आगरकरांनी 100 वर्षांपूर्वी जे कार्य करावयास आरंभ केला ते दुर्दैवाने अजून मोठ्या अंशाने अजून अपूर्ण राहिले आहे. त्यांनी महाराष्ट्रात विवेकवादी सर्वांगीण सुधारणावादाची मुहूर्तमेढ रोवली, पण ते गेल्यानंतर लवकरच महाराष्ट्राची स्थिती जवळपास पूर्वीसारखी झाली. आज शंभर वर्षांनंतर ती तशीच आहे असे म्हणण्यास प्रत्यवाय नाही. अंधश्रद्धा, जादूटोणा, मंत्रतंत्र, बुवाबाजी इ. गोष्टी पूर्वीइतक्याच जोमाने सुरू आहेत. भ्रमाने आपल्या सामाजिक जीवनात घातलेला धुडगूस अधिक तीव्रपणे चालू आहे. कुंभमेळे, गंगास्नान, यज्ञयाग हे सर्व जातिभेद पूर्वीइतकाच तळ ठोकून आहेत आणि राजकारणात निवडणुकांच्या निमित्ताने त्याला उघड आवाहन केले जात आहे. दलित आणि स्त्रिया यांवरील अत्याचारांनी परिसीमा गाठली आहे. या सर्व शोचनीय स्थितीवर उपाययोजना करणे अतिशय कठीण आहे. आभाळच फाटल्यावर त्यावर ठिगळ तरी कोठे कोठे लावणार? परंतु तरी या कामात प्रत्येकाने हातभार लावणे जरुरीचे आहे असे आम्हाला वाटते. आणि म्हणून त्यात आपला वाटा उचलणे आम्ही आमचे कर्तव्य समजतो.
(नवा (आजचा) सुधारकच्या पहिल्या अंकातील संपादकीयातून)