आजचा सुधारक’चा हा अंतिम अंक वाचकांपुढे सादर करताना मनात संमिश्र भावना दाटून आल्या आहेत. एकीकडे अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत विवेकवादाचे निशाण फडकवीत ठेवण्याचा एक प्रामाणिक आणि प्रगल्भ प्रयत्न काळाच्या पडद्याआड जात आहे ह्याचे आत्यंतिक दुःख आहे, तर दुसरीकडे अशा प्रयत्नाच्या प्रासंगिकतेची लख्ख मोहर जाणत्यांच्या मनावर उमटल्याचे समाधानही आहे.
वैचारिक नियतकालिकाची वाटचाल नेहमीच खडतर असते. आमचे मूल्यमापन समकालीन व भविष्यातील अभ्यासक करतील, तसेच काळही करेल. पण ह्या टप्प्यावर आम्हाला आतापर्यंतच्या वाटचालीबद्दल काय वाटते? गेली २७ वर्षे ‘आजचा सुधारक’ने नेमके काय केले? इतक्या साऱ्या नियतकालिकांच्या गर्दीत व माध्यमक्रांतीच्या गदारोळात त्याचे महत्त्व तरी काय? समाजासमोरील असंख्य प्रश्नांवर साधकबाधक चर्चा घडवून आणणे, जगभरात विविध विषयांवर सुरू असणाऱ्या वैचारिक विमर्शात आपल्या वाचकांना सहभागी करून घेणे, सामाजिक प्रश्नांचे, उपेक्षितांच्या जगण्याचे असंख्य अप्रकाशित पैलू, कंगोरे प्रकाशात आणून त्यांना विमर्श व धोरणाच्या कक्षेत आणण्याचा प्रयत्न करणे, ह्या देशाच्या परंपरेने जपलेल्या व आपल्या संविधानाने प्राणतत्त्व मानून वर्धिष्णू केलेल्या विविधता, परमतसहिष्णुता, विचारभिन्नता, आविष्कारस्वातंत्र्य ह्या संकल्पनांचा सातत्याने पुरस्कार करणे … हे सारे ‘आजच्या सुधारक’ने जाणीवपूर्वक व निष्ठेने केले. हे सर्व करत असताना आसपासच्या गदारोळात हरवून न जाता आपला शांत, संयत पण ठाम स्वर कायम ठेवणे हे ‘आजचा सुधारक’चे वैशिष्ट्य राहिले आहे. आमच्या व्यासपीठावर मा. गो. वैद्य, नी. र. वऱ्हाडपांडे व दिलीप करंबेळकर ह्यांच्यापासून आ. ह. साळुंखे, गो. पु. देशपांडे, भा. ल. भोळे अशा सर्व वैचारिक छटांच्या विचारकांनी वाद-संवाद केला आहे ह्याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे. ह्याच माध्यमातून एका आंबेडकरवादी व एक सावरकरवादी ह्यांचा विमर्श दोन वर्षांहून अधिक काळ रंगला ही बाब आजच्या आक्रस्ताळी वितंडवादाच्या काळात आम्हाला आश्वासक वाटते.
दि.य. देशपांडे ह्या मान्यवर तत्त्वज्ञांनी ह्या कार्याची मुहूर्तमेढ रोवली व आपल्या संपादकीय कारकिर्दीत जगभरातील विवेकवादी तत्त्वज्ञांच्या कार्याचा परिचय मराठी वाचकांना करून दिला. त्यानंतरच्या प्रत्येक संपादकाने मूळचा धागा क्षीण होऊ न देता आपापल्या व्यक्तित्वाचे व विचारविश्वाचे रंग त्यात मिसळले. दिवाकर मोहनींच्या कार्यकाळात स्त्रीमुक्ती, भाषा-लिपी-व्याकरण, भारतीय मानसिकतेतला बुद्धिप्रामाण्यविरोध ह्या मुद्द्यांना प्राधान्य मिळाले. नंदा खरेंनी त्यांच्या अनवट शैलीत मराठी विचारविश्वाला अपरिचित असे उत्क्रांतीय जीवशास्त्र, मेंदूविज्ञान, पर्यावरणीय अर्थशास्त्र ह्यांसारखे विषय चर्चेत आणले. त्याचप्रमाणे शहरी मध्यमवर्गीय वाचकांनी दुर्लक्षिलेल्या काही विषयांना – उदा. कोसळता गावगाडा व त्याचे सामाजिक-सांस्कृतिक परिणाम यांस मानाचे स्थान प्राप्त करून दिले. ही परंपरा सर्व संपादकांनी सांभाळली. सामयिक प्रश्नांसोबत अनेक महत्त्वाच्या विषयांवर अतिशय सकस विशेषांक प्रकाशित केले. धर्म-ईश्वर, ऐहिकता-निरीश्वरवाद, श्रद्धा-अंधश्रद्धा, परंपरा-नवता, धार्मिक कट्टरता व मूलतत्त्ववाद, बदलत्या काळातील स्त्री-पुरुष नाते व नैतिकतेच्या संकल्पना हे विषय इतक्या सातत्याने व सखोलपणे इतर कोणीही हाताळले नाहीत.
अशा नियतकालिकाची आजच्या संदर्भात खूप गरज आहे, म्हणून ते बंद पडता कामा नये असे आम्हाला अनेक वाचक, सामाजिक कार्यकर्ते, विचारक ह्यांनी आवर्जून सांगितले आहे. ही फक्त शुभेच्छा आहे की त्यामागे मराठी समाजातील जाणते आपली शक्ती लावायला तयार आहेत, ह्यावर ह्या प्रश्नाचे उत्तर अवलंबून आहे. असे नियतकालिक आज चालवायचे असेल व ते त्याची गरज असणाऱ्या सर्वांपर्यंत पोहोचवायचे असेल तर ध्येयवाद, झपाटलेपण ह्यांना व्यावसायिकता, आर्थिक नियोजन, उत्तम व्यवस्थापन व वितरण व्यवस्था ह्यांची जोड द्यावी लागेल. विकासाच्या प्रक्रियेत अलिकडे सामील झालेले व आकांक्षांचे अंकुर फुटलेले समाजसमूह व अठरापगड जातींचा नव्या विचारांच्या शोधात असलेला तरुणवर्ग ह्यांच्यापर्यंत पोहचण्याचे मार्ग शोधावे लागतील. नव्या नियतकालिकासाठी आवश्यक आर्थिक बळ, किमान ५०० वर्गणीदारांची हमी, व्यवस्थापनात साह्य व महाराष्ट्राच्या विविध भागात अंक नेऊ इच्छिणारे उत्साही कार्यकर्ते जर मिळाले तर सध्याची संपादकीय चमू विवेकवादाची ही दिंडी पुढे नेण्यास उत्सुक आहे. हा समापन अंक हा ह्या ध्येयवादी नियतकालिकासाठी पूर्णविराम आहे की स्वल्पविराम ह्याचे उत्तर आता तुमच्या हातात आहे. आतापर्यंत तुम्ही जे अलोट प्रेम दिले त्याबद्दल ‘आजचा सुधारक’च्या नव्या-जुन्या चमूंतर्फे कृतज्ञता व्यक्त करून थांबतो.