गेल्या काही दिवसातील वेगाने घडलेल्या घटना बघून लहानपणापासून सिनेमाच्या पडद्यावर बघितलेले काश्मीर सारखे आठवते आहे. प्रोफेसर, काश्मीर की कली, जंगली अशा लहानपणी बघितलेल्या अनेक हिंदी सिनेमांच्या आणि त्यातील काश्मीरच्या निसर्ग सौंदर्याच्या, सुरेल गाण्यांच्या पार्श्वभूमीवर चित्रित केलेल्या दृश्यांच्या आणि इतर अनेक प्रसंगांच्या आठवणी जाग्या झाल्या. त्याकाळी काश्मीरमधल्या मुली मुस्लिम आहेत की हिंदू असा विचार चुकूनही मनात येत नसे. ते काश्मीर आपले वाटत असे… आता भारताने आपल्याच हाताने ते दूर लोटले असल्यासारखे वाटते आहे….
सिनेमातल्या काश्मीरशी माझी प्रत्यक्ष ओळख झाली ती १९८५साली. १९७०च्या दशकात भारत सरकारच्या एका उपक्रमांतर्गत श्रीनगरजवळ एका विस्तृत परिसरात भौत्तिकशास्त्र संशोधन संस्थेची मोठी इमारत बांधलेली होती. त्या संस्थेच्या विस्तारासाठी नियोजन करायचे होते. तेव्हा नवीन इमारतीची वास्तुरचना करण्याचे काम माझ्यावर सोपवले होते. ती जागा, तेथील इमारत, तेथील संशोधकांच्या नवीन उपक्रमांसाठी आवश्यक असलेल्या गरजा जाणून घेण्यासाठी मला काश्मीरला भेट द्यायची होती. श्रीनगरप्रमाणेच गुलमर्ग येथेही एक संशोधन केंद्र होते आणि तेथील आवारातही काही नवीन इमारतींची आखणी करायची होती. काश्मीरच्या अतिशय रम्य परिसरात, निसर्गाच्या कुशीत घडलेल्या वेगळ्याच बांधकामशैलीच्या इमारती बाघायला मिळणार होत्या. बर्फाच्या प्रदेशातील वास्तुरचनेची नवीन तंत्रे जाणून घ्यायची ती मोठीच संधी होती. माझी काश्मीरची ती पहिलीच भेट होती. श्रीनगर, गुलमर्ग, दाल सरोवर, चार-चिनार, शिवाय तेथील राजेशाही उद्याने अशी पर्यटकांना आकर्षित करणारी ठिकाणे बघण्यासाठी तेव्हा वेळ मिळणार नसला तरी शहराची, प्रदेशाची आणि लोकांची तोंडओळख करून घेण्याची ती मोठी आणि वेगळीच संधी होती. अभ्यास करून श्रीनगरमध्ये वेगळ्या प्रकारची वास्तुरचना करायला मिळणार ह्याचाही आनंद होता. सर्व प्रवास एकटीने करायचा होता. कामाच्या निमित्ताने का होईना पृथ्वीवरचे नंदनवन थोडेसे तरी बघायला, अनुभवायला मिळणार म्हणून मन अगदी हरखून गेले होते.
केंद्रसरकारच्या उपक्रमात मी अधिकारी पदावर असले तरी विमानाने प्रवास करण्याइतका माझा अधिकार मोठा नव्हता. त्यामुळे मुंबईहून झेलम एक्स्प्रेसने जम्मू, जम्मू ते श्रीनगर बसचा प्रवास, तेथे ६ दिवसाचे काम आणि मग त्याच प्रकारे बस, ट्रेन मार्गे परतीचा प्रवास एकटीने करायचा होता. मुख्य वास्तुतज्ज्ञ, अभियंता आणि इतर अधिकारी विमानाने येणार होते. श्रीनगरमध्ये शासकीय विश्रामगृह असल्याने तेथे राहण्याचा प्रश्न नव्हता. आणि जम्मूला एका काश्मिरी मैत्रिणीच्या मामांकडे, श्री. भान यांच्याकडे जाता येता दोन रात्री राहण्याची व्यवस्था झाली होती. श्रीनगरमधील विद्यापीठामध्ये प्राध्यापक असलेल्या तिच्याच धाकट्या मामांना त्यांच्या श्रीनगरच्या घरी भेटायचे ठरले म्हणून मी एक दिवस आधीच पोहोचले. तेव्हाचे काश्मीर अतिशय शांत होते, सुंदर होते, सुरक्षित होते. लाल चौकात बस पकडून स्थानिक बसने केलेल्या प्रवासातील काश्मिरी लोकांचे हसरे चेहरे, धारदार नाके आणि मैत्रीपूर्ण संवाद आजही आठवतात. काश्मिरी पदार्थांच्या घरगुती जेवणाच्या आणि गेस्टहाउसमधील ‘सुभाना’ ह्या खानसाम्याच्या हातच्या काश्मिरी मांसाहारी जेवणाच्या आठवणीने आजही तोंडाला पाणी सुटते.
तेव्हा ९ वर्षाच्या लेकाला पहिल्यांदाच घरी ठेवून १० दिवसाचा दौरा केला तेव्हा हुरहूर होती तरी काळजी नव्हती. कामही मनासारखे झाल्याने खूप समाधान मिळाले. गुलमर्गला उंच डोंगरावर चढून संशोधन केंद्रासाठी नैसर्गिक झऱ्याच्या पाण्याचा शोध घेण्यात तर खूपच मजा आली. त्यानंतर अजून एकदा कामासाठी काश्मीरला जाण्याची संधी मिळाली आणि दरवर्षी तेथे जायचे स्वप्न पडू लागले. पहिल्याच भेटीने काश्मीरबद्दलचे प्रेम आणि आकर्षण इतके निर्माण झाले की त्यानंतरच्या वर्षी एकदा यूथ होस्टेलच्या लोकांसोबत लेह लडाखला ट्रेक केला आणि एकदा आई आणि मुलासोबत काश्मीरची पर्यटन सहल केली.
मात्र पुढे दोन-तीन वर्षात काश्मीर अस्वस्थ होत गेले. मी तयार केलेल्या इमारतींचे आराखडे मंजूर होऊन त्याच्या बांधकामाच्या निविदाही निघाल्या. ….पण ते बांधकाम काही सुरू झाले नाही. उलट तेथील अस्थिर परिस्थितीमुळे संशोधन संस्थाच बंद करावी लागली. अधिकारी, संशोधक, कर्मचारी अशा सर्वांना मुंबईला आणले गेले.
गेल्या काही दिवसातील काश्मीरमधील वेगाने घडलेल्या घटना बघून पुन्हा एकदा ३५ वर्षांपूर्वीच्या त्या आठवणी जाग्या झाल्या आणि मनात भावनांचा नुसता कल्लोळ उडाला. मधल्या काळात काश्मीरमध्ये अस्वस्थता निर्माण झाल्यावर भानमामांचे कुटुंब श्रीनगर सोडून दिल्लीला आले होते. त्यांचा एक मुलगा शिक्षणासाठी मुंबईला येऊन राहिला. त्यांचे मी पाहिलेले श्रीनगरमधील सुंदर, नवीन बांधलेले, लाकडी बांधकामाचे घर अतिरेकी लोकांनी जाळल्याचे कळले. त्या धक्क्याने मामांचा मृत्यू झाला. आता ते कुटुंब दिल्लीत स्थायिक आहे. स्थलांतरित जीवनाशी नाईलाजाने त्यांनी जुळवून घेतले आहे. पण काश्मीरच्या आठवणींनी त्यांचे मन व्याकूळ आहे. राग, दु:ख ह्यात होरपळून निघाले आहे.
त्यांच्या आठवणींनी मीही भावनांच्या लाटांचा अनुभव घेत आहे. काश्मीरमधील घटनांनी त्यांना काहीसा आनंद झाला आहे. पण तो काही निखळ नाही. एक मोठी विषण्णता आहे. काश्मीरच्या सारिपाटावर झालेल्या नव्या राजकीय खेळीने मागील अपुरा आयुष्याचा डाव नव्याने सुरू करता येईल, परत जाता येईल, घर उभारता येईल याची फारशी आशा त्यांना नाही. पस्तीस वर्षांनी मामांच्या मुलांना पुन्हा तेथे जाऊन नव्याने जीवन सुरू करणे अशक्य नसले तरी खूप अवघड आहे. परत काश्मीरला जायचे त्यांचे स्वप्न जरी त्यांनी उराशी बाळगले होते तरी आज ज्या प्रकारे भारतीय लोकसभेने काश्मीरचा प्रश्न संपविला असल्याचे चित्र निर्माण केले आहे त्यामुळे ते स्वप्न प्रत्यक्षात येईल याची त्यांनाच काय इतारांनाही खात्री नाही. येणारा काळ काश्मीरसाठी नक्कीच अधिक आह्वाने आणि संकटांनी भरलेला असेल ह्याची धास्ती वाढली आहे. अनेक काश्मिरी पंडितांची आणि माझ्यासारख्या अनेक शांतीप्रिय, संवादप्रिय आणि सहिष्णू तसेच उदारमतवादी भारतीय लोकांची मनेही राग, दु:ख आणि काळजी अशा आवर्तनांतून जात आहेत.
प्रचलित सरकारने ज्या पद्धतीने भारताच्या लोकशाही परंपरांना आणि स्वप्नांना बेदरकारपणे झुगारून काश्मीरमध्ये अभूतपूर्व परिस्थिती लादली तेव्हा त्याचा मला तर क्षणभरही आनंद झाला नाही. माझ्या मैत्रिणीच्या कुटुंबाचे, तसेच अनेक काश्मिरी पंडितांचे गेल्या काही वर्षातील दु:ख आणि वेदनांनी भरलेले आयुष्य बघूनही पंतप्रधान मोदी आणि अमित शहा ह्यांच्या कुटिल नीतीने आखलेल्या, काश्मीर पादाक्रांत करण्याच्या आविर्भावाचा किंचितही आनंद झाला नाही. त्या दिवशी भारतातील असंख्य लोकांना, जवळच्या नातेवाईकांना झालेला उन्मादी आनंद मला समजूच शकला नाही. आजही समजत नाही. कसला आनंद झाला होता त्यांना? कसला आणि कोणत्या पराक्रमाचा जल्लोष करत होते ते सर्व लोक? त्यात त्यांचा काय पराक्रम होता? केवळ त्यांनी निवडून दिलेल्या सत्ताधारी लोकांनी कोणाचा तरी, अनामिक शत्रूचा सूड प्रत्यक्ष काश्मीरमध्ये राहणाऱ्या आपल्याच देशातील नागरिकांवर उगवला याचा? तेथल्या हजारो राजकीय नेत्यांना नजरकैदेत टाकले त्याचा? लोकांना घराबाहेर पडणे मुश्किल केले त्याचा? विद्यार्थी मुला-मुलींचे शैक्षणिक नुकसान होत आहे त्याचा? हजारो सैनिकांच्या आणि पोलिसांच्या नजरेखाली आपल्याच नागरिकांत दहशत माजवण्याच्या कृत्याचा? फोन, मोबाईल. टीव्ही, इंटरनेट अशा सर्व संपर्कसाधनांपासून लोकांना वंचित ठेवल्याचा? कुटुंबीयांचा हालहवालही कळू न शकणाऱ्या, काश्मीर बाहेर राहणाऱ्या नागरिकांना काळजीत लोटल्याचा?
माझे मन मात्र काश्मीरमधील कारवाईच्या रागाने व्यापून गेले होते. घडणाऱ्या घटनांनी मी अतिशय अस्वस्थ झाले होते. आज महिना उलटून गेला आहे. काश्मीरमधील बातम्या मुख्य प्रसारमाध्यमातून गायब झाल्या आहेत. काही माध्यमांमध्ये मिळणाऱ्या बातम्या काही आनंदाची वार्ता देत नाहीत. त्या दिवसाच्या रागाची, हताशपणाची आणि क्रोधाची भावना काहीशी ओसरली आहे, नव्हे जाणीवपूर्वक ती भावना आता दूरस्थपणे बघते आहे. रोजची कामे करते आहे. मात्र रागाची जागा आता अनामिक दु:ख आणि काळजीने घेतली आहे. काश्मीरच्या भान कुटुंबाचे दु:ख, राग मी जवळून बघितले आहेत. आता तीच भावना समस्त काश्मिरी लोकांची नसेल का? तेथील लोकांचा राग वाढत जाईल ह्यात मला तिळमात्र शंका नाही. हे दु:ख आहे आणि काळजी सर्वच काश्मिरी लोकांबद्दल आहे. काश्मीरच्या आणि भारताच्याही भविष्याबद्दल आहे. अर्थात मी दु:ख किंवा काळजी करून वास्तव आणि भविष्य बदलणार नाही हे खरे असले तरी त्या भावना आता दूर होणे अवघड आहे.
आपल्याला कोणी फसविले, वचन देऊन ते मोडले, प्रतारणा केली की जी भावनांची आवर्तने येतात तीच मी अनुभवते आहे. सुरुवातीला येतो तो प्रचंड राग आणि काही करू शकत नाही ह्याचे हताशपण. लाखो सामान्य लोकांचे पैसे आणि आयुष्यभराची कमाई घेऊन पसार होणारे ठग समाजात असतात. फसवले गेलेल्यांना राग येणे सहाजिक असते. सार्वजनिक बँकांना बुडवून मल्ल्या आणि नीरव मोदी-चोकसी कायदे-करार मोडून देशाबाहेर पळून जातात तेव्हा भारतीय देशाचे नागरिक म्हणून आपल्याला राग येतो. पण मग त्यांच्याच बाबतीत गाफील राहिलेले किंवा कदाचित त्यांना पळून जायला मदत करणारे सरकार जेव्हा काश्मीरच्या राजाने काही दशकांपूर्वी, त्याच्या बहुसंख्य नागरिकांच्या सहमतीने भारतावर विश्वास टाकून केलेला करार मोडते तेव्हा काश्मिरी नागरिकांना राग आला तर त्यांची काय चूक? त्यातून भारत लोकशाही राष्ट्र असल्याने आपल्याला तेथे अधिक स्वातंत्र्य आणि शांतता मिळेल आणि आपले स्वतंत्र अस्तित्व टिकून राहील ह्या विश्वासाने काश्मीरच्या राजाने भारताबरोबर केलेला करार आपल्या सरकारने मोडला आहे तेव्हा आपण आनंदी कसे काय होऊ शकतो? त्यातून राज्यघटनेची खिल्ली उडवून, काश्मीरमध्ये प्रचंड लष्कर आणि निमलष्करी सैन्य घुसवून तेथे लोकांना घराबाहेर पडणे मुश्किल झाले असताना कोणाही काश्मिरी नागरिकाला आनंद होईल हे कसे शक्य आहे? आपल्या दसरा-दिवाळी आणि गणपती सणांवर बंदी घातली तर आपल्या बहुसंख्य लोकांना काय वाटेल? काश्मिरी लोकांनी ईदच्या दिवशी काय अनुभवले असेल? समजा काही काश्मिरी पंडितांना सरकारच्या तथाकथित धाडसी कृत्याचा आनंद झाला असला तरी ते अशा सैनिकी पहाऱ्यात बंदिस्त झालेल्या, संपर्कसाधने हिरावून घेतलेल्या प्रदेशात निर्धास्तपणे परत जाऊ शकतील का? समजा मी काश्मिरी नागरिक असते, माझ्या मुलाबाळांची, आणि पुढील पिढ्यांची स्वप्ने बघणारी आई असते, माझ्या मुलांचे बालपण हिरावून घेतले गेले असते तर मला सैनिकांचा आणि त्यांना पाठविणाऱ्या नेत्यांचा राग आला नसता का? त्रास नसता का झाला? म्हणूनच करार मोडणारे, घटनेची खिल्ली उडविणारे, लोकशाहीचे कोणतेच संकेत न पाळणारे हे सरकार आणि त्यांची कृत्ये मला आनंद देऊ शकत नाहीत. समाधान तर नाहीच नाही.
भारताने काश्मीरच्या राजाबरोबर केलेल्या करारानुसार लोकांची मते पूर्वीच आजमावली असती तर कदाचित तेव्हा त्यांनी राजाच्या मताशी सहमती दर्शवीत भारतामध्ये राहण्यासाठी आनंदाने सहमती दिली असती. किंवा समजा दिली नसती तरी भारताला त्यांचे स्वातंत्र्य मान्य करून मैत्रीपूर्ण संबंध ठेवता आले असते. उत्तर सीमेवर नेपाळसारखे स्वतंत्र राष्ट्र असते तर तो त्यांचा निर्णय असता. लादलेला नाही. त्यामुळे काश्मीरशी भारताने केलेला करार दोनदा मोडला अशी जर आता तेथील बहुसंख्य नागरिकांची धारणा झाली असेल तर त्याला भारतच जबाबदार नाही का? अशा प्रतारणा करणाऱ्या भारताशी तेथील लोक कसे काय सहकार्य करतील? यापुढे तर हवे तसे कायदे करून आणि मोडून तेथील जमिनी हडप केल्या जाणार असतील आणि लोकांवर सतत लष्कराचा पहारा असेल तर त्यांचे सहकार्य कसे काय मिळेल? आणि तेथे विकास तरी कसा होईल? देशा-प्रदेशाचा विकास म्हणजे काय फक्त स्थावर मालमत्ता असते? उंच इमारती आणि लाखो मोटारी म्हणजे विकास? कुलू-मनालीसारखा सुंदर नैसर्गिक प्रदेश बेदरकार पर्यटकांनी नष्ट केलाच आहे. तेच आता काश्मीरमध्ये झाले तर ते नंदनवन तरी राहील का? उत्तुंग इमारती, झोपडपट्ट्या आणि लाखो मोटारींनी ग्रासलेले जनजीवन हे आज मुंबई, दिल्ली, कोलकाता, बंगलोर, चेन्नई येथील विकासाचे प्रारूप जर खरोखर यशस्वी असते तर तेथील बहुसंख्य नागरिक सुखी आणि समाधानी दिसले असते. दुर्देवाने कोठेही समाधान देणारा विकास झाला आहे असे सामान्य लोकांना आजही अनुभवाला येत नसताना पोलीसांच्या आणि लष्कराच्या टाचेखाली जीवन जगण्याची पाळी आलेल्या काश्मिरी लोकांना अशा विकासाचा भयंकर अनुभव येण्याची शक्यता तर हजारो पट वाढली आहे.
त्यामुळेच आता रागापाठोपाठ मला दु:ख आणि काळजी वाटते आहे. केवळ काश्मिरी लोकांचीच नाही तर संपूर्ण भारतातील सामान्य लोकांची. आधीच आपला बहुसंख्य समाज केवळ क्षणिक किंवा तत्कालीन आनंदासाठी जगणारा आहे. निव्वळ दिखाऊ लग्नासाठी कोट्यावधी रुपये खर्चून, कर्ज काढून आपल्या मुलींना त्यांच्या मनाविरोधात सासरी पाठविण्यात आनंद मानणारा आहे. मुलीचे दु:ख, तिचा आनंद, तिचे मत यांना तर तो काडीचीही किंमत देत नाही. तरीही आपण बहुमताला बाजूला सारून आधुनिक भारतामध्ये घटनेने मुलींना आणि स्त्रियांना दिलेले स्वातंत्र्याचे अधिकार मोठ्या अभिमानाने मिरवतो. त्यावेळी मुलींचा बळी घेणारा बहुसंख्य अशिक्षित समाज चुकीचा आणि मागास आहे असे अनेक सुशिक्षित लोक मानतात. दूरगामी सुखाचा तो मार्ग नसतो असे आता अधिक प्रमाणात लोक मानत असले तरी त्यांचे बहुमत आहे म्हणून ते योग्य मानले जात नाही.
मात्र काश्मीरच्या बाबतीत बहुसंख्यांकांच्या मताच्या जोरावर पंतप्रधानांनी केलेली घटनेची पायमल्ली अनेक सुशिक्षित लोकांना न्याय्य वाटते तेव्हा त्याचे मला आश्चर्य वाटते. आपल्या देशामध्ये लोकांच्या माताधिक्यापेक्षा घटना जास्त पवित्र आणि न्याय्य मानलेली आहे. संवाद, चर्चा आणि साधकबाधक विचार करून सहमती बनवता येते हा विश्वास देणारी आपली राज्यघटना आहे. विविधतेमधील एकता राखण्यासाठी घटना आहे. बहुमताने केलेला निर्णय अन्यायकारक नसतोच असे अजिबात नाही. परंतु राज्यघटनेवर माझा विश्वास आहे. दिलेला शब्द पाळणे ही नीती मी मानते. कपट-कारस्थाने आणि कुरघोडीचे डावपेच मानवाच्या भूतकाळात शोभतात. एकविसाव्या शतकाशी, आधुनिक काळाशी ते अजिबात सुसंगत नाहीत.
राजकारणात तत्कालीन यश मिळाल्याचा उन्माद बहुसंख्य नेते आणि लोकांना आज झालेला दिसतो. नोटबंदीच्या निर्णयाचा आनंद किती आणि कसा क्षणभंगुर होता हे तो आनंद घेतलेल्या लोकांना आज आठवतही नसेल. पण काश्मीरची कारवाई तेथील नागरिक खूप काळ विसणार नाहीत. दूरगामी शांतता राखून देशाचा विकास होईल याची आशा मात्र आता खूप दूर गेली आहे. काश्मीरच्या बाबतीत शासनाने केलेली कारवाई भले बहुसंख्य लोकांना कितीही न्याय्य वाटत असली, तरी लोकशाही भारताच्या भविष्याचे स्वप्न पाहून गांधीजींच्या नेतृत्वाखाली लढलेल्या, तुरुंगवास भोगलेल्या आणि इंदिरा गांधींनी लादलेल्या आणीबाणीच्या विरोधात लोकशाही प्रस्थापित करण्यासाठी लढलेल्या माझ्या वडिलांच्या आणि त्यांच्यासारख्या असंख्य स्वातंत्र्य सैनिकांच्या वारसांना आजची काश्मीरमधील अघोषित आणीबाणी मान्य नाही. काश्मीरमधील कारवाईने भविष्याबद्दल आशा वाटणे अशक्य आहे. गेल्या पाच वर्षांपासून वाटणारी ‘म्हातारी मेल्याचे दु:ख नाही पण काळ सोकावत असल्याची’ भावना काश्मीरमधील लष्करी बळाच्या जोरावर केलेल्या कारवाईने अधिकच तीव्र झाली आहे.
Brilliant
प्रिय सुलक्षणा जी,
स.न.
खूपच आत्मीयतेने आपण लेख लिहिला आहे. भूतकाळातली निरभ्र आठवण सांगताना, तुम्ही विद्यमान सरकारच्या विद्वेषी धोरणांमुळे व्यक्त केलेली वर्तमानातली चिंता अस्वस्थ करणारी आहे. आज या चिंतेने असंख्य संवेदनशील मनांना डंख मारला आहे. तुमचे अनुमान, तुमची शंका आणि तुमच्या मनातला संशय, सध्याचा सत्तेचा उन्माद पाहता रास्तच आहे.
लेखाच्या शेवटी, तुम्ही आणीबाणीची आठवण काढली आहे, त्याप्रसंगी सरकारविरोधात आवाज उठवणाऱ्यांना आजचे काश्मिरचे वास्तव मान्य नाही, असेही म्हटले आहे, ते पटण्यासारखेच आहे. गंमत बघा, त्यावेळचे समाजवादी-साम्यवादी लोक आजच्या सत्तेविरोधात आवाज उठवताहेत, पण आणीबाणीची पेन्शन घेणारे तमाम संघ-भाजपचे ‘स्वातंत्र्यसैनिक’ मौन धारण करून आहेत. त्यांचे हे मौन पुरेसे बोलके आहे.
अखेरीस इंदिरा गांधींनी आणीबाणी जाहीर केली, त्यात सामान्य माणसांना घरात जेरबंद केल्याचे माझ्या तरी वाचनात नाही. आज नेते, समाजसेवक, अधिकारी यांच्यासोबत सर्वसामान्य काश्मिरी जनतासुद्धा बंदीवान झालेली आहे. इतकी वर्षे फक्त पाकिस्तानी लष्कराच्या बाजूने कुरापती काढणे सुरू होते, आता भारतीय राजकीय-लष्करी सत्तेनेही पुढच्या १०० वर्षांच्या अस्थिरतेची सोय केलेली आहे.
आपला लेख या व अशा अनेक विचारांना चालना देणारा ठरला आहे…
कळावे.