करोनाने सगळ्यांना दुग्ध्यात पाडले आहे. विशेषतः आरोग्यकर्मींना.
नवी साथ आली म्हणताच देशोदेशीचे वैद्य, हकीम आपापले बटवे घेऊन सरसावले आहेत. बटवेच नाही तर बावटेही आहेत त्यांच्या हातात. त्या त्या देशाला त्या त्या देशीच्या देशी औषधांचा अभिमान आहे. तेंव्हा आपलंच खरं असं सांगायची एक चढाओढ लागली आहे.
आमच्या पूर्वापार चालत आलेल्या प्रथापरंपरा, जडीबुटीची जादुई दवा, आता आपली कमाल दाखवेल, असे दावे जगभरात केले जात आहेत.
चिन्यांनी नेहमीप्रमाणे इथेही आघाडी घेतली आहे. प्राचीन चिनी उपचार कसे ‘बेश्ट’ आहेत हे ते सांगत आहेत. त्यांच्या सरकारचाही त्यांना पाठिंबा आहे. ‘चायनिज जर्नल ऑफ इंटीग्रेटेड मेडिसिन’नी करोनाहारक अशा अर्धा डझन वनस्पति आणि काढे यांची यादीच प्रसिद्ध केली आहे. अर्थात यातल्या कशालाच पुरेसा पुरावा नाही आहे. बरीचशी वेडी आशा आणि काहीशी राजकीय अभिलाषा यामागे आहे.
अमेरिकेच्या ‘नॅशनल इंस्टीट्यूट ऑफ हेल्थ’ने चिन्यांच्या या दाव्याला धू धू धुतला आहे. वर चिनी औषधात कीटकनाशके, घातक रसायने इतकेच काय, पण गुपचूपपणे घातलेली आणि त्यामुळे प्रमाण, मात्रा वगैरे गुलदस्त्यात असलेली; ‘आधुनिक औषधे’ही असू शकतात असं बजावून सांगितलं आहे. चिनी औषधे नेमकी साधक का बाधक ते अजूनही सांगता येत नाही, यांच्याबाबतचा कोणताच अभ्यास परिपूर्ण नाही, असंही त्यांच्या वेबपेजवर म्हटलं आहे.
करोना रुग्णांच्या संख्येइतकीच चिन्यांची ह्या बाबतीतली आकडेवारीही संशयास्पद आहे. आपलंच घोडं पुढे दामटण्यात चीनचे राजकीय हितसंबंध आहेत. ह्याला म्हणतात ‘सॉफ्ट पॉवर’. म्हणजे आपली भाषा, संस्कृति, कला, परंपरा, चित्रपट, वैद्यकी इत्यादी माध्यमांतून परकीयांवर केलेला हा हल्लाच. अर्थात अशी ‘सॉफ्ट पॉवर वॉर्स’ सतत चालत असतात. उत्तम चित्रपटांना पुरस्कार झांबीयातही देतच असतील की पण आपले डोळे ‘ऑस्कर’कडे लागलेले असतात. हे अमेरिकन सॉफ्ट पॉवरचं उदाहरण. योगा आणि बॉलीवुड हे भारतीय सॉफ्ट पॉवरचं.
माझ्या आजीसकट, जगभरच्या आजीबाईंच्या बटव्याप्रमाणेच चिनी आजीचा बटवा आहे. त्यात काही उपयोगी, बराचसा संदिग्ध आणि काही निरुपयोगी माल भरलेला आहे. म्हणजे गवती चहा प्यायल्यावर सर्दी झालेल्याला ‘बरं’ वाटतं पण त्याने तो ‘बरा’ होत नाही, असा तो प्रकार आहे. बरं वाटणं आणि बरं होणं ह्यात जमीन आस्मानाचा फरक आहे. करोना साथीत तर तो शब्दशः जमीन आस्मानाचा आहे.
प्राचीन चिनी मुनींनी दिलेला हा समृद्ध वारसा चिनी डॉक्टरांनी जतन केला पाहिजे, त्याचा अभिमान बाळगला पाहिजे, तो वृद्धिंगत केला पाहिजे, त्यात संशोधन केले पाहिजे, त्याचा प्रचार आणि प्रसार केला पाहिजे, वगैरे, वगैरे, वगैरे, चीनचे अध्यक्ष क्षी जिन पिंग यांनी हे वेळोवेळी सांगितलं आहे. हे सगळं खूप परिचयाचं, ऐकल्यासारखं आणि अगदी जवळचं वाटतंय ना? मग आहेच तसं ते.
जगभर सगळे आपापली औषधे सरसावून पुढे येत आहेत. उदाहरणार्थ, आपल्या आयुष मंत्रालयाने जानेवारीतच आर्सेनिक अल्बम हे होमिओ औषध ‘प्रतिबंधक’ म्हणून सुचवलं आहे. ह्या दाव्याशी सुसंगत असा एकही अभ्यास झालेला नसताना हा दावा करण्यात आला आहे. गंमत म्हणजे २६ मार्चच्या ट्विटमध्ये महाराष्ट्राच्या आरोग्य मंत्रालयाने, ‘कोरोना रोखण्यास कोणत्याही औषधाची शिफारस नाही’ असे स्पष्ट केलेले आहे. निसर्गोपचारवाले, रेकीवाले, अरोमावाले, कोणीही मागे नाही. अॅक्यूपंक्चरवाल्यांकडे तर ‘किडनी आणि फुफ्फुसे बलदंड करणारी’ युक्ती आहे. बरेचदा हे दावे पोकळ असतात त्यामुळे निरुपयोगी आणि निरुपद्रवीही असतात. असल्या दाव्यांची चलती असते त्यामागे हेही कारण आहे. पण कधीतरी गणित फसतं. इराणमध्ये करोना होऊ नये म्हणून लोक गावठी दारू प्यायले आणि विषबाधा झाल्याने तब्बल ४४ जणांना प्राणास मुकावे लागले.
मला एड्सच्या साथीची आठवण होते. एड्सवर औषध यायला काही दशके लागली होती. आणि इतका सारा काळ केरळपासून कॅलिफोर्नियापर्यंत अनेक भोंदुंनी आपापली दुकाने थाटली होती. आज एड्सवर प्रभावी औषध आहे आणि औषधबाजारातील ही सारी भोंदुंची पाले भूछत्राच्या गतीनी मिटली आहेत. पण सुरुवातीला एड्सच्या भयगंगेत अनेकांनी आपले हात धुऊन घेतले. सर्वसंहारक संकट, भयभीत, हतबल जनता, या परिस्थितीचा गैरफायदा घेणारे भोंदू आणि शास्त्रीय औषधांच्या उदयाबरोबर होत जाणारा त्यांचा अस्त; हासुद्धा अभ्यासाचा विषय आहे.
ह्या सगळ्यात गंमतीशीर दावा आहे तो ‘प्रतिकारशक्ती वाढवण्याचा’. हे सगळे ‘पूरक आणि पर्यायी औषधोपचार’ प्रतिकारशक्ती वाढवतात म्हणे! प्रतिकारशक्ती ही जरा ऐसपैस संकल्पना आहे. त्याचे कोणतेही एकच मापक किंवा एकक नाही. त्यामुळे ती वाढवल्याचा दावा करणे अगदी सोपे आहे. तो दावा खोडून काढणे अवघड नाही तर अशक्य आहे. म्हणूनच तर असले दावे केले जातात. ‘मी तुमची कल्पनाशक्ती वाढवतो!’, अशा दाव्यासारखा हा दावा आहे.
मनात आणलंच तर अगदी साखरेच्या पुड्यासुद्धा प्रतिकारशक्तीवर्धक म्हणून विकता येतील. कारण उपाशी माणूस हा सहज आजारी पडतो हे सत्य आहे. ह्या न्यायानी पाणीसुद्धा प्रतिकारशक्तीवर्धक म्हणता येईल. कारण शुष्कता आली तर शरीरातल्या अनेक सिस्टिम्स बिघडतात. त्यात प्रतिकारशक्तीही आली.
प्रतिकारशक्ती सशक्त ठेवायची तर चौरस आहार, पुरेशी विश्रांती, व्यायाम आणि निर्व्यसनी राहणी हे महत्त्वाचे. प्रतिकारशक्ती वाढवण्याचा, सर्वांनी सरसकट घ्यावा असा, दुकानात विकत मिळणारा, झटपट फॉर्म्युला नाहीच. पण असे फॉर्म्युले विकणारे मात्र भरपूर आहेत. सार्वजनिक भीतीचा, वापर हे आपला माल खपवण्यासाठी करत असतात.
शिवाय हे उपचार आधुनिक उपचारांच्या सोबतीनी घ्यायचे आहेत अशीही मखलाशी आहे. ही एक चांगली सोय असते. म्हणजे यशाचं पितृत्व स्वतःकडे ठेवून अपयशाचं खापर दुसऱ्याच्या माथ्यावर फोडता येतं. नेहमीप्रमाणेच, ‘फायदा होतो का नाही हा वाद ठेवा बाजूला, पण निदान तोटा तर होत नाही ना?’ हाही लाडका युक्तिवाद आहेच. आधीच जेमतेम असलेला पैसा अशा अनिश्चित आणि प्रसंगी तापदायक उपचारात घालवणे हा तोटाच आहे. योग्य उपचारांपासून परावृत्त होणे हा तोटाच आहे. उपचार चालू आहेत ह्या भ्रमात रहाणे हा तोटाच आहे. पण या साऱ्याला राजमान्यता, समाजमान्यता आणि माध्यममान्यता मिळणे अधिक धोकादायक आहे.
आमच्याकडे हा आजार बरे करणारे औषध नाही, असं फक्त आधुनिक औषधोपचारवाले म्हणत आहेत. आहे त्या सामग्रीनिशी ते लढत आहेत. तोंडाला ‘मुसक्या’ बांधून, आधुनिक ‘घोंगड्या’ (रक्षाकवच) पांघरून, रोज आले किती? तपासले किती? बरे किती? वारले किती? वगैरे आकडेवारी जाहीर करत आहेत. यशापयशाचा लेखाजोखा मांडत आहेत. संशोधन जारी आहे. तुमचा काय अनुभव, आमचा काय अनुभव; तुमचं कुठे चुकलं, आमचं कुठे चुकलं; अशी देवघेव चालू आहे. अमुक करा, तमुक नको असे सल्ले दिले-घेतले जात आहेत. चुका दुरुस्त केल्या जात आहेत. ह्या अशा अभ्यासातून आणि काटेकोर नियोजनातून देवीचे निर्मूलन झाले, पोलिओ पळून गेला, नारू नाहीसा झाला, एड्स आवाक्यात आला आणि कुष्ठरोग, गोवर, निघायच्या वाटेवर आहेत. तेंव्हा हाच मार्ग खरा. पूर्वग्रहविरहित, अभिनिवेशरहित, अशा ह्या मार्गानेच जाऊ या.
प्रथम प्रसिद्धी : महाराष्ट्र टाइम्स, २४ एप्रिल २०२०
संपर्क : ९८२२०१०३४९