काश्मीर, हिंसा, काश्मिरी पंडित, मुस्लिमप्रश्न
—————————————————————————–
भारत-पाक फाळणीला आता 70 वर्षे होतील. पण काश्मीरमधील पेचप्रसंगाने ही जखम अजूनही भळभळती ठेवली आहे. गेले सहा महिने तर तेथे कर्फ्युच लागलेला होता. लष्करी बळावर आपण काश्मीर भारतात भौगोलिक दृष्ट्या राखू शकू. पण त्यातून उद्भवणारे राजकीय-सामाजिक-सांस्कृतिक प्रश्न आपली पाठ सोडणार नाहीत. थेट काश्मीरला जाऊन तेथील विविध जनसमुहांशी थेट संवाद करून तेथील परिस्थितीचा एका पुरोगामी कार्यकर्त्याच्या दृष्टीने धांडोळा घेणाऱ्या रिपोर्ताजचा हा पूर्वार्ध.
—————————————————————————–
1 ऑक्टोबर 2016
राष्ट्र सेवा दलाच्या ट्रस्टीमंडळाने गुजरातमधील उना व काश्मिरमधील सध्याच्या परिस्थितीचे अवलोकन करण्यासाठी मला पाठविण्याचा निर्णय घेतला म्हणून मी 1 ऑक्टोबर रोजी नागपूर-दिल्ली-जम्मू विमानाने सकाळी 11 वाजेपर्यंत जम्मूला पोहोचलो. उतरल्याबरोबर माझा मोबाईल बंद झाला. काश्मिरवरची भारत सरकारची पहिली उपाययोजना! सगळी संपर्काची साधने सरकारच्या मर्जीने बंद! गंमत म्हणजे तिथे आणीबाणी लागू केलेली नाही. मी आणीबाणीचा काळ बघितल्यामुळे मला हे अघोषित सेन्सॉरशिपचे रूपच वाटले.
जम्मू विमानतळावरून एक टॅक्सी बोलावली होती. तिने सरळ जम्मू-श्रीनगर हायवेवरील जागती नावाच्या काश्मिरी पंडितांच्या कॉलनीत गेलो. तेथे सायंकाळपर्यंत पंडितांचे नेते त्रिलोकनाथ पंडित (वय वर्षे 88) व कॉलनीतील इतर लोकांशी बोललो. 2006 मध्येही मी तिथे गेलो होतो. तेव्हा हे सगळेजण दहा बाय दहाच्या पत्र्याच्या शेडमध्ये अत्यंत दाटीवाटीने राहत असलेले मी पाहिले होते. यावेळी एकदम पुण्या-मुंबईतील बऱ्या हौसिंग सोसायटींच्या धर्तीवर एकसारख्या इमारतींची रचना, मध्यभागी मोकळ्या जागेत बाग. बागेत मुलांना खेळण्यासाठी सी-सॉ, घसरगुंडी आणि इतर प्रकारही दिसले. त्रिलोकीनाथ पंडितांच्या घराच्या भिंतीवर 2007 साली त्यावेळचे पंतप्रधान मनमोहन सिंहांनी उद्घाटन केलेले फोटोसुद्धा पाहिले. माझ्या मागील भेटीतील पाहिलेल्या नरकापेक्षा आताची वसाहत बरीच चांगली, ऐसपैस बांधलेली दिसली. कॉलनीला शॉपिंग कॉम्प्लेक्स, 10 खाटांचे हॉस्पिटल इ. सोयी पाहून मन निवले. आता ही मंडळी काश्मिरात परत न येण्याचा धोकाही मला त्यात दिसला. कारण 2006 साली मी त्यांना काश्मिरात गेल्यावर हुरियतच्या नेत्यांना काश्मिरचे काहीही होवो पण काश्मिरी पंडितांशिवाय सब झुट! म्हणून हुरियतने काश्मिरी पंडितांना परत आणण्याची आपल्यापरीने सुरुवात केल्याचे मी ऐकले होते; पण आता ही कॉलनी पाहून माझी उरलीसुरली आशाही मावळली. त्रिलोकीनाथांनी समोरच्या फ्लॅटमधील उडशीच्या अंजली रैनांना चहा करण्याची आज्ञा केली. त्या चहा घेऊन आल्यावर बसल्या बसल्या म्हणाल्या, “आम्ही मुसलमानांना म्लेंच्छ (नीच, अस्पृश्य) समजतो, म्हणून त्यांना आमच्याकडे मुक्त प्रवेश नाही, आम्ही त्यांचे भांडे वेगळे ठेवतो”. मनातल्या मनात म्हटले- कुठले हे लोक काश्मिरला येतात?’ अन् बाई चक्क बोलल्या, ‘‘मेरी बेटी पुणे हिंजवडी के आय.टी. में बडी पोस्ट पे है. हमने वहॉं फ्लैट भी ले लिया है और मैं भी वहॉं रहने जा रही हूँ.’’ मी तुम्हाला काश्मिरला घ्यायला आलो हे बोलायचीही सोय नव्हती. म्हणाली, “आम्ही पंडित पुऱ्या दुनियेत 60 लाख आहोत. इथे जम्मू परिसरातील आमचा कॅम्प जागती बाजूचा नगरौटा व जम्मूच्या वरच्या अंगाला मिस्त्रीवालामध्ये आम्ही एकूण 3 लाख आहोत. उरलेले 57 लाख देश-विदेशात फैलावले आहेत आणि आता त्यांपैकी कुणाचीही इकडे यायची इच्छा नाही”. संघ परिवार ऊरबडवेगिरी करून काश्मिरी पंडित, काश्मिरी पंडितचा हेका धरून हिंदूंच्या भावना भडकावण्याचा अव्याहतपणे उद्योग करतात अन् हे पंडित आपल्या करियरसाठी वाट्टेल तेथे (काश्मिर सोडून) जायला निघालेले पाहून तर मला वाटून गेले काश्मिरी पंडितांची समस्या येत्या 10 वर्षांत संपलेली असेल; कारण अंजली म्हणाली, “जागती कॅम्पमधील पाचशेच्यावर मुलेमुली इंजिनिअरींग, एम.बी.ए., मेडिकल इ. उच्च विद्यांमध्ये पारंगत होऊन देश विदेशाबाहेर चांगल्या पगारांवर कामाला लागलेले आहेत. 100% साक्षरता; यात मुलेमुली सारखीच. पंडितांची आधीचीपण स्थिती चांगलीच होती. आतातर ते स्ट्रगल फॉर रेझिटन्सच्या भावनेने खूपच मेहनतीने मन लावून शिकत असून आपल्या मुलांना शिकवण्यासाठी सर्वस्व पणाला लावत आहेत!”
तेथून 8-10 कि.मी.वरील नगरौटा कॅम्पला गेलो. नगरौटाला आर्मीचे खूपच मोठे सेंटर असून त्याला लागूनच असलेला पंडितांचा जागतीसारखाच मल्टीस्टोरी कॉम्प्लेक्स मला पाहायला मिळाला. मी तिथे पूर्वी येऊन गेल्याचे त्यांना आठवले, म्हणून त्यांच्या ऑफिसात सगळे पदाधिकारी जमा झाले; पण सगळ्यांचा एकच सूर – “खैरनार साहब आप और कुछ मत कीजियें. हमें पर पर्सन 2500 भत्ता महिने का मिलता है. 9 किलो अनाज मिलता है और पर फॅमिली 10,000 रुपये महिने के मिलते हैं. इन्हे बढ़ाने का काम करो.” मी त्यांना म्हणालो की, मी यांतील एकही काम करू शकणार नाही; पण मी तुम्हाला मागे काश्मीर घाटीमध्ये घेऊन जाण्याचे जे बोललो होतो ते प्रत्यक्षात आणण्याचा प्रयत्न करीन. यावर सर्वांनी एका एका आवाजात सांगितले की आम्हाला घरीच नेणार असाल तर आमची स्वतंत्र कॉलनी सुरक्षेच्या कवचात करा. मी म्हटले, “आपको अपने पुश्तैनी घर ले जाने का मेरा इरादा है,” जे त्यांनी साफ नाकारले. मी त्यांना म्हणालो, “तुमच्या सुरक्षेसाठी वेगळी कॉलनी करणे हे सगळ्याच अर्थाने चुकीचे आहे. त्याने उलट तुम्ही अलगथलग पडून जाल व असुरक्षतेची तलवार आयुष्यभर तुमच्या डोक्यावर टांगती राहील”, तर ते म्हणाले, “मग आम्ही इथे काय वाईट आहोत? उलट आमची मुलेमुली शिकूनसवरून देश-दुनियेत जात आहेत. हम भी यहाँ कहाँ रहनेवाले हैं? चले जायेंगे बच्चों के साथ इधर उधर.”
1 ऑक्टोबरचा आख्खा दिवस दोन कॅम्प्समध्येच गेला. रात्री हॉटेलच्या खोलीवर मिश्र भावनांचा कल्लोळ घेऊन आलो. त्यांची सुस्थितीतील घरे पूर्वीच्या खुराड्यांपेक्षा बरी होती व त्यामुळेच की काय दहा वर्षांत त्यांच्यातील आत्मविश्वास व जिद्द, मुलांच्या शिक्षणासाठी एकजात त्यांचे चाललेले प्रयत्न पाहून बरेही वाटले. पण गेल्या भेटीत काश्मिरी पंडितांचे विविध नेते मला सांगत होते की –काश्मिरीयत के असली प्रतिनिधी हम ही हैं. हमारी ही संस्कृती 5000 साल पुरानी है, इसलिये काश्मिर पे हमारा हक हर तरह से जायज है. इ.इ. यावेळी त्यांच्यापैकी एकानेही माझ्या फोनला, मेलला उत्तर दिलेले नाही. कदाचित त्याचे कारण हेच तर नसेल?
2 ऑक्टोबर, 2016
गांधी जयंती. मी काश्मिरी पंडितांच्या तिसऱ्या कॅम्पला – मिस्त्रीवाला – जायचा विचार केला, तर काश्मिर टाईम्सचे संपादक प्रबोध जमवाल म्हणाले, “कल आप दोनो कॅम्पो में हो आए. आज आप तिसरे कॅम्प में क्या नया पाओगे? यहाँ से 40 कि.मी. पर बॉर्डर है और उरी के घटना के बाद बॉर्डर के गांवो का क्या हाल है यह आपको देखना चाहिए.” म्हणून मी रणवीरसिंह पूरा या सीमेपलिकडील भागात गेलो. जम्मूपासून पंजाबच्या दिशेने 40 कि.मी. संपूर्ण बासमतीचे कापणीला आलेले पाच-साडेपाच फूट उंचीचे भाताचे पीक पाहून मी तर हरखून गेलो. भारताच्या सगळ्याच प्रदेशांमध्ये जायचा योग आलेला. स्वतः शेतकरी कुटुंबातील जन्मलेला, म्हणून इतके जबरदस्त पीक पाहून राहवले नाही. मी गाडीतून उतरून शेतात घुसलो व फोटो काढायचा प्रयत्न केला पण मी शेतात दिसत नव्हतो. शेवटी बांधावर चढून फोटो काढला. ही शेती जम्मूनंतर सुरू होते ते थेट बॉर्डरच्या पलीकडेपण! मध्ये फक्त तारांचे कुंपण. पलीकडे सियालकोट जिल्ह्याचे शेतही बासमतीने डौलत असलेले दिसत होते! अशा तऱ्हेने सीमांचे प्रदेश पाहिले म्हणजे मला नेहमी प्रश्न पडतो की, कोणा मूर्खाच्या हाती कागद व पेन्सील आली व त्याने ह्या रेघोट्या ओढल्या? भारत-पाकिस्तान, इराण-इराक इ.इ. माती, पाणी, हवा, पक्षी, जनावरे व सर्वांत महत्त्वाचे म्हणजे माणसे व बाया सगळे सारखेच! सीमांचा खेळ आतातरी तथाकथित सुधारलेल्या, स्वतःला सभ्य म्हणवणाऱ्यांनी बंद करायला हरकत नाही. अन्यथा माणूस अजूनही सुधारला नाही असेच म्हणावे लागेल.
रणवीरसिंहपुरापासून 10-12 कि.मी वरील एकदम सीमेवरचे अब्दुलीनिया गाव गाठले. इनमीन शे-सव्वाशे घरे, 3 बंकर, मेजॉरिटी जाट शेतकरी, सगळी पक्की घरे, घरी दुधाची रेलचेल अन् बासमतीची शेती. सगळे गाव समृद्ध वाटले; पण उरीनंतर गावांवर युद्धाची अवकळा पसरलेली. गावात फिरता फिरता सायंकाळ झाली तो अजानीचे सूर आले. अजान येत आहे ते गाव कुठले? तर नंदपूर. मी विचारले, “हे भारतातील का?” म्हणाले, “नाही. पाकिस्तानातील सियालकोट जिल्ह्यातील.”
थोड्या वेळाने अजून वेगळ्या अजानीचे सूर आले. म्हटले, ‘हे कोणते गाव?’ तर म्हणाले, ‘कुंजापूर!’
मी हटकून विचारले, “गावांची नावे अजून नंदपूर, कुंजापूरच आहेत?” तर ठासून म्हणाले, “हो’ आणि आमचे गाव अब्दुलिनिया नाही का?” अब्दुलिनिया तीन बाजूंनी पाकिस्तानी सीमांनी वेढलेले आहे. फक्त एका बाजूने रणवीरसिंहपुरासाठी जो रोड जातो तोच काय तो अॅक्सेस. आमच्या देखत सूर्य मावळतीला लागला होता व गावात लगबग सुरू झाली. म्हटले, “काय झाले?” म्हणाले, “आर्मीचे ट्रक व बसेस सायंकाळी येऊन समस्त गावाला घेऊन जातात व रात्रभर रणवीरसिंहपूराच्या आयटीआय व खुल्या स्टेडिअममध्ये ठेवून सकाळी परत आणून पोहोचवतात. गुरे, ढोरे सगळे सामान सोडून.” हा रोजचा प्रकार.. आपण भारताच्या मध्यवर्ती राहणारे लोक 62, 65, 71 ची युद्धे वीरस्य कथा म्हणून वाचत, पाहत, ऐकत आलोत. 400 वर्षांपूर्वी मावळे, शिवाजी व थोडेफार पेशव्यांचे युद्धाचे प्रसंग सोडले तर आपल्या वाट्याला हा अनुभव कधी येतो का? मला हा प्रश्न सीमेवर उभा असताना वारंवार पडत होता. काही माणसे किती असुरक्षित व आपण किती सुरक्षित याचे वैषम्य वाटत होते व युद्धस्य कथा रम्या ह्या प्रकाराचीही लाज वाटत होती. कारण युद्धाची प्रत्यक्ष झळ न लागणाऱ्या समाजाला ते करमणुकीचे साधन वाटते. प्रत्यक्ष युद्धसीमेवर लढणारा सैनिक असो वा तेथील रहिवासी यांच्यासाठी ‘आपुलें मरण पाहिलें मीं डोळां’ या म्हणीचे प्रत्यंतर क्षणोक्षणी येत असते. म्हणून सत्तेच्या सोंगट्या खेळणाऱ्या जगातील समस्त सत्ताधिशांना माझे या निमित्ताने आवाहन आहे की, ‘आयजीच्या जीवावर बायजी उदार’वाला हा मामला बंद करा. तुमच्या खेळापायी लाखो लोकांचे प्राण, जीवन धुळीला मिळते, त्याचे काय? आणि आपण खरेच सभ्य झालो असे वाटत असेल तर यापुढे युद्धखोरीचे खेळ बंद करून आपण शांततेची कास धरूया. युद्ध ही रानटीपणाची खूण आहे. माणूस ते जेवढ्या लवकर थांबवेल तेवढे समस्त मानवाचे कल्याण होईल. भारत व पाकिस्तान एकमेकांच्या शत्रुत्वापोटी जगाच्या संरक्षणखर्चाच्या 3/4 बजेट खर्च करत आहेत. . दोघांच्या प्राथमिक गरजा अजून पूर्ण व्हायच्या आहेत. बकालपणा, दारिद्र्य, भूकबळी, अनारोग्य इ. मूलभूत समस्यांच्या सोडवणुकीसाठी दोघांच्या बजेटमध्ये नाममात्र व्यवस्था आहे. संरक्षणावरचा खर्च कमी केला तर दोन्ही राष्ट्रांचे प्राथमिक प्रश्न सुटायला मदत होईल व त्यामुळे दोन्ही देशांची सर्वार्थाने भरभराट होईल. पण ह्यासाठी दोन्ही देशांधील सभ्य समाजानेच पुढाकार घेऊन आपल्या राज्यकर्त्यांना वठणीवर आणण्याचे काम अग्रक्रमाने करायला हवे. दोन्हीकडच्या सुजाण लोकांचा या बाबतीत सहभाग घेऊन आपण हा पागलपणा थांबवून आपापले खरे प्रश्न सोडवून गुण्यागोविंदाने नांदलो तरच आपल्या येणाऱ्या पिढीला आपण शांत, सुस्थितीतील भविष्य देऊ शकू. अन्यथा आपली भावी पिढी आपल्याला जाब विचारू शकते असे या सीमेवरच्या आजच्या प्रवासातून माझ्या मनात येऊन गेले.
3 ऑक्टोबर 2016
जम्मूहून सकाळी 10च्या विमानाने श्रीनगरला जाण्यासाठी विमानतळावर आलो असता तपासणीचा नवाच अनुभव वाट्याला आला. सहा जागी स्कॅनिंग प्लस कैक जागी बॅगा उघडून सर्व सामान बाहेर काढून दाखवण्याचा प्राणायाम. हे कमी होते की काय म्हणून चक्क विमानात लगेजमध्ये जाणाऱ्या बॅगला ‘ही माझी बॅग’ म्हणून विमानाजवळ जाऊन बोर्डिंग पासवर टिकमार्क करून आल्यावरच बॅग विमानाच्या आत फेकतात. 15-20 मिनिटांतच श्रीनगर आले. मला माझे पॅलेस्टाईन यात्रेतील मित्र मोहम्मद याकुब दार घ्यायला आले होते. ते मला विमानतळावरून थेट त्यांच्या एका नातेवाईकाच्या लग्नसमारंभात घेऊन गेले. अर्ध्या तासातच आम्ही गुलशन नावाच्या श्रीनगरमधल्या कॉलनीत पोहोचलो. 9 जुलैपासून बंद, कर्फ्यूत असलेले काश्मिर, तुरळक वाहतूक. सगळ्यात जास्त वाहतूक होती सुरक्षादलांची. सामान्य लोक अगदीच नाईलाजाने, जावेच लागते म्हणून भीत-भीत वावरताना दिसत होते. भीतीचे सावट लग्नघरावरही दिसले. इनमीन 15-20 लोक (बाया माणसे, मुले-मुली धरून) होते. गाजावाजा नाही, लगीनघाईत असलेली धांदल, गोंधळ काही नाही. स्मशानशांतता वाटावी असा माहोल. सगळे चूपचाप! मला एका खोलीत नेल्यावर पाचेक मिनिटांतच लग्नातील बहुसंख्य माणसे माझ्या खोलीत आली. चारी बाजूंना खाली दाटीवाटीने बसून माझ्याशी बोलू लागली. त्यात निम्म्यापेक्षा जास्त बायकाच होत्या व एकीनेही बुरखा घेतला नव्हता. चक्क दोन-अडीच तास आमची लग्नापासून ते काश्मिरच्या आंदोलनापर्यंत अनेक प्रश्नांवर मनमोकळी चर्चा झाली. या चर्चेत बायकांचा सहभाग विलक्षण प्रभावकारी, लक्षणीय होता. सर्वच बायका सुशिक्षित असून त्यांना सर्व प्रश्नांची विलक्षण समज होती. हा तेथील चळवळीचा परिणाम की एकूणच काश्मिरची खासियत असा मला प्रश्न पडला. शादीची दावत जरी छोटेखानी असली तरी काश्मिरीयतचा परिचय होण्यात यजमानांनी कसलीच कसर ठेवली नव्हती. विलक्षण उदार, आत्मीयतेने ओतप्रोत, अत्यंत मोकळेढाकळे असे काम वाटले. आपल्या घरांमध्ये आपण इतक्या नवख्या व्यक्तीला एवढ्या कमी वेळात आपल्यात सामील करून घेतो का? मला तरी पुन्हा पुन्हा हाच प्रश्न पडला. (अपूर्ण)
सुरेश खैरनार
ईमेल: sureshkhairnar59@gmail.com