नैसर्गिक आणि रसायनमुक्त (chemical-free) म्हणजे चांगले असा एक सर्वसाधारण समज आहे. या शब्दांचा अर्थ काय याचा विचार मात्र क्वचितच केला जातो. साधारणतः कारखान्यात बनलेली उत्पादने वापरण्याऐवजी नैसर्गिकपणे अस्तित्वात असलेले साहित्य वापरून बनवलेले खाद्यपदार्थ/ जिन्नस म्हणजे नैसर्गिक किंवा रसायनमुक्त आणि म्हणून हेच चांगले असे मानले जाते. खरे तर दहावीपर्यंत शाळा शिकलेल्या कोणालाही हे लक्षात यावे की रसायनमुक्त असे काहीच असू शकत नाही, कारण सर्वच सजीव (प्राणी/ वनस्पती/ सूक्ष्मजीव) आणि निर्जीव वस्तू ह्या मुळात वेगवेगळ्या रसायनांपासूनच बनलेल्या असतात. या सर्वांमध्येच वेगवेगळी मूलतत्त्वे (chemical elements) म्हणजे ऑक्सिजन, कार्बन, नायट्रोजन, सिलिकॉन, सोडियम इत्यादी असतात. हे सर्व घटक भौतिकशास्त्रामधील वेगवेगळ्या नियमांप्रमाणे ठराविक पद्धतीने वागत असतात. म्हणजे रसायनमुक्त या शब्दाला काहीच अर्थ नाही. कारण रसायन नाही तर काहीच नाही! अर्थात आपल्या घोकंपट्टीवर आधारित शैक्षणिक पद्धतीमध्ये असा विचार करायला लावण्याची पद्धत नाही आणि मग धूर्त व्यापाऱ्यांना “नैसर्गिक”, “ऑरगॅनिक” या शब्दाचे भांडवल करून पाहिजे ते चढत्या भावाने विकता येते. सोयीसाठी या लेखामध्ये “रसायनयुक्त म्हणजे कारखान्यात बनलेले” आणि “रसायनमुक्त म्हणजे कारखान्यात न बनता नैसर्गिकपणे उपलब्ध असलेल्या पदार्थांपासून बनलेले” अशी व्याख्या करू या, व्याख्या थोडी चुकीची असली तरी!
मग आता सर्व रसायनयुक्त म्हणजे कारखान्यात बनलेले ते वाईट आणि सर्व रसायनमुक्त म्हणजे चांगले असा सरसकट नियम लावणे बरोबर आहे का? विशेष अभ्यास न करतादेखील यावर थोडासा विचार केला तर लक्षात येईल की हा समज काही बरोबर नाही. साधे उदाहरण घ्यायचे तर क्षयरोगाला कारणीभूत सूक्ष्मजीव हे पूर्णपणे नैसर्गिक असतात आणि त्याच्या उपचारासाठी कारखान्यात बनलेली प्रतिजैविके (antibiotics) म्हणजे रसायनयुक्त औषधे वापरली जातात. नैसर्गिक, पण आजार पसरवणारे सूक्ष्मजीव चांगले आणि प्रतिजैविके वाईट असे म्हणता येत नाही! मलेरियासारखे आजार पसरवणारे डाससुद्धा पूर्णपणे नैसर्गिक आणि म्हणून रसायनमुक्त असतात. पण डास चांगले आणि डास चावण्यापासून संरक्षण करणारे, मच्छरदाणी, वेगवेगळी मलमे किंवा औषधे हे प्रकार कारखान्यात बनलेले म्हणून वाईट असेही म्हणणे चुकीचे आहे! असेच पेट्रोलियमपासून कारखान्यात बनवलेल्या LPG या घरातील सिलिंडरमधील वायू वापरण्याऐवजी नैसर्गिक अशा लाकडाचा इंधन म्हणून उपयोग करून स्वयंपाक करणे प्रकृतीला किंवा निसर्गासाठीही चांगले आहे का? लाकडाच्या चुलीवरील जेवण चवीला वेगळे किंवा चांगले लागते असे मत असू शकते पण त्यामुळे स्वयंपाक करणारीला श्वसनाचे आजार होतात आणि प्रदूषण वाढते त्यामुळे ते थांबवले पाहिजे. म्हणजे पूर्णपणे नैसर्गिक उगम असलेले अनेक पदार्थ घातक असू शकतात. तसेच अनैसर्गिक असलेल्या अनेक वस्तू आज आपल्या आयुष्याचा अविभाज्य भाग आहेत. कारखान्यात बनलेले सर्वच चांगले असे इथे म्हणायचे नाही. प्रतिजैविकेसुद्धा प्रमाणापेक्षा जास्त घेतली तर रोग निर्माण करणाऱ्या सूक्ष्मजीवांबरोबर चांगले सूक्ष्मजीवसुद्धा मरून जातात आणि डासांपासून संरक्षण देणारी मलमे चोवीस तास, बारा महिने वापरली तर त्याचे परिणाम नक्कीच वाईट होतील. पण हाच नियम नैसर्गिक पदार्थांनाही लागू होतो आणि केला पाहिजे.
“नैसर्गिक” म्हणजे सुरक्षित हे समीकरण कसे चुकीचे आहे याचे एक उदाहरण म्हणजे दुधीभोपळ्याचा रस. दुधीचा रस पिणे प्रकृतीला चांगले असे पारंपरिक उपचारपद्धतीत समजले जाते. दुधीच्या रसाचे शरीरावर काय परिणाम होतात हे बघायला काय चाचण्या केल्या गेल्या आहेत, याची माहिती उपलब्ध नाही. नैसर्गिक म्हणून तो चांगलाच असणार असे समजले जाते. पण खराब दुधीचा रस पिऊन जिवावर बेतण्याचे प्रकारही घडले आहेत. म्हणजेच काही परिस्थितीमध्ये तरी, नैसर्गिक असूनही, दुधीच्या रसाचे जीवघेणे परिणाम होतात. कुठल्या प्रकारच्या दुधीचा रस प्यावा, रस कसा बनवावा, कोणी प्यावा आणि कोणी पिऊ नये, किती प्यावा आणि पिताना काय काळजी घ्यावी हे तज्ज्ञांनी, योग्य त्या चाचण्या करून ठरवले पाहिजे. तसेच त्याचे काय दुष्परिणाम आहेत याची माहिती देणे अत्यंत गरजेचे आहे. नैसर्गिक असो वा कारखान्यात बनलेले असो, दोन्हींमध्ये चांगल्या-वाईट गोष्टी असतात आणि नैसर्गिक चांगले आणि अनैसर्गिक वाईट अशी समीकरणे मांडण्याऐवजी सारासार विचार करून योग्य आणि अयोग्य काय हे ठरवले पाहिजे. मग एखादी वस्तू (खाद्यपदार्थ/ सौन्दर्य प्रसाधने/ औषधे/ इतर रसायने) चांगले किंवा वाईट कसे ठरवावे? इथे चांगले म्हणजे साधारणपणे आरोग्यासाठी चांगले किंवा आरोग्यावर विपरीत परिणाम न करणारे असे म्हणायचे आहे. कुठलेही रसायन ठरावीक पातळीपेक्षा जास्त प्रमाणात वापरले तर ते विषारी ठरू शकते. म्हणजे साखरही एका पातळीपुढे घातक ठरते. याउलट अफूसारख्या व्यसन लावणाऱ्या पदार्थापासूनसुद्धा मॉर्फिनसारखे अत्यंत उपयोगी वेदनाशामक औषध बनते. एखादे रसायन कुठल्या प्रमाणात घातक अथवा विषारी असते हे त्या क्षेत्रातील तज्ज्ञांनी ठरवणे आवश्यक आहे. भारतामध्ये Food Safety and Standards Authority of India (FSSAI) द्वारा कुठल्या खाद्यपदार्थांमध्ये विशिष्ट रसायनाची पातळी किती असावी हे ठरवले जाते, जसे अन्नपदार्थातील कीटकनाशकांचे प्रमाण. नैसर्गिक विरुद्ध अनैसर्गिक चर्चेमध्ये कीटकनाशकांचा नेहेमीच उल्लेख केला जातो. कीटकनाशके आजच्या जीवनाचा अविभाज्य भाग आहेत आणि त्यांचे शरीरावर अनेक वाईट परिणाम होतात हे खरेच आहे. मात्र ती किती प्रमाणात पोटात गेल्यावर त्याचे वाईट परिणाम होतात याची मापके असतात. एका ठरलेल्या प्रमाणापर्यंत त्यांचा वाईट परिणाम होत नाही पण त्या पातळीपुढे मात्र त्यांचा शरीरावर वाईट परिणाम होऊ शकतो. FSSAI द्वारा देशभरातील धान्यांमध्ये आणि भाज्यांमधे कीटकनाशकाचे प्रमाण किती आहे हे तपासले जाते. प्रत्येक कीटकनाशकाची FSSAI द्वारा ठरवलेली एक पातळी असते ज्याला Maximum Residue Limit (MRL) म्हणतात. जर खाद्यपदार्थांमधील कीटकनाशकांची पातळी MRL पेक्षा कमी असेल तर ते खाद्यपदार्थ खाण्यासाठी सुरक्षित समजले जातात. म्हणजेच कीटकनाशकांवर बंदी आणणे गरजेचे नसून त्यांचा योग्य त्या प्रमाणातच वापर होणे महत्त्वाचे आहे. तसेच कीटकनाशकांची नवीन माहिती उपलब्ध होत जाईल तसे ही मापके बदलणेसुद्धा अत्यंत महत्त्वाचे आहे. खरी अडचण हे असलेले नियम राबवण्याची आहे, कीटकनाशकांवर बंदी घालणे हा यावरील उपाय नाही. कीटकनाशके वापरणे बंद केले तर कीड लागलेले धान्य आपण खाणार का याचा आणि शेतीच्या उत्पादकतेवर होणाऱ्या परिणामांचा विचार करावा लागेल. शिवाय धान्य पिकण्याच्या आधी कीड लागून रोपे मेली तर शेतकऱ्याला नुकसानभरपाई कोण देणार याचा विचार करायला पाहिजे. यावर नक्कीच असे उत्तर मिळेल की “नैसर्गिक” कीटकनाशके (जसे कडुनिंबापासून बनवलेली कीटकनाशके) वापरावीत, त्यामुळे काहीही वाईट परिणाम होत नाहीत. पण खरे तर अशी नैसर्गिक कीटकनाशके सुरक्षित आहेत की नाहीत याची कोणी चाचणीच केलेली नसते आणि “नैसर्गिक ते सुरक्षित” या समीकरणावर ते आधारित असते. वर लिहिल्याप्रमाणे नैसर्गिक असो वा अनैसर्गिक, कुठलेही रसायन ठराविक प्रमाणानंतर विषारी किंवा घातक ठरू शकते. जर नैसर्गिक कीटकनाशकामुळे किडे मरतात तर मोठ्या मात्रेमध्ये नैसर्गिक कीटकनाशक वापरले तर माणसालाही त्रास होण्याची शक्यता आहेच! असा त्रास होऊ शकतो का आणि नैसर्गिक कीटकनाशक किती प्रमाणात वापरणे योग्य आहे हे ठरवण्यासाठी योग्य त्या चाचण्या केल्या गेल्या पाहिजेत. अश्या चाचण्या केल्या नसतील तर नैसर्गिक कीटकनाशकामुळे काहीही त्रास होत नाही असे म्हणणे चुकीचे आहे.
एखादे रसायन किती प्रमाणात विषारी आहे हे तज्ज्ञ कसे ठरवतात? कीटकनाशकाचेच उदाहरण घेऊन हे पाहता येईल. ज्या प्रमाणात हे कीटकनाशक किडे मारण्यासाठी फवारले जाईल त्या प्रमाणातील कीटकनाशक वापरून प्रयोगशाळेत चाचण्या केल्या जातात. प्रयोगशाळेतील पेशींवर हे रसायन घालून त्याचा पेशींची वाढ, जैवरासायनिक प्रक्रिया आणि जनुकांवरील (DNA) परिणाम तपासले जातात. वाईट परिणाम दिसून आले तर रसायन वापरायला परवानगी मिळत नाही. जर वाईट परिणाम दिसले नाहीत तर हेच प्रयोग मग उंदीर अथवा सशासारख्या प्राण्यांवर केले जातात. या प्राण्यांमध्येही काही वाईट परिणाम दिसले नाहीत तर हे रसायन वापरायला परवानगी मिळते. अर्थात सर्व माहिती ताबडतोब मिळत नाही. जर अनेक वर्षांच्या वापरानंतरच कीटकनाशकाचा काही वाईट परिणाम दिसत असेल तर हे प्रयोग अनेक वर्षे केल्यानंतरच ही माहिती मिळेल. त्यामुळे सुरुवातीला मुख्यतः अल्पकालीन परिणाम बघितले जातात. कीटकनाशके बाजारात उपलब्ध झाल्यानंतरही हे प्रयोग चालू असतात आणि दीर्घकालीन परिणामांची तपासणी केली जाते. दीर्घकाल वापरानंतर काही वाईट परिणाम दिसून आले तर त्या कीटकनाशकावर बंदी येऊ शकते किंवा ते कमी प्रमाणात वापरायला सांगण्यात येते. एन्डोसलफान आणि डीडीटी या कीटकनाशकांवर अशीच दीर्घकालानंतर परिणाम दिसल्यावर बंदी घालण्यात आली. ही परिस्थिती आदर्श नक्कीच नाही कारण वाईट परिणाम दिसून येईपर्यंत अनेक प्रकारचे नुकसान होऊ शकते. तसेच या सर्व चाचण्या केल्या आहेत की नाहीत, सर्व नियम पाळले जात आहेत की नाहीत हे त्या त्या भागात कायद्याची अंमलबजावणी कशी होते यावर अवलंबून असते. पण याला सध्यातरी पर्याय नाही. निदान अनैसर्गिक समजल्या जाणाऱ्या रसायनांच्या सुरक्षेसंबंधी काही चाचण्या तरी झालेल्या असतात आणि या चाचण्या अनेक वर्षे चालू राहतात.
“नैसर्गिक” उत्पादनांच्या मात्र काहीच चाचण्या झालेल्या नसतात किंवा अपुऱ्या चाचण्या केल्या जातात. त्यांचे काय चांगले किंवा वाईट परिणाम होतात याची प्रयोगशाळेत पद्धतशीर चाचणी बहुतांश वेळा झालेली नसते किंवा ती अर्धवट झालेली असते. त्यामुळे दुधीच्या रसाप्रमाणेच या नैसर्गिक रसायनांचा काही वाईट परिणाम होतो का हेच कळत नाही. पण अशा चाचण्या योग्य त्या पद्धतीने केल्या की पारंपरिक औषधांमधून किती उत्तम औषधे तयार होऊ शकतात याचे चांगले उदाहरण आहे आर्टेमायसिन (Artemisin) हे मलेरियावरील औषध. टू युयु या चीनी संशोधिकेने पारंपरिक चीनी जडीबूटीमधून हे औषध शोधून काढले. पारंपरिक चीनी औषधांमधील साधारण २००० वनस्पतींचा त्यांनी अभ्यास केला. या वनस्पतींचे वेगवेगळ्याप्रकारे अर्क काढून, त्यांचा अभ्यास करून शेवटी sweet wormwood या औषधी वनस्पतीमध्ये त्यांना आर्टेमायसिन हे मलेरियावरील औषध सापडले. उपचारासाठी हे औषध वापरण्यापूर्वी टू युयु यांनी अनेक वर्षे आधुनिक विज्ञानातील चाचण्या वापरून संशोधन केले. ह्या रसायनाची सुरक्षितता आणि मलेरियाच्या उपचारासाठी त्याचा प्रभावीपणा तपासण्यासाठी प्राण्यांमध्ये आणि माणसांमध्ये चाचण्या केल्या. हा अभ्यास त्यांनी १९६९ मध्ये सुरू केला, १९८१ मध्ये सर्वप्रथम हा अभ्यास वैज्ञानिकांपुढे मांडला आणि २००५ मध्ये World Health Organization (WHO) तर्फे आर्टेमायसिन असलेल्या औषधाची मलेरियाच्या उपचारासाठी शिफारस केली गेली. म्हणजेच पारंपरिक औषधांपासून किंवा नैसर्गिक जडीबूटीपासून एका गोळीच्या स्वरूपात असलेले औषध तयार करून ते सर्वमान्य व्हायला साधारण ३५-४० वर्षे जावी लागली. आज आर्टेमायसिन हे मलेरियावरील अत्यंत प्रभावी औषध समजले जाते. या संशोधनासाठी टू युयु यांना २०१५ मध्ये नोबेल पुरस्कार मिळाला. भारतातील अनेक पारंपारिक औषधांचा असाच बारकाईने अभ्यास करणे आवश्यक आहे. असा अभ्यास होईपर्यंत या औषधांची सुरक्षितता आणि प्रभावीपणा यावर शंका उपस्थित केली तर त्यात काहीच चुकीचे नाही!
आजकाल “हे नक्की वाचा आणि पुढे पाठवा” या अर्थाचे अनेक संदेश WhatsApp, Facebook अशा समाजमाध्यमांवर वाचायला मिळतात. यात लिंबामुळे किंवा जीवनसत्त्वामुळे कर्करोग कसा बरा होतो, अमुक जातीच्या गायीच्या दुधाचे कसे वाईट परिणाम होतात किंवा “संपूर्णपणे नैसर्गिक” (आणि म्हणून सुरक्षित) असा हा साबण वापरा असे अनेक लेख सररास दिसतात. यावर विश्वास ठेवण्याआधी वरील माहितीचा जरूर विचार करा. अशी विधाने करण्यापूर्वी काय चाचणी केली आहे? आणि चाचणी केली असेल तर त्यातून काय माहिती मिळाली? याची माहिती घ्यायचा प्रयत्न करा. तुम्ही इंटरनेट वापरत असाल तर विश्वसनीय संकेतस्थळांवरून त्याबद्दल माहिती घ्या. ही माहिती नेहेमी मिळेलच असे नाही पण प्रयत्न आणि विचार जरूर करा. तसेच नैसर्गिक आणि अनैसर्गिक उत्पादन (जसे नैसर्गिक/ हर्बल टूथपेस्ट आणि इतर टूथपेस्ट) यांच्यातील घटकपदार्थ तपासूनसुद्धा तुम्हांला बरीच माहिती मिळू शकते. माझ्या अनुभवात या दोन्ही प्रकारच्या उत्पादनांच्या घटक पदार्थांमध्ये फार फरक नसतो! बहुतेकवेळी आपले दहावीपर्यंतचे विज्ञानातील शिक्षण यासाठी पुरते. उदाहरणार्थ, आजकाल गोमूत्र असलेली उत्पादने बाजारात मिळतात. या उत्पादनांमधील घटक वाचले तर दिसते की त्यात cow urine distillate आहे. अर्थात, यात गोमूत्राचे Distillation म्हणजे ऊर्ध्वपातन करून जे distillate मिळते ते घातले आहे. ऊर्ध्वपातन या क्रियेत एखादे द्रव्य तापवले जाते आणि त्यातून निघणारी वाफ परत गार करून त्यापासून शुद्ध द्रव्य मिळवले जाते. या शुद्ध केलेल्या द्रव्याला distillate असे म्हणतात. ही क्रिया मुख्यतः द्रव्यात मिसळलेल्या घन पदार्थांपासून द्रव्य वेगळे करण्यासाठी किंवा वेगवेगळ्या तापमानाला बाष्पीभवन होणाऱ्या द्रव्याचे मिश्रण असल्यास द्रव्ये एकमेकांपासून वेगळी करण्यासाठी वापरतात. सातवी-आठवीपर्यंत शाळेत शिकलेल्या प्रत्येकाला या प्रक्रियेबद्दल माहिती असते. गोमूत्राचे (किंवा कुठल्याही प्राण्याच्या मूत्राचे) ऊर्ध्वपातन केले तर काय होईल? तर distillate मध्ये फक्त पाणीच मिळेल! कारण कुठल्याही प्राण्याच्या मूत्रामध्ये पाण्याशिवाय वेगळ्या तापमानाला बाष्पीभवन होणारे इतर कोणते द्रव्य असल्याचे अजून तरी सिद्ध झालेले नाही. मग पाणी घालून बनवलेल्या उत्पादनात विशेष काय आहे हा प्रश्न पडतो!! आता इथे वापरलेला distillate हा शब्द चुकीचा आहे की लोकांच्या पारंपरिक विचारांचा फायदा घेऊन उत्पादने विकण्याचा हा प्रकार आहे हे ज्याने त्याने आपापले ठरवावे!
गैरसमजामुळे किंवा अपुऱ्या/ खोट्या माहितीमुळे कोणाची फसवणूक होऊ नये आणि कोणाचे नुकसानही होऊ नये हा या लेखामागचा उद्देश आहे. खरे तर नैसर्गिक असो व कारखान्यात बनलेले असो, सर्व उत्पादनांचे प्रमाणीकरण करणे, त्यासंबंधित निरनिराळे नियम तयार करून ते लागू करणे हे सरकारचे काम आहे. हे योग्यरीत्या कधी होईल हे सांगता येत नाही. पण अपुरी किंवा चुकीची माहिती देऊन उत्पादनांचा खप वाढवणाऱ्या जाहिरातींना बळी न पडणे आपल्या हातात आहे. विचारपूर्वक निर्णय घ्यायची गरज आहे. घोकंपट्टी करत झालेल्या आपल्या शिक्षणात प्रश्न विचारायला सहसा प्रोत्साहन मिळत नाही आणि लहानपणापासून आपण असे शिकतही नाही. ते मागे ठेवून, घेतलेल्या शिक्षणाचा वापर करून विचारपूर्वक निर्णय घेणेच योग्य आहे!
पूर्वप्रकाशित : प्रेरक ललकारी, फेब्रुवारी २०१७