राष्ट्र, राष्ट्रवाद या संकल्पनांचा आणि त्यांच्या प्रासंगिकतेचा एका संवेदनशील मनाच्या लेखकाने आपल्या स्वतःच्या बुद्धी, अनुभव आणि आकलनाच्या कक्षेत घेतलेला शोध.
——————————————————————————–
हा एक जुना प्रसंग आहे. २००५-०६ मधला. मध्य प्रदेशात बडवानीमध्ये ’नर्मदा बचाओ आंदोलना’चं ऑफिस आहे. मी मेधाताईंना प्रथम पाहिलं ते या छोट्याशा ऑफिसमध्ये. माझ्या या पहिल्या भेटीच्या वेळी पुण्यातून माझ्याबरोबर असीम सरोदे आणि शिल्पा बल्लाळ हे दोघेजणही होते. त्या दिवशी बडवानीमध्ये एक मोठी सभा होती. पुष्कळ लोक होते. स्त्रियांची संख्याही लक्षणीय होती. डोक्यावरून लाल-हिरव्या रंगाचे पदर घेतलेल्या स्त्रिया घोळक्याने बसल्या होत्या. मी तोवर कधी कुठल्या संघटनेच्या कार्यक्रमात गेलेलो नव्हतो. माझी समज लिंबू-टिंबू पातळीवरची होती. (आजदेखील त्यात फारसा फरक पडला आहे असं नाही, लिंबाचा आकार थोडा मोठा झाला असेल इतकंच!) सभेला गेलो. मेधा पाटकर ही काय चीज आहे याचा प्रत्यय येत होता. मेधाताई स्टेजवर आल्या. वातावरणात कमालीचा उत्साह होता. घोषणा सुरू होत्या. मेधाताईंनी नारे दिले. थोडं बोलल्या आणि नंतर चक्क आम्हाला थोडं बोलायला सांगितलं. मी खरं तर गांगरून गेलो होतो. असीम आणि शिल्पा माझ्यापेक्षा तयार गडी होते. त्यांच्याकडे शिबिरं, सभा याचा थोडा अनुभव गाठीशी होता. त्यामुळे ते प्रत्येकी दोन-चार मिनिटं सलग बोलले, जोमाने घोषणा दिल्या. माझी वेळ आली तेव्हा मी कसंबसं थोडं बोललो, पण मी संपूर्ण नापास झालो तो घोषणा देताना. हात उंचावून अत्यंत मरतुकड्या आवाजात मी जे काही म्हटलं त्याला ‘घोषणा’ म्हणणं म्हणजे बडबडगीत गायनाला शास्त्रीय गायन म्हणण्यासारखं होतं. मी चांगलाच खजील झालो होतो.
हा प्रसंग आठवला तो अर्थातच ‘भारतमाता की जय’वरून. मी एकूणात असं पाहिलं आहे की मला घोषणा कधीच देता येत नाहीत. क्वचित काही प्रसंगी दिलेल्याही आहेत, आधी थोडं बिचकून आणि नंतर जोराने. आपण जे करतो आहोत — म्हणजे कृती आणि विचार दोन्ही — ते योग्य की अयोग्य असं स्वतःला सारखं विचारून त्रास आणि गोंधळ वाढवून घ्यायची माझी वृत्ती आहे. ती तशी थोडी अडचणीचीही आहे, पण आहे. त्याचाच एक परिपाक म्हणजे ‘घोषणा देता नयेणं’ हा असावा. बरं, मला कधी भारावल्यासारखं होत नाही का? तर तसं नाही. मी अनेक वेळा भारावून गेलेलो आहे, डोळ्यात पाणी आलं आहे, मनाला बर्याच वेळा लागलं आहे, फक्त व्यक्तिगत नव्हे – सामाजिकतेमुळेही अस्वस्थता आली आहे, बेचैन झालो आहे. अगदी आध्यात्मिक म्हणता येतील अशा स्वरूपाचे अनुभवही आलेले आहेत. त्यामुळे संवेदनेवर आघात होणं आणि त्यातून मी काही करणं हे घडलेलं आहे. पण मी घोषणा दिलेल्या नाहीत. का कुणास ठाऊक, पण मला ते कृत्रिम वाटतं. का कृत्रिम वाटतं? कारण बहुधा माझ्यासाठी (मध्यमवर्गीय, बेतशुद्ध वर्तन असणारा, पुस्तकं वाचणारा पण ‘जमिनी संघर्षा’त फारसा सहभागी न झालेला असा मी) ते ‘सहजतेने’ होत नाही. माझं ‘कृत्रिम’ दुसऱ्याचं ‘सहज’ असणारच आहे. त्यामुळे मला घोषणा न देता येणं किंवा मला ते कृत्रिम वाटणं हे अर्थातच माझ्यापुरतं मर्यादित आहे.
रविवारी सकाळी आम्ही बरेचदा सिनेमा बघायला जातो. तेव्हा सिनेमा सुरू व्हायच्या आधी राष्ट्रगीत लागतं. हरिप्रसाद चौरसिया, एन्. राजम, झकिर हुसेन, विश्वमोहन भट या व इतर मंडळींचं म्युझिकल राष्ट्रगीत मला फारच आवडतं. दुसरं म्हणजे सीमेवरच्या जवानांवर चित्रित केलेलं राष्ट्रगीत. मल्टिप्लेक्समध्ये सहसा प्रेक्षक ‘भारतमाता की जय’ असं म्हणत नाहीत. पण अनेक वर्षांपूर्वी सिंगल स्क्रीन थिएटरमध्ये प्रेक्षकातले काहीजण ही घोषणा द्यायचे. ‘जय’ म्हणण्यात माझादेखील आवाज कधीकधी सामील असायचा. पण पुन्हा तेच. असून नसल्यासारखाच.
’मिळून सार्याजणी’ मध्ये काम करत होतो तेव्हा अनेक वाचकांची पत्रं यायची. काही स्त्रीवाचक त्यांचे अनुभव लिहायच्या. ते वाचून उद्विग्न व्हायचो. आणि दुसरीकडे थोडं शांतही वाटायचं. आपण फालतू आहोत पण तरी आपण काही माणसांच्या जगण्याशी, त्यांच्या दु:खाशी जोडून घेऊ शकतोय याचं समाधान वाटायचं. आंदोलनाच्या कार्यक्रमांमध्ये सहभागी होताना, प्रकल्पग्रस्त लोकांशी बोलताना मला हे समाधान मिळालं आहे. आणि अपराधी तर खूपच वाटलं आहे.
मी काही गोष्टींमुळे का गहिवरतो? काहींमुळे का नाही? माझं गहिवरून येणं हे जर काही गोष्टींबाबत उत्स्फूर्तपणे होत असेल, त्या न्याय्य गोष्टी असतील आणि इतर काही बाबतीत जर मी गहिवरून येत नसेल तर तो माझा दोष ठरतो का? संवेदना आतून, स्वयंभूपणेच जागी होते की कुणीतरी सांगून जागी होऊ शकते? ‘संवेदना’ हा राजकारणाचा ट्रिगर असू शकतो का? राष्ट्र म्हटलं की माझ्या डोळ्यासमोर काय येतं? सैनिक, पंतप्रधान, ताजमहाल, संसद भवन, राष्ट्रध्वज हे उभं राहतं की कामाठीपुरा, शेतकरी आत्महत्या, प्रचंड लोकसंख्या, पाणी टंचाई हे येतं?
मी खरं तर हा प्रयोग कधी करून बघितलेला नाही. पण लिहिताना वाटलं की हा प्रयोग करून बघायला हवा. ‘देश’ म्हटल्यावर आपल्या डोळ्यापुढे काय येतं याचा डोळे मिटून विचार करावा आणि जे दिसतं ते सांगावं!
’भारत माता की जय’ची घोषणा देणे हा एक ‘सेंटिमेंटल’ मुद्दा आहे याविषयी दुमत नसावं. ‘देश’ नावाच्या एका ‘लार्जर एंटिटी’शी तुम्ही काही सेकंदात प्रतीकात्मकरित्या जोडले जाण्याचा हा एक मार्ग आहे. तर्काच्या कसोटीवर हे उतरतं की नाही हा वेगळा मुद्दा, पण तरी एक गोष्ट लक्षात घ्यावी लागते ती अशी की बहुसंख्य भारतीय सेंटिमेंटल आहेत आणि प्रतीकांमध्ये रमणारे आहेत. मला स्वत:ला ते फारसं पटत नाही, रुचत नाही कारण प्रतीकांमध्ये रमलं की सेंटीमेंट्स वर सरकायची मर्यादा आणि विचार खाली सरकायची मर्यादा आकसत जाते. पण तरी वास्तव हे असं आहे. दुसरा एक युक्तिवाद असा आहे की राष्ट्रप्रेम हा लोकांना एकत्र आणण्याचा, त्यांच्यात सकारात्मक विचार जागे ठेवण्याचा, आपण आपल्या देशासाठी आपलं काम जीव ओतून केलं पाहिजे हा विचार रुजवण्याचा एक मार्ग आहे. थोडक्यात लोकांना ‘रुळावर’ ठेवायचा हा एक मार्ग आहे. एक मोठाच्या मोठा लोकसमूह आहे. त्यांनी या देशासाठी, म्हणजेच इथल्या माणसांसाठी काही उपयोगी कार्य करावे, किमान त्यांनी आपली नोकरी/व्यवसाय सचोटीने करावा व देशाच्या आर्थिक प्रगतीत हातभार लावावा ह्यासाठी त्यांना प्रेरणा कशी द्यायची? तर ती देशप्रेमातून. बहुसंख्य माणसांना कशाच्या आधारे एकत्र बांधून ठेवायचे हा प्रश्न खरोखरच अवघड असतो. ते एक आह्वान असतं आणि नेमका इथेच ज्याला आपण सुधारक विचार म्हणू त्याच्यात आणि परिस्थितीपुरक, ‘वर्केबल’ उत्तरं शोधायचा जो पारंपरिक प्रयत्न होतो त्यात फरक आहे. सगळ्या माणसांना एकत्र ठेवायचं, त्यांची मोट बांधायची तर राष्ट्रप्रेम हे ‘डिफॉल्ट सेटिंग’ हवंच असं एक सार्वत्रिक मत दिसतं.
पण हे खरंच होतं का? मुळात राष्ट्र, देश, गाव, शहर ही भौगोलिक आणि प्रशासकीय सत्ये आहेत. त्यात माणसाचं जोडलेपण येतं ते तो तिथे राहतो, मोठा होतो, नाव कमावतो इत्यादी गोष्टींमुळे. पण जर एखाद्याला किंवा एखाद्या समूहाला हे जोडलेपण नाही आलं तर तो फक्त त्याचा/त्यांचा दोष होऊ शकत नाही. स्वातंत्र्य मिळवण्याकरता या देशाने मोठा लढा दिला हे खरं — पण म्हणून ‘स्वातंत्र्य हे कुठल्या गाढवीचं नाव आहे?’ असं लिहिणार्या नामदेव ढसाळांना आपण देशद्रोही म्हणणार का? ‘जिन्हें नाज है हिंद पर वो कहां है’ असंही लिहिणार्या साहिर लुधियानवीला आपण काय म्हणणार? जे राष्ट्रप्रेमी आहेत आणि जे इतरांनी राष्ट्रप्रेमी असावं याबाबत आग्रही आहेत, त्यांनी राष्ट्रातल्या असंतुष्ट घटकांजवळ जायचा, त्यांचं म्हणणं समजून घ्यायचा प्रयत्न केला आहे का? राष्ट्रप्रेम एका बाजूला आहे आणि दुसर्या बाजूला आहेत राष्ट्रातील अनेकानेक व्यवस्था. राष्ट्र हे व्यवस्थांनीच तयार होत असतं. या व्यवस्थांचे निर्माते, चालक माणसं असतात आणि त्याचे लाभार्थीही माणसंच असतात. शिवाय हा व्यवहार चक्राकार आहे. देवाण-घेवाणीचा व्यवहार आहे. आता राष्ट्रभक्त मंडळी या अशा असंख्य व्यवहारांच्या मुळाशी जाऊन हे व्यवहार नीट चालू आहेत का, कुणावर अन्याय होतोय का? असल्यास काय करायचं यावर फारसं काम करतात का? सहसा असं दिसतं की त्यांना नवनिर्माणाच्या कामांत आणि सेलिब्रेशनमध्ये रस असतो. पण होतं असं की काम आणि कामाचा आभास यात बरेचदा फरक करता येत नाही. दुसरं म्हणजे कोणत्याही मूल्यात्मक बदलासाठी न झगडता नवनिर्माणासाठी काम करणं यातून दूरगामी परिणाम होत नाहीत. शिवाय आयात-निर्यात, आर्थिक प्रगतीचे आकडे, इंटरनेटचा वापर, उत्पादनात वाढ, दरडोई उत्पन्न, अमुक क्रमवारीत देशाचा नंबर हा तांत्रिक भाग झाला. त्यात ‘माणूस’ आनंदी आहे का, तो उन्नत होतो आहे का हा विचार होत नाही. मी जे काही काम करतो आहे त्याचं महत्त्व कसं ओळखायचं? याचं गांधीजींनी दिलेलं उत्तर होतं की माझ्या कामाचा समाजातील सर्वांत शेवटच्या पायरीवर असलेल्या माणसाला काही फायदा होईल का हा प्रश्न स्वत:ला विचारावा आणि ते काम हाती घ्यावं. आता या विधानातील ‘दुर्बोध आदर्श’ क्षणभर बाजूला ठेवू, पण माझ्या कामाने नक्की कुणाला काय मिळेल? त्याने व्यवस्थेत सुधारणा होईल का याची खातरजमा तर मला करता येतेच. मात्र असं दिसतं की देशप्रेमाने भारलेल्या अवस्थेत असा विश्लेषक विचार होत नाही. म्हणूनच लोकांना एकत्र आणण्यासाठी देशप्रेमासारखी अस्पष्ट, धूसर संकल्पना योग्य की माणसांना खर्या प्रश्नांसाठी कार्यप्रवण करणारी अभिनिवेशरहित वैचारिक बैठक योग्य हा कळीचा प्रश्न आहे. पहिला मार्ग सोपा आहे. तर दुसरा मार्ग वेळखाऊ, अवघड पण योग्य आहे असं मला वाटतं.
मी घोषणा देऊ शकत नाही यामागे माझी मध्यमवर्गीय घडण, कन्व्हिक्शनचा अभाव, माझं गोंधळलेपण असं बरंच काही आहे. पण दुसर्या बाजूला मी माझ्या कुवतीप्रमाणे काही एक विचार करतोच आहे. माझं अत्यल्प योगदान देतो आहे. ‘राष्ट्र’या संकल्पनेबाबत विचार करताना एक गोष्ट मला जाणवते की मानवसमूहाबाबत माझ्या ज्या काही कल्पना असतील, माझ्या स्वप्नाळू नजरेच्या टप्प्यात सगळं जग एकत्र आलं आहे, विविध धर्म-प्रांत-जातींचे लोक आनंदात एकत्र राहतायत, देशांच्या सीमा गळून पडल्या आहेत असं चित्र जरी येत असेल तरी ते आजचं वास्तव चित्र नाही. लहान मोठी प्रशासकीय केंद्रे आणि त्यांनी मिळून बनलेला, सीमा असलेला देश ही आजची वस्तुस्थिती आहे. संपूर्ण जगाचा विचार करता ‘देश’ हे आजचं लघुतम एकक आहे आणि माणसाची ओळख त्याच्या देशाशी जोडली गेली आहे. ‘मी जगाचा नागरिक आहे’ असं मी म्हणू शकतो. मला युरोपातल्या किंवा जपानमधल्या एखाद्या व्यवस्थेविषयी, विचाराविषयी प्रेम वाटू शकतं. मी तिथे जाऊही शकतो. पण माझी ओळख ‘भारतीय’ हीच राहते. आजच्या ‘जागतिक नागरिका’ची ‘राष्ट्रीय ओळख’ अजून तरी पुसली गेलेली नाही. ‘देश’ हा इतिहासाच्या प्रचंड वाटचालीतला एक टप्पा आहे हेही मान्य. या टप्प्यावर आज माणसाची ओळख देशाशी जोडली आहे. कदाचित आजपासून पन्नास हजार वर्षांनी ही ओळख नसेलही. समूहव्यवस्था बदललेली असू शकेल. हेही मान्य. पण ‘आज’तरी मी भारतीय आहे हे मला लक्षात ठेवावं लागतं. मला असं वाटतं की राष्ट्रवादाबाबत आग्रही असणारे लोक आणि आग्रही नसणारे लोक यांच्यात हाही एक फरक पडतो. पहिल्या प्रकारात राष्ट्रावरील प्रतीकात्मक प्रेमाचा अतिरेकी आग्रह आहे, तर दुसऱ्या प्रकारात राष्ट्रवादाची तात्कालिक अनिवार्यता नाकारणं आहे.
संकल्पनांबाबत एक धोका असा असतो की त्या तुम्हाला भावनिकदृष्ट्या आणि वैचारिकदृष्ट्या व्यापू शकतात. त्या तुमची पळवाटदेखील होऊ शकतात. राष्ट्रवादाबाबत संघ-भाजपप्रणीत वैचारिकतेचं असं झालं आहे असं दिसतं. आणि एकूणातच चुकीच्या कारणांमुळे आपण चर्चेत राहतो आहोत हे त्यांच्या लक्षात येत नाही आहे. पण इथे मला अजूनही एक गोष्ट जाणवते. संघ परिवार, भाजप सरकार, मोदी हे सगळे न आवडणं मान्य आहे — मी स्वतः भाजपला कधीच मत देणार नाही. पण मला असं वाटतं की आपण वैचारिक विरोधक आहोत की सतत त्यांना टारगेट करणारे आहोत हे आपल्याला ठरवायला लागेल. कारण विरोध जर वैचारिक असेल तर त्याच्या प्रकटीकरणाला एक चौकट देणं अपेक्षित आहे. सत्तेत असणाऱ्या कुठल्याही पक्षाचं मूल्यमापन करणं योग्यच आहे, मात्र मूल्यमापन आणि नुसतंच झोडपणं यात फरक करता यायला हवा. संघ-भाजपची मूळ विचारधारा मला पटणारी नाही. त्यांच्याबाबत अतिशय सावधपणे विचार करावा लागतो हे खरं आहे. पण आज जर भाजप सत्तेत आहे तर त्यांनी धर्माधारित राजकारणाला रजा द्यावी, मूलभूत प्रश्नांना हात घालावा, जनहिताची कामे करावीत आणि त्यांनी ती केली तर त्याचं कौतुक करावं असंही मला वाटतं. मोदी तुम्हाला मान्य नाहीत, आवडत नाहीत हे ठीक, पण आज ते देशाचे पंतप्रधान आहेत आणि त्यामुळे लोकांच्या हिताचे निर्णय घेण्यात, धोरण ठरवण्यात त्यांना यश यावं अशी आपली अपेक्षा असली पाहिजे. त्यांनी चुकीचे निर्णय घेतले की आपल्याला स्कोअर केल्याचा आनंद मिळत असेल तर ती विचार करण्यासारखी गोष्ट आहे असं मला वाटतं. कारण सरकारचा चुकीचा निर्णय हा पक्षाच्या प्रतिमेपेक्षा देशासाठी घातक असतो. अर्थात संसदीय लोकशाही आणि ती चालवणारं सत्ताकेंद्री पक्षीय राजकारण यांच्यातील अंतर्विरोध समोर उभे राहिले की मला या विषयाबाबत अनेक प्रश्न पडतात आणि ते वैचारिक किंवा संकल्पनात्मक मुद्द्यांपासून व्यवस्थात्मक मुद्द्यांपर्यंतचे प्रश्न आहेत. (विनोबा भावे यांनी त्यांच्या ‘स्वराज्यशास्त्र’ या पुस्तकात ‘राजकीय प्रश्न म्हणजे काय?’ या चर्चेत म्हटलं आहे की माणसे स्वभावत:च म्हणजे निसर्गत: कमी-अधिक बुद्धिमान आणि कमी-अधिक शक्तीशाली असतात. बुद्धी आणि शक्ती म्हणजेच सामर्थ्य. म्हणून समर्थ-असमर्थ हा मूलभूत भेद आणि कमी-अधिक सामर्थ्याच्या माणसांनी मिळून आपली व्यवस्था कशी राखून ठेवावी हा राजकीय प्रश्नाचा मूलभूत आणि स्वाभाविक अर्थ आहे. यात पुढे त्यांनी एकायतन, अनेकायतन आणि सर्वायतन अशा तीन व्यवस्थांचा विचार केला आहे. आता आपली व्यवस्था आपण कशी राखावी हा जर मूळ प्रश्न असेल तर मग पक्ष, पक्षीय राजकारण आणि पक्षाशी बांधिलकी याच्या पलीकडे जाऊन आपल्याला स्वशासनाच्या दिशेने नवा शोध घेता येईल का, काही नवीन प्रारूपे उभी करता येतील का असा माझ्या मनात विचार येतो. कारण प्रचलित व्यवस्थेत विचारधारेशी बांधिलकी आणि पक्षाची पाठराखण यापलीकडे जाणं फारसं होत नाही. अर्थात याबाबत स्वतंत्र मांडणी करावी लागेल.)
माझा देश म्हणजेच देशातील अनेकानेक व्यवस्था माझं जगणं सुकर करत आहेत, मला त्यांच्यामुळे एक चांगलं जीवन जगता येतं आणि म्हणून मी त्यांच्याप्रती कृतज्ञ असलं पाहिजे हा झाला रूढ राष्ट्रवादी विचार. या व्यवस्थेत बर्याच त्रुटी आहेत, इथे सुधारणेला वाव आहे, या व्यवस्थेत माझं मन रमत नाही, मला तुटलेपण येतं हा झाला आजच्या अर्थाने ‘अराष्ट्रवादी’ विचार. या दोन्ही विचारांत काही गोष्टींकडे दुर्लक्ष होतय हे लक्षात आलं तर बरं होईल. पहिल्या विचारातलं भारावलेपण आणि दुसर्या विचारातलं तुटलेपण याची तीव्रता कमी झाली तर ते आपल्या हिताचं होईल. पहिल्या विचारात ‘देश म्हटलं की झेंडा, संसद, लष्कर अशा गोष्टी येतात. दुसर्या विचारात पंधरा ऑगस्टला धुळीत पडलेला झेंडा, तो विकणारी गरीब मुलं, संसदेतील भ्रष्ट नेते, लष्करावर होणारा खर्च या येतात. खरं तर दोघांनी आपापल्या कार्यक्षेत्रात प्रेरणा म्हणून दुसऱ्या बाजूच्या मुद्द्यांकडे लक्ष द्यायला हवं. म्हणजे उजव्या बाजूला – ‘राष्ट्रीय संवेदनाधिष्ठित’ कार्य खरोखर राष्ट्रनिर्माण करतं आहे का याचा तपास करणे आणि त्यात गुंतलेल्या लोकांची स्थिती काय आहे, प्रत्यक्षातील प्रश्न काय आहेत, आपण त्यांना भिडणार की त्यांना बगल देऊन सुरू असलेल्या कामाला राष्ट्रकार्य म्हणणार याचा विचार करणे हे तर डाव्या बाजूला – प्रश्न सोडवण्याकडे लक्ष देताना आपण लोकांच्या ‘संवेदनाधिष्ठित’ बाजूशी जोडून घेण्यात कमी पडतो आहोत का, वैचारिक आणि संकल्पनात्मक गुंत्यात अडकून आपण व्यावहारिक अपरिहार्यता विसरतो आहोत का, आपलं प्रबोधनाचं प्रारूप लोकांना आपलंसं वाटतं का, नसेल तर का याचा विचार करणे.
इथे खरं तर राष्ट्र, राष्ट्रवाद ही चर्चाच बाद होते आणि अंतिमतः व्यवस्था बांधणी, व्यवस्थात्मक सुधारणा या महत्त्वाच्या विषयावर लक्ष केंद्रित होतं. आणि तेच व्हायला हवं आहे. मग ते करणारे राष्ट्रवादी असोत अथवा नसोत!