सर्व श्रद्धा, विचार, गृहीतके वारंवार तर्काच्या व वास्तवाच्या कसोटीवर घासून पाहणे हा विवेकवादाचा गाभा आहे. आपल्या काळात लोकप्रिय असणाऱ्या व आपल्याला प्रिय असणाऱ्या अशा दोन्ही प्रकारच्या श्रद्धा, विचार, गृहीतके ह्यांचा त्यात समावेश होतो. ‘आजचा सुधारक’च्या माध्यमातून ते घडावे असा छोटासा प्रयत्न आम्ही करीत आहोत. गेल्या काही अंकातून आमच्या वाचकांना त्याची चुणूक दिसली असावी. ती प्रक्रिया ह्या अंकातून आम्ही पुढे नेत आहोत.
विवेकवादाची लढाई निरीश्वरवादाच्या छोट्या रिंगणातून बाहेर काढून प्रत्येक धर्मात गेल्या अनेक शतकांपासून सुरू असणाऱ्या पुराणमतवादी विरुद्ध सुधारणावादी ह्या संघर्षाशी तिला जोडावे, असा प्रयत्न ‘धर्म: परंपराआणि परिवर्तन’ ह्या लेखमालेतून आम्ही करीत आहोत. आतापर्यंत आपण हिंदू व ख्रिश्चन धर्मातील ह्या संघर्षाचा आढावा घेतला. ह्या अंकात मुस्लिम समाजातील स्थित्यंतरांचा आपण धावता आढावा घेणार आहोत व त्यातून इतर धर्मीयांना, विशेषतः हिंदूंना काय शिकता येईल हे बघणार आहोत.
खाजगीकरण-उदारीकरण-जागतिकीकरण (खा-उ-जा) हा ह्या युगाचा मंत्र आहे. तो जपा, नाहीतर तुम्ही नामशेष व्हाल असा इशारा अनेक माध्यमांतून वारंवार दिला जातो. खरे पहिले तर डंकेल प्रस्तावाच्या काळापासून खा-उ-जा चे विरोधक ह्या प्रक्रियेमुळे विषमता कमालीची वाढेल व विकासाच्या प्रक्रियेत परिघावर असणारे समूह कायम वंचिततेच्या गर्तेत फेकले जातील, असा इशारा देत होते. पण वित्तीय भांडवल खुले करण्यातून व जनहिताच्या योजनांवरील (welfare schemes) सरकारी खर्च कमी करण्यातूनच विकास होईल, संपत्तीची निर्मिती होईल; तिच्या वितरणाचा प्रश्न त्यानंतर सोडविता येईल असेच आपल्याला वेळोवेळी ऐकविण्यात आले होते. आता विकासाच्या ह्या प्रक्रियेच्या सूत्रधारांमध्ये तिच्या लाभ-हानीबद्दल पुनर्विचार सुरू असल्याचे दिसते. ह्या संदर्भात ह्या अंकातील ‘नवउदारमतवादाचा डांगोरा जरा जास्तच पिटला गेला आहे का?’हा लेख महत्त्वाचा आहे.
शेती-शेतकरी-शेतीचे अर्थकारण-पर्यावरण ह्या साखळीचा गंभीर विचार व्हायला हवा असे आम्ही मानतो. बहुतेक वेळी त्याविषयक चर्चा ही पोकळ अभिनिवेशाने लढवली जाते. ह्या अंकातील संध्या एदलाबादकर ह्यांचा स्वानुभव व आकडेवारीवर आधारित लेख एका विशिष्ट भौगोलिक-पर्यावरणीय परिसरातील वास्तव नेमकेपणाने मांडतो व चर्चेच्या वाटा खुल्या करतो, हेच त्याचे वैशिष्ट्य आहे.
श्रद्धा-अंधश्रद्धा ह्या क्षेत्रात विवेकवादाचे उपयोजन करताना आध्यात्मिक अनुभव व साक्षात्कार ह्यांची समीक्षा करणे हे सर्वांत कठीण काम होऊन बसते. कारण अशा समीक्षेतून अनेक वंदनीय-पूजनीय व्यक्तींच्या अनुभवाचे तुम्ही अवमूल्यन करता असा आक्षेप विश्लेषकावर येऊ शकतो. डॉ. रवींद्रनाथ टोणगावकर ह्यांनी स्वतः आध्यात्मिक अनुभूती घेऊन तिचे शास्त्रीयदृष्ट्या विश्लेषण करण्याचे धैर्य दाखविले. त्यांच्या लेखाचा उत्तरार्ध ह्या अंकात छापत आहोत. ‘सैराट’ चित्रपटाच्या निमित्ताने एका युवा कार्यकर्त्याने मांडलेले मनोगत व शर्मिला कलगुटकर ह्या संवेदनशील पत्रकारांनी आपल्या मैत्रिणीचे रेखलेले व्यक्तिचित्र तुम्हाला नक्कीच अंतर्मुख करतील.
ह्या सर्व मजकुरावर खुली चर्चा व्हावी असेच आम्हाला वाटते.
दीर्घ-प्रतीक्षित आषाढसरींचे मनापासून स्वागत. आपल्या भाषेच्या-देशाच्या विचारविश्वातही असाच झडझडून पाऊस पडो व त्यात आलेली मरगळ, साचलेपण दूर होवो हीच सदिच्छा!