जंक फूड हा शब्दच फसवा व विरोधाभासी आहे. कुठलेही अन्न हे जंक कसे काय असू शकते? जंक या शब्दाचा अर्थच मुळी भंगार, टाकाऊ असा होतो व कुठलीही खाण्याची वस्तू ही अशी असणे शक्यच नाही. तरीही जंक फूड हा शब्द इतका प्रचलित झालेला आहे की त्यामधील विरोधाभास सहज लक्षातदेखील येत नाही.
खरेतर मनुष्य जन्माला आल्यापासून ते अखेरचा श्वास घेईपर्यंत तो खातच असतो व तेही दिवसातून किमान ३ वेळा. याचा अर्थ मनुष्याचे सरासरी आयुर्मान ८० वर्षे धरले तर त्याच्या संपूर्ण आयुष्यात साधारणपणे ८८००० वेळा खाण्याची क्रिया घडते. एखादी गोष्ट इतक्या वेळा करताना, त्यात झालेली जराही चूक पुनःपुन्हा ८८००० वेळा रिपीट होण्याची शक्यता असते. या छोट्याश्या चुकीचे साचत गेलेले परिणाम प्रचंड मोठे, दीर्घकालीन व अतिशय गंभीर स्वरूपाचे असू शकतात हे समजणे गरजेचे आहे. खरेतर मनुष्य आपल्या आयुष्यात जी गोष्ट इतक्या वेळा करतो की त्यामध्ये तो स्वतःच तज्ज्ञ व्हायला पाहिजे. दुर्दैवाने तशी परिस्थिती नसल्याचे दिसून येते.
भारतामधीलच आकडेवारी पाहिली तर असे दिसेल की आज शिकलेल्या प्रौढ शहरी लोकांमध्ये वजन गरजेपेक्षा जास्त असणाऱ्यांचे प्रमाण जवळपास ६०% आहे. भारतीय तरुणांमध्ये वा शाळकरी मुलांमध्येपण लठ्ठपणाचे प्रमाण वाढतच चालले आहे. एवढेच नव्हे, तर दोन वर्षे वयाच्या आतील मुलांची वजनेदेखील जास्त असण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढतेच आहे.
गरजेपेक्षा जास्त वजन असण्याचे परिणाम म्हणून आज भारतीय लोकांमधील डायबिटीस, उच्च रक्तदाब वा हार्टअटॅकसारख्या आजारांचे प्रमाण वाढते आहे. आज शिकलेल्या प्रौढ शहरी लोकांमध्ये १०० पैकी १४ लोकांना डायबिटीस होतो, २५ लोकांना उच्च रक्तदाब असतो तर १२ लोकांना हार्टअटॅक येतो. शिवाय हे आजार होण्याचे वय मागील दोन दशकांमध्ये वयाची २५-३० वर्षे इतके खाली आलेले आहे. हे होण्याची महत्त्वाची कारणे म्हणजे बदलत/ बिघडत चाललेल्या खाण्यापिण्याच्या सवयी, घटणारे शरीरश्रम, लहान वयापासूनच आलेला मानसिक तणाव, आयुष्याचा एकूणच वाढलेला वेग व जगण्यातील अर्थहीनता ही होत.
ह्यांपैकी आपल्या खाण्याच्या चुकीच्या व बिघडलेल्या सवयी हा एक खूप महत्त्वाचा व सहज दुरुस्त करता येण्यासारखा घटक आहे. आहारशास्त्राचे मूलभूत नियम आपण समजून घेतले व ते मुलांनाही समजून सांगू शकलो तर या समस्येवर मात करणे शक्य होऊ शकते. त्यासाठी त्यांना समजेल व पटेल-रुचेल अशा भाषेत विज्ञान मांडता आले पाहिजे. केवळ जंक फूड वाईट व ते खायला नको असे म्हणून चालणार नाही. तर जंक फूड म्हणजे नेमके काय, त्याचे आरोग्यावर काय परिणाम होतात व त्याला इतर कोणते आरोग्यदायी पर्याय उपलब्ध आहेत हे सांगणे त्याच्या सवयी बदलण्यासाठी उपयोगी ठरेल.
जंक फूडमध्ये खूप जास्त प्रमाणात कॅलरीज असतात व शरीरासाठी आवश्यक असणारे घटक त्यामानाने अतिशय कमी प्रमाणात असतात, प्रसंगी नसतातसुद्धा! मुख्यत्वे कर्बोदकांचे व फॅट्सचे प्रमाण बरेच जास्त असते. शिवाय अन्नावर खूप जास्त प्रक्रिया केलेली असल्यामुळे त्यामध्ये आरोग्यासाठी नुकसानकारक असे अनेक विषारी घटकसुद्धा तयार होतात. शिवाय पदार्थ ताजे दिसावेत व जास्त काळ टिकावेत म्हणून त्यांवर केल्या जाणाऱ्या अनेकविध प्रक्रिया व वापरावी लागणारी प्रिझर्वेटिव्हस यामुळे ते आरोग्यासाठी आणखीनच हानिकारक ठरतात.
समोसा-कचोरी, वडापावसारखे अधिक तळले गेलेले पदार्थ, मैद्यापासून तयार होणारे बेकरी उत्पादित बहुतेक सर्व पदार्थ, चाट व तत्सम पदार्थ, पिझ्झा-बर्गर, नूडल्स, मंचुरियन, सॉफ्ट ड्रिंक्स, आईस्क्रिम, हंबरबर्ग इ.चा समावेश जंक फूडमध्ये करता येईल. अर्थात हे पदार्थ क्वचित आणि प्रमाणात खाल्ले तर काही बिघडेल असे नाही. पण संपूर्ण आठवड्यात जर हेच पदार्थ अधिक वेळा खाण्यात आले तर मात्र अपायकारक ठरतील.
लहान मुले व तरुणाईचा ओढा जंक फूडकडे जास्त आहे. जंक फूडचे आकर्षण जास्त असण्याची कारणे विविध आहेत. आकर्षक पॅकेजिंग, जाहिराती, ते उपलब्ध असतात तेथील वातावरण हे सर्व तरुणाईला आकर्षित करणारे असते. हल्ली तर महानगरांमधील खूपसे तरुण पालक अगदी कौतुकाने आपल्या छोट्या बाळांना घेऊन असल्या ठिकाणी आठवड्यातील काही दिवस तरी खादाडी करत फिरत असतात. अगदी कळत नसतानाच्या वयात हे सर्व पाहिलेली ती मुले थोडी मोठी झाल्यावर जंक फूडच्या आहारी नाही जाणार तर आणखी काय होणार? जंक फूडचे प्रस्थ वाढण्याचे आणखी एक महत्त्वाचे कारण म्हणजे आज जीवनाची एकूणच वाढलेली गती हे होय. पती-पत्नी दोघेही नोकरी-व्यवसायाच्या निमित्ताने दिवसभर बाहेर असतात. त्यामुळे मुलांना व बरेचदा स्वतःसाठीसुद्धा घरच्या घरी काही खाण्यासाठी बनविणे कठीण जाते. अश्यावेळी तयार अन्नपदार्थ बाजारातून आणून खाणे वा बाहेर खायला जाणे हा सहज सोपा पर्याय निवडला जातो. हल्ली अनेक घरांमधून आठवड्यातून बरेचदा असे होत असल्याने हळूहळू जंक फूडची सवय व्हायला लागते वा पुढे ते आपल्या आहाराचा नियमित हिस्सा बनते. कालांतरानें जंक फूडचे अपायकारक परिणाम लक्षात आले व दिसायला लागले तरी ही सवय व्यसनासारखी मुरलेली असते आणि सोडविता सुटत नाही.
आणखी एक ट्रेंड हल्ली महानगरांमध्ये बळावताना दिसतोय. जिम, एरोबिक सेंटर एका मजल्यावर तर पिझ्झा-बर्गर व तत्सम फास्ट फूडची दुकाने त्याच इमारतीमधील दुसऱ्या एका मजल्यावर. हे परस्परविरोधी सहनिवास एकत्र आल्याने एकातून दुसऱ्यात प्रवेश सहजच होतो. मॉर्निंग वॉक वा अन्य कुठलातरी व्यायाम करून झाल्यावर श्रमपरिहारासाठी काहीतरी पोटात टाकण्याची व्यवस्था बहुतेक सर्वच लहानमोठ्या शहरात उपलब्ध असते व अशी सवय बऱ्याच व्यायामप्रेमी मंडळींमध्येपण जडलेली दिसते.
जंक फूडची सवय मुळात लागूच नये वा लागलेली असेल तर ती सुटावी यासाठी खालील काही आहारशास्त्रविषयक मूलभूत तथ्ये सर्वानी समजून घेतली तर सोपे होते.
१. हल्ली आपण फार घाईघाईत खाणे उरकवितो. कारण एकूणच कमीत कमी वेळात जास्तीत जास्त काम हे आजच्या जमान्यातील कार्यक्षमतेचे निदर्शक मानले जाते. जीवनाच्या अन्य क्षेत्रात हे खरे असले तरी खाण्याच्या संदर्भात मात्र ते चुकीचे आहे. एक घास ३२ वेळा चावून खाल्ला पाहिजे असा जो पुरातन काळापासून आपण ऐकत असलेला नियम आहे तो वैज्ञानिकदृष्ट्या अगदी खरा आहे. असे चावून खाल्ल्याने एकतर तोंडातील लाळ अन्नामध्ये जास्त प्रमाणात मिसळेल. लाळेमध्ये टायलिन नावाचे एंझाईम असते, जे कर्बोदकांच्या पचनासाठी जरुरी असते. त्याशिवाय चांगल्या प्रकारे चावून-चावून खाल्ले तर, आपल्या मेंदूमध्ये असणारे तृप्तीचे केंद्र लवकर समाधान पावते व कमी खाऊनही पोट भरल्याचे समाधान होते. खाणे आपोआपच कमी होते. म्हणून नियम करा की निदान २० पेक्षा जास्त वेळा चावल्याशिवाय गिळायचे नाही. त्यासाठी खाण्याचा कालावधी वाढवा. म्हणजेच तुम्ही १० मिनिटात जर खाणे संपवून उठत असाल तर त्याऐवजी २० मिनिटे बसा. म्हणजेच हळूहळू खा. जास्त वेळा चावून खा.
२. चव समजणाऱ्या ग्रंथी जिभेच्या फक्त समोरच्या भागावर असतात. त्यामुळे चवीचा आनंद घेण्यासाठी अन्नपदार्थ जिभेच्या या भागावर जास्तीत जास्त वेळ राहणे गरजेचे असते. जिभेच्या पाठीमागे व शरीरातील पुढच्या संपूर्ण अन्नमार्गामध्ये कोठेही चव समजू शकेल अशा ग्रंथी नसतात. त्यामुळे अन्नाचा घास एकदा जिभेच्या मागे गेला की चव समजणे बंद होणार; मग बेसन खाल्ले काय किंवा श्रीखंड खाल्ले काय! त्यामुळे चवीचा खरा आनंद घेण्यासाठी, शांतपणे पुरेपूर आस्वाद घेत रंग, गंध, चव या सर्वांसह अन्नाचा आस्वाद घेणे महत्त्वाचे असते. म्हणून अतिशय संथपणे व ध्यानपूर्वक खाण्याकडे पूर्ण लक्ष केंद्रित करुन खात राहिल्यास खाण्यावर व वजनावर नियंत्रण राखणे सोपे जाते.
३. आपले पोट-जठर हे volume sensitive (आकारमान) आहे. त्यामुळे ते भरले जाणे महत्त्वाचे. ते भरल्याशिवाय आपल्याला स्वस्थता मिळत नाही. मात्र ते कशाने भरायचे याच्याशी त्याला देणेघेणे नसते. चवीशी तर नक्कीच नाही. कारण जठरामध्ये कोणत्याही प्रकारच्या चव समजणाऱ्या ग्रंथी नसतात. मग पोट असल्या गोष्टींनी भरायचे की ज्यामध्ये कॅलरीज् कमी असतील, पण आकारमान जास्त असेल. उदा. सूप, ताक, सलाद, अंकुरित कडधान्य, भाज्या व फळे इ. हे सर्व आपल्या खाण्यामध्ये असतील तर साहजिकच इतर अन्नपदार्थ कमीच खाल्ले जातील व मग थोडेफार जंक फूड खाल्ले गेले तरी फारसे बिघडणार नाही. म्हणजेच जंक फूड कधी खायचेच झाले तर थोडे आधी एखादे फळ, ताक, कुठलातरी नैसर्गिक ज्यूस असे घेतले तर आपोआपच नंतर खाल्ल्या जाणाऱ्या जंक फूडचे प्रमाण कमीच राहील. शिवाय मग खाताना किती खावू असा विचार करण्याची फारशी गरज राहणार नाही.
४. भूक लागल्यावर हाताशी काहीतरी खाण्याचे पदार्थ तयार असणे महत्त्वाचे असते. घरी लाडू-चिवडा यांसारखे पदार्थ तयार करून डब्यामध्ये भरून ठेवलेले असणे किंवा फ्रिजमध्ये कुठल्यातरी खाण्याच्या वस्तू जसे फळे, सूप्स व अन्य काही तयार असल्यास भूक लागल्यावर यातील काहीतरी पोटात टाकता येते. हे तयार नसले तर मग साहजिकच जंक फूडकडे मोर्चा वळतो.
५. व्यायाम-योगासारख्या आरोग्यदायी सवयी जर स्वतःला लावून घेतल्या तर जंक फूडकडे वळण्याचे प्रमाण कमी व्हायला मदत होते. साधे पायी चालणे, सायकलिंग, पोहणे, एरोबिक्ससारखा एखादा व्यायामप्रकार नियमितपणे केल्यास किंवा कुठलातरी मैदानी खेळाचा छंद जोपासल्यास दिनचर्या थोडी अधिक नियमित व आरोग्यपूर्ण व्हायला मदत होते. बरोबरीने व्यायामाचे इतर फायदे मिळतातच.
६. तणावाचे व्यवस्थापन : जंक फूडकडे वळण्याचे आणखी एक कारण म्हणजे वेगवेगळ्या कारणांमुळे उद्भवणारा तणाव. हल्ली जगण्याचा वेग प्रचंड वाढला असल्याने व एकूणच जगणे अधिक गुंतागुंतीचे झाले असल्याने तणाव निर्माण होण्याचे प्रसंग तर वाढले आहेतच, शिवाय तणावाची पातळीसुद्धा. हल्ली तणावग्रस्त होण्याचे प्रसंग अगदी लहान वयापासूनच येताना दिसतात. बरेचदा तणावाची योग्य प्रकारे हाताळणी नाही करता आली तर मग जंक फूडचा उपयोग तणाव कमी करण्याचे साधन म्हणून केला जातो. अशा कारणांनी जडलेली जंक फूडची सवय सुटणे हे एक मोठे आव्हान असते. त्यासाठी सुयोग्य पद्धतीद्वारे तणावाचे व्यवस्थापन करायला शिकणे महत्त्वाचे असेल. योग, ध्यान, व्यायाम, कौन्सेलिंग, सायकोथेरेपी इ. उपाय यासाठी कमी पडू शकतात. एखादा छंद जोपासणे हा पण एक प्रभावी उपाय असू शकतो.
७. आयुष्याचे ध्येय निश्चित करणे : बरेचदा एखाद्या चुकीच्या सवयीपासून मुक्तता मिळविण्यासाठी केवळ त्या सवयीपुरता विचार करून भागत नाही. तर त्या सवयीचे एकूणच आयुष्यावर होणारे विविधांगी बरे-वाईट परिणाम काय असतील असा विचार करणे उपयुक्त ठरते. ते संपूर्ण चित्र डोळ्यांपुढे आणता आले तर त्या सवयींपासून मुक्तता मिळणे सोपे जाते.
यासंदर्भात मला माझेच स्वतःचे वैयक्तिक उदाहरण द्यायला आवडेल. जीवनशैली व आरोग्य हा माझा अभ्यासाचा विषय राहिलेला आहे. या विषयासंदर्भात बऱ्यापैकी वाचन, अनुभव असल्याने मला हे कळलेले होते की मानवी शरीररचना ही १२० वर्षे निरामय जगण्यासाठी बनविलेली आहे. मी स्वतःसाठी ध्येय ठरविलेले आहे की मला वयाच्या शंभरीपर्यंत काम करायचे आहे. ७ मे २०६१ ला माझा १००वा वाढदिवस असेल व तो मी साजरा करत असल्याचे चित्र कायम माझ्या डोळ्यापुढे असते. मी गेली ३६ वर्षे सामाजिक क्षेत्रात कार्यरत आहे व ते काम माझे अत्यंत आवडते व आनंद देणारे आहे. माझ्या आवडत्या व अर्थपूर्ण कामांसाठी आयुष्याची उर्वरित वर्षे आरोग्यदायी ठेवणे अत्यावश्यक आहे ही बाब मला स्पष्ट झाल्यापासून अधूनमधून आरोग्यदायी सवयींपासून वा जीवनशैलीपासून परावृत्त होण्याचे प्रसंगपण कमी करीत चाललो आहे. त्यामुळे आयुष्याचे दूरगामी उद्दिष्ट स्पष्ट करून घेणे आरोग्यपूर्ण सवयी टिकविण्यासाठी महत्त्वाचे ठरू शकते.
हल्ली जंक फूडशी संबंधित एक महत्त्वाची समस्या म्हणजे वाढलेले वजन कसे कमी करावे ही होय. हा प्रश्न अनेकांना सतावतो व खूप प्रयत्न करूनसुद्धा यश न मिळाल्याने हताश होऊन प्रयत्न करणेच सोडून दिले जाते, असे अनेकांच्या बाबतीत घडताना दिसते. यासाठीच्या काही टिप्स …..
- वाढलेले वजन कमी करण्यासाठी उपाशी राहण्याची गरज नसते किंवा उपाशी राहून कमी केलेले वजन फार काळ कमी राखता येत नाही. काही दिवसांनी ते पुन्हा वाढायला लागते व खूप वेळा तर आधीपेक्षाही जास्त वाढते. खाणे कमी न करता सुद्धा सहजतेने वजन कमी करता येते व एकदा कमी झाले की पुन्हा वाढणार नाही याची काळजीपण घेता येते. त्यासाठी काही गोष्टी फक्त कमी प्रमाणात खाण्याची गरज असते. मुख्यत्वे ज्या खाद्यपदार्थांमध्ये तेलतुपादि स्निग्धपदार्थ व साखर जास्त प्रमाणात आहेत असे पदार्थ प्रमाणात खाण्याची गरज असते. इतर पदार्थ न मोजता खाल्ले तरी फारसे बिघडत नाही. रेषेदार पदार्थ (fibers) मात्र भरपूर प्रमाणात खायला हवेत.
- एक किलो वजन कमी करण्यासाठी ८००० कॅलरीज् खर्च कराव्या लागतात. त्यासाठी पायी चालणे (जवळपास २०० किमी.), सायकल चालविणे, पोहणे यासारखा व्यायाम साधारणत: ३०-४० तास करणे गरजेचे असते.
- वजन कमी करताना फार घाई करू नये. दर आठवड्याला साधारणत: अर्धा ते एक किलो (महिन्याला २ ते ४ किलो) वजन कमी होईल अशाप्रकारे योजना बनवावी. यापेक्षा जास्त वेगाने वजन कमी करणे, आरोग्यास अपायकारक असू शकेल. ससा व कासवाच्या शर्यतीत, कासवच जिंकतो हे लक्षात ठेवावे.
- वजन कमी करण्यासाठी खाण्यापिण्याच्या व शरीरश्रमाच्या ज्या सवयी स्वत:ला लावून घेण्याची गरज असते त्या सर्वांसाठीच हितकर असल्याने घरातील सर्वांनीच तसा प्रयत्न करणे फायद्याचे राहील.
- वजन कमी करण्यासाठी खात्रीचा उपाय म्हणजे आपला बीएमआर (चयापचयाचा वेग) वाढविणे. हा मुख्यत्वे आपल्या शरीरातील स्नायूंच्या प्रमाणात असतो. त्यामुळे व्यायाम करून स्नायू बळकट करणे हे वजन कमी करण्यासाठी महत्त्वाचे असते. केवळ खाण्यातील बदलांनी फार काळ वजन कमी राहू शकत नाही.
शरीरात जमा झालेल्या १ किलो जास्तीच्या चरबीसाठी शरीराला जवळपास २०० कि.मी. लांबीच्या रक्तवाहिन्यांचे जाळे नव्याने तयार करावे लागते. या वाढीव रक्तवाहिन्यांच्या जाळ्यामध्ये रक्त पोहचविण्यासाठी हृदयावरील ताणही तेवढाच वाढतो. म्हणून वजन वाढू न देणे हे हृदयाचे व पर्यायाने आपले आयुष्य वाढविण्यासाठी आवश्यक व महत्त्वाचे असते.
बैठी जीवनशैली असणाऱ्यांसाठी स्निग्धपदार्थांची गरज दिवसाला २० मिली प्रति व्यक्ती, म्हणजेच महिन्याला ६०० मिली असते. आपल्याकडे खाल्ल्या जाणारे स्निग्धपदार्थांचे प्रमाण हे गरजेपेक्षा कितीतरी जास्त (३ ते ५ पट) असते. जंक फूडसोबतच मसालेदार तर्रीवाल्या भाज्या व तळलेले पदार्थ; शिवाय बरेचदा वरून घेतले जाणारे तेल, तूप, तेल लावून केलेल्या पोळ्या, तूप लावलेल्या पोळ्या, सायीचे दही इत्यादी सवयी यासाठी कारणीभूत ठरतात. जास्तीच्या स्निग्धपदार्थांचे शेवटी शरीरात चरबीमध्ये रूपांतर होते व वजन वाढते.
हे झाले दिसणाऱ्या स्वरूपातील स्निग्धपदार्थांबाबत. याशिवाय अप्रत्यक्ष स्वरूपातील स्निग्धपदार्थ जसे शेंगदाणे, तीळ, नारळ वा काजू-बदाम, खव्याची मिठाई इ. रोजच्या आहारातील स्निग्ध पदार्थांचा हिशोब करताना हेदेखील मोजावे लागतात. हे सर्व पदार्थ शेवटी चरबी वाढवितात.
यावर खात्रीलायकरीत्या नियंत्रण मिळवण्याचा उत्तम उपाय म्हणजे दरमहा घरात येणारे तेल-तूप हे जास्तीत जास्त माणशी ६०० मिली असा हिशोब करूनच आणावे व कटाक्षाने संपूर्ण महिना तेवढ्यातच भागवावे.
साखर मुख्यत्वे चहा, कॉफी, बेकरीचे पदार्थ व मिठाई याद्वारे शरीरात जाते. एका कपाला २ चमचे साखर असेल तर व दिवसाकाठी ४-५ कप चहा होत असेल तर जवळपास ५०-६० ग्राम साखर शरीरात जाते. हे प्रमाण कमी करण्यासाठी एक तर चहातील साखरेचे प्रमाण कमी करावे लागेल किंवा चहा घेण्याचे प्रमाण कमी करावे लागेल. तसेच मिठाई व गोड पदार्थ आवडतात म्हणून पोटभर न खाता प्रमाणात खावे लागतील.
कॅलरीजचा हिशोब तर सगळीकडेच मांडला जातो. पण त्यावरून फारसे काही लक्षात येत नाही. अनुभवाने आम्ही त्यामध्ये एक कॉलम जास्तीचा जोडला. तो म्हणजे किती कॅलरीज खर्च करायला किती किमी पायी चालावे लागेल. त्यामुळे एक कप चहा = ६० कॅलरीज = १२०० मीटर चालणे, २ बिस्किटे = ५० कॅलरीज = १ किमी चालणे, १ समोसा = २०० कॅलरीज = ४ किमी चालणे. कॅलरीजचे जे गणित अनेक शिकल्यासवरलेल्यांना समजत नाही ते याप्रकारे मांडल्याने अगदी नर्सरीच्या मुलालापण समजते असा अनुभव आहे. पुढे अशाच रीतीने तयार केलेला एक कॅलरी चार्ट दिलेला आहे.
रोजच्या खाण्याच्या पदार्थामध्ये असणाऱ्या कॅलरीज व
त्या खर्च करण्यासाठी करावा लागणारा व्यायाम
पदार्थ | प्रमाण | कॅलरीज | या कॅलरीज जाळण्यासाठी, पायी चालावे लागणारे अंतर (किमी) |
चहा बिनसाखरेचा | १ कप | २० | ०.४ |
चहा साखरेचा | १ कप | ६० | १.२ |
कॉफी | १ कप | ३० | ०.६ |
दूध बिनसाईचे | १ कप | ७० | १.४ |
दूध साईचे | १ कप | ११० | २.२ |
ब्रेड | १ स्लाइस | ७० | १.४ |
ग्लुकोज बिस्कीट | २ | ५० | १.० |
अंडी | १ | ८५ | १.७ |
पोळी-भाकरी | १ | २०० | ४.० |
फुलका | १ | ८५ | १.७ |
भात | १ वाटी |
| २.२ |
पुरी | १ |
| १.६ |
दही साधे | १ वाटी | ७० | १.४ |
दही साईचे | १ वाटी | १०० | २.० |
आईस्क्रीम | १ कप | १८० | ३.६ |
बटाटेवडा | १ | १२० | २.४ |
दहीवडा | १ | ८० | १.६ |
समोसा | १ | २०० | ४.० |
इडली | २ | १३० | २.६ |
पोहे | १ बशी | १२० | २.४ |
साबुदाणा खिचडी | १ बशी | 180 | ३.६ |
कांदाभजी | ६ | २०० | ४.० |
डॉ. अविनाश सावजी एमबीबीएस
एमबीबीएस ही पदवी घेतल्यानंतर, उच्च शिक्षणासाठी प्रवेश मिळत असतानासुध्दा जाणीवपूर्वक पुढे न शिकता, आपल्या ज्ञानाचा उपयोग पैसे कमविण्यासाठी न करता, सर्वसामान्य लोकांना व्हावा म्हणून मागील ३३ वर्षांपासून कार्यरत डॉक्टर. औषधांचा फारसा वापर न करता निरामय व स्वस्थ जीवन कसे जगावे, आजारी पडल्यावर औषध घेण्यापेक्षा आजारी पडूच नये यासाठी काय करावे, हार्ट अटॅक, बी.पी., डायबिटीससारखे आजार कसे टाळावेत, याबाबत समाजाला जागरुक करण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रात व्याख्याने व शिबिरांद्वारे जनजागृती. ‘शतायुषी व्हा’ व ‘यशस्वी व्हा’ या पुस्तकांचे लेखक, उत्कृष्ट वक्ता, सुप्रसिध्द गांधीवादी विचारवंत.)
लेखक प्रयास संस्थेचे संचालक आहेत.
संपर्क : विमलनगर, फरशी स्टॉप, अमरावती ४४४६०५.. मोबाईल ९४२०७२२१०७
अतिशय उपयोगी लेख । सद्या माझे वय 58 आहे व आपल्या 100 वा वाढदिवस माझ्या शुभेच्छा ने साजरा व्हावा अशी इच्छा आहे ।
खूपच छान
Very nice and useful. Congratulations sir. Best wishes.
It’s a very useful information for our human bodies how to maintain health conscious in day to day life. But we are neglected on those rutine diet. We need to avide junk food & only simpal vegetarian diet for reduses the verious deceses.
सर,नमस्कार।
अत्यंत उपयुक्त माहिती व सहज ,सोप्या पद्धतिने दिली आहे.
मी याबाबत आपला अनुयायी आहे.जीवनशैली बाबत आपण माझे आदर्श आहत.
आपले ध्येय आणि कार्य महान आहे.
आपणास माजा सलाम….!!!!!
सर,नमस्कार
आजच्या धकाधक्कीच्या जीवनात आपण लिहीलेले वास्तव वाचून नक्कीच काही गोष्टी उशिरा का होईना पण ठरवल्या.मागच्याच महिन्यात भेट झाली होती आपली,आपल्या घरी.नांदेडच्या शिबिरास मुलाला पाठवायचे ठरवले होते पण त्याच्या परीक्षा चालू
त्याही रद्द झाल्या.हा संदेश मी अनेकापर्यंत नक्की पोहोचवीन. होत्या.नंतर
दिनचर्या आणि आहार याचे समीकरण सोप्या पद्धतीने मांडलेला उत्कृष्ट लेख…?
माहितीपूर्ण लेख खूप आवडला धन्यवाद सर
अतिशय सोप्या भाषेत ,सूटसूटीत अगदी किचकट विषय वाचन्यास मिळाला, धन्यवाद।
सर,खूप खूप छान मार्गदर्शन केले.मी परभणीत आपले व्याख्यान,मला १०० वर्षे जगायचे हे ऐकले होते.
यावेळी,आपण माझ्याकडे घरी येवुन गेलात,आणि पुस्तक पण मला भेट दिले होते.
पुनश्च मार्गदर्शन केल्याबद्दल अभिनंदन,आणि पुढील कार्यास शुभेच्छा.
सध्या चालू असलेल्या करोणा बद्दल मार्गदर्शन करावे ही विनंती.
सर खूप खूप खूप छान. सध्या करोना व अँसिडीटि खूप चालू आहे. त्यावर व थायरॉईडवर लेख पाठवा. करोना जीव नसतांना मल्टीपल कसा होतो? त्याला मेमरी असते का? कारण बहुसंख्य व्हावे ही जीवाला इच्छा असते, ती प्रोटिनला कशी होईल? सापाचे विषपण प्रोटीन असते म्हणतात. मग ते मल्टीपल का होत नाही? मार्गदर्शन करा.
The most Scientific & Spiritual approach towards a Healthy Life !
Thank you very much Avinash Sir !
भारतातील पारंपरिक मिठाई आणि पक्वान्ने यांच्यामध्येदेखील तूप, तेल, साखर हे पदार्थ भरपूर असतात. त्यामुळे हे पदार्थदेखील मधुमेह, ब्लडप्रेशर, हृदयविकार यांच्या दृष्टीने घातकच असतात. मग त्यांनाही जंकफूड का म्हणू नये?
खरंय. तसे समजायला काहीच हरकत नाही. साखरेचे कोणतेही खाद्यपदार्थ निषिद्धच मानायला पाहिजे.