भारतीय चर्चापद्धती (भाग ४)

चरकसंहिता : वादविद्येचे प्रात्यक्षिक

चर्चापद्धती, चरकसंहिता, वादविद्या

——————————————————————————–

         ‘भारतीय चर्चापद्धती’चा इतिहास सांगणाऱ्या ह्या लेखमालेच्या ह्यापूर्वीच्या भागात आपण आन्वीक्षिकीचा परिचय करून घेतला. आयुर्वेदाने ह्या पद्धतीचे उपयोजन तज्ज्ञ मंडळींमध्ये मानवी आरोग्यविषयक चर्चा घडविताना अतिशय प्रभावी पद्धतीने केले. चरकसंहितेच्या आधाराने लिहिलेल्या ह्या लेखातील विद्वज्जनांच्या परिषदांबद्दलची अनेक निरीक्षणे आजही प्रासंगिक ठरू शकतील.

——————————————————————————–

         आन्वीक्षिकीचा एक मुख्य विषय बनलेली हेतुविद्या (तार्किक कारणांचा सिद्धान्त) ही तर्कविद्या (वादकला) आणि वादविद्या(चर्चाकला) या नावांनीही ओळखली जात असे. विद्वान लोकांच्या परिषदांमधून तिचा विकास संथगतीने अनेक शतके होत गेला. या परिषदांना संसद, समिती, सभा, परिषद अथवा पार्षद असे म्हटले जात असे. ही परिषद चार, दहा किंवा एकवीस ब्राह्मणविद्वानांची असे.

तन्त्रयुक्ति

        या परिषदांमध्ये ज्या संज्ञा वापरल्या गेल्या, त्यांच्या रचनेतून ‘तन्त्रयुक्ति’ नावाचे तांत्रिक शब्दांनी बनलेले शास्त्र निर्माण झाले. ‘तन्त्रयुक्ति’चा अर्थ ‘शास्त्रीय विवेचनाच्या पद्धती’ असा होतो. पंडित र. पं. कंगले यांच्या मते ‘येथे तन्त्र म्हणजे शास्त्र’. या शास्त्राचा ‘विचार’ हा विषय असल्याने ‘तन्त्रयुक्ति’ हे विचार करण्याचे शास्त्र आहे.

         डॉ. सतीशचंद्र विद्याभूषण यांच्या मते सुश्रुतसंहितेनुसार परिषदांमधील ही ‘तन्त्रयुक्ति’ एक समग्र चर्चापद्धती म्हणून बहुधा इ.स.पू. सहाव्या शतकात आकाराला आली असावी. आन्वीक्षिकीचा प्रस्थापक मेधातिथी गौतम (इ.स.पू. ५५०) याने आन्वीक्षिकीचे जे मुख्य सिद्धान्त सुव्यवस्थितपणे रचले, ते चरकसंहितेत आणि न्यायसूत्रांत आढळतात.

        चरकसंहितेचे मूळ नाव आयुर्वेदसंहिता. तिचा मूळ प्रणेतालेखक पुनर्वसू आत्रेय (इ.स.पू. ५५०) हा आन्वीक्षिकीचा एक गुरु. चरकाने (इ.स.पू.७८) मूळ संहितेचे काटेकोर संपादन करून आन्विक्षिकीचे सिद्धान्त आयुर्वेदात समाविष्ट केले, तीच चरकसंहिता म्हणून प्रसिद्ध झाली.

        ज्ञानशास्त्र या अर्थाने पाहता ज्ञान म्हणजे काय ? सत्य व यथार्थ ज्ञानाची लक्षणे कोणती ? ज्ञानाचे मार्ग कोणते ? ज्ञेयवस्तूचे स्वरूप काय ? अनृत/भ्रम म्हणजे काय ? ज्ञानाचे वितरण कसे होते ? ज्ञानाचा अधिकारी होण्याची पात्रता काय, इत्यादींची चर्चा चरकसंहितेत आढळते.

        चरकसंहिता ही गुरुशिष्यांतील शास्त्रीय विषयावर संभाषाविधिच्या स्वरूपात केलेली चर्चा आहे. यात सुमारे पासष्ठ ऋषींचा उल्लेख असून विविध परिषदांची माहिती दिली आहे.

तद्विद्यसंभाषा

        तद्विद्यसंभाषा ही ज्ञानाची आणि चर्चेची ‘तन्त्रयुक्ति’पूर्ण पद्धती होती. तेथील निर्णय हे सिद्धान्त म्हणून मान्य केले जात असत. (सिद्धान्तोनामयः परीक्षकै: बहुविधं परीक्ष्य हेतुभिश्च साधयित्वा स्थाप्यते निर्णय: ) मिळेल तेथून ज्ञान ग्रहण करावे, त्याची परीक्षा करावी आणि मगच त्याचा स्वीकार करावा (विविधानि शस्त्राणि ….च ), प्राणी, वनस्पती, शैवाल इत्यादी सारे काही सजीव असून औषध म्हणून मानवाला ते सारे उपयुक्त आहेत, ही आंतरविद्याशाखीय दृष्टी चरकसंहितेत आढळते.

        वादविधीची चर्चा चरकसंहितेच्या ‘विमानस्थान’ या तिसऱ्या प्रकरणात आहे. या विमानस्थानातील ‘रोगभिषग्जितीय विमान’ या आठव्या अध्यायात रोगाची चिकित्सा व उपाय यांची माहिती आहे. ती योग्य रीतीने व्हावी, याची पूर्वअट म्हणून गुरुशिष्यपरंपरा आणि त्यांच्या उत्तमतेची, पात्रतेची लक्षणे स्पष्ट केली आहेत. गुरु-शिष्यांत ज्ञानाचे यथार्थ आदान-प्रदान व्हावे याकरिता अध्ययन, अध्यापन आणि तद्विद्यसंभाषा हे शास्त्र जाणण्याचे तीन उपाय, तसेच वादमार्ग इत्यादी सांगितले आहेत. त्यातील तद्विद्यसंभाषेचे स्वरूप पुढीलप्रमाणे :

तद्विद्यसंभाषा

        एका वैद्याने दुसऱ्या वैद्याबरोबर शास्त्रीय विषयाची चिकित्सा करणे म्हणजे तद्विद्यसंभाषा. त्या अनुषंगाने दोन किंवा अधिक विद्वानांमध्ये केली जाणारी शास्त्रीय चर्चा म्हणजे तद्विद्यसंभाषा, असे चरक नमूद करतात. तद्विद्यसंभाषा ही अथांग ज्ञानाचे भांडार खुले करते. याचा अर्थ असा की ती सहभागी व्यक्तींना सभाचातुर्य, वाक्शक्ती(भाषाप्रभुत्व), आत्मविश्वास देणारी, त्यांचा संशय दूर करणारी, तसेच चर्चाविषयास स्थिरता देणारी असतेच, पण उपस्थित प्रेक्षक किंवा साक्षीदारांनाही हे सारे गुण ती बहाल करते. यावेळी होणाऱ्या खंडन-मंडनातून गुरुंकडून अध्ययनकाळात न लाभलेल्या नव्या ज्ञानाचा लाभ शिष्यांना आणि इतरांनाही होतो. तद्विद्यसंभाषा दोन प्रकारची असते: संधायसंभाषा आणि विगृह्य संभाषा. मित्रभावाने, सुहृद्भावनेने होणारा संवाद म्हणजे संधायसंभाषा आणि शत्रुभावनेने होणारा संवाद म्हणजे विगृह्यसंभाषा. संधायसंभाषेला ‘अनुलोम संभाषा’ आणि विगृह्यसंभाषेला ‘प्रतिलोम संभाषा’ असे म्हटले आहे. अनु = एका दिशेला, एका बाजूने जाणे आणि प्रति = बाजूच्या त्या विरुद्ध जाणे.

संधायसंभाषा

        ज्ञान आणि विज्ञान यांनी परिपूर्ण असा पूर्वपक्ष आणि उत्तरपक्ष यांच्यातच ही संभाषा होते, म्हणजे वाद होऊ शकतो. वादातील पूर्वपक्ष आणि उत्तरपक्ष यांचे अपेक्षित अंगभूत गुण कोणते ? तर चरकाच्या मते, क्रोधरहित, विद्यासंपन्न, दुसऱ्यांच्या गुणांचा आदर करणारा, विनयशील, चतुर, सहनशील आणि मधुर भाषण करणारा मनुष्य असणे, हे ते गुण आहेत. अशा सद्गुणी पक्षाने (मग तो पूर्वपक्ष असो व उत्तरपक्ष) म्हणजे अशा गुणी विद्वानाने निश्चिंत मनाने वाद करावा, प्रश्न विचारावेत, ‘माझा पराभव होईल’ अशी भीती बाळगू नये, ज्याचे ज्ञान नाही, ते विषय परिषदेत उपस्थित करू नये, आपल्या सभ्यवर्तनाने आपले म्हणणे दुसऱ्यास व्यवस्थितपणे समजेल अशा रीतीने मांडावे. कोणत्याही परिस्थितीत विनयशील राहावे. वादात प्रतिपक्ष हरला तर त्याचे सर्व तऱ्हेने समाधान करावे व त्याचवेळी स्वतः प्रसन्न होऊ नये. एवढेच नव्हे, तर त्याच्या पराभवाची चर्चा इतर कोणाबरोबर करू नये ! असे दोघांनी केले तर आणि तरच वादाचा निष्कर्ष दोन्ही पक्ष सिद्धान्त, निर्णय म्हणून स्वीकारू शकतात.

विगृह्यसंभाषा

        संधायसंभाषा ही दोन वादींमध्ये अपेक्षित असलेले सद्गुण असलेल्यांत होणारी चर्चा असते आणि असे सद्गुण नसलेल्यांत जी चर्चा होते ती म्हणजे विगृह संभाषा होय. विगृह्यसंभाषा ही वस्तुतः चर्चा नसतेच, ते भांडण असते. म्हणजे यात वाद न होता केवळ जल्प (‘माझेच खरे’ हा दुराग्रह) आणि वितंड (केवळ दोष दाखवून बिनमुद्द्याचे भांडण करीत राहाणे) हेच प्रकार होतात. म्हणून त्यास विग्रह = तीव्र मतभेद असणारे म्हटले आहे.

        इथे अर्थात हे लक्षात घेणे आवश्यक आहे की, चरकाच्या मते, मूलतः वाद हा केवळ सुयोग्य समानशील विद्वानांतच होतो. पण कधीकधी प्रतिपक्ष आपल्यासारखा सुजाण नाही, तो केवळ जल्प व वितंड यासाठीच आला आहे, असे लक्षात येते. त्यावेळी संधाय संभाषा करणाऱ्या वादीने संयम राखावा.

        पण मग त्याने अशावेळी नेमके काय करावे ? तर त्याने बोलणे सुरू करण्यापूर्वी प्रतिवादीची योग्यता (म्हणजे अयोग्यता) जाणून घ्यावी. हे काम फारच संवेदनशील, नाजूक असते, जणू ती आपलीच परीक्षा असते. अशी परीक्षा घेतल्याने सभाचतुर जाणत्यांकडून आपली प्रशंसा होते. या परीक्षेतून विरोधी पक्षाची परीक्षा होतेच पण आपलीही (सत्त्व)परीक्षा होऊन जाते. येथे उभयपक्षांतील व्यक्तींच्या गुणदोषांची ओळख पूर्ण होते. ती झाल्यानंतर पुढे, त्यातील कोणता गुण श्रेयस्कर आणि आणि कोणता दोष हानिकारक आहे, याची कसोटी घ्यावी. गुण कोणते ? तर श्रुत, विज्ञान, धारणा, प्रतिभासंपन्नता व वचनशक्ती हे सद्गुण विजयासाठी आवश्यक असतात.

  1. श्रुत म्हणजे ‘एकाच शास्त्राचे – विषयाचे ज्ञान आहे की अन्यही पूरक शास्त्रांचे ज्ञान आहे’ हे तपासणे
  2. विज्ञान म्हणजे प्रतिपाद्य विषयातील आधीच सिद्ध झालेले सिद्धान्त, औषधनिर्माणपद्धती, रोगीपरीक्षा, रोगनिदान, चिकित्सा
  3. धारणा म्हणजे चर्चेत सांगितलेल्या गोष्टींचे त्वरित आकलन होणे व त्यांचे योग्यवेळी म्हणजे चर्चेत योग्य ठिकाणी स्मरण होणे
  4. वचनशक्ती याचा अर्थ आपल्याला असलेले शास्त्रीयज्ञान सोप्या भाषेत स्पष्ट करता येईल इतके भाषाप्रभुत्व आपल्याकडे असणे.

         गुण पाहिले, आता दोष कोणते ? तर उत्तर न देता रागावणे, विषयाचे ज्ञान नसताना (अवैशारद्य) विषय उकरून काढणे, विरुद्धपक्षास अकारण घाबरणे, त्याने मांडलेला विषयच विसरून जाणे, प्रश्नोत्तरकालात बेसावध असणे-दुसरीकडेच लक्ष देणे, हे दोष असले की वादाचे रूपांतर विगृह्यसंभाषात होते.

         पुढे चरक म्हणतो, की “विगृह्यसंभाषेत वादी-प्रतिवादींनी एकमेकांच्या गुणदोषांची पारख करावीच, कारण दोघेही विजिगीषु असतात. त्यामुळे दुसऱ्याची दुर्बलता लक्षात येत नाही तोपर्यंत विजय मिळणे कठीण असते ! गुणदोष शोधण्याच्या कसोटीत प्रतिवादी कोणत्या विषयांत अपात्र आहे, याचे ज्ञान होते. त्याचवेळी स्वतः वादीच त्या विषयात पात्र व पारंगत आहे, याचे ज्ञान होते. याचा फायदा घेऊन अशा वेळी वादीने ‘ज्या विषयात प्रतिवादी अपात्र आहे आणि आपण स्वतः पात्र आहोत’ अशाच विषयांचा प्रयोग सुरू करावा. फक्त आपल्या स्वहिताचा विचार करून विगृह्यसंभाषा सुरू करावी. अन्य कोणताही विचार करू नये.

         विगृह्यसंभाषावादाचे स्वरूप लक्षात घेऊन चरकाने प्रतिवादीचे तीन प्रकार केले आहेत – प्रवर (उत्तम), प्रत्यवर (अधम), आणि सम. हे प्रकार केवळ वादाच्या दृष्टिकोनातून केले आहेत. कुल,शील, जाती इत्यादी दृष्टिकोनातून नाही..

परिषदेचे दोन प्रकार

         यानंतर चरकपरिषदेचेही प्रकार सांगतो. ते मुख्यतः दोन आहेत. ज्ञानवती परिषद आणि मूढपरिषद. आता, उघडच ज्ञानवती परिषद म्हणजे ज्ञानी लोकांची संभाषा आणि मूढपरिषद म्हणजे मूर्ख लोकांची परिषद. मूढांची परिषद अर्थातच जल्प, वितंड यांनीच संपन्न होते !

         आता, इथे चर्चकांची ज्ञानी व मूर्ख अशी वर्गवारी झाली असतानाही प्रत्यक्षात चर्चेसाठी जावे तर मात्र वेगवेगळे अनुभव येतात. म्हणजे ज्ञानी चर्चेसाठी जातो तेव्हा अशा दोन प्रकारांत विभागलेले चर्चक, गट, परिषद लाभतील याची खात्री देता येत नाही. म्हणजे ज्ञानी माणसाला ज्ञानीच भेटेल असे नाही, मूर्खही भेटू शकेल; पण ते आधी माहीत नसते. म्हणून चरक पुन्हा या दोन्हीं परिषदांचे तीन उपप्रकार चरक करतो. ते असे (सुहृत्परिषत्, उदासीन परिषत्, प्रतिनिविष्ट परिषेच्चेति) :

अ) ज्ञानवती परिषदेचे उपप्रकार

  1. ज्ञानवतीसुहृदपरिषद : ज्ञानीमित्रांची परिषद = निश्चित तर्कशुद्ध निर्णय देणारी.
  2. ज्ञानवतीउदासीनपरिषद : ज्ञानी, पण हारजीत, निष्कर्षाप्रति उदासीन असणारी.
  3. ज्ञानवतीप्रतिनिविष्टपरिषद : ज्ञानी पण ‘माझेच खरे’ वाल्या दुराग्रही अहंकारी विद्वानांची !
  4.  

ब) मूढपरिषदेचे उपप्रकार

         इथे मूळ चरकसंहितेत “मूढपरिषदेचेही असेच प्रकार होतात”, एवढेच नमूद केले आहे. त्यावर इतरांनी केलेल्या भाष्यात, टीकेतही कुठेही मूढ परिषदेचे उपप्रकार दिलेले नाहीत. मूळ सूत्र असे : मूढायां तु सुहृत्परिषद्युदासीनायां वा ज्ञानविज्ञान …. ). त्यामुळे हे प्रकार पुढीलप्रमाणे करता येतील, असे मला वाटते :

  1. मूढसुहृदपरिषद : मूर्खमित्रांची परिषद = निर्णय न देणारी.
  2. मूढउदासीनपरिषद : मूर्ख आणि हारजीत, निष्कर्षाप्रति उदासीन असणारी.
  3. मूढप्रतिनिविष्टपरिषद : मूर्ख आणि ‘माझेच खरे’वाल्या दुराग्रही अहंकारी मूर्खांची !

        चरक म्हणतो, “ज्ञान, विज्ञान, वचन (प्रश्न), प्रतिवचन (उत्तर) यांनी युक्त असलेल्या ज्ञानी पण प्रतिनिविष्ट म्हणजे दुराग्रही अहंकारी लोकांच्या परिषदेत आणि अज्ञानी तसेच शत्रू (प्रतिनिविष्ट) असलेल्या मूर्खांच्या परिषदेत कोणत्याही शहाण्या (ज्ञानी) विद्वानाने वाद करू नये.” तर मग कुणाशी वाद घालावा ?

        तर चरक तीन प्रकारे वाद करावा असे स्पष्ट करतो.

        (१) पहिला : “सुहृद परिषद किंवा मूढ उदासीन परिषद, अशा दोन्ही परिषदेत ज्ञान, विज्ञान, वचन (प्रश्न), प्रतिवचन (उत्तर) यांनी युक्त नसणारे आणि जे विद्वान, प्रतिष्ठित लोकांशी वैर धरणारे लोक असतात. त्या दोन्ही ठिकाणच्या लोकांशी वाद घालावा !” म्हणजे मित्रांमध्ये आणि शत्रूंमध्ये असे मूर्ख लोक असतात, त्यांच्याशी वाद घालण्यास हरकत नाही. पण अशा वेळेस त्यांच्याशी जल्प करावा. म्हणजे त्यांच्याशी बोलताना मोठमोठी लंबीचवडी, एकमेकांत गुंतलेली वाक्ये करावीत, ज्यांचे स्पष्टीकरण केल्याशिवाय त्यांना समजणारच नाहीत अशी दुर्बोध वाक्ये वापरावी. दुर्बोधशब्द वापरताना म्हणावे की “तुम्ही काही बोलत नाही याचाच अर्थ तुमचा पराभव झाला आहे. आपली प्रतिज्ञा तुम्ही पुरी करू शकत नाही.” हे वारंवार म्हणत राहावे. त्याला हरवावे. समजा त्याने पुन्हा चर्चेसाठी बोलाविले तर म्हणावे, ” तू अजून एक वर्षभर अभ्यास कर आणि मगच माझ्याशी बोलायला ये. गुरूची ठीक तऱ्हेने तू उपासना केली नाहीस, असे दिसते” किंवा म्हणावे, ” तुला आहे तेवढे ज्ञान पुरेसे आहे, अधिक अभ्यासाची तुला गरज नाही. (कारण) चर्चेत जो एकदा पराजित होतो त्याला नेहमीच शहाणे पंडित पराजित मानतात (तू पराजित झालेला आहेसच). अशा पराजिताला संभाषापरिषदेत पुन्हा प्रवेश नाही”

         (२) दुसरा : ज्ञानवती आणि मूढ सुहृत् परिषदेत जर कुणी आपल्यापेक्षा कमी दर्जाचा अथवा समान दर्जाचा असेल तर त्याच्याशीही विगृह्यसंभाषा करावी, असे चरक सांगतो. म्हणजे मित्रांपैकी एखादा किंवा ते सारेच मित्र ज्ञानी आहेत पण प्रस्तुत चर्चाविषयाच्या संदर्भात विरुद्धपक्षाचे आहेत; अशा लोकांशी चर्चा करताना विगृह्यसंभाषा(च) करावी.

        (३)तिसरा : उदासीन परिषद आहे पण ती ज्ञानी आहे की मूढ हे अद्यापि माहीत नाही, अशी स्थिती असेल तर कोणता निर्णय घ्यावा ? चरक म्हणतो, “अवधानश्रवण (आपला तर्क, युक्तिवाद लक्षपूर्वक ऐकणारे), वचन, प्रतिवचन यांनी ज्ञानी असलेली अशी परिषद असेल तर तिथे आपले म्हणणे मांडताना प्रतिपक्षाची चाचपणी करावी आणि मग निर्णय घ्यावा. म्हणजे जर प्रतिपक्ष प्रस्तुत चर्चाविषयाच्या संदर्भात सबल असेल तर वाद करू नये; उलट विषयाला जल्प, वितंडा होणार नाही, असे पाहून एकमताकडे यावे. पण जर प्रतिपक्ष प्रस्तुत चर्चाविषयाच्या संदर्भात दुर्बल असेल तर त्याच्यावर विजय मिळविण्यात हयगय करू नये.

        हा पराभव करण्याचे तन्त्र कोणते ? चरक म्हणतो, जर प्रतिपक्ष…..

  1. “अज्ञानी, श्रुतहीन (प्रस्तुत विषयाचे आणि अन्यही पूरक विषयांचे – शास्त्रांचे ज्ञान नसणारा) असेल तर त्यास मोठमोठी शास्त्रीय उदाहरणे द्यावीत
  2. विज्ञानहीन असेल तर त्यास उमजणार नाही अशी वाक्यरचना करावी
  3. त्याच्याकडे धारणाशक्तीचा अभाव असेल तर जटील, लांबलचक, संकीर्ण वाक्यरचना करावी
  4. प्रतिभाहीन असेल तर अनेकार्थी शब्दयोजना करावी
  5. वचनशक्तिहीन (भाषाप्रभुत्व नसलेला) असेल तर त्याचे उत्तर झिडकारावे
  6. रागीट असेल तर त्यास चिडवावे
  7. भित्रा असेल तर घाबरून टाकावे
  8. बेसावध असेल तर नियमांत अडकवून त्याचा गोंधळ उडवून द्यावा.

 अशा रीतीने प्रतिपक्षाचा संपूर्ण पराजय करावा ! अर्थातच हा प्रतिपक्ष मूढ प्रतिनिविष्ट असतो. म्हणजे मूर्ख विरोधक असतो.

         या सगळ्या गाळणीतून चरक दोन व्यापक नीतिनियम देतो :

         (अ) जर प्रतिपक्ष ज्ञानवतीसुहृदपरिषद असेल तर त्यांच्याबाबतीत विगृह्यसंभाषा करू नये. म्हणजे विगृह्यसंभाषा आपल्यापेक्षा बळ, बुद्धि आणि ज्ञान यांत जे श्रेष्ठ आहेत, त्यांच्याशी करू नये’. अशा वेळी अशा परिषदेत कोणताही वाद युक्तीनेच करावा, प्रतिपक्षाने तर्कसंगत वाद केला तर त्याचा स्वीकार करावा. येथे कोणतीही निरर्थक चर्चा करू नये.

         (ब) जर प्रतिपक्ष मूढ प्रतिनिविष्ट असेल तर काहीवेळा विगृह्यसंभाषा काही लोकांना अत्यंत संतप्त करते. मग अशी क्रुद्ध व्यक्ती काहीही अनहित करू शकते. म्हणून सभ्यपुरुष परिषदेमध्ये कलह पसंत करीत नाहीत.

         या नियमांच्या अनुसार वादविवाद करावा. विगृह्यसंभाषा ही मूलतः काहीही करून दुसऱ्याला पराजित करणे, एवढाच मर्यादित हेतू ठेवते, ती सिद्धान्त न देता कलह मात्र निर्माण करते, ती जल्पप्रधान आहे (स्वतःचा विजय, बस्स ! दुसरे काही नाहीच !!) ती ज्ञानाला, शास्त्राला उपकारक, गति देणारी नाही. म्हणून ती टाळावी. (अपूर्ण )

संपर्क : ईमेल: shriniwas.sh@gmail.com

अभिप्राय 1

तुमचा अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published.