२०२० च्या सुधारकच्या अंकासाठी घेतलेला ‘लैंगिकता’ हा विषय ठरला तेव्हा ‘आजचा सुधारक’मध्ये याविषयाबद्दल आधी काय लिहून आले आहे ते पाहण्याची उत्सुकता वाटली. हा विषय बऱ्याच वर्षांपूर्वी ‘सुधारक’मध्ये गाजला होता हे माहीत होते. त्यासाठी ‘सुधारक’चे ह्या विषयावर आधारलेले जुने अंक वाचले. हे भूतकाळात जाणे फारच रंजक ठरले. साधारणतः १९९३ ते २००१ दरम्यानच्या ‘सुधारक’चे बरेच अंक स्त्रीमुक्तीविषयीच्या उलटसुलट चर्चांनी गाजलेले आहेत. (‘सुधारक’च्या जुने अंक आता आंतरजालावर उपलब्ध आहेत.) ‘साधना’च्या मे १९९४च्या अंकामध्ये शांता बुद्धिसागर यांनी ‘चारचौघी’ नाटकाची चर्चा करत असता ‘खरी स्त्रीमुक्ती कोठे आहे?’ हा लेख लिहिला. त्यावर दिवाकर मोहनींनी ‘खरी स्त्रीमुक्ती कशात आहे?’ हा प्रतिक्रियात्मक लेख ऑगस्ट १९९४च्या ‘आजचा सुधारक’मध्ये लिहिला. त्या लेखावर प्रतिक्रिया म्हणून इतर मान्यवरांचे लेख, त्यावर पुनःप्रतिक्रिया म्हणून इतरांचे लेख किंवा प्रत्युत्तर, खंडन वा शंकानिरसन म्हणून पुन्हा दिवाकर मोहनींचे लेख अशी ती लेखमाला अनेक भागांमध्ये येत राहिली. विषयच तसा ज्वलंत होता….! स्त्रीमुक्ती ..! स्त्रियांचे लैंगिक स्वातंत्र्य .. !
‘खरी स्त्रीमुक्ती कशात आहे?’ हा प्रश्न विचारत दिवाकर मोहनी स्वतःच त्याचे उत्तर देतात. त्यांच्या मते स्त्रीला लैंगिक स्वातंत्र्य मिळाल्याशिवाय (ते तिला हवे किंवा नको असेल तरी.. ) ती खरी मुक्त होऊच शकत नाही…… प्राचीन संस्कृती लाभलेल्या भारतीय उपखंडात, मागील शतकाच्या नव्वदीच्या दशकात, म्हणजे पंचवीस अठ्ठावीस वर्षांपूर्वी हे धाडसाचे विधान केल्यानंतर काही समाजधुरीणांचे पित्त खवळले नसते तरच नवल… त्यानंतर बऱ्याच शाब्दिक चकमकी झडल्या. चर्चा झाली. शास्त्रार्थ घडले. जणू काही स्त्रियांना लैगिक स्वातंत्र्य कोणाकडूनतरी मिळाले आहे आणि ते त्यांनी त्वरित वापरायला सुरुवात करण्याचा अनर्थ घडणार आहे असे गृहीत धरून बऱ्याच शक्यताही वर्तविण्यात आल्या. कुटुंबाची जबाबदारी पेलणाऱ्या स्त्रीचे पाऊल वाकडे पडले तर होणाऱ्या भीषण परिणामांच्या धोक्याची घंटा वाजविण्यात आली….संस्कृती भ्रष्ट होण्याची भीती व्यक्त करण्यात आली. म्हणजे एकूण काय तर संस्कृती वाचवायची असो वा कुटुंब, सगळी मदार स्त्रीच्या शुद्ध चारित्र्यावर..! चारित्र्य शुद्ध केव्हा तर योनिशुचिता पाळल्यावर ….! म्हणजे शेवटी सगळे स्त्रीच्या लैंगिकतेभोवतीच फिरत राहणार. शुचितेचा मक्ता फक्त स्त्रियांचा. पुरुषांचे बहुपत्नीकत्व मात्र सर्वसम्मत. (यात गंमत अशी की येथील योनिशुचितेचा दुराग्रह धरणाऱ्यांना मोहनींनी मांडलेली बहुपत्नीकत्वाची कल्पना मात्र फारच पसंत पडली होती.)
मोहनींनी त्या सगळ्यांना प्रत्युत्तर देताना मात्र त्यांच्या पद्धतीप्रमाणे शांतपणे, (त्यांच्या शब्दात ‘अहिंसक व विधायक’ मार्गाने) पण ठामपणे स्वतःच्या विचारांची पाठराखण केली आहे. सर्व प्रश्नांचे, शंकासंशयांचे व गैरसमजुतींचे त्यांनी प्रसंगी योग्य दाखले देऊन निवारण केले आहे. स्त्रीच्या दुःखाची कारणे आणि त्या दुःखांचे निराकरण करण्याचे उपाय ते एवढ्या तर्कशुद्ध पद्धतीने मांडतात की आपण हतबुद्ध होतो. संस्कारांचे लोढणे आपल्याला तर्क वापरण्यास आडकाठी करते आहे हे उमजून कधी निराशा देखील वाटते. दिवाकर मोहनी मात्र आज वयाच्या एकोणनव्वदाव्या वर्षीदेखील तेवढेच आशावादी आणि सहानुभूत आहेत. त्यांचे म्हणणे नीट समजून घेण्यासाठी आपल्याला मात्र जुने सगळे लेख वाचणे अनिवार्य आहे. पंचवीस वर्षांपूर्वी ‘आजचा सुधारक’चा वाचकवर्ग मर्यादित असल्याने तेव्हा समाजदेखील मर्यादितपणेच ढवळला गेला असावा. बऱ्याच पुरुषवाचकांनी हे लेख कुटुंबात रमलेल्या आपल्या स्त्रियांपर्यंत पोहोचू दिले नसावेत याची मला खात्री आहे. त्या बिचाऱ्या अज्ञानातच सुखी असोत. हात दाखवून अवलक्षण कोण करून घेईल ?
मुळात लैंगिकतेविषयी बोलणेही आत्ताआत्तापर्यंत थिल्लरपणाचे मानले जात होते. त्यात स्त्रियांनी त्यांच्या स्वतःच्या लैंगिकतेविषयी बोलणे म्हणजे निर्लज्जपणाची कमालच. अश्या परिस्थितीत मोहनींनी विवाहित, अविवाहित, विधवा, कुमारी, परित्यक्ता, कुरूप, अपंग, मतिमंद अशा सर्व स्त्रीपुरुषांच्या लैंगिकतेवर संवेदनशीलपणे केलेली निर्भीड भाष्ये म्हणजे एखादे मानसशास्त्रीय विवेचनच वाटते. माणसाच्या विचारांचा फार मोठा भाग व्यापून असलेली कामप्रेरणा अभिव्यक्त होताना हीन दर्जाची का ठरते याचे कारण मोहनींना कळत नाही. ‘सुसंस्कृत स्त्री कोणती, तर जिच्यामधली कामप्रेरणा नष्ट झाली आहे ती व ज्या स्त्रिया आपल्या सहजप्रेरणांना प्रतिसाद देतात त्या अनीतिमती’ हे आपल्या समाजाचे स्त्रीच्या चारित्र्याविषयीचे आकलन त्यांना अत्यंत अस्वस्थ करते. स्त्रीमुक्तीच्या त्यांच्या संकल्पनेचे विस्तृत वर्णन करताना ते म्हणतात की, ‘स्त्रीमुक्ती म्हणजे स्त्रियांचे स्वातंत्र्य! पूर्ण स्वातंत्र्य! कोणत्याही पुरुषाच्या मागणीला नाही म्हणण्याचे स्वातंत्र्य! कोणत्याही पुरुषाच्या मागणीला हो म्हणावे लागले तर ते स्वातंत्र्य नव्हे. ती गुलामीच झाली. कोणालाही नाही म्हणताना कसलेही दडपण त्यांच्या मनावर नको. त्यांच्या नाही म्हणण्याचा आम्ही सर्वानी आदर केला पाहिजे.’ (No means no हे जे विधान ‘पिंक’ या चित्रपटातील अमिताभने साकारलेल्या वयोवृद्ध व्यक्तिरेखेने लोकप्रिय करून ठेवले आहे, त्याचे मूळ मला ह्या तेवीस वर्षे जुन्या लेखमालेमध्ये आढळते आहे.) याउपर मोहनी म्हणतात की, ‘यच्चयावत सर्व स्त्रीपुरुषांचा सामाजिक दर्जा समान ठेवल्याशिवाय खऱ्या अर्थाने कोणीच मुक्त होणार नाहीत; कारण स्वातंत्र्याची समानता आणि मुक्ती ही एकच गोष्ट आहे.’
जुने लेख वाचताना असे वाटत होते की आता एवढ्या वर्षांनंतर परिस्थिती बदलली असेल. तशी परिस्थिती बदलली आहेच आणि आपल्या जाणिवांचाही विस्तार झाला आहे. कारण आपली देशी अभिव्यक्तिमाध्यमेदेखील आता ह्या विषयावर सेन्सॉरमर्यादित भाष्य करू लागली आहेत. सेन्सॉरचा बडगा नसलेल्या शुद्ध भारतीय वेबसिरीज मधून काही चांगल्या दिग्दर्शकांनी स्त्रियांचे नाजूक विषय प्रेक्षकांपर्यंत योग्य पद्धतीने पोहोचतील अशा तरलपणे मांडले आहेत. त्यांनी रेखाटलेल्या स्त्रिया आपल्या लैंगिकतेविषयी विचार करताना दिसतात. स्वतःचा आनंद, सुख किंवा समाधान म्हणूया हवे तर, ह्याबाबतीत त्यांना काही संभ्रम नाहीत. त्यासाठी लागणारी प्रयोगशीलता त्यांच्याकडे आहे. त्या प्रयोगांच्या परिणामांची जबाबदारी घेण्याची कुवतदेखील त्यांच्याकडे आहे.
दिवाकर मोहनींच्या मनातील तेव्हाची स्त्रीमुक्ती आता पंचवीस तीस वर्षांनंतर थोडी तरी साध्य झाली असावी असे वाटत असताना आजच एका सर्वेक्षणाचा अहवाल वाचनात आला. काही मोठ्या महानगरांमधील तरुण युवकांमध्ये केलेल्या सर्वेक्षणानुसार चाळीस टक्क्यांच्यावर मुलांना, कुटुंब टिकविण्याची जबाबदारी केवळ स्त्रियांची वाटते व त्यासाठी त्यांना कौटुंबिक हिंसाचार सहन करावा लागत असेल तर स्त्रियांनी तो सहन केला पाहिजे असे वाटते. सामाजिक काम करणाऱ्या मानसोपचारतज्ज्ञांच्या मते त्यांच्याकडे उपचारासाठी येणाऱ्या सत्तर टक्क्यांहून अधिक महिला, तरुण मुली ह्या विविध प्रकारच्या हिंसेच्या बळी असतात. त्यातून आलेले नैराश्य त्यांची कार्यक्षमता हिरावून घेते व आत्मविश्वास खच्ची करते. दुर्दैवाने असा कौटुंबिक हिंसाचार करण्यात घरातील स्त्रियांचा (सासू, नणंदा इ.) देखील समावेश आहे. तसेच, केवळ स्त्री आहे म्हणून समाजातील अनोळखी लोकांकडून होणाऱ्या छळवणुकीला वा हिंसेला तर कोणताही तर्क लागू होत नाही. यांत छेडखानीपासून ते एवढ्यातच घडलेल्या बलात्कार करून जाळून टाकण्यासारख्या अक्षम्य गुन्ह्यापर्यंत काहीही असू शकते.
आजही मध्यपूर्वेतील काही देश, आफ्रिका आणि आशिया खंडातील भारतासह काही देशांतील मुस्लिम समाजामधील स्त्रियांना खतना (female genital mutilation or FGM) ह्या अमानवी प्रकाराला सामोरे जावे लागते. सुमारे ५ ते १० वर्षे वयाच्या मुलींच्या योनिभागातील clitoris हा लहानसा भाग चाकूने किंवा ब्लेडने कापून टाकला जातो. कारण काय तर तो अवयव तिला मोठेपणी लैंगिक आनंदाचा (orgasm)अनुभव देणार असतो. स्त्रियांनी असा आनंद मिळविणे हे त्यांच्या धर्माच्या दृष्टीने पाप आहे. अप्रशिक्षित स्त्रियांकडून हे ‘हराम की बोटी’ कापण्याचे काम अत्यंत अघोरी पद्धतीने पार पाडले जाते. परिणामस्वरूप मुलींना भयंकर वेदना, प्रमाणाबाहेर रक्तस्राव आणि जंतुसंसर्ग ह्यांना सामोरे जावे लागते. याविरोधात आता कुठे थोडी समाजजागृती होऊ लागली आहे.
याचा एक अर्थ असा निघतो की समाज म्हणून याबाबतीत आपण अद्याप फार पुढे आलेलो नाही. गेल्या पाव शतकात आपण फक्त काही पावलेच चाललेलो आहोत. आपले राहणीमान वा जीवनमान आधुनिक झाले असेल पण विचारांना मात्र आधुनिकतेचा बराच मोठा पल्ला गाठायचा आहे. नवी तरुण पिढी मात्र संस्कृतीच्या बाबतीत फारशी पूर्वग्रहदूषित नाही असे वाटते. त्यांचे तसे असणे त्यांना लैंगिक समानतेबाबत निखळ विचार करण्यासाठी अनुकूल ठरेल अशी आशा आहे.
‘आजचा सुधारक’मधील ‘खरी स्त्रीमुक्ती कशात आहे?’ ह्या अनेक भाग असलेल्या दीर्घ लेखमालेचा धांडोळा घेणारा लेख दिवाकर मोहनी यांनी जून १९९७च्या अंकात ‘फिरून एकदा स्त्रीमुक्ती’ ह्या मथळ्याखाली लिहिला. तो लेख ह्या अंकात पुनःप्रकाशित करीत आहोत. दोन तपांपूर्वीची परिस्थिती आणि आजची स्थिती ह्यात काही फरक पडला का हे ह्या निमित्ताने तपासून पाहता येईल. तेव्हा क्रांतिकारी वाटणारे दिवाकर मोहनींचे स्त्रीमुक्तीविषयीचे विचार मला तरी आजही तितकेच क्रांतिकारी वाटतात. त्यांचे द्रष्टेपण असेच वेळोवेळी सिद्ध होत राहील याची मला खात्री आहे.
माधुरी कानेटकर, नागपूर