(डॉ. शंतनू अभ्यंकर यांच्या “या मार्गानेच जाऊया” या लेखाच्या पुन:प्रसिद्धीनिमित्ताने)
२४ एप्रिल २०२०च्या महाराष्ट्र टाइम्समधील डॉ. शंतनू अभ्यंकर यांचा “या मार्गानेच जाऊया” हा लेख ‘सुधारक’च्या १ मे २०२०च्या कोरोना विशेषांकांत पुन:प्रकाशित झाला. तेव्हा म.टा.ला कळवायची राहून गेलेली प्रतिक्रिया ‘सुधारक’च्या सुजाण वाचकांसाठी सत्वर पाठवत आहे. ‘जागतिक आरोग्य संघटना’ पारंपरिक-पूरक वैद्यकांस नीटसपणे पुढे आणून, येणार्या काळात प्रत्येक देशाचा आरोग्यांक वाढावा यासाठी प्रयत्नशील आहे. [https://www.who.int/traditional-complementary-integrative-medicine/strategy/en/] असे असता लेखाच्या सुरुवातीपासून इतक्या कडवटपणे देशी औषधांचा तिरस्कार करण्याचे कारण कळत नाही.
कोण्या उच्चविद्याविभूषित म्हणविणार्याने एका सामाजिक व्यासपिठावरून केलेली मांडणी ही भाषेचाही दर्जा सोडून झाली की तेथेच काही काळेबेरे असावे अशी शंका येते. चीनचे नेमके दावे काय होते, त्यांपैकी अमेरिकेने नेमके कोणत्या माहितीआधारे, म्हणजे संख्याशास्त्रीय पुराव्यांसह, कोणते खंडून काढले हे देण्याऐवजी चिनी औषधांबाबत “अमेरिकेने चिन्यांच्या दाव्याला धू धू धुतला” असे सरधोपट विधान खटकते. प्रत्यक्षात [https://www.nccih.nih.gov/health/traditional-chinese-medicine-what-you-need-to-know] या संकेतस्थळावर चायनीज मेडिसिन्समध्ये आर्सेनिकसारखे जड किंवा विषारी धातू आणखीही काही असते, जे रुग्णासाठी काही समस्या निर्माण करू शकते इतकेच म्हटले आहे. पुढे असेही म्हटलेले आहे की याबाबत शास्त्रोक्त पद्धतीने केलेल्या संशोधनातून काही ठोस उत्पन्न झाले नाही. गंमत म्हणजे अशाप्रकारच्या संशोधनासाठी निधी उपलब्ध करून देण्यात येईल असेही म्हटल्याचे तेथेच दिसेल. [https://directorsblog.nih.gov/2020/04/17/pursuing-safe-effective-anti-viral-drugs-for-covid-19/] या अमेरिकन इन्स्टिट्यूट ऑफ हेल्थच्या संचालकांच्या ब्लॉगमध्ये स्पष्ट म्हटलेले आहे की ॲलोपॅथी घेऊन आम्ही धडपडतो आहोत, शास्त्रीय संशोधनातून सिद्ध झालेले औषध लवकर एकदाचे मिळो. म्हणजे ॲलोपॅथीलाही ते मिळालेले नाही हे त्या बिचार्यांनी स्पष्ट सांगितलेले आहे. मग फक्त चायनीज मेडिसीनसंदर्भातला अभ्यास परिपूर्ण नाही असे का लिहावे? लेखातील, “कशालाच पुरेसा पुरावा नाहीये. बरीचशी वेडी आशा आणि काहीशी राजकीय अभिलाषा यामागे आहे” हे विधान खरेतर जगभरातील ॲलोपॅथीच्या उपचारांनाच अधिक ठळकपणे लागू होते.
चिनी किंवा कोणत्या औषधांची बाजू घ्यायची असा हेतू नाही. आणि सध्या फक्त सामान्यांच्या जवळचा महत्त्वाचा विषय म्हणून औषधयोजना या विषयापुरतेच लिहिणार असल्याने सॉफ्टपॉवर नि त्यासारख्या मुद्द्यांना हात लावणार नाही.
आजीबाईचा काहीसा उपयोगी, बराचसा संदिग्ध आणि काही निरुपयोगी वस्तूंचा, बरं वाटल्यासारखे भासवणारा पण बरं होण्याची खात्री नसलेला बटवा, ऋषीमुनींचा वारसा इत्यादी ‘चिन्यांस बोले, भारतीयांस लागे’ थाटात का लिहिले आहे? “कोरोना रोखण्यास कोणत्याही औषधाची शिफारस नाही” यात ॲलोपॅथी औषधांचा समावेश आहे की नाही? इराणच्या दारूबाधित ४४ जणांच्या मृत्यूची केस जरूर द्यावी, सोबत ॲलोपॅथीचाही फेल्युअर रेट द्यावा. गेले काही महिने जगभर करोडो रुपयांचा चक्काचूर झाल्यावरही कोणताही खात्रीचा इलाज तिथे मिळालेला नसून अनेक जीवांची बाजी लागल्यानंतरसुद्धा भारतात आयुषवैद्यकांकडून क्लिनिकल ट्रायल्स किंवा रुग्णचिकित्सेचे अधिकारच काढून घेतले जातात आणि संशोधनाचा अधिकार फक्त ॲलोपॅथीचा असल्याचे घोषित होते यात “वाहत्या गंगेत हात धुवून घेणारे” कोण दिसतात? आयुषच्या उपचारांनी प्रतिकारशक्ती वाढवण्याचा दावा हा सर्वोच्च नेत्यांकडून जाहीरपणे होतोय त्याला लेखकाने या लेखात आव्हान दिले आहे का हाही एक प्रश्न विचारायला हवा. उलट प्रतिकारशक्ती वाढवणे हाच जर सध्या कोरोनावर इलाज आहे आणि ती जर आयुषवैद्यकातील उपचारांनी वाढतेय असे सरकार सांगत आहे तर आयुषवैद्यक उपयोगी नाही असे म्हणणे हा विरोधाभास नाही का?
बाकी, या दाव्यात अर्थ नाही असे सांगण्यास दिलेली उदाहरणे मात्र एखाद्या शिक्षकाला लाजवतील इतकी दर्जेदार आहेत. शिवाय चौरस आहार, पुरेशी विश्रांती, व्यायाम आणि निर्व्यसनी राहणे ही प्रतिकारशक्ती वाढवण्याची चतु:सूत्रीही लाजवाब! झटपट फॉर्म्युला नाहीच आहे म्हणजे तो ॲलोपॅथीकडेही नाही असे स्पष्ट करायचे तेवढे राहिले आहे.
आयुषचे उपचार घेण्यास निर्बंध असू नये या आयुषवैद्यकाच्या मागणीवर, ते घ्यायचे असल्यास आधुनिक उपचारकेंद्रात तेथील अधिकार्यांच्या परवानगीनेच घेता येतील हे अलिकडच्या सरकारी फतव्यात स्पष्ट केले गेले याची लेखकांस वार्ता नाही बहुतेक. यशापयशाची जबाबदारी घेण्यास तयार असल्याशिवाय २००० आयुषवैद्यांनी यासंदर्भात आपापले संशोधन प्रकल्प सादर केले असतील का यावर वाचकांनी विचार करावा. “जेमतेम असलेला पैसा अनिश्चित आणि तापदायक उपचारात घालवून योग्य उपचारांपासून परावृत्त होणे आणि उपचार चालू आहेत या भ्रमात राहणे हा तोटाच आहे” हे किती खरे! त्याला समाजमान्यता मिळते की नाही हे सांगण्याचे परिमाण आपल्याकडे नाही, पण असे पैसे ॲलोपॅथीमध्ये घालवण्याला राजमान्यता आणि माध्यममान्यता मिळालेली दिसते. परिवर्तनाचा वाटसरू [www.pvatsaru.com] किंवा सुधारक [www.sudharak.in] असे विचारमंच सोडता, सर्वसामान्यांपर्यंत पोहोचणार्या वृत्तपत्रांत, असेच, केवळ ॲलोपॅथीची तळी उचलून थांबणारे नव्हे तर बाकी सगळे भंपक, असे ठसठशीतपणे लिहिलेले लेखच दिसत आहेत. आता मूळ लेखात लिहिल्याप्रमाणे तसे होणे हे अधिक धोकादायक, म्हणून हा लेखनप्रपंच!
आमच्याकडे औषध नाही तरी आम्हीच तुमच्यावर उपचार करणार आणि काय येईल तो बरा-वाईट निकाल तुमच्या पुढ्यात ठेवणार असेच चाललेले नाही का ॲलोपॅथीचे? दुसर्यांना संशोधनाची आणि रुग्णचिकित्सेची संधी जर एपिडेमिक ऍक्टमध्ये योग्य त्या सुधारणा न करता नाकारलेली आहे तर ते कुठून आणतील अनुभव नि अनुभवांची देवाणघेवाण केल्याची उदाहरणे? गावेच्या गावे ओस पाडणार्या रोगांच्या साथी हजारो वर्षांपूर्वीही होत्या, जनपदोध्वंस असे त्याला नावही दिलेले आढळते. तेव्हाही काही उपचारपद्धती होत्या. शे-दोनशे वर्षांत म्हणजे आधुनिक वैद्यकाच्या उदयकाळात आयुर्वेदिक वैद्यांनी रुग्णचिकित्सा केल्यास हात तोडले जातील असे फतवे होते असे सांगतात. अशातही एखाद्या राजवैद्यानी राजाला बरे केले नि फक्त त्यांना रुग्णचिकित्सेचा परवाना मिळाला अशीदेखील उदाहरणे आहेत. शाहूमहाराजांनी प्लेगमध्ये होमिओपॅथीचा शासकीय दवाखाना सुरू केल्याचे उदाहरण आहे. आता तिकडे लक्षच न देता “आम्हीच सगळे केले” असे कुणी म्हणत असतील तर ‘वर्हाड निघाले लंडनला’मधल्या शेजारच्या अमकीला पोर झालं ते बी माझ्याचमुळं… या विनोदाची आठवण होते, दुसरे काय?
तेव्हा इतकेच म्हणायचे आहे की पूर्वग्रहविरहित, अभिनिवेशरहित राहून स्वत:ला पटेल अशा पद्धतीचा अवलंब लोकांना करू द्या. एकदा बाजारात आणून, लोकांना देऊन मागे घेतलेल्या लसींची उदाहरणे गेल्या पाच वर्षांत २४ आहेत [https://www.fda.gov/vaccines-blood-biologics/safety-availability-biologics/recalls-biologics], तेव्हा ॲलोपॅथीत सगळे योग्यच चालले आहे असे समजण्याचे कारण नाही. सद्सद्विवेक वापरून सर्व प्रकारच्या वैद्यकांनी हातात हात घालून जगाच्या कल्याणासाठी उभे राहण्याची वेळ आहे. “माझेच बरे, बाकी झूठ” हा विचार सोडून देऊन देशाच्या संविधानात सांगितलेल्या स्वातंत्र्य, समता आणि बंधुतेच्याच मार्गाने जाऊया…
सर्वेऽपि सुखिन: सन्तु। सर्वे सन्तु निरामया:।
(अंबुजा साळगांवकर या मुंबई विद्यापिठामध्ये संगणकशास्त्र विभागप्रमुख असून भारतीय शास्त्रांचे आधुनिक काळात उपयोजन हा त्यांच्या संशोधनाचा विषय आहे. परीक्षित शेवडे हे मुंबईस्थित प्रथितयश आयुर्वेदतज्ज्ञ, वैद्य, असून सामाजिक मंचांवरून दिलेली त्यांची हजारो व्याख्याने गाजलेली आहेत.)
अतिशय समर्पक उत्तर समर्थपणे लिहीले आहे, दुसर्याला कमी लेखुन स्वतःचे मोठेपण सिद्ध करता येत नाही,
आयुर्वेद है एक शास्त्र आहे आणि शाश्वत आहे म्हणूनच एव्हढया काळाच्या ओघात ते टिकून आहे ! धन्यवाद ?
आपली सर्व स्पष्टीकरणे पटली आणि योग्य रीतीने मांडली आहेत. शुभेच्छा! आम्ही नदीसंवर्धन विषयक काम करत असताना याबद्दल खूप जागरूक असतो, कारण आज जगभरातल्या नद्यांना सर्व प्रकारच्या रासायनिक विषद्रव्यांनी ग्रासले आहे. प्रतिबंधात्मक जीवनशैली हे फक्त आयुर्वेदच सांगतो. कारण ते शास्त्र असले तरी जीवनशैली अधिक आहे, असे मला वाटते. मला आयुर्वेदातील किंवा अलोपथीमधले ज्ञान नसले तरी, आत्ताची जीवनशैली सर्व निसर्ग संसाधनांना मारक आहे, आणि ती बदलल्याशिवाय माणसाला असे विषाणू पुढेही छळत राहतील याची खात्री आहे.
आपली स्पष्टीकरणे अभ्यासपूर्ण आहेत. आभार.