अ पिंच ऑफ स्किन, प्रिया गोस्वामी, शिश्निकाविच्छेदन
—————————————————————————–
भारतातील एका संपन्न, सुशिक्षित समाजात कित्येक पिढ्या चालत असलेल्या एका रानटी, स्त्री-विरोधी प्रथेबद्दल असणारे मौन तोडून अस्वस्थ करणारे अनेक प्रश्न सामोरे आणणाऱ्या माहितीपटाचा एका संवेदनशील तरुण मनाने घेतलेला वेध
———————————————————————-
“मी सहा वर्षांची होते. अम्मी म्हणाली – तुला वाढदिवसालाबोलावलंय. मी छान कपडे घातले, केस विंचरले. अम्मीसोबत निघाले. पण जिथे गेलेतिथे ना फुगे होते ना केक. मला एका अंधाऱ्या खोलीत नेलं. तिथे एक बाईहोत्या. मला कपडे काढायला लावले. त्या बाईंच्या हाती ब्लेड होतं. मला काहीकळायच्या आत दोन पायांमधल्या जागी त्यांनी कापलं. रक्त आलं. मी मोठ्यांनीरडले…”
ही कहाणी कोण्या एका बालउत्पीडन बळीची नाही. ही कहाणी एखाद्या इजिप्शियन – आफ्रिकन मुलीचीनाही, किंवा एखाददुसरीचीही नाही. ही कहाणी आहे एका मोठ्या, तथाकथित ‘सुशिक्षित’ संपन्न समूहातील प्रत्येक मुलीची. आपल्याच भारतात हेघडते आहे, तेही गेल्या अनेक पिढ्या! हे धक्कादायक सत्य केवळ आपल्यापासूनच लपले आहे असे नाही, तर ही वस्तुस्थिती कदाचित त्या समूहाच्या सर्व पुरुषांनाही माहित नाही.
हेविदारक सत्य समोर आणण्याचं धार्ष्ट्य केलं ‘प्रिया गोस्वामी’ या तरुणचित्रपटकर्मीने आपल्या अ पिंच ऑफ स्किनह्या माहितीपटातून. प्रिया ही National Institute of Design (NID) मध्ये शिकत असताना शेवटच्यासहामाहीसाठी माहितीपट करण्यासाठी विषय शोधत असताना तिच्या वाचनात ‘शिश्निकाविच्छेद ‘ (female genital mutilation) यावरचा लेख आला. तो वाचून आणि ही गोष्ट भारतात घडते, तीही तिच्या आजूबाजूच्या समाजात, हे वाचून तिला या विषयाला वाचा फोडावे असे वाटले. त्यातून हा माहितीपट निर्माण झाला.
यामाहितीपटाचा ६० व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारात ‘विशेष उल्लेख’ करण्यातआला. हा २३ मिनिटांचा माहितीपट, कधीही न बोलल्या जाणाऱ्या, अत्यंतगुप्तता पाळलेल्या विषयाच्या आणि मुख्य म्हणजे ‘परंपरा सांगते म्हणून’ केल्या जाणाऱ्या विधीबाबतचा असल्यामुळे त्यात सहभागी झालेल्या महिलांच्याओळखीविषयी विशेष गुप्तता पाळली आहे. त्यामुळे संपूर्ण चित्रपटात आपल्यालाफक्त हातांच्या हालचाली, पावले, पडद्यामागे संधिप्रकाशात बोलत असणाऱ्याबाया दिसतात आणि त्यातून ऐकू येणाऱ्या,काळ्या पडद्यावर ठसठशीत इंग्रजीतछापल्या जाणाऱ्या कहाण्या मनाची सालपटे सोलत जातात.
जसजशी एकेक कहाणी पुढे सरकते, तसतशी तिच्यातील स्त्रीची असहायता, तिचा राग, तिचे प्रश्न, तिचा माणूसम्हणून जगण्याचा अधिकार आणि तिचे लैंगिक अधिकार असे अनेक प्रश्न आपल्याआजूबाजूला घिरट्या घालायला लागतात. हळू हळू ‘खतना” हा शब्द ओळखीचा होतो पणमाहितीपटातील बायका तो शब्द अगदी सहज आणि रोजच्या वापरातला असावाइतक्या थंडपणे उच्चारतात, तेव्हा ह्या शब्दातील क्रूरता अंगावर यायला सुरुवातहोते. माहितीपटातील एका वळणावर जेव्हा बायका ह्या प्रथेचेउदात्तीकरणकरायला सुरुवात करतात, तेव्हा ‘धर्म’ ह्या संकल्पनेविषयी असणारे आपले प्रश्नही अधिक गडद होत जातात .
प्रिया गोस्वामीने पडद्यावरकाळोखात विचारलेल्या‘‘हे सगळे कशासाठी केले जाते?’’ह्या प्रश्नावरउत्तरादाखल आलेले शब्द आपल्याला एखाद्या ब्लॅकहोलमध्ये घेऊन जातात. ‘हेसगळे कसे शास्त्रीयदृष्ट्या महत्त्वाचे आहे; समाजाच्या शुद्धीकरणासाठी कसे आवश्यक आहे; नवरा बायकोचे नाते टिकवण्यासाठी असलेली ती लग्नसंस्थेची कशी निकडचआहे आणि सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे बाईच्या लैंगिकतेला अंकित ठेवण्यासाठीआमच्या व्यवस्थेला आम्ही दिलेला हा विश्वास आहे’, हे सगळे जेव्हा बोहरी समाजातल्या ‘त्या’ सुशिक्षित डॉक्टरबोलतात, तेव्हा त्यांच्या हातावरील मेहंदीचा गडद रंग आपल्याला सहन होत नाही. ‘ब्लेडनेछोटासा भाग कापला जातो (म्हणजे clitoris ) आणि थोडंसं रक्त येतं, बस्स. अगदी दोनमिनिटाचं काम असतं”…. पण त्या दोन मिनिटांत सात आठ वयाच्या चिमुरडीचे कायहोते, तिच्या भावी आयुष्यावर त्या घटनेचा काय परिणाम होतो, तिच्या भावविश्वातकाय घालमेल होते, तिच्या फुलणाऱ्या सुंदर लैंगिक भावनांचे काय होते, त्यावयातील आकर्षण, ती ओढ एका ब्लेडच्या घावाने कशी रक्तबंबाळ केली जाते…. आणिह्या विरोधात प्रश्न विचारण्याचा अवकाशही परंपरा स्त्रीला देत नाही! बाईच्या जन्माला आलेल्या कोणीही आपली लैंगिकता व्यक्तच करू नये हीधर्मांधआणि पुरुषसत्ताक समाजरचनेची गरज आहे. पण त्यातला स्त्रियांचा सहभाग मती गुंग करून टाकणारा आहे. “माझ्या आज्जीने केलं, आईने केलं, आतामाझ्या मुलीला नि सुनेलाही तेच करावं लागणार.” इतके तर्कहीन उत्तर ह्या स्त्रिया द्यायला लागतात. मग ही व्यवस्था स्त्रियांना हाताशी धरून एकाजीवघेण्या प्रथेतून त्या कोवळ्या जीवास मरणयातना सहन करण्यास भाग पाडते. ज्यामुळे आयुष्यभर त्या वेदना आणि पाप म्हणवून हिणवून कापून टाकलेली (हरामकी बोटी) म्हणजेच तिची अपुरी लैंगिकता घेऊन, तिचा एखाद्या पुरुषावर प्रेमकरण्याचा हक्कही हिरावून घेऊन तिला हे अपूर्ण आयुष्यजगायला भाग पाडते. प्रिया गोस्वामीचा माहितीपट आपल्याला कोणतीही आरडओरड न करताहे सारे सांगण्याचा प्रामाणिक व प्रभावी प्रयत्न करतो .
बाईची लैंगिकता ही नेहमीच नैतिक-अनैतिकतेच्या भोवऱ्यात फिरत ठेऊन धर्माच्यानावाखाली अश्या अघोरी प्रथांनामान्यता देणे हे जगभर पूर्वीपासून सर्रास चालू आहे. खरे तर लैंगिक भावना ह्या स्त्री आणि पुरुष दोघांकडेही निसर्गतःच आहेत . पणतरीही ती पुरुषांच्या अंकित राहावी, ती स्त्री आहे ह्याची तिला सतत जाणीव राहावी ह्यासाठी अशा प्रथा निर्माण झाल्या आणि मुख्य म्हणजे आजही त्या टिकून आहेत. कारण स्त्रियांनीच त्या मनोमन स्वीकारल्या आहेत.पुरुषप्रधान संस्कृतीतील रीतीरिवाज आणि आचारविचार, पर्यायाने पुरुषी वर्चस्व टिकवण्यासाठी स्त्रीसारखे धारदार हत्यार दुसरे नाही, हे ह्या संस्कृतिरक्षकांना पक्के माहीत आहे.
ह्या माहितीपटाचे एक वैशिष्ट्य म्हणजे ह्यात दिग्दर्शक ‘आपणहे केले पाहिजे, अशी system असली पाहिजे’, असे काही दावे करत नाही. ती फक्त एक धक्कादायक सत्य आपल्यासमोर मांडते. त्यासोबत ती आपल्याला काही आशादायी गोष्टीहीदाखवते. ह्या प्रथेच्या विरोधात प्रश्न विचारणाऱ्या काहीमुलींच्या आकृत्याही आपल्याला दिसतात. “हे का केले जाते? ह्या प्रथेमागे काही तर्क तरी आहे का?”– असे प्रश्न त्या विचारतात, आपला विरोध नोंदवतात, तेव्हा त्यापुसटश्या आकृत्या सकारात्मक दिसायला लागतात. “माझा माणूस म्हणून जगण्याचा हक्कओरबाडायचा अधिकार तुम्हाला कोणी दिला आहे?” असे प्रश्न त्या आपल्या आईवडिलांनाविचारतात आणि “आम्ही हे स्वीकारणार नाही” असे ठणकावूनही सांगतात.
बाई ही फक्त मुलांना जन्म देणारी,पुरुषाची लैंगिक गुलामी करणारी,आपल्या स्वत:च्या लैंगिक भावना दाबून टाकणारी अशी असावी, ही व्यवस्था खरे तर कोणत्याचजातीने, धर्माने, पंथाने स्वीकारायला नको. पण तसे होताना दिसत नाही. कारणह्या व्यवस्थेतली स्त्री स्वतःच स्त्री असण्याच्या अपराधगंडाच्या भावनेतून ‘ह्याज्या काही प्रथा आहेत, त्या समाजाच्या कल्याणासाठी आहेत’ अशी स्वतःची वेडगळ समजूत घालूनजगते आहे, ते मला खूप धोक्याचे वाटते. ‘माझ्यामुळे ह्या समाजात काही अनैतिकघडायला नको, ती जबाबदारी माझी आहे’ हे असे स्त्रीला पटवून देण्यात हा समाज यशस्वी होतानादिसतो आणि इथेच ही व्यवस्था कोणतीही लढाई न करता जिंकताना दिसते.
पणअखेरीस कोणीही संवेदनशील स्त्री किंवा पुरुष ह्या प्रवाहात प्रिया गोस्वामीबरोबर पोहत जातो व अखेरीस ‘निसर्गानेप्रत्येकाला दिलेल्या लैंगिक भावना ह्या त्या त्या व्यक्तीचा मुलभूत अधिकारआहे आणि‘खतना’ सारखी अघोरी प्रथा, जी आपल्या भारतात आपल्या आसपास सुरू आहे. ती ह्या मानवी अधिकारांचे उल्लंघन करणारी आहे आणि म्हणून ती बंद झाली पाहिजे’ ह्या निष्कर्षावर पोहचतो. ह्या माहितीपटातील सफरचंदाचे साल काढण्याइतकी साधी कृतीही आपल्याला अस्वस्थ करून विचार करण्यास प्रवृत्त करतेआणि हेच ह्या माहितीपटाचे यश आहे.