वातावरणबदलामुळे मानवी अस्तित्व धोक्यात येणार आहे याची आता सर्वांना कल्पना आली आहे. त्यामुळे हवेतील कार्बन-डायऑक्साइड आणि मिथेन कमी करण्यासाठी आपण सर्वांनीच प्रयत्न केला पाहिजे. आपल्या सरकारने यासाठी आवश्यक ती पावले उचलली पाहिजेत हे खरे आहे. पण व्यक्तिशः आपणही त्यासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे. आपण काय केले असता वातावरणातील ग्लोबल वॉर्मिंग गॅसेसचे प्रमाण व उत्सर्जन कमी होईल याचा विचार करू.
गाई व म्हशी हे रवंथ करणारे प्राणी आहेत. त्यांना चार जठरे असतात. त्यांपैकी दोन जठरांमध्ये त्यांनी खाल्लेल्या गवताचे व इतर पालापाचोळ्याचे जंतूंच्या साह्याने पचन केले जाते. हे करताना ज्या रासायनिक प्रक्रिया घडतात, त्यामधून मिथेन वायू बाहेर पडतो. हा वायू त्यांच्या ढेकरामधून बाहेर पडतो. शिवाय काही प्रमाणात त्यांच्या पादण्यातूनही हा वायू बाहेर पडतो.
हा वायू उष्णता धरून ठेवण्यामध्ये कार्बन-डायऑक्साईडपेक्षा जवळपास ८५ पटीने जास्त ताकदवान आहे. जगामध्ये जेवढ्या गाई, म्हशी व इतर रवंथ करणारे प्राणी आहेत त्यांपैकी भारतामध्ये ६३ टक्के आहेत. भारतामध्ये प्रत्येक गाय किंवा म्हैस सरासरी साठ किलो मिथेन दरवर्षी बाहेर टाकते. गाई, म्हशीची संख्या भारतामध्ये जवळपास ३०० दशलक्ष म्हणजे तीस कोटी आहे. त्यांच्यापासून दरवर्षी अठराशे कोटी किलोग्रॅम किंवा १.८ कोटी टन मिथेन बाहेर टाकला जातो. इतक्या मिथेनची उष्णता धरून ठेवण्याची ताकद ही १५३ कोटी टन कार्बन-डायऑक्साईड इतकी असते. हे गणित वीस वर्षे मुदत धरून केले आहे. भारताने २०१९ साली अंदाजे २४० कोटी टन कार्बन-डायऑक्साइड उत्सर्जित केला. त्याच्याशी तुलना केली असता १५३ कोटी टन कार्बन-डायऑक्साईड इतकी क्षमता असलेली मिथेनची वातावरण बदल घडवण्याची ताकद निम्म्यापेक्षा जास्त भरते. म्हणजेच आपण जर मिथेन उत्सर्जन कमी करू शकलो तर वातावरण बदलाच्या वेगामध्ये मोठा फरक करू शकतो.
गाई-म्हशींच्या शेणामधूनदेखील मोठ्या प्रमाणावर मिथेन तयार होतो. कारण शेण कुजून त्याचे पूर्ण खत तयार होईपर्यंत त्याला ऑक्सिजनचा पुरवठा पुरेसा होतोच असे नाही व ज्या वेळेला होत नाही त्यावेळीही मिथेनचे उत्पादन आणि उत्सर्जन होत राहते.
आपल्याकडे पर्यावरणवाद्यांमध्ये एक भाबडी समजूत आहे. ती म्हणजे मोठ्या प्रमाणावर जनावरे पाळून मोठी डेअरी तयार करून दूध तयार केले तर त्यामधून जास्त प्रमाणावर मिथेन तयार होईल. पण आपल्याकडच्या शेतकर्याने एखाद-दुसरी गाय किंवा म्हैस ठेवली व दूध उत्पादन केले तर त्यापासून फारसा मिथेन तयार होणार नाही. पण ही समजूत चुकीची आहे. कारण गाय जितके जास्त दूध रोज आणि आयुष्यभरात देईल तितका एक लिटर दुधाचा कार्बन फूटप्रिंट कमी होत जाईल. म्हणजेच एक लिटर दुधाच्या उत्पादनामागे मिथेनचे उत्सर्जन कमी होते. गाय जितके कमी दूध देईल तितका हा कार्बन फूटप्रिंट वाढत जाईल. साधारण मानाने रोज १० लिटरपेक्षा कमी दूध दिले तर एक लिटर दूधाचा कार्बन फूटप्रिंट आठ किलो इतका येतो, तर रोज २० लिटरपर्यंत दूध जर दिले तर तो रोज एक किलोपर्यंत कमी येतो. त्यामुळे शास्त्रीय ज्ञान वापरून व्यावसायिक रीतीने मोठ्या प्रमाणावर डेअरी चालवल्यास दुधाचा कार्बन फूटप्रिंट कमी होतो. भाकड जनावरे खूप वर्षे पाळल्यास त्यामुळेही मिथेनचे उत्सर्जन विनाकारणच वाढते. अर्थात गोहत्या बंदीमुळे मिथेनचे उत्सर्जन वाढते.
अमेरिकेमध्ये गोमांसाची मागणी खूप मोठ्या प्रमाणात आहे व ती मागणी पूर्ण करण्यासाठी ब्राझीलमध्ये ॲमेझॉनचे जंगल तोडून व जाळून तेथे कुरणे तयार केली जातात व गाई पाळून या गाईंचा उपयोग अमेरिकेला गोमांस पुरवठ्यासाठी केला जातो. भारतामध्ये सहसा कोणी गोमांस खात नसल्यामुळे हा प्रश्न भारतात नाही. पण गो-पालन, म्हैस-पालन वगैरे जनावरांचे पालन जर कमी झाले तर त्यांच्यासाठी लागणार्या चराईरानाची आवश्यकता कमी होऊन, तेथे जंगले वाढू शकतील व त्यामुळेदेखील ग्लोबल वार्मिंग काही प्रमाणात कमी होऊ शकेल.
आपण मिथेनचे उत्सर्जन कसे कमी करू शकतो? तसे पाहिले तर हे काम जास्त सोपे आहे. कारण त्यासाठी आपल्याला शासनावर अवलंबून राहण्याचे कारण नाही. आपण जर गाईच्या – म्हशीच्या दुधाचा खप कमी करू शकलो तर गाई – म्हशी पाळण्याचे प्रमाण खूप कमी होऊ शकेल. त्यासाठी आपण फक्त दूध आणि दुधाचे सर्व पदार्थ खाणे बंद केले पाहिजे. आणि हे तर आपल्या ताब्यात आहे. दुधाचे पदार्थ न खाण्याने आपले काहीही बिघडत नाही. दुधापासून मिळणार्या प्रथिनांसाठी आपण कडधान्ये, शेंगदाणे, गळिताची धान्ये यांचा वापर नक्कीच करू शकतो. शिवाय ज्यांना मांसाहार करायचा आहे त्यांना मासे, कोंबड्या आणि अंडी खायला काहीच हरकत नाही. कारण यांच्या उत्पादनामध्ये मिथेनचे किंवा कार्बन-डायऑक्साइडचे उत्पादन जवळपास नसतेच. या जमाखर्चामध्ये मी शेळ्या-मेंढ्यांचा समावेश केलेला नाही, कारण शेळ्या-मेंढ्यादेखील रवंथ करतात व त्यादेखील मिथेन तयार करतात व हवेत सोडतात. त्यामुळे दुधाबरोबरच आपण शेळ्या-मेंढ्यांचे मांसदेखील खाणे बंद केले पाहिजे.
निष्कर्ष असा की जर आपण गाई-म्हशींचे दूध आणि शेळ्या-मेंढ्यांचे मांस खाणे बंद केले तर, ग्लोबल वॉर्मिंगच्या वेगामध्ये खूपच फरक पडेल आणि आपली मुले आणि नातवंडे दीर्घकाळ जगण्याची शक्यता वाढेल. अनुषंगाने, मानवजात निर्वंश होण्याची भीती खूप कमी होईल. यासाठी शासनाने कोणताही निर्बंध आणण्याची आवश्यकता नाही किंवा शासनाने काही कृती करण्याची आवश्यकता नाही. आमच्या जिवावर आम्ही ही कृती करू शकतो. ती करणे आवश्यक आहे असे तुम्हांला वाटत नाही काय?
पुरवणी १
Carbon footprints CF of commonly used foods.
Kilograms of CO2, per Kg. of
Beef from specially dedicated herd | 60 |
Mutton sheep, lamb | 24 |
Cheese | 21 |
Beef from dairy herd | 21 |
Prawns farmed | 12 |
Palm Oil | 8 |
Pig Meat | 7 |
Poultry Chicken | 6 |
Fish farmed | 5 |
Eggs | 4.5 |
Rice | 4 |
Fish wild | 3 (Diesel for boats) |
Cow Milk | Well maintained modern herd 3/ litre Where average cow gives 33 litres milk per day |
Cow milk, India | 7 to 10 litre/day |
old cows neither slaughtered nor sold | 9/litre |
Buffalo milk, india | 3/litre |
Sugar | 3/kg |
Ground Nut | 2.5/kg |
Ground nut oil | 5/kg |
Wheat | 1.4/kg |
Fruits, vegetables | 0.4/kg |
Fuels
Petrol | 2.31/litre |
Diesel | 2.68/litre |
Grid electricity | 1/kwh or 1/unit |
LPG | 3/kg |
CNG | 3.142/kg |
Cement. 1/kg
Steel 1.85/kg
Carbon footprint of my family of six persons for one month.
Food Item | Quantity | CF |
Wheat | 15 kg | 21 |
Rice | 2 kg | 8 |
Dal | 5 kg | 8 |
Sugar | 6 kg | 18 |
Vegetables | 30 kg | 12 |
Potato | 3 kg | 1 |
Onion | 5 kg | 7 |
Ground nut oil | 7 kg | 35 |
Fruits | 30 kg | 12 |
Total | 122 | |
Milk | 66 litres | 200 |
All food including milk | 322 |
ENERGY
Petrol for 2 two-wheelers | 17 lit | 40 |
Petrol for Car | 33 lit | 88 |
One electric scooter | Nil | |
Gas LPG | 15 kg | 45 |
Electricity (Solar) | 200 units | Nil |
Total | 173 |
Grand total for a month – CF 495
Grand total for a year – CF 5940
Per person per year – 1 ton
Note:- This doesn’t include CF of things done by Government for each citizen. CF per person in India is 2 tonnes per year.
पुरवणी २
पांढरा रंग, आरोग्य व पर्यावरण
व्हाईट इज वाईट? भात (तांदूळ), दूध, साखर, मैदा, कपडे. भात व साखर या दोन गोष्टी पौष्टिक नाहीत. त्यांत फक्त ऊर्जा आहे. जीवनसत्वे, खनिजे, तंतू नाहीत. दोन्ही मधुमेहकारक व मधुमेह, लठ्ठपणा, रक्तदाब यांच्यासाठी पूरक. भातात प्रोटिन्स फार कमी. या दोन्ही गोष्टी आहारात नसलेल्याच चांगल्या. भातरोप लावण करण्यापूर्वी शेतात १-२ इंच तरी पाणी तुंबवतात. ते १-२ महिने तसेच ठेवतात. त्यामुळे रोपाचे नुकसान होत नाही परंतु तेथे कोणतेही तण उगवत नाही. रोपे छान वाढतात; पण त्यामुळे जमिनीत अनॲरोबिक स्थिती तयार होते व मिथेन तयार होतो. मिथेन हा जबर उष्माधर वायू आहे. CO2 पेक्षा ८० पट ताकदवान! जागतिक मिथेन उत्सर्जनामध्ये भात लागवडीचा वाटा २०% आहे. आपण सर्वांनीच भात खाणे बंद केले तर आरोग्याला पोषक व पृथ्वी तापणेपण कमी! एक किलो तांदूळ शिजवायला किमान ५००० लिटर पाणी लागते. बर्याच वेळा त्याहूनही जास्तच. जगभरात सिंचनासाठी जितके पाणी वापरले जाते, त्यातले ४३% पाणी भातशेतीसाठी वापरले जाते. या पाणी उपश्यामुळे पंजाबमधील भूगर्भातील पाणीसाठा संपत आला आहे. तसेच पाणी तुंबवण्यामुळे शेतजमिनीचे नुकसान होत आहे. भात खाणे कमी/बंद केल्यास गोड्या पाण्याचीदेखील खूप बचत होईल. १९-२० साली आपण १५.७५ लाख टन तांदूळ निर्यात केला. आपण तो खाणे बंद केले तर निर्यात वाढेल.
भातपिकाची लागवड रोपलावणी न करता बी वापरूनही करता येते. पण तसे केल्यास पाणी न तुंबवल्यामुळे तण वाढण्याची शक्यता असते व त्यामुळे भाताच्या पिकाचे नुकसान होऊ शकते. असे होऊ नये म्हणून तणनाशकाचा वापर करावा लागतो. असे म्हणता येईल की तणनाशकामुळे होणारे पर्यावरणाचे नुकसान हे फक्त तेवढ्या क्षेत्रापर्यंतच असते तर मिथेनमुळे होणारे नुकसान जागतिक असते. त्यामुळे तणनाशक वापरणे जास्त श्रेयस्कर होय. एक किलो साखर तयार करायला १५०० ते २००० लिटर पाणी लागते. साखर व मिठाई, थंड पेयेपण बंद केली तर आरोग्य तर सुधारेलच, पण निर्यात तरी वाढेल, नाहीतर पाणी तरी वाचेल.
भारतात धवलक्रांती झाली व काही वर्षांत क्षयरोग व रक्तदाब यांची पण साथ आली! लोणी, तूप या संपृक्त स्निग्ध पदार्थांचा तो परिणाम झाला. गाई, म्हशी गवताचे पचन करताना ढेकर देऊन व नंतर शेणाबरोबर खूप मिथेन सोडतात. भारतात ३० कोटी गाई व म्हशी आहेत व त्यांच्यामुळे खूप मिथेन हवेत सुटतो. उष्माधर वायूमध्ये खूप महत्त्वाची भर पडते. आपण दूध व त्याचे पदार्थ खाणे बंद केले तर दोन्ही आपत्ती टळतील.
गव्हामध्ये भरपूर पौष्टिक द्रव्ये असतात. पण मैद्यात कोंडापण नसतो व इतर पौष्टिक पदार्थपण कमी असतात. म्हणून मैदा व त्यापासून बनवलेले बेकरी पदार्थ न खाणे उत्तम.
जाता जाता:
- पांढरे कपडे तयार करताना बरीच रसायने व क्लोरीन वापरतात. तसेच नंतर ते धुताना जास्त साबण व ब्लिचिंग पावडर वापरली जाते. हे सर्व पर्यावरणाला घातक असल्याने पांढरे कपडे कमी वापरावेत.
- इमारतीला किंवा कपाट वगैरेंना रंग देण्यापूर्वी त्या रंगात शिसे, क्लाडमियम, पारा अशी विषारी द्रव्ये नाहीत याची खात्री करून घ्यावी.
Very good arricle Dr. Athale. If you can also specify possible downsides of Milk on human health, besides the fat aspect, that would further resonate with those who are more conscious about health.