चित्रपट, पिंक, बलात्कार, हिंसा, नकाराचा अधिकार, योनिशुचिता
—————————————————————————–
लैंगिक संबंधांना नकार देण्याचा स्त्रीचा अधिकार हा तिच्या स्वतःच्या शरीरावर असणाऱ्या मुलभूत अधिकाराचा भाग आहे, हे वास्तव व्यावसायिक चित्रपटाच्या माध्यमातून जोरकसपणे मांडणाऱ्या ‘पिंक’ ह्या चित्रपटाच्या निमित्ताने आजच्या आधुनिक स्त्रीच्या विचारपटाचा हा आलेख.
—————————————————————————–
शुजित सरकार यांचा ‘पिंक’ हा अलीकडच्या काळातील एक महत्वाचा चित्रपट आहे. सिनेमा ही केवळ वैचारिक नाही तर भावनिक अनुभूतीही असते. त्यामुळे मला (किंवा इतर कुणाला) या सिनेमाचे (किंवा कोणत्याही कलाकृतीचे) भावणे हे अतिशयोक्त आणि सापेक्ष असू शकते. थेट सामाजिक संदर्भ असलेला एक महत्त्वाचा विषय हाताळल्याबद्दल आणि या विषयातले वैचारिक बारकावे टिपण्याचा पुरेपूर प्रयत्न केल्याबद्दल, तसेच अभिव्यक्तीतील ठाशीवपणा आणि साधेपणा यांसाठी ‘पिंक’ मला खूप आवडला.