‘तलवार’च्या निमित्ताने

तलवार, मेघना गुलजार, विशाल भारद्वाज, गत-अवलोकन परिणाम

आरुषी खून खटल्यावर आधारित ‘तलवार’ चित्रपटाच्या निमित्ताने मानसशास्त्रातील गत-अवलोकन परिणाम ही संकल्पना व तिचेसामाजिक निर्णयप्रक्रियेवरील परिणाम ह्यांची तोंडओळख करून देणारा हा लेख.
—————————————————————————

दोन हजार आठ साली दिल्लीतील नॉईडा येथे झालेल्या आरुषी तलवार आणि हेमराज बनजाडे यांच्या हत्येच्या तपासावरती ‘तलवार’ हा मेघना गुलजार दिग्दर्शित आणि विशाल भारद्वाज लिखित चित्रपट बेतला आहे. चित्रपटाविषयी बोलण्याआधी या खटल्याची पार्श्वभूमी समजावून घेऊ या.

खटल्यासंबंधी
आरुषी ही नुपूर आणि राजेश तलवार ह्या दांपत्याची एकुलती एक मुलगी होती आणि हेमराज हा त्या कुटुंबाचा त्यांच्याकडेच राहणारा नोकर होता. एके दिवशी सकाळी तलवार दांपत्याला त्यांच्या मुलीचा खून झालेला आढळला आणि हेमराज अनुपस्थित असल्यामुळे त्यांनी पहिला संशय नोकरावर घेतला. या घटनेच्या दुसऱ्याच दिवशी हेमराजचाही मृतदेह त्यांच्याच घरी मिळाला. त्यामुळे खटल्यातील गुंतागुंत  अजूनच वाढली. माध्यमांद्वारे या प्रकरणाला पहिल्यापासूनच व्यापक प्रसिद्धी मिळत गेली. काही दिवसांनी पोलिसांनी आरुषीचे आई-वडील म्हणजे नुपूर व राजेश तलवार यांनाच आरोपी म्हणून घोषित केले. हे घोषित करण्यामागे पोलिसांनी दोन संभाव्य कारणे दाखवली. एक म्हणजे आरुषी आणि हेमराज या दोघांना राजेश यांनी ‘आक्षेपार्ह’ स्थितीत पकडले आणि संतापाच्या भरात दोघांचाही खून केला. दुसरे कारण म्हणजे राजेश यांचे काहीतरी विवाहबाह्य संबंध होते जे आरुषीला माहिती होते. त्यामुळे राजेश यांनी आरुषीचा आणि नंतर पुरावा मिटवण्यासाठी हेमराजचाही खून केला. पोलिसांच्या या दोन्ही दाव्यांवरती आक्षेप घेतला गेल्यामुळे आणि माध्यमांचे ‘लक्ष’ असल्यामुळे हे प्रकरण सी.बी.आय. या संस्थेकडे चौकशीसाठी आणि तपासासाठी देण्यात आले. सीबीआय़च्या टीमने आई-वडिलांना  दोषी न मानता राजेश तलवार यांचा सहाय्यक कृष्णा आणि अजून दोन नोकरांवर संशय घेतला. पण सीबीआयच्या टीमला काही ठोस पुरावा मिळाला नाही, म्हणून सीबीआयने त्यांच्याच दुसऱ्या टीमकडे हे  प्रकरण सोपवले. या दुसऱ्या टीमने संशयाची सुई पुन्हा आई-वडिलांकडे दर्शवून त्या दिशेने तपास केला. पण त्यांनाही पुरेसा पुरावा मिळाला नाही. शेवटी सीबीआयने चार्जशीट दाखल करण्यास असमर्थता दाखवून प्रकरण बंद केले. कोर्टाने मात्र परिस्थितिजन्य पुरावा ग्राह्य मानून तलवार दांपत्यास सजा ठोठावली. खटल्याची पार्श्वभूमी इथे संपते.

या खटल्याला माध्यमांमध्ये एवढी प्रचंड प्रसिद्धी मिळण्याची दोन प्रमुख कारणे होती. लागोपाठच्या दोन हत्यांमुळे या प्रकरणामध्ये नाट्य मोठ्या प्रमाणावर होते आणि हत्या नेमकी कुणी व का केली हे एक मोठे रहस्य बनून राहिले होते. दुसरे कारण म्हणजे, पोलिसांच्या आरोपामुळे ऑनर-किलिंगच्या जिव्हाळ्याच्या विषयाशी  हे प्रकरण जोडले गेले होते. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांपासून स्वयंसेवी संस्थांपर्यंत सर्वांचेच या प्रकरणाविषयी काहीतरी मत अथवा म्हणणे होते.

खटल्यासंबंधीचा एक प्रमुख मुद्दा असा की पोलिसांच्या अगदी पहिल्या टीमकडून पुरावे गोळा करण्यात खूप जास्त त्रुटी राहून गेल्या होत्या. जर हे न्यायवैद्यक (forensic) पुरावे व्यवस्थित जपले गेले असते, तर तपास सोपा होऊन गेला असता (आणि हा चित्रपटही बनला नसता).

चित्रपटासंबंधी
चित्रपटात दोन वेगळी गृहीतके घेऊन तपास करणाऱ्या सीबीआयच्या दोन टीम्सच्या दृष्टीने हे प्रकरण दाखविले आहे. त्याचबरोबर खटल्याची पार्श्वभूमी, सीबीआयचे टीम बदल, त्यामागील राजकारण, माध्यमांच्या सादरीकरणातून  बनणारे जनमत आणि त्याचा  न्यायदानावर होणारा परिणाम ह्या बाबी  हा चित्रपट चांगल्या प्रकारे दाखवतो. खटल्याच्या दोन बाजू दाखवताना अकीर कुरोसावा या प्रसिद्ध दिग्दर्शकाच्या ‘राशोमान’ चित्रपटाची स्टाईल दिग्दर्शक वापरतात. या स्टाईलमधे ती ती बाजू मांडताना व्यक्तिरेखांना त्या प्रसंगांमध्ये त्या त्या दृष्टिकोनातून चित्रित केले जाते.

फक्त ‘राशोमान’ मध्ये एक घटना तीन (किंवा चार) वेगवेगळ्या निवेदनांतून—दृष्टिकोनांमधून दाखवताना कुरोसावा स्वत: मात्र सर्व निवेदनांना सारखाच न्याय देतो आणि स्वत:चे (दिग्दर्शकाचे/ लेखकाचे) मत मात्र देत नाही. एकाच घटनेकडे अनेक दृष्टिकोनांतून पाहिले जाऊ शकते आणि यातील प्रत्येकच दृष्टिकोन व्यक्तिसापेक्ष असल्यामुळे ‘खरा’ असू शकतो. एकाच सत्याची अनेक रूपे किंवा अनेक सत्ये हा राशोमानचा मुख्य मुद्दा आहे (असे मला वाटते). प्रेक्षकही या अनेक-सत्य-दर्शनाने अंतर्मुख होतो आणि कदाचित त्यामुळेच राशोमान एवढा प्रभाव टाकून आहे.

या हत्याकांडाबद्दल माहिती मिळवून वाचली असता केस गुंतागुंतीची आहे (अपुऱ्या पुराव्यांमुळेही आहे) हे लक्षात येते आणि हेही लक्षात येते की आई-वडिलांना दोषी मानण्याइतका पुरावा नक्कीच नाही आहे. त्यामुळे कोर्टाने ठोठावलेली शिक्षा नेमकी का दिली किंवा कशाच्या प्रभावाखाली येऊन दिली हा प्रश्न उरतो. या खटल्याबद्दल विचार करताना हे लक्षात घ्यायला हवे की आपण न्यायाधीशाच्या भूमिकेत पटकन जाऊ नये. आई-वडिलांना दोषी मानण्याएवढा पुरावा नाही याचा अर्थ आई-वडिलांना दोषी मानण्याएवढा पुरावा नाही एवढाच आहे, आई-वडील निर्दोष आहेत असा नाही.

नुपूर आणि राजेश तलवार या दांपत्याबद्दल पूर्ण सहानुभूती बाळगूनही असे म्हणावे वाटते की इथे दिग्दर्शक-लेखकद्वयाचा तोल ढळला आहे. राशोमानमधील निरीक्षकाचा नि:पक्षपातीपणा दुर्दैवाने ‘तलवार’ दाखवत नाही. ‘तलवार’मध्ये निवेदनातील तोल तलवार दांपत्याकडे झुकला आहे. असे म्हणता येऊ शकते की तलवार दांपत्यावरील झालेल्या अन्यायाला चित्रपटात वाचा फोडली आहे. पण मग ‘राशोमान’ स्टाईल आणून नि:पक्षपातीपणाचा आव आणण्याची गरज नव्हती. सरळसरळ ‘आम्ही या बाजूचे’ असे म्हणून चित्रपट विणता आला असता किंवा मुळात चित्रपटाच्या ऐवजी माहितीपटही (documentary) बनवता आला असता. नि:पक्षपाती म्हणवून घ्यायचे आणि हलकेच एका बाजूला झुकते माप द्यायचे, ह्यामुळे चित्रपटाचा दर्जा खालावला आहे.

तलवार दांपत्याची बाजूही लेखक-दिग्दर्शकद्वयाने चतुराईने घेतली आहे. चित्रपटातील इन्स्पेक्टर आणि सीबीआय टीम-२ च्या व्यक्तिरेखा रंगवताना त्यांचे व्यंग्यचित्रीकरण (caricaturization) केले आहे. या व्यंग्यचित्री-करणामुळे त्यांची बाजू आपोआपच लंगडी पडते. मेघना गुलजार यांच्या दिग्दर्शनाबद्दल माहिती नाही, पण विशाल भारद्वाजसारख्या चांगल्या लेखक-दिग्दर्शकाकडून अजून जास्त अपेक्षा होती.

चित्रपटाच्या पलिकडे..
एका प्रसंगामध्ये सीबीआय टीम-१ च्या  अधिकाऱ्याच्या तोंडी पुढील अर्थाचा संवाद आहे — “एखाद्या केसचा तपास करताना आधी धागेदोरे शोधावे, मग पुरावे शोधावे आणि पुराव्यांवरून उलगडा करावा (आणि सत्य ज्ञात व्हावे) ही योग्य पद्धत आहे, पण हे लोक (म्हणजे पोलीस आणि सीबीआय टीम-२) यांनी मात्र आधी सत्य काय आहे ते ठरवून घेतले आहे आणि त्यावरून ते उलटे पुरावे शोधत बसले आहेत (जे अतिशय चूक आहे!)”.

या संवादामध्ये एक गोष्ट दिग्दर्शक/लेखक विसरले आहेत ती ही की सुरुवातीच्या पोलीस टीमच्या दृष्टीने  तपासाच्या सर्व दिशा एकसारख्याच होत्या. कारण त्यावेळी त्यांना असलेल्या माहितीनुसार खुनी कोणीही असू शकत होते. त्यांतील एक दिशा त्यांनी पकडली आणि त्या दिशेने तपास केला. हा तपास पूर्वग्रहदूषित होता असे मानणे वस्तुस्थितीचे पुरेसे आकलन झालेले नाही याची साक्ष देते. पुरावे गोळा करण्यात पोलिसांकडून झालेली दिरंगाई ही एक घोडचूक आहे हे मान्य. पण त्यामुळे पोलिसांनी निवडलेली दिशा चूक होती असे ठाम विधान करणे आणि त्यांनी ही चूक हेतूपुरस्सर केली आहे असे  मानणे चुकीचे आहे.

बाजूच्या खोलीत खून होऊनही आई-वडिलांना ते कसे कळले नाही हा ह्या संदर्भात उपस्थित केला गेलेला एक कळीचा मुद्दा. या मुद्द्याचा प्रतिवादही मूळ खटल्यात आणि चित्रपटात झालेला आहे आणि तो  सिद्धही  झालेला आहे. परंतु ज्यावेळी पोलिसांच्या पहिल्या टीमने तपासाला सुरुवात केली त्यावेळी हा मुद्दा त्यांना ज्ञात नव्हता. प्रतिवादात केलेली चाचणी खूपच उघड-उघड (obvious) वाटते त्यामुळे पहिल्याच टीमने ही चाचणी का केली नाही हा दावाही बहुतांशी लोकांना खरा वाटला तरी तो चूक आहे. कारण पुन्हा एकदा, जे आत्ता मागे वळून पाहताना उघड-उघड वाटते ते इतिहासातील त्या क्षणी सुस्पष्ट नव्हते. मानसशास्त्रीय भाषेत या परिणामाला गत-अवलोकन परिणाम (hindsight bias) असे म्हणतात.

गतअवलोकन परिणाम (Hindsight Bias)
वर्तणूक मानसशास्त्रामध्ये (Behavioral psychology) हा परिणाम अनेक वेळा दाखवून देण्यात आला आहे. याला अनौपचारिकपणे “मला हे आधीपासूनच माहिती होते – परिणाम (I-knew-it-all-along effect)” असेही म्हणता येईल. सर्वसाधारणपणे मानवी मन हे एखाद्या ज्ञानाच्या गतकाळातील स्थिती समर्थपणे उभ्या करू शकत नाही. साध्या भाषेत सांगायचे तर भूतकाळात आपले या विषयावरचे काय मत होते हे व्यक्तीला परिपूर्णपणे आठवता येत नाही.

हा परिणाम नीट समजावून घेण्यासाठी त्यासंदर्भातील एक अभ्यास बघू. प्रा. बरुच फ्रिचॉफ यांनी १९७२ साली अमेरिकेत पुढील जनमत चाचणी केली. त्यावेळी अमेरिकी राष्ट्राध्यक्ष रिचर्ड निक्सन चीनला भेट देणार होते. चाचणीत सहभागी नागरिकांना त्या भेटीच्या संभाव्य परिणामांची एक यादी देण्यात आली. त्या यादीतील पर्याय संभाव्य/असंभाव्यतेच्या कसोटीवरती नोंदवण्यास त्यांना सांगण्यात आले (assigning different probabilities to possible options). उदाहरणार्थ – माओ, निक्सन यांना भेटायला राजी होतील का? अमेरिका चीनला अधिकृत राजकीय मान्यता (diplomatic recognition) देईल काय? इ. रिचर्ड निक्सन यांची चीन-भेट झाल्यावर त्याच सहभागी नागरिकांना भेटून त्यांना विचारण्यात आले की तुम्ही आधीच्या जनमत चाचणीत यादीतील पर्यायांना किती संभाव्यता दिली होती. प्रा. बरुच फ्रिचॉफ यांना असे आढळले की ज्या घटना खरेच घडून गेल्या होत्या त्याविषयी  त्याच व्यक्तीला  आता आठवत असलेला संभाव्यतेचा अंदाज हा त्याच व्यक्तीने त्याच घटनेविषयी भूतकाळातील दिलेल्या संभाव्यतेच्या  अंदाजापेक्षा खूप जास्त होता. म्हणजे बहुतांश लोकांना असे वाटत होते की “चीन भेटीत जे घडले ते मला आधीपासूनच माहिती होते”.

अशा अनेक अभ्यासांमध्ये हा परिणाम सत्य असल्याचे दिसून आले आहे. वाटतो तेवढा हा परिणाम दुर्लक्षणीय नाही. या मानसशास्त्रीय परिणामाचे अनेक आयाम आहेत त्यांतील फक्त एका आयामाची चर्चा करून हे विवेचन थांबवू.

गतअवलोकन परिणामाची सामाजिक किंमत
समाजात ज्या व्यक्ती इतरांच्या वतीने व्यावसायिक निर्णय घेत असतात त्यांच्या बाबतीत गत-अवलोकन परिणाम विशेष अपायकारक असतो. उदा. डॉक्टर, संस्थांचे आणि कंपन्यांचे प्रमुख, राजकारणी मुत्सद्दी, राष्ट्रीय नेते, इ. या विवेचनापुरते अशा व्यक्तींना आपण निर्णयघेणारे असे म्हणू. निर्णयघेणाऱ्या व्यक्तींच्या निर्णयाचे परिणाम निसर्गत:च अनेक गोष्टींवरती अवलंबून असतात. त्या सर्व गोष्टी निर्णयघेणारे व्यक्तींच्या हातात असतील असे नाही. उदाहरणा-दाखल, एखाद्या राष्ट्रीय नेत्याने घेतलेल्या आर्थिक धोरणाचे किंवा परराष्ट्रीय धोरणांचे परिणाम हे निसर्गत:च अनेकानेक गोष्टींवरती अवलंबून असतात. गत-अवलोकन परिणामांमुळे निर्णय-घेणाऱ्यांच्या भूतकाळातील चांगल्या निर्णयांना — ज्यांचे परिणाम काही कारणांमुळे वाईट झाले (मूळ निर्णयामुळे नाही) —  आपण गरजेपेक्षा जास्त दोष देतो. आणि जे चांगले परिणामकारक निर्णय कालांतराने obvious वाटतात त्यांना त्यांच्या लायकीपेक्षा कमी श्रेय देतो. उदाहरणार्थ, एखाद्या कमी धोकादायक ऑपरेशनमध्ये जर रोगी दगावला तर डॉक्टरला ऑपरेशनचे धोके “पुरेशा गांभीर्याने” न समजावून सांगितल्याबद्दल शिव्या (किंवा मार) मिळतात. परंतु निर्णयघेणाऱ्या लोकांना तर निर्णय घ्यावेच लागतात. सद्-हेतूने घेतलेल्या परंतु जोखीम असलेल्या निर्णयाबद्दल (गत-अवलोकन परिणामामुळे) भविष्यात आपल्याला शिव्या मिळू शकतील असे वाटले तर ते निर्णयघेणारे नोकरशाही-सदृश धोरण स्वीकारतात, ज्यामध्ये कमीत कमी जोखीम घेतली जाते आणि कागदपत्रांची पूर्तता मात्र काटेकोररीत्या केली जाते. अमेरिकेतील (आणि काही अंशी भारतातीलही) वैद्यकीय व्यवस्था याचे चांगले निदर्शक आहे, असे मानण्यास हरकत नसावी. काही वैद्यकीय चाचण्यांची गरज नसतानाही त्या करायला लावणे, गरज नसताना उपचार चालू ठेवणे इ.बाबी त्यामुळेच केल्या जातात.

जाताजाता/ समारोप
’तलवार’ चित्रपटाच्या निमित्ताने आपण गत-अवलोकन परिणामापर्यंत आलो. गत-अवलोकन परिणाम जीवनाच्या अनेक क्षेत्रांत व्याप्त आहे.  त्यामुळे ह्या आणि ह्यासारख्या इतर महत्त्वाच्या मानसशास्त्रीय संकल्पनांविषयी जाणून घेणे हे त्यांच्या सामाजिक परिणामांच्या दृष्टीने महत्वाचे आहे.

संदर्भ : Thinking, fast and slow by Daniel Kanheman (for hindsight bias)
आभार : ‘तलवार’ चित्रपटातील मुद्द्यांवर चर्चेत भाग घेणाऱ्या मित्रांचे.
ईमेल : dhananjay.muli@gmail.com

तुमचा अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published.