ध्यान-मीमांसा

विपश्यना, साक्षात्कार, वैज्ञानिक आकलन, मेंदूविज्ञान

——————————————————————————

       ‘आजचा सुधारक’च्या जून व जुलै 2016च्या भागामध्ये ‘साक्षात्कारामागील वैज्ञानिक सत्य’ व ‘साक्षात्कार : वैज्ञानिक स्पष्टीकरण’ ह्या दोन लेखांमधून डॉ. रवीन्द्र टोणगावकरांनी ‘साक्षात्कार’ची ह्या संकल्पनेचे वैज्ञानिक विश्लेषण केले होते. त्याच विषयाची दुसरी बाजू मांडणारा व त्याचबरोबर ध्यान, ईश्वर, भक्ती ह्या संकल्पनांचा गांधी-विनोबा परंपरेतला अर्थ विशद करून सांगणारा आणखी एका डॉक्टरांचा हा लेख, आजचा सुधारकची संवादाची परंपरा नक्कीच पुढे नेईल.

——————————————————————————

        आपल्यालेखनात डॉ. रवीन्द्र टोणगावकरांनी साक्षात्काराची वैज्ञानिक विश्लेषणात्मक बाजू मांडताना खालील विधाने केली आहेत: ‘‘ध्यानावस्थेत देवांच्या विचाराचा कैफ चढल्यामुळे किंवा त्या विचारांनी आलेली उन्मादावस्था, झिंग (God Intoxication) या अवस्थेत स्वतःच्या अंतर्मनातून आलेले जे विचार असतात, त्यांनाच अंतिमसत्य मानून, त्यावर भाबडा विश्वास ठेवून, त्यांना साक्षात्कार किंवा दैवी संदेश म्हटले जाते.’’

         ‘‘ध्यानधारणा, योगाभ्यास, आर्ट ऑफ लिव्हिंग, विपश्यना, सिद्ध-समाधि-योग, राजयोग इत्यादी साधनातून मिळणाऱ्या सुखामागे मेंदूत मुक्त होणारे Endorphins आहेत. कपालभाती, भस्रिका, सुदर्शनक्रिया ह्यांसारखे प्राणायाम करून आधी मेंदूतील रक्तपुरवठा कमी करून ‘कृत्रिमसंकट’, ‘स्ट्रेस’ निर्माण करायचे आणि या संकटामुळे मेंदूत निर्माण झालेल्या Endorphins मुळे मिळणारा तात्पुरता स्वर्गीय आनंद अनुभवायचा! या सर्व साधनातून मिळणारे स्वर्गीय सुख हे तात्कालीन आणि आभासी आहेत. Superior parietal lobe of brain च्या dysfunction मुळे होणाऱ्या loss of space orientation तून होणारा ‘अहम् ब्रह्मास्मि’ चा भ्रम (Hallucination) मात्र सत्य वाटायला लागतो.’’ डॉ. रवीन्द्र टोणगांवकरांना वरील बाब स्वानुभवाने पटलेली आहे.

         वरील विधानांचे विश्लेषण करताना आपण खालील बाबी प्रथम समजावून घेतल्या पाहिजेत. —

(अ) मनुष्याला आकलन कसे होते?

         आमच्या मेंदूचे (Cerebral Cortex) दोन भाग आहेत. डावा मेंदू वैज्ञानिक युगात प्रभुत्व असणारा (Dominant) मानला जातो, बुद्धीचे क्षेत्र आहे, तार्किक (rational) आहे, गणिती आहे, मोजमाप करू शकतो, cause आणि effect relationship हुडकून काढू शकतो, पुनरावृत्ती (replicability) ची शक्ती साठवून असतो आणि वैज्ञानिकतेची जननी आहे. सारांश बुद्धिप्रामाण्यतेने झालेल्या आकलनाचे ते क्षेत्र आहे, त्यातून Explicit knowledge प्राप्त होते. उजवा मेंदू मात्र सांस्कृतिक जाणीव, संगीताची मधुरता, रंगांची भाषा, भावनाशीलता, अंतःप्रेरणा इ.चे आकलन करणारे आहे. या आकलनात समग्रता असते (multifactorial perception), झालेल्या जाणिवेचा (अनुभूतीचा) उगम शोधता येत नाही./Multifactionial perception ची पारस्परिकता जाणणे (cosmic relationship) म्हणजे निसर्गाला जाणणे, त्याची पुनरावृत्ती करता येत नाही, ते व्यक्तिगत अनुभूतीचे क्षेत्र आहे. शब्दांच्या पलिकडचे आकलन, अंतर्मनाचा कल ओळखणाऱ्या ह्या ज्ञानाला Tacit Knowledge म्हणतात. बाह्य जगतातले निसर्गाच जे नियम बुद्धिप्रामाण्याने उकलले जाऊ शकतात, प्रतिष्ठापित करता येतात, प्रयोगाने सिद्ध केले जातात, त्यास विज्ञान म्हटले जाते. काही नियम आम्ही बुद्धीने, संशोधनाने सिद्ध केलेले असतात (विज्ञान); तरीही बरेच नियम अजून बुद्धिगम्य झालेले नाहीत, प्रयोगांनी सिद्ध करता येत नाहीत. मात्र त्यांचा अनुभव येतो. त्याची अनुभूति होते. त्यांना भ्रम म्हणणे अवैज्ञानिक ठरेल. ‘‘मला माहीत नाही.’’ हे म्हणणे अधिक वैज्ञानिक असेल. बुद्धी जेव्हा किंकर्तव्यमूढ होते, तेव्हा हृदयाची हाक मार्ग दाखविते. डावा मेंदू (बुद्धी) वैज्ञानिकतेचे वाहन आहे, उजवा (हृदय) अध्यात्मिकतेचे (निसर्गाशी एकरूपतेचे)!  

         मृत्यूच्या काही तासानंतर शरीर rigid कसे होते? शरीरातून काय निघून गेले, ज्यामुळे चेतनाच नष्ट होऊन चालत असलेले शरीर काष्ठवत होते? ते न दिसणारे चेतन तत्त्व, अस्तित्वातच नाही हे म्हणण्याला कोणता वैधानिक आधार आहे? स्वतःला चालविणाऱ्या चेतनतत्त्वाला तसेच निसर्गाला (Cosmos) चालविणाऱ्या तत्त्वाला आम्ही अनुभवतो की नाही? मानवाने नैसर्गिक नियमांची अवहेलना केली. म्हणून पर्यावरण संकट उभे राहत आहे. ह्यामागचे विज्ञान आम्हाला कळायला लागले की नाही? निसर्गाशी एकरूप होऊन जगणे जर आम्ही शिकलो नाही तर विनाश ओढवेल ह्याचे भान आम्हाला होत आहे ना?

         बुद्धिप्रामाण्यतेचा कस लावून, साक्षात्काराला भ्रम ही संज्ञा डॉ. रवीन्द्र टोणगावकरांनी दिली आहे. बुद्धिग्राह्यतेपलिकडे हृदयग्राह्य अनुभूती आमच्या जीवनाचा प्रत्यक्ष अनुभव आहे की नाही?    

         ‘तर्कालाच सत्य मानणे’ ह्या श्रद्धेचे नाव आहे अंध-अश्रद्धा! आपण अंधश्रद्धा जितकी चूक मानतो, अंध-अश्रद्धा तेवढीच चूक आहे.

ईश्वरीय संकल्पना कोणती?

         उत्क्रांत मनःस्थिती निसर्गाला ईश्वर (निर्गुण-निराकार) मानते. त्या अनाकलनीय देवाला (obstracl), निसर्गाच्या बुद्धिगम्य नसलेल्या नियमांना, बुद्धीने अंशतःच जाणले जाऊ शकते (विज्ञान). मात्र पूर्णत्वाचे आकलन बुद्धी करू शकत नाही. निसर्ग एक cosmos आहे, chaos नाही. निसर्गात परस्परपूरकता आहे आणि परस्परनियंत्रणही. त्या Abstract संकल्पनेला समग्रतेनेच जाणून घ्यावे लागले. ती शक्ती उजव्या मेंदूत (हृदय) आहे. बाह्य निसर्गातील ईश्वर मी अनुमानाने, अप्रत्यक्ष कल्पनेत आणू शकतो. मात्र माझ्यातील चेतनतत्त्वाला सिद्ध करायचे असेल तर ते चैतन्य कॉन्शन्स माझ्या हृदयातच व्हावे लागेल.

         सर्वसाधारण व्यक्तीला ही abstract साधना अशक्य वाटते, म्हणून आकलनाच्या मर्यादेत येणारी ईश्वरीय संकल्पना गुणसमुच्चयाची मानली गेली (सगुण-निराकार). कोणत्याही एका व्यक्तीवर साकल्याचा (देवत्वाचा, पूर्णत्वाचा) आरोप करता येत नाही. म्हणून एका-एका गुणामागे एक-एक अवतार (सगुण-साकार) अनुभवणे सोपे जाते. राम सत्याचे, बुद्ध करुणेचे, ईसा प्रेमाचे, महंमद शांतीचे, कृष्ण अनासक्तीचे प्रतीक! सगुण साकार देवाचे श्रेयस रूप म्हणजे गुरु. माझ्यासारखा हाडामांसात वावरणारा मानवदेह, त्याच्या गुणविशेषामुळे मला हवा-हवासा वाटतो. मला अनुकरणीय वाटतो. मात्र त्यावर साकल्याचा आरोप मी करत नाही. दत्तात्रेयाचे तेवीस गुरु मानले गेले. जर मी गुरूला देव मानायला लागलो तर गुरु पूजनीय होतो, अनुकरणीय ठरत नाही. मग माझे आरोहन (गुण-संवर्धन) खुंटते. ‘गुरु-गोविंद दोऊ खड़े काके लागूं पाय, बलिहारी गुरुदेव की, गोविंद दियो बताय।’’ हे गुरु जनसामान्यांचे पथप्रदर्शक ठरतात. त्यांच्या बुद्धिप्रामाण्याला नम्रतेची झालर असते. निसर्गाशी अद्वैत साधता आले नाही तरी परमोच्च द्वैताची उपासना करणारे पथप्रदर्शक असतील.

         माझ्यासारख्या सर्वसाधारण मनोवृत्तीच्या माणसाला सगुण-साकार देव भावतो. मी त्याचे आलंबन घेतो. मात्र आलंबन माझ्या अर्थासाठी घेतो, तो अर्थ स्थूल झाला, किंवा ज्या सूक्ष्मवस्तूच्या प्रकाशासाठी आलंबन घेतले तो प्रकाश गौण झाला, आलंबन बलवान ठरले, ज्या विचारासाठी आलंबन घेतले तो विचार झाकला गेला तर धोका उद्भवतो. आलंबन न घेतले तर विचार अस्पष्ट होतो. सद्भावना अव्यक्त रूपांत पसरत असते, परंतु विचार अव्यक्त रूपांत घनाकार होत नाही – म्हणून आम जनतेला त्याचे आकर्षण राहत नाही. आरोहणाची पहिली पायरी म्हणून आलंबन घेतले तरी पुढच्या पायरीवर आलंबन विसर्जित करून त्यामागील गुणावर/विचारावर (सगुण-निराकारावर) एकाग्र होता आले पाहिजे. सगुण-साकाराचा अहंकार सोडता यायला पाहिजे. आलंबन घेण्याचा धोका ओळखणारा आणि मनुष्य एक सामाजिक प्राणी आहे, व्यक्तीचे भले समाजाच्या भल्यात सामावलेले आहे, हे जाणणारा माणूस आपल्या विचाराच्या उत्क्रांतीने समाजाला ईश्वर मानेल (सगुण-निराकार). मग पंथ आणि संप्रदायापासून मुक्ती मिळेल आणि एक सामाजिक प्राणी म्हणून वावरत असताना मानवधर्माच्या गुणोपासनाकडे पावले उठतील, समाजनिष्ठा बाणवेल. दरिद्रनारायण आराध्य होईल. सामाजिक जीवनात सर्वधर्मसमभाव आणि समता, मैत्री आणि स्वातंत्र्याची मूल्ये जोपासली जातील. सर्वोदयाच्या परिधिमध्ये अंत्योदयाची वाटचाल सुनिश्चित होईल. सामूहिक समाजजीवनाचे पाथेय रेखांकित होईल.

         देवाची गरज माणसाला का भासते हेही समजून घेतले पाहिजे. निसर्गाने माणसाला बुद्धी दिली. तो स्वप्न बघू शकतो, संशोधन करू शकतो. मात्र मी मरणार आहे हे बुद्धीने जाणतो. परिणामतः जीवयोनीत मनुष्य सर्वांत असहाय्य आणि एकाकी प्राणी आहे. तो जीवनात आधार शोधत असतो (देवाचा, समाजाचा, गुरुचा). तो नात्यात जगतो, खोटा का होईना आधार पावतो. अन्यथा असुरक्षितता, एकटेपणा व मृत्यूचे भय त्याला वेडे बनवील! मानसिक आधार मनुष्यजीवनाची जैविक गरज (biological necessity of life) आहे.

ध्यान आणि संमोहनावस्था (Hypnotic Trance) मध्ये फरक तो कोणता?

         ध्यान म्हणजे स्वतःला पूर्णपणे जाणून घेण्याची क्रिया. ध्यानाचा पहिला अंश आहे – दोष निरीक्षण. जेव्हा आपल्यातील दोष दिसायला लागतात, तिथून उत्कर्षाचा प्रारंभ होतो. अहंकार प्रतीत व्हायला लागला तर समजावे की उत्कर्षाचा अंत झाला.

         ध्यानाचा दुसरा अंश आहे दोषनिरसनाचा संकल्प. जिथे दोष दिसले, त्यास स्वच्छ करून घेणे म्हणजे स्वाध्याय. ज्याचे चित्त शुद्ध असते, त्याला आपला अल्प दोषसुद्धा त्रास देतो, म्हणून तो आत्मनिंदा करतो. तो आपल्या दोषांना मोठे करून बघतो, दुसऱ्याचे दोष त्याला दिसत नाहीत. तो तुलना करीत नाही. आध्यात्मिक परीक्षणाचा हा मार्ग आहे. ध्यानाचा तिसरा अंश नम्रतेची पराकाष्ठा होऊन ईश्वराकडून मदतीची अपेक्षा म्हणजे भक्ती.

         ‘‘ध्यानात निद्रेतील तन्मयता असते. परंतु शून्यता नसते, जागृती असते. ती एक गाढ जागृत निद्रा आहे. आपल्या सर्व वृत्ती नष्ट होऊन केवळ एक वृत्ती-वर्तमान-बाकी उरेल ह्या अवस्थेचे नाव आहे ध्यान. ध्यानात व्यक्ती निरंतर सावधान असते.’’विनोबा

         ‘‘Awareness of whole process, both conscious and hidden, is meditation. The awakening experience, uncovering process of conditioning and going beyond is meditation. When thinker/observer look at the thing without label, without term, without symbol, is meditation.The very essence of self-knowledge is meditation.’’ – J. Krishna Murthy

         ध्यानाच्या अनेक पद्धती आहेत. काही संमोहनाचा (Hypnotism) आधार घेतात. संमोहन एक अर्धनिद्रित अवस्था आहे. संमोहित होणारी व्यक्ती, संमोहित करणाऱ्या व्यक्तीच्या आहारी जातो आणि तो जसे सुचवेल (suggestion/आदेश) तशी वागते. ‘अहंम् ब्रह्मास्मि’च्या समजुतीवर चित्तवृत्ती स्थिर करून सतत अभ्यासाने वृत्ती दृढ केली (programming of brain) म्हणजे हाच सत्याचा अनुभव आहे. आणि हाच आत्मबोध आहे. ही भ्रामक धारणा होऊन जाते. ती स्वतः बनविलेली चित्तवृत्ती आहे हे ध्यानात येत नाही. वारंवार पुनरावृत्तीमुळे दिलेले suggestion संमोहित अवस्थेत सत्य वाटायला लागते. मनुष्य स्वतःचा विवेक हरवून बसतो. अश्या संमोहित अवस्थेच्या (Hypnotic Trance) अर्धनिद्रित अवस्थेला ध्यान म्हणणे चुकीचे ठरेल, कारण त्यात विवेकपूर्ण चिंतनाची वाटचाल करण्याची शक्यता नाही. जी व्यक्ती विवेकी असेल, विचारनिष्ठ असेल, कमजोर नसेल, तिला संमोहित करता येत नाही. विवेकपूर्ण (श्रद्धा+बुद्धी) चिंतनासाठी जागृतता हवी, सजगता हवी ह्याशिवाय एकाग्रता साधता यायला पाहिजे. एकाग्रता साधण्याचे Hypnotic Trance एक अशुद्ध साधन आहे.

साक्षात्कार आणि भ्रम(Hallucinations) यांतील फरक कोणता?

         डॉ. टोणगावकरांनी आपल्या बुद्धिप्रामाण्यवादी भूमिकेतून (Explicit knowledge) साक्षात्काराला भ्रम म्हटले. ती Dominant Brain ची कसरत आहे. साक्षात्काराचा अर्थ आहे – जो चित्ताला चिंतनाद्वारे मान्य झाला, त्याचे डोळ्याने दर्शन होणे. ती एक अनुभूती आहे – Holistic multifactorial right brain perception. साक्षात्कार आणि Hallucinations चा छडा कसा लावायचा? दोन्ही projections म्हणून अनुभवता येतात. मात्र त्या projections च्या प्रकटीकरणामागे चित्ताला स्पर्श करणारी संवेदना ओळखता आली तर त्याला साक्षात्कार म्हणावे. साक्षात्काराची अनुभूती खरी की खोटी, ह्याची परीक्षा व्यक्ती स्वतः करू शकते. विषय-वासना शमली तर खरी, विषयवासना तीव्र झाली तर खोटी! संवेदनाचा स्पर्शही नसताना अचानक प्रकट झालेले projection हे Hallucination मानावे. संवेदनाला ओळखून त्याच्या स्पर्शाने प्रकटलेली Intense (तीव्र) भावना, Hallucination ला नाकारेल.

         ‘‘ईश्वराचे तीन साक्षात्कार – एक सर्वसामान्य जनतेच्या रूपाने, दुसरा विशाल प्रकृतीच्या रूपात आणि तिसरा अंतर्यामीच्या रूपात! विशाल वैज्ञानिक विश्व बाहेर उभे आहे, विशाल मानवता बाहेर उभी आहे, नीती आणि सेवेचे व्यापक क्षेत्र बाहेर उभे आहे, तितकेच विशाल एक तिसरे विश्व आहे – अंतर्विश्व। विज्ञानाचा अनुभव वैज्ञानिकांना, निष्कामसेवेचा अनुभव नीतिनिष्ठ सेवकांना होतो/दोन्ही अनुभव अपुरे आहेत, तिसऱ्या अनुभवाशिवाय, जो भक्तीद्वारा होतो. त्यात चित्ताच्या पलिकडचे जे दर्शन आहे, त्याचा साक्षात्कार होत असतो. ब्रह्मांडात परमात्म्याची सिद्धी तर्कावर आधारित आहे, तशीच पिंडात आत्म्याची सिद्धी स्वानुभूतीवर आधारलेली आहे. धर्म मुख्यतः Mystique experiences वर म्हणजे आत्मदर्शनावर आणि आत्मानुभूतीवर उभा असतो. त्याला श्रुती म्हणतात – धर्माचे मुख्य हार्द! मानवसेवा आणि निजनिष्ठेने मनुष्य शुद्ध होईल, विज्ञान-निष्ठेने बुद्ध होईल, मात्र सिद्ध तेव्हाच होईल जेव्हा निज-चेतनेच्या आविर्भावाचा त्याला अनुभव होईल.’’

माझा विपश्यनाशिविराचा अनुभव

         एकाग्रता साधण्याची विपश्यना ही एक पद्धती आहे. मला ती अत्यंत वैज्ञानिक वाटली. त्याला ध्यान म्हणणे चुकीचे ठरेल. एकाग्रता साधण्याचे ते एक साधन आहे (technique). ध्यानासाठी एकाग्रता साधणे ही पहिली पायरी आहे. ‘आनापान’ प्रक्रियेत नाकपुडीतून आत-बाहेर होणाऱ्या श्वासावर लक्ष केंद्रित करणे शिकविले जाते. मनुष्याच्या शरीरातील अत्यंत संवेदनशील स्थानांपैकी एक स्थान नाकपुडी हे आहे. आत-बाहेर होणाऱ्या श्वासासोबत हलणाऱ्या केसांची संवेदना ओळखता येते. श्वासाच्या हालचालीवर चित्त एकाग्र करणे साधले, मन भटकू दिले नाही, तर कायेच्या अन्य भागांवर एकाग्र होणे सुचविले जाते. डोळ्यांवरील केसांच्या हालचालीवर मन केंद्रित होणे जमले तर कायेच्या इतर भागावर मन केंद्रित करताना संवेदनेचा एक प्रवाह मनासोबत धावताना (शरीरावर) अनुभव करता येतो. ह्या संवेदना आपल्या कायेवर नित्य असतात पण आपण त्याची उपेक्षा करीत असतो. एकाग्र मनःस्थितीत त्या जाणवतात. ह्याला काया-विपश्यना म्हणतात.

         मात्र ह्या संवेदनेच्या प्रवाहासोबत खेळत राहिले तर विपश्यनेची पुढली पायरी गाठता येत नाही. ह्या पुढच्या पायरीला चिंतनोपश्यना म्हणतात. विपश्यना शिविरात रोज संध्याकाळी गोयन्काजीद्वारा जी ‘धर्मचर्चा’ होते, त्यातून आत्मचिंतनाकरिता बरेच खाद्य मिळते. त्या विचारावर एकाग्र होऊन सहजगत्या विश्लेषण सुरू होते, चिंतनोपश्यनाला चालना मिळते. चिंतनोपश्यना साध्य व्हायला लागली तर ‘मौन’ हवे-हवेसे वाटायला लागते. त्यात अवरोध झालेला आवडत नाही. आत्मचिंतन आणि आत्म-मूल्यांकनाचा मार्ग सुकर होतो. आपले दोष दिसायला लागतात. आपल्या जमेच्या चित्तवृत्तीची ओळख व्हायला लागते. आपल्या खोल चित्तात दडलेली photo-negative point, positive print होऊन स्पष्ट व्हायला लागते. पुढचा मार्ग दिसायला लागतो. मैत्र-साधनेचा प्रभाव मनावर बिंबतो. चिंतनोपश्यना जागृतावस्थेत, दैनंदिन जीवनातही करता येते असा विश्वास बळावतो. अंतर्मनात उठलेल्या सद्भावना क्रियान्वित करून घेण्याची प्रेरणा व्हायला लागते. चिंतनोपश्यनाच्या स्टेशनपर्यंत न पोहचणाऱ्या शिबिरार्थी मित्रांमध्ये काया-विपश्यना हे एक कर्मकांड होऊन राहिल्याचे मला जाणवते.

आपल्यातले वृत्तिदोष आवरणे शिकण्याचा कल व्यवहारात जाणवतो.

         मात्र संवेदनाच्या स्पर्शाने विकसित होणाऱ्या चिंतनोपश्यनेचा शोध बुद्धाने लावला. स्पर्श, दृष्टी आणि श्रवणातून संवेदना चित्ताशी संपर्कात येते. ह्या संवेदना प्रथम ओळखल्या जातात (recongnised), मग स्मृती (memory) सोबत match केल्यावर त्यांचे assimilation आणि analysis (विश्लेषण) होते. स्मृतीत Bias जर खोलवर दडलेले असतील तर मनुष्य reflexly (विचार-विश्लेषण न करता) प्रतिक्रिया (reaction) देतो. चिंतनोपश्यनेत स्पर्श करणाऱ्या संवेदनांच्या जुन्या विरोधीस्मृतीची उपेक्षा करून वर्तमानांत पुनश्च विवेकाने विश्लेषण करूनच मग विपश्यक कृतिपर होतो. (thoughtful action). प्रतिक्रिया तीन प्रकारे प्रकट होऊ शकते – 1) Motor action (बोलणे, लिहिणे, शारीरिक हालचाली), 2) भावनांच्या रूपात Body language द्वारे आणि 3) Projections (Visual-Auditory) – अनुभूतीच्या दर्शनाने.

         सारांश विवेकपूर्ण प्रतिक्रिया देण्यास शिकणे म्हणजे चिंतनोपश्यना. ह्यासाठी संवेदनेच्या पाठीशी असणारा हेतू पूर्वाग्रहाची उपेक्षा करून ओळखायचा असतो आणि प्रतिक्रिया विवेकी असावी ह्याचे भान ठेवायचे असते. चित्ताच्या आरोहणाचा (चित्तशुद्धी) मार्ग मग उघडतो. चित्तशुद्धी आचरणात प्रकट व्हायला लागते. प्रत्येक क्षणी जागृतता व संयम (तटस्थ वृत्ती) बाळगून दैनंदिन आचरणात त्यास उतरविणे ही ध्यानसाधनेची दुसरी पायरी.

         चित्तशुद्धी योग्य मार्गावर (निसर्गाशी एकरूपता) अग्रेसर होत आहे, ह्याची जाणीव अनुभूतीच्या आधारे होते. मनात निर्माण होणारे समाधान, कृतकृत्यता, मैत्र, आनंद (मुदिता) आणि शांती ह्यांची अनुभूती ही स्वतःमध्ये वास करणाऱ्या निसर्गासोबत (कॉन्शन्स, चेतना)च्या आपल्या एकरूपतेची ग्वाही असते. त्या अनुभूतीच्या स्मृती स्थायी असतात. प्रत्येक व्यक्तीच्या जीवनात असे प्रसंग येतात मात्र ते क्षणिक असतात. चिंतनोपश्यनेत अश्या सरजनशील आठवणींना उजाळाही देता येतो. मात्र ध्यान-साधनेत अश्या अनुभूतींचे सातत्य साधनेद्वारे शिकायचे असते.            

ध्यानाचे प्रयोजन चित्तशुद्धी आहे, हे विसरू नये!

संपर्क : ईमेल : ulhasjajoo@gmail.com

तुमचा अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published.