आपल्या सभोवताली विलक्षण वेगाने इतक्या काही घटना घडत आहेत की सुजाण व संवेदनशील माणसाला हतबुद्ध होण्याशिवाय पर्यायच उरू नये. रोहित वेमुलाच्या आत्महत्येच्या प्रकरणाचे धागेदोरे उलगडू लागतात न लागतात, तेव्हढ्यात जे एन यु घडते. तेथील एका छोट्या घटनेचे निमित्त करून देशातील ह्या अग्रगण्य शिक्षणसंस्थेला देशद्रोह्यांचा अड्डा म्हणून बदनाम करण्यात येते. तेथे नेमके काय घडले हे चित्र स्पष्ट होईपर्यंत आता अलिगढ मुस्लीम विद्यापीठाची पाळी आलेली दिसते. एकूण देशप्रेमाचे हाकारे देत जे कोणी आपल्याला कोणत्याही कारणाने विरोध करतील त्या सर्वांविरुद्ध रान पेटवत देशद्रोही म्हणून त्यांची शिकार करायची हाच उद्देश असावा अशी शंका येते.
अशा प्रसंगांमध्ये विविध विचारप्रवाहांमध्ये संवाद घडून समाज/देश ह्यांची मानवतेकडे वाटचाल होण्यासाठी धडपडणाऱ्या आपल्यासारख्या व्यक्ती व ‘आजचा सुधारक’सारखी नियतकालिके ह्यांची काय भूमिका असू शकेल? एकीकडे ‘इंडियन एक्स्प्रेस’ व ‘हिंदू’ सारखी नियतकालिके, ‘scroll.in’ सारखी संकेतस्थळे, सोशल मिडियावरील विविध समूह, यू ट्यूब वरून व्हायरल होणारे व्हिडीओ यांच्यामधून संबधित माहितीचा पूर वाहत आहे. त्यातून ह्यातील प्रत्येक घटनेचे धागेदोरे उलगडत आहेत. अनेक नवे पैलू प्रकाशात येत आहेत. राष्ट्रवाद, अभिव्यक्ती स्वातंत्र्य, नागरिकांचे हक्क व कर्तव्ये, विद्यार्थी आंदोलन, शिक्षण पद्धती व शिक्षणविषयक धोरण अशा सर्व संबंधित विषयांवर आज विश्लेषणात्मक गंभीर लेख, व्याख्याने, व्यंगचित्रे, गाणी, ‘किस्सागोई’ (विनोदी ढंगाचे कथात्मक निरुपण) असे सर्व साहित्य उपलब्ध आहे. पण दुसरीकडे ह्यातील बहुतेक साहित्य त्याच त्या वर्तुळात फिरत राहिल्यामुळे सर्वांना उपलब्ध होत नाही. ज्यांना हे ज्ञान होते त्यांनाही काय कृती करावी हे कळत नाही व ते निष्क्रिय राहतात, तर दुसरीकडे हजारो लाखो तरुण डोक्याला कसलाही त्रास न देता भडकाऊ, आगलावू भाषणे किंवा घोषणा ऐकून, सोशल मीडियावरील तद्दन खोट्या पोस्ट्स वाचून आपली मते बनवितात व आपल्याहून वेगळे विचार मांडणाऱ्या व्यक्तींना समाज/राष्ट्राचे शत्रू कल्पून त्यांना धडा शिकविण्यासाठी सज्ज होतात. त्यामुळे ज्ञानवान विवेकी माणसांना कृतिप्रवण करणे, समाजावर प्रभाव टाकणाऱ्या घटना/समस्या ह्यांमागील दुर्लक्षित पैलू समाजातील बहुसंख्य लोकांच्या ध्यानात आणून देणे व अविवेकी कृती करणाऱ्यांशी संवाद साधून त्यांना त्या कृतीपासून परावृत्त करणे, असे हे तिहेरी आव्हान आहे.
ब्रेकिंग न्यूजच्या व माहितीच्या महापुराच्या काळात ‘आजचा सुधारक’ला तात्कालिक माहितीच्या पलीकडे जाऊन दृष्टिकोन व विचार देणे, मुख्य प्रवाहातल्या माध्यमांनी दुर्लक्षित केलेले विषय, पैलू मांडणे, असे बरेच काही करून आपली प्रासंगिकता टिकवून ठेवायची आहे. त्या दिशेने आम्ही क्रेत असलेले प्रयत्न, उदा. मुखपृष्ठाचे वेगळे रूप, कविता, अनुभव ह्यांना अंकात दिलेले स्थान ह्या बाबी आमच्या वाचकांच्या ध्यानात आल्या असतीलच.
जे एन यु त नेमके काय घडले ह्याविषयी विविध माध्यमांतून विविध ‘व्हर्शन्स’ प्रसृत होत आहेत. त्यातील अनेकांचा खोटेपणाही कालांतराने स्पष्ट होत आहे. ह्या पार्श्वभूमीवर आम्ही घटनेनंतर प्रत्यक्ष जे एन यु त जाऊन वेगवेगळ्या लोकांशी बोलून श्री. जयंतकुमार सोनवणे ह्यांनी बनविलेला ‘ग्राउंड झिरो रिपोर्ट’ या अंकात मुद्दाम प्रकाशित करत आहोत. तो सत्याच्या अधिक जवळ जाणारा आहे, असा आमचा विश्वास आहे. रोहित, जे एन यु, अलिगढ विद्यापीठ–ह्या साखळीतील महत्त्वाचे सूत्र आजच्या शिक्षणपद्धतीची दिशाहीनता हे आहे. ह्या पार्श्वभूमीवर ह्या अंकातील बाळकृष्ण पिशुपती ह्यांचे मुंबई विद्यापीठाच्या दीक्षांत समारंभातील भाषण आमच्या वाचकांना नक्कीच महत्त्वाचे वाटेल. ह्या वर्षीचा दुष्काळ फार कठीण असणार आहे, ह्याच्या खाणाखुणा उन्हाळा लागण्यापूर्वीच दिसू लागल्या आहेत. पण त्याहून गंभीर बाब ही की सरकार व समाज ह्या दोघांच्याही विचारतालिकेवर हा विषयच नाही. संवेदनांचा हा दुष्काळ ही नैसर्गिक दुष्काळाहून अधिक गंभीर समस्या आहे. शेतीविषयातील कृतीशील विचारवंत श्री. वसंत फुटाणे ह्यांनी मराठवाड्यात फिरून केलेल्या दुष्काळाच्या पाहणीचा अहवाल तुम्हाला नक्कीच अंतर्मुख करेल. आंतर्राष्ट्रीय महिला दिनाचे औचित्य अधोरेखित करणारी कविता व नव्या पिढीच्या वागण्यातून प्रतिबिंबित होणारे स्त्री-पुरुष नात्यातील मोकळेपण मांडणारा ‘अनुभव’ बऱ्याच वाचकांना ‘आपलासा’ वाटू शकेल.
‘आजचा सुधारक’ची ही धडपड तुम्हाला कशी वाटते हे editor.sudharak@gmail.com वर अवश्य पाठवा. हे मासिक प्रतिकूल परिस्थितीत तगून राहावे असे वाटत असेल तर आपल्या वर्गणीचे नूतनीकरण करणे, तसेच नवे वर्गणीदार मिळवून देणे हे तुम्हाला करायलाच हवे.
विवेकवादी निव्वळ बोलघेवडे नसतात हे सिद्ध करणे आता तुमच्या हातात आहे.