विवेकवादी विचारांची परंपरा लाभलेले ‘आजचा सुधारक’ हे नियतकालिक २७ वर्षे सातत्याने प्रकाशित होऊन काही तांत्रिक कारणांमुळे बंद करावे लागले. ‘आजचा सुधारक’चे संस्थापक व प्रथम संपादक प्रा. दि.य.देशपांडे यांच्यापासून ते दिवाकर मोहनी, प्र.ब.कुळकर्णी, नंदा खरे, संजीवनी कुळकर्णी, अनुराधा मोहनी, प्रभाकर नानावटी, रवीन्द्र रुक्मिणी पंढरीनाथ यांचे संपादकत्व ह्या नियतकालिकाला लाभले.
३० वर्षांपूर्वी प्रकाशित झालेल्या ‘आजचा सुधारक’च्या पहिल्या अंकाच्या निमित्ताने आपले मनोगत व्यक्त करीत असताना प्रा. दि.य.देशपांडे यांनी लिहिले होते,
“धर्माने आपल्या सामाजिक जीवनात घातलेला धुडगूस आजही तेवढ्याच, किंबहुना अधिक तीव्रपणे चालू आहे. अंधश्रद्धा, बुवाबाजी इत्यादी गोष्टी पूर्वीइतक्याच जोमाने सुरू आहेत.