प्रस्तुत लिखाणात आपण कोविडच्या निमित्ताने विविध गोष्टींचा विचार करू. या लेखाचे तीन भाग आहेत. पहिल्या भागात – कोविडमुळे विविध क्षेत्रांत, जनमानसात, समाजात, इकॉनॉमीत, पर्यावरणात काय बदल झाले ते बघू. दुसऱ्या भागात – पर्यावरणीय दृष्टिकोणातून या परिस्थितीत, मुख्यतः इकॉनॉमीत बदल करण्याची गरज का आहे आणि ते कसे करता येतील ते बघू. तिसऱ्या भागात – करोना या विषाणूची उत्क्रांती, जीवशास्त्र, इकॉलॉजी समजून घेत असे साथीचे रोग कसे टाळता येतील ते बघू. नंतर रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यात पोषणाचे महत्त्व समजून घेऊन शेवटाकडे जाऊ.
भाग १: बदलांच्या निमित्ताने आत्मपरिक्षण होणार का?
‘नवीन सार्स करोना’ विषाणूने इतिहास लिहायला घेतला आहे यात काही शंका नाही. पण अर्थात हे मानवजातीसाठी नवीन नाही. आत्तापर्यंत अनेक रोगांच्या साथी येऊन गेल्या आहेत. काही याहून भयंकर स्वरूपाच्या होत्या. तरीही आत्ता आपल्याला कोविडचे अधिक भय वाटते आहे. कारण जागतिकीकरणामुळे आणि विविध प्रसारमाध्यमांच्या वापरामुळे आत्ताचे जग अधिक जोडले गेले आहे. या प्रगतीमुळे अपेक्षा वाढल्या आहेत, सहज मरण अपेक्षित नाही. खरे तर या रोगापेक्षा त्याची भीतीच एवढ्या मोठ्या प्रमाणावर पसरली आहे की माणसाला कोविडशिवाय इतर कारणाने मृत्यू येऊ शकतो हेच आपण विसरलो आहोत. जगाचा सरासरी मृत्युदर बघता रोज १.६ लाख एवढी माणसे कोविडशिवाय मरतात, मरत आहेत. आत्तापर्यंत कोविडने मृत्यू झालेल्यांची संख्या आहे साधारण साडेचार लाख आणि भारतातील संख्या आहे तेरा हजार. साहजिकच ह्यापेक्षा इतर आजार होऊन मरणाऱ्यांची संख्या अनेक पटीनी जास्त आहे. हे आकडे बघता इतिहासात ही घटना महत्त्वाची ठरणार आहे ती याच्या मृत्युदरामुळे नव्हे, तर ह्या साथीमुळे जे भय निर्माण झाले आणि त्यामुळे अर्थव्यवस्था आदींवर जे परिणाम झाले त्यामुळे. हे टोक आपण का गाठले हा स्वतंत्र चर्चेचा विषय आहेच. परंतु तूर्तास आपण बहुतांश मानवी समाजाने यातून काही एक धसका घेतला आहे हे वास्तव स्वीकारून पुढे जाऊ.
सुरूवातीला माणसाचा पृथ्वीवरचा कार्यभाग समजून घेऊ. माणूस निसर्गाचा भाग आहे का? निसर्गात सर्व सजीवांना एक किंवा अधिक नैसर्गिक शत्रू आहेत किंवा काही जण स्वतः सर्वोच्च भक्षक आहेत. ही सगळी व्यवस्था कोणीएक वरचढ होऊ नये या तऱ्हेने उत्क्रांत झालेली आहे. माणूस स्वतःला (Homo) sapiens sapiens (माणसाचे शास्त्रीय नाव. त्याचा अर्थ हुशार, म्हणजेच जाणिवेची जाणीव असणारा सजीव) म्हणवून घेत या अनेक सर्वोच्च भक्षकांसहित सर्व नैसर्गिक परिसंस्थांवर स्वार झाला. पण इतर भक्षक हे ‘नैसर्गिक उत्क्रांतीच्या प्रक्रियेतून’ त्या स्थानावर पोहोचले आहेत. माणूस हा पृथ्वीच्या आयुष्यातील एकमेव अपवाद जो तंत्रज्ञानाच्या आधारे या स्थानावर पोहोचला आहे. आणि खरोखर सर्वोच्च भक्षक असल्याच्या थाटात आपण या पृथ्वीवरची संसाधने, निसर्ग, जीविधता हवी तशी वापरत आहोत. ‘विकास’ साधण्याच्या घाईत ह्या वापराचा ‘वेग’ आणि ‘प्रमाण’ असे काही वाढले आहे की त्यातून जी द्रव्ये तयार झाली ती विषारी ठरली. आणि ती हवामानबदलासारख्या रूपाने म्हणा किंवा स्थानिक पातळीवरच्या नदी-प्रदूषणासारख्या गोष्टींमुळे म्हणा, पुनश्च मानवजातीलाच घातक ठरली. रोग वाढले आहेत, सामाजिक, आर्थिक विषमता वाढते आहे, गुन्हेगारी वाढते आहे, मानसिक स्वास्थ्य चिंताजनक आहे, परंतु या सगळ्याने आपण काही हललो नव्हतो, ते या ‘करोना’नामक एका अतिसूक्ष्म विषाणूमुळे मात्र हललो आहोत. या निमित्ताने एक नवीन जाणीव होते आहे – आपण अनेक प्राण्यांप्रमाणे एक प्राणी असल्याची आणि आपल्यावरही अंकुश ठेवणारा कोणी असू शकतो हे समजून घेण्याची. अर्थात हे काही इतिहासात प्रथमच घडते आहे असे नाही, परंतु जागतिकीकरणाच्या या टप्प्यावर ही जाणीव तीव्र झाली आहे. मुद्दा असा आहे की या इशाऱ्याकडे आपण कसे बघतो आहोत, यातून आपण काय शिकणार, भविष्याचे नियोजन कसे करणार, निसर्गातला एक प्राणी म्हणून असलेली आपली जबाबदारी आपण ओळखणार का? आपला कार्यभार नक्की काय? अगदी स्वार्थीपणे स्वतःच्या जातीला तगवण्याचा जरी आपण विचार केला तरी तो मार्ग शाश्वत आणि सर्वसमावेशक असण्याचे फायदे या निमित्ताने लक्षात घेणार का? या अतिसूक्ष्म विषाणूने एवढी उलथापालथ होईल अशी कल्पना निदान सामान्य माणसांना तरी निश्चित नव्हती. मोजक्या जाणत्या लोकांना मात्र गेल्या दोन वर्षांत याची चुणूक लागल्याचे थेट पुरावे आहेत. परंतु एकंदर जगच हादरले आहे याविषयी कुणाचेही दुमत असायचे कारण नाही.
तर भारतात, जगात आत्तापर्यंतच्या इतिहासात अनेक महत्त्वाचे बदल झाले आहेत. त्यात आपण औद्योगिकीकरण, महायुद्धे, ब्रिटिशराज, हरितक्रांती असे टप्पे सांगतो. त्यात आता कोविड-१९ची भर पडली हे निश्चित. काही गोष्टींमध्ये सकारात्मक बदल होत आहेत तर काही गोष्टींमध्ये नकारात्मक. प्रत्येक देशाची कोविडपूर्व आर्थिक स्थिती आणि आत्ताची स्थिति यांत प्रचंड फरक आहे. बाजारात ग्राहक नाही ही सगळ्यात मोठी अडचण आहेच परंतु अनेक पुरवठायंत्रणा (सप्लाय चेन्स) मुख्यतः चीनशी संलग्न असल्याने छोट्या-मोठ्या व्यवसायांवर मोठा परिणाम झाला आहे. या सगळ्यांमुळे GDP कमी झाला तरी चंगळवाद आपसूक आटोक्यात राहील असे दिसते. हातावर पोट असणाऱ्यांचे, स्थलांतरित मजुरांचे सगळ्यांत जास्त हाल होत आहेत. देशातील एकूण काम करणाऱ्या लोकांपैकी ९४% लोक बेभरवशी क्षेत्रात काम करतात. यातले केवळ २% ते ३% संघटित क्षेत्रात औपचारिकरीत्या काम करणारे आहेत. हे वाचणाऱ्यांत त्यांचीच संख्या जास्त असणार. या नागरी लोकांच्या आयुष्यात कदाचित फार थेट फरक पडलेला नाही. बचतीच्या आधारे लॉकडाऊनला आनंदाने किंवा आहे तर आहे या भावनेने सामोरे जाणाऱ्या या मंडळींना फार तर घरी बसायचा कंटाळा आला आहे इतपतच. अर्थात यांच्यातले बरेच जण घरून काम करू शकत आहेत. डिजिटल क्रांतीत भर पडतेच आहे. काही वर्षांपूर्वी स्मार्टफोन आणि सहजसाध्य इंटरनेट यामुळे याला सुरुवात झाली. निश्चलनीकरणामुळे (demonetization) याचा वापर वाढला. हातात रोकड नसल्याने लोकांनी रोजच्या गरजेच्या छोट्या-मोठ्या खरेदीसाठी पेटीएम, भीम, गुगल-पे अशी अॅप्स वापरून कार्यभाग साधला आणि या गोष्टी सर्वसामान्य माणसाला, अगदी भाजीवाल्यालाही सवयीच्या झाल्या. या डिजिटल वापरात सध्या काही पटीने वाढ होते आहे हे आपण बघतच आहोत. झूम, गुगलड्यूओ, स्काइप अशी अनेक अॅप्स सर्रास वापरली जाऊ लागली आहेत. तंत्रज्ञान मोठेच आव्हान आहे असे मानणारे, त्याला दूषण देणारे किंवा अगदी वयस्कदेखील ही सगळी अॅप्स वापरून मित्रांशी, नातेवाईकांशी गप्पा मारत आहेत, वैचारिक चर्चेत सहभागी होत आहेत, वेबिनार ऐकत आहेत. एक-दोन महिन्यांत हा मोठाच बदल झाला आहे. या डिजिटल क्रांतीचा एक महत्त्वाचा धोका काहीजण व्यक्त करत आहेत तो म्हणजे आपली वैयक्तिक माहिती सर्वदूर पसरण्याचा आणि तिचा गैरवापर वाढण्याचा. आरोग्याच्या किंवा सुरक्षिततेच्या कारणामुळे तंत्रज्ञान वापरून माणसांवर बारीक पाळत ठेवता येणे शक्य झाले आहे. कदाचित अनेक लोकांकडे गुप्त ठेवावी अशी माहिती नाही. परंतु तरीही या पाळतीतून प्राप्त होणारा डेटा आपल्या परवानगीशिवाय वापरला जाण्याची शक्यता आहेच. अमेरिकेतील निवडणुका जिंकण्यासाठी असाच डेटा वापरून मते वळवण्यात आली हे आपण जाणतोच. नवनवीन तंत्रज्ञानामुळे अनेक नवीन संधी तयार होत आहेत. त्या संधी घेण्याच्या शर्यतीत काही लोक माणुसकी बाजूला सारून स्वतःचे हित साधणार असे दिसते. यात आपण भरडले जाऊ नये या कारणाने तंत्रज्ञानाचा सजगतेने वापर करावा हे मात्र खरे. तीच परिस्थिती शिक्षणक्षेत्राची. कोणाचे इ-लर्निंग अॅप्स दर्जेदार शिक्षण देणार, किती किमतीत देणार यावर लोक निवड करणार हे उघड आहे. एकंदर विविध मीडियाचा वापर वाढला आहे, वाढणार आहे हे निश्चित. ह्याला लोक ‘न्यू नॉर्मल’ – नवीन सुरळितता असे म्हणत आहेत. परंतु यातला दर्जा कसा टिकवणार हा प्रश्न आहे. कोणत्याही गोष्टीचा अतिरेक झाला की त्याचा कंटाळा येतोच तसाच कंटाळा अनेक लोकांना या बदलाच्या सुरुवातीलाच येतो आहे. या डिजिटल युगातील क्रांतीला काही सार्थ दिशा देता येईल का हा अनुत्तरित प्रश्न आहे. नागरिकांच्या निवडीमुळे ही दिशा ठरावी आणि निवड करण्यात नागरिकांनी सजगता बाळगावी ही सदिच्छा.
सध्याच्या बाजारात डोकावले तर अनेक सेवांचा आणि वस्तूंचा आपसूकपणे खोलातून विचार केला जातो आहे. अर्थव्यवस्था कच्च्या मालापासून, कारखान्यापासून सुरू होऊन ग्राहकापर्यंत येऊन थांबते. काही विशिष्ट व्यवसाय जसे की पर्यटनकंपन्या, सिनेमागृहे, मॉल्स, केटरिंग, इव्हेंट ऑर्गनायझर, विविध सेवा पुरवणारे इत्यादी जवळजवळ पूर्ण बंद आहेत. यातले खरोखर गरजेचे किती आणि चैनीचे किती ह्यावर आपसूक विचार केला जातो आहे. दुसऱ्याला मदत केली तर होणाऱ्या समाधानाची अनुभूती अनेक जण घेत आहेत – म्हातारे आजी-आजोबा एकटेदुकटे असतील तर आपल्यातला स्वयंपाक त्यांना देणे असो किंवा त्यांना बाहेरून भाजी किराणा आणून देणे असो किंवा दुकानातले शेवटचे कणकेचे पाकीट आपल्या मागच्या आजोबांना देणे असो किंवा घरातले दोन शेवटचे शिल्लक बटाटे शेजारणीला देणे असो! आपल्याकडे कमी असलेली गोष्ट विभागून देण्यातली मजा काही औरच! समाजात घडणारे हे बदल अधोरेखित करण्याचा उद्देश एवढाच की आपण ज्या प्रकारे या सगळ्याला सामोरे जात आहोत त्यातून आपण काय शिकणार, काय विसरणार, आपल्या जाणिवा, नेणिवा तीक्ष्ण होणार का? किमान गरज आणि हाव यातला फरक आपण ओळखायला शिकणार का?
बरोबरीने कुटुंबातील सर्व जण घरात पूर्ण वेळ एकत्र असल्याने नात्यात काही बदल होत आहेत का? हे बदल प्रत्येक कुटुंबातल्या पूर्वसंचितानुसार, संस्कारानुसार, शिक्षणानुसार, माणसांच्या स्वभावानुसार वेगवेगळे असणार हे नक्की. पूर्ण वेळ एकमेकांच्या सहवासात राहून आपण कंटाळतो आहोत की आनंदाने राहतो आहोत हे यावरच अवलंबून आहे. घरकामे वाटून घेत आहोत की जैसे थे चालू आहे. परिस्थितीचा शांतपणे विचार करून नियोजन करत आहोत की एक एक दिवस वैतागून पुढे ढकलत आहोत ह्यात कुटुंबागणिक फरक असू शकेल. मानसिक आरोग्याचे महत्त्व या निमित्ताने अधोरेखित होते आहे. सद्य:परिस्थितीत खूप जास्त अनिश्चितता आहे. इथेच आपली तार्किकता कामाला लावणे गरजेचे आहे. आपली मानसिकता सकारात्मक ठेवणे ही पहिली महत्त्वाची गोष्ट आहे. अनेक मानसोपचारतज्ज्ञ यावर मार्गदर्शन करत आहेत. यात या सगळ्या परिस्थितीचा डोळस स्वीकार ही पहिली पायरी आहे. अनेकांचे टोकाचे नुकसान होत आहे. भीषण परिस्थिती ओढवली आहे. परंतु तरीही जी गोष्ट आपल्या हातात नाही, तिच्याविषयी, होणाऱ्या परिणामांविषयी फार नकारात्मक बोलून, प्रतिक्रिया देऊन आपण स्वतःची ऊर्जा बरीच वाया घालवतो. त्यापेक्षा ज्या गोष्टी सध्या आपल्या हातात आहेत त्या करण्यात समाधान मानले तर मानसिक आरोग्य टिकून राहण्यास मदत होऊ शकेल. धोका विषाणूचा नसून आपल्या आत दडलेल्या राक्षसाचा आहे, द्वेषाचा आहे, अहंभावाचा आहे, भीतीचा आहे. भावनांचा उद्रेक झाला की शारीरिक बदल होतात आणि रोगप्रतिकारक शक्ती घटते. म्हणजेच विषाणूकरता संवेदनशीलता वाढते. हे होऊ नये याकरता तार्किकतेच्या आणि सकारात्मतेच्या आधाराने मानसिक आरोग्य टिकवणे हा एकमेव मार्ग आहे. व्यक्तिगत पातळीपासून ते सामाजिक, राष्ट्रीय ते जागतिक अश्या सर्व पातळींवर एकात्म भावनेने काम केले तर विषाणूला टक्कर देणे सोपे होईल. लॉकडाऊनच्या निमित्ताने जो मोकळा वेळ आपल्याला सक्तीने मिळाला त्यात आपण वैचारिक पातळीवर, माणुसकीच्या पातळीवर, मूल्यांच्या पातळीवर आणि एकंदर स्वतःविषयीच्या सजगतेच्या पातळीवर पुढची पायरी चढणार आहोत का? करोनापूर्व काळात या प्रश्नाचे उत्तर देणे कठीणच होते परंतु आता जी एक उसंत मिळाली आहे त्यात समाज अशी एक पायरी चढू शकेल अशी शक्यता निश्चित दिसते. आमेन!
पर्यावरणातील बदलाचा आपण सगळेच ‘याचि देहीं याचि डोळां’ अनुभव घेत आहेत. हे सगळे बदल बघायला माणसालाही उसंत आहे. त्यामुळे सुरुवातीच्या २-३ आठवड्यांत भरपूर सकारात्मक गोष्टींच्या चर्चा झाल्यानंतर माणसाचा वेग मंदावला आणि निसर्गाला वाव मिळाला. हे असेच चालू राहावे अशी इच्छा शेकडो लोकांनी सोशल मिडियावर भरभरून व्यक्त केली. परंतु वैयक्तिक पातळीवर ह्यातला उत्साह लवकरच ओसरला असेही दिसते. ते इतर ट्रेंडिंग टॉपिकसारखेच राहिले. मात्र संस्थात्मक पातळीवर हे पुढे सुरू राहावे ह्यासाठी प्रयत्न चालू झालेले दिसतात. हे एकीकडे चालू असताना याच्या विरुद्ध बातम्या येऊ लागल्या आहेत. अनेक देशांनी पर्यावरण अहवाल सादरीकरण करण्यात शिथिलता दिली आहे किंवा पर्यावरणविषयक मर्यादा तात्पुरत्या स्थगित केल्या आहेत. करोनाच्या पार्श्वभूमिवर वैद्यकीय क्षेत्रात स्वच्छता आणि आरोग्य जपण्यासाठी ‘वापरा आणि फेका’ वस्तूंचे प्रमाण आणि वापर अनेक पटींनी वाढला आहे आणि तेवढ्याच प्रमाणात रसायनांचा वापर आणि धोकादायक कचरादेखील! तर हे झाले निसर्गसंवर्धनाच्या बाबतीत घडणारे विरुद्ध टोक. अर्थव्यवस्था सुरू व्हावी याकरता सर्वच राष्ट्रे निसर्गाकडे दुर्लक्ष करून प्रयत्न करणार हे इतिहासावरून स्पष्ट आहेच आणि वर्तमानकाळातदेखील हे दिसते आहेच. एकमेव आशा आहे ती सामान्य माणसाने योग्य पावले उचलली तर ‘समाजाची एकत्रित निवड’ दिशादर्शक ठरू शकेल. गेल्या एक-दोन वर्षांतील अनियमित आणि अतिपावसाच्या आणि पुरांच्या घटनांमुळेदेखील विचारांना चालना मिळाली आहे. ती सकारात्मक कृतीत परिवर्तित व्हावी ही सदिच्छा! आमेन!
संपर्क : ketaki@oikos.in
“बदलाच्या निमित्ताने आत्मपरीक्षण होणार का?” हा पहिला लेख वाचला.
गरज व चैन यांतील फरक कळून बदल व्हायला पाहिजे; पण भारतीय मानसिकता पाहता आपण पुन्हा त्याच पटरीवर येणार हे निःसंशय.
खरं तर असे लेख वारंवार लिहून लोकमानस जागे करायला हवे.
आपण ती धडपड कायम करत असता. आपले पर्यावरणीय भान वादातीत आहे.
तुम्ही मांडलेला डेटा चौर्याचा मुद्दा अनेकांना (त्यात सुविद्यही आहेत) कळतच नाही. फुकट ते पवित्र या तत्वावर वेगवेगळी apps वापरून स्वतःच आपली माहिती सतत चोर कंपन्यांना देणारे आपणच या स्थितीला कारणीभूत आहोत. मी स्वतः उच्च शिक्षित तंत्रज्ञ आहे पण कोणत्याही प्रकारच्या मोबाइल पासून मुक्त आहे. मुक्त संगणक प्रणाली (gnu/linux) हा यावर एक मोठा उपाय आहे.
तुमच्या उत्तम लेखाबद्दल तुमचे अभिनंदन आणि आभार.