भारतीय चर्चापद्धती (भाग ५)

चरकसंहिता : वाद आणि वादपरिभाषा

चर्चापद्धती, चरकसंहिता, वादविद्या, परिभाषा
भारतीय चर्चापद्धतीचा इतिहास सांगणाऱ्या ह्या लेखमालेच्या ह्यापूर्वीच्या भागांमध्ये आपण आन्वीक्षिकीचा परिचय करून घेतला.ह्या पद्धतीचे उपयोजन तज्ज्ञ मंडळींमध्ये मानवी आरोग्यविषयक चर्चा घडविताना प्रभावी पद्धतीने कसे केले जात होते ह्याचे दाखले चरकसंहितेत अनेक ठिकाणी मिळतात. त्यांतील वादांचे स्वरूप व परिभाषा ह्यांचा परिचय ह्या लेखात करून दिला आहे.

चरकाचार्यांनी परिषदेचे स्वरूप सांगून नंतर प्रत्यक्ष चर्चा कशी करावी, यासाठी न्यायदर्शनातील ‘वाद’ संकल्पनेत काही बदल केले. त्यासाठी वादाची परिभाषा तयार केली. आयुर्वेदाचा संदर्भ वगळला तर ती आज किंवा कधीही इहवादी दृष्टिकोनातून उपयुक्त ठरू शकेल इतकी लवचीक आहे.

राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय परिषद
चरकाचार्यांनी परिषदेचे ज्ञानवती आणि मूढवती असे दोन मुख्य प्रकार केले. त्याचबरोबर आजच्या भाषेत सांगावयाचे तर राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय परिषदा असा भेदही केला. अशा सात परिषदांचा उल्लेख चरकसंहितेत केलेला आढळतो: (१) हिमालयाच्या पायथ्याशी झालेली पहिली ऋषि परिषद : “आयुर्वेदावतरण प्रसंग परिषद”, (२) वातविषयक तद्विद्यसंभाषा परिषद, (३) पित्तदोषविषयक तद्विद्यसंभाषा परिषद, (४) कफदोषविषयक तद्विद्यसंभाषा परिषद, (५) पुरुषोत्पत्ती व रोगोत्पत्तिविषयक तद्विद्य संभाषापरिषद, (६) रस आणि आहारविषयक वातविषयक संभाषापरिषद, आणि (७) मदनफलसंबंधी तद्विद्य संभाषा परिषद.

यातील पहिली परिषद आयुर्वेदाचे ज्ञान इंद्राकडून ग्रहण करण्यासाठी जमलेल्या ऋषींची होती. ऋषिका (ऋषिस्त्रिया-पत्नी, मुलगी), ऋषिपुत्र, देवर्षी आणि महर्षी असे चार प्रकारचे ऋषी या परिषदेत होते. ही परिषद संख्येने सर्वांत मोठी व दीर्घकालीन होती. रस आणि आहारविषयक वातविषयक संभाषा परिषद ही दुसरी मोठी व दीर्घकालीन परिषद होती. या दोन्ही आंतरराष्ट्रीय परिषदा होत्या.

पहिल्या ‘आयुर्वेदावतरण प्रसंग परिषद’ मधील सहभागींची नावे कुठल्याच आवृत्तीत दिलेली नाहीत, केवळ त्यांची वर्गवारी दिली आहे. दुसरी तिच्यापेक्षा व्यापक व मोठी होती. या परिषदेतील ऋषींची नावे चरकसंहितेत चरकाचार्यांनी दिली आहेत तर ‘चरक चिकित्सा’ ग्रंथात दृढबल या चरकपूर्व महर्षीने त्या ऋषींच्या देशांची तत्कालीन नावे दिली आहेत. वाल्हिक (बॅक्ट्रीया – अफगाणिस्तान व त्याजवाळील प्रदेश),पह्लव(पर्शिया), चीन, शूलीक(??), यवन (ग्रीस), शक (मध्य आशिया- कझाकस्तान, किर्गिझस्तान, उझबेकिस्तान, ताजिकिस्तान व तुर्कमेनिस्तान, अफगाणिस्तान व इराण,मंगोलिया हेदेशतसेच पाकिस्तानचा उत्तरभाग, भारताचा काश्मीर, चीनमधील शिंच्यांग हा प्रदेश व दक्षिण सायबेरिया), सैन्धव (सिंध-बलुचिस्तान), मलय (आग्नेय आशिया – कंबोडिया, लाओस, बर्मा, द्वीपकल्पीय मलेशिया, थायलंड व व्हिएतनाम, इंडोनेशिया, सिंगापूर, फिलिपिन्स, ब्रुनेई व पूर्व तिमोर), प्राच्य (बिहार व बंगाल), अश्मक (प्राचीन महाराष्ट्र), आवन्तिक (उज्जैन, माळवा परिसर), असे भारताच्या पूर्वेकडील,चीनच्या दक्षिणेकडील व ऑस्ट्रेलियाच्या उत्तरेकडील देश, तसेच दक्षिण, उत्तर, पश्चिम, मध्यप्रदेश अशी एकूण चौदा नावे दिली आहेत. (कंसात आजचा भूप्रदेश अंदाजे दिला आहे.) या देशांमधील शेकडो रसायनतज्ज्ञ, औषधीतज्ज्ञ, विद्वान, वैद्य, ऋषी ह्या परिषदेत जमले होते, असे चरकसंहिता सांगते. तिच्या स्वरूपावरून ही आयुर्वेदाच्या विकासातील महत्त्वाची परिषद होती,असे दिसते.

वादप्रारंभ
चरकाचार्यांच्या मते, वाद कसा सुरू करावा ? याचे साधेसरळ उत्तर असे की विद्वान वैद्य तज्ज्ञाने पुढाकार घ्यावा. त्याने सर्व सभासदांना अभिवादन करून त्यांना आपलेसे करावे. त्यानंतर ‘आपण ज्या विषयात तज्ज्ञ आहोत, जो विषय आपणास सोपा जाईल आणि प्रतिवादीस अवघड जाईल, तोच विषय या सभासदांकडून जाहीर होईल’, असे पाहावे. समजा, प्रतिवादी सदस्यांनी वेगळ्या विषयाची मागणी केली तर (मग मात्र) “ही सभाच आता विषयाची निवड, त्यासंबंधीचा शास्त्रार्थ आणि वादाची मर्यादा याबद्दल निर्णय घेईल,” असे म्हणून स्वस्थ, गप्प राहावे.

वादमार्ग व वादपरिभाषा
वाद सुरू करताना परिषदेला, दोन्ही पक्षांना आणि प्रेक्षकांना मान्य असणारी वादाची परिभाषा तयार केली जाते. किंबहुना तिचे ज्ञान सर्वांना आहे, असे गृहीत धरले जाते. ही परिभाषा काही संकल्पनांनी बनली आहे. या संकल्पना चरकसंहितेत ‘वादमार्ग’ या शीर्षकाखाली मांडल्या आहेत. ज्या संकल्पनांचे सखोल ज्ञान चर्चेतील सर्वांना, विशेषतः शहाण्या चर्चकास असलेच पाहिजे, अशा या चव्वेचाळीस संकल्पना आहेत. १. वाद, २. द्रव्य, ३. गुण, ४. कर्म. …४४. निग्रहस्थान. यांचा विशिष्ट क्रम असून तो बदलावायचा नसतो. या संकल्पनाच्या वर्णनाला ‘वादपरिभाषा’ असे म्हटले आहे.

या यादीतील साऱ्या चव्वेचाळीस संकल्पनांच्या माहितीची प्रस्तुत संदर्भात गरज नाही. त्यांतील काही विशिष्ट संकल्पनांचे स्वरूप येथे पाहू. त्याचे कारण या निवडक संकल्पना निव्वळ चरकसंहितेशिवाय इतरत्र म्हणजे आजच्या आपल्या नेहमीच्या वादांत आणि चर्चांत उपयोगी पडणाऱ्या आहेत. त्यांचे स्वरूप पाहाताना त्याचे क्रमांक तसेच ठेवले आहेत : (१) वाद, (१२) दृष्टान्त, (१६) सिद्धान्त, (१७) शब्द, (२९) अनुयोज्य, (३०) अननुयोज्य, (३१) अनुयोग, (३२) प्रत्यानुयोग, (३३) वाक्यदोष, (३४) वाक्यप्रशंसा, (३५) च्छल, (४४) निग्रहस्थान. यातील पहिली संकल्पना ‘वाद’ हीच आहे.

(१) ‘वाद’ संकल्पना
चरकाचार्यांच्या मते, वाद करताना दोन गोष्टीचे भान बाळगले पाहिजे. एक, चर्चा विषयाची शास्त्रीय मर्यादा आणि विषयाची व्याप्ति पाहणे आणि दोन, प्रतिवादीची विरोधी भावना लक्षात घेणे. त्यानंतर चर्चा करणे म्हणजे वाद करणे. संक्षेपात प्रतिपक्षाची विगृह्य भावना लक्षात घेऊन त्यांच्याशी चर्चा करणे. या वादाचे दोन भेद आहेत. जल्प आणि वाद (तत्र वादो नाम स यत् परेण सह शास्त्रपूर्वकं विगृह्य कथयतिI स च द्विधः संग्रहेण – जल्प: वितण्डा च).

दोन्ही पक्षांनी- वादी व प्रतिवादी (पूर्वपक्ष आणि उत्तरपक्ष) यांनी आपल्या संबंधित विषयांचे योग्य, सुस्पष्ट विवेचन करणे, मांडणी करणे म्हणजे ‘जल्प’. आणि त्याविरुद्ध प्रकारे चर्चा झाली तर ती वितंडा.(तत्र पक्षाश्रियायोर्वचनंजल्प: , जल्प विपर्ययो वितण्डा.)

या दोन प्रकारांत वाद म्हणजे केवळ ‘जल्प’ हा अपेक्षित आहे आणि अर्थातच वितंडा म्हणजे वाद नाहीच ! येथे न्यायदर्शनातील वाद, जल्प, वितंडा या संकल्पना चरकसंहितेत बदललेल्या आहेत. न्यायदर्शनानुसार जल्प = केवळ स्वतःचा हेकेखोरपणा आणि वितंडा = दुसऱ्याशी निव्वळ भांडण. हे टाळून सम्यक चर्चा = वाद. पण चरकसंहितेत पूर्वपक्ष आणि उत्तरपक्ष यांनी आपली योग्य, सुस्पष्ट मांडणी करणे म्हणजे ‘जल्प’ असे म्हटले आहे.

(१२) दृष्टान्त
काहीतरी समजावून देताना दृष्टान्त द्यावे लागतात. ‘दृष्टान्त’ चे दोन अर्थ आहेत. १. मूर्ख आणि विद्वान या दोघांनाही विषय योग्य प्रकारे समजावा यासाठी दिलेले उदाहरण म्हणजे दृष्टान्त होय. २. वर्णनीय चर्चेचा विषय दुसऱ्या शब्दांत सांगणे. उदाहरणार्थ ‘अग्नि’ हा एकच शब्द उच्चारल्यावर तो ‘उष्ण आहे’ हे कळले पाहिजे, ही अपेक्षा असते. ती शहाण्याला कळते; पण प्रत्यक्षात, व्यवहारात बोलताना, चर्चा करताना मूर्खाला ‘अग्नि काय?’ असा प्रश्न पडू शकतो; किंबहुना पडतोच ! त्याच्यासाठी ‘अग्नि उष्ण आहे’ असे पूर्ण वाक्य म्हणावे लागते. अशा प्रकारे मूर्खालाही समजेल असे दुसऱ्या शब्दांत वर्णन वाढवून अधिक स्पष्टीकरण देणे, हा दृष्टान्त होय.(दृष्टान्तो नाम यत्र मूर्खविदुषां बुद्धिसाम्यं, यो वर्ण्यं वर्णयति )

(१६) सिद्धान्त
परिषदेतील परीक्षक अनेक प्रकारचे परीक्षण करून आणि अनेक कारणांमुळे विषय सिद्ध करतात आणि त्याविषयी निर्णय देतात, त्याला सिद्धान्त म्हणतात. याचे चार प्रकार आहेत. १. सर्वतंत्र सिद्धान्त, २. प्रतितंत्र सिद्धान्त, ३. अधिकरण सिद्धान्त, आणि ४. अभ्युपगम सिद्धान्त.
१. सर्वतंत्र सिद्धान्त : एका ग्रंथात विविध ठिकाणी मांडलेला किंवा विविध ग्रंथांत मांडलेला एक सिद्धान्त म्हणजे सर्वतंत्र सिद्धान्त. विविध ठिकाणी केलेल्या मांडणीतून एक सिद्धान्त सिद्ध होणे. जसे की आयुर्वेदाचे ग्रंथ विविध आहेत पण सर्वत्र सिद्धान्त एकच आहे : रोगचिकित्सा व उपाय.
२. प्रतितंत्र सिद्धान्त : प्रत्येक ठिकाणी वेगवेगळे सिद्धान्त मांडणे आणि प्रत्येकाचे समर्थन करणे. प्रति = विरुद्ध. एकाच्या विरुद्ध अर्थ निघेल असा दुसरा सिद्धान्त मांडणे. एकात रस आठ म्हणायचे तर दुसऱ्या ठिकाणी सहा म्हणायचे किंवा एका ग्रंथात इंद्रिये पाच तर दुसऱ्या ग्रंथात मन धरून सहा म्हणायचे.
३. अधिकरण सिद्धान्त : अधिकरण म्हणजे विषय. एका विषयाची चर्चा चालू असताना मध्येच विनाकारण तो विषय सोडून दुसऱ्याच असंबद्ध पण सिद्ध झालेल्या विषयाची चर्चा सुरू करणे (मूळ विषयाला बगल देणे), जसे की ‘जीवन्मुक्त माणूस शुभाशुभ कर्मफल देणारे कर्म करीत नाही’ हा विषय असताना ‘कर्माला फळ असते, मग पुनर्जन्म असतो इ. इ.’ विषय घुसवून दुसरीच चर्चा करणे. सिद्धान्त बिघडविणे, नोटाबंदी विषय असताना स्वातंत्र्ययुद्धात काय झाले ? असा विषय सुरू करणे.
४. अभ्युपगम सिद्धान्त : सिद्ध न झालेले (असिद्ध), परीक्षण न झालेले (अपरीक्षित) मत हे ‘निर्णय झालेला सिद्धान्त’ म्हणून स्वीकारणे म्हणजे अभ्युपगम करणे.
(१७) शब्द

वर्णसमूहाला शब्द म्हणतात. (शब्दो नाम वर्ण समाम्नाय:…) उच्चारल्या जाणाऱ्या वर्णाचे समूह केल्यामुळे दोन प्रकारचे शब्द निर्माण होतात. १. सार्थक आणि २. निरर्थक. दुसऱ्याची चर्चा, माहिती येथे आवश्यक नाही, त्यामुळे चरकाचार्य केवळ पहिल्याची माहिती देतात. सार्थक शब्द चार प्रकारचा असतो.
१. दृष्टार्थ : जे प्रत्यक्षात दिसते, जाणवते तो दृष्टार्थ. डोळा, नाक इत्यादीने दिसणे, गंध येणे.
२. अदृष्टार्थ : जे प्रत्यक्षात दिसत नाही, जाणवत नाही तो अदृष्टार्थ. पुनर्जन्म, मोक्ष यांचे ज्ञान होत नाही.
३. सत्य : जे सर्वथा यथार्थ आहे, त्यास ‘सत्य’ म्हणावे. जाणले जाणारे, पडताळा देणारे यथार्थ वास्तव म्हणजे सत्य. जसे की आयुर्वेदात अनेक उपदेश, चिकित्सा प्रयोग, विरेचन इत्यादी उपाय, यांचा पडताळा घेता येतो.
४. अनृत : सत्याच्या विपरीत, विरुद्ध सर्व काही ते असत्य म्हणजे अनृत. अपथ्य सेवनाने रोग वाढत नाही, पंचकर्माचे फळ मिळत नाही, हे म्हणणे सर्व असत्य आहे. कारण अपथ्यसेवन केले तर रोग वाढतोच हा अनुभव आहे. तसेच पंचकर्म उपचार केले तर रोग बरा होतो, हाही अनुभव येतो.

(२९)अनुयोज्य
युक्तिवादातील कोणत्यातरी दोषाने दूषित असणारे वाक्य म्हणजे अनुयोज्य होय.(अन्युयोज्यं नाम यद्वाक्यं वाक्यदोषयुक्तं तत्…) वाक्यदोषयुक्त वाक्य म्हणजे अनुयोज्य वाक्य. एखादे वाक्य पूर्ण स्पष्ट असूनही विनाकारण त्यास इतर वाक्ये जोडून ते मोठे करणे, हा दोष मानला आहे. उदाहरणार्थ“हा आजार हे औषध घेतल्याने बरा होईल” असे डॉक्टरने सांगूनही रोग्याने “म्हणजे ह्या गोळ्या, पातळ औषध, इंजेक्शन घेऊन आजार बरा होईल ना?” असे विचारणे. किंवा “नव्या नोटांनी काळा पैसा बंद होईल” असे सांगितल्यावरही “नव्या नोटा आल्यावर काळा पैसा, तस्करी, लाचलुचपत, भ्रष्टाचार बंद होईल म्हणता का ?!” असे विचारणे.

(३०) अननुयोज्य
वरील अनुयोज्यच्या पूर्ण विरोधी वाक्य म्हणजे अननुयोज्य. जसे की “हा आजार हे औषध घेतल्याने बरा होईल” असे माहीत असूनही डॉक्टरने “हा रोग कधीही बरा होणार नाही !” असे म्हणणे. त्याने असे म्हटल्यावर “मग, तुम्ही कशाला आहात डॉक्टर” असा प्रश्न रोग्याच्या मनात निर्माण होतो, कारण डॉक्टरकडे रोगी जातो ते बरा होण्यासाठी. पण त्या ऐवजी “आता जणुकाही तू मरणार” असे डॉक्टर सांगतो हा वाक्यदोष आहे. ज्याने सत्य मांडले पाहिजे त्याने असत्य मांडणे हा अननुयोज्य.

(३१) अनुयोग
ज्या चर्चेत, तद्विद्यपरिषदेत संबंधित विषयाची चर्चा होतेच पण त्याचबरोबर त्यास पूरक असणाऱ्या इतर ज्ञान, विज्ञान, वचन, विरुद्धवचन यांचीही चर्चा अन्य काही प्रश्न उपस्थित करून होते त्यास ‘अनुयोग’ म्हणतात. वाहिन्यांवरील चर्चेत असे घडते. नोटाबंदीची चर्चा चालू असताना आर्थिक प्रश्नाबरोबर राजकीय, सामाजिक, तात्त्विक प्रश्न विचारून चर्चा विस्तारणे.

(३२) प्रत्यनुयोग
अनुयोगचर्चेसंबंधी पुन्हा अनुयोग करणे. म्हणजे प्रश्नावर प्रतिप्रश्न विचारणे. म्हणजे त्या प्रश्नाचे कारण विचारणे. एकाने काही विचारले तर दुसऱ्याने “हा प्रश्न तुम्ही का विचारीत आहात? ” असा प्रश्न विचारणे; त्यावर आधीच्याने किंवा अन्य कुणीतरी मध्येच (तोंड घालून) “हा प्रश्न तुम्ही का विचारीत आहात?” असा प्रश्न विचारणे (प्रत्यनुयोगो नामानुयोगस्यानुयोग: , यथा –अस्यानुयोगस्य पुनः को हेतुरिति ) या प्रवृत्तीला “प्रश्नोऽऽनुयोग: पृच्छाच” असे अमरकोशात म्हटले आहे. (आपल्या नेहमीच्या बोलण्यात असे नेहमी घडून चर्चा बिघडते, असा अनुभव येतोच!) सामान्यतः प्रश्न, पृच्छा आणि अनुयोग हे पर्यायी शब्द मानले जातात.

(३३)वाक्यदोष
ज्या वाक्यात दोष आहे ते वाक्यदोषयुक्त वाक्य असते. असे दोष पाच प्रकारचे आहेत.
१. न्यून : काहीतरी कमी असणे म्हणजे न्यून. जे सिद्ध करायची ती प्रतिज्ञा, उदाहरण, तर्कप्रक्रिया युक्तिवादात नसणे हे न्यूनत्व असते.
२. अधिक : न्यूनत्वाच्या विरुद्ध अधिकता असणे. म्हणजे गरजेपेक्षा जास्त काहीतरी असणे. सतत काहीतरी सांगणे, मांडणे, पुनरुक्ती करणे. याचे दोन प्रकार : अर्थपुनरुक्त आणि शब्दपुनरुक्त. याचा अनुक्रमे अर्थ असा की एकाच अर्थाचे अनेक शब्द वापरणे आणि एकच शब्द सतत वापरत राहाणे.
३. अनर्थक : ज्यामुळे कोणताही अर्थ स्पष्ट होत नाही असे शब्द वापरणे. याला साहित्यात ‘निरर्थक दोष’ म्हटले आहे. (जसे च, वा, बरं, या ठिकाणी, तर असं आहे की, चला तर मग, मग …. )
४. अपार्थक : ज्यांचा संबंध नाही असे शब्द एकमेकांशी जोडणे : चक्र, तक्र, नक्र; बडबड, गडबड. यांना स्वतंत्ररीत्या अर्थ आहे, पण त्यांचा एकत्र विनाकारण उपयोग करणे म्हणजे अपार्थक. काही वक्त्यांना अशी सवय असते !
५. विरुद्ध : जे विषय दृष्टान्त,सिद्धान्त किंवा चर्चेच्या वेळेच्या विरुद्ध असेल तेच विषय चर्चेत आणत राहाणे. म्हणजे चर्चा ‘पृथ्वी सूर्याभोवती फिरते’ अशी असेल तर ती सोडून चंद्र, राहू, केतू, इ.वा नवरा बायकोभोवती फिरतो, प्राचीन काळी असे होते अथवा भविष्यकाळात कसे असेल इ. विषय आणणे.

(३४) वाक्यप्रशंसा
ज्या वाक्यात वरील दोष नाहीत आणि जे ज्या अर्थाने वापरले आहे ते त्याच अर्थाने समजणे हा वाक्याचा सद्गुण आहे. त्यास वाक्यप्रशंसा म्हटले आहे.

(३५) च्छल
ज्या वाक्यात धूर्तता आहे, जे अर्थहीन आहे, किंबहुना ज्यात अर्थ असल्याचा भास होतो पण जो नसतो, जे अनर्थक आहे आणि केवळ दुसऱ्याला फसविण्यासाठी केलेले आहे त्याला च्छल म्हणतात. च्छलाचा चर्चेत उपयोग नसतोच पण त्रास होतो, म्हणून शहाणी माणसे तो टाळतात. जर कुणी तसा करीत असेल तर त्या माणसालाच टाळावे ! च्छल दोन प्रकारचा आहे : १. वाक्च्छल २. सामान्यच्छल
१. वाक्छल : शब्दाचे वेगवेगळे अर्थ काढणे. ‘नव’ चे नवीन, नऊ असे दोन अर्थ काढून वितंड करणे.
२. सामान्यच्छल : वाक्छल शब्दअसलेली वाक्ये बनवून छळणे.

(४४) निग्रहस्थान
चर्चा करताना ज्या मुद्द्यावर परिषदेत सहभागी झालेले सभासद, परीक्षक अथवा वादी यांच्याकडून प्रतिवादी किंवा प्रतिवादीकडून वादी यांना पराजित केले जाते, ती चर्चेतील जागा ठिकाण म्हणजे निग्रहस्थान होय. निगृहीत करणे म्हणजे पराजित करणे. निग्रह = नि:गृह = ज्याला घर उरले नाही असे करणे, जणु काही बेघर करणे, ‘कहीं का न छोडना !’, ‘पळता भुई थोडी करणे’. निग्रह म्हणजे ठाम निश्चय, आता तो बदलणे नाही. दुसऱ्याचा पराभव करून आपण जिंकणे. याचे तीन प्रकार आहेत :
१. ज्ञानवती परिषदेत त्या सदस्यांना, प्रतिपक्षाला आपला मुद्दा समजावा म्हणून तीन वेळा सांगूनही त्यांना अर्थ न कळणे म्हणजे त्यांचा पराभव झाला, असे समजणे; म्हणजेच आपला जय झाला, हे जाहीर करणे. (शहाण्या लोकांना तीनवेळा सांगूनही कळत नसेल तर त्यांना मूर्खच समजावे, असे ध्वनित केले आहे.)
२. अननुयोज्याचा अनुयोग : आधी काहीतरी वाक्यदोषयुक्त वाक्य, मुद्दा उपस्थित केल्यानंतर त्याच्या पूर्ण विरोधी वाक्य करणे, म्हणजे साधे बोलणे करणे; पण त्यानंतर त्याप्रश्नावर पुन्हा प्रतिप्रश्न किंवा त्या प्रश्नाचे कारण विचारणे. याचा अर्थ विनाकारण निरर्थक काहीतरी विचारीत राहाणे.
३. अनुयोज्याचा अननुयोग :अनुयोज्यच्या पूर्ण विरोधी वाक्य करणाऱ्या अननुयोज्य वाक्याच्या जोडीला इतर काही प्रश्न उपस्थित करून चर्चा भरकटत ठेवणे म्हणजे अननुयोग. जसे की “हा रोग कधीही बरा होणार नाही !” असे डॉक्टरने म्हटल्यानंतर रोग्याने “मग, तुम्ही कशाला आहात डॉक्टर?” असा प्रश्न विचारणे आणि पुढे डॉक्टरने “जणुकाही तू मरणार” असे सांगितल्यावरही रोग्याने पुन्हा “आत्मा अमर आहे, पुनर्जन्म असतो, कर्मफल भोगावेच लागते” असे काहीबाही बोलून मूळ रोगाकडे दुर्लक्ष होत राहील असे बडबडत राहाणे. (उदा. वाहिन्यांवरील नोटाबंदीची चर्चा चालू असताना आर्थिक प्रश्नाबरोबर राजकीय, सामाजिक, तात्त्विक प्रश्न विचारून चर्चा विस्तारणे, प्रत्येक मुद्दा खोडत नंतर संदर्भहीन काहीबाही विचारीत राहणे.)

वादमर्यादा
चर्चा चालू असताना काय बोलावे, काय टाळावे, याचे भान ठेवणे आणि त्याच वेळेस “आता पराभव झाला” असे म्हणावे किंवा म्हणू नये; हेच मुळात ठरवावे की नाही, याचा निर्णय घेणे म्हणजे वादमर्यादा होय. (तत्रैववादमर्यादालक्षणं भवति.. ). बऱ्याचदा बोलताना वितंडा होण्याची शक्यता असते. त्यावेळी “तुमचा पराभव झाला” असे म्हणण्याचा मोह होतो. तो टाळून पूर्ण विचार करूनच जर आपली बाजू यथार्थ व सार्थक रीतीने मांडली गेली असेल तर आणि तरच वादाला मर्यादा घालता येते, हे लक्षात घेणे आवश्यक आहे.

वादस्थल
वादस्थल म्हणजे ‘वाद करण्याची जागा’ असा अर्थ नाही. वाद करण्याची जागा ती ज्ञानवती परिषद. येथे स्थल म्हणजे चर्चेचा मुद्दा. चर्चेत युक्तिवादातील मुद्द्याची जागा म्हणजे वादस्थल. हा ‘वादाचा मुद्दा’ सोडून वाद करावयाचा नाही.

थोडक्यात, काटेकोर शिस्तबद्ध रीतीने वरील सर्व नियम पाळून केवळ सार्थक वाक्यांनी बनलेल्या युक्तिवादाची मांडणी करून चर्चा केवळ वादस्थलावर करणे म्हणजे वाद, असे चरकाचार्य नमूद करतात.
(अपूर्ण )

तुमचा अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published.