चरकसंहिता : वादविद्येचे प्रात्यक्षिक
चर्चापद्धती, चरकसंहिता, वादविद्या
——————————————————————————–
‘भारतीय चर्चापद्धती’चा इतिहास सांगणाऱ्या ह्या लेखमालेच्या ह्यापूर्वीच्या भागात आपण आन्वीक्षिकीचा परिचय करून घेतला. आयुर्वेदाने ह्या पद्धतीचे उपयोजन तज्ज्ञ मंडळींमध्ये मानवी आरोग्यविषयक चर्चा घडविताना अतिशय प्रभावी पद्धतीने केले. चरकसंहितेच्या आधाराने लिहिलेल्या ह्या लेखातील विद्वज्जनांच्या परिषदांबद्दलची अनेक निरीक्षणे आजही प्रासंगिक ठरू शकतील.
——————————————————————————–
आन्वीक्षिकीचा एक मुख्य विषय बनलेली हेतुविद्या (तार्किक कारणांचा सिद्धान्त) ही तर्कविद्या (वादकला) आणि वादविद्या(चर्चाकला) या नावांनीही ओळखली जात असे. विद्वान लोकांच्या परिषदांमधून तिचा विकास संथगतीने अनेक शतके होत गेला. या परिषदांना संसद, समिती, सभा, परिषद अथवा पार्षद असे म्हटले जात असे.