलं आणि आपण मात्र त्याला ‘मानसिक उभारी’ समजण्याची गल्लत करून बसलोय, हे आपल्याला समजून घ्यावं लागेल.

‘मानसिक आधारासाठी ईश्वर’ हे आपल्या कमकुवत/अविकसित विवेकबुद्धीचं लक्षण आहे, हे आपल्याला पटतच नाही. हळव्या माणसांना आणि हळवेपणाला आपल्याकडे सहानुभूती जास्त असते. हळवं असण्याला चांगलं म्हणलं जातं, तर हळवं नसण्याला कोडगेपणा किंवा निर्दयी समजलं जातं. भावना या प्रत्येकालाच असतात, पण भावनाप्रधान असणं आणि भावनावेगात वाहवत जाणं यांत फरक करायला शिकायला हवा. विवेकबुद्धीला नाकारून भावनांच्या आधारावर निर्णय घेण्याला आपल्या कथा-कादंबर्‍यांतून आणि सिनेमांमधून जास्तच प्रतिष्ठित, गौरवशाली (ग्लोरिफाय) केलं गेलंय पण चित्र दरवेळेसच सुबक असेल असं नाही. 

मानसिक अस्थिरतेच्या काळात भावनावेगाच्या हिंदोळ्यावर डुलणारा माणूस हा आत्मघातच करून घेत असतो. भावनिकदृष्ट्या चंचल आणि अस्थिर माणसं व्यसनांना लवकर बळी तर पडतातच पण धर्मांध मूलतत्त्ववादी लोकांकडून त्यांच्या धार्मिक हळवेपणाचा वापर ‘कच्चा माल’ म्हणून केला जातो, हे जास्त चिंताजनक आहे. अशा लोकांच्या भावना भडकावणं जास्त सोपं आणि कमी कष्टाचं असतं. म्हणून ‘मानसिक आधारासाठी ईश्वर’ ही कल्पना वरवर जरी भोळीभाबडी आणि आश्वासक वाटत असली तरी ती ‘परिपूर्ण’ (ideal) नाही, आणि वैज्ञानिक तर नाहीच नाही. उलट काही परिस्थितीत ती आत्मघाती संभावना बाळगून असते, असं म्हणता येईल. त्यापेक्षा मानसिक आधारासाठीचे इतर मार्ग जसे की मनमोकळ्या गप्पा, मित्रमैत्रिणी, शेअरिंग, REBT मध्ये सांगितल्याप्रमाणे भावनांचं विश्लेषण, भावनांचं नियमन, समुपदेशन वगैरे जास्त आश्वासक आहेत. असो.

आता दुसऱ्या प्रश्नाकडे वळू.

लोकांच्या मनातून देवाची भीती काढून टाकली तर लोक स्वैराचारी होतील असं कायम म्हणलं जातं. पण खरंच असं आहे का? जरा खोलात याचा अभ्यास करू.

‘भीती’ ही तीन पातळ्यांवर असते. पहिल्या पातळीवर स्वतःची (किंवा स्वतःच्या अंतर्मनाची) भीती असते. दुसऱ्या पातळीवर समाजाची आणि आई-वडिलांची (म्हणजेच सामाजिक भीती) असते. आणि तिसर्‍या पातळीवर कायद्याची भीती असते. (आता किती लोक कशाची तमा बाळगतात अथवा नाहीत, तो वेगळा मुद्दा, पण साधारणपणे असे भय किंवा वचक असतात.)

आपण हे उदाहरणातून समजून घेऊ. 

सिग्नल तोडणे, हेल्मेट न घालणे यात कायद्याची भीती आहे, पण समाजाची नाही. तर, आंतरजातीय विवाह करणे, दारू पिणे यात समाजाची भीती आहे, पण कायद्याची नाही. म्हणजे काही गोष्टी बेकायदेशीर असतात, तर काही गोष्टी अनैतिक असतात. काही गोष्टी दोन्ही असतात. उदा. खून, चोरी, बलात्कार. यांत कायद्याची आणि समाजाची दोन्हींची भीती आहे. पण ह्या दोन्ही व्यतिरिक्त जास्त मोठी भीती असते ती त्याच्या सद्सद्विवेकबुद्धीची, अंतर्मनातली भीती!

समजा, चौकात लाल सिग्नलला आपण उभे आहोत, तिथे कॅमेरा नाही आणि वाहतूक पोलीसदेखील नाही (म्हणजे कायद्याची भीती नाही). तसेच सोबत सिग्नलला थांबलेले काहीजण सिग्नल तोडून जातदेखील आहेत (म्हणजे सामाजिक भीतीदेखील नाही). अश्यावेळी “मी सिग्नल तोडणार नाही, मी नियम पाळेन आणि दुसऱ्या कित्येकांनी कसेही वागले तरी मी तसे वागणार नाही”, ही आपली जी जडणघडण असते, तिलाच सद्सद्विवेकबुद्धीची भीती (किंवा शिस्त) म्हणतात. 

कॉलेजसाठी होस्टेलवर ठेवलेल्या मुलाला आईवडिलांची भीती संपली की तो बिघडू शकतो, पण ज्याला स्वतःच्याच विचारांची शिस्त आहे, तो मुलगा वाहवत जात नाही. म्हणून लहानपणापासून मुलांना आईवडिलांच्या धाकाने किंवा माराच्या धाकाने अभ्यासाला बसविण्यापेक्षा ‘स्वतःहून अभ्यास करणे तुझ्या भल्यासाठी आणि भविष्यासाठी किती गरजेचे आहे’, हे त्याच्या मनावर बिंबवता आले पाहिजे, त्याची जाणीव त्याला करून देता आली पाहिजे. मग अशी मुलं कुठेही असली किंवा कोणाच्याही संगतीत राहिली, तरी ती वाया जात नाहीत.

आपल्या अंतर्मनातला हा विवेकाचा आवाज किंवा सद्सद्विवेकबुद्धीची ही शिस्त जास्त शाश्वत आणि आश्वासक असते. आपल्या मनालाच पटत नसेल, तर आपल्याकडून गैरकृत्ये, गैरवर्तणूक होत नाही आणि वारंवार तर नाहीच नाही. हे सिग्नलचे उदाहरण खूप वरवरचे आहे, पण माणसाच्या प्रत्येक कृतीमागे, प्रतिक्रियेमागे त्याच्या मानसिक जडणघडणीचा जो भाग असतो, त्याला ही सद्सद्विवेकबुद्धीची शिस्त किंवा ‘आतला आवाज’ जबाबदार असतो.

म्हणून प्रस्तावना मुद्दाम एवढी  लांबवलीये.

वरील उदाहरणात जसं आई-वडिलांच्या आणि माराच्या धाकाबद्दल आहे, तसंच लहानपणापासून आपण देवाची आणि पापाची भीती मुलांच्या मनात रुजवतो. “अमुक का करायचं नाही?” तर पाप लागतं म्हणून! “तमुक का करायचं नाही?” तर देव शिक्षा देतो म्हणून! अशी मांडणी होते. पुढे कधीतरी कळत्या वयात आल्यावर त्या मुलाला, खोटं बोलून, फसवाफसवी करून, अन्याय अत्याचार करूनही अनेकांचे काहीही वाईट झाले नसल्याचे दिसते. उलट देव सत्ताधीशांचा आणि श्रीमंतांचाच वाली असल्यासारखी परिस्थिती दिसते. अश्यावेळी मग “देव शिक्षा देतो” वगैरे आपल्याला जे सांगितलं गेलं होतं ते खोटं होतं की काय? असे त्याच्या मनात नक्कीच येत असणार. अश्यावेळी अनेकांना तीव्रतेने वाटू शकते की अत्याचारी, खोटारड्या व्यक्ती मेल्यानंतर नरकात जातील ते जावोत, ते कुणी बघितलंय, पण निदान इथं असेतोवर तर ते पैशात लोळताहेत किंवा स्वर्ग अनुभवताहेत!! मग त्यांच्या मनातून देवाची भीती सुटत जाते. त्यांच्यासाठी देव हा फक्त भक्तीचा तर धर्म हा फक्त कर्मकांडांचा भाग उरतो. 

होस्टेलवर ठेवलेल्या त्या मुलाच्या उदाहरणाप्रमाणे जर मुलांच्या मनात लहानपणापासून देवाच्या शिक्षेच्या भीतीपेक्षा विवेकबुद्धीची शिकवण बिंबवली गेली, तर मात्र चित्र बदलू शकते. 

“चांगलं का वागायचं?” “इतरांची मदत का करायची?” “दुसऱ्याची दुःखे समजून का घ्यायची?” अशा प्रश्नांची उत्तरं “सामाजिक जाणिवेतून” अशी देता आली पाहिजेत. दारिद्र्य, अंधत्व, अपंगत्व ह्याबद्दल संवेदनशीलता निर्माण करता आली पाहिजे. चांगले संस्कार हे फक्त पालकांकडूनच न होता, तो शिक्षणाचा भाग झाला पाहिजे. पूर्वी ‘मूल्यशिक्षणा’चा तास असे, त्याच धर्तीवर बोधकथा, नीतिशास्त्र, समाजशास्त्र हे शास्त्रीय पद्धतीने शिकविले गेले पाहिजेत. 

वास्तविक पाहता न्याय-नीतिची चाड असणे, पर्यावरणाविषयी प्रेम असणे, कुठल्याही आधारावर भेदभाव न करणे, व्यवसायाशी/नोकरीशी प्रामाणिक राहणे, आपलं काम प्रामाणिकपणे करणे, अश्या गोष्टींसाठी तुम्ही ‘धार्मिक’ असण्याची किंवा देव मानण्याची गरज नसते. म्हणून, पापाच्या भीतीने आणि स्वर्गाच्या लालसेने हे शिकविण्यापेक्षा ‘इतरांनी आपल्यासोबत जसे वागावे वाटते, तसे आपणही इतरांसोबत वागावे’ इतक्या सोप्या पद्धतीने आपण मुलांना ते शिकवायला हवे. 

“तू चोरी करतोस, पण तुझ्याकडेच कोणी चोरी केली तर तुला कसे वाटेल?” “तू मारतोस, त्रास देतोस, आकांडतांडव करतोस, ऐकत नाहीस, मग असंच तुझ्याशी कोणी वागले तर तुला कसे वाटेल?” अशी मांडणी करून ‘दुसऱ्याच्या जागेवर स्वतःला ठेवून बघणे’ असे जर शिकविले, तर त्यातून त्या व्यक्तीला आपल्या वागण्याने समोरच्यावर काय परिणाम होऊ शकतो, याची जाणीव होऊ शकते. अश्यावेळी पुढे अन्याय-अत्याचार करण्याआधी अथवा कोणतीही अनैतिक कृती करण्याआधी ती व्यक्ती दहा वेळा तरी विचार करेल. 

आता याचा दुसरा भाग पाहू.

समजा एखाद्याने चोरी केली आणि नेमकं दरम्यानच्या त्या काळात ॲक्सिडेंट होऊन त्याचा पाय मोडला, तर ‘देवानंच ही शिक्षा आपल्याला दिली की काय’ असं त्याच्या मनात येतं. आणि देवावरची त्याची श्रद्धा अधिकच दृढ होते. त्या ॲक्सिडेंटमुळे जखमी झालेले इतर सगळेच पापी होते का? त्यात मृत्युमुखी पडलेले तान्हे बाळदेखील पापी होते का? वगैरे वगैरे विचार त्याच्या मनात येत नाहीत. अश्या अनेक घटना आपल्या आसपास अचानक घडत असतात. पण लोक त्यामागचा कार्यकारणभाव तर्कबुद्धीने न शोधता त्यांचा एकमेकांशी संबंध लावतात, आणि म्हणतात, “देवाची भीती आहे म्हणून बरं आहे, नाहीतर काय झालं असतं देव जाणे!” असो.

सद्सद्विवेकबुद्धीच्या शिस्तीपेक्षा ‘देवाच्या शिक्षेची भीती’ हा सोपा पर्याय आहे, आणि प्रत्येक धर्माने तो पुरेपूर वापरलादेखील आहे. पण तो एक ‘मागास’ पर्याय आहे. स्वर्ग/जन्नत/पॅराडाईज, हूर/अप्सरा अशी मांडणी लोकांच्या गळी उतरविण्यात धर्म यशस्वी झाले असले तरी तो काळ वेगळा होता. तेंव्हा खूप गोष्टी अनाकलनीय होत्या. विज्ञान खूपच अविकसित स्थितीत असल्यामुळे कोणत्याही गोष्टीमागचा कार्यकारणभाव शोधण्यात बरेचदा हतबलता यायची. त्यामुळे नैतिकतेबद्दल पडणाऱ्या प्रश्नांची उकल धर्मग्रंथातच शोधावी लागायची. नीतिशास्त्र, समाजशास्त्र यांची पोहोच धर्माच्या कुंपणापर्यंतच असायची. ह्या आणि अशा अनेक कारणांनी धर्मानं दाखविलेलं मोक्षाचं गाजर आणि नरकाची भीती चालून गेली. पण आता तसं होत नाही. 

थोडी जरी तर्कबुद्धी वापरली तरी कार्यकारणभावाची धर्माची कारणं ‘पराभूत’ ठरतात.

काळ जसजसा बदलतोय तसं लोकांना देवाच्या शिक्षेचा फोलपणा लक्षात येऊ लागला आहे, पण बऱ्याचदा तो उघडपणे मान्य होत नाही, इतकंच. अन्यथा चराचरात देव आहे असं म्हणणाऱ्या धर्मात कोणीच पाप करताना दिसलं नसतं, निदान मंदिरात बलात्कार झाले नसते, मशिदीत शस्त्रे लपवली गेली नसती, आणि पुजारी/मौलवी/पाद्री यांच्याकडून तरी कोणतीच पापकर्मे झाली नसती!! असो. 

पुढे पुढे तर परिस्थिती आणखी विसंगत होत जाणार आहे. देवधर्म हा फक्त लोकांच्या भक्तीचा भाग राहणार आहे, आचरणाचा नाही.

अश्यावेळी आपण शक्य तितक्या लवकर देवाच्या शिक्षेच्या भीतीची जागा ‘विवेकवादाने’ घेतली नाही, तर खऱ्या अर्थाने अनागोंदी माजेल. म्हणून धार्मिक आधारावर नैतिकतेचा आपला आग्रह बाळबोध तर आहेच, पण तो आता अव्यवहार्यपण आहे. आणि त्याच्या टोकाच्या आग्रहाचे घातक दुष्परिणामदेखील आहेत. कसे ते आपण पाहू.

धार्मिक माणूस पापभीरू असतो. म्हणजे तो पापांना भितो. ज्या ज्या गोष्टीमुळे ‘पाप लागतं’ असं धर्मात सांगितलंय अश्या गोष्टी न करणारा माणूस म्हणजे पापभीरू माणूस! आणि पापभीरू माणसांना आपण सज्जन समजतो. पण मेख अशी आहे की, एका समाजासाठी किंवा धर्मासाठी नैतिक असणारी गोष्ट दुसऱ्या समाजासाठी तितकी/तशी असेल असं नाही. दारू न पिणाऱ्याला हिंदू धर्मात सज्जन समजतात, मुस्लिम धर्मातही सज्जन समजतात, पण ख्रिश्चन आणि ज्यू धर्मात तसं काही नसतं. बहुपत्नीत्व, तलाक, हलाल या गोष्टी मुस्लिमांच्यात धर्माचरणच असते, तर स्त्री-दमन, जातिभेद आणि इतर काही प्रथा-परंपरा हिंदूंसाठी धर्ममान्य असतात.

धर्माला अनुसरून असलेल्या या काही गोष्टींत भक्तांना व्यवस्थित गुंडाळता आलं, तर आपण नैतिकतेच्या व्याख्या त्यांच्यापुरत्या बदलू शकतो, हे पूर्वीपासूनच धर्माच्या ठेकेदारांच्या लक्षात आलं. त्याचंच आताचं रूप म्हणजे आसारामबापू किंवा रामरहीम किंवा इतर कोणी बाबा-बुवा/मौलवी/पाद्री. भक्तांसोबत अनैतिक गोष्टी करताना त्या धर्माला अनुसरून आहेत किंवा ‘दैवी आदेश’ आहेत, असा बनाव भक्तसमुदायाच्या गळी उतरवण्यात ते यशस्वी ठरतात आणि भक्त संप्रदायही ते बिनबोभाट मान्य करतो. ह्याचं कारण म्हणजे ‘धार्मिकता’ म्हणजेच ‘नैतिकता’ हे गृहीतक लोकांच्या मनात खोलवर रूजलेलं असतं! धार्मिक माणूस जे काही करेल ते योग्यच असतं, किंवा धर्मात सांगितलेल्या पद्धतीच ‘योग्य’ तेच खरं ‘योग्य’ असतं, अशी त्यांची समजूत असते. 

एक तर अशा माणसांची विवेकबुद्धी विकसित झालेली नसते किंवा आपली विवेकबुद्धी देवाधर्माच्या बाबतीत वापरायची नाही/नसते, हे त्यांनी स्वतःच्या मनावर बिंबवलेलं असतं. म्हणून तर कित्येक सुशिक्षित आणि इतर बाबतीत विद्वान लोकदेखील बाबा-बुवांच्या कच्छपी लागलेले किंवा अंधश्रद्धांच्या आहारी जाताना आपण पाहतो. 

“हा अंगारा लावल्याने तोटा काय होणार आहे, झाला तर फायदाच होईल ना!” किंवा “सगळ्या गोष्टींचा डोक्याने विचार करायचा नसतो हो, ‘आस्था’ नावाचा काही प्रकार असतो की नाही? उगीच कशाला वेगळा विचार करून अजून मानसिक गोंधळ वाढवून घ्यायचा? देव खरंच कोपला तर काय घ्या?” अश्या अनेक सबबी शोधत कित्येक लोक लहानपणी मनावर बिंबवली गेलेली देवाधर्माच्या रूपातली आस्था हीच अंतर्मनाच्या भीतीसाठी ‘पाया’ म्हणून वापरत राहतात. म्हणून, अशा लोकांना वाटतं की मनात देवाची किंवा पाप-पुण्याची भीती आहे म्हणूनच जग व्यवस्थित चाललंय, नाहीतर काय झालं असतं देव जाणे! पण मूळातच काहीतरी चुकतंय हे समजण्याची त्यांची मानसिक कुवत नसते. असो.

ह्यावर उपाय म्हणून लहानपणापासूनच मुलांना शास्त्रोक्त पद्धतीने ‘विवेकवाद’ कसा शिकवायचा ह्याचा आपल्याला विचार करावा लागणार आहे. संस्कार करणे म्हणजे केवळ श्लोक/शुभंकरोती किंवा आरती/कलमा म्हणणे, या भ्रमातून लोकांना बाहेर काढून नैतिकतेला धार्मिकतेपासून वेगळं करावं लागणार आहे.

जगण्याच्या वाटेवरच्या सगळ्या असुरक्षिततांचं सतत भांडवल करत, श्रद्धेच्या गोंडस नावाखाली वाढणाऱ्या प्रकारांना आपण अजिबात भुलता कामा नये. ‘खतरे में’ किंवा ‘गर्व से कहो’ यांना भीक घालणं बंद केलं पाहिजे. वैयक्तिक पातळीवरदेखील “जे घडतंय ते असं का घडतंय?”, याचं आपल्याला झेपेल असं उत्तर मिळालं नाही, तर लगेच त्याची नाळ थेट कर्म/देव/पाप किंवा नशीब यांच्याशी जोडून टाकणं बंद करायला हवं. पुण्य/स्वर्ग/मोक्ष असल्या श्रद्धीय व्यसनांच्या आहारी जाऊन, सतत कसल्या न कसल्या भीतीला आणि अनाकलनीय गोष्टींना बळी पडत जाणं टाळता यायला हवं. 

दुःख, आजार ही संकटे जीवनाचा अविभाज्य भाग आहेत, ती येणारच! त्यांचा देव-धर्म, पाप-पुण्य, स्वर्ग-नरक, पूर्वजन्मीचं संचित असल्या भ्रामक गोष्टींशी काहीही संबध नाही. वैज्ञानिक प्रगतीने यातील बऱ्याच गोष्टींवरचे उपाय शोधले आहेत व पुढेही नवे शोध लागत राहतील. परंतु माणूस स्वतःच्या अविवेकीपणामुळे दुःखात किंवा संकटांत वेगाने भर घालत आहे. म्हणून, वैज्ञानिक दृष्टीकोन, समता, बंधुता, न्याय या मूल्यांची जपणूक करून ‘विवेकी समाजा’कडे वाटचाल करणे ही काळाची गरज आहे. बुद्धिप्रामाण्यवाद हेच शिकवतो. तोच कट्टरता कमी करण्याचा उपाय आणि तीच प्रगतीची दिशादेखील आहे.

अभिप्राय 13

  • एकदम लॉजिकल लिखाण आहे…अगदी नेहमी प्रमाणेच.
    हा मुद्दा वरवर बऱ्याच लोकांना पटतो, पण मला वाटतं हा लेख वाचल्यावर तो मुद्दा डोक्यात खोलवर जाऊन रुजेल.
    खूपच व्यवस्थित पणे मांडून लिहिल्यामुळे प्रत्येकाला त्याची clarity येईल ही अपेक्षा आहे.
    धन्यवाद सचिन.

  • लिहिलेलं सगळं तंतोतंत पटतंय,
    सद्सद्विवेक बुद्धीने विचार करायला भाग पाडणारा एक अतिशय सुरेख लेख,
    आजच्या पिढीला असे लेख वाचून त्यातील गोष्टी अमलात आणणे शक्य आहे, आणि आपणही बऱ्याच गोष्टी आचरणात आणू शकतो, नक्कीच

  • खूप स्पष्ट ‌व परखड विचार
    काळाच्या कसोटीवर नक्की टिकणारे
    सचिन, अभिनंदन.

  • अतिशय सुरेख लेख!

  • खुप छान लेख आहे सर,,,👌

  • अतिशय मुद्देसूद, परखड लेख! पण या विचारांची व्यावहारिकता किती हा मोठा प्रश्न आहे! शतकानुशतकं, पिढ्यानपिढ्या चालत आलेले विचार, समज पूर्णपणे नाहीसे करणे अशक्य आहे असे वाटते!! अनेक उच्चशिक्षित लोकही रोजच्या व्यवहारात धार्मिक कर्मकांडे
    पाळताना दिसतात तर अशिक्षित लोकांना काय म्हणणार?मला वाटत प्रत्येकाने आपापल्या मार्गावर दुसर्‍याच्या पायात पाय न घालता चालल तरी पुष्कळसे प्रश्‍न सुटतील, किमानपक्षी परिस्थिती अजून बिघडणार तरी नाही!

  • काही लोक सदसदविवेकबुद्धीला पटत नाही म्हणून नैतिक रहाण्याचा प्रयत्न करतात तर काही लोक देवाच्या भीती पोटी नैतिक रहाण्याचा प्रयत्न करतात. ननैतिक राहण्यापासून परावृत्त करणारे घटक वेगळे असतील. सगळ्यांचेच मेंदू कसे प्रगल्भ असतील? आपला सरपटणारा मेंदु हा आपण सुप्तावस्थेत ठेवण्याचा या ना त्या प्रकारे प्रयत्न करत असतो.

  • अभिनंदन डॉ.सचिन ! तुम्ही छान लेख लिहिला आहे. लेख प्रदीर्घ असूनही सर्व मुद्देसूद आहे. कुठेही पाल्हाळ नाही. उत्तम लेखनशैली.
    ……यनावा.

  • थोर विचार आहेत. अशा विचारांची गरज आहे.

तुमचा अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published.