आम्ही ऐकलंय की जीवाणू सगळीकडे असतात: शरीरात, हवेत, पाण्यात. मग कोरोना व्हायरसही सगळीकडेच असणार, नाही का?
- पहिले तर, कोरोना हा विषाणू (virus) आहे, जीवाणू (bacteria) नाही.
- जीवाणू हे एकपेशीय, सूक्ष्मदर्शी जीव आहेत. ते वेगवेगळ्या प्रकारचे असून पृथ्वीतलावर जवळजवळ सगळीकडे (गरम झरे, खारट पाणी, अत्यंत थंड किंवा गरम प्रदेश) सापडतात.
- काही जीवाणू माणसाच्या शरीरावर किंवा शरीराच्या आत राहतात. त्यांच्यापैकी अगदीच थोडे प्रकार माणसाला अपायकारक असतात. उदाहरणार्थ: पटकी (Cholera), क्षय रोग (TB), विषमज्वर (typhoid), मेनिन्जायटिस वगैरे.
- विषाणू हे जीवाणूंपेक्षाही अनेक पटींनी सूक्ष्म असतात. त्यांचेही अनेक प्रकार असतात.
- त्यांना ‘पेशी’ म्हणायचे की नाही, त्यांना ‘जीव’ म्हणायचे की नाही, ह्यावर एकमत नाही!
- इतके मात्र खरं, की विषाणू स्वतःचे स्वतः प्रजनन करू शकत नाहीत. ‘विभाजन’ होण्यासाठी (एका विषाणूपासून अनेक विषाणू निर्माण होण्यासाठी) त्यांना एखाद्या प्राण्याच्या, वनस्पतीच्या किंवा जीवाणूच्या पेशीत शिरावं लागतं.
- म्हणूनच, आजैविक (inorganic) वस्तूंवर विषाणू फार कमी काळ तगू शकतात.
- विषाणूंपासूनही माणसांना काही रोग होतात. उदाहरणार्थ: HIV (एड्स), देवी, फ्लू, डेंगू, SARS CoV, SARS CoV-2, इबोला वगैरे.
विषाणूंबद्दल जरा अजून सांगाल का?
- विषाणू हे अत्यंत सूक्ष्म परजीवी आहेत.
- त्यांचे अनेक आकार असतात. कोरोना गोलाकार आहे, पण इबोला लांबुळका, आणि इतर काही तर स्फटिकासारखे अनेक कोन असलेले असतात.
- सध्याचा कोरोना व्हायरस (CoV -2) सुमारे 0.1 मायक्रोमीटर इतक्या व्यासाचा आहे. म्हणजे, 1 मिलीमीटर वर साधारण 10,000 कोरोनाचे विषाणू एका शेजारी एक मावतील.
- विषाणूंची रचना आपल्या पेशींपेक्षा खूपच साधी असते.
- विषाणूंची रचना जीवाणूंच्या पेशींपेक्षाही साधी आणि सोपी असते.
खाली दिलेल्या चित्रांमधून चार वेगवेगळ्या प्रकारच्या पेशींच्या रचनेची साधारण कल्पना करता येईल. हे लक्षात घ्यावे, की ही फक्त चित्रे आहेत, फोटो नाहीत. तरीसुद्धा, विषाणूची क्लिष्टता सगळ्यात कमी आहे.
- असे समजा की एक विषाणू म्हणजे काही प्रोटीन्स (प्रथिने) आणि लिपिड (स्निग्ध पदार्थ) ह्यांनी बनलेली एक डबी असून तिच्या आत DNA किंवा RNA (अनुवांशिक पदार्थ) चा एक रेणू बंदिस्त असतो.
- आपल्या पेशींमधे असलेले पेशीद्रव्य, मायटोकोण्ड्रिया, रायबोसोम आणि इतर घटक विषाणूंमधे नसतात. ह्याचाच अर्थ असा, की विभाजनासाठी लागणारी यंत्रणा विषाणूंमधे नसते.
विषाणूंची रचना इतकी साधी असूनही ते इतके धोकादायक कसे काय असतात?
- आता आपल्याला पटले आहे, की विभाजनासाठी लागणारी यंत्रणा विषाणूंमधे नसते. म्हणूनच त्यांना विभाजनासाठी एका ‘यजमान’ पेशीची गरज असते.
- वेगवेगळ्या प्रकारचे विषाणू वेगवेगळ्या प्रकारच्या यजमान पेशींमधे राहू शकतात.
- जेंव्हा एखादा विषाणू आपल्या पेशीत शिरतो, तेंव्हा आपल्याला ‘विषाणूचे संक्रमण (infection) झाले’ असे म्हटले जाते.
- पेशीत शिरलेला विषाणू आता त्या पेशीची यंत्रणा स्वतःच्या विभाजनासाठी लागणारी सामग्री बनवण्यासाठी वापरू लागतो.
- पेशी स्वतःचे काम सोडून, विषाणूच्या जास्त जास्त प्रती बनवण्यासाठी लागणारी प्रोटीन्स, लिपिड्स आणि DNA किंवा RNA तयार करायला लागते.
- एक वेळ अशी येते, की असंख्य नव्या विषाणूंनी भरलेली पेशी फुटते, आणि विषाणू बाहेर पडतात.
- हे नवे विषाणू आता शरीरातील इतर पेशींकडे वळतात, आणि वरील चक्र पुन्हा सुरु होते.
एका अशाच विषाणूचे जीवनचक्र बघा:
आपली रोगप्रतिकार संस्था (immune system) ह्या विषाणूला का मारत नाही?
- आपली रोगप्रतिकार संस्था अनेकानेक विषाणूंपासून आपल्याला सतत वाचवत असते. आपला विविध प्रकारचे खोकला आणि सर्दी आपल्याला कळायच्या आतच बरे होतात.
- कधी कधी मात्र काही काही विषाणू आपल्या पेशींना इतक्या वेगाने ताब्यात घेतात, की रोगप्रतिकार संस्थेला त्याची जाणीव व्हायच्या आताच आपण खूप आजारी झालेलो असतो.
सर्वच विषाणू धोकादायक असतात का?
- नाही. काही विषाणू एखाद्या विशिष्ट प्राण्यामध्ये किंवा एखाद्या वनस्पतीमध्ये अनेक पिढ्यांसाठी त्यांना आजारी न करता राहतात. त्या प्राण्याला (किंवा वनस्पतीला) आणि विषाणूला एकमेकांची सवय झालेली असतें. यजमान पेशीला न मारता हे विषाणू तिच्यात राहतात.
- असे म्हणतात, की काही प्रकारचे ‘फ्लू विषाणू’ माणसांमधे राहत आहेत. वटवाघळांमध्येही असंख्य प्रकारचे विषाणू राहतात. अनेक झाडे आणि प्राणी त्यांच्या त्यांच्या विशिष्ठ विषाणूंबरोबर राहत आहेत.
- पण काही वेळा, जर हे विषाणू एखाद्या वेगळ्या जीवाच्या संपर्कात आले, तर मात्र ते त्याला आजारी पाडू शकतात.
कोविड-19 म्हणजे काय?
- कोविड -19 हा नुकताच सापडलेल्या (2019 मधे) कोरोना व्हायरसमुळे होणारा संसर्गजन्य रोग आहे.
- कोरोना विषाणूला ‘SARS CoV-2’ असं ही म्हणतात.
- डिसेंबर 2019च्या मध्ये चीनमधील ‘वुहान’ प्रांतात त्याचा उद्रेक होण्यापूर्वी या नवीन विषाणूबद्दल आणि ह्या आजाराबद्दल जगाला काहीच माहिती नव्हती.
‘सार्स’ म्हणजे काय?
- 2002-3 साली मानवी श्वसनसंस्थेवर हल्ला करणारा एक अत्यंत संसर्गजन्य रोग जगभर पसरला.
- त्याच्या तीव्रतेमुळे त्याला Severe Acute Respiratory Syndrome किंवा SARS हे नाव दिलं गेलं.
- ह्या रोगाचे कारण असलेल्या SARS-CoV ह्या कोरोना व्हायरसचा शोध 2003 साली लागला.
कोविड-19, कोरोना व्हायरस आणि SARS एकच का?
- नाही. हे तिन्ही वेगळेवेगळे आहेत.
- ‘कोरोना’ ह्या लॅटिन शब्दाचा अर्थ ‘मुगुट’ किंवा ‘मुगुटासारखे’ असा आहे.
- पृष्ठभागावर कंगोरे किंवा काटे असल्यामुळे मुगुटासारखे दिसणाऱ्या विषाणूंचा एक संच (किंवा कुटुंब) आहे.
- 2003 साली सापडलेला SARS CoV, आणि 2019-20 सालच्या साथीचे (सध्याच्या साथीचे) कारण ठरलेला विषाणू, हे दोन्हीही ‘कोरोना’ कुटुंबात मोडतात.
- सध्या ज्याने जगात धुमाकूळ माजवला आहे, त्या विषाणूचं नाव SARS CoV-2 असं आहे.
- कोविड-19 हा SARS CoV-2 मुळे होणारा रोग आहे.
- SARS CoV आणि SARS CoV-2. ह्या दोन्ही विषाणूंमधे काही साम्ये आहेत, परंतु काही फरकही आहेत.
- SARS CoV आणि SARS CoV-2 हे विषाणू जरी एकमेकांशी अनुवांशिकदृष्ट्या संबंधित आहेत, तरी त्यांमुळे होणारे रोग बरेच वेगळे आहेत.
- SARS CoV मुळे होणारा रोग जास्त प्राणघातक होता, परंतु त्याचा विषाणू SARS CoV-2 च्या तुलनेत खूपच कमी संसर्गजन्य होता.
- 2003च्या नंतर जगात कुठेही SARS CoV चा पुन्हा उद्रेक झालेला नाही.
कोविड-19 ह्या आजाराची चिह्ने काय आहेत? हा आजार झाला, तर मला कसे वाटेल?
- तुम्हाला गळून गेल्यासारखे किंवा अशक्तपणा आल्यासारखे वाटू शकते. कधी तापही येऊ शकतो.
- काही लोकांना कोरडा खोकला होऊ शकतो, तर काही जणांना सर्दी होऊन नाकही गळू शकते.
- कोविड-19 च्या तीव्र उदाहरणात रोग्याला श्वासोच्छवास करायला त्रास होऊन गुदमरायला होते.
कोविड-19 झालेल्या प्रत्येक रोग्यामधे ही सगळी चिह्ने दिसतात का?
- नाही. काही लोकांना ह्या आजाराची लागण झाली असूनही त्यांच्यात ह्यातील एकही चिह्न दिसत नाही.
- काही लागण झालेल्या लोकांमध्ये हीच चिह्ने अगदी सौम्य असतात, आणि थोड्याच दिवसांत ती दिसणे बंदही होते.
- काही रोग्यांमध्ये आजाराचे स्वरूप तीव्र असते. अशा रोग्यांना दवाखान्यात नेणे हा सर्वोत्तम उपाय आहे.
कोरोना विषाणूचा संसर्ग झालेली प्रत्येक व्यक्ती स्वतः संसर्गजन्य असते का?
- होय. जे लोक ह्या विषाणूची लागण होऊनही कोविड-19 ची कुठलीही चिह्ने दाखवत नाहीत, ते लोकदेखील रुग्ण आहेत हे विसरू नये. तेदेखील हा रोग आजूबाजूच्या लोकांमध्ये पसरवू शकतात. म्हणूनच जरी तुमच्या मित्र परिवारात कोणीही खोकत किंवा शिंकत नसेल, तरीही त्यांच्यापासून दूर राहणेच शहाणपणाचे आहे.
- शिवाय, समजा, तुम्ही स्वतः रोगाची सौम्य चिह्ने दाखवत आहेत, आणि त्यातून तुम्ही लवकरच बरेही व्हाल. पण असेही शक्य आहे, की तुमच्यापासून संसर्ग झालेली इतर कोणी व्यक्ती इतक्या सहजी बरी होणार नाही. तुमच्यापासून इतरांना धोका असू शकतो.
- आजूबाजूच्या लोकांपासून दूर राहणे, त्यांच्यापासून शारीरिक अंतर ठेवणे, हे तुमच्या स्वतःच्या तसेच इतरांच्या सुरक्षिततेसाठी अत्यंत महत्त्वाचे आहे.
कोविड-19 किती धोकादायक मानावा? ह्या रोगाची किती भीती बाळगणे योग्य आहे?
- कोविड-19 चा धोका अनेक घटकांवर अवलंबून आहे: वय, आधीपासून असलेले इतर रोग आणि उपलब्ध असलेली आरोग्यसेवा, हे काही महत्वाचे घटक आहेत.
- रुग्णाचे वय जितके जास्त, तितकी रोगाची तीव्रता अधिक. आणि जितकी रोगाची तीव्रता अधिक, तितकी दवाखान्यात भरती करावे लागण्याची शक्यताही जास्त, आणि मृत्यू होण्याची शक्यताही तितकीच जास्त.
- एखाद्या व्यक्तीत आधीपासून अस्तित्वात असलेले रोग, आणि त्या व्यक्तीचे साधारण आरोग्य ह्यांचा परिणाम तिच्या कोविड-19 ला तोंड द्यायच्या क्षमतेवर होतो. ज्यांना श्वसन संस्थेचे आजार, हृदयाचे आजार (रक्तदाब वगैरे) किंवा मधूमेह आहे अशा रोग्यांना कोविड-19 मुळे न्यूमोनिया होऊन त्यांची परिस्थिती बिकट होऊ शकते.
लहान मुले आणि तरुण ह्यांचा कोविड-19 मुळे मृत्यू होण्याची शक्यता अगदी कमी आहे असे म्हणतात. असे असताना त्यांनी नेहेमीप्रमाणे वागणे, जगणे चालू ठेवायला काय हरकत आहे?
- त्यांनी असे करणे धोक्याचे आहे ह्याचे कारण हे लोक जरी स्वतः आजारी पडले नाहीत, तरी त्यांच्याकडून इतर (वयस्क व इतर आजार असलेले) लोकांना कोविड-19 चा संसर्ग होऊ शकतो.
- दुसरे म्हणजे, जरी ह्या व्यक्तींमध्ये मृत्यूचे प्रमाण कमी असले, तरी तेदेखील खूप आजारी पडू शकतात, आणि त्यांना दवाखान्यात भरती करावे लागू शकते.
- ह्याचा एक परिणाम म्हणजे ज्यांना जास्त धोका आहे, अशा रुग्णांसाठी दवाखान्यातील जागा आणि सोयी कमी पडू शकतात.
- उपचारापेक्षा रोग टाळणे केंव्हाही चांगले! म्हणूनच लहान वयाच्या लोकांनी सुद्धा एकमेकांपासून अंतर ठेवणे वगैरे खबारदाऱ्या घेऊन ह्या रोगाचा संसर्ग पसरण्याला आळा घालण्यास मदत करावी.
- शेवटचे म्हणजे, ज्या लहान मुलांना काही विशिष्ट प्रकारच्या आरोग्यसेवेची गरज असते (special needs children) अशा मुलांवर कोविड-19 चा काय परिणाम होतो ह्याबद्दल खूप कमी माहिती उपलब्ध आहे. ‘अमेरिकन असोसिएशन ऑफ पेडिऍट्रिक्स’ ह्या संस्थेतील एका डॉक्टरांच्या मते, ज्याप्रमाणे आपण वयस्क रुग्णांची काळजी घेऊ, त्याच स्तराची काळजी ह्या मुलांची घेणे आवश्यक आहे.
हा विषाणू कसा पसरतो?
- जेंव्हा एखादा संसर्ग झालेला रुग्ण खोकतो, शिंकतो, किंवा बोलतो, तेंव्हा जे थुंकीचे थेंब उडतात, त्यांच्यामार्फत कोविड-19 चा विषाणू पसरतो.
- हे थेंब बऱ्यापैकी जड असतात, त्यामुळे ते फार काळ हवेत तरंगत राहू शकत नाहीत. ते लगेचच जमिनीवर आणि आजूबाजूच्या इतर पृष्ठभागांवर येऊन पडतात.
- तुम्ही कोविड-19 ने आजारी असलेल्या एखाद्या व्यक्तीच्या जवळ उभे असाल, तर व्हायरस त्याच्या श्वासातून तुमच्या शरीरात शिरू शकतो.
- दूषित पृष्ठभागांना लावलेला हात जर न धूता नाक, डोळे किंवा तोंड ह्यांना लावलात, तरी हा विषाणू तुमच्या शरीरात प्रवेश करू शकतो.
कोरोना विषाणूचा संसर्ग होऊ नये म्हणून काय काळजी घ्यावी?
- बऱ्याच विषाणूची लागण झालेल्या लोकांमधे रोगाची चिह्ने दिसत नाहीत. म्हणूनच सर्व बाहेरच्या/बाहेरून आलेल्या लोकांपासून दूर राहणे (किमान एक मीटर किंवा तीन फूट) महत्त्वाचे आहे.
- हात साबणाने स्वछ, चोळून धुवावे. हातावर साबण घेतल्यानंतर हात किमान 20 सेकंद चोळावेत, आणि मग पाण्याने साबण धुवून टाकावे. साबण लावून चोळण्याची क्रिया विषाणू नष्ट करायला पुरेशी आहे.
- हात चोळत असताना नळ बंद ठेवावा, आणि पाणी वाया घालवू नये. उन्हाळा येतो आहे हे विसरू नये.
- अल्कोहोल असलेले सॅनिटायझर्स वापरून हात वेळोवेळी स्वच्छ करावेत.
- आपल्या चेहऱ्याला, नाकाला किंवा डोळ्यांना स्पर्श करणे टाळावे.
- जेंव्हा शक्य असेल तेंव्हा बाहेर जाताना सर्जिकल मास्क वापरावा. मास्क नसेल, तर अनेक थर असलेल्या रुमालाचा/ओढणीचा वापर करावा.
- खोकला किंवा शिंक आल्यास आपले नाक आणि तोंड अनेक थर असलेल्या रुमालाने/ओढणीने किंवा वाकलेल्या कोपऱ्याने झाकून मगच खोकावे/शिंकावे.
- अन्न शिजवून खावे.
- मोठे जमाव जेथे जमतात अशा ठिकाणी (क्रीडास्पर्धा, गायनाचे कार्यक्रम, शाळा) जाऊ नये.
- सार्वजनिक वाहनांमधून (रिक्षा, बस, आगगाडी, विमान) प्रवास टाळावा.
- अस्वस्थ वाटत असल्यास, बरे वाटत नसल्यास घरात रहावे, आणि घरातील इतरांपासून स्वत:ला वेगळे ठेवावे.
स्वत:ला अलग ठेवणे (self quarantine) म्हणजे काय?
- जे लोक कोरोना व्हायरसच्या संपर्कात आले असण्याची शक्यता आहे आणि ज्यांना कोविड -19 होण्याचा धोका आहे त्यांनी स्वत:ला इतरांच्या संपर्कात येण्यापासून थांबवणे आवश्यक आहे. समजा तुम्ही परदेश प्रवास करून आला असाल, शहरातील कोरोनाग्रस्त भागात जाऊन आला असाल किंवा तुमच्या जवळ असलेल्या व्यक्तीला विषाणूची लागण झाल्याचे कळले असेल, तर तुम्ही स्वतःला इतरांपासून दूर ठेवणे गरजेचे आहे.
- अशा लोकांनी किमान 14 दिवसांसाठी स्वतःला अलग ठेवावे अशी शिफारस आरोग्यतज्ज्ञांनी केली आहे.
- इथे अशी आशा केली गेली आहे, की ह्या दोन आठवड्यांमध्ये ह्या लोकांना आजार झाला असेल, आणि ते स्वतः संसर्ग पसरवू शकत असतील अथवा नाही हे स्पष्ट होईल.
स्वत:ला अलग ठेवणे ह्यात खालील बाबी समाविष्ट आहेत:
- घरी राहणे.
- आपल्या घरातील इतर लोकांपासून कमीतकमी 6 फूट अंतरावर राहणे.
- शक्य असल्यास संलग्न बाथरूम असलेल्या खोलीत एकटेच बंदिस्त असणे.
- पाहुण्यांना घरी न बोलावणे.
- इतरांपेक्षा वेगळे टॉवेल्स आणि भांडी वापरणे.
- शक्य असल्यास खोलीतच अन्न घेणे.
- स्वतःची भांडी, कपडे स्वत: धुणे.
- हा कालावधी संपल्यानंतर, आणि आपल्याला रोगाची लक्षणे नसल्यास, आपल्या नेहमीच्या दिनचर्येला कसे लागावे याविषयी डॉक्टरांच्या सूचनांचे अनुसरण करणे.
कोविड-19 वर काही औषध आहे का?
- सध्या अस्तित्वात असलेल्या कुठल्याही औषधाने हा रोग पूर्ण बरा होत असल्याचा पुरावा नाही.
- काही औषधांच्या उपयुक्ततेबद्दल अफवा आहेत, परंतु खात्रीलायक माहिती नाही. ह्या औषधांचे अनेक धोके असू शकतात.
- अनेक नव्या, आणि पाश्चिमात्य आणि पूर्वापार चालत आलेल्या औषधांच्या परिणामांवर आणि उपयुक्ततेवर सध्या जोरात अभ्यास सुरु आहे.
कोविड-19 साठी अँटिबायोटिक्स घ्यावीत का?
- अँटिबायोटिक्सचा उपयोग जीवाणू (bacteria) नष्ट करायला होऊ शकतो. विषाणूंवर त्यांचा थेट परिणाम होत नाही. कधीकधी विषाणूच्या संसर्गामुळे अशक्त झालेल्या शरीराला इतर संसर्ग होऊ नयेत म्हणून डॉक्टर ह्या प्रकारची औषधे देतात.
- डॉक्टरच्या सल्ल्याशिवाय, स्वतःच्या मनाने, कधीही अँटिबायोटिक्स घ्यायला सुरुवात करू नये. ह्याचे दुष्परिणाम बरेच आहेत.
जर कोविड-19 वरची लस अस्तित्वात नाही, तर मग काही रुग्ण बरे कसे होत आहेत?
- ‘लस’ ही आपल्या शरीराला विषाणूंच्या हल्ल्याला तोंड देण्यासाठी तयार करते. लसीची टोचणी विषाणूची लागण व्हायच्या आधी व्हावी लागते.
- जर शरीरावर आधीच विषाणूचा हल्ला झालेला असेल, तर लस टोचल्याने फरक पडत नाही.
- विषाणूची लागण झाल्यानंतर शरीराची रोगप्रतिकार शक्ती त्याच्याशी लढा देण्यासाठी हळूहळू सिद्ध होऊ लागते.
- जर विषाणूने पेशींचा खूप मोठ्या प्रमाणावर नाश करण्याच्या आधी शरीराने त्याचा प्रतिकार करायला सुरुवात केली, तर आजार फार पुढे न जाता रुग्ण बरा होऊ लागतो.
- प्रत्येक माणसाची रोगाला प्रतिकार करायची क्षमता वेगळी असते. ही क्षमता माणसाचे वय आणि आरोग्य ह्यांवर अवलंबून असते. म्हणूनच काही जण लवकर बरे होतात, तर काहींना खूप त्रास होतो. आणि इतर काही जणांचा ह्या रोगामुळे अंतही होऊ शकतो.
कोविड-19 एखाद्याला पुन्हा पुन्हा होऊ शकतो का?
- ह्याचे उत्तर अजून आपल्याला माहीत नाही.