स्टॅनफर्ड तुरुंग प्रयोग: नक्की काय समजायचे? 

तुरुंग, गुन्हेगारी, वचक, सामाजिक मानसशास्त्र 

तुरुंगरक्षकांमध्ये असलेले क्रूरपणा व आक्रमकता हे गुण ‘स्वाभाविक’ असतात की परिस्थितिजन्य ह्या प्रश्नाचा शोध घेण्यासाठी करण्यात आलेल्या वादग्रस्त प्रयोगाचीही कहाणी. प्रयोगासोबातच प्रयोगकार्त्यांचे मानस उलगडून दाखवणारी व आपल्या आसपास असणाऱ्या काही प्रश्नाची उत्तरे सुचविणारी.. 

१७ ऑगस्ट १९७१ च्या सकाळी, कॅलिफोर्नियामधील पालो अल्टो परिसरात नऊ तरुणांच्या घरी जाऊन पोलिसांनी अटकसत्र चालवलं. त्या तरुणांवर कलम २११ आणि ४५९ (सशस्त्र दरोडा आणि घरफोडी) यांच्या उल्लंघनाचा आरोप ठेवण्यात आला होता. रीतसर झडती, बेड्या वगैरे सोपस्कार उरकून त्यांना वाजत गाजत (सायरनच्या आवाजात) पालो अल्टो पोलीस ठाण्यात नेण्यात आले. नेहमीची पोलिसी औपचारिकता पार पाडल्यावर ‘गुन्हेगारांच्या’ डोळ्यांवर पट्टी बांधून त्यांना स्टॅनफर्ड काउंटी तुरुंगात रवाना करण्यात आले. 

ह्या तरुणांना नेमका ‘गुन्हा’ काय होता? तर एका स्थानिक वृत्तपत्रात आलेल्या जाहिरातीला त्यांनी प्रतिसाद दिला होता! ‘तुरुंगातील परिस्थितीमुळे होणारा मानसिक परिणाम’ ह्या विषयीच्या वैज्ञानिक अभ्यासासाठी / प्रयोगासाठी स्वयंसेवक म्हणून काम करण्याची त्यांनी तयारी दर्शवली होती. (परंतु अशी अपमानकारक अटक केली जाईल, याची कल्पना त्यांना त्या वेळी नव्हती). त्यांची रवानगी झालेले ‘स्टॅनफर्ड काउंटी तुरुंग हे प्रत्यक्षात स्टॅनफर्ड विद्यापीठाच्या मानसशास्त्र विभागाचे तळघर होते जेथे एका सामाजिक मानसशास्त्रीय प्रयोगाची जय्यत तयारी केली गेली होती! 

‘अटक’ झालेल्या आपल्या ९ दोस्तांव्यतिरिक्त ६० हून अधिक युवकांनी अभ्यासात सहभागी होण्यासाठी जाहिरातीला उत्तर दिले होते. मुलाखती व चाचण्या घेऊन त्यांतील मानसिक समस्या, अपंगत्त्व, गुन्हेगारी किंवा मादक द्रव्यांच्या सेवनाचा इतिहास असलेल्या उमेदवारांना वगळण्यात आले. शेवटी, २४ निरोगी, बुद्धिमान, मध्यमवर्गीय, कॉलेजात जाणाऱ्या आणि दिवसाकाठी १५ डॉलर कमावण्याची इच्छा बाळगणाऱ्या अमेरिकन अथवा कॅनडियन पुरुषांना, सामाजिक मानसशास्त्राच्या इतिहासामधील एका अत्यंत सुप्रसिद्ध पण तेवढ्याच वादग्रस्त प्रयोगासाठी निवडण्यात आले. प्रयोगाचे नाव होते ‘Stanford Prison Experiment’, अर्थात ‘स्टॅनफर्ड तुरुंग प्रयोग’. 

या मुलांना अहेतुकपणे (randomly) दोन गटांत विभागण्यात आले. अर्धे रक्षक बनले आणि उरलेले कैदी. प्रयोगाच्या सुरवातीला कैदी आणि रक्षक ह्या दोन गटातील मुलांच्या स्वभावात काही विशेष फरक नव्हता हे लक्षात ठेवणे महत्त्वाचे आहे. २४ पैकी १८ मुलेच (९ रक्षक आणि ९ कैदी) सुरुवातीला प्रयोगाचा भाग होती. उरलेली मुले राखीव (on call) होती. 

ह्या प्रयोगाचे मुख्य संशोधक, प्रा. फिलीप झिम्बार्डो, यांना शोध घ्यायचा होता की बहुतांश तुरुंगरक्षकांमध्ये आढळणारा क्रूरपणा व आक्रमकता हे गुण स्वाभाविक असतात की परिस्थितिजन्य, उदाहरणार्थ, कैदी आणि रक्षक यांचे मूळ स्वभावच असे असू शकतील ज्यामुळे त्यांच्यातील संघर्ष अपरिहार्य बनतो. रक्षक आक्रमक असले आणि कैद्यांना कायदा व सुव्यवस्था ह्यांविषयी काहीच आदर नसेल, तर त्यांच्यात नक्कीच संघर्ष होईल. त्याऐवजी, समजा तुरुंगातील वातावरणातच सत्तेची अभेद्य उतरंड (rigid power structure) असेल आणि रक्षकांनी कैद्यांवर सत्ता गाजवायची पद्धतच रूढ असेल, तरीदेखील संघर्ष संभावतो. ह्या दोन्हींपैकी स्वाभाविक आणि परिस्थितिजन्य नेमक्या कुठल्या बाबीचा सर्वाधिक परिणाम होतो, हे शोधण्यात झिम्बाडना रस होता. 

जर प्रयोगातील कैदी आणि रक्षकांमध्ये फारसा संघर्ष झाला नाही तर असे म्हणता येईल की खऱ्या तुरुंगातील संघर्ष हा तिकडच्या कैदी व रक्षकांच्या स्वभाववैशिष्ट्यांचा परिणाम आहे. याउलट समजा प्रयोगातही संघर्ष आढळला तर असे सिद्ध होईल की तुरुंगाचे वातावरणच संघर्षाला कारणीभूत आहे (परिस्थितीजन्य) 

कैद्यांचे स्वागत आणि रक्षकांची तयारी 

तर… अटकसत्राशेवटी कैद्यांना स्टॅनफर्ड विद्यापीठाच्या मानसशास्त्र विभागाच्या तळघरात वसलेल्या स्टॅनफर्ड काउंटी तुरुंगात आणण्यात आले. खऱ्या तुरुंगासारखीच रचना आणि वातावरणनिर्मिती करण्यासाठी बरेच कष्ट घेण्यात आले. त्यासाठी जाणकार लोकांची मदत घेण्यात आली. कैदी आल्या- आल्या त्यांच्याकडील सर्व खासगी सामान जप्त करण्यात आले. त्यांना नागवे करून त्यांच्यावर जंतुनाशक औषधाचा फवारा करण्यात आला. तुरुंगातील गणवेश आणि बिछाना देऊन त्यांना टाळेबंद करण्यात आलं. कैद्यांना अंतर्वस्त्रे घालायची परवानगी नव्हती. त्यांनी नुसताच एक गाउन सदृशगणवेश घालणे अपेक्षित होते. केस झाकण्यासाठी एक नायलॉनची टोपी, पायात बेडीवजा साखळी अशी आभूषणे त्यांच्यावर लादण्यात आली. मुख्य हेतू हाच की खऱ्या कैद्यांनी अनुभवलेला अतीव अपमान व उपमर्द प्रयोगातील कैद्यांनाही तीव्रतेने जाणवावा. याशिवाय, कैद्यांची स्वत्वाची जाणीव चेचली जावी म्हणून असा नियम करण्यात आला की यापुढे कैद्यांना कोणीच नावाने संबोधू शकणार नाही. कैद्याचा उल्लेख फक्त त्याच्या गणवेशावरील क्रमांकाने होईल. 

अंगात एकसमान खाकी वर्दी, गळ्यात एक शिट्टी आणि हातात एक पोलिसी दंडुका असा सर्व रक्षकांचा वेश करण्यात आला. रक्षक डोळ्यावर काळा गॉगल घालत असत, जेणेकरून कैद्यांना थेट रक्षकांच्या डोळ्यात बघता येऊ नये. ९ तुरुंगरक्षकांची विभागणी ३-३ च्या ३ गटात करण्यात आली होती. प्रत्येक गट दिवसातले ८ तास काम करत असे. तुरुंगात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी आवश्यक ते करण्याची मुभा रक्षकांना होती. मात्र, किमान अधिकृतपणे तरी, त्यांना शारीरिक हिंसा करायला परवानगी नव्हती. 

प्रा. झिम्बार्डो हे स्वतः तुरुंगाचे अधीक्षक ह्या भूमिकेतून कैदी व रक्षक यांच्यावर लक्ष ठेवणार होते. 

काय घडले

थोड्याच कालावधीत कैदी आणि तुरुंगरक्षक आपापल्या भूमिकांमध्ये अलगदपणे शिरू लागले. प्रयोग सुरू झाल्यानंतर काही तासांच्या आतच काही रक्षकांनी कैद्यांना त्रास द्यायला सुरुवात केली. कैद्यांशी क्रूर वागताना काही रक्षकांना विकृत आनंद व्हायला लागला. हळूहळू इतर रक्षकही त्याच मार्गाला लागले. 

सुरुवातीला कैद्यांनी प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला, प्रयोगाच्या दुसऱ्याच दिवशी कैद्यांनी बंड पुकारले. त्यांनी आपापल्या टोप्या काढल्या, गणवेशावरील क्रमांक फाडले आणि कोठडीच्या दारालगत आपले पलंग लावून रक्षकांना आत येण्यापासून मज्जाव करायचा प्रयत्न केला. प्रत्युत्तर म्हणून रक्षकांनी ड्यूटी संपलेल्या आपल्या सहकाऱ्यांना बोलवून घेतले. मग त्यांनी फायर एक्स्टिग्विशर मधून अतिशीत अशा कार्बन डायऑक्साइडचा फवारा कैद्यांवर मारला. कैदी मागे हटले. रक्षकांनी लगेच तुरुंगांमध्ये प्रवेश केला, पलंग काढून घेण्यात आले आणि कैद्यांना नागवे राहण्याची शिक्षा देण्यात आली. कैद्यांच्या बंडाच्या नेत्यांना खऱ्या तुरुंगाप्रमाणेच एकल कोठडीत राहण्याची शिक्षा झाली. ह्या प्रसंगानंतर रक्षक कैद्यांना अधिक त्रास देऊ लागले, मनाला येतील ती कामे अथवा शिक्षा देऊ लागले. 

रक्षक, आपलं वर्चस्व राहावे यासाठी वेगवेगळे प्रयोग करू लागले. कैद्यांमध्ये फूट पडण्याच्या हेतूने ‘चांगल्या कैद्यांना ‘VIP’ कोठडीत पाठवण्याची शक्कल लढवण्यात आली. ज्या कैद्यांनी बंडामध्ये फारसा सहभाग दाखवला नाही, त्यांना VIP कोठडीमध्ये ठेवण्यात आले. तिकडे कैद्यांना अंघोळ करण्याची, कपडे घालण्याची, पलंगावर झोपण्याची आणि चांगले भोजन घेण्याची सोय होती जी सामान्य कैद्यांना नव्हती. 

हा खेळ साधारण अर्धा दिवस चालल्यावर रक्षकांनी अजून एक शक्कल लढवली. काही ‘चांगल्या’ कैद्यांना VIP तुरुंगातून बाहेर काढून ‘वाईट’ कैद्यांना तिकडे ठेवण्यात आले. यामुळे कैद्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले. VIP सेल ‘कमावलेले’ कैदी हे रक्षकांचे खबरी असल्याची शंका इतर कैद्यांच्या मनात प्रस्थापित झाली. एकंदरच रक्षकांनी खेळलेल्या चालींमुळे कैद्यांमध्ये अविश्वसाचे वातावरण निर्माण झाले. 

कैद्यांचा अपमान व चेष्टा करणे आणि त्यांना निरर्थक आणि कंटाळवाणी कामे देणे, हा रक्षकांचा मुख्य उद्योग बनला. कैद्यांना प्रसाधनगृहात जाण्यासाठी देखील रक्षकांची परवानगी लागत असे आणि रक्षक त्यांच्या लहरीनुसार ती देत अथवा नाकारत रात्री १० नंतर कैद्यांना कोठडीतील बादलीतच लाघवी किंवा मलविसर्जन करणे भाग असे. काही वेळा ही लघवी आणि विष्ठेने भरलेली बादली रिकामी करण्याची परवानगीदेखील मिळत नसे ज्यामुळे कोठडीत असह्य दुर्गंध पसरे. 

जशीजशी कैद्यांमधील अगतिकता वाढू लागली तसे रक्षक अधिकच आक्रमक झाले. कैदी एकमेकांशी त्यांच्या तुरुंगावासाविषयीच बोलत जणू ते खरंच कैदी आहेत. हळूहळू ते रक्षकांकडे एकमेकांबद्दल चुगल्या करू लागले. ते तुरुंगातील नियमांना अधिकाधिक महत्त्व देऊ लागले जणू काही ते नियम कैद्यांच्या भल्यासाठीच आहेत आणि त्यांचे उल्लंघन केल्यास त्यांचेच मोठे नुकसान होणार आहे. किंबहुना नियम न पाळणाऱ्या कैद्यांविरोधात जाऊन इतर कैदी रक्षकांची बाजूदेखील घेऊ लागले. 

हे सर्व इतके हाताबाहेर गेले की ३६ तासांतच एक कैदी अनावर रडू आणि ओरडू लागला. त्याच्या विचारांमधली सुसूत्रता कमी होऊ लागली आणि त्याला प्रचंड नैराश्य आले. गम्मत म्हणजे, रक्षकांचीच नव्हे तर मानसशास्त्राचा गाढा अभ्यास असलेल्या प्रा. झिम्बार्डो यांची सुद्धा प्राथमिक धारणा तो कैदी उगाचच ‘नाटके करतोय अशीच होती. परंतु काही वेळानी तुरुंगाच्या वतावरणाचा त्याच्यावर खरेच खोलवर परिणाम झालाय, हे लक्षात आल्यावर त्याला घरी पाठवून देण्यात आले. पुढील काही दिवसातच इतर ३ कैद्यांवर गंभीर मानसिक परिणाम झाल्याचे लक्षात आल्यामुळे त्यांनादेखील सोडून देण्यात आले. एक गोष्ट इथे अधोरेखित केली पाहिजे की प्रयोग सुरू होण्याच्या काहीच दिवसांपूर्वी हे सर्व युवक मानसिकरित्या स्थिर असल्याचे ठरवण्यात आले होते. 

मुळात हा प्रयोग १५ दिवस चालणार होता, परंतु तो सहाव्या दिवशीच समाप्त करण्यात आला. क्रिस्टीना मास्लाश, ही प्रा. झिम्बाडोंची विद्यार्थिनी, कैद्यांची व रक्षकांची मुलाखत घेण्यासाठी आली होती. तुरुंगातील वातावरण पाहून तिने तीव्र अक्षेप नोंदवला. रागाच्या भरात तिने प्रा. झिम्बाडौंनाच फटकारलं! “It’s terrible what you are doing to these boys!” (“तुम्ही ह्या मुलांसोबत जे करताय ते अतिशय भीषण आहे!”) ह्या तिच्या उद्गारामुळे झिम्बर्डो एकदम भानावर आले. आपण एक तटस्थ संशोधकाच्या भूमिकेपासून दूर जाऊन तुरुंग अधीक्षकाच्या भूमिकेत किती बहावत गेलोय हे त्यांच्या लक्षात आले आणि त्यांनी प्रयोग थांबवण्याचा निर्णय घेतला. 

प्रयोगाची नैतिकता 

स्टॅनफर्ड तुरुंग प्रयोग वादग्रस्त ठरण्यामागचे एक कारण हे ह्या प्रयोगामधील डळमळीत नैतिकता आहे. ह्या प्रयोगादरम्यान नेमके काय घडेल हे प्रा. झिम्बार्डो यांनाही माहिती नसल्यामुळे, स्वयंसेवकांकडून आधीच लिहून घेतलेल्या माहितीपूर्ण संमतीला तसा फारसा अर्थ उरत नाही. तसेच, स्वयंसेवकांना खऱ्या पोलिसांकरवी अटक करण्यात येणार असल्याचे संमतीपत्रात नमूद न करणे, हेही नैतिकतेला धरून वाटत नाही. 

याशिवाय, प्रयोगादरम्यान होणाऱ्या अपमान व उपमर्दामुळे होणारा खोल मानसिक परिणाम कमी करण्यासाठी कुठल्याच उपाय योजना करण्यात आल्या नव्हत्या. कदाचित त्याचमुळे मानसिक ताण विकोपाला जाऊन, सहज जाणवतील असे मानसिक बदल काही कैद्यांमध्ये दिसून आले. 

कुठल्याही मानसशास्त्रातील प्रयोगादरम्यान प्रयोग सोडून जाण्याचे स्वातंत्र्य स्वयंसेवकांना दिले जाते तसे ते याही प्रयोगात होते. मात्र प्रत्यक्ष प्रयोग घडत असताना काही स्वयंसेवकांना प्रयोग सोडून जाण्याची इच्छा असूनही त्यांना परवानगी नाकारण्यात आली. 

ह्या प्रयोगाच्या डळमळीत नैतिकतेवर झालेल्या टीकेचा एक परिणाम असा झाला की अमेरिकन मानसशास्त्रीय संस्थेने ( American Psychological Association) काही मार्गदर्शक नैतिक तत्त्वे अंमलात आणली. आता कुठलाही मानसशास्त्रीय अभ्यास अथवा प्रयोग संमत होण्याआधी एका समितीतर्फे त्याचा आढावा घेतला जातो. अभ्यासाचे संभाव्य फायदे हे जर स्वयंसेवकांना उद्भवू शकणाऱ्या मानसिक हानीच्या तुलनेत लक्षणीयरित्या जास्त असतील तरच त्या अभ्यासाला संमती दिली जाते. 

(प्रयोगकर्त्यांचा) निष्कर्ष

ह्या प्रयोगातून असा निष्कर्ष काढण्यात आला की तुरुंग रक्षकांच्या क्रूर आणि आक्रमक वर्तनाला त्यांच्या स्वभावापेक्षा तुरुंगातील वातावरण अधिक कारणीभूत ठरते. प्रा. झिम्बार्डो यांच्या मते कैदी आणि रक्षकांच्या प्रयोगादरम्यान दिसलेल्या वर्तनामागे दोन प्रक्रिया कारणीभूत असू शकतात. 

पहिली म्हणजे वैयक्तिकता लोपणे (de-individualization): आपण आपल्या गटाच्या अपेक्षा / कर्तव्य / नियमावली मध्ये इतके गुंतून जातो की आपल्याला स्वतःच्या स्वतंत्र ओळखीचा विसर पडतो आणि मग आपण आपली वैयक्तिक जबाबदारी आणि मूल्ये सहज झटकून टाकू शकतो. उदाहरणार्थ, एरवी सामान्य वाटणारा युवक रक्षकाच्या भूमिकेत अतिशय क्रूरपणे वागतो, कारण तिथे तो फक्त त्या गटाचा भाग म्हणून कार्यरत असतो. तिथे तो करीत असलेल्या कृत्याची वैयक्तिक जबाबदारी तो ‘रक्षक’ ह्या गटावर टाकून मोकळा होतो. सर्व रक्षकांची एकसमान वर्दी त्यांच्या गटात्मक ओळखीला वृद्धिंगत करते. 

दुसरी प्रक्रिया आहे learned helplessness’ किंवा स्व- शिक्षित अगतिकता, काहीच तासात कैद्यांच्या लक्षात आले की त्यांनी काहीही केले तरीही शेवटी त्यांचे भवितव्य रक्षकांच्या हातात आहे. त्यामुळे काहीच प्रत्युत्तर न देता रक्षकांना पूर्णपणे शरण जाण्याचा, त्या मानाने कमी खडतर पर्याय निवडायला ते शिकले. 

प्रयोग संपल्यानंतर झिम्बार्डी यांनी सर्व स्वयंसेवकांच्या मुलाखती घेतल्या. 

एका रक्षकाच्या मते सत्तेच्या नशेची धुंदी काही औरच असते. एकदा त्याने विनाकारण एका कैद्याचा व्यवस्थित मांडलेला बिछाना हेतुपुरस्सर खराब केला. कैद्याने अचानक त्याची गचांडी धरली. तोच त्या रक्षकाने दंडुका फिरवला आणि कैद्याच्या हनुवटीवर वार केला. तत्क्षणी त्या रक्षकाला त्या कैद्याच्या शिरजोरीचा प्रचंड राग आला. आपण अकारण कैद्याची छेद काढली होती ही बाब त्याच्या खिजगणतीतही नव्हती. तशी परवानगी नसूनही त्याने शारीरिक हिंसा केली ते वेगळेच! 

बहुतांश स्वयंसेवकांना हा प्रयोग ‘खरा’ वाटला. एका रक्षकाने कैद्यांना हाताने संडास साफ करण्यास भाग पडले होते. रक्षकाच्या भूमिकेतून तो कैद्यांचा, गुरं-ढोरं असल्यासारखा विचार करत होता. मागे वळून पाहताना त्याला स्वतःलाच ह्या गोष्टीचे खूप आश्चर्य वाटले. बऱ्याच रक्षकांना त्यांच्या व्यक्तिमत्त्वाची अशीही एक बाजू आहे हे पहिल्यांदाच उमगले होते. कैद्यांनासुद्धा त्यांच्या रक्षकांना पूर्णपणे शरण जाण्याचं खूपच आश्चर्य वाटत होतं. त्यांच्यापैकी अनेकांच्या मते ते स्वतः खऱ्या आयुष्यात खूपच आग्रही आणि हेकेखोर होते. 

काहीच वर्षे आधी झालेल्या मिल्यम यांच्या आज्ञाधारकपणा विषयीच्या अभ्यासाने दाखवून दिले होते की एका अधिकारी व्यक्तीने आज्ञा / प्रोत्साहन दिल्यास, एखादा सामान्य माणूस सुद्धा दुसऱ्या माणसाच्या प्राणावर बेतू शकेल इतक्या पातळीचा विद्युत झटका त्याला देण्यास तयार होतो. अनेकांच्या मते स्टॅनफर्डमधील प्रयोग देखील याच संकल्पनेला अधोरेखित करतो. निरंकुश सत्ता दिल्यास आपल्यापैकी कोणीही, एक क्रूर आणि अत्याचारी कर्दनकाळ बनू शकतो हे अस्वस्थ करणारे सत्य आपल्यासमोर उघड करतो. 

टीका

वरती नमूद केलेले निष्कर्ष जरी मानसशास्त्राच्या दृष्टीने लक्षणीय वाटत असले तरी ह्या क्षेत्रातील अनेक जाणकारांनी ह्या प्रयोगाविषयी अनेक शंका उपस्थित केल्या आहेत. काही जाणकार असे मानतात की प्रयोगकत्यांनी निष्कर्ष काढताना काही मूलभूत संकल्पनांकडे कानाडोळा केला आहे. त्यातलीच एक संकल्पना म्हणजे ‘गर्भित मागणी’ (demand characteristics). जाणकारांच्या मते, प्रयोगादरम्यान कैदी व रक्षक आपापली भूमिका वठवत होते. हा एका प्रकारचा अभिनय असल्यामुळे, ते स्वतःच्या मनातील प्रतिमांना किंवा कोण्या अधिकारी व्यक्तीच्या आदेशांना आपल्या वागण्यात उतरवायचा प्रयत्न करीत होते. कोणत्याही वैध प्रयोगामध्ये गर्भित मागणीची शक्यता दूर किंवा निदान कमी करणे आवश्यक आहे. मात्र ह्या प्रयोगात गर्भित मागणी सर्वत्र होती, किंबहुना ती फारशी गर्भित नव्हतीच. ‘दी लुसिफर इफेक्ट’ या २००८ साली प्रकाशित झालेल्या आपल्या पुस्तकात, रक्षकांना दिलेल्या सूचनांविषयी झिम्बार्डो सांगतात: 

त्यांना मी म्हटले, “आपण त्यांचा शारीरिक छळ करू शकत नाही. मात्र त्यांचा तुरुंगवास आपण कंटाळवाणा आणि नैराश्यपूर्ण नक्कीच करू शकतो. आपण त्यांच्यात भीती नक्कीच निर्माण करू शकतो. त्यांना इतके गोंधळवून टाकू शकतो की त्यांचे आयुष्य पूर्णपणे आपणच नियंत्रित करत असल्याची खात्रीच त्यांना पटेल, त्यांच्यावर सतत आपली पाळत असेल. आपली परवानगी नाही अशी कुठली ही गोष्ट ते करू अथवा बोलू शकणार नाहीत. सगळी सत्ता आपल्याकडे असेल, त्यांच्याकडे कोणतीच नसेल” 

ह्या सूचना म्हणजे रक्षकांना विकृत आणि आक्रमक वागण्याचे आमंत्रणच नाही का? मग रक्षक खरेच तसे वागले आणि हे सगळे उघड्या डोळ्यांनी पाहत असलेल्या झिम्बार्डोनी त्याला मूक संमती दिली तर रक्षकांना आपण योग्यच करत असल्याची खात्रीच नाही का होणार? शिवाय, हे सगळे आपण विज्ञानाच्या भल्यासाठीच करत आहोत अशी आत्म-समर्थक भूमिका त्यांच्या मनात असणारच. असे असताना ते अधिकाधिक आक्रमक होत गेले, तर त्यात नवल ते काय? 

या प्रयोगावर टीका होण्याचे अजून एक कारण म्हणजे अमेरिकी नौदलाकडून ह्या अभ्यासाठी निधी मिळाला आहे याबद्दल स्पष्टपणे मांडणी करण्यात आली नाही. टीकाकारांच्या मते नौदलाचा निधी देण्यामागचा उद्देश हा सैन्यदलाकडून चालवण्यात येणाऱ्या तुरुंगातील अपमानास्पद वर्तणुकीमुळे युद्ध कैद्यांवर होणारा परिणाम जाणून घेणे, किंवा अशा वर्तणुकीला युद्धकैदी कसे प्रत्युत्तर देऊ शकतात हे जाणून घेणे असा असू शकतो. परंतु हे दोन्ही उद्देश झिम्बाडोंनी मांडलेल्या (आणि वरती नमूद केलेल्या) उद्देशाशी सुसंगत नाहीत. 

सार

मग नक्की स्टॅनफर्ड तुरुंगप्रयोग आपल्याला काय दाखवतो? त्याचे निष्कर्ष फक्त तुरुंगाबद्दल आहेत का ते एकंदरच मानवी आयुष्याला लागू पडण्याइतके व्यापक आहेत? समजा त्या प्रयोगादरम्यान रक्षकांना एवढ्या प्रक्षोभक सूचना दिल्या गेल्या नसत्या तर चित्र वेगळेच दिसले असते? 

२००१ सालच्या डिसेंबर महिन्यात स्टीफन रेशर आणि अलेक्सांडर हस्लम या संशोधकांनी बीबीसीच्या मदतीने झिम्बाडौंचा प्रयोग पुन्हा एकदा करण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या रक्षकांनादेखील गणवेश होते. कैद्यांना बक्षिस किंवा शिक्षा देण्याची मुभादेखील त्यांना होती. त्यांच्या तुरुंगाची संरचनादेखील स्टॅनफर्ड काउंटी तुरुंगातल्या तुरुंगाशी मिळतीजुळती होती. मुख्य फरक हा होता की गर्भित मागणी कमी करण्याचा प्रयत्न ह्या प्रयोगादरम्यान केला गेला. कैदी येण्याआधीच तुरुंगाचे नियम ठरवणे रक्षकांसाठी बंधनकारक होते. तुरुंगाचे व्यवहार सुरळीत चालावेत एवढाच त्या नियमांचा हेतू असणार होता. 

प्रयोगाच्या पहिल्या काही दिवसांतच लक्षात येऊ लागले की रक्षकांमध्ये एकजूटीचा फारच अभाव आहे. अनेक रक्षक आपल्या अधिकारांचा वापर करायले फारसे उत्सुक नव्हते. कैद्यांमध्ये मात्र लवकरच संघभावना निर्माण झाली. त्यांची धिटाई वाढत गेली आणि रक्षकांना दम भरण्यापर्यंत त्यांची मजल गेली. रक्षकांना मुद्दाम त्रास देऊन कैदी आपापसांत त्यांची खिल्ली उडवत. मध्यंतरीच्या काळात कैदी आणि रक्षकांनी एकत्र, एका ‘कम्युन’ सारखे राहण्याची शक्यता पडताळून पाहिली आणि ह्या कम्युनचे नियम काय असावेत ह्याविषयी तात्त्विक चर्चादेखील केली. परंतु सहाव्या दिवशी ३ कैद्यांनी कोठडीतून स्वतःची सुटका करून घेतली आणि रक्षकांच्या खोलीवरच कब्जा केला. संशोधकांच्या असं लक्षात आलं की यापुढे रक्षकांचे काहीच चालणार नाही आणि म्हणून त्यांनी प्रयोग थांबवायचे ठरवले. 

ह्या प्रयोगातून असे दिसते की रक्षक आक्रमक होणे आणि कैद्यांमध्ये अगतिकता येणे ही काही काळ्या दगडावरची रेघ नाही. ह्या दोन्ही प्रयोगांकडे एकत्र पाहिले तर असे म्हणता येईल की, आपल्याकडून कोणाच्या आणि काय अपेक्षा आहेत यावर आपण आपल्या वर्तणुकीची दिशा ठरवत असतो. शिवाय आपल्याकडून अपेक्षा असलेली व्यक्ती उतरंडीत जितकी वर असेल तितके आपण त्याला जास्तच महत्व देऊ शकतो. ‘स्टॅनफर्ड’चा कडक बंदोबस्त आपल्याला दबंग आणि क्रूर होण्यास भाग पडतो मात्र ‘बीबीसी’ ची सौहार्दाची ‘अपेक्षा’ त्याच आपल्याला माणूस म्हणून वागण्याची मुभा देते. 

संदर्भः 

1. The Lucifer Effect – Philip Zimbardo 

2. ‘Stanford Prison Experiment’ चे विकीपेडिया पेज

3.    http://www.prisonexp.org/ 

4. http://www.simplypsychology.org/zimbardo.html 

5. https://www.psychologytoday.com/blog/freedom- learn/201310/why-zimbardo-s-prison-experiment-isn-t-in- my-textbook 

6.    http://valtinsblog.blogspot.in/2012/03/lie-of- stanford-prison-experiment.html#.V151wTXh5z0 

ईमेल: sanat.ganu@gmail.com 

तुमचा अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published.