श्रम, संपत्तिनिर्माण, तंत्रज्ञान
—————————————————————————
आपण बहुतेक वेळी संपत्तीचा संबंध पैशाशी लावतो. पण त्याचा संबंध तंत्रज्ञानाच्या वापरातून माणसाला मिळणाऱ्या फुरसतीशी आहे, अशी अभिनव मांडणी करणारा; भारतात तंत्रज्ञानातील नवसर्जन का घडत नाही, उत्पादन, चलनवाढ व उपभोग ह्यांचा परस्परसंबंध कसा असावा अशा महत्त्वाच्या प्रश्नांचा वेध घेणाऱ्या लेखाचा उत्तरार्ध
—————————————————————————
भारतीय माणसाचा स्वभाव पाहिला असता तो कमी श्रमांत जास्त उत्पादन करण्याचा नसून तो कमी श्रमांत जास्त पैसा मिळविण्याचा आहे. आमच्या अशा स्वभावामुळे आम्ही आमच्या विहिरींवर खिराडीसुद्धा बसवत नाही. ‘वेळ वाचणे आणि श्रम वाचणे म्हणजे श्रीमंती येणे’ ही व्याख्या जर मान्य केली तर आपल्याला वस्तूंच्या किंमती पैशात न मोजता त्यांच्यासाठी किती श्रम करावे लागले यामध्ये मोजाव्या लागतील असे मला का वाटते ते समजेल.
कोणत्याही समाजाच्या ठिकाणी सुबत्ता येणे म्हणजे श्रमाचे परिमाण पूर्वीइतकेच ठेवून उपभोगाचे परिमाण वाढवीत जाणे. ह्यालाच “चंगळवाद’असे एक नाव आहे. ‘चंगळवाद’ हा शब्द वाईट आहे. तो शब्द वापरल्यामुळे आज जे वंचित आहेत, त्यांच्या उपभोगात भर पडली तरी ते चंगळ करतात असा अर्थ निघतो. सर्वांचा उपभोग समान असायला हवा, हे आपले उद्दिष्ट असावे. युरोपातल्या काही राष्ट्रांमध्ये समान उपभोग आहे असे मी ऐकून आहे. तिथे काही जास्त धनसंपन्न आणि काही कमी असे असले तरी त्यांचे खाणे-पिणे, कपडे-लत्ते यांमध्ये फारसा फरक नाही. धनिकांचे धन कशात खर्च होते? तर ते त्यांच्या घरी असलेल्या कलाकुसरीच्या वस्तूंमध्ये. एखाद्या नामवंत चित्रकाराचे चित्र कोट्यवधी रुपये खर्च करून आपल्या घरातल्या भिंतीवर टांगणे ही प्रतिष्ठेची बाब आहे, उपभोगाची नाही असे मला वाटते.
उपभोग्य वस्तूंची निर्मिती जर अविरत होत असेल तर, त्या मिळविण्यासाठी पोटाला चिमटा घेण्याची किंवा पति-पत्नींनी कामे करण्याची गरज राहात नाही, हे विधान बरोबर आहे का? ते बरोबर असेल तर आज आम्ही स्कूटर, मोटर आणि घर अशा वस्तू घेण्यासाठी दोघे-तिघे विनाकारण राबतो असे म्हणणे भाग आहे. नवरा-बायको दोघांनीही नोकरी केल्यामुळे घरात जास्त पैसा येतो यात संशय नाही. पण या जास्त येणाऱ्या पैशामुळे बाजारातल्या वस्तूंच्या किंमती वाढत असल्या तर त्यांचे राहणीमान जागच्या जागीच राहील. आज तसे होत आहे असे जाणवते. सध्या मुंबईला नोकरी करणाऱ्या पुष्कळश्या महिलांना दोन आघाड्यांवर लढून त्यांचे शरीरस्वास्थ्य, त्याचबरोबर मनःस्वास्थ्यदेखील गमवावे लागत आहे. असे होणे आमच्या समाजाला भूषणास्पद नसून लांछनास्पद आहे.
उत्पादनपद्धतीचे दोन प्रकार आहेत. पहिला प्रकार — गरज निर्माण झाल्यावर वस्तू बनवण्याचा. दुसरा प्रकार म्हणजे आधी वस्तू बनवायची आणि त्यानंतर ग्राहक शोधायचा असा. घरबांधणीचे उदाहरण घेऊन हा मुद्दा समजावून घेऊ — आयुष्यभर पैसा वाचवून, प्रसंगी पोटाला चिमटा घेऊन काही पुंजी साठवायची आणि ती पुरेशी जमल्यावर सुतार, गवंडी अशा कारागिरांना बोलावून त्यांच्याकडून एक घर बांधून घ्यावयाचे आणि त्या घराला ‘श्रमसाफल्य’ अशासारखे नाव देऊन तेथे राहायला जायचे. कृतकृत्यतेचा आनंद उपभोगायचा. हा पहिला प्रकार.
दुसरा प्रकार असा — ऐन तारुण्यात वर्तमानपत्रातील जाहिराती पाहून आपल्या गरजेप्रमाणे घर निवडायचे आणि सुरुवातीचा केवळ इसार भरून तिथे राहायला जायचे. नंतर हप्तेबंदीने बाकीचे पैसे फेडायचे. पहिल्या प्रकारातील जी उत्पादनपद्धती आहे तिच्यामध्ये गरजेप्रमाणे उत्पादन होत असे. एखादा माणूस झोपडीत राहत असेल तर त्याला पक्क्या घराची गरज नाही असे मानले जात असे. त्यामुळे त्याची झोपडी खराब झाल्यानंतर ती दुरुस्त करणे एवढेच काम होते आणि समाजाचे राहणीमान स्थिर होते. अशा स्थिर राहणीमानाच्या काळात ज्यामुळे माणसाचे श्रम कमी होतील असे शोध लागणेही दुरापास्त होते. समाजातले बलिष्ठ लोक, मग ते धनाने असोत वा शरीराने असोत, स्वतःची कामे दुसऱ्याकडून करून घेत होते. त्या काळात गुलामगिरीची प्रथा त्यामुळेच निर्माण झाली होती. एकूण ‘बळी तो कान पिळी’ असा प्रकार होता. या परिस्थितीत फरक पडला तो इंग्लंडात झालेल्या औद्योगिक क्रांतीने. औद्योगिक क्रांती झाल्यावरही गुलामगिरी काही दिवस टिकून राहिली होती. आपल्या महाराष्ट्रातदेखील पेशवाईपर्यंत ती होती. पेशवाईनंतरही ती होती. वरसईकर गोडसे भटजी 1857 च्या सुमारास उत्तर भारतात प्रवासाला गेले होते, त्यांनी माळव्यात कुठेतरी झालेल्या यज्ञाचा प्रसंग वर्णिला आहे. त्यामध्ये, यज्ञासाठी आलेल्या ब्राह्मणाला दक्षिणेसोबत दासीही दिली गेली असे लिहिले आहे. पण ते असो.
बलुतेदारीच्या प्रथेमुळे आर्थिक व्यवहारासाठी पैसा जवळपास लागतच नसे. बलुतेदारी ज्यावेळी प्रचारात होती, त्यावेळी पैशांचा वापर न्यूनतम होता. त्यावेळी वस्तुविनिमयसुद्धा नव्हता. प्रत्येक धंदेवाईकाने आपापले काम करायचे आणि शेतकऱ्यांनी त्यांच्या शेतात उत्पादित धान्याचा वाटा बलुतेदाराला द्यायचा. जणू काय पूर्ण गाव एक कुटुंब होते. आणि ते एकमेकांची सेवा आणि उत्पादन आपापसांत वाटून घेत. या बलुतेदारांमध्ये लोहार, सुतार, चांभार, न्हावी, गवंडी, कोळी, साळी, माळी, कुंभार, अशी मंडळी असत. त्यात एक ग्रामजोशीदेखील होता. त्यालाही शेतकऱ्याच्या खळ्यावर जाऊन आपले बलुते मागून आणावे लागे.
गावकऱ्यांच्या सर्व गरजा बलुतेदारीवर भागत. त्यामुळे गाव स्वयंपूर्ण असे. याचा अर्थ असा की गाव पैशाच्या वापराशिवाय संपन्न असे. पण दुसऱ्या बाजूला ते दरिद्री होते. कारण त्यांच्या शारीरिक कष्टाला सीमाच नव्हती. अशा गावकऱ्यांमधली काही तरुण मंडळी सैन्यात दाखल होत. ती तलवारबाजीत प्रवीण असली तरी तेव्हाच्या या गावकऱ्यांचे जीवनक्रमामध्ये नवीन काहीच घडत नव्हते. त्यामुळे परदेशातून आलेल्या शिपायांपुढे, बंदुकांपुढे ते हतप्रभ होते, त्यामुळेच त्यांना जिंकणे सोपे गेले असावे. हे थोडे विषयांतर झाले.
गरज आणि शोध
“गरज शोधाची जननी आहे.’ हा समज कितपत बरोबर आहे, हे आता तपासू या. माणसाची गरज आधी की शोध आधी हे ठरविणे कोंबडी आधी की अंडे आधी.’ या प्रश्नाइतके कठीण नाही. गरज म्हटली की शोध लागतो. हे भारतात तरी कधी झाले असे ऐकिवात नाही. इथल्या लोकांना गरज नाही असे म्हणावे तर तेही कठीण आहे. आपण आज जितकी उपकरणे वापरतो त्यांतील बहुतेक सारी सुरुवातीला परदेशातून आली आहेत. त्याला त्यांच्या नकला इकडे झाल्या असल्या तरी मूळ संकल्पना आपल्या देशातल्या नव्हत्या. आपण एक विजेचे उदाहरण घेऊ — विजेचा शोध कोणत्या गरजेमुळे लागला? तो शोध लागला तेव्हा विजेपासून कोणकोणती कामे घेता येतील हे अजिबात माहीत नव्हते. अशी आणखीही काही उदाहरणे देता येतील.
शिवणाचे यंत्र शोधून काढले ते त्याची गरज होती म्हणून? कोण्या एका माणसाच्या मनात आपल्या बायकोचे शिवणाचे श्रम कमी करण्याचा विचार आला, तो तासन्तास अनेक महिनेपर्यंत ती टाके कसे घालते याचे निरीक्षण करीत बसला. यंत्राने तसे करता येईल का? याचे प्रयोग करू लागला. (त्याच्या बायकोने मला हे शिवणयंत्र करून द्या, मला याची गरज आहे असे म्हटले नव्हते. शेजारणीकडे तिने पाहिले आणि मलाही हे यंत्र पाहिजे असा हट्टही केला नव्हता.) अनेक प्रयोग केल्यानंतर एका दोऱ्याने यंत्राने शिवणे अशक्य आहे हे त्याच्या लक्षात आले. येथेही गरज ही शोधाची जननी आहे असे म्हणणे अवघड आहे. हा नियम सर्वत्र लागू नाही एवढे मात्र आपल्याला म्हणता येईल.
नवनवे शोध लागतात, माणसाचे श्रम कमी करणारी यंत्रे आधी बनतात आणि त्यांची गरज लोकांना मागाहून वाटायला लागते. (निदान आपल्या देशात) लोकांना गरज वाटावी म्हणून या उपकरणांची, त्या साधनांची जाहिरात करावी लागते, प्रदर्शने भरवावी लागतात. हे सारे सांगण्याचा उद्देश इतकाच की, गरज नसताना उत्पादन केल्याशिवाय आपले राहणीमान सुधारत नाही. आपले श्रम कमी होत नाहीत.
नवनवे उत्पादन विकत घेता यावे यासाठी आपली क्रयशक्ती समाज स्वतःच वाढवत असतो. या नव्या साधनांचे उत्पादन जसजसे वाढत जाते तसतसे ते अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचते. फार क्वचित आधी क्रयशक्ती वाढली म्हणून शोध लागतात.
विषमतेची संगती कशी लावणार?
आपल्या देशात जवळ-जवळ प्रत्येक जण भल्याबुऱ्या मार्गाने पैसे मिळवण्याच्या मागे लागला आहे. पैसा त्याला मिळतोही आहे. सरकारी खात्यांत तेथल्या कमर्चाऱ्यांकडून कामे करून घेण्यासाठी पैशाची भरमसाठ देवाण-घेवाण होते असे ऐकिवात आहे. खूप पैसा देशात फिरतो आहे. (थोडा उघडपणे आणि थोडासा लपवून) त्यापैकीच काही विदेशांतल्या बँकांमध्येही जाऊन पोहचला आहे. काही भारतीय कारखानदार परदेशांतील कारखाने विकत घेऊन तेथे ते चालवितात. असे असूनसुद्धा आपला देश दरिद्री देशांमध्ये गणला जातो. त्यामुळेच की काय तो कर्जबाजारी आहे. परक्या देशांतून भांडवल आणल्याशिवाय येथे नवीन कारखाने उभे राहू शकत नाहीत. हा काय प्रकार आहे? एकाचवेळी आपल्याकडे भक्कम पैसा आहे आणि दुसरीकडे दारिद्र्य आहे! एका बाजूला उत्तुंग इमारती आहेत आणि त्यांच्याच शेजारी मोठमोठ्या झोपडपट्ट्या! यांची संगती कशी लावावी?
देश दरिद्री आहे म्हणजे काय? दारिद्र्याची व्याख्या करावी लागेल. ती व्याख्या अशी करता येईल – “दारिद्र्य म्हणजे अभाव. अभाव कशाचा तर उपभोग्य वस्तूंचा. त्याशिवाय अभाव फुरसतीच्या वेळेचा.”
आपण दारिद्र्याची व्याख्या केली, आता श्रीमंतीची करू :- “श्रीमंती म्हणजे विपुलता. विपुलता कशाची, तर उपभोग्य वस्तूंची आणि वेळेची.’’
उपभोग्य वस्तू म्हणजे काय? तर – “ज्या वस्तूंमुळे माणसाच्या प्राथमिक गरजा भागून त्याचे राहणीमान सुधारत जाते त्या.” आता राहणीमान सुधारणे म्हणजे काय? हेही सांगावे लागेल. अन्न, वस्त्र, निवारा याची विपुलता म्हणजे राहणीमान सुधारणे नव्हे, तर त्यामध्ये एकंदर समाजाचेच आरोग्य सुधारत जाणे. समाजाची समज वाढत जाणे, आणि एकूण सुखसोयींमध्ये भर पडत जाणे. मोकळ्या वेळाचे परिमाण वाढणे, तो मोकळा वेल ललितकलांच्या उपासनेमध्ये घालविणे, हे राहणीमान सुधारल्याचे लक्षण आहे.
समाजाचे राहणीमान कशाने वाढते? ते श्रम वाचवल्याने वाढते. तेव्हा श्रम कसे वाचतात ते आता समजून घेऊ –
आज आपल्या देशात सगळ्यात जास्त कष्ट शेतकऱ्याला करावे लागतात. दिवसभर उन्हा-तान्हात राबावे तेव्हा कुठे त्याला पोटापुरते अन्न मिळते आणि तेही मिळेलच याची खात्री नाही. ज्याला आपण सुखसोयी म्हणतो त्यांचा विचार करू — दळणवळणाची साधने असणे, चांगले रस्ते असणे, पोस्ट ऑफिस, टेलिफोन, दवाखाने आणि शाळा यांच्यामुळे सुखसोयी वाढतात. आणि सुखसोयींमध्ये आता करमणुकीच्या साधनांचाही अंतर्भाव करावा लागेल. ज्या गोष्टी गावातल्या गावात केल्या जातात किंवा होऊ शकतात त्या अन्न, वस्त्र, निवारा पुरवू शकतात. पण बाकीच्या सुखसोयींसाठी मोठ्या प्रमाणावर संघटन आवश्यक असते.
पोस्ट ऑफिस, शाळा, दळणवळणाची साधने, दवाखाने इत्यादी बाबी निर्माण करण्यासाठी पुष्कळशा गावातल्या लोकांना एकत्र यावे लागते. कामे वाटून घ्यावी लागतात आणि ती व्यवस्थितपणे पार पाडावी लागतात. म्हणजेच मोठ्या प्रमाणावर श्रमविभागणी करावी लागते. श्रमविभागणी केल्याशिवाय सुखसोयी निर्माण होऊ शकत नाहीत. वेळ वाचवू शकत नाही. आणि कष्टही कमी होऊ शकत नाहीत.
श्रीमंतीचे तीन प्रकार संभवतात –
१) व्यक्तिगत श्रीमंती, २) समाजाची श्रीमंती, ३) सार्वजनिक श्रीमंती
१) व्यक्तिगत श्रीमंती : व्यक्तिगत संपत्तीमध्ये घर-दार, शेतीवाडी, कपडेलत्ते, भांडीकुंडी, वाहन, सोनेनाणे, पुस्तके, गृहोपयोगी वस्तू इत्यादी वस्तू.
२) समाजाची श्रीमंती : समाजाच्या श्रीमंतीमध्ये अशा वस्तू येतात ज्या खाजगी मालकीच्या असल्या तरी पूर्ण समाजाच्या उपोयगी पडतात. ज्यामध्ये मंगल कार्यालये, शाळा, रिक्षा, टांगे, टॅक्सी यांसारखी वाहने आणि खाजगी दवाखाने-हॉटेल्स यांसारख्या वस्तू येतात. काही ठिकाणी बसेस, रेल्वेसुद्धा खाजगी मालकीच्या म्हणजे मोठमोठ्या कंपन्यांच्या मालकीच्या असतात.
३) सार्वजनिक श्रीमंती : सार्वजनिक श्रीमंतीमध्ये सरकारी आणि निमसरकारी शाळा, नद्यांवरची धरणे, रस्ते, दवाखाने, उद्याने, राखीव मैदाने, दूध उत्पादक संस्था इत्यादी.
खाजगी श्रीमंती सर्वांची सारखी नसते. एकाची श्रीमंती वाढल्यामुळे दुसरा त्यापासून वंचित राहतो. ज्यावेळी उपभोग्य वस्तूंचे उत्पादन हाताने होत असे त्यावेळी कोण्या एकाची श्रीमंती दुसऱ्याला लुबाडल्याशिवाय येऊच शकत नव्हती. कारण उत्पादन अत्यंत मोजके होते. शंभर वर्षांपूर्वीपर्यंत कापडाचे दरडोई उत्पन्न वीस वार (यार्ड) होते. ते सारे स्त्रियांच्या वस्त्रांसाठी वापरले जाई व पुरुषांना केवळ लंगोटी लावून राहावे लागे. मुले तर उघडी-नागडीच राहत. आता कपडा विपुल प्रमाणात निर्माण होतो. पण त्याचे वितरण अजून समप्रमाणात होऊ शकले नाही. औद्योगिक क्रांतीनंतर हे चित्र बदलायला सुरुवात झाली. आणि मानवनिर्मित कृत्रिम धागा उपलब्ध झाल्यापासून वस्त्रांची रेलचेल झाली असली तरी ती सर्वांपर्यंत पोहचलेली नाही. औद्योगिक क्रांतीच्या पूर्वी एकूणच उत्पादन फार थोडे असल्याकारणाने सारेच देश दरिद्री होते. जे काय उत्पादन होईल ते कष्ट केल्यानेच मिळे. आज जी विषमता आहे ती एकाचे लुबाडून दुसऱ्याने वापरल्यामुळे निर्माण झालेली नाही. पण तो वेगळा विषय आहे. त्याचा विचार नंतर.
एखाद्या समाजाजवळचे सोनेनाणे वाढले म्हणजे तो समाज श्रीमंत होतो हा समज खरा नाही. या ठिकाणी मला एका गोष्टीचे स्मरण होते — एका खेड्यात एक न्हावी आपले काम करून जे काय दोन-चार पैसे मिळतील त्याच्यावर उदरनिर्वाह करीत असे. त्याने असे ऐकले की लंकेत फार स्वस्ताई आहे. तेथे तू गेलास तर तुला तुझ्या कामाबद्दल सोन्याच्या विटा भेटतील. ते ऐकून त्या न्हाव्याला लोभ सुटला. त्याने लंकेला जाऊन आपले नशीब काढायचे ठरविले. मोठ्या कष्टाने, पुष्कळ अडचणी सोसून तो लंकेपर्यंत पोहचला. तेथे रस्त्याच्या कडेला बसून धोकटी उघडली आणि गिऱ्हाईकाची वाट पाहू लागला. त्याच्याकडे आलेल्या पहिल्या गिऱ्हाईकाने त्याला दोन सोन्याच्या विटा दिल्या. दिवसभरात न्हाव्याला भरपूर गिऱ्हाईके मिळाली व प्रत्येक गिऱ्हाईकाकडून सोन्याच्या विटांची भरपूर कमाईही झाली. न्हाव्याला लंकेत येऊन आपले नशीब जोर काढते आहे असे वाटून लंकेत येण्याचे समाधान वाटले. निसर्गनियमाप्रमाणे दिवस मावळायला आला. दिवभराच्या श्रमाने न्हाव्याला भुकेची जाणीव झाली. जवळ सोन्याच्या विटा असल्यामुळे पैशाची चिंता नव्हती. काहीतरी विकत घेऊन खाण्यासाठी तो खाण्याच्या पदार्थांच्या दुकानात जिन्नस खरेदी करण्यासाठी गेला तेव्हा अगदी किरकोळ चणेफुटाण्यांसारख्या पदार्थांसाठी त्याला तीन सोन्याच्या विटा द्याव्या लागल्या. न्हाव्याने कपाळावर हात मारला. गोष्टीचे तात्पर्य असे की, पैसा कितीही आला तरी उपभोग मात्र तेवढाच राहतो.
आमच्या दारिद्र्याचे पहिले कारण असे की, कष्ट कमी व्हावे यासाठी आम्ही साधने कधीही बनवली नाहीत, आजपर्यंत नाही. बैलगाडीपलिकडे कुठलेही वाहन बनवले नाही, वाहनात सुधारणा केल्या नाहीत. आमच्या इथल्या आदिवासींनी बैलगाडीसुद्धा बनवली नाही. वाहने सुधारली नाहीत, त्यामुळे रस्तेही सुधारले नाहीत. पायवाटांवर आणि चाकोऱ्यांवर निभवत राहिले. रस्ते नाहीत, त्यामुळे पूल नाही. घड्याळ केले नाही. कालमापनासाठी सूर्योदयाला घटिकापात्र पाण्यात टाकायचे आणि त्यावरून कालमापन करायचे. घड्याळच नसल्यामुळे नावा समुद्रात फार दूर जाऊ शकत नव्हत्या. होकायंत्र कधी वापरायला सुरुवात केली हे माहीत नाही. माणसाने बुद्धी वापरून या सर्व वस्तू केल्या. मात्र आम्ही बुद्धीचा वापर योग्य दिशेने न केल्यामुळे दरिद्री राहिलो.
भारतीय माणूस फक्त देवाच्या कामासाठी किंवा राजाज्ञेप्रमाणे एकत्र येत राहिला. त्यामुळे आम्ही मोठमोठी मंदिरे आणि राजमहाल बांधले पण सामान्य जनांसाठी सोयीस्कर घरे आम्ही बांधूच शकलो नाही. पुणे शहरात पेशव्यांच्या आज्ञेवरून कात्रजला तलाव बांधून कुंभारीनळांच्या साह्याने पुण्यातल्या हौदात पाणी खेळवले. पण स्वतःसाठी कोणत्याही गावाने असे काम केले नाही. आम्ही ढोंगी आणि मत्सरी असल्याकारणाने आम्हाला कोणतीही कामे संघटितपणे करता आली नाहीत.
आम्हा भारतीयांचा दुर्गुण असा की आम्ही अतिशय ढोंगी आहोत. त्यामुळे आम्ही आमच्यावर सोपवलेली कामेसुद्धा प्रामाणिकपणे करीत नाही. परिणामी आमच्याकडे पर्यवेक्षकांची श्रेणी निर्माण करावी लागते. आपली मुख्य अडचण अशी आहे की, आपण पैशाला, सोन्याला, रत्नांना, चांदीला संपत्ती समजतो. (काही खनिज पदार्थ, धातु) ती संपत्ती गोळा करत राहतो. खऱ्या संपत्तीकडे दुर्लक्ष होते. पुस्तकातून शिकून आपल्याला ज्या गोष्टी माहीत झाल्या आहेत त्यांचा आपण स्वीकार करीत नाही. आपल्या परिसरातील स्वच्छता. ती राखल्याने आपण आरोग्यसंपन्न राहतो. रहदारीचे नियम — ते पाळल्याने अपघातांची संख्या कमी होते. अशासारख्या नागरिकांनी एकमेकांसाठी करावयाच्या गोष्टीसुद्धा आपण करीत नाही. हेच आपल्या दारिद्र्याचे मूळ आहे हे आपल्याला समजलेच नाही. संपन्न समाज कोणता? ज्याच्या ठिकाणी आरोग्य, शिक्षण, आणि दोन्हीच्या शिवाय बंधुभाव आहे तो. हा बंधुभाव असला की, परस्परांच्या अडचणीच्या वेळी आपण धावून जाऊ शकतो आणि हे एकमेकांसाठी केलेले काम हीच श्रीमंती. आमच्या इथले डॉक्टर्स लहान गावात जायला पाहात नाहीत. त्यांची धाव परदेशाकडे. आपल्या इथले अभियंते मोठमोठी धरणे बांधतात, पण शेतकऱ्यांपर्यंत पाणी पोहचत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांची स्थिती मरणोन्मुख आहे. ती स्थिती तशीच राहते आणि अभियंत्यांच्या खिशांत पैसा खुळखुळतो.
वास्तविक एकमेकांसाठी कामे करणे, साधने निर्माण करणे आणि एकमेकांच्या गरजेच्या वेळी मदत करणे म्हणजे खरी श्रीमंती. आणि हे सारे पैशाशिवाय होऊ शकते. आणि हे सारे आजपर्यंत मोठ्या प्रमाणावर होत आले आहे. पैशाशिवाय श्रीमंती कशी येते हे सांगायचा मी प्रयत्न केला आहे.
श्री मोहिनीराज, खरे टाऊन, धरमपेठ, नागपूर-440010.
मराठी भाषेमध्ये पण उत्तम ज्ञान मिळू शकते याचे सर्वात चांगले उदाहरण म्हणजे हा लेख.
खोलात शिरून कठीण गोष्टी सोप्प्या उदाहरणा सोबत सांगण्याची लेखकाची हतोटी वाखणण्या जोगी आहे.