भारत, पाकिस्तान, जीना, मूलतत्त्ववाद
मोठ्यांच्या राजकारणात बळी जातो, तो लहानांचा…. आपल्याला आणि आपल्या मुलांना एका भीषण भविष्याला तोंड द्यावे लागणार ह्या कल्पनेने शोकाकूल झालेल्या एका पाकिस्तानी महिलेचे मनोगत
जो कुणी परदेशात प्रवास करून आलेला आहे अशी कुणीही व्यक्ती हे सांगेल की तुम्ही कुठल्याही देशात जा, तुम्ही गेलेला देश कितीही विकसित असो.. जर तुम्ही ब्रिटिश असाल किंवा गोरे अमेरिकन असाल, देशाची दारं तुमच्याकरता सहज उघडी होतात. सुरक्षा काहीशी कमी जाचक होते, व्हिसा क्यूज् लहान होतात आणि नियम आणि पद्धती साध्या सरळ होतात. पण तुम्ही दुसऱ्या देशाकडे जाणाऱ्या सावळ्या रंगाच्या पाकिस्तानी व्यक्ती असाल, तर वातावरण पूर्णपणे बदलते. तुम्ही मध्य-आशियात नोकरी करत असाल, संभवनीय हेच असते की, तुमचा पगार हा किमानवेतनाच्या जरा जास्त असेल, किंवा इतर सात जणांसोबत एका अंथरुणावर झोपता येईल एवढीच जागा तुम्हाला उपलब्ध असेल. सन्मान नसल्यासारखाच असेल. तुम्हाला कुणालाही नाराज करून चालणार नाही, किंवा अधिकारांची भाषा करून चालणार नाही. तुमची पोरं हजारो मैल दूर कुठेतरी शिकत असतात (कारण त्यांना इथं शिक्षण देणं तुम्हाला परवडणारं नसतं). कसाबसा जगण्यासाठी पुरेसा पैसा मिळवायचा म्हणून तुमची पत्नीही दुसरीकडे कुठेतरी काम करीत असणार आणि तुमची नोकरी तुमच्या शरीरातून शोषून घेतलेला प्रत्येक रक्ताचा थेंब, प्रचंड गगनचुंबी इमारत उभी करण्यासाठी साह्यभूत होणाऱ्या एखाद्या लहानशा डब्यात जमा होत असणार, आणि तु्म्ही ह्या परिस्थितीबद्दल ‘ब्र’ उच्चारायचाच अवकाश, तुमची मालक-कंपनी तुमचं रक्त साठवलेला तो डबा दूर भिरकावून तुम्हाला बाय बाय करायला तयारच असते.
मी ह्या सुपर पॉवर्सच्या जगात पाकिस्तानी असण्यामुळे ज्या दयनीय स्थितीत जगावं लागतं त्या स्थितीचं वर्णन करण्यासाठी कुठल्या समान स्थिती दर्शवणाऱ्या उपमेचा उपयोग करू शकेन? जणू काय देशातील सद्यःकालीन स्थिती, अनेक वर्षांची हुकूमशाही आणि पायाभूत संसाधनांचा अभाव ह्यामुळे आम्ही पुरेसे पागल झालेलो नाही म्हणूनच की काय, आता धर्मवादी अतिरेक्यांना आमंत्रित करण्यात आलंय आणि आपल्याला जे आपलं आणि प्रिय आहे ते सर्व नष्ट करण्याचा त्यांना परवाना देण्यात आला आहे. हे खरं आहे की, ‘जैसे थे’वादी म्हणतील की हा काही अस्सल इस्लाम नाहीये, किंवा इतर काहीतरी असंच. परंतु माझा सवाल आहे की, (अगदी गंभीरतेनं विचारतेय) – ‘खरा इस्लाम म्हणजे काय आणि कुठचा इस्लाम खरा नाही’ ह्या वादातून आपण केव्हा बाहेर पडणार आहोत? ह्या धर्मवेत्त्यांना आणि मुल्लामौलवींना बसू द्या ना मशिदींमध्ये. पण एकदा आणि नित्याकरता नष्ट करा, खत्म करा ह्या क्रूर, पशू, भेकड, नीतिशून्य माणसांना, जे शरीरानं दुबळ्या, दारिद्र्यानं ग्रस्त, आणि अविचारी झालेल्या लोकांना विकत घेतात, त्यांच्या पाठीवर स्फोटके बांधतात आणि त्यांना निरागस मुलं आणि स्त्रियांनी भरलेल्या बाजारपेठेत पाठवतात. संपवा समाजातील ह्या तिरस्कृत वृत्तीला, जी तुम्हाआम्हाला पाषाणयुगाकडे फेकण्याचा प्रयत्न करतेय.
न्यूयॉर्क टाईम्समध्ये नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या लेखात जागतिक आरोग्य संघटनेने (डब्लूएचओ) पाकिस्तानमध्ये पोलिओच्या बाबतीत आणीबाणीची स्थिती असल्याचे घोषित केलंय. गेल्या साली, पेशावरमध्ये एका पोलिओ कर्मचाऱ्याला ठार केलं गेलं, तसंच खैबर एजन्सीत आणखी एकाला गोळी घालून खतम केलं. बारामध्ये अनेकांना पळवून नेलंय. ह्या वर्षाच्या जानेवारी महिन्यात ह्या कराचीत पोलिओ लस मोहिमेत सहभागी झालेल्या तीन आरोग्यकर्मचाऱ्यांना बंदुकधाऱ्यांनी गोळ्या घालून ठार केलं. काबूलमध्ये नाही, सिरा लिऑन वा रियाधमध्ये नाही; ह्या कराचीत झालंय हे. माझं हृदय जळतंय, रटारटा शिजतंय, ह्या अशा बातम्यांचा मीडियाचॅनेल्सवर आलेला पूर पाहून. न्यूयॉर्क टाईम्समधील लेखात पुढे सांगितलंय की, अहवालानुसार पोलिओ लस टोचून घ्यायला नकार देणाऱ्यांचे सर्वांत जास्त प्रमाण आहे कराचीतील सधनांच्या वस्त्यांमध्ये, कारण त्यांना सार्वजनिक आरोग्यव्यवस्थेवर किंचितही भरोसा राहिलेला नाही. उत्तर वझिरीस्तानमध्ये तेहेरीक-ए-तालीबान पाकिस्तान (टीटीपी) ने गेल्या अनेक वर्षापासून लसटोचणी निषिद्ध केलीय. पाकिस्तानमध्ये आज ५९ ज्ञात पोलिओग्रस्त आहेत, जगात सर्वांत जास्त.
एक आई म्हणून जिवाचा थरकाप होतो माझ्या. रात्र रात्र डोळा लागत नाही माझा. मला वाटतं, जरी मी माझ्या देशाच्या सीमापार दूर पळून गेले तरी हे सैतान माझ्या मागावर राहतील, माझ्याच नाही माझ्या पुढच्या पिढ्यांच्याही. गुगल न्यूजवर मी पाकिस्तान टाईप करते, आणि तेथे कशाच्या बातम्या असतात तर मृत्यूच्या, विध्वंसाच्या, रोगांनी पिडलेल्या मुलांच्या, अतिरेक्यांनी उडवून दिलेल्या गोष्टींचा, आणि धडपडत असलेल्या अर्थव्यवस्थेच्या.
मी आपल्या शेजारच्या देशाकडे नजर टाकते आणि आपण जर अजूनही एकत्रित भारतात (युनायटेड इंडिया) राहिलो असतो तर काय झालं असतं हे मला दिसतं. कदाचित आपण पोलिओमुक्तही झालो असतो. जगाला उद्या ज्या शक्तीची दखल घ्यावी लागणार आहे, जी भविष्यातील बलाढ्य अर्थव्यवस्था असेल अशा प्रक्रियेत सहभागी भाग झालो असतो आपण. मला माझ्या अंतःकरणापासून वाटतं, जिनांनी ही चूक करायला नको होती, त्यांनी पाकिस्तानच्या भविष्याचा विचार करायला हवा होता. आपण कुठल्या प्रतिगामी मानसिकतेला भविष्यकाळात प्रबल व्हायची संधी देतोय ह्याचा त्यांनी विचार केला नाही. जे आपल्याला देश म्हणून एकत्रित आणू शकले नाहीत असे धूसर. अस्पष्ट ध्येय… ज्यासाठी लाखो लोक मृत्युमुखी ढकलले गेले. पाकिस्तानला जेव्हा संघर्षाला सामोरे जावं लागलं अशा त्या घटना मला आठवताहेत – ढाक्याचे पतन, प्रांताप्रांतातील लढाया, टोकाची अलगत्वाची मानसिकता …आणि मला समजतच नाही, इंडियन नॅशनल कॉंग्रेस सोडण्याचा निर्णय घेताना जिनांच्या मनात काय असावं.
आपल्या पूर्वजांच्या डीएनएशिवाय आपण आपल्या भारतीय बांधवांसोबत इतरही बऱ्याच बाबतीत सारखेपणा राखून आहोत – आपले अन्न, भाषा, कपडे, जीवनशैली हे, ज्यांची आपण नक्कल करण्याचे प्रयत्न करत आहोत त्या अरबांपेक्षा भारतीयांच्या किती अधिक समान आहे. ‘तू कायमची आंधळी आणि ढब्बू राहणार असल्याने तुझं लग्न होणार नाहीये’, असं एखाद्या चेहऱ्यावर मुरुमाच्या पुटकुळ्या असलेल्या सोळाव्या वर्षाच्या मुलीला सांगितलं जावं, आणि तिचीच मोठी बहीण जी अधिक सशक्त, अधिक सुंदर, सुशिक्षित आहे, कारण तिला चांगले पालक लाभले आहेत, अशी पाकिस्तान आणि भारत ह्यांची स्थिती आहे.
आज मला पाकिस्तानी असल्याची शरम वाटतेय. ज्या देशात मानवी अधिकाराच्या बाजूनं असणाऱ्या वकिलांना, राज्यपालांना, ठार मारले जाते, आणि विद्यापीठातील प्राध्यापकांना ठार मारण्याच्या धमक्या दिल्या जातात अशा देशाची मी नागरिक आहे, ह्याबद्दल मला शरम वाटतेय. केवळ ते वेगळ्या मूल्यांवर विश्वास ठेवतात म्हणून आपण आपल्या वैज्ञानिकांना नाकारलंय ह्याची मला शरम वाटतेय.
आम्ही कुठल्या तरी बकवास सिद्धांतांवर आणि षडयंत्रांच्या पोकळ कल्पनांवर बिनदिक्कत विश्वास ठेवतो याची मला शरम वाटते.
मला शरम वाटते, आपण आपल्या स्त्रियांना संरक्षण देऊ शकत नाही, आपल्या मुलांना सुरक्षा देऊ शकत नाही, अतिरेकीपणाच्या, मूलतत्त्ववादाच्या घातक प्रवृत्तीपासून. पाकिस्तान हा एक महान देश आहे ह्या खुळचट कल्पनेपासून आपल्या पुरुषांना वाचवू शकत नाही. पाकिस्तान हे पंखही न फुटलेली, धडपडणारी राज्यसत्ता आहे, आणि जी आपल्या पायांनी कधीही चालू शकणार नाहीत अशी ती ५९ मुलं, रझा रूमीच्या ड्रायव्हरचं कुटुंब, सलमान तसीरसाठी जे अश्रू ढाळत आहेत ते, प्रविण रहमान, रशीद रहमान, डॉ मुर्तिजा हैदर आणि त्यांचा बारा वर्षांचा मुलगा — अशा सर्व व्यक्ती, ज्या नेहमीप्रमाणे घरातून बाहेर पडल्या आणि कधीच जिवंत घरी परतल्या नाहीत, ते सर्व, तुम्ही आज मुमताज काद्रीसारख्या भेकड माणसांबद्दल जो आपलेपणा, आदर दाखवत आहात, त्याची किंमत देत आहेत.
(माहवाश बदर ह्या मानसशास्त्रज्ञ सत्य बोलायचं धाडस करणाऱ्या मोजक्या पुरोगाम्यांतील एक आहेत. 12 मे 2014 ला’ पाकिस्तान एक्स्प्रेस ट्रायब्यून ब्लॉग्ज’ मध्ये त्यांनी ‘जीना मेड अ मिस्टेक ऍण्ड आय ऍम शेमफूल ऑफ बीईंग पाकिस्तानी’ ह्या शीर्षकाचा लेख लिहिला. परंतु आयएसआयच्या छुप्या हाताने हा लेख आणि त्यांचा ट्विटर अकाऊंट नाहीसा केला. त्यांनी लिहिेलेला मूळ लेख ढाका ट्रायब्यूनमध्ये पुनःप्रकाशित करण्यात आला, त्याचा हा अनुवाद.)