स. न.
माझ्या, ‘या मार्गानेच जाऊया’ (सुधारक, मे २०२०) या लेखाचा प्रतिवाद करणारे डॉ. शेवडे व अंबुजा साळगावकर यांचे टिपण वाचले.
पारंपरिक आणि पूरक उपचार हे आपोआप जसे उपयुक्त ठरत नाहीत तसे ते निरर्थकही ठरत नाहीत. पण ते उपयुक्त आहेत हा दावा करायचा तर त्याला सबळ पुरावा हवा. जी औषधे/शस्त्रक्रिया शास्त्रीय कसोटीवर उतरतात ती आपोआपच आधुनिक औषधशास्त्राचा भाग बनतात. आयुर्वेदाधारीत रिसरपीन हे औषध, भगेंद्रासाठी सूत्रचिकित्सा किंवा चिनी वनस्पतीचे अरटेमेसुर हे मलेरियासाठीचे औषध अशी काही मूळ ‘देशी’ औषधे आता आधुनिक वैद्यकीचा भाग आहेत. अॅस्प्रिन, अॅट्रोपिन, स्कॉलीन, क्वीनीन ही औषधे आधुनिक वैद्यकीत रोज वापरली जातात. ही सर्व एकेकाळची ‘झाडपाल्याची’ औषधे आहेत. ही काही माझ्या महितीतील उदाहरणे. आणखीही कितीतरी असतील. आधुनिक वैद्यकीने देशोदेशीच्या ‘देशी’ औषधांवरच बरेचसे संशोधन करत करत आपले कपाट भरले आहे. मुद्दा एवढाच की औषध ‘प्राचीन’, ‘नॅच्युरल’, ‘हर्बल’, ‘पारंपरिक’, ‘होमिओ’, ‘चिनी’ वा ‘आयुर्वेदिक’ असणे हा त्या औषधाच्या वापराचा आणि उपयुक्ततेचा निकष नाही. कोणत्याही पॅथीच्या, कोणत्याही औषधाचा स्वीकार हा शास्त्रीय मापदंडावर आधारित असावा एवढीच अपेक्षा आहे. असं म्हटलं की पर्यायीवाल्यांची एक ठरलेली पळवाट असते. आम्ही इतके थोर आहोत की शास्त्रीय मापदंडाच्या पट्ट्यांनी आमची ऊंची मोजलीच जाऊ शकत नाही; असं त्यांचे म्हणणे असते. एफ्.डी.ए.चे नियम सुद्धा वेगवेगळे आहेत. ‘अ’ हे औषध ‘ब’ या आजारांसाठी उपयुक्त आहे असं म्हणायचं झाल्यास, ‘जुन्या ग्रंथातील संदर्भ’ एवढाच पुरावा ‘आयुष’कडून अपेक्षित असतो. याउलट आधुनिक वैद्यकीचे दावे अत्यंत काटेकोर निकष लावून सतत तपासले जातात; आणि हेच योग्य आहे.
…शिवाय जागतिक आरोग्य संघटना पारंपरिक, पूरक वैद्यकीस ‘नीटस’पणे पुढे आणण्यास प्रयत्नशील आहे.
हे योग्यच आहे. पण तिथेही प्रस्तावनेतच, ‘दर्जाची खात्री, सुरक्षितता, योग्य वापर आणि परिणामकारकतेचा’ आग्रह आहेच. (To strengthen the quality assurance, safety, proper use and effectiveness of T&C M by regulating products, practices and practitioners) मी तेच म्हणतो आहे.
‘या संकेतस्थळावर चायनीज मेडिसिन्समध्ये आर्सेनिकसारखे जड किंवा विषारी धातू आणखीही काही असते, जे रुग्णासाठी काही समस्या निर्माण करू शकते’ इतकेच म्हटले आहे.
हा ‘च’ जाचक आहे. इतके‘!’ म्हटले आहे, असं असायला हवं. घातक ठरू शकतील अशी रसायने अनेक देशी औषधात असतात. त्याबाबत कोणतीही माहिती लेबलवर नसते. (लेबलबाबतचे नियम वेगवेगळे असल्याने हे नियमातही बसते.) इतकेच काय ‘पारंपरिक व पूरक’ म्हणून दिलेल्या औषधात, लेबलवर काहीही न छापता मिसळलेली, स्टीरॉईडसारखी ‘आधुनिक औषधे’ही आढळली आहेत. जगभर आढळली आहेत. हे गैरच आहे.
पुढे असेही म्हटलेले आहे की, ‘याबाबत शास्त्रोक्त पद्धतीने केलेल्या संशोधनातून काही ठोस उत्पन्न झाले नाही. गंमत म्हणजे अशा प्रकारच्या संशोधनासाठी निधी उपलब्ध करून देण्यात येईल असेही म्हटल्याचे तेथेच दिसेल.’
यातही आक्षेपार्ह काहीही नाही. अमुक औषध, तमुक आजाराला उपयुक्त आहे असं कोणी म्हटल्यास, आणि त्यात सकृतदर्शनी तथ्य आढळल्यास, संशोधन गरजेचेच आहे. तरच त्या दाव्याचा शहानिशा शक्य आहे. नाही तर नुसतेच ‘आमची परंपरा’ एवढ्याच शक्तीवर शड्डू ठोकणे चालू राहील. जे कुणाच्याच हिताचे नाही. उलट मन आणि डोळे उघडे असल्याचे हे लक्षण आहे.
आता काही प्रश्नोत्तरे..
प्रश्न :- ‘म्हणजे ॲलोपॅथीलाही ते (औषध) मिळालेले नाही हे त्या बिचार्यांनी स्पष्ट सांगितलेले आहे.’ मग फक्त चायनीज मेडिसीनसंदर्भातला अभ्यास परिपूर्ण नाही असे का लिहावे?
उत्तर :- ह्याचे कारण असे की अपुऱ्या पुराव्यानिशी हे चिनी उंच उंच उड्या मारत आहेत. तुम्हाला तो अभ्यास परिपूर्ण आहे असं सुचवायचं आहे का?
प्रश्न :- “कोरोना रोखण्यास कोणत्याही औषधाची शिफारस नाही” यात ॲलोपॅथी औषधांचा समावेश आहे की नाही?
उत्तर:- अर्थातच आहे.
प्रश्न :- इराणच्या दारूबाधित ४४ जणांच्या मृत्यूची केस जरूर द्यावी, सोबत ॲलोपॅथीचाही फेल्युअर रेट द्यावा.
उत्तर :- तो तर रोज वर्तमानपत्रातून दिला जातो आहे.
प्रश्न :- झटपट फॉर्म्युला नाहीच आहे म्हणजे तो ॲलोपॅथीकडेही नाही असे स्पष्ट करायचे तेवढे राहिले आहे.
उत्तर :- ते तर स्पष्टपणे म्हटलेले आहे. असा फॉर्म्युला असूच शकत नाही, असा दावा भोंगळ आहे हे लेखात, साखर आणि पाण्याची ‘शालेय’ उदाहरणे देऊन, स्पष्ट केले आहे.
वरील प्रश्नात आधुनिक वैद्यकीला औषध सापडलेले नाही हाच मुद्दा उगाळला आहे. हे मान्यच आहे. पण आधुनिक वैद्यकीकडे औषध नाही म्हणजे ते इतरांकडे आहे असा अर्थ होत नाही!! आमच्याकडे औषध नाही असं म्हणायला लाज कसली? उलट भोंगळ, अवैज्ञानिक दावे करणे लज्जास्पद आहे. आपले अज्ञान आणि मर्यादा आधुनिक वैद्यकीने मान्य केल्या आहेत. अज्ञान मान्य करणे ही ज्ञानाकडे जाण्याची पहिली पायरी आहे. त्यात शरम ती कसली? उलट प्रामाणिकपणा आहे. परवा परवापर्यंत आधुनिक वैद्यकीकडे एकाही जिवाणूविरुद्ध, विषाणूविरुद्ध औषध नव्हते. आज अनेक आहेत.
प्रश्न :- आयुष-उपचारांनी प्रतिकारशक्ती वाढल्याचा दावा सर्वोच्च नेत्याने केला आहे. त्यांच्यावर अविश्वास दाखवण्याची गुस्ताखी करता आहात का?
उत्तर :- हो. कारण कोणा नेत्याचे मत हा पुरावा कसा काय होऊ शकतो? त्यांनी आणि त्यांच्या सवंगड्यांनी या आधीही असे अचाट दावे करून स्वतःचे हसे करून घेतले आहे. प्लॅस्टिक सर्जरी, लांडोरीचे अश्रु, इंटरनेट, उत्क्रांती वगैरे बाबतची त्यांची विधाने त्यांची विज्ञानविषयक समज स्पष्ट करतात.
आयुष उपयोगी नाही असे सरसकट विधान मी केलेले नाही. मुळात आयुष म्हणजे कोणता एकच एक वैद्यकविचार नसून आयुर्वेद, युनानी, सिद्ध आणि होमिओपॅथी अशी ती सरमिसळ आहे. उपयुक्तता ही त्या त्या विषयातल्या तज्ज्ञांनी सिद्ध करून दाखवायची आहे. ती मी किंवा कोणी नेत्यांनी सर्टिफाय करण्याची गोष्ट नाही.
भारतात आयुषची गळचेपी चालू आहे असाही सूर आहे.
असेल बुवा. पण केंद्रीय संशोधन संस्था, त्यांना मिळणारा सरकारी निधी, शेकड्याने कॉलेजेस्, खाजगी औषधकंपन्यांचे संशोधनविभाग वगैरे वर्षानुवर्षे कार्यरत आहेत की. पण गेल्या सत्तर वर्षांत दखलपात्र संशोधन झाल्याचे दिसत नाही. होमिओवाल्यांचे सरकारी ऑनलाइन जर्नल तर गेली काही वर्षे निपचित पडून आहे.
आमच्याकडे औषध नाही तरी आम्हीच तुमच्यावर उपचार करणार आणि काय येईल तो बरा-वाईट निकाल तुमच्या पुढ्यात ठेवणार असेच चाललेले नाही का ॲलोपॅथीचे?
आधुनिक वैद्यकीचं जे काय चाललं आहे ते येणेप्रमाणे…
रोग ‘बरा करणारे’, म्हणजे कोविडबाबतीत तो विषाणू नष्ट करणारे औषध आज नाही. पण त्यामुळे होणारे त्रास सुसह्य करणारे अनेक उपचार आधुनिक वैद्यकीकडे आहेत. तापासाठी आहेत, श्वसन-सुलभतेसाठी औषधे आहेत, फुफ्फुसाची सूज आटोक्यात रहावी म्हणून आहेत, क्षार आणि रक्तद्रव संतुलनासाठी आहेत, किडनीचे कार्य सुलभ करणारी आहेत, उलटी, मळमळ, खोकला यांसाठी आहेतच आहेत. अत्यवस्थ रुग्णांसाठी डायलेसीस, व्हेंटीलेटर असे उपचार आहेत. हे आणि असे सर्व प्रकार वापरून रुग्णांवर लक्षण-लक्ष्यी उपचार केले जातात. उपचारांनी जंतू मरत नाहीत. उपचार सहाय्यभूत तेवढे ठरतात. यातून बरेचसे पेशंट बरे होतात. उपचारांची सामर्थ्यस्थळे आणि मर्यादा यांचे भान येत जाते. हे सारे संशोधन आज झालेले नाही. ही वैज्ञानिक विचारसरणीची इतक्या वर्षांची पुण्याई आहे.
हे सारे नाकारून एखाद्या अन्य-पॅथीय दवाखान्यात जायचे रुग्णाचे स्वातंत्र्य अबाधित आहे.
‘पूर्वग्रहविरहित, अभिनिवेशरहित राहून स्वत:ला पटेल अशा पद्धतीचा अवलंब करण्याचा’ अधिकार रुग्णाला आहेच. अमुक औषध घेऊ नका असं कायदा कुठेही सांगत नाही. साथ पसरू नये म्हणूनची खबरदारी घेणे मात्र कायद्याने बंधनकारक आहे. याचा अर्थ ‘आयुष’ची गळचेपी असा मात्र नाही.
एकदा बाजारात आणून, लोकांना देऊन मागे घेतलेल्या लसींची उदाहरणे गेल्या पाच वर्षांत २४ आहेत.
प्रत्येक औषधाच्या चांगल्या-वाईट सगळ्याच परिणामांचा अभ्यास करायचा चंग अॅलोपॅथीने बांधलेला आहे. बाजारात दाखल होण्यापूर्वी आणि नंतरही असा अभ्यास निरंतर चालू असतो. अशा परिणामांच्या आंतरराष्ट्रीय रजिस्ट्री (अभिलेखागार, नोंदवह्या) आहेत. ऑनलाइन आहेत. तेंव्हा मीदेखील यात माझ्या अनुभव नोंदवू शकतो. काही कमतरता आढळली तर मग औषध बाजारातून मागे घेतलं जातं. अॅलोपॅथीची मूठ झाकलेली नाही. त्यामुळे तीत सव्वा लाख रुपये आहेत की सव्वा रुपया आहे हे तुम्ही पाहू शकता.
‘आयुष’ने असे अभ्यास केले आहेत का? अशी रचना तयार केली आहे का? मी तर उलट प्रश्न विचारेन, एकदा बाजारात आणून परत घेतलेली आयुष औषधे किती? अशी जर अजिबातच नसतील तर ते अशुभचिन्ह नाही का?
… तेव्हा ॲलोपॅथीत सगळे योग्यच चालले आहे असे समजण्याचे कारण नाही.
अर्थातच नाही. पण तो वेगळा विषय आहे.
वैज्ञानिकतेचा मार्ग आपल्याला तारू शकतो एवढं खरं.
मी हा पत्रव्यवहार खूप उशिरा म्हणजे २०२१ फेब्रुवारी मध्ये वाचला.
बऱ्याच वर्षापूर्वी आजचा सुधारक मध्ये प्रसिद्ध झालेल्या अशाच एका चर्चेत मी पत्र पाठवले होते.
माझ्या त्या पत्रातील मुद्दे आजही समर्पक वाटतील असे आहेत म्हणून ते सध्याच्या चर्चेला योग्य वाटतील असे सुधारले आहेत.
भारतात सध्या प्रामुख्याने अॅलोपॅथी, आयुर्वेद, होमिओपॅथी व युनानी या चार वैद्यकप्रणालींचा वापर वैद्यकीय व्यावसायिक करतात.
‘वैज्ञानिक वैद्यक’ हे अॅलोपॅथीचे अत्याधुनिक रूप आहे असे दिसते. अॅलोपॅथीतील उणिवा वैज्ञानिक वैद्यक दूर करणार असेल तर त्याचे स्वागत करायलाच हवे. परंतु येथे एक महत्त्वाचा मुद्दा विसरता कामा नये. अलोपॅथीच्या आजवरच्या प्रगतीत खाजगी क्षेत्रातील औषध-कंपन्यांच्या संशोधनाचा फार मोठा वाटा आहे. सर्व औषध कंपन्यांचे एकमेव उद्दिष्ट असते ते अधिकाधिक नफा मिळवण्याचे. त्यामुळेच वैज्ञानिक वैद्यकाचा विकास झाला तरी त्याचा भारतासारख्या कोट्यवधी गरीब लोकांच्या देशाला अगदी अल्पप्रमाणात फायदा होतो व त्याची जबर किंमत मोजावी लागते. . समाजहिताच्या दृष्टिकोणातून महागड्या वैद्यकीय तंत्रज्ञानाकडे बघणे आवश्यक आहे. केवळ ते वैज्ञानिक आहे म्हणून त्याचा स्वीकार करणे शहाणपणाचे आहे का याचा विचार झाला पाहिजे.
आपल्या ग्रामीण व शहरी भागांत, पाणी, हवा व ध्वनी ह्यांच्या प्रदूषणामळे व अनेक अनाकलनीय बाबींमुळे जुने आजार नवीन रूप घेऊन आले आहेत व आपल्या आरोग्यसेवा पुरवणाऱ्यांपुढे हे मोठेच आह्वान उभे आहे. नव्या आरोग्यसमस्यांना तोंड देण्यासाठी व आरोग्यसेवांचा दर्जा सुधारण्यासाठी केवळ वैज्ञानिक वैद्यक वा आयुर्वेद वा होमिओपॅथी ही एक वैद्यकप्रणाली समर्थ आहे असा दावा कोणी करू नये व तो केल्यास तो अज्ञानमूलक, समाजस्वास्थ्यविरोधी व समाजहितविरोधी होईल असे आपण म्हणू शकतो.
या उलट वर उल्लेखलेल्या चारही वैद्यकप्रणालींच्या समर्थकांनी एकत्र येऊन उमद्या मनाने, निःसंकोचपणे व पूर्वग्रह बाजूला ठेवून, आपल्या प्रणालीच्या जमेच्या बाजू व उणिवा यांचा विचार करावा व आपल्या देशाच्या आरोग्य समस्या दूर करण्यासाठी एकत्रित असा सुसंघटित कार्यक्रम देशापुढे ठेवावा.
आयुर्वेदातील उपचारपद्धतीत वनौषधींचा व इतर नैसर्गिक घटकांचा/धातूंचा वापर असतो. वैज्ञानिक वैद्यक वा अॅलोपॅथी फायद्याच्या दृष्टिकोणातून विचार करत असल्यामुळे वनौषधींचा मर्यादित प्रमाणात वापर करतात. याचा अर्थ आयुर्वेदातील औषधे निराधार आहेत असा होत नाही. पिढ्यानपिढ्या जी वनौषधियुक्त औषधे भारतीय वापरत आले आहेत ती कुचकामी आहेत असे कोण म्हणत असेल तर योग्य वाटत नाही.
आयुर्वेदातील आसवे, भस्मे व गोळ्या बनवण्यासाठी वनस्पतींचा, धातूंचा व अन्य नैसर्गिक रसायनांचा वापर होतो. माझ्या माहितीप्रमाणे एकच औषध हजारोंना लागू पडेल ही कल्पनाच मुळी आयुर्वेदाच्या मूलभूत संकल्पनेच्या विरुद्ध आणि विसंगत आहे. व्यक्तीप्रमाणे वैद्याने औषध बनवायचे व ते त्या व्यक्तीने सेवन करायचे हा नियम आजच्या काळात पाळता येणार नाही का?
आयुर्वेद म्हणजे निव्वळ औषधोपचार नव्हे. आयुर्वेद आपल्या जीवनाचा संपूर्ण विचार करतो व एक विशिष्ट जीवनशैली सुचवतो असा आयुर्वेद समर्थकांचा दावा असतो. तर आयुर्वेद कालबाह्य झाला आहे असे आधुनिक औषधांचे समर्थक म्हणतात. ज्या काळात आयुर्वेदाच्या वेगवेगळ्या संहिता लिहिल्या गेल्या तो काळ व आजचा काळ यांत जमीनअस्मानाचे अंतर आहे हे मान्य करूनही ज्या वैज्ञानिक वैद्यकाचा डॉ. अभ्यंकर हिरिरीने पुरस्कार करतात त्या वैद्यकालापण आयुर्वेदाकडे मोकळ्या, विवेकशील मनोवृत्तीने बघण्याची जरुरी आहे. सर्व पूर्वग्रह बाजूला सारून, आयुर्वेद एक ज्ञानशाखा आहे असे समजून संशोधन करण्याची आवश्यकता आहे हे पुन्हा आग्रहपूर्वक सांगू इच्छितो.