नाहीतरी हवेवर उजेडावर स्वप्नांवर नियंत्रण थोडेच आलेले आहे
नाहीतरी शर्टाच्या खिशावर गुलाब लावून फिरता येते की घराबाहेर
नाहीतरी अजूनही सूर्य उगवतोच की नाही पूर्वेला पृथ्वीवर सकाळी सकाळी
नाहीतरी अजूनही न चुकता सकाळ संध्याकाळ होत राहतात की नाही दररोज
नाहीतरी अजूनही पुनवेला चंद्र फुलतोच की नाही आकाशात संपूर्ण
नाहीतरी पक्षी उडत राहतातच की नाही हवेत स्वतःच्या इच्छेने
मी म्हणतो विश्वास ठेवायला हरकत काय आहे
की आपण अजूनही जिवंत आहोत
नाहीतरी अजूनही दुःखाचा पूर थोडाच आला आहे घरभर
नाहीतरी पृथ्वी फिरतेच की सूर्याभोवती निरंतर
नाहीतरी सूर्यामुळे काळोख थोडाच गळतराहतो अंगावर
नाहीतरी उजेड सांडतच राहतो की सगळ्या पृथ्वीवर
नाहीतरीउजेडाने आपले डोळे थोडेच खुपत राहतात
नाहीतरी काळोखाने अजूनही डोळे थोडेच दिपत राहतात आपले
तुम्ही सगळे सर्वज्ञ आहात
मी म्हणतो डोळे मिटून विश्वास ठेवायला
हरकत काय आहे
की अजूनही आपण मेलेले थोडेच आहोत