आपण सर्वजण विघातक आज्ञाधारकतेचे बळी ठरण्याची शक्यता आहे. व आपल्याला त्याबद्दल खूपच कमी जाण आहे हे भान जागविणारा सामाजिक मानसशास्त्रातील एका महत्त्वाच्या पैलूची ओळख करून देणारा लेख
—————————————————————————-
जाहीर सूचना
एका तासासाठी ४ डॉलर कमावण्याची संधी – स्मरणशक्तीच्या अभ्यासासाठी लोक हवे आहेत.
* आम्हाला स्मरणशक्ती आणि शिक्षणासंदर्भातील वैज्ञानिक अभ्यासासाठी न्यु हॅवन येथील पाचशे पुरुषांची मदत हवी आहे. हा अभ्यास येल विद्यापीठात करण्यात येणार आहे.
* सहभागी होणाऱ्या प्रत्येक व्यक्तीस साधारण एका तासासाठी ४ डॉलर (अधिक कारभत्त्यापोटी ५० सेंटस) दिले जातील. आम्हाला तुमचा फक्त एक तास हवा आहे – अजून काहीही नको. तुम्ही येण्यासाठीची वेळ – संध्याकाळी, सोम–शुक्र किंवा शनि–रवि – तुमच्या सोयीने निवडू शकता.
* शिक्षण, प्रशिक्षण किंवा अनुभवाची कुठलीही अट नाही. आम्हाला कारखान्यातील मजूर, शहरी नोकरदार, मजूर, न्हावी, व्यापारी, व्यावसायिक, कारकून, बांधकाम–मजूर, टेलिफोन लाईनवरील मजूर, विक्रेते, पांढरपेशे कर्मचारी किंवा इतरही चालतील.
* सहभागी व्यक्तीचे वय २० ते ५० च्या मध्ये असावे. शाळेतील किंवा कॉलेजमधील विद्यार्थ्यांना सहभागी होता येणार नाही.
* जर आपण या अटींची पूर्तता करू शकत असाल तर आम्हाला खालील कूपन भरून प्रा. स्टॅन्ले मिल्ग्रम, मानसशास्त्र–विभाग, येल विद्यापीठ, न्यु हॅवन या पत्त्यावर पाठवा. तुम्हाला अभ्यासाच्या नेमका दिवस आणि वेळेबद्दल नंतर कळवण्यात येईल. कुठलाही अर्ज नाकारण्याचा हक्क आम्ही राखून ठेवत आहोत.
* तुम्हाला ४ डॉलर (अधिक ५० सेंटस) प्रयोगशाळेत आल्याआल्या दिले जातील.
* कूपनचे तपशील
१९७४ साली वरील जाहिरात एका वर्तमानपत्रात प्रकाशित झाली. ज्या व्यक्ती या अभ्यासात सहभागी झाल्या त्यांना विशिष्ट वेळी येल विद्यापीठातील मानसशास्त्र विभागात बोलवण्यात आले. तिथे त्यांची अजून एका व्यक्तीसोबत गाठ पडली. प्रयोगकाने (प्रयोग करणारा, experimenter) समोर येऊन त्या दोन व्यक्तींना प्रयोगाबद्दल थोडक्यात माहिती दिली.
“स्मरणशक्ती आणि शिक्षा या संदर्भात आम्ही अभ्यास करतो आहोत. शिक्षा दिल्याने स्मरणशक्ती वाढून शिकणे सुधारेल का याबद्दल आमचा प्रयोग आहे. तुमच्यापैकी एकजण शिक्षकाच्या भूमिकेत असेल तर दुसरा विद्यार्थी बनेल. प्रयोग अधिक प्रभावी व्हावा यासाठी शिक्षक एका खोलीत आणि विद्यार्थी दुसऱ्या खोलीत अशी व्यवस्था केलेली आहे. तुम्हा दोघांचे संभाषण मायक्रोफोन–स्पीकर आणि या दिव्यांद्वारे होईल. मी शिक्षकाला शब्दांच्या जोड्या असलेली एक यादी देईन जी त्याने विद्यार्थ्याला एकदा पूर्ण वाचून दाखवावी. नंतर त्यातील किती शब्द लक्षात राहिले हे तपासण्यासाठी आपण चाचणी घेऊ. या चाचणीमध्ये शिक्षक विद्यार्थ्याला शब्दांच्या जोडीतील पहिला शब्द वाचून दाखवेल आणि उत्तरासाठी पर्याय म्हणून अ, ब, क, ड असे चार पर्यायी शब्द वाचून दाखवेल. विद्यार्थ्याने त्यातील योग्य पर्यायासमोरील बटन दाबून आपले उत्तर सांगायचे आहे. हे उत्तर चुकल्यास शिक्षक विद्यार्थ्याला शिक्षा म्हणून या शॉक जनरेटर यंत्रावरील एक बटन दाबून तेवढ्या व्होल्टसचा शॉक देईल. पहिल्या चुकीस १५ व्होल्टसच्या शॉक देण्यात येईल. पुढील उत्तरे चुकत गेल्यास प्रत्येक चुकीच्या उत्तरास १५ व्होल्टसच्या पटीत (१५–३०–४५…) शॉक देण्यात येईल. शॉक जनरेटर यंत्रावर १५ व्होल्टपासून ४५० व्होल्टची बटने आहेत.”
दोन व्यक्तींपैकी एकजण विचारतो की हे शॉक धोकादायक आहेत काय. त्यावर प्रयोगक सांगतो की या शॉकमुळे वेदना होतात परंतु ते धोकादायक नाहीत (painful but not dangerous).
प्रत्यक्ष प्रयोगास सुरुवात होण्याआधी शिक्षक कोण व विद्यार्थी कोण हे चिठ्ठ्या टाकून ठरते. व्होल्टसच्या शॉक मिळण्याच्या क्षमतेचा अंदाज यावा म्हणून शिक्षकाला ३० व्होल्टसच्या एक शॉक दिला जातो. शॉक देणाऱ्या पट्ट्या विद्यार्थ्याच्या हाताशी बांधल्या जातात, विद्यार्थी आणि शिक्षकाला वेगवेगळ्या कक्षांमध्ये बसवले जाते आणि प्रत्यक्ष प्रयोगास सुरुवात होते.
प्रयोगामध्ये शिक्षक एक शब्द वाचून दाखवतो आणि उत्तरादाखल चार पर्याय वाचून दाखवतो. विद्यार्थी ए, बी, सी, डी यांपैकी एक बटन दाबून दिव्याद्वारे आपले उत्तर कळवतो. सुरुवातील बहुतेक उत्तरे बरोबर येतात. नंतर मात्र उत्तरे चुकू लागतात. शिक्षक पहिल्या चुकीच्या उत्तरास १५ व्होल्टसचा शॉक देतो. पुढील चुकीच्या वेळी (३० व्होल्टसनंतर) ४५ व्होल्टसच्या शॉकच्या वेळी विद्यार्थी पहिल्यांदा ’आऊच’ असा आवाज करतो. असा आवाज आल्यावर शिक्षक प्रयोगकाकडे पाहतो. प्रयोगक अत्यंत शांतपणे “कृपया पुढे चालू ठेवा” असे म्हणतो. त्यापुढील प्रत्येक शॉक्सच्या वेळी (चुकीच्या उत्तराची शिक्षा म्हणून) वेदनादर्शक आवाज येत जातो. प्रयोगकाला विचारल्यास तो आधीच्याच प्रकारे शांततेने “कृपया चालू ठेवा”, “प्रयोगात तुम्ही पुढे चालू ठेवणे आवश्यक आहे”, “तुम्ही प्रयोग चालू ठेवणे अत्यंत आवश्यक आहे”, “तुम्हाला पुढे चालू ठेवावेच लागेल, दुसरा कुठलाही पर्याय तुमच्याकडे नाही” अशी उत्तरे (याच क्रमाने) देतो. ११५ व्होल्टसचा शॉक दिल्यानंतर मात्र विद्यार्थी जोरात ओरडतो आणि म्हणतो “मला मोकळे करा, मला पुढे नाही जायचे”.
यक्षप्रश्न
वरीलप्रमाणे ओरडणे ऐकू आल्यावरही प्रयोगक आधीच्याच शांतपणे “कृपया पुढे चालू ठेवा” असे म्हणतो. अशा वेळी शिक्षक काय करेल? शिक्षक प्रयोगकाचे ऐकेल की विद्यार्थ्याचे ऐकून शॉक देणे थांबवेल? तुम्हाला काय वाटते? समजा हा प्रयोग १०० ’शिक्षकां’वरती केला गेला तर त्यापैकी किती व्यक्ती ४५० व्होल्टसपर्यंत शॉक देतील? (तुमचे उत्तर एका कागदावर नोंदवून ठेवा.) नंतरच्या प्रत्येक शॉकच्या वेळी विद्यार्थी वेदनादर्शक ओरडतो आहे, कधीकधी मोकळे करण्याबद्दल विनवणी करतो आहे असे दिसत असताना पण प्रयोगक शांत असताना किती व्यक्ती पुढे जातील?
स्टॅन्ले मिल्ग्रम यांच्या प्रयोगाचा हेतू खरेतर हेच तपासण्याचा होता. स्मरणशक्ती संबंधातील चाचणी हे आवरण होते. शिक्षक आणि विद्यार्थी यांच्यापैकी विद्यार्थी कोण असणार हे आधीच ठरलेले होते. शिक्षकाचे वर्तन तपासण्यासाठी हा प्रयोग होता. अधिकारी व्यक्तीने आज्ञा/सूचना दिल्यास कुठल्या मर्यादेपर्यंत तिचे पालन केले जाते? या प्रयोगात विद्द्यार्थी थांबवण्यासाठी विनवणी करत असताना किती शिक्षक विजेचे धक्के देत प्रयोग पुढे चालू ठेवतील हे तपासणे हा प्रयोगाचा हेतू होता.
सामाजिक मानसशास्त्राबद्दल थोडेसे
सामाजिक मानसशास्त्र (Social psychology) ही मानसशास्त्राची एक उपशाखा आहे. इतर लोकांच्या प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष उपस्थितीमुळे लोकांच्या विचारांवर, भावनांवर आणि वागण्यावर होणारा परिणाम या उपशाखेत अभ्यासला जातो. ही ज्ञानशाखा विज्ञाननिष्ठ आहे, म्हणजेच प्रयोगांचा आणि प्रयोगपद्धतींचा वापर, माहितीचे विश्लेषण करून निष्कर्षाप्रत येणे आणि निष्कर्ष peer-reviewed शोधनिबंधांमध्ये प्रकाशित होणे या विज्ञानशाखेच्या मूलभूत वैशिष्ट्यांचा सामाजिक मानसशास्त्रात समावेश होतो.
लोक विशिष्ट सामाजिक सेटिंग्जमध्ये कसे वागतात आणि त्यांच्या त्या वागण्यामागची कारणे काय असू शकतील यावर सामाजिक मानसशास्त्राने खूप महत्त्वाचे योगदान दिले आहे. सामाजिक मानसशास्त्रातील अभ्यासांमुळे सामाजिक घटनांवरती केवळ भावनिक किंवा उथळ चर्चा न होता त्या घटनांवरती गंभीर आणि विज्ञाननिष्ठ चर्चा घडू शकते. सामाजिक मानसशास्त्रातील आज्ञाधारकपणा ह्या विषयाची आणि त्यासंबंधातील सर्वांत महत्त्वाच्या मिल्ग्रम प्रयोगाची या लेखाद्वारे चर्चा केली आहे.
मिल्ग्रम प्रयोगाचे निष्कर्ष
मिल्ग्रम यांना त्यांच्या अभ्यासात असे आढळून आले की सहभागी लोकांपैकी ५०% लोकांनी अगदी शेवटपर्यंत – म्हणजे ४५० व्होल्टपर्यंत धक्के देणे चालू ठेवले. जाहिरातीत उल्लेखल्याप्रमाणे सहभागी लोक हे वेगवेगळ्या शैक्षणिक आणि व्यावसायिक पार्श्वभूमीचे होते.
सहभागी लोकांना प्रयोग-उत्तर मुलाखतीत “विद्यार्थ्याच्या विनवण्या आणि ओरडणे ऐकू येत असतानाही तुम्ही शॉक देणे पुढे चालू का ठेवले?” या प्रश्नाचे बहुतेकांचे उत्तर पुढील धाटणीचे होते. “मला अर्थातच थांबायचे होते पण तुम्ही मला प्रयोग चालू ठेवण्याबद्दल सूचना देत होता”, “परिणामांची जबाबदारी तुमची होती असे तुम्ही सांगितले होते”. ज्यांनी शॉक देणे थांबवले नाही अशा ५०% लोकांना आपण कसे बघू? दुसऱ्या व्यक्तींना पीडा देण्यात आनंद देणारी व्यक्ती (saddist) असे त्यांचे सरसगट वर्गीकरण करता येईल काय? सामाजिक मानसशास्त्रातील एक समकालीन प्राध्यापक स्कॉट प्लाऊस असे म्हणतात की या लोकांना सॅडिस्ट मानण्यासारखी दुसरी घोडचूक नाही.
मुद्दाम उल्लेख करून सांगण्याजोगी गोष्ट अशी की पूर्ण प्रयोगादरम्यान सर्व सहभागी प्रयोगार्थी शिक्षक शॉक देताना आणि आतून ओरडणे ऐकताना मानसिक तणावाखाली होते. प्रत्येक वेळी ओरडणे ऐकू आले की ते प्रयोगकर्त्याकडे बघत आणि त्याला विचारत की आपण थांबायला हवे का. प्रयोगकर्त्याने “पुढे चालू ठेवा” म्हटल्यानंतर ते पुढे चालू ठेवत. पण शॉक देणे आणि समोरच्या व्यक्तीचे ओरडणे ऐकून त्यांचा तणाव वाढतच होता. प्रा. स्कॉट प्लाऊस याला अपरिणामकारक आणि अनिर्णायक अ-आज्ञाधारकपणा असे म्हणतात. प्रयोगार्थी आज्ञा पाळण्यासाठी विरोध करत परंतु त्यांचा विरोध फलदायी होत नसे.
मिल्ग्रम प्रयोगात थोडे बदल करून ते प्रयोगही करण्यात आले आहेत. त्यातील मुख्य निष्कर्ष हा की जसजसे शिक्षक आणि विद्यार्थी यांच्यातील प्रत्यक्ष अंतर (physical proximity) कमी होते तसा आज्ञाधारकपणाही कमी होताना दिसतो.
प्रयोगाची पार्श्वभूमी आणि निष्कर्षांचे सार्वत्रिकीकरण
स्टॅन्ले मिल्ग्रम स्वत: दुसऱ्या महायुद्धात जर्मनीतून अमेरिकेत स्थलांतरित झालेल्या ज्यू आई-वडिलांचे अपत्य होते. न्युरेम्बर्ग इथे चालू असलेल्या दुसऱ्या महायुद्धाच्या युद्ध गुन्हेगारांच्या खटल्यात ज्यू-वंशहत्येसंदर्भातील अडॉल्फ इकमन (Adolf Eichmann) या प्रमुख गुन्हेगाराकडून “आपण फक्त आज्ञांचे पालन करत होतो” असा बचाव केला गेला. त्यावरून मिल्ग्रम यांना “हे शक्य आहे का की इकमन आणि त्याच्यासारखे लोक हे केवळ आज्ञांचे पालन करत होते?” हा प्रश्न पडला आणि मिल्ग्रम प्रयोगासाठीचा तो एक महत्त्वाचा प्रेरक हेतू ठरला.
या प्रयोगाद्वारे मिल्ग्रम यांनी असे दाखवून दिले की वरिष्ठांप्रती किंवा अधिकारपदावरील व्यक्तींप्रती आज्ञाधारकपणा (obedience to authorities) आपण समजतो तेवढी क्षुलक्क गोष्ट नाही. मिल्ग्रम यांचा प्रयोग २-३ वेळा वेगवेगळ्या कालखंडात करण्यात आलेला आहे आणि त्याचे निष्कर्ष बदललेले दिसत नाहीत. मिल्ग्रम यांचा प्रयोग म्हणजेच ज्यू-वंशहत्याकांड असा अपरिपक्व दावा सामाजिक मानसशास्त्रातील कुणीही करू इच्छित नाही. पण केवळ जर्मन समाज किंवा दुसऱ्या महायुद्धकालीन परिस्थितीच वंशहत्येला कारणीभूत होती असे मानणे म्हणजे आपल्या स्वत:च्या बळी पडण्याच्या जागांकडे (vulnerability) जाणीवपूर्वक डोळेझाक करणे होय. वंशहत्येसारख्या अतिरेकी घटनेला अनेक सामाजिक ताणेबाणे असतात. अशा घटना पुन्हा घडू नयेत या उद्देशाने त्याबद्दल वैज्ञानिक पद्धतींच्या आधारे जाणून घेणे, त्यामध्ये काही मानसशास्त्रीय सारखेपणा असतो का हे शोधून काढणे मिल्ग्रम प्रयोगासारख्या प्रयोगांचे उद्दिष्ट असते.
सामाजिक मानसशास्त्रातील आज्ञाधारकपणाच्या कुठल्याही प्रयोगात एक गोष्ट ठळकपणे दिसते. ती म्हणजे आज्ञाधारकपणाची जाण असण्याचा अभाव. मिल्ग्रम प्रयोगातही लोकांना किती लोक कमाल मर्यादेचा शॉक देण्यापर्यंत पुढे जातील असे विचारले असता त्यांनी दिलेल्या उत्तराची सरासरी १०% एवढी आहे. म्हणजे साधारण सर्वजणांना सहभागी लोकांपैकी केवळ १०% लोक कमाल मर्यादेचा शॉक देतील असे वाटते. वर चर्चा केल्याप्रमाणे प्रत्यक्षात हा आकडा ५०% एवढा मोठा आहे. असेच उत्तर इतर प्रयोगांबाबतीतही मिळाले आहे. विस्तारभयास्तव आणि मुख्य गाभा मिल्ग्रम प्रयोगात येऊन गेल्यामुळे आज्ञाधारकपणावरील इतर प्रयोगांची चर्चा या लेखात टाळली आहे. प्रा. स्कॉट प्लाऊस म्हणतात – “म्हणजे आपण दुहेरी अडचणीत आहोत. पहिली अडचण ही की आपण सर्वजण विघातक आज्ञाधारकतेचे बळी ठरण्याची (vulnerable to distructive obedience) शक्यता आहे. दुसरी अडचण अशी की आपल्याला त्याबद्दल खूपच कमी जाण (lack of awareness) आहे.” यामुळे आपली आपल्या बळी पडू शकणाऱ्या गोष्टींबद्दलची जाण वाढवणे महत्त्वाचे आहे.
मिल्ग्रम प्रयोगातील निष्कर्षावर आणि त्यांच्या सार्वत्रिकीकरणावर (कुठल्याही वैज्ञानिक सिद्धांताबद्दल घेतले जातात तसे) आक्षेप घेण्यात आले आहेत. परंतु प्रस्तुत लेखकाला ते आक्षेप वाचल्यानंतर त्यांची दखल घ्यावी एवढे महत्त्वाचे वाटलेले नाहीत.
प्रयोगपद्धतीमधील नैतिकता
मिल्ग्रम प्रयोगातील सहभागी लोकांना प्रयोगाचा पूर्ण काळ मानसिक तणावातून जावे लागले. एवढ्या लोकांना मानसिक तणाव देऊन निष्कर्ष काढणे महत्त्वाचे आणि समर्थनीय आहे का असे वैध आक्षेप घेण्यात आले आहेत. प्रस्तुत लेखकाचा या नैतिकतेबद्दल विचार चालूच आहे पण काही बाबी नोंदाव्याशा वाटतात. मिल्ग्रम यांनी ज्यावेळी हा प्रयोग केला त्यावेळी अशा प्रयोगाच्या नैतिक बाजूंबद्दलचे नियम बनलेले नव्हते. तसेच प्रत्येक प्रयोग झाल्यानंतर प्रयोगार्थी व्यक्तीला शॉक दिल्याबद्दल अपराधी वाटू नये यासाठी त्यांची विद्यार्थी व्यक्तीशी भेट घालून देण्यात आली आणि त्यांना अपराधगंड निर्माण होऊ नये यासाठी पूरक उपाय करण्यात आले.
आजच्या काळात असे प्रयोग कुणाला करायचे असल्यास त्यांना त्या त्या शैक्षणिक संस्थेशी संबंधित समितीकडून (Ethics review committee) नैतिक पूर्व-अटींची पूर्तता करायला लागते. यामध्ये प्रयोगार्थीकडून संमतिपत्र भरून घेणे, प्रयोगार्थीला प्रयोगातून कुठल्याही क्षणी बाहेर पडण्याची मुभा असणे तसेच प्रयोगार्थींना त्यांना मानसिक ताण येतील अश्या काही गोष्टी कराव्या लागतील याची कल्पना देणे बंधनकारक असते. मानसिक ताणाचा कालावधी कमीत कमी असेल अशा पद्धतीने प्रयोग करावे लागतात.
समारोप
या विषयाबद्दल जाणून घेणे दृक्-श्राव्य माध्यमाद्वारे सोपे जाते. लिखाणातून चित्र उभे करणे हे अवघड काम वाटले तरीही या आणि यासारख्या प्रयोगांबद्दल मराठीत लिहिले जावे असे वाटल्यामुळे प्रस्तुत लेख लिहिला आहे. मिल्ग्रम प्रयोगाची आणि आज्ञाधारकपणा या सामाजिक मानसशास्त्रातील विषयाची तोंडओळख करून देणे हा लेखाचा हेतू आहे. जिज्ञासूंनी खालील संदर्भ शोधल्यास त्यांना अधिक माहिती मिळू शकेल.
संदर्भ आणि आभार
- Introduction to social psychology या विषयावरील प्रा. स्कॉट प्लाउस यांचा www.coursera.org या संकेतस्थळावरील कोर्स – https://www.coursera.org/course/socialpsychology
या कोर्समधेच Social Psychology – D G Myers, McGraw-Hill पुस्तकातील काही प्रकरणे वाचावयास मिळतील आणि काही उत्तम videos ही मिळतील.
- Stanley Milgram आणि Milgram experiment विकीपेडिया
- www.simplypsychology.org/milgram.html
- आभार : सोबत कोर्स करणाऱ्या आणि चर्चेत भाग घेणाऱ्या मित्रांचे
ईमेल: dhananjaymuli@gmail.com