अफझलखानाचं स्वराज्यावरील आक्रमण हे स्वराज्यावरचं फार मोठं संकट होतं. उणे पुरे दहा – बारा वर्ष तर झाले होते, शिवाजीराजांना स्वराज्य स्थापून! हाताशी असलेले थोडेफार किल्ले. आजच्या भाषेत दोन तीन जिल्ह्यांपुरतं सुद्धा नव्हतं हे राज्य.
अन् ह्या अश्या राज्याला चिरडण्यासाठी क्रूरकर्मा, महाभयंकर अफझलखान तीस – पस्तीस हजारांचं चतुरंग सैन्य घेऊन निघाला होता. स्वराज्याजवळ होते, सर्व मिळून अवघे सहा हजार सैनिक! आदिलशाहीचा तर विश्वास होताच, शिवाजीचं राज्य संपणार म्हणून. पण मोंगल, इंग्रज, पोर्तुगीज, फ्रेंच, वलंदेज… या सार्यांचाही ठाम विश्वास होता की शिवाजी संपणार आणि त्याचं राज्य उध्वस्त होणार. म्हणूनच अनेक मराठा सरदार सुद्धा अफझलखानाला जाऊन मिळाले होते.
मात्र शिवाजी महाराजांनी अत्यंत शांतपणे, उत्तेजित न होता, धीर धरत, घाबरल्याचं सोंग करत अफझलखानाला प्रतापगडाच्या पायथ्याशी, अर्थात जावळीच्या खोर्यात आणलं. तिथे खानाचा हा तीस – पस्तीस हजाराचा सेनासागर तळ ठोकून बसलेला असताना प्रतापगडाच्या आसपास स्वराज्याचं सैन्य होतं, अवघं तीन हजार..!
दिनांक १० नोव्हेंबर, १६५९च्या दुपारी महाराजांनी अफझलखानाचा कोथळा बाहेर काढून त्याला मारून टाकला. ही येथपर्यंतची कहाणी आपण ऐकतो. पण खरी गंमत पुढेच आहे.
खानाला मारून महाराज वर प्रतापगडावर आले ते त्यांचे रक्ताळलेले कपडे बदलायला. त्याच रात्री महाराजांनी दक्षिणेकडे कूच केली. खानाच्या सैन्याचा निःपात करून सरसेनापती नेताजी पालकर धावले पूर्वेला, सरळ विजापूरवर. आणि दोरोजी ह्या सरदाराला शिवाजींनी पाठवलं, कोंकणच्या मोहिमेवर. तीन दिशांनी त्रिशूळ झेपावला शत्रूवर.
शिवाजीचा तर पार फन्ना उडाला असेल अशी सर्वांची कल्पना असताना, मराठे अचानक छापा घालत होते. एक एक किल्ला, एक एक ठाणे घेत ते पुढे जात राहिले. खानाला मारल्याच्या बरोबर १८व्या दिवशी, अर्थात २८ नोव्हेंबर, १६५९ला महाराजांनी बलाढ्य असा पन्हाळगड जिंकून घेतला होता. अन् नेताजी पालकर विजापूरच्या दारात, त्यांना धमकावून आणि आदिलशाहीची प्रचंड लूट घेऊन स्वराज्यात परतला होता.
खानाला मारल्याच्या अवघ्या अठरा दिवसात, शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्य दुपटीहून मोठे केले होते, अन समृद्धही..!
एखाद्या संकटाला संधी मानून गरुडझेप घेण्याचं, याहून चांगलं उदाहरण इतिहासात नाही.
_ _ _ _ _ _ _ _
अशीच एक मोठी संधी भारतासमोर चालून आलेली आहे, चिनी व्हायरसच्या, म्हणजेच कोरोना व्हायरसच्या संकटामुळे! अनेकांना हे संकट वाटत असेलही. पण ही आहे एक संधी. प्रचंड मोठी संधी. नियतीनं आपल्यासमोर आणून ठेवलेली..!
कोरोंनानंतरचं जग हे पाहिल्यासारखं नक्कीच नसणार. ते खूप बदललेलं असेल. आमूलाग्र. सामाजिक, कौटुंबिक, राजकीय, आर्थिक अश्या अनेक गोष्टी बदलणार आहेत. अनेक राष्ट्रांच्या अर्थव्यवस्था कोसळणार आहेत. अनेक राष्ट्रे त्यांच्या एकूण धोरणांचाच फेरविचार करणार आहेत.
ह्या कोरोनाच्या आधी चीन हा जागतिक महासत्तेला टक्कर देण्याच्या पावित्र्यात होता. नव्या काळाला अनुसरून आपली वसाहत निर्माण करण्याच्या मागे होता. आफ्रिकन देशात केलेली गुंतवणूक; पाकिस्तान, बांगलादेश, श्रीलंका, मालद्वीपसारख्या लहान लहान देशांत उभे केलेले स्वतःचे भले मोठे इन्फ्रास्ट्रक्चर, तिथले प्रकल्प… या सर्वांतून चीनला जगावर सत्ता गाजवायची होती, हे निश्चित.
अजूनही चीनचा तोच प्रयत्न असेल. नव्हे, आहे. चीनचे ह्या सर्व प्रकरणांत फारसे नुकसान झालेले नाही. अत्यंत अमानुष पद्धतीने त्यांनी कोरोना व्हायरसचा सामना केला आणि जगात हाहाकार माजला असताना आपला देश पूर्वपदावर आणला. चीनचे हे धोरण चालूच राहणार आहे. नुकतेच चीनच्या पीपल्स बँक, ह्या मध्यवर्ती बँकेने भारताच्या एचडीएफसी लिमिटेडचे १.७५ कोटी शेअर्स विकत घेतले, जे शेअर होल्डिंगच्या १.०१ टक्के आहेत. चीन असं करतोय. तो करत राहणार. चीनचा अंदाज आहे की ह्या महामारीचा फार मोठा फटका त्याला बसणार नाही.
पण चीनला फटका बसणार आहे, तो वेगळ्याच अर्थाने. सार्या जगाचं जनमत सध्या चीनच्या विरोधात आहे.
जपान सरकारने नुकतीच घोषणा केली आहे की जपानच्या सर्व कंपन्या, ज्या चीनमध्ये उत्पादन करत होत्या, त्या तेथील उत्पादन बंद करून जपानला आणतील किंवा इतरत्र जातील. थोडक्यात काय, तर चीन नको. आणि हे सर्व करून घ्यायला जपान सरकारने, जपानी कंपन्यांसाठी २.२ बिलियन यूएस डॉलर्स एवढी रक्कम बाजूला काढलीय. म्हणजे, वाटल्यास पैसे घ्या, पण चीनमधून बाहेर पडा.
संकटाला संधीत बदलण्याचं हे जपानचं चांगलं उदाहरण. मुळात जपान आणि चीन ह्या दोन देशांमध्ये अक्षरशः पिढीजात वैर आहे. त्यामुळे जपानला, आपल्या देशातील कंपन्यांनी चीनला जायला नको होतं. मात्र चीनमध्ये उत्पादन करणे स्वस्त असल्याने, आंतरराष्ट्रीय बाजारात स्पर्धा करण्यासाठी जपानी कंपन्या चीनमध्ये गेल्या. जपानी सरकारला ते पटलं नसलं तरी चालवून घ्यावं लागलं.
पण आता नाही. जपान सरकारने कोरोनाची संधी साधली अन् आपल्या सर्व कंपन्यांना चीनमधून बाहेर पडण्याचे आदेश दिले. सोबतीला मदतही दिली. जपान १६५ बिलियन यूएस डॉलर्सचा एक्सपोर्ट चीनला करतो आणि चीनहून १३७ बिलियन यूएस डॉलर्सच्या मालाची आयात करतो. अर्थात जपानसाठी हा सरप्लस व्यापार आहे.
जपान आता चीनसोबत अगदी पूर्ण नाही, तरी बराच मोठा व्यापार करणार नाही. जपानमध्ये उद्योग लावणं प्रचंड महाग आहे. समजा जपानने साठ-सत्तर टक्के उद्योग जरी त्यांच्या देशात परत आणले, तरी उरलेल्यांचं काय..? हे उद्योग व्हिएतनाम, कंबोडिया, बांगला देश, श्रीलंका… ह्या देशांत जाऊ शकतात. पण त्यांची क्षमता तर फार कमी आहे, लहान आहे. त्यामुळे भारत ही नैसर्गिक निवड होऊ शकेल. अर्थात जपानी उद्योगांना भारतात खेचून आणण्याची कितीतरी मोठी संधी चालून आलीय. त्यातून जपानचे प्रधानमंत्री शिंजो आबे आणि आपले मोदीजी हे चांगले मित्र आहेत. जपान भारताच्या मागे भक्कमपणे उभा असतो. हे सर्व कोरोना व्हायरस प्रकरण होण्याआधीच! जपानने फूड सेक्टरमध्येही भारतात गुंतवणूक करायला सुरुवात केलीय. पुण्याजवळ ‘यीस्ट’ उत्पादनाचा भला मोठा प्लांट उभा राहतोय. आजपर्यंत ऑटोमोबाइल्स, इलेक्ट्रॉनिक्स, स्टेशनरीसारख्या मोजक्या क्षेत्रांत भारतात गुंतवणूक करणारा जपान, भारताला आपला सर्वंकष मॅन्युफॅक्चरिंग पार्टनर म्हणून बघतोय…!
_ _ _ _ _ _ _ _
गेल्या एक ते दीड वर्षांपासून अमेरिका आणि चीन यांच्यामध्ये ‘ट्रेड वॉर’ चालू होतं. ते थोडं निवळतंय असं वाटतंय, तर हे कोरोना प्रकरण समोर आलं.
आता तर चित्र पार बदललंय. अमेरिकेत चीनविरोधात प्रचंड जनाक्रोश निर्माण झालाय. आज न्यूयॉर्कसकट अवघ्या अमेरिकेची जी फार मोठी वाताहत झालेली आहे, त्याला चिनी व्हायरसमुळे चीन जबाबदार आहे, अशी तेथील लोकांची ठाम श्रद्धा आहे. त्यामुळे येऊ घातलेल्या निवडणुकीत जिंकण्यासाठी ट्रम्प किंवा डेमोक्रेट पक्षाच्या उमेदवाराला चीनविरोधी भूमिका घ्यावीच लागणार आहे. Kearney ह्या नावाची अमेरिकेची एक प्रतिष्ठित अशी Global Manufacturing Consulting Firm आहे. त्यांनी परवा 7th Annual Reshoring Index जाहीर केला आहे. ह्या रिपोर्टमध्ये त्यांनी स्पष्टपणे म्हटले आहे की अमेरिकन व्यापार्यांनी आपल्या अनेक वस्तू उत्पादनासाठी चीनला दिल्या होत्या. कारण ‘कॉस्ट’ हा मुद्दा होता. आता मात्र ह्या उद्योगांना चिंता सतावतेय ती ‘रिस्क’ची.
सध्या अमेरिका, चीनहून ५३९.५ बिलियन यूएस डॉलर्सचा माल आयात करतो. यात बरीच कपात होईल हे निश्चित. अमेरिका अगदी ५० टक्के माल, चीनहून आयात करणार नाही असं जरी गृहीत धरलं तरी हा आकडा येतोय, २७० बिलियन यूएस डॉलर्सच्या आसपासचा. आणि त्यामुळेच, Kearney चा रिपोर्ट हे ठामपणे म्हणतोय की अमेरिकन उद्योग आता इतरत्र पर्याय शोधतील. त्यांना पर्याय आहेत – मेक्सिको, भारत, ब्राझील, कंबोडिया वगैरे…
जी गत अमेरिकेची, तीच युरोपियन देशांची. गेल्या पंधरा-वीस वर्षांत अनेक युरोपियन देश, त्यांचं मूलाधार असलेलं मॅन्युफॅक्चरिंगच विसरून गेलेले होते. चीन स्वस्तात बनवून द्यायचा, म्हणून युरोपातले अनेक उद्योगधंदे बंद पडले होते. इटलीची संपूर्ण फॅशन इंडस्ट्री, चीनमधून वस्तू बनवून आणायची आणि आपला लोगो मारून विकायची. पण आता हे होणार नाही. साठ टक्क्यांपेक्षा जास्त उद्योग, चीनला पर्याय शोधतील.
ह्या चिनी व्हायरसने सारंच उलटं पालटं करून टाकलंय, अन् ह्या अदलाबदलीत आपल्यासमोर उभी केलीय एक लखलखीत सोनेरी संधी.
_ _ _ _ _ _ _ _
भारतासारख्या प्रचंड लोकसंख्या असलेल्या देशानं उत्पादन-आधारित अर्थव्यवस्था राबवायला हवी होती. मात्र आपल्या देशाने नव्वदच्या दशकामध्ये आर्थिक सुधारणांचा जो धडाका लावला, तो सेवाक्षेत्राच्या दिशेने. त्यामुळे काही उद्योग मोठे झाल्यासारखे वाटले. मात्र मॅन्युफॅक्चरिंग तितकं पुढे गेलं नाही. सेवाक्षेत्रात आपली आर्थिक अवलंबिता जास्त आहे, आणि त्याच बरोबर आहे ती मोठी जोखीम (risk).
आता मात्र ही खूप चांगली संधी समोर आहे. आपण उत्पादन-आधारित व्यवस्थेकडे जाऊ शकतो. सुमारे सात-आठशे वर्षांपूर्वी जागतिक व्यापारात तीस टक्क्यांपेक्षा जास्त वाटा असलेले आपण, आपल्या उत्पादन कौशल्यामुळेच जगभर आपला माल पाठवत होतो.
उत्पादनाची प्रचंड आणि वेगवेगळी क्षेत्रे आपल्याला खुणावत आहेत. चिनी कंपन्यांनी कशी कल्पनाशक्ति लढवून, लहान लहानश्या वस्तूंपासून, खेळण्यांपासून ते हाय टेक मशीनरीपर्यंत वस्तू बनवून जगभर विकल्या..? सन १९९५मध्ये फारश्या चर्चेत नसलेला चीन, अचानक २००५मध्ये आर्थिक महासत्ता बनण्याच्या दिशेने वाटचाल करू शकतो, तर आपणही ते साध्य करू शकतो.
अगदी घरोघरी चांगल्या चांगल्या हस्तकलेच्या वस्तू बनविण्यापासून ते विशिष्ट मशीनरी तयार करण्यापर्यंत प्रत्येकाला प्रचंड मोठी संधी अवचितपणे समोर आलेली आहे. या संधीचं सोनं करण्यासाठी प्रचंड मेहनत करणं आवश्यक आहे. अफझलखानाचा खात्मा करून शिवाजी महाराज विश्रांतीसाठी प्रतापगडावरच थांबले असते, तरी त्यांचं कौतुकच झालं असतं, त्यांनी हे जीवघेणं संकट संपवलं म्हणून. पण ते ‘महाराज’ होते. पुढील १८ दिवस ते आणि त्यांच्या सहकार्यांनी, चालून आलेल्या संधीचा फायदा घेत, अहोरात्र लढाया मारून, स्वराज्याचा विस्तार दुप्पट केला.
खूप परिश्रम, पॅकेजिंगवर भर, नवीन तंत्रज्ञानाचा उपयोग, इंटरनेटच्या माध्यमातून जागतिक बाजारपेठेत शिरकाव, अत्यंत व्यावसायिक दृष्टीकोण या सर्वांमुळे जागतिक बाजारपेठेत आपलं स्थान बनविणं आपल्याला शक्य आहे.
हे सगळं सोपं नाही. कठीण आहे. खूप खूप कठीण आहे. पण अशक्य नाही.
सत्तरच्या दशकाच्या सुरूवातीला सायकलवरून आणि बैलगाडीवरून सॅटेलाइटचे सुटे भाग नेतानाचे फोटो आपण बघितले असतील. तेंव्हा जग त्यांच्यावर हसत होतं. उपहास करत होतं. ‘हे काय सॅटेलाइट बनवणार..!’ असं म्हणत होतं.
आणि आज..?
आपण अवकाशक्षेत्रातली चौथी महाशक्ती आहोत. एका लॉंचरमधून शंभरच्या वर सॅटेलाइट अवकाशात सोडण्याचा विक्रम आपल्या नावावर आहे. मंगळावर पाहिल्याच प्रयत्नात यान पाठवणारे आपण जगातला एकमात्र देश आहोत…!
आपल्या परमाणू कार्यक्रमाला जेंव्हा अडचण आली, तेंव्हा ती सोडवायला आपण कोण्या प्रगत देशाकडे नाही गेलो. आपणच सोडवली आपली ती समस्या. आज आपण न्यूक्लिअर पॉवरमध्ये जगात तिसर्या स्थानावर आहोत.
कारण आपण करू शकतो.
सारं जग अत्यंत आदरानं आपल्याकडे बघतंय. भारतीय जीवनमूल्यांची ओळख जगाला होतेय. ‘हे संकट भारतात फार खोलवर आणि आतवर पोहोचू शकलं नाही, कारण आपली जीवनशैली’ असं जग आता म्हणू लागलंय. अमेरिकेसारखा देश, आपल्या देशात बनवलेल्या औषधांसाठी घायकुतीला येतोय. औषधांवरचे प्रतिबंध दूर करतोय.
नियती संकेत देतेय. खूप चांगल्या गोष्टी घडून येताहेत. केंद्रात संवेदनशील आणि खंबीर सरकार आहे. प्रधानमंत्री मोदींसारखा कणखर नेता आपल्याला मिळालाय. एकशेतीस कोटींचा हा राष्ट्रपुरुष जागा झालाय. समाज सक्रिय आहे. ह्या कोरोनाच्या संकटाने एक लखलखती सोनेरी संधी आपल्यापुढे आणून ठेवलीय. ही संधी आपण गमावली तर आपल्यासारखे कर्मदरिद्री आपणच असू. मग पुढची पिढी आपल्याला माफ करणार नाही, हे निश्चित…!