‘आजचा सुधारक’च्या तरुण चमूने घडवलेल्या विचारभिन्नता विशेषांकाचे आमच्या नव्या-जुन्या वाचकांनी जोरात स्वागत केले. नागपूर येथे ह्या अंकाचे एका देखण्या कार्यक्रमात विमोचन झाले. त्यानिमित्त ‘आजचा सुधारक’ व ‘यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान’ नागपूर यांच्या संयुक्त विद्यमाने ‘आजच्या भारतीय समाजात वेगळे मत मांडण्याचा अवकाश आक्रसत चालला आहे का?’ ह्या विषयावरील परिसंवादाचे आयोजन करण्यात आले होते, ज्यात विभिन्न विचारधारांशी संबंधित वक्त्यांनी आपले विचार मांडले. कार्यक्रमाला श्रोत्यांचा उत्कृष्ट प्रतिसाद लाभला. ह्या सर्व बाबी आजच्या अस्वस्थ करणाऱ्या वास्तवातही सौहार्द व परस्पर संवादाची परंपरा अद्याप तग धरून आहे असा आशावाद जागवतात. विवेकी व्यक्ती व त्यांना अभिव्यक्ती देणारी ‘आजचा सुधारक’ सारखी नियतकालिके ह्याच आधारावर तग धरून असतात, हे वेगळे सांगायला नको.
खुशीपत्रे छापण्याची आमची परंपरा नाही. ‘प्रतिसाद’ मधून आम्ही अंकात प्रकाशित झालेल्या मजकुराशी विचारभिन्नता दर्शविणारी व त्यातील चर्चा पुढे नेणारी पत्रेच तेवढी प्रकाशित करतो. ह्या अंकात ‘विचारभिन्नता विशेषांकातील त्रुटी दर्शविणारी दोन पत्रे आम्ही प्रकाशित करीत आहोत. आमच्या वाचकांच्या आमच्याकडून किती मोठ्या अपेक्षा आहेत, ह्यांचे दर्शन त्यातून होते. ह्या विशेषांकातून प्रस्तुत विषयाची केवळ झलक दाखविणेच शक्य होते. पण विविध विषयांवर मराठीतून मौलिक लेखन, तेदेखील नवनव्या संदर्भासह आम्ही प्रकाशित करावे, त्या लिखाणात तजेला असावा, शैली असावी, अनुभवाची जोड असावी, विनोदाचे वावडे नसावे, ह्या आमच्या वाचकांनी व्यक्त केलेल्या सर्व मतांशी आम्ही सहमत आहोत व त्यासाठी आम्ही प्रयत्नांची पराकाष्ठा करू. एवढेच नमूद करतो. ह्या अंकाचे संदर्भमूल्य लक्षात घेवून विशेषांकात प्रकाशित झालेल्या मजकुरात आणखी काही लेखांची भर घालून ते लौकरच पुस्तकरूपात प्रकाशित केले जाईल, असेही ह्या निमित्ताने आम्हाला जाहीर करावेसे वाटते.
ह्या अंकात आपल्याला सजग करणारा, विचारांना चालना देणारा किंवा अस्वस्थ करणारा बराच मजकूर आहे. ४८ पानांच्या मर्यादेत जगातील सर्व विषयांना हात घालण्याची आमची इच्छा असते. पण काळाच्या, वाचकांच्या व आमच्या स्वतःच्या अंकाकडून ज्या अपेक्षा आहेत, त्यांना ह्या चौकटीत न्याय मिळू शकत नाही, ह्याची आम्हाला जाणीव आहे.. ‘आजचा सुधारक’ वेगळ्या आकार- प्रकारात, अधिक व्यापक व सखोल चिंतनासह व अधिक आकर्षक स्वरूपात वाचायला तुम्हाला आवडेल का? त्यासाठी वाचक म्हणून तुम्ही कितपत उत्सुक आहात? त्यासाठी तुम्ही काय साह्य करू शकता? कोणत्या विषयांवर वाचायला तुम्हाला आवडेल? छापील अंकासोबत ईमेलद्वारे व आंतरजालावरील संस्थळावर हा अंक उपलब्ध व्हावा असे तुम्हाला वाटते का? हे सर्व बदल करायचे झाले तर आर्थिक, व्यवस्थापकीय व वितरण ह्या तिन्ही आघाड्यांवर आम्हाला मोठ्या
प्रमाणावर मदत लागेल. ती करण्यास आपण तयार आहात का?
‘आजचा सुधारक’सारखे विचारपीठ सक्रिय राहायला हवे असेल तर त्यासाठी वाचकांना आपली जबाबदारी उचलावी लागेल. कारण सध्याच्या काळात आम्ही हे कार्य एक सामाजिक जबाबदारी म्हणून करीत आहोत. वाचकांकडून अधूनमधून प्राप्त होणाऱ्या वर्गणीशिवाय कोणताही आर्थिक स्रोत आमच्याकडे नाही. आम्ही जाहिराती स्वीकारत नाही. लेखक, संपादक कोणालाही मानधन दिले जात नाही. ह्यातील ‘मिशनरी’ वृत्ती कायम ठेवून नव्या काळाला अनुरूप बदल करण्याची आमची तयारी आहे.
आपल्या प्रतिसादाची editor.sudharak@gmail.com वर किंवा आमच्या पत्त्यावर वाट पाहत आहोत.