आंबेडकरांचे विचार

(Abstract
Historic Perspective of Relevance and Impact of Dr. Babasaheb Ambedkar’s thought in The Contemporary Age)

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारधारेची ऐतिहासिकता आणि समकालीन संदर्भात त्याचे उपयोजन व मूल्यांकन करण्याच्या दृष्टीने काही पैलूंवर मी माझे काही विचार आपल्यासमोर ठेवतो आहे.

१. बाबासाहेबांच्या प्रतिमा व प्रतीकाचे सापेक्ष विश्लेषण करणे गरजेचे आहे. भारतीय जातिसमाजात त्यांची प्रतिमा – (१) एका अस्पृश्य जातीचे म्हणजे महार जातीचे, (२) अस्पृष्य जातिसमूहाचे आणि (३) भारताला राष्ट्र-राज्य म्हणून घडविण्यासाठी योगदान करणारे राष्ट्रीय नेते या तीन प्रकारांत पाहिली जाते. १९९०-२०००च्या कालखंडात जागतिकीकरणानंतर ही प्रतिमा विश्वमहामानवाची झाली आहे. ते आता एका राष्ट्राचे महामानव म्हणून राहिले नाहीत. वैश्विक झाले आहेत. त्यामुळेच त्यांना एका अस्पृश्य जातीच्या वा अस्पृश्य जातिसमूहाच्या मुक्तिसंघर्षाचे नायक म्हणून पाहणे चुकीचे आहे. जातिव्यवस्था नसलेल्या युरो-अमेरिकन-ऑस्ट्रेलियन जनसमाजात आंबेडकरांच्या विचारधारेबद्दल सामाजिक चळवळी व अकादमिक स्तरावर आकर्षण व आस्था सतत वाढत असताना दिसते आहे. जगभरातील शोषितशासित वंचित जनसमूहाच्या मुक्तिसंघर्षाचे नायक म्हणून त्यांची प्रतिमा साकारत आहे. बुद्ध, जीजस, मार्क्स या महामानवांच्या पंक्तीत त्यांना आता स्थान दिले जाऊ लागले आहे. ब्रिटिश वसाहतवाद्यांनी व भारताने हेतुतः गांधींच्या प्रतिमेचे वैश्विकीकरण केले. वास्तविक आंबेडकरांपुढे गांधींच्या मर्यादा उघड झाल्या आहेत. या तुलनेत आंबेडकर आता जागतिक स्तरावर समजावून घेतले जात आहेत. आणखी एक मुद्दा असा आहे की, आंबेडकरांना प्रखर राष्ट्रवादी नेता म्हणूनही प्रोजेक्ट केले जात असते. पण त्यातील गफलत लक्षात घेतली पाहिजे. बाबासाहेब हे नॅशनलिस्ट नसून समाजवादी आहेत. भारतीय राष्ट्रवाद व राष्ट्र-राज्य घडणीच्या प्रक्रियेत त्यांचा praxis अर्थात संव्यवहार वर्ग, जाती, लैंगिक विषमतेच्या निराकरणार्थ मानवी मुक्तीच्या बाजूने होता. हे प्रकर्षाने लक्षात घेतले नाही तर ही अशी चर्चा राष्ट्रवादाच्या गारुडाच्या सापळयात सापडण्याची शक्यताच जास्त!

२. बाबासाहेबांच्या एकूण चरित्रात्मक व वैचारिक साहित्याचे कालानुक्रमिक टप्पे करून सापेक्षतः चर्चा केली तरी समग्रदृष्टीची आवश्यकता आहे. १९८०पर्यंत धनंजय कीर व चांगदेव खैरमोडे ह्यांनी लिहिलेल्या चरित्राच्या आधारावर मराठी विश्वात जे आकलन साकारले त्याची व्यापक समीक्षा केली गेली नाही. कीरांनी आंबेडकरांना सावरकरीय विचारांच्या प्रभावात मार्क्सविरोधी व गांधीशत्रु म्हणून रेखाटले आहे. या चरित्राद्वारे मराठी दलित व दलितेतर अभ्यासक व कार्यकर्त्यांचे आकलन १९८०पर्यंत घडवले होते. असाही विचार केला जात आहे की, १९७० ते ७५ पर्यंत दलित पँथरच्या नेत्या-कार्यकर्त्यांपुढे बाबासाहेबांचे किती व कोणते साहित्य उपलब्ध होते, याची उकल करावी लागेल. त्यावेळी उद्भवलेल्या बुद्ध, मार्क्सविषयक वादचर्चेत त्यांना कोणते संदर्भ उपलब्ध होते. पँथरच्या चळवळीचा प्रभाव सातत्याने समकालीन आंबेडकरवादी चळवळीवर राहिला आहे. १९७९ नंतरच डॉ.बाबासाहेब आंबेडकर रायटिंग ॲण्ड स्पीचेसचे खंड क्रमाक्रमाने यथावकाश प्रकाशित झाले आहेत. बाबासाहेबांच्या काही विचारकृतींबद्दल संदिग्धता व वादंग सतत होत राहिले आहेत. ‘बुद्ध ॲण्ड हिज धम्म’ची प्रस्तावना किंवा ‘बुद्ध ॲण्ड मार्क्स’ की ‘बुद्ध ऑर मार्क्स’ या टायटलची वादचर्चा याची उदाहरणे आहेत. बाबासाहेबांच्यां कोणकोणत्या वैचारिककृतींचा कोणत्या अभ्यासक विचारवंतांनी व कार्यकर्त्यांनी चळवळीत कसाकसा अर्थ लावला आहे? याचा शोध घेतला गेला पाहिजे. लिखित साहित्याखेरीज जनसमूहात जलसा, गाणी, नाट्य, स्त्रीगीते, ओव्या, घराघरात भिंतीवर लावल्या गेलेल्या फोटोप्रतिमा, चित्र, पेंटिग्ज, शिल्पपुतळे जनकलासंस्कृतीप्रकार इत्यादीत आंबेडकर, आंबेडकरप्रतिमा व आंबेडकरविचार कसेकसे रुजले याचा आढावा घेतला पाहिजे. मौखिक परंपरेने किंवा वामनदादा कर्डकांच्या गीताच्या अनुषंगाने असा अभ्यास करता येईल. युरो-अमेरिकन जगतात ज्याप्रमाणे अनेक थोर व्यक्तींची विश्लेषक चरित्रे लिहिली गेली आहेत तसे बाबासाहेबांविषयीचे मराठी व इंग्रजी व इतर भाषांत चरित्रलेखन करणे महत्त्वाचे आहे.

३. आंबेडकरांच्या विचारधारेविषयी चर्चा करताना नक्की आंबेडकरी विश्लेषणपद्धती-मेथॉडॉलाजी काय आहे? तिचे स्वरूप व व्याप्ती काय आहे? हे ठोसपणे अधोरेखित करावयास पाहिजे. यासंबंधी अनेक मतमतांतरे आहेत. १९७०नंतर आंबेडकरवादाची चर्चा अधिक सघनपणे सुरू झाली.

बौद्धतत्त्वज्ञान (महायानपरंपरा वर्ज्य करून), राज्यसमाजवाद, राजकीय लोकशाही यांमधून आंबेडकरवाद साकारला आहे. आंबेडकरवादात नासिक व पूना अशी दोन स्कूल्स आहेत. आंबेडकरांच्या समग्र मांडणीत ‘थॉट्स’, ‘इझम’, ‘फिलॉसॉफी’, ‘ॲण्टी-फिलॉसॉफी’ अशी परस्परविरोधी द्वंद्वेही दिसून येतात. तरीही त्यातील संगती लक्षात घ्यावी लागतेच. काही अभ्यासक आंबेडकरांना तत्त्वज्ञ नसल्याचे सांगतात. ते केवळ विचारवंत आहेत. त्यामुळे आंबेडकरवाद ही विचारसरणी आहे, ते तत्त्वज्ञान नाही असे म्हटले जात आहे. तत्त्वज्ञान, सौंदर्यशास्त्र, राजकीय अर्थशास्त्र आदि अंगांनी आंबेडकरवादाची मांडणी होणे आवश्यक आहे. जर आंबेडकरवादाची सापेक्ष व्याप्ती जातिपितृसत्ताक व्यवस्थेविरोधी नवरचनेची असेल तर जातिसमाजाबाहेरील भारतीयेतर राष्ट्र व समाजसमूहांना ही विचारधारा नेमके काय देऊ शकते? तिची वैश्विकता नेमकी काय आहे? वर्गेतर समाजातील शोषणमुक्ती व समताक्रांतीसाठी बाबासाहेबांची विचारसंपदा जागतिकस्तरावर प्रेरक ठरत आहे. व्यक्तीस्वातंत्र्य आणि समूहस्वातंत्र्य सयुक्तिक असणार्‍या सामाजिक लोकशाहीचे त्यांनी महत्त्वपूर्ण सिद्धांतन केले आहे. वर्गीय व जातीय विषमतेच्या मुक्तिलढ्याबरोबरच लिंग, धर्म, वंश, जमात अशा बहुविध विषमतेच्या व शोषणाच्या निःपातासाठी आंबेडकरांचे सिद्धांत आणि प्रत्यक्ष चळवळ प्रेरणादायी बनले आहेत. जातिपितृसत्तेच्या अनुषंगाने त्यांनी ‘बहुस्तरीय शोषणात्मक असमानते’चे अनन्यसाधारण सिद्धांकन केले आहे. आणि तिच्या निराकरणार्थ मार्क्सवादी तत्त्वप्रणालीशी विधायक मतभेद स्पष्ट करीत बौद्धतत्त्वज्ञानाचे आधुनिकीकरण केले आहे. हे त्यांचे जागतिकस्तरावर दखल घेण्याजोगे योगदान आहे. अनेक परिस्थितीत, अनेक संदर्भात वेगवेगळ्या हितसंबंधांच्या गरजेतून तत्त्वज्ञान/ विचारप्रणाली/ विचार/ प्रतीके यांच्यात समन्वय वा संयोग साधण्याचा प्रयत्न सुरू असतो. आंबेडकर+सावरकर+हेडगेवार अशी समरसता मोहीम सुरू आहे. ही आंबेडकरवाद नष्ट करण्याची व्यूहरचना आहे. आंबेडकर+गांधी असाही समन्वय साधण्याचा प्रयास चालू आहे. गांधीवाद मूलतः जातवर्गसमन्वयवादी आहे. त्यातील धारणा काही प्रमाणात सुधारणावादी धारणा आहेत. सवर्ण व्यक्ती व समूहाचे दलित आदिवासींप्रती मानसिक परिवर्तन घडविण्यासाठी गांधीमार्गाचा कल्पक विनियोग करता येऊ शकतो. पण समन्वय नेमका का व कशासाठी आणि कोणत्या तत्त्वांमध्ये केला जात आहे याची चिकित्सा करताना चिकित्सेचे निकष काय असतील हेही तपासले पाहिजे. आंबेडकर+मार्क्स असाही समन्वय वा संयोग केला जात आहे. आंबेडकरवादाच्या समाजक्रांतिकारी तत्त्वसरणीशी मार्क्सवादाची सांगड घालताना चिकित्सेचे हेच निकष कटाक्षाने लक्षात ठेवले पाहिजेत. भारतातील मार्क्सवाद्यांनी जातिमुक्तीच्या प्रश्नांकडे कायम दुर्लक्ष केले आहे. त्यांनी आंबेडकरांना ‘बूर्झ्वा विचारवंत व समाजसुधारक’ म्हणून चुकीचे मूल्यांकन केले आहे. कम्युनिस्ट व मार्क्सवाद्यांची आंबेडकरांच्या योगदानाला व जातिप्रश्नाला बेदखल करण्याची भूमिका प्रत्यक्षाप्रत्यक्षपणे जातीयगंडाची म्हणजेच ब्राह्मण्यग्रस्त असल्याने भारतातील कम्युनिस्ट व मार्क्सवादी चळवळीच्या सैद्धांतिक आणि व्यावहारिक अंगाने चिकित्सा करीत असताना मार्क्सवादी विचारसंपदेचा वैश्विक वारसा आंबेडकरवादात समाविष्ट करणे मुळीच गैर नाही. मार्क्सवाद हे वर्गसमाजक्रांतीचे तत्त्वज्ञान आहे. तसे जातिसमाजक्रांतीचे तत्त्वज्ञान आंबेडकरवाद आहे. दोन समाजक्रांतिकारी तत्त्वज्ञानांमध्ये समाजपरिवर्तनाच्या निकडीपोटी सांगड घातली जाऊ शकते. पण वैरभावी तत्त्वांची सांगड घालणे धोक्याचे असते. तद्वत ब्राह्मण्यवादी व भांडवली विचार-व्यवहाराशी आंबेडकरवादाची सांगड घालता येणार नाही. अशी मांडणी करणे व त्यानुसार व्यवहार करणे म्हणजे शत्रूने आंबेडकरवाद गिळंकृत करण्यासाठी रचलेली व्यूहयोजना!

मार्क्सवादाप्रमाणेच स्त्रीवादी धारेशी आंबेडकरवाद जोडणे अनिवार्य आहे. जातिव्यवस्था, स्त्री-पुरुषसंबंध, पितृसत्ता यांचा जैवसंबंध बाबासाहेबांनी उकलून दाखविला आहे. गोर्‍या स्त्रीवादाच्या मर्यादा काळ्या स्त्रीवाद्यांनी स्पष्ट केल्या तश्या भारतातील तथाकथित स्त्रीवाद हा शहरी, पांढरपेशा, ब्राह्मणी वळणाचा राहिल्याने फुले-आंबेडकरांच्या मांडणीच्या आधारे दलित स्त्रीवादाने व अब्राह्मणी स्त्रीवादाने त्यांच्याही मर्यादा दाखवून समग्रता वाढवली आहे. आंबेडकरी चळवळ भारतातील स्त्रीमुक्तीची चळवळ का होऊ शकली नाही, या प्रश्नाच्या दिशेनेही आपल्याला अधिक चिंतन करायला पाहिजे.

संपर्क : क.भा.पा.कॉलेज, इस्लामपूर (सांगली)

अभिप्राय 3

  • आंबेडकरांचे विचार, धोरण, ते धोरण अमलात आणणे यांसाठीचे डावपेच आणि स्ट्रॅटेजी याविषयी लेखकाचे काय म्हणणे आहे हे काहीच कळले नाही. सर्व लेखांमध्ये अमुक एक गोष्ट केली पाहिजे तमुक गोष्ट केली पाहिजे एवढेच वाचायला मिळाले. स्वतः लेखकाने काय केले आहे ते समजलेच नाही.
    आंबेडकरांना कोणकोणत्या बाबतीत अपयश आले व त्याबाबत आपण आज काय करू शकतो? ते कसे दुरुस्त करू शकतो, याचा विचार व्हायला हवा. स्वतः बौद्ध धर्म स्वीकारून दलितांनाही तो स्वीकारायला लावण्यामध्ये आंबेडकरांचा कोणता उद्देश होता व तो उद्देश आज सफल झालेला दिसतो का? बौद्ध धर्मामध्ये ईश्वराला स्थान नाही. आज जी जनता बौद्धधर्म पाळते, त्यांच्यामध्ये ईश्वराविषयाची श्रद्धा कितपत आहे, याची तपासणी व्हायला हवी.

    • वरील लेख हे एका सेमिनारमध्ये केलेल्या बीजभाषणाचे सारांश टिपण आहे. सुरुवातीला तशी नोंद आहे, ती अपुरी आहे.abstract….. असे पुरेसे नाही, हे मान्य.
      हा समग्र लेख वगैरे नाही. सेमिनारमध्ये समोर असलेल्या विद्यार्थी, प्राध्यापक, संशोधक यांच्या मर्यादित चौकटीत आंबेडकरवादाचा कोणत्या मुद्दयावर विकास करण्याच्या दृष्टीने काय लिहिले,शोधले,मांडले पाहिजे याअर्थाने चर्चात्मक “बोलले”आहे.
      आंबेडकरी विचारांची विकासाची दिशा लोकशाहीचिंतन, मार्क्सवाद, स्रीमुक्तीवाद यासंदर्भात व्हावी, असे सुचवले आहेच.
      आंबेडकरवादाचे योगदान व मर्यादा यावर मी मराठीतील वैचारिक वर्तुळातील मान्यताप्राप्त नियतकालिकातून ब-यापैकी लिहिले आहे. जातीअंतासंबंधी व बौध्दवादाविषयी अकादमिक व चळवळ अशी संयुक्तिक चिकित्सा करणारी पुस्तकेही आहेत. जिञासूंनी ती पाहावीत.
      उपरोक्त लेखसदृश्य टिपणाला खूप मर्यादा आहेत, हे मान्यच!

  • हा लेख खूप भक्तिभावाने लिहिण्यात आलेला आहे. या लेखामध्ये लेखक आपले विचार मांडताना आंबेडकर हे विश्व मानव आहे अशा प्रकारची वर्णन केलेले आहे .त्याचे कारण देताना लेखक म्हणतात त्यांचा अभ्यास जागतिक पातळीवर केला जातो. जगभरातल्या विविध विद्यापीठात त्यांचा अभ्यास केला जातो म्हणून ते विश्वमानव आहे. ही मांडणी अत्यंत चुकीचं आहे. कोणत्याही तत्त्वज्ञान विश्वव्यापी व्हायचे असेल तर त्याला वैश्विक दृष्टिकोन असावा लागतो. ही पूर्वअट आहे. आता आंबेडकरांच्या विचार आणि व्यवहार जागतिक पातळीवर कोणत्याही अंतर्विरोध समजून घेण्याची तर जाऊ दे त्याच्या संदर्भ सुद्धा नव्हता. खूप चुकीच्या पद्धतीचे मांडणी करण्यात आली आहे. दुसरे महत्त्वाचे आंबेडकर हे समाजवादी आहे हे मत कोणते निकष खाली येतो. हे स्पष्टपणे सांगितले नाही. समाजवादाची व्याख्या आणि आंबेडकर. आंबेडकर कोणत्या अर्थाने समाजवादी नाही. आंबेडकर हे एक एक जाति विरोधी समाजसुधारक होते. सामाजिक लोकशाहीवादी( social democratic) होते असे म्हणता येईल.

तुमचा अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published.