भक्ति – सूफीसमन्वय

भक्ति, सूफी, हिंदू-मुस्लीम समन्वय
—————————————————————————–
इस्लाममधील वाहिबी (मूलतत्त्ववादी) वि. अन्य विचारधारा हा संघर्ष जगभरात पेटून उठला आहे. त्याच बरोबर इस्लामचे एकसाची आक्रमक स्वरूप जनमानसावर ठसविण्याचे कामही जोरात सुरू आहे. ह्या पार्श्वभूमीवर हिंदूंमधील अद्वैत दर्शनाशी नाते सांगणाऱ्या,गेली अनेक शतके हिंदू-मुस्लीम समन्वय साधणाऱ्या सूफी पंथाचा परिचय करून देणारा हा लेख.
—————————————————————————–

सूफी संत हे इस्लामचे शांतिदूत म्हणून ओळखले जातात. अकराव्या शतकात अरबस्थानात सूफी संप्रदायाचा विकास घडून आला. अल गझाली या प्रसिद्ध सूफीच्या काळात सूफी संप्रदायात नवीन बदल झाला. येथूनच भारतातसुद्धा सूफींचे आगमन होऊन बाराव्या-तेराव्या शतकात सूफी संप्रदायाचा विस्तार भारतभर झाला.
भक्तिसंप्रदायाने ज्याप्रमाणे महाराष्ट्राच्या सामाजिक सांस्कृतिक जीवनात मोठ्या प्रमाणावर बदल घडवून आणला, त्याचप्रमाणे सूफी संप्रदायानेसुद्धा महाराष्ट्राच्या सामाजिक-सांस्कृतिक जीवनाला आकार दिला. भक्तिपंथाने ज्या समतेचा पुरस्कार केला त्याच समतेचा अंगीकार सूफीसंप्रदायाने केला. भक्तिसंप्रदायाप्रमाणेच सूफीसंप्रदायानेसुद्धा परमेश्वराच्या नामस्मरणावर भर दिला, बाह्य अवडंबर टाळले. भक्तिपंथाप्रमाणे सूफी हे भारताचे सांस्कृतिक वैभव आहे.
भारतात येण्याच्या काळातच सूफीपंथ हा कर्मकांडाऐवजी ज्ञानमार्गाकडे वळला. इस्लामच्या द्वैतवादी विचारसरणीत सूफी संप्रदायाने “वहदत-उल-वजूद’ म्हणजेच अद्वैतवाद आणून एका नव्या युगाला सुरवात केली. गजनीचे रहिवासी अबुल हसन हुजवेरी हे सूफी संत पंजाबमधील लाहोर येथे स्थिरावले. त्यांनी “कशफूलमहजुब’ हा ग्रंथ लिहिला. बाबा फकरुद्दीन हे सूफी आंध्रप्रदेशातील प्रेनुकोंडा येथे स्थायिक झाले. नंतर तेराव्या शतकात सय्यद बंदा नवाज गेसुदराज यांचे भारतात आगमन झाले.
ख्वाजा अबु इसहाक सामी चिस्ती, शेख अब्दुल कादर जिलानी, जियाउद्दीन नजीब सुहरावर्दी, ख्वाजा बहाउद्दीन नक्शबंद इत्यादी सूफी संतांनी भारतात सूफी संप्रदायाच्या विविध शाखा उपशाखा रुजविण्याचे कार्य केले. याच वेळेला महाराष्ट्रातसुद्धा सूफी संतांचे आगमन झाले.
मोमिन आरिफ देवगिरीला तर जलालउद्दीन हे खुल्ताबादला स्थायिक झाले. जेव्हा महाराष्ट्रात यादवांच्या सत्तेचा उतरता काळ सुरू झाला होता त्या वेळेला मुंतजबोद्दीन जरजरीबक्ष हे त्याच्या सातशे अनुयायासह खुल्ताबाद येथे स्थायिक झाले. मोईजोद्दीन यानी पैठण परिसरात विशेष कार्य केले. बाबा शाह मुसाफर, मीर मुहम्मद, ख्वाजा यादगार खान, सैय्यद मासुम, रहेमत आला शाह, शाहबुद्दीन, नितामुद्दीन, दावल शाहवली, शाह नसिरुद्दीन, शाह लतिफ कादरी, लुता अली शाह, रूननुद्दीन, बुरहानुद्दीन, जष्नुद्दीन, रज्जक शाह, जान अलाशाही, निर्गुन शाहवली, रहमत आला या सारख्या अनेक सूफी संतांनी महाराष्ट्रात आपल्या कार्याला सुरुवात केली.

सूफी कोण ?
अरबस्थानात मदिना शहरातील मशिदीसमोर एक चबुतरा होता. या ठिकाणी बसून काही लोक सतत अल्लाहचे नामस्मरण करत. या लोकांची ओळख “सूफी’ (चबुतरा = सुफा-सूफी) अशी होऊ लागली. शेख बशीर म्हणतात की, ज्याचे अंतकरण “साफ’ आहे तो “सूफी’ होय. “सोफिया’ याचा अर्थ ज्ञान व सूफी म्हणजेज्ञानी असासुद्धा अर्थ दिला जातो. याशिवाय हे लोक लोकरीचे जाडेभरडे कपडे वापरत म्हणून ‘सूफ’ (लोकर) चा ‘सूफी’ असा अर्थ होऊन हे लोक सूफी ह्या नावाने ओळखले जाऊ लागले. ज्याप्रमाणे बुद्धाच्या अनुयायांनी चिवर नेसायला सुरवात केली होती, त्याच प्रमाणे सूफींमध्ये कपड्यांना व डोक्यावरील फेट्यांना ठिगळ लावण्याची चाल होती. असे करण्यामागे तो सूफी निष्कांचन आहे हे दाखविणे हा हेतू होता. जुनैद बुगदादी यांनी सूफींना धरित्रीची उपमा दिली आहे.

सूफींचे तत्त्वज्ञान
सूफी तत्त्वज्ञानाची मुळे आपणास कुरानमध्ये दिसून येतात. नंतर अरबस्थानाच्या बाहेर जसजसा सूफी पंथ वाढू लागला, इतर पंथांच्या संपर्कात येऊ लागला, तसतसा या संप्रदायाने इतर पंथीयांची चांगली तत्त्वे आत्मसात करायला सुरवात केली. ख्रिश्चन धर्माच्या संपर्कात आल्यावर परमेश्वरचिंतन, नामस्मरण यांवर सूफींनी भर दिला. ग्रीक साहित्याचा अरबीमध्ये अनुवाद झाल्यानंतर परत एकदा सूफीपंथास चालना मिळाली. बौद्ध, जैन, हिंदू तत्त्वज्ञानाचा प्रभाव पडताच सूफींनी अनेक तत्त्वे स्वीकारली. हे आदान-प्रदान दोन्ही बाजूने झाले. अहं ब्रह्मास्मि हे तत्त्व आणि अन-हल-हक हे तत्त्व समसमान आहे. भक्तिसंप्रदायाप्रमाणे सूफींनीसुद्धा गूढवादाचा स्वीकार केला होता. सूफींनी मानव व परमेश्वर यांचे संबंध महत्त्वाचे मानून याकरिता ईश्वराला सर्वशक्तिमान ठरविले. सूफींमध्ये तात्त्विक भूमिकेचा पुरस्कार हुसेन-बिन-मंसूर या सूफी संतांनी केला. इब्न सीना यांनी परमेश्वराच्या सर्वात्मक विश्वव्यापी रूपावर भर दिला. शंकराचार्य व इब्न सीना याच्या तात्त्विक विचारांमध्ये आपणास साम्य दिसून येईल. सुहरावर्दी याच्या मते जोपर्यंत आत्मा परमात्म्यात विलीन होत नाही तोपर्यंत तो पुन्हा पुन्हा जन्म घेत राहतो. हीच बाब मंडुकोपनिषदात मांडली आहे. (मंडुकोपनिषद 3.2.2)
इब्न अल अरबी यांनी परमेश्वराचे प्रतिबिंब निसर्ग व मानव यांच्यात पाहण्याचा प्रयत्न केला. अब्दुल करीम अल जिली यांच्या काळात सूफी तत्त्वज्ञान अत्युच्च स्थानाला पोहचले. यात एकेश्वरवादाचा प्रखर पुरस्कार केला गेला.
मुक्तीकरिता सूफी साधना करत. यात सूफी साधकाला विविध टप्प्यांमधून जावे लागते. त्याला ‘मकामात’ म्हटले गेले. सूफी संप्रदायात भक्ताला, साधकाला ‘जिक्र’ करावा लागे. भक्तिपरंपरेतील नामस्मरण आणि सूफी “जिक्र’ यात कमालीचे साम्य दिसते. भक्तिपरंपरेप्रमाणेच सूफीपरंपरेत गुरूला महत्त्वाचे स्थान होते.

सूफी-भक्ति समन्वय
महाराष्ट्रातील समाजमन कायम बहुप्रवाही राहिले आहे. परस्परविरोधी विचार सहजगत्या स्वीकारणे हे येथील मातीचे वैशिष्ट्य. भारताबाहेर उदयास आलेला इस्लाम धर्म व सूफीसंप्रदाय इकडे येताच येथे रुजले, फोफावले. समानता, निष्कांचन वृत्ती, मानवता हे गुण सूफींमध्ये ठायी ठायी दिसून येतात. महाराष्ट्रात आगमन झाल्यानंतर सूफींनी लवकरच येथील लोकमनाला आकर्षित केले. येथे सूफींना मोठ्या प्रमाणावर अनुयायी मिळाले. महाराष्ट्राच्या मातीत रुजलेल्या भक्तिपंथाशी संपर्क आल्यानंतर परत एकदा सूफींमध्ये बदल झाला. सूफींनी मराठी भाषा आत्मसात करून आपला उपदेश मराठीमध्येसुद्धा दिला. इतकेच नव्हे तर अनेक मध्ययुगीन सूफींनी मराठीमध्ये पद्यचना केली. महाराष्ट्रात व्याप्त जातिव्यवस्थेवर प्रहार केला.
महाराष्ट्रात जवळप्रास 49 मुस्लिम सूफी मराठी संतकवी म्हणून ओळखले जातात. डॉ. यु.म. पठाण, डॉ. रा.चिं. ढेरे, डॉ. कृ.ना.चिटणीस, प्रो. ताराचंद, डॉ. अलिम वकील, डॉ. मुहम्मद आजम यांसारख्या विद्वानांनी महाराष्ट्रीय सूफींवर प्रकाश टाकला आहे.
श्रीगोंदा येथील शेख महंमद बाबा हे सूफी म्हणतात:

याती मुसलमान। महाराष्ट्रि वचनें । ऐकती आवडीनें ।
मंगळवेढ्याला लतिफ शहा हे प्रसिद्ध सूफी झाले. त्याच्याबद्दल महीपती लिहितात —

लतिफ शाह मुसलमान ।
परमभाविक वैष्णवजन ।।
महीपती लतिफ शहा याना परमभाविक वैष्णव म्हणतात, यावरून आपणास तत्कालीन संस्कृतीसमन्वयाची कल्पना यावी.
वजीरुल मुल्क मुंतोजी ऊर्फ शहा मुर्तुझा कादरी यांनी ‘संगीत मकरंद’ या नावाने मराठीत टीकाग्रंथ लिहिला, शिवाय ‘विजय वैभव’ हा त्यांचा एक ग्रंथ होय. संगीत मकरंदाचा शेवट करताना ते लिहितात,
“श्रीमन्महाराजाधिराज श्री संगीतसहितशिरोमणी श्रीखलचिवंशवर्णन जीया दौलतखानाचा नंदन वजीरुलमुल्क तेन कृतासंगीत मकरंदश्या टीका’ यावरून त्यांच्या मराठी प्रेमाची साक्ष पटते. दुसरे मुंतोजी बामणी (मेत्यराजय) यांचे मूळ नाव ‘शहामुर्तुझा कादरी’ होते. ते म्हणतात,
शहा मुतबजी बहमणी ।
जिनमें नहीं मनामनी (मनमानी) ।।
पंचीकरणका खोज किए ।
हिंदू मुसलमान एक कर दिए।।

यावरून त्यांनी एकोप्यावर भर दिल्याचे सिद्ध होते. ‘प्रकाशदीप’ हा त्यांचा ग्रंथ होय. यातील मंगलाचरण महत्त्वाचे आहे. ते असे-

श्रीगणेशायनम:
श्रीमद् गुरवे नम:
श्रीरामचंद्राय नम:

याच मुतोजींनी जातिभेदावर टीका केल्याचे त्याच्या ग्रंथात दिसते. ते म्हणतात,

शूद्र, वैश्य, क्षत्रिय, ब्राह्मण। हा देहाचाची गुण ।
तुज नाहि जातिवर्ण । यांसितू भुलो नको।

त्यांनी या ग्रंथाशिवाय ‘सिद्धसंकेत’, ‘हिंदू-इस्लाम दर्शनपरिभाषा कोश’, ‘जीवोद्धरण’, ‘स्वरूप समाधान’, ‘अद्वैत प्रकाश’, ‘अमृतानुभव’, ‘अनुभवसार’, ‘गुरुलीला’ यांसारख्या ग्रंथांची रचना केली.
अंबर हुसेन हे गीता टीकाकार म्हणून ओळखले जातात. ‘अंबर हुसेनी’ ही त्याची मराठी गीता टीका होय.
चांद बोधले उर्फ चांदसाहेब कादरी हे संत एकनाथाचे गुरू होय. या चांद बोधल्यांना दत्ताचा अवतार मानले जाई.
‘ज्ञानाचा एका, नामयाचा तुका आणि कबिराचा शेका’ या लोकोक्तीमध्ये एका – एकनाथ, तुका – तुकारामआणि शेका – शेख महंमद ही त्रिमूर्ती आदरणीय आहे. हे शेख महंमद श्रीगोंद्याचे. त्यांनी ‘योगसंग्राम’, ‘प्रवनविजय’, ‘निष्कलंक-प्रबोध’, ‘भक्तिबोध’, ‘आचारबोध’, ‘भारूड’ यांची रचना केली. ‘आचारबोध’ या रचनेत ते म्हणतात,

सुच सोवळी, हीन याती । नेणें विटाळ विपत्ति ।
सोवळे-वोवळे भाविती ।।
लटिका व्युत्पत्ती । शेख महंमद बोलती ।।

आपल्या भारुडात त्यानी हरी व अल्ला यांच्यात भेद केला नाही. या रचनेशिवाय त्यानी ‘दुचेश्मा’ हा परिभाषाकोशसुद्धा लिहिला.
आलमखान हे नागेश संप्रदायाचे एक प्रमुख संतकवी. यांच्या कवितासुद्धा भक्ति-सूफी समन्वयावर प्रकाश टाकतात. याशिवाय जंगली फकीर, शहामुनी, लतिफशहा, शेख सुलतान या सूफी संतकवींनी सुद्धा निखळ मराठीत रचना केली. महाराष्ट्राच्या सामाजिक-सांस्कृतिक जीवनात त्यांनी आपले एक वेगळे स्थान निर्माण केले. महाराष्ट्रात सर्वधर्मसमभावाचे तत्त्व रुजविण्यात, एकोप्याची भावना निर्माण करण्यात त्यांचे अतुलनीय योगदान राहिले. आपल्या लिखाणातून या सूफींनी समाजप्रबोधन, विषमतेला विरोध, अंधश्रद्धेवर कुठाराघात केले.
सूफी आणि भक्तिसंप्रदाय यांत सांस्कृतिक, वैचारिक आदानप्रदान झाले. अनेक विद्वान अभ्यासक असे आदानप्रदान झाल्याचे मान्य करतात. परंतु काही विरोधकसुद्धा आहेत, जे असे आदानप्रदान झाल्याचे अमान्य करतात. जर हे आदानप्रदान झाले नसते तर अनेक सूफींना मराठी रचना करण्याची आवश्यकता भासली नसती;अनेक पंथीय संतांनी, कविंनी मुस्लिम सूफींचे गुणगान केले नसते.
सूफींच्या दैनंदिन जीवनातील अनेक शब्द आज आपल्या मराठीत प्रचलित आहेत. फना – पारमार्थिक स्थिती = फन्ना – संपविणे; जिक्र – नामस्मरणाची सर्वोच्च स्थिती = जिकर – नेटाने;हाल – सूफी जीवाची अंतिम अवस्था = हाल – त्रास होणे; छबिना – शबीना = देवाची पालखी;छल्ला – शिष्य = अपभ्रंश रूप – चेला – शिष्य यांसारखे अनेक शब्द सूफींचा महाराष्ट्र संस्कृतीवरील प्रभाव दाखवितात. नाथपरंपरेमधील ‘अवधूत’ व सूफी ‘अवलिया’ यांच्यात साम्य आहे. नाथपंथीयाची ‘अलखनिरंजन’ ही हाळी आणि सूफींची ‘अनहलहक’ ही हाळी यांत कमालीचे साम्य आहे. त्याचा अर्थ एकच – ‘तो मीच आहे’. आपल्या मताचा प्रचारप्रसार करण्यासाठी सूफी प्रभातफेरी काढत. त्या वेळेला हातात डफ घेऊन जी गीते म्हटली जात त्याला “करीमा’असे म्हणत. याला प्रत्युत्तर म्हणून रामदास स्वामींनी खड्या आवाजात ‘मनाचे श्लोक’ म्हणण्याची प्रथा सुरू केली असे इतिहासाचार्य वि.का.राजवाडे नमूद करतात.
सूफींची साधी राहणी व उच्च विचारसरणी येथील सर्वसामान्य जनतेला फार आवडली. यामुळे मोठ्या प्रमाणावर तळागाळातील लोक या सूफींचे अनुयायी झाले.
आजच्या परस्पर अविश्वासाच्या युगात सूफींचे हे समन्वयाचे कार्य अधोरेखित होणे फार गरजेचे आहे. सूफींनी या भूमीत आपल्या आचरणातून, कृतीतून, वृत्तीतून, साहित्यातून कायमच एकोप्यावर, शांततेवर, सौहार्द्रावर, बंधुत्वावर भर दिला. जर सूफींचे हे दुर्लक्षित कार्य समोर आले तर आज जो परस्पर अविश्वास, संशयी वातावरण आहे त्यावर उतारा मिळेल. एक हजार वर्षांपासून सूफींनी महाराष्ट्रात, देशात जातीय, धार्मिक सलोख्यावर भर दिला. सूफी-भक्ति याच्यात कायम समन्वय राहिला. सुरुवातीपासूनच यांच्यात सर्व थरात आदानप्रदान राहिले. महाराष्ट्र मानसाला विकसित करण्यात सूफींचे हे योगदान आपण नजरेआड करता कामा नये.

तुमचा अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published.