नवरा-बायको, आई-बाप, नातेवाईक व शेजारी मित्रांचे समूह ही नाती, वर्ग, धर्म व राज्य या संस्था आणि त्या सार्यांच्या जोडीला कायदा, परंपरा आणि नीतिनियमांची बंधने या सार्यांनी मिळून स्त्रीपुरुष संबंधाविषयीच्या आजच्या भूमिका घडविल्या आहेत. या सगळ्या गोष्टी एवढ्या जीवनव्यापी आणि मजबूत की त्यांच्या वजनदार सर्वंकषतेने या संबंधातली वैयक्तिक कोवळीक पार चिरडून टाकली आहे.
सगळ्या विचारसरणी, मग त्या मनूच्या असोत नाहीतर मार्क्सच्या, माणसाच्या सहजसाध्य संबंधांना एका घट्ट चौकटीत ठामपणे फिट्ट करण्याचा प्रयत्न करतात आणि त्या प्रयत्नांना अपरिहार्यपणे येणार्या अपयशासाठी विचारसरणीला दोषी न ठरवता माणसालाच दोषी ठरवून निकालात काढतात. या वैचारिक अट्टाहासाचे बळी खूप आहेत. स्त्रीपुरुषसंबंधातली सहजता आणि त्या सहजतेतून येणारी सौंदर्यासारखी विलोभनीय मूल्ये यांचा या बळींच्या यादीत समावेश होतो.
भूमिकांनी स्वभावाचा बळी घेणे ही बाब राजकारणापासून समाजकारणापर्यंत आता आपल्या चांगल्या परिचयाची झाली आहे. सगळा अभिनिवेश, सगळे तणाव आणि म्हटलीच तर या संबंधातली सगळी ढोंगबाजी या अवस्थेतून जन्माला येते आणि भूमिकांचे स्वभावावरील हे वर्चस्वच स्त्रीपुरुष संबंधातल्या आजच्या खोट्या व्यवहाराला कारणीभूत होत असते. प्रत्यक्ष जीवनाहून भूमिकांच्या बांधिलकीला महत्त्व आल्याने मुखवटे म्हणजे आयुष्य नव्हे याचे गेलेले भान एक जीवनव्यापी विसंवाद उभा करते. सगळी नाती आणि त्यांना जोडलेली नीति यांत आज हा विसंवाद उभा आहे.
एक आणखी महत्त्वाचा आणि सर्व स्तरावर जाणवणारा (पण ज्याची पुरेशी दखल विचारवंतांना घ्यावीशी वाटलेली नाही असा) दुसरा महत्त्वाचा विसंवाद, कायद्याने मान्य केलेले व्यक्तीचे स्वातंत्र्य व त्यातून तिला मिळणारे अधिकार आणि व्यवस्थेच्या बंधनांनी चालविलेला कालबाह्य नीतिमूल्यांचा बडिवार यांचेतील आहे. जगातल्या सर्व प्रगत देशातील कायदे आणि घटना स्वातंत्र्याचा अधिकार व्यक्तीला बहाल करतात. आपल्या मूलभूत अधिकारांवरचे स्वामित्व व्यक्तिगत स्वरूपाचे आहे. पण सगळ्या परंपरागत आणि काही नव्या विचारसरणीदेखील सगळा विचार समूहाच्या संदर्भात करणार्या आहेत. त्यामुळे विचारसरणी व परंपरा समूहगत तर कायदा व अधिकार व्यक्तिगत असे ह्या विसंवादाचे स्वरूप आहे.
कुमारी मातेचा बाळंतपणाची रजा मागण्याचा हक्क आपल्या न्यायालयांनी आता मान्य केला आहे. व्यवस्थेला तो मान्य व्हायला आणखी किती काळ जावा लागेल हा विचार करण्याजोगा प्रश्न आहे. स्त्री व पुरुष यांचे व्यक्तिगत स्वातंत्र्य कायद्याला मान्य असले, तरी समूहाला व परंपरेला ते अमान्य आहे हा ह्या विसंवादाचा दृश्य परिणाम आहे.
एक पुरुष आणि एक स्त्री यांना नवरा बायको ठरवून दिले किंवा त्यांनी स्वत:हून तसे ठरवून घेतले की मग त्यांना संबंध ठेवायला हरकत नाही ही समाजाची व सर्वच संबंधितांची भूमिका असते. ह्या प्रकारात संबंधांच्या स्वरूपाहून ठरावाचे महत्त्व मोठे असते आणि हा ठराव किंमत म्हणून आयुष्य मागतो ही बाब कुणी फारशी विचारणीय वा मनावर घेण्याजोगी मानत नाही. अमेरिकेत ह्या संदर्भात झालेले एक सर्वेक्षण अतिशय बोलके आहे.
‘तुमच्यासमोर एक बटन ठेवले आहे. ते दाबल्याने तुमचा आजचा विवाह कधी झालाच नव्हता अशी स्थिती निर्माण होणार आहे. तुम्ही हे बटन दाबाल काय?’ असा एकच प्रश्न या सर्वेक्षणात तिथल्या स्त्रियांना विचारण्यात आला. ६७ टक्क्यांएवढ्या स्त्रियांनी ह्या प्रश्नाला होकारार्थी उत्तर दिले. त्या देशात असलेले घटस्फोटाचे प्रमाण लक्षात घेतले तर हा आकडा नव्वद टक्क्यांच्या घरात जाणारा आहे. भारतात असले सर्वेक्षण करण्याची बुद्धी अद्याप समाजशास्त्रज्ञांना होत नाही हे आपले राष्ट्रीय सुदैवच मानावे लागेल. जर कधी असे सर्वेक्षण झाले तर ते विलक्षण क्रांतिकारी असेल याविषयी कुणीही शंका बाळगण्याचे कारण नाही.
स्त्री-पुरुषांच्या वैवाहिक आणि विवाहबाह्य अशा दोन्ही संबंधांचे स्वरूप आपापल्या भूमिका बाजूला सारून तपासण्याची व समजून घेण्याची गरज म्हणूनच आज निर्माण झाली आहे. ह्या संबंधाविषयीचे सगळे भ्रम आणि अपसमज त्यांच्या मूळ स्वरूपामुळे निर्माण न होता समाजाने त्याविषयी स्वीकारलेल्या भूमिकांमुळे निर्माण झाले आहेत. म्हणूनच ते भूमिकानिरपेक्ष पातळीवर समजून घेण्याची आणि नव्या परिस्थितीच्या संदर्भात त्याविषयीची समजूत नव्याने प्रस्थापित करण्याची गरज आहे.
स्त्री-पुरुषातले सहज संबंध, त्याला मैत्री म्हणा वा प्रेम, ही नियमांनी वा नात्यांनी बांधून टाकता येणारी गोष्ट नाही. आपल्याकडे विवाहपूर्व प्रेमाचा प्रकार तसा कमीच आढळतो. विवाहोत्तर सहवासातून निर्माण होणार्या प्रेमाविषयीचा भरवसा आपल्यात फार मोठा आहे आणि ती बिनभरवशाची बाब आहे, हे सिद्ध करायला पुराव्यांची गरज नाही. सहवासातून प्रेमच निर्माण होईल असे नाही, भांडण ही देखील सहवासाचीच देणगी आहे.
विवाहानंतर पुरुषाच्या मनात पत्नीखेरीज आणखी कुणा स्त्रीविषयीचे आकर्षण उत्पन्न होऊ नये, हा आपला आदर्श विचार झाला आणि पत्नीच्या मनात कुठल्याही परपुरुषाचा विचार डोकावू नये, ही आपली मागणी झाली. एकपत्नीव्रताच्या आणि पातिव्रत्याच्या कल्पनांनाही आपण एका पातळीवर राखले नाही. पुरुषांनी मोडलेले आदर्श आपण क्षम्य मानतो. काहीवेळा तर आदर्श मोडणारांनाच मोठे मानतो. आम्हाला राम पूज्य आणि कृष्णही पूज्य. पण स्त्रीच्या बाबतीत असला अपराध आम्ही नेहमीच अक्षम्य मानला. हिंदू, बौद्ध, मुस्लिम वा ख्रिश्चन कोणत्याही धर्माचा इतिहास ह्या पक्षपातापासून मुक्त नाही.
ह्या सगळ्या आदर्श म्हणविणार्या पक्षपाती परंपरांनी एक मूलभूत सत्य सदैव कठोरपणे नाकारले आहे. प्रेम ही एक सहज भावना आहे आणि ती खरी असेल तर ती केव्हाही आणि कोणत्याही संदर्भात निर्माण होणारी आहे. विवाह हे विजेचे बटन नव्हे की त्यामुळे वाहणारा प्रेमाचा प्रवाह बंद करून थांबविता येईल. स्त्री-पुरुषांना विवाहाच्या बंधनाबाहेरही ते वाटू शकेल. आजची स्त्री ही तुलनेने आपल्या पतीहून परपुरुषांच्या सहवासात अधिक काळ राहते. पुरुष तर पत्नीच्या सहवासाहून इतरांच्या सहवासात कधीचाच अधिक काळ राहत आलेला आहे. अश्यावेळी विवाहाबाहेर नाजुक संबंधांना सुरुवात झाली तर तो नीतितत्त्वाचा भंग वा विवाहसंस्थेचा र्हास मानण्याचे कारण नाही. बदलत्या वास्तवाची ती अपरिहार्य परिणती मानली पाहिजे.
ज्या काळात ह्या तत्त्वांचा वा संस्थांचा पाया घातला गेला त्या काळात आजचे नवे वास्तव लक्षात घेण्याची गरज नव्हती आणि तेव्हाच्या माणसांना याचे भान असण्याचे कारणही नव्हते. शिवाय ज्या काळात ह्या तत्त्वाची व संस्थांची बंधने कडक होती त्याही काळात त्यांचेकडे कानाडोळा करणार्या बहाद्दरांचा वर्ग नव्हता असेही नाही. असा कानाडोळा करणारांचे अत्यंत गौरवशाली उल्लेख आपल्या सगळ्याच आदरणीय ग्रंथांमधून आलेले आहेत.
विवाहबाह्य संबंधांतून जन्माला येणार्या संततीला सन्मानाने जगू देण्याचे जे औदार्य प्राचीन समाजाने दाखविले व त्यासाठी त्याकाळी जे मार्ग त्यांनी शोधून काढले ते पाहिले की आपला वर्तमान समाजच तुलनेने अधिक बंदिस्त वाटू लागतो.
श्वेतकेतूच्या आईला त्याच्या बापासमक्षच एक अतिथी भोगासाठी ओढून नेऊ लागला तेव्हा श्वेतकेतूने त्याला अडविण्याचा प्रयत्न केला. त्यावर त्याच्या बापाने त्यालाच थांबवून जे घडत आहे तो अतिथिधर्माचा भाग असल्याचे सांगितले. त्यावर श्वेतकेतूने विवाहाची मर्यादा जाहीर केली व विवाहित स्त्रीने पतीखेरीज इतर पुरुषांशी संबंध ठेवू नये, ते पातक होय, असे घोषित केले.
दीर्घतमसकाम हा जन्मांध ऋषी अतिशय कामाचारी होता. त्याच्या अतिचाराला आणि अंधत्वामुळे उघड्यावर चालणार्या कामुक चाळ्यांना कंटाळून त्याच्या पत्नीने त्याला सोडून दुसर्या कुणाजवळ जाऊन राहण्याची धमकी दिली. तेव्हा पतिव्यक्तिरिक्त दुसर्या पुरुषाचा विचार मनात आणणार्या स्त्रीला भ्रूणहत्येचे पातक लागेल असा नियम ह्या दीर्घतम्याने सांगितला. (पुढे त्याच्या चाळ्यांना कंटाळून त्याच्या पत्नीने आपल्या मुलांच्या मदतीने त्याला दोरांनी बांधले आणि वाहत्या गंगेत सोडून दिले अशी ही कथा आहे) हा दीर्घतमसकाम ऋग्वेदाच्या पहिल्या मंडलाचा रचयिता आहे.
महाभारताच्या आदिपर्वात विवाहमर्यादांची उत्पत्ती सांगणार्या ह्या दोन कथा विस्ताराने सांगितल्या आहेत. मुळात ह्या कथाच फारशा नैतिक नाहीत. त्या कथांतील व्यवहार आणि अन्याय (विशेषत: दीर्घतम्याच्या कथेतला) उघड आहे. अश्याच कथा ख्रिश्चन, ज्यू आणि इतरही सर्व धर्मांत आहेत आणि त्यांचेही स्वरूप फारसे नैतिक नाही.
ह्या कथा शब्दश: खर्या मानण्याचे वा त्यांनीच सध्याच्या व्यवस्था घडविल्या असे मानण्याचे कारण नसले तरी त्या तत्कालीन समाजमनाचे दर्शन घडविणार्या आहेत हे नाकारण्याचे कारण नाही. कोणे एके काळी समाजाच्या विशिष्ट अवस्थेत त्याला जे नियम (कुणाच्या सोयीसाठी वा व्यवहारासाठी का असेना) घालून देणे उचित वाटले ते आज हजारो वर्षांच्या बदलानंतर जसेचे तसे कायम टिकविण्याचा अट्टाहास दुराग्रही तर आहेच शिवाय तो टिकणाराही नाही. हे निर्बंध मुळात पूर्वीही फारसे टिकले नव्हते हेही महत्त्वाचे आहे.
राजा, प्रधान, सेनापती, राज्यातील धनवंत, जमीनदार व सरदार इत्यादींना हे निर्बंध प्लेटोच्या आदर्श राज्यातल्या कायद्याप्रमाणे कधी लागूच झाले नाहीत. कवी, कलाकार, प्रतिभावंत आणि समाजातील इतर मान्यवर यांनाही त्यातून नेहमीच सूट मिळत राहिली. हा प्रकार थोड्याफार फरकाने आजही आहेच. एखाद्या सिनेनटीने वा नटाने एखाद्या विवाहितेशी वा विवाहिताशी लग्न लावले की आमची नीतिमान वृत्तपत्रेदेखील त्या लग्नाचे कौतुक करणारी छायाचित्रे छापणार. अश्यावेळी द्विभार्याप्रतिबंधक नावाचा कोणता कायदा देशात अस्तित्वात आहे याचा सरकारसकट सार्यांना विसर पडणार आणि विचारवंत म्हणविणारी माणसे ह्या प्रकाराच्या समर्थनासाठी आपली बुद्धी झिजवणार. माझा ह्या प्रकाराला आक्षेप नाही. फक्त हे स्वातंत्र्य समाजातल्या सामान्य माणसाने घेतले तर त्याचे असे समर्थन मांडायला कुणी धजावत नाही वा त्यासाठी आवश्यक ते समाजमन घडविण्याची कुणाची तयारी असत नाही, हा यातल्या दुबळ्या पक्षपाताचा भाग आहे एवढेच.
आपली एक परंपरा तर विवाहबाह्य संबंधांचे नुसते कौतुकच नव्हे, तर धार्मिक पातळीवरून तशी गरज प्रतिपादन करणारीच आहे. कौतुकाच्या पातळीवरचे परंपरेतले लाडके नाव ‘राधा’ तर धार्मिक पातळीवरचे नाव ‘भैरवी’ हे आहे. नवव्या शतकाच्या सुमारास महाकवींच्या प्रतिभेने जन्माला घातलेली राधा ही प्रेमाच्या क्षेत्राला भारताने दिलेली अपूर्व अशी देण आहे. ही राधा अनलाची पत्नी असून कृष्णाची प्रेयसी आहे आणि त्यांच्या विवाहबाह्य प्रेमसंबंधाने गेले एक हजार वर्ष कवींना कविता, चित्रकारांना चित्रे, नृत्यकारांना नृत्याचे विषय, प्रतिभावंतांना प्रेरणा आणि प्रेमिकांना पाठबळ मिळवून दिले आहे. राधा-कृष्णाच्या ह्या प्रेमात वासना वर्ज्य नाही, पण वासना हा प्रेमाचा आधार नाही. शरीर, नाव, सहवास, प्रतिष्ठा यापैकी कशाचाही आग्रह न धरणारी राधा कृष्णावर मनोमन प्रेम करते. हा उत्कट प्रेमाचा आम्ही सर्वश्रेष्ठ अविष्कार मानला.
ह्या उलट आपल्यातल्या शाक्तांनी राधेला शारीर पातळीवर नेऊन भैरवी बनविले. मैथुन हा पूजेचा श्रेष्ठ विधी ठरविला आणि मैथुनातला आनंद हाच ब्रह्मसुखाचा सहचर मानणार्या वामाचार्यांनी भैरवीच्या भूमिकेसाठी स्वस्त्रीपेक्षा परस्त्री श्रेष्ठ ठरविली. पत्नीशी केलेले मैथुन धर्मदृष्ट म्हणून विशेष आनंदाचे ठरत नसल्याने प्रेमदृष्ट असलेला परस्त्रीसमागम अधिक आनंदाचा ठरविला. परस्त्रीशी करावयाच्या या समागमाला हिंदूतल्या वामाचार्यांप्रमाणेच बौद्धांच्या वज्रयान आणि सहजयान पंथांनी आपलेसे केले. जगातल्या अनेक धर्मात आलेल्या ह्या वामाचाराने अशा परस्त्रीसमागमनाला धार्मिक प्रतिष्ठा मिळवून दिली आणि वामाचार म्हणताना देखील हा आचार समाजाच्या मोठ्या वर्गाला धार्मिक विधीतला महत्त्वाचा भाग वाटत आला.
जगातल्या सगळ्या सभ्य समाजांनी स्त्रीपुरुषसंबंधांची, मग ते वैवाहिक असले तरी, चर्चा, चिकित्सा टाळण्यावरच भर दिला. धर्म, समाज, परंपरा ह्या साऱ्यांचे मूळ कुटुंबात आणि कुटुंबाची उभारणी स्त्री-पुरुषांच्या शरीरसंबंधांच्या नियमावर बेतलेली आहे. परिणामी, सनातनी राहोत नाहीतर सुधारक, ही व्यवस्था अशीची अशीच राखू इच्छिणार्यांना ह्या आधाराची चर्चाही नको अन् चिकित्साही नको. असल्या चिकित्सेने ही आधारव्यवस्था कोलमडून जाण्याचीच त्यांना चिंता वाटत आली.
ह्या संबंधांभोवती म्हणूनच गूढ वा गूढरम्य म्हणा हवे तर, वलये उभी करण्यात सार्यांनी आपली प्रतिभा खर्ची घातली. ह्या संबंधांची उघड चर्चा पापमूलक ठरविली. त्याबाबतची सूचकता हा त्यातल्या त्यात कमी असभ्य प्रकार मानला. स्वाभाविकच पति-पत्नीच्या शयनगृहाचे दार कायम बंद राहिले. प्रत्येक शतकाने ह्या दाराला नवीनवी आणि मोठमोठी कुलुपे ठोकली. त्याभोवती प्रतिष्ठा, सभ्यता आणि संकोचाच्या भिंती उभ्या केल्या आणि समाजाचे सारे व्यवस्थापक ह्या भिंतींबाहेरचे अदृष्य पहारेकरी बनले. स्त्रीच्या मनाभोवती आणखी एक अदृष्य पहारा उभा राहिला तो तिचाच स्वत:चा. हा पहारा पातिव्रत्याच्या कल्पनेचा होता अन् आहे. परिणामी नवर्याच्या असल्यानसल्या यशाची गाणी म्हणणे हा पूजेचा आणि अपयशाची वाच्यता हा पापाचा भाग ठरला. नवर्याचा अहंकार अर्थातच ह्या वाच्यतेविरुद्ध राहिला आणि ह्या अहंकारामागे सारी धर्मपरंपरांची व्यवस्था पाठिंब्यासाठी उभी राहिली.
परिणामी पति-पत्नीची शय्या हा चित्तचक्षुकुतूहलाची, चित्रविचित्र कल्पनांची आणि समर्थ वा दुबळ्या, कधी निकोप तर बहुदा विकृत प्रतिभेचा विषय बनली. त्यातून अनेक खुळ्या व मूर्ख कल्पनांचा जन्म झाला. ही शय्या श्रांत मनाला आणि शरीराला रिझवणारी सुखाची शय्या ठरली. मनाचे, शरीराचे तणाव घालवणारी आणि त्यांचे सुखद सैलपण आणणारी बाब ठरली. नव्या उमेदीचे अंकुर फुलविणारी, जोम जागविणारी, नव्या पिढ्या, नव्या रचना जन्माला घालणारी व्यवस्था बनली.
ही व्यवस्था चिकित्सेचा विषय मात्र कधी झाली नाही. परिणामी सगळ्या भाबड्या समजुती कायम झाल्या आणि बंद दाराआडच्या व्यथा, किंकाळ्या, तणाव आणि बलात्कार कोंडलेलेच राहिले. अनेक संशोधकांनी ह्या बंद दाराआडची दु:खे प्रथम बोलकी केली तेव्हा ह्या शय्येबाबतच्या आपण जपलेल्या समजुतींच्या खोटेपणाचा साक्षात्कार समाजाला झाला. ही शय्या निव्वळ सुखाची नाही, ती कुठे क्रौर्याची आणि विटंबनेची, घृणेची आणि तिरस्काराची, फसवणुकीची आणि दुटप्पीपणाची, अहंता गोंजारण्याची आणि त्यासाठी विकारांचा आश्रय घेणारी, कुठे कायम भीतीची तर कुठे निव्वळ वासनेच्या शमनाचीही शय्या आहे ह्या जाणिवेने जुन्या गोंडस कल्पनांना धक्का दिला. पण व्यवस्थेने आपल्या लवचिक अस्तित्वात हे सारे सामावून पुन्हा हसरा मुखवटा धारण केला.
‘स्त्रीच्या लैंगिकतेचा प्रवास आत्म्याच्या अधिष्ठानांशी सुरू होऊन संवेदनेच्या पातळीकडे जातो, पण त्या पातळीवर तो क्वचितच पोहोचतो, तर पुरुषाच्या लैंगिकतेचा प्रवास संवेदनेच्या पातळीवर सुरू होऊन आत्म्याच्या दिशेने जातो. मात्र तो आपल्या मुक्कामावर कधीच पोहचत नाही’ असा एक अभिप्राय ॲलन् के ह्या संशोधनकर्तीने फार पूर्वी नोंदविला आहे आणि तो अनेक भाबड्या विचारवंतांना (त्यात महाराष्ट्रातले स्वत:ला संशोधक मानणारे काही अभ्यासूही सामील आहेत) अतिशय पसंत आहे. पूर्वीच्या ताराबाई शिंद्यांपासून आजच्या प्रोमिला थापरपर्यंत ह्याबाबत एक भाबडे एकमत आहे. ‘पुरुष प्रेम करतो ते संभोगासाठी तर स्त्री संभोग करते ते प्रेमासाठी. केवळ शारीरिक गरज म्हणून स्त्री पुरुषाशी संबंध ठेवूच शकत नाही. उलट पुरुषाला मात्र भावनिक गरज नसतानाही स्त्रीचे शरीर हवे असते’ अशा आशयाच्या कविता याच भाबडेपणातून जन्माला येतात.
ह्या क्षेत्रात संशोधक म्हणविणारांचा वर्गच जर ह्या बाळबोध पातळीवर असेल तर सामान्य माणसांकडून ह्या संबंधांच्या वास्तविक जाणिवांची अपेक्षा करणे हाही चुकीचा प्रकार ठरेल.
महाभारतात शरपंजरी पडलेल्या भीष्माला युधिष्ठिर विचारतो, ‘समागमाचा आनंद पुरुषाला अधिक होतो की स्त्रीला’ (आजपासून पाच हजार वर्षांपूर्वी एक नातू आपल्या मरणासन्न आजोबाला हा प्रश्न विचारतो ही बाबही येथे लक्षणीय आहे) भीष्म ह्या प्रश्नाचे उत्तर देताना स्वच्छपणे सांगतो, ‘समागमाचा आनंद स्त्रीला अधिक होतो’ पुढे आपल्या उत्तराच्या स्पष्टीकरणार्थ तो एक कथाही सांगतो.
ह्या क्षेत्रातल्या संशोधनात अग्रपूजेचा मान असलेल्या हेवलॉक एलीसने अॅलन के चा अभिप्राय पुराव्याच्या पातळीवर टिकणारा नसल्याचे स्पष्टपणे नोंदविले आहे. स्त्री-पुरुषांमधील (लैंगिक) संबंधांना शारीरिक, मानसिक, बौद्धिक आणि जैविक बाजूंसोबत सामाजिक व नैतिक मूल्यांचेही परिमाण आहे. त्या संबंधांचा क्षमतेएवढाच संस्कारांशी संबंध आहे. म्हणून ह्या संदर्भात एखादे कायम सर्वमान्य सूत्र तयार करणे वा ते तसे असल्याचा आभास निर्माण करणे हीच मुळात अशास्त्रीय बाब आहे.
‘कामतृप्तीचे महत्त्व जितके पुरुषाला वाटते तितके ते स्त्रीला वाटत नाही, कामतृप्तीशिवाय ती वर्षानुवर्षे राहू शकते’ हेही याच संदर्भातले मराठी संशोधकांचे मत बरे असले तरी, खरे नाही. शिवाय ते पुरुषांएवढेच स्त्रियांवरही अन्याय करणारे आहे. असे पुरुष वा स्त्रिया नाहीत असे नाही. परंतु सगळे पुरुष वा सगळ्या स्त्रिया अश्या आहेत वा असतात असे म्हणणे धार्ष्ट्याचे होणार आहे. वयाच्या विसाव्या, तिसाव्या, बत्तिसाव्या वर्षी विधुरत्व आल्यानंतर ते तसेच पत्करून उरलेले आयुष्य वैराग्याने काढणार्या पुरुषांची नावे मोठी झाली नाहीत, पण अशा पुरुषांच्या कहाण्या गावोगावी आणि जागजागी आहेत. याउलट पाच पती असतानाही सहाव्या पुरुषावर मन जाणार्या स्त्रीच्या गौरवाच्या कहाण्याही (प्रक्षिप्त स्वरूपात का असेना) आपल्यात आहेत. पुरुषांना पुनर्विवाहाची मोकळीक असल्याने ते मोठ्या प्रमाणावर पुनर्विवाह करीत. अशी संधी अकाली वैधव्य आलेल्या स्त्रियांना नव्हती. म्हणून तिच्यावर लादल्या जाणार्या एकाकी जगण्याचे परंपरेने पूजनीय स्तोम माजविले. पण समाजाच्या ज्या वर्गात स्त्रियांनाही पुनर्विवाहाचे स्वातंत्र्य होते तेथे ते होतच असत आणि त्याचा उगाच बडिवारही कुणी मिरवीत नसत. मुख्य म्हणजे हेच वर्ग समाजात बहुसंख्येने होते हेही ध्यानात घेतले पाहिजे.
मात्र ह्या संदर्भात नोंदवायचा मुद्दा वेगळा आहे. वर उल्लेखिलेली सहाव्या पुरुषावर मन जाणारी स्त्री ही तमाम स्त्री वर्गाची प्रतिनिधी नसते. तसे वर उल्लेखित शरीरलोभी पुरुषही सर्व पुरुषांचे प्रतिनिधी नसतात. स्त्री व पुरुष यांचेतील शारीरिक स्वरूपाचा भेद नैसर्गिक असला तरी मन व संवेदना यांचेबाबत आढळणारा फरक संस्कारांचाच असतो आणि संस्कारभेद जपणे, वाढवणे, मिरवणे हा सामाजिक प्रक्रियेचाच भाग असतो. आजचा नित्याचा ज्ञात संस्कार झुगारून देणारी स्त्री लैंगिक बाबतीत पुरुषांएवढीच आक्रमक होऊ शकते व तशी शेकडो उदाहरणे शास्त्रज्ञांनी नोंदविली आहेत. पुरुषांनी स्त्रियांवर केलेल्या बलात्काराच्या कथा शेकड्यांनी छापून येतात, पण स्त्रियांनी अल्पवयीन मुलांवर केलेल्या बळजोरीच्या कितीश्या कथा प्रकाशित होतात? एलीसच्या मते दुसर्या प्रकारच्या कथांची संख्या पहिल्या प्रकारच्या कथांहून मोठी आहे. त्यांना वाचा नाही एवढेच. मात्र हे सुद्धा स्त्रीचे वा पुरुषाचे खरे किंवा पूर्ण चित्र नव्हे. हे त्यांच्यातील काहींचे चित्र आहे हे लक्षात घेतले पाहिजे.
मुळात ह्या संबंधांकडे निकोप दृष्टीने पाहण्याएवढे सकस मन कितीजणांकडे आहे हाच यातला मुख्य प्रश्न आहे. लैंगिकता आणि पाप हे दोन शब्द समानार्थी मानणार्या समाजव्यवस्थेत स्त्रीविषयीच्या भावना पूर्णपणे विकारहीन राहणे मुळातच अशक्य आहे. परिणामी ह्या विषयाची सगळी चर्चाच पोरकट, किरटी, विकारवश, अपराधी आणि अपुरी असते.
काही वर्षांपूर्वी कोलकात्याच्या सरकारी कार्यालयात काम करणार्या काही महिला कर्मचार्यांनी ‘इलस्ट्रेटेड विकली’ला पत्र लिहून ‘अर्धनग्न स्त्रियांची चित्रे किती छापाल, आता जरा अशी पुरुषांची चित्रेही छापा’ अशी जाहीर मागणीच केली होती. ह्या मागणीची संसदेपासून सर्वत्र निलाजरेपणाची मागणी म्हणून हेटाळणी झाली होती. यातली मुख्य बाब अशी मागणी करण्याचे धाडस ही नसून तशी इच्छा असणे, ही आहे. क्रोध, मोह, महत्त्वाकांक्षा इ. सर्व क्षेत्रांत स्त्री पुरुषाएवढाच पुढाकार घेताना दिसते. सर्वच क्षेत्रांत तशी ठळक उदाहरणेही आहेत. अशी स्त्री ‘काम’ ह्या एकाच क्षेत्रात वेगळी आहे असे भासविण्याचा प्रयत्न हा पुन्हा आपल्या पुरुषप्रधान संस्कारांचाच प्रकार असतो. आपल्या व्यवस्थेत पुरुषांना जेवढी संधी उपलब्ध आहे तेवढी ती स्त्रियांना नाही. संधीची कमतरता हे स्त्रीच्या वेगळेपणाचे कारण आहे, परिणाम नव्हे हे स्पष्टपणे समजून घेतले पाहिजे.
संरक्षणाच्या गरजेपोटी स्त्रीचा वेगळेपणा निर्माण होतो, सुरक्षा व भयमुक्ती यासाठी पुरुषाचा आधार ही तिची गरज होते, हा एक निराधार मुद्दाही ह्या संदर्भात अनेकांकडून ऐकायला मिळतो. वास्तव असे की, संरक्षण ही फक्त स्त्रीची गरज नसून ती प्रत्येकालाच लागू होणारी बाब आहे. असुरक्षिततेच्या भयापासून स्त्रीएवढाच पुरुषही मुक्त नाही, हेही येथे नोंदविणे आवश्यक आहे.
स्त्री-पुरुषांच्या मैत्रीसंबंधांचे स्वरूप काय असावे, विशेषत: या संबंधांच्या मर्यादा कोणत्या असाव्या हा सर्वांना नेहमीच पडत असलेला प्रश्न आहे. या प्रश्नाच्या उत्तरासाठी कल्पनाविलासाचा आश्रय घेण्याचे कारण नाही. खुल्या मैत्रीचा मुक्त व्यवहार असलेल्या अनेक मागास जमाती आणि अतिशय प्रगत समाज आज एकाचवेळी जगात अस्तित्वात आहेत. त्यांच्यावर एक नजर टाकली तरी ह्या प्रश्नाचे उत्तर गवसणारे आहे. विवाहपूर्व लैंगिक स्वातंत्र्य देणारे आदिवासींचे अनेक समूह भारतात व भारताबाहेर आहेत. वयात आलेल्या व येऊ पाहणार्या मुलामुलींना लग्नाआधी रात्रीचे एका मध्यवर्ती निवारागृहात (घोटुल) ठेवण्याची व तेथे त्यांना लैंगिक शिक्षणासह जीवनाचे सगळे व्यवहार शिकविण्याची व्यवस्था ह्या समूहांत आहे. मध्यप्रदेशातील बस्तर ह्या महाराष्ट्राच्या गडचिरोली जिल्ह्यांतील बडा माडिया व माडिया जमातींत ह्या व्यवस्थांचे अवशेष अजून टिकले आहेत आणि लैंगिक स्वातंत्र्य असतानाही ह्या समाजातील मुलामुलींत अनाचार बोकाळल्याचा पुरावा नाही. शिवाय या समाजात बलात्कार, सक्ती यांचे प्रमाणही दखलपात्र नाही. मुलींना नवरा निवडण्याचा अधिकार असल्याने त्यांच्या फसवणुकीचाही प्रकार नाही.
विवाहानंतर हे स्वातंत्र्य संपते, पण घटस्फोट, काडीमोड घेऊन नवे घरठाव करण्यावर मात्र निर्बंध नाही. (माझा ह्या जमातींशी बराच काळ संबंध राहिला. त्यातल्या विवाहित स्त्रीला विवाहपूर्व/ विवाहबाह्य संबंधांबाबत विचारलेल्या प्रश्नांची तिने दिलेली उत्तरे येथे महत्त्वाची ठरावी. आपल्या नवर्याशिवाय वस्तीतल्या अनेकांशी तिचा लग्नाआधी संबंध घडल्याचे तिने सांगितले. आज त्या पुरुषांकडे पाहताना मनात काय येते असे विचारता ती म्हणाली, काही नाही. त्या सार्यांमधूनच मी माझा नवरा निवडला आहे.)
पाश्चात्त्य औद्योगिक समाजातून स्त्री-पुरुषांच्या अधिक मुक्त संबंधांचे चित्र पाहत असतानाच त्या समाजातून घटस्फोटांचे प्रमाण वाढल्याची आणि घटस्फोटित मातापित्यांच्या मुलांची आबाळ होत असल्याची चर्चाही आपण ऐकत असतो. मात्र हे समाज त्यामुळे मोडून गेल्याचे चित्र नाही. साहित्य, कला, संगीत, क्रीडा यासारख्या सांस्कृतिक क्षेत्रातील त्यांची प्रगती तेवढीच गतिशील आहे. औद्योगिकीकरण आणि त्याच्या जोडीने येणारे व्यक्तिस्वातंत्र्य यांचा हा परिणाम अटळ म्हणूनच त्याकडे पाहावे लागणार आहे.
एखाद्या समाजात २५ टक्क्यांएवढे घटस्फोट होतात याचा अर्थ न पटल्यामुळे तेवढ्या कुटुंबातील स्त्री-पुरुषांनी कुढत जगण्यापेक्षा वेगळे होण्याच्या निर्णय घेतला असाही करता येतो. उरलेली ७५ टक्के कुटुंबे पटवून घेत वा एकमेकांना सावरून आहेत असाही हा अर्थ होऊ शकतो. पटो वा न पटो, माणसे आपली कुढत जगत आहेत ह्या आपल्या चित्राहून पाश्चात्त्यांचे खुले चित्र एकाएकी टाकावू ठरविण्याचे कारण नाही. शिवाय आपल्याकडील परित्यक्त्यांचे प्रमाण पाश्चात्यांच्या घटस्फोटांच्या संख्येप्रमाणेच तपासून पाहण्याजोगे आहे. पुण्यासारख्या प्रगत जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील अनेक तालुक्यात प्रत्येकी किमान पाचशेवर परित्यक्तांचा प्रश्न उभा आहे. याची कारणे वेगळी असली तरी आपल्याही समाजात हा बेकायदा घटस्फोटाचा प्रकार आता दुर्लक्षिण्याजोगा राहिलेला नाही हे येथे नोंदवायचे आहे.
समतेप्रमाणेच स्वातंत्र्याचे मूल्यही माणसांना काही मोल मागत असते. काही सोडायला भाग पाडत असते. ज्यांनी ही तयारी दाखविली त्या सगळ्यांना अनैतिक व स्वैराचारी ठरवून मोकळे होण्याचा ठोकळेबाज प्रकार करण्याचे कारण नसावे. मार खात, खस्ता काढीत आणि मनाचा सदैव कोंडमारा सहन करीत (आणि तो कोंडमारा आहे याची खूपदा जाणीवही नसणारी) जगणारी आपल्या समाजातील स्त्री आणि स्वत:च्या स्वातंत्र्याचा आग्रह धरीत त्याविरुद्ध जाणार्या व्यवस्था नाकारणारी पाश्चात्त्य स्त्री यातले कोणते चित्र अधिक आदरणीय आहे हा विचार प्रत्येकाला करावा लागणार आहे. कारण ह्या चित्रापासून आपणही आता फारसे दूर नाही.
बालविवाहांचा आणि संयुक्त कुटुंबाचा काळ आता मागे पडला आहे. अल्पवयीन मुलामुलींत समज येण्याआधीच त्यांचे पति-पत्नींचे नाते निर्माण झाल्याने येणारी मानसिकताही आता राहिलेली नाही. प्रौढ आणि अतिप्रौढ विवाहांच्या आजच्या काळात स्त्री-पुरुषांच्या परस्परांबाबतच्या व्यक्तिगत पसंतीला न्याय्य महत्त्व आले आहे. याच काळात विवाहपूर्व मैत्री रुजू लागली आहे आणि ती सहजगत्या घेण्याइतपत मानसिकताही वाढू लागली आहे. सारांश आपल्याकडे अश्या मैत्रीला पूर्वी नव्हता तो अनुकूल काळ व वातावरण आता निर्माण होत आहे.
पती व पत्नी दोघेही नोकरीत असतील तर दोघांचा सगळा दिवस वेगवेगळ्या सहकार्यांच्या सोबत जातो. या ठिकाणची एक चमत्कारिक मानसिकताही लक्षात घेण्याजोगी आहे. पती व पत्नीत (सुद्धा) एकमेकांना गृहीत धरून वागण्याचा जो बेफिकीर प्रकार असतो तो ह्या सहकार्यांत अभावानेच आढळतो. आपल्या पत्नीच्या बाबतीत बेफिकीर असणारा नवरा त्याच्यासोबत काम करणार्या स्त्रियांशी आदराने वागतो. हाच प्रकार स्त्री-कर्मचार्यांबाबतही खरा आहे. जागा नोकरीची असेल नाहीतर पंचतारांकित क्लबातली, हॉटेलातली किंवा रोजगार हमी योजनेच्या कामाची, हा प्रकार सर्वत्र अनुभवाला येतो. यातून विवाहपूर्व मैत्रीएवढीच विवाहबाह्य मैत्रीलाही अनुकूलता लाभली आहे. पुढल्या काळात ती आणखी वाढत जाणार आहे. ती रोखणे वा थांबवणे हा त्यावरचा उपाय नसल्याने (व तो अंमलात येणेही अशक्य असल्यामुळे) ही मैत्री नव्या संदर्भात निकोप मनाने समजून घेणे हीच आजची व उद्याची गरज आहे. ह्या मैत्रीला असणार्या मर्यादांबाबतही काही अटळ गोष्टी स्पष्टपणे नोंदविण्याची गरज आहे. समाजाने ह्या संदर्भात घालून दिलेल्या पूर्वापार मर्यादांचा पुढील काळात कुणी आदर करील असे समजण्याचे कारण नाही. आपली सामाजिक बंधने आणि त्यामागे असणारे समाजमनस्कतेचे वजन हे सारेच आता बर्यापैकी शिथिल आणि दुबळे झाले आहे.
सगळ्या समाजाची वाटचालच समूहमनस्कतेकडून व्यक्तिकेंद्री व्यवस्थेकडे सुरू आहे. (ते प्रगतीचे लक्षण तर आहेच, शिवाय ते कायदा व अधिकारांच्या व्यवस्थेलाही सुसंगत आहे) परिणामी ह्या मर्यादांचा विचार संबंधित व्यक्तींनाच करावयाचा आहे. त्यातून येणार्या परिणामांची जबाबदारीही व्यक्तींनीच आपापल्या पातळीवर स्वीकारायची आहे. ह्या जबाबदारीची जाणीव हीच ह्या संबंधांची खरी मर्यादा असेल. अशी समर्थ जाणीव सर्वच स्त्री-पुरुषांत निर्माण होऊ शकेल काय? तशी ती नसली तर स्वैराचार, अनाचार यांना ते निमंत्रण ठरेल काय? असे प्रश्न याबाबत विचारले जाऊ शकतात. त्याचे उत्तर एवढेच, व्यक्तिगत जबाबदारीच्या जाणिवा याही आजच्या सामाजिकतेच्या जाणिवेप्रमाणेच असणार नाहीत. तशा कोणत्याही जाणिवा सार्वत्रिक नसतात व तशा अपेक्षा बाळगणेही व्यर्थ आहे.
कायद्यासह सगळी सामाजिक बंधने त्यांच्या जाणिवांसकट असतानाही अनाचार, स्वैराचार, बलात्कार, बळजोरी ह्या गोष्टी आज आहेतच. उद्याच्या अवस्थेत आजच्या बंधनांसोबत व्यक्तिगत जबाबदारीच्या जाणीवेचे प्रभावी स्वयंशासन असेल. ते मर्यादा असेल आणि स्वातंत्र्याचाही तो भाग असेल. शिवाय ज्या समाजांनी स्त्रीपुरुषांचे स्वातंत्र्य मान्य केले तेथे केवळ अनाचारच माजला असाही पुरावा नाही. आदिवासींच्या ज्या जमातीत विवाहपूर्व लैंगिक स्वातंत्र्य आहे तेथेही स्वैराचार नाही. पसंती, मैत्री, समानता, आदर हा मानवी भाग मागास समजल्या जाणार्या ह्या वर्गातही आहेच.
सुशिक्षित, स्वयंपूर्ण आणि आत्मभान असणार्यांना असा निर्णय स्वत: घेण्यात अडचण येणार नाही. (शिवाय उद्याचे स्त्रियांचे वर्ग पुरुषांएवढेच आर्थिकदृष्ट्याही स्वयंपूर्ण असतील) त्यामुळे निर्माण होणार्या परिस्थितीत कुटुंबाचे आजचे रूप बदलेल पण ते तुटण्याची शक्यता असणार नाही. नवर्याने कमवायचे, संरक्षण द्यायचे आणि घरातल्या इतरांनी त्याच्या कलाने जगायचे ही कुटुंबाची आजची आपली अवस्था आदर्शही नव्हे. परस्परांच्या स्वातंत्र्याला मान देत, बरोबरीच्या नात्याने चालणारे स्त्रीपुरुषांचे सहजीवन हा येणार्या काळातील लोकशाही कुटुंबाचा आदर्श आहे व त्याच्या स्वागताची मानसिकता तयार करणे हे आमचे काम असेल.
शिवाय ह्या चर्चेला (व एकूणच समस्येला) फार दिवसांचे आयुष्य नाही, हेही येथे नोंदविणे आवश्यक वाटते. गेल्या काही वर्षात ह्या संदर्भातले समाजाचे जुने आग्रह लोपू लागले आहेत व त्यांची जागा कुठे उदासीनतेने, तर कुठे बेफिकीरीने घेतली आहे. काही जागा अश्याही आहेत की जेथे ह्या संबंधांकडे तटस्थपणे वा समजुतीने पाहिले जाऊ लागले आहे. नव्या पिढीची मानसिकता उदार आहे. आजच्या पिढीला जाणवणारे ह्या संदर्भातले तणाव हेही ह्या बदलत्या वास्तवाचेच द्योतक आहेत. समाजाचे, कुटुंबाचे व नीतिनियमांचे आग्रह यांचे स्वरूप बदलत असल्याचे हे लक्षण आहे. म्हणून हे तणाव पुढल्या किती पिढ्यांपुढे उभे राहतील हा प्रश्न प्रत्येकाने स्वत:ला विचारून पाहण्याजोगा आहे.
स्वातंत्र्य की सुरक्षितता हा एक सनातन वाद आहे. सुरक्षितता स्थैर्य देते, तर स्वातंत्र्य प्रगतिशील गतिमानता. यापैकी काय घ्यायचे ह्या प्रश्नाचे इतिहासाने दिलेले उत्तर ह्या दोहोतल्या समन्वयाचे आहे. आम्हाला स्वातंत्र्यासोबत स्थैर्यही हवे.
स्वातंत्र्याच्या प्रत्येक पावलागणिक आपण सुरक्षिततेच्या व स्थैर्याच्या नव्या व्यवस्था निर्माण करीत असतो. स्थैर्याला झेपेल असे स्वातंत्र्याचे पाऊल पुढे टाकायचे आणि स्वातंत्र्य पेलून धरणारी सुरक्षितता उभी करायची असा हा प्रवास आहे. व्यक्तिस्वातंत्र्याच्या ह्याच गरजेतून संयुक्त कुटुंबाची सुरक्षित व्यवस्था मागे पडली व त्याची जागा लहान कुटुंबांनी घेतली. विम्यासारख्या सुरक्षेच्या योजना ह्या नव्या अवस्थेची गरज म्हणून पुढे आल्या. वृद्धाश्रमासारख्या योजनाही याच सुरक्षेचा भाग म्हणून निर्माण झाल्या. व्यक्तिस्वातंत्र्याचे नवे उन्मेष मरू न देण्याची खबरदारी प्रत्येक पिढीने प्रसंगी फार मोठे मोल चुकवून घेतली आहे.
स्त्रीपुरुषसंबंधांची आजची अवस्था व्यक्तिस्वातंत्र्याला व विशेषत: स्त्रीच्या स्वातंत्र्याला फारशी अनुरूप नाही. शिक्षण व त्यामुळे येणारे आत्मभान या दोहोंच्या अभावी स्त्रीने ही अवस्था आजवर चालवून घेतली. ती पुढेही अशीच चालेल ह्या भ्रमात कोणीही राहण्याचे कारण नाही. शिवाय संख्येने पन्नास टक्क्याएवढा असलेला समाजाचा हा मोठा घटक तसा ठेवण्याचा प्रयत्न अन्यायकारक आहे व म्हणूनच त्याचे अपयशही अटळ असेच आहे.
स्वातंत्र्याच्या नव्या वातावरणातल्या मैत्रीचा आधार परस्पर समजूत आणि परस्परांविषयीचा आदर हा असेल आणि दोघांच्या व्यक्तिमत्त्वातील प्रभाव ह्या संबंधाचे स्वरूप निश्चित करणारा असेल.