अनुभव : मी मराठा ?

मराठा, जातीय अस्मिता
—————————————————————————–
मराठा मोर्च्याच्या पार्श्वभूमीवर आरक्षणाने नव्हे, तर शिक्षण व स्वतंत्र व्यवसाय उभारण्यातून मराठा युवकांचे प्रश्न सुटू शकतील असे मांडणारा हा स्वानुभव
—————————————————————————–
मराठा जातीत जन्माला आल्याचा मला जराही अभिमान नाही, असण्याची आवश्यकता अजिबात नाही, यात माझं काहीही कर्तृत्व नाही. याउलट याची लाज वाटावी अशाच काही घटना घडल्या आहेत. आरक्षणाचा मला वैयक्तिक काहीच तोटा झाला नाही. मला दहावीला ८४% मार्क्स मिळाले, बारावीला ७८%. देशातल्या सर्वोत्तम कॉलेजेसपैकी एक असणाऱ्या रुईया कॉलेजमध्ये मला अॅडमिशन मिळाली, कोणत्याही अडचणीशिवाय. गावाकडे अगदीच थोडीशी कोरडवाहू शेती असल्याने त्याचा तसा कधीच काही फायदा झाला नाही. वडिलोपार्जित कोणतीही प्रॉपर्टी नाही. वडील स्वतः घरातले मोठे असल्याने त्यांच्यावर खूप लहानपणीच मोठ्या खटल्याची जबाबदारी पडली. माझ्या वडिलांनी दिवसरात्र मेहनत करूनही ते आमच्यासाठी विशेष काही करू शकले नाहीत. कारण त्यांच्या कमाईचा बराच पैसा हा त्यांचे आई-बाबा, भावंडे, त्यांची शिक्षणं, लग्नं यांतच खर्च झाला. आमच्याकडे माझ्या बाबाने घाटकोपरमध्येस्लममध्ये घेतलेलं एक छोटं घर इतकंच होतं.इन्वेस्टमेंटचा फायदा किंवाअगदीच वाईट वेळ आली तर आसरा या दूरदृष्टीने घेतलेलं. हे घरही बाबाच्या आजारपणात झालेल्या प्रचंड खर्चामुळे विकावं लागलं. 2009 मध्ये बाबा गेला, घर गेलं. सगळं शून्य झालं. त्यात आम्ही 6 भावंडं.
आर्थिक परिस्थिती हलाखीची झाली, तरीही आपल्याला आरक्षण हवं होतंअसं कधी वाटलं नाही. फी माफ केली जावी असं मात्र वाटून गेलं एकदोनदा. 2009 मध्ये दहावी नुकतीच पास झाले आणि बाबा गेला तेव्हा ऊर बडवत न बसता एका जिममध्ये रिसेप्शनिस्ट म्हणून नोकरी करायला सुरुवात केली. सकाळी 6 ते 1 जिम, नंतर कॉलेज, कॉलेजवरून आल्यावर मुलांची ट्यूशन घेणे, वयाच्या सोळाव्या वर्षापासून फक्त चार साडेचार तास झोप. तरी माझ्या एकटीच्या कमाईत 7 माणसांचे कुटुंब चालणे अशक्य होते. आईला घरकामे करायची सुरवात करावी लागली. खूप वाईट वाटले. रडू यायचे आईवर ही वेळ आली म्हणून. पण त्यावेळी सगळी घडी बसेपर्यन्त पर्याय नव्हता. पण किती दिवस असे चालणार? म्हणून अवघ्या पाचशे रुपये भांडवलावर भाजी विकण्याचा एक छोटा स्टॉल सुरू केला. खूप मेहनतीने हा व्यवसाय केला. सुरुवातीपासून काही चांगल्या सवयी लावल्या. दररोजचा चोख हिशोब, वीकली ऑडिट, मंथली ऑडिट, एन्युअल टर्नओवर. एखादी मोठी कंपनीच जबाबदारीने चालवत आहोत. अशा पद्धतीने काम केले. होम डिलिवरी वगैरे सारख्या गोष्टी केल्या. नुसत्या भाजीच्या व्यवसायावर समाधान नाही मानले. सणासुदीच्या दिवशी फुले, फुलांच्या माळा, तोरणे असे सगळे विकायचो. त्यात चांगले प्रॉफिट होऊ लागले. मगमी बारावीत नोकरी सोडून फक्त हा व्यवसाय आणि अभ्यास करू लागले. तोवर याच प्रॉफिटमधून घरी छोटी मेस सुरू केली. इंजीनिअरिंग, मेडिकलच्या बॅचलर मुलांना डबे पुरवू लागलो. आईची बाहेरची कामे कमी झाली. मग भाजीच्या स्टॉलच्या बाजूला एक छोटा नाश्त्याचा स्टॉल सुरू केला. उत्तम चव, स्वच्छता, चांगली गुणवत्ता, होम डिलिवरी यामुळे हा व्यवसाय हीखूप कमी काळात सेट झाला. अडचणी अनेक होत्या, काही लोकांची भाईगिरी, बीएमसी, व्यवसाय म्हणले की गृहीत धरलेलं नुकसानही. त्यात कुणा नातेवाईकांचा काडीचा सपोर्ट नाही. त्यात आम्ही सगळ्या मुली. पण काही चांगले लोकही होते यात आम्हाला मदत करणारे. तर असे छोटे छोटे व्यवसाय अत्यंत अल्प भांडवलात सुरू केले. संपूर्ण कुटुंबाने खूप मेहनत केली. महापालिकेने केलेल्या डिमॉलिशनमुळे भाजीचा स्टॉल बंद करावा लागला. पण नाष्ट्याचा व्यवसाय अशा पद्धतीनं सेट केलाय की संपूर्ण कुटुंबाचा बराच खर्च त्यातून निघतो. पुरणपोळी व इतर छोट्या ऑर्डरही घेतो. आज आईला बाहेर काम करायला जावे लागत नाही. आराम मिळतो. याचे खूप समाधान मिळते. दरम्यान मी महाराष्ट्र 1मध्ये नोकरी केली. त्यानंतर मला वुमन एम्पॉवरमेंट जेंडर इक्वालिटीसाठी एक छान फेलोशिप मिळाली, ज्याचे मला खूप चांगले पैसेही मिळतात आणि रिसर्चही करता येतो. आज सगळे सुखात आहे असे नाही, पण परिस्थितीत खूप सुधारणा आहे. माझा लहान भाऊही शहरातल्या उत्तम असणाऱ्या बालमोहन विद्यामंदिरात शिकतो.
ही सगळी लंबी चौडी कहाणी सांगण्यामागे मला असे वाटते की मराठी आणि त्यातही मराठा आणि त्यातही रयत मराठा नेहमी बोंबाबोंब करतो -आम्हाला आरक्षण नाही, आमची जमीन नाही, काही पिकत नाही, जे अगदी माझ्या केसमध्येही खरे आहे. नोकऱ्यांमध्ये आरक्षण नाही, जमीन नाही तर तुम्ही व्यवसायाचा गांभीर्याने विचार का करत नाही?500 रुपये भांडवलावर सुरू केलेल्या धंद्याची प्रगती करत जर पुढे त्यावर माझे7 जणाचे कुटुंब पोसले जाऊ शकते,तर स्वतःचे काही सुरू करण्याचा विचार किती जण करतात? किती तरी संस्था शिक्षण, व्यवसाय यासाठी मदत करतात, तिथे जात वगैरे निकष नसून फक्त गुणवत्ता लागते, याची किती मराठा मुलांना माहिती आहे?
किती तरी स्कॉलरशिप्स, फेलोशिप्स असतात, रिसर्च प्रोजेक्ट असतात, त्याची माहिती आपण घेतो का ? स्वतःची एखादी कन्सेप्ट डेवलप करून त्यावर पैसे कमावता येतात, याचा विचार तरी कधी आपल्या मेंदूत आला का? विविध प्रकारच्या संशोधनांसाठी अभ्यासाने प्रपोजल तयार करून सरकारी किंवा खाजगी संस्थांकडून ग्रांट मिळवून एक चांगला प्रोजेक्ट करता येईल का, ज्याचा समाजाला आणि आपल्यालाही उपयोग होईल? सरकार तरुणांच्या व्यवसायासाठी काय स्किम राबवते, त्यातून आपल्याला काय मदत होईल?एकट्याने जरी नाही तरी मित्र मैत्रिणी मिळून एखादे स्टार्ट अप करू शकतो का? उन्हाळ्यात गंमत म्हणून सहज आम्ही बहिणीनी 300 रुपये गुंतवून फक्त 2 महीने ताक विकलं होतं, तेही रोज 1-2 तास. त्यात 10,000 रुपये नेट प्रॉफिट होऊ शकला. म्हणजे गोष्टी नक्कीच अशक्य नाहीत. कोणत्याही व्यवसायाची लाज वाटता कामानये. प्रचंड जिद्द आणि लाथ मारू तिथे पाणी काढण्याची वृत्ती आणि कृती हवी. सोपे नाही पण अशक्यही नाही. किमान आरक्षणावर खापर फोडण्यापेक्षा स्वतःचे काही निर्माण करण्याचा विचार तर करूया.

तुमचा अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published.