सुरांचा धर्म (१)

भारतीय संगीतपरंपरा, सूफी, हिंदू-मुस्लीम संबंध
—————————————————————————–
धार्मिक उन्मादाच्या आजच्या वातावरणात भारताची ‘गंगा-जमनी’ संस्कृती, सर्व धर्मियांचा सामायिक वारसा म्हणजे काय हे नीट उलगडून दाखविणारा हा लेख. भारतीय संगीताला मुस्लीम संगीतकारांनी व राज्यकर्त्यांनी नेमके काय योगदान दिले व सूफी परंपरेने भक्ती संप्रदायाशी नाते जोडीत कर्मठ धर्मपरंपरेविरुद्ध कसे बंड पुकारले हा इतिहास विषद करणाऱ्या लेखाचा हा पूर्वार्ध –
—————————————————————————–

गुजरातमधल्या हिंसाचाराच्या गोंधळात एका गोष्टीकडे कोणाचे फारसे लक्ष गेले नाही. बडोद्यात मुस्लिमविरोधी हिंसाचारादरम्यान उस्ताद फैयाज खानांच्याकबरीची मोडतोड झाली. अहमदाबादेत अनेक दंगे या धर्मपिसाटांनीभुईसपाट केले. त्यापूर्वी अनेक वर्षांपासून कधी गुलामअलीच्या गाण्याच्या कार्यक्रमात गोंधळ, मेंहदी हसनला कार्यक्रम करण्यापासून रोखणे असे अनेक प्रकार झाले. या सर्वांतून आपण कुठे बेसूर होत आहोत, असे सतत मनात ठुसठुसत राहते. संगीतासारख्या क्षेत्रात हे का व्हावे? भारतीय संगीताच्या क्षेत्रात या प्रवृत्ती कुठून आल्या? का आल्या?
उत्तर भारतातील हिंदुस्थानी शास्त्रीय संगीत व संगीतकार अनेक संस्कृतींच्या परस्पर मेळांतून घडत गेले आहेत. एकस्तरीय गायनापासून साम-गायनापर्यंतच्या प्राचीन परंपरेत देशज संगीताचा प्रभाव होताच. ‘मार्ग’ व ‘देशी’ संगीत घडत होते. दरबार सुरावटीचा किती प्रभाव राहत आला आहे त्याचा अंदाज येत नाही. मात्र कुमार गंधर्वांच्या धून उगम रागातून हा संबंध काय असावा त्याची कल्पना येते. ग्वाल्हेरचा राजा मानसिंग तोमर व मृगनैनी किंवा सोळाव्या शतकात मांडूचा सुलतान बाजबहादूर व लोकगीत गायिका रूपमती यांच्या कहाण्या केवळ प्रेमकथा एवढ्यापुरत्याच मर्यादित नसाव्यात. दरबारी किंवा अभिजात संगीत व देशी-लोकसंगीतातील संकल्पना, स्वरावली परस्परांच्या सहवासात आल्या. संगीतातली ही खासियत आपल्या समान वारशाचे (सांझी बिरासत) एक प्रतीकच आहे.
दहाव्या शतकानंतर मुस्लिम सुलतानांच्या आक्रमणाबरोबर मोडतोड व विध्वंसाबरोबरच काही नवेही घडत जात होते. हजारो वर्षांपासून भारतीयांचा समुद्रमार्गे व्यापारानिमित्ताने अरबांशी संबंध राहत आला. पुढे मुस्लिमांनी सिंधवर आक्रमण केले. या काळात अनेक नव्या गोष्टी घडल्या. प्राचार्य कैलासचंद्र देव ‘बृहस्पति’ यांच्या मते एकदा थोडे स्थिर झाल्यावर मुस्लिमांमध्ये खारिजी, जिंदिकी, मुजाहिद, ख्वाजा इत्यादी संप्रदाय निर्माण झाले. हिंदू गायक, शिल्पकार, तत्त्वज्ञ इत्यादींनी अरबांना प्रभावित केले. बौद्ध भिक्षू व ब्राह्मण पंडितांकडून ते तत्त्वज्ञान, ज्योतिष, गणित, आयुर्वेद, रसायन इत्यादी विद्या शिकू लागले. इ.स. 753-774 या काळात “ब्रह्म-सिद्धान्त’ “खंड-खाद्यक’ अशासारख्या ग्रंथांचे अरबीत अनुवाद झाले. बगदादच्या राजाने अरबांना भारतीय विद्यांचे अध्ययन करायला परवानगी दिली. ‘बरमक’ शाखेच्या मुस्लिमांनी अनेक अरबांना विद्याध्ययनासाठी भारतात पाठवले; भारतीय विद्वानांना बगदादला बोलावून अनुवाद करून घेतले.पुढे हे ज्ञान अरबांनी युरोपीयांकडे संक्रमित केले.
त्याचबरोबर इराणी, अरबी शिल्प, संगीत व भाषेची अनेक वैशिष्ट्ये भारतात अनेक शतकांपासून येत आहेत. मौर्यकाळातल्या पाषाणशिल्पांवर — विशेषतः अशोकस्तंभ व तत्सम — इराणी शिल्पांचा प्रभाव होता. दहाव्या-अकराव्या शतकानंतर मुस्लिम सुल्तानांच्या स्वाऱ्यांमध्ये त्यांच्याबरोबर नंतर आलेल्या काही मुस्लिम विद्वानांनी भारतीय संगीतशास्त्र समजून घेण्याचा प्रयत्न केला. बहादूर मलिक या कडा येथील सरदाराने देशभरच्या संगीतपंडितांना बोलावून त्यांच्या ग्रंथांच्या आधारे ‘संगीत शिरोमणी’ हा ग्रंथ तयार केला. हुसेनशहा शर्की या पंडिताने अनेक नवे राग रचले. भारतीय परंपरेने त्यालाच ख्याल गायकीचा प्रवर्तक मानले. मात्र ख्याल हे शीर्षक असलेले गेय काव्य दक्षिणेतल्या सूफी लोकांत सापडते.
या काळात भारतात सूफी संत व त्यांच्या तत्त्वज्ञानाचा, अनुयायांचा सुकाळ झाला. मुहम्मद घोरीच्या सैन्याबरोबर शेख मोईनुद्दीन चिश्ती हा सूफी भारतात अजमेर येथे स्थायिक झाला होता. मौलवी लोक सनातनी व कोरडे असत, तर सूफींनी मुस्लिम परंपरेत भक्तिसंप्रदाय आणला. ईश्वर व मनुष्य यांचे संबंध थेट व प्रेमाचे असतात; त्यात काव्य, संगीत, जनरीती व संस्कृती यांची महत्ता आहे असे सूफी मानत. संगीत हा सूफी परंपरेचा भाग राहत आला; त्यासाठी त्यांचेमौलवींबरोबर वादविवादही झाले होते. सुहरवर्दी व चिश्ती या परंपरांचे सूफी, भारतीय संगीत शिकू लागले.
मोईनुद्दीन चिश्ती व त्याच्या अनुयायांनी भारतीय भाषा व लोकरीत अंगीकारली. निजामुद्दीन चिश्ती (औलिया) काळात चिश्ती परंपरेने वसंतोत्सव साजरा करण्यास व रंग खेळण्यास सुरुवात केली. आजच्या हिंदी भाषेचा विकास या परंपरेतून झाला. फारसी व ब्रज भाषा प्रथम वेगवेगळ्या तऱ्हेने काव्यात गोवल्या जात असत. जसे –
जे हाल-ए — मिश्किन मकुन तगाफुल
बनाएँ बतिया दुराएँ नैना।
अमीर खुसरोच्या ह्या सर्वपरिचित ओळींमध्ये फारसी व ब्रज भाषक वाक्य-समूह भिन्न आहेत. पुढे या शब्दांची परस्परांत अधिक सरमिसळ सुरू झाली. मलिक महंमद जायसी याचे कृष्णावरचे काव्य प्रसिद्ध आहे. सूफी संतांचा दरबार सर्वांना खुला असे. लोकांची भाषा स्वीकारल्याने तर ते अधिकच लोकप्रिय झाले.
ठिकठिकाणच्या सूफींनी अश्या अनेक रचना केल्या होत्या. त्यात केवळ नव्या भाषेचा विकास नव्हता; तर मुस्लिम धर्मात हिंदू दर्शनातील अनेक संकल्पना रुजत होत्या. विशेषतः व्याकुळता, भक्ती व्यक्त करण्यासाठी द्वैत (ईश्वर व माणूस) येत असतानाच इस्लाममध्ये नसलेले ईश्वर-भक्ताचे प्रेमाचे (इश्क) नाते (प्रेमी-प्रेमिका) पुढे अद्वैतात कसे परिणत होते त्याचे सुरेख प्रत्यंतर सूफी काव्यात येते. म्हणूनच सनातनी मुस्लिम मौलवी व धर्ममार्तंडांनी सूफींना धर्मबाह्य ठरवले. आता तर तबलीघसारख्या संघटना मुस्लिमांना सूफी संतांच्या दर्ग्यात जाऊ नका असे सांगतात.
सूफी तत्त्वज्ञान हे प्रस्थापित मुस्लिम संस्थात्मक धर्माच्या विरोधी-बंडखोर होते. शेख फरीमुद्दीन गंजशकर म्हणत होते –
आसा के री यही सो रीत
जाऊ नाय की जाऊ मसीत
(मशिदीत जाऊ की न जाऊ, तू आशा लावलीस की असेच होते.)
पहिले काही सूफी भारताबाहेरून आले तरी संगीतकारांत आदरणीय रोकप्रिय सूफी संत निजामुद्दीन औलिया उत्तरप्रदेशात बदायूँमध्ये जन्मले. भारतीय दर्शनातील माया, भक्त व ईश्वराचे मैत्र या संज्ञा मुस्लिम धर्मप्रक्रियेचा सहज भाग झाल्या होत्या. सैय्यद महंमद जौनपुरी हे बुद्धिवादी सूफी म्हणतात —
हौं बलिहारी सजना हौं बलिहार
हौं सिरजन सिहरा साजन मुझ गल हर
(साजना, तुझ्यावर मी प्राणाची कुरवंडी करते. मी सृष्टीचा मुकुट आहे — तू माझ्या गळ्यातला हार)
शेख अब्दुल कुद्दस गंगोदी (1455-1538) यांनी अलखदास या नावाने काव्यरचना केली आहे. माया व अद्वैत इत्यादी संज्ञा एका भक्तिरसात या संतांनी सहज समाविष्ट केल्या.
जिधर देखूं हे सखी, देखूं होर न कोय
देखा बूझ विचार में सभी आपी सोय
(सखे, जिकडे पाहते तिकडे तोच. दुसरे कुणी दिसतच नाही. खूप विचार केल्यावर कळते की सगळे आपल्यातच आहेत.)
शेख बहाउद्दीन बरनावी हे सर्वसंगपरित्यागी सूफी जहांगीर बादशाहच्या काळांत संगीताचे मोठे पंडित म्हणून प्रसिद्धीस पावले. त्यांनी म्हटले आहे —
इस नैन का यहीं बिसेख
हौं तुझ देखूं तू मुझ देख।
( या डोळ्यांचा हाच विशेष – मी तुला पाहतो, तू मला पाहा!)
सूफींनी आपल्या कल्पनाशक्तीला परंपरा व धर्मग्रंथांच्या चौकटीतून बाहेर काढताना नवे तत्त्वज्ञान घडवले. हे भक्तीचे तत्त्वज्ञान तत्कालीन नाथपंथीय व अन्य संतांच्या दर्शनाच्या जवळचेच होते. इतक्या सहजपणे भारतीय दर्शनांच्या जवळ ते आले होते की या काळात बाबा फरीद, बुल्लेशाह, नानक, नामदेव, कबीर व अन्य कवि-संतांची व साहित्यिकांची मालिकाच दिसते. गुजरातमध्ये फेब्रुवारी-मार्च 2002 मध्ये मुस्लिमविरोधी हिंसाचारात अनेक सूफी दर्गेदेखील नष्ट करण्यात आले. शहा महंमद ज्यू जामधनी (मृत्यू 1515) या सूफीने म्हटले आहे.
एक समंदर सात कहावे, धनुस बादल मेंह बरसावे।
वही समंद हो बूंद दिखाले, नदिया नाले होकर चाले….
(समुद्र एकच; मात्र त्याला सात म्हणतात. इंद्रधनुष्य व मेघ पाऊस पाडतात. तोच समुद्र, तोच थेंब, नदी-नाले होऊन चालतात.)
सूफी परंपरेतून भारतीय मुस्लिमांची संस्कृती-त्यांची भाषा, लोकरीती, त्यांचे दर्शनदेखील अरबस्तानच्या मुस्लिमांपेक्षा फार वेगळे घडले आहे. लोकजीवनाचाच एक भाग म्हणून सूफी विचारांनी इथल्या संगीतालाही नवा आशय दिला.
मुस्लिम आक्रमणाबरोबर सूफींचा प्रवेश भारतात झाला. सूफी लोकसमूहांना बरोबर घेऊन चालणारे होते. म्हणून समाजात सहज स्वीकृत होत असत, तरी काही सूफी संतांचा अपवाद सोडला तर बहुतेकजण मुस्लिम धर्माचाही प्रचार करीत होते. मात्र त्यांची इस्लाम व धर्म यांची परिभाषा वेगळी होती. ती एक प्रकारची नैतिक बंडखोरी आहे व प्रत्येक धर्मात ती असते. भावनाशून्य व साचेबंद रूढी व दिखाऊ आचार सूफींना योग्य वाटत नाहीत. हिंदू परंपरेत वेळोवेळी बंडखोर तत्त्वचिंतक, धर्मसंस्थापक निर्माण झाले. पुरोहित व संत यांच्यात जो फरक आहे तोच मौलवी व सूफीत आहे. आचार्य कैलासचंद्र बृहस्पती हे आपल्या ‘मुसलमान व भारतीय संगीत’ या पुस्तकात सूफी पंथाचे अभ्यासक डॉ. अब्दुल हक यांचे एक अत्यंत लोभस अवतरण देतात,
‘’मौलवी बहिरंग पाहतो तर सूफी अंतरंगावर लक्ष देतो. तो कर्मकांडाचा दास होतो तर हा त्यातून मुक्त होऊ इच्छितो. मौलवीचे वागणे धिक्काराने व तिरस्काराने भरलेले असते तर याच्या वागण्यात दया व प्रेम असते. तो दुसऱ्यांचे दोष जाहीर करतो, तर हा आत्मपरीक्षण करतो. मौलवी सर्वांना एकाच तराजूत तोलतो तर सूफी प्रत्येक व्यक्तीचे वेगळेपण लक्षात घेऊन वेगवेगळा संस्कार करतो. तसे करताना ‘शरीयत’ला व सर्व बाह्य आचारधर्माला सूफी धाब्यावर बसवतो. सूफी लोकांच्या अंतरंगात प्रवेश करतो, दुसऱ्याचे हृदय वश करण्याकडे त्याचे लक्ष असते. ते करताना तो कोणत्याही धार्मिक-अधार्मिक बाह्य बाधेची फिकीर करत नाही. एक हृदय काबीज झाले म्हणजे एक नवे जग काबीज करण्यासारखे असते. त्यामुळे जे काम मोठमोठ्या पंडितांना व बादशहांना जमत नाही ते एक साधा दरवेशी व फकीर सहज करून जातो. सूफी विनयाने व नम्रतेने लीन होतो. त्याची दृष्टी परिणामावर असते, फकीराच्या दरबारात लहान-मोठा, राव-रंक, विद्वान-मूर्ख कुणीही जाऊ शकतो.’’
या सूफींनी इस्लाममध्ये संगीत बसवले. कुराण व प्रेषित महंमदाच्या वचनांचा (हदीस), ‘ईश्वरभक्तीत मन एकाग्र करण्यासाठी गाणे-वाजवणे सदैव योग्य आहे’ – हा अर्थ त्यांनी लावला.
अनेक सूफी संत संगीत जाणत होते. कव्वाल होते. निजामुद्दीन औलिया स्वतः तसेच त्यांच्या अवतीभवती गाणारे होतेच. या चिश्ती सूफींच्या परंपरेत अमीर खुसरोचा उदय झाला. अल्लाउद्दीन खिलजीच्या काळातत्याच गोपाल नायकाबरोबर (गायक व त्याहून मोठा नायक) शास्त्रीय चर्चा झाली असल्याची शक्यता आहे.खुसरो आजच्या उत्तर प्रदेशातल्या एटा जिल्ह्यात जन्मले होते. भारती संगीत जगात सर्वश्रेष्ठ आहे असे ते म्हणत. ते ब्राह्मण पंडितांकडून थोडेबहुत भारतीय शास्त्र शिकले. त्यांनी इराणी संगीतपद्धतीतील राग-वर्गीकरणाची पद्धत भारतीय संगीतात आणली असे एक मत (बृहस्पती) आहे. मात्र आपल्याकडील डॉ. तारळेकर प्रभृतींनी त्याला विरोध दर्शविला. असो. तात्पर्य, एवढेच की भारतीय संगीताचा अधिक विस्तार व विकास सूफी परंपरेने केला. मात्र हे ‘भारतीय’ संगीत होते.
सूफी सामगायन, ग्राम-मूर्च्छना, मेल, थाट-राग पद्धती, प्रबंधगायकी, त्यातून मध्ययुगात धृपद गायकी प्रचलित झाली. भारतीय संगीत म्हणजे धृपद गायकीच होती हे अगदी एकोणिसाव्या शतकाच्या मध्यापर्यंत खरे होते. गोपाल नायक, तानसेन, बैजू, धोंडू, हरिदास स्वामी डागर हे सर्वच धृपदिये होते. भारतीय सांस्कृतिक परंपरेत गायन-संगीत हे अभिन्न अंग होते. लोकपरंपरांमध्ये तर जन्म, मरण, विवाह, शेती, सण-वार, लेकी-सुना, धुणी-भांडी ह्या सर्व ठिकाणी गीत-संगीत असायचेच, त्यातूनच ते स्फुरायचे. अभिजात संस्कृतीतही शास्त्रीय गायनाच्या रूपाने सशक्त व सर्जनशील कला विकसित होत राहिली, या‘मार्ग’ व ‘देशी’ परंपरांची परस्परांशी देवाण-घेवाण सतत चालूच होती. मुस्लिम सूफी संप्रदायातल्या कलाकारांनी त्याचा आणखी विकास केला. या संयुक्त प्रभावांमधून आज प्रचलित असलेल्या ख्यालगायकीची बीजे रुजली. आचार्य बृहस्पतींच्या मते खुसरो पद्धतीचा पंडित हुसेनशहा शर्की याने अनेक नवे राग रचले व ख्यालगायकीची सुरुवात केली. एका भूभागातील सतत बदलत्या, विकसित होत असलेल्या, वैविध्यपूर्ण योगदानांतून एक स्वतःचे स्वायत्त विश्व असलेले शास्त्रीय संगीताचे अंग आपल्या संस्कृतीचा एक अविभाज्य भाग बनले. या सांगीतिक विकासाबरोबर भारतीय शास्त्रीय संगीताचे समाजशास्त्रही विलक्षण आहे.
उत्तरेबरोबर दक्षिणेतील मुस्लिम राजवटीतही भारतीय कला-विद्यांची व संगीतांची कदर झाली होती. बहामनी राज्याचा पहिला सुलतान अलाउद्दीन हसन बहाद्दूरशहा (1347-59) हा निजामुद्दीन चिश्तीचा शिष्य व अमीर खुसरोचा मित्र होता. त्याच्या पदरी अनेक संगीतकार होते. पहिला महंमदशाह याच्या काळात भारतीय संगीतवर्गीकरणावर मुकामपद्धतीचा परिणाम झाला असे म्हणतात. मात्र बहामनी सुलतानांचे व एकंदरच मुस्लिमशासकांचे वर्तन हे धर्मांध व परकेपणासारखेही होते याचीही नोंद घ्यावयास हवी. पुढे गोवळकोंड्याचे महंमद कुली कुतुबशाह यांनी आपल्या अनेक प्रेमिकांवर काव्ये लिहिली. आदिलशाहीतील सर्व सुलतान संगीताचे चाहते होते. त्यांच्यापैकी दुसरा इब्राहीम आदिलशाह (1580-1627) यांनी ‘नवरस’ ग्रंथ संपादित केला. आपल्या गेय गीतांच्या संग्रहाचे मंगलाचरण त्यांनी सरस्वतीच्या स्तुतीने केले. ‘नवरस’मध्ये राग-रागिन्यांची शब्दचित्रे आहेत. त्यांच्या दरबारात चार हजार संगीतज्ञ होते.

तुमचा अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published.