‘आजचा सुधारक’चा ‘विचारभिन्नता विशेषांक’ वाचकांसमोर ठेवताना आम्हांला आनंद होतो आहे. तात्त्विक दृष्टिकोनापासून ते रोजच्या जगण्यापर्यंत आपल्याला विचारभिन्नतेला सामोरं जावंच लागतं. या भिन्नतेला बरोबर घेऊनच आपण आपल्या जगण्याची चौकट आखत असतो. विशेषतः राजकीय-सामाजिक संदर्भात प्रामुख्याने भारतीय समाजाचा विचार करत असताना आज जे चित्र समोर दिसत आहे त्यावर साधक-बाधक चर्चा करण्यासाठी एक विशेषांक काढावा अशी कल्पना पुढे आली आणि सगळ्यांनीच ती उचलून धरली.
माणूस आणि सृष्टी हे नातं जसं द्वंद्वात्मक आहे, तसंच माणूस आणि माणूस हेही नातं द्वंद्वात्मक आहे. माणसाची वाटचाल एकरेषीय नाही आणि त्यामुळे त्याच्या विचारांची वाटचालही एकरेषीय नाही.