आज देशभरात सर्वच प्रश्नांवर ध्रुवीकरणाची भूमिका घेतली जाते आहे असे आपल्याला दिसते. तुम्ही एकतर देशप्रेमी आहात किंवा देशद्रोही (देशप्रेमाची व्याख्या आम्ही करू ती!) त्याविरोधात जे आवाज उठत आहेत तेही बव्हंशी प्रतिक्रियेच्या स्वरूपाचे आहेत, किंवा तेही वेगळ्या अर्थाने ध्रुवीकरणाचीच कास धरणारे आहेत. त्यामुळे भारतात एकतर हिंदुराष्ट्राचे समर्थक आहेत किंवा आंबेडकरवाद व मार्क्सवादाच्या समन्वयाचे समर्थक, असे चित्र माध्यमांतून उभे केले जात आहे. मुळात ह्या दोन्ही विचारधारांच्या मध्ये भलाथोरला वैचारिक पैस आहे व भारतातील बहुसंख्य जनता त्या जागेवर उभी आहे. भारतातील आजच्या वैचारिक संघर्षात ह्या ‘सुटलेल्या’ मधल्या जागेला योग्य स्थान मिळावे, असा आमचा प्रयत्न राहील. अर्थात, ‘आजच्या सुधारक’च्या संपादकीय धोरणानुसार रा. स्व. संघापासून माओवादाच्या समर्थकांपर्यंत सर्वाना विमर्शासाठी आमचे विचारपीठ खुले आहे, ह्याचा आम्ही पुनरुच्चार करू इच्छितो.
सामाजिक माध्यमांचा वापर आपापल्या विचारधारांच्या प्रचारप्रसारासाठी कशा पद्धतीने केला जातो, हे आपण सर्व अनुभवीत आहोत. अतिशय आक्रमक (व बिनडोक) पद्धतीने केला जाणारा हा प्रचार सर्वसामान्य जनता कसलाही विचार न करता का स्वीकारते, हा प्रश्नही आपल्याला त्रास देतो. सुकल्प कारंजेकर हे कोडे विज्ञानाच्या मदतीने हे कोडे सोडविताना आपल्याला ह्या अंकात भेटतील. ‘इतिहासाचे काय करायचे?’ हा देखील आजच्या काळातील असाच एक कळीचा प्रश्न. इतिहासाचे वारंवार पुनर्लेखन होण्याच्या ह्या काळात आपल्याला त्रासदायक वाटणाऱ्या (पण एकेकाळी इतिहासात आदराचे स्थान असणाऱ्या ) प्रतीकांचे काय करायचे हा प्रश्न जगभरातील लोकांना भेडसावीत आहे. ऱ्होड्स ह्या अमेरिकन धनवंताला एकेकाळी आफ्रिकेच्या इतिहासात गौरवाचे स्थान प्राप्त होते. पण ‘पिरामिडच्या खालून लिहिल्या जाणाऱ्या’ इतिहासाने त्याला खलनायक ठरविला व त्याच्या पुतळ्यांची मोडतोड करण्यात आली. हा संदर्भ घेऊन श्याम पाखरे हे इतिहासाचे अभ्यासक आपल्याला भारतीय समाजाच्या दृष्टीने एक मोलाची गोष्ट सांगण्याचा प्रयत्न करीत आहेत. फिल्म इन्स्टिट्यूट, हैद्राबाद मध्यवर्ती विद्यापीठ व जे एन यु त माजलेल्या रणाच्या पार्श्वभूमीवर नंदा खरे आपल्याला ‘लिबरल एज्युकेशन’ देणारी, तरुणांमधील बंडखोरीला वाव देणारी, त्यांना प्रश्न विचारण्यास प्रोत्साहित करणारी विश्वविद्यालये भारतात निर्माण का होत नाहीत हे समजावून सांगत आहेत. धर्मांधतेच्या प्रश्नावर आतापर्यंत ‘आजचा सुधारक’मधून बरेच वैचारिक साहित्य प्रकाशित झाले आहे. ह्या अंकात मात्र ह्या प्रश्नाचा वेध दोन वेगळ्या पातळ्यांवर घेण्यात आला आहे. आमचे दिवंगत मित्र व नर्मदा बचाव आंदोलनाचे बिनीचे कार्यकर्ते संजय संगवई ह्यांचा ‘मुस्लीम समाजाने भारतीय शास्त्रीय संगीताला दिलेले योगदान’ ह्या विषयावरील एक महत्त्वाचा लेख आम्ही दोन भागात पुनर्मुद्रित करीत आहोत. त्याद्वारे भारतातील गंगा-जमनी संस्कृतीचे एक विहंगम दर्शन आमच्या वाचकांना होईल. आमचे दुसरे स्नेही श्री अमर हबीब ह्यांनी त्यांच्या आंतरधर्मीय विवाहाचा आपला अनुभव ह्या अंकात मांडला आहे, तो हृदयस्पर्शी तर आहेच, पण धर्मभेदाच्या जटील प्रश्नालाही प्रेमाचे साधेसोपे उत्तर कसे पुरेसे ठरते हेही त्यातून आपल्याला उमगते.
गेल्या अनेक शतकांपासून प्रत्येक धर्मात सुरु असलेला ‘पुराणपंथी वि. सुधारणावादी’ हा संघर्ष आता ऐरणीवर आला आहे. त्याचे ऐतिहासिक महत्त्व विषद करणारी लेखमाला आम्ही ह्या अंकापासून सुरु करत आहोत. भारतातील एका संपन्न संप्रदायात रूढ असणाऱ्या एका भीषण स्त्री-विरोधी परंपरेविषयी बनविलेल्या माहितीपटाविषयीदेखील आपण ह्या अंकात जाणून घेणार आहोत. हा ऐवज आमच्या वाचकांना विचारप्रवृत्त करेल, अशी आशा आहे.