मासिक संग्रह: फेब्रुवारी, २०१६

दरी

नकाच पडू माझ्या भानगडीत
चालू देत माझं आपलं
वेगळंच काहीतरी, भलतंच काहीतरी
तुम्हाला नाहीच कळणार
माझा आवाज तुमच्यापर्यंत नाहीच पोहोचणार
कारण आपल्यामध्ये एक दरी आहे
हां म्हणजे नातं आहेच, कचकड्याचं
तो डी एने पण आहे, जीन्स पण
पण या सगळ्याला व्यापून उरणारी
एक भली थोरली दरी आहे आपल्यात

या दरीत ते शेतकरी आहेत
ज्यांच्याविषयी तुम्हाला जराही कणव नाही
कारण ते टॅक्स भरत नाहीत
‘ती लोकं ‘ आहेत फँड्रीमधली
ज्यांची तुम्हाला किळस वाटते
ती आदिवासी लोकं पण आहेत
विकासाच्या मार्गातले धोंडे बनलेली
आणि ती विस्थापित लोकं पण
ते नाही का जे सिग्नल्स वर दिसतात
त्यांचे घाणेरडे हात आपल्याला , आपल्या गाडीला लावत
भीक मागतात
असं सगळं तुम्ही नाकारलेलं वास्तव या दरीत साचलंय
नदीतून वाहून आलेल्या गाळासारखं
दिवसागणिक थरावर थर साचाताहेत
घट्ट होत जाताहेत
भीतीदायक आहे सगळं
प्रलय येऊन पुनश्च सृजनाची सुरुवात असणारा
पिंपळाच्या पानावरचा तो बाळकृष्ण दिसेपर्यंत तरी
हे असंच चालणार
हा असाच अंधार असणार
गिळायला बघणारा

नकाच येऊ तुम्ही इथे
तुमचं चालू देत
हिंजेवाडी, नगरपट्टा , खराडी
ट्रॅफिक
पाचगणी की गोवा
टकिला की ओल्ड मॉंक
चिकन साटे की चिकन फलाणा
मी येते ना तुमच्याबरोबर
छान तयार होऊन
‘व्यवस्थित’ कपडे घालून
माझा नेहमीचा मुखवटा घालून
डिनरला मंगळागौरीची रांगोळी काढायला
साखरपुड्याला गणेशवंदना म्हणायला
गौरी जेवणाला
सगळ्याला
पण मनानी मात्र मी त्या दरीतच असते
मला नाही जमत तुमच्यासारखं
ते वास्तव नाकारत जगायला

अनुभव: दारू आणि लहान मुले

दारू, बालके

सध्याच्या जिव्हाळ्याच्या व वादग्रस्त प्रश्नाची एक दुर्लक्षित बाजू …
—————————————————————————
चंदगडला आता प्राध्यापक म्हणून काम करत असलेल्या वर्गमित्राकडे गेलो होतो. तो जिथे राहतो, त्याच्यासमोरच मांगवाड्याची वस्ती सुरू होते. छान जेवून मित्राच्या दिवाणखान्यात गप्पा ठोकत बसलो होतो. तेवढ्यात समोरच्या झोपडीवजा घरातून कलकलाट ऐकू आला. शिवीगाळ, काहीतरी फेकून मारल्याचे, ठो-ठो बोंबलण्याचे, रडण्याचे आवाज. कुतूहलाने काय होते आहे हे बघण्याच्या उद्देशाने मी खुर्चीतून उठताना बघून हातानेच मला बसण्याचा त्याने इशारा केला. मग अत्यंत निर्लेप आवाजात तो मला सांगू लागला, “समोर एक मांगाचं कुटुंब आहे.

पुढे वाचा

श्रद्धांजली : अनिल पाटील सुर्डीकर

गावगाडा- शतकानंतर – अनिल पाटील सुर्डीकर

दशावतारांच्या गोष्टींपैकी वामनाची गोष्ट मला नेहेमीच अस्वस्थ करत आली आहे. एरवी देव पाप्यांना शिक्षा देतो, तर बळीचं पापच मला दिसत नाही. एरवी देव दुर्बलांचा घात करतो. हो;
घोडा नको, हत्ती नको, वाघ तर नको रे बाबा
बकरीच्या पोराचा बळी दे,
असा देव दुर्बलांचा घात करतो!
वामन मात्र बळीचा दडपून वर टर्रेबाजी करतो! आणि बळीही हसतखेळत वामनाला झेलून आपले महत्त्व अबाधित ठेवतो. एक वर्षारंभ आपल्या नावाशी जोडून घेतो. इडा-पिडा टळून आपले राज्य येवो, अशी प्रार्थना लोकांना करायला लावतो.

पुढे वाचा

‘तलवार’च्या निमित्ताने

तलवार, मेघना गुलजार, विशाल भारद्वाज, गत-अवलोकन परिणाम

आरुषी खून खटल्यावर आधारित ‘तलवार’ चित्रपटाच्या निमित्ताने मानसशास्त्रातील गत-अवलोकन परिणाम ही संकल्पना व तिचेसामाजिक निर्णयप्रक्रियेवरील परिणाम ह्यांची तोंडओळख करून देणारा हा लेख.
—————————————————————————

दोन हजार आठ साली दिल्लीतील नॉईडा येथे झालेल्या आरुषी तलवार आणि हेमराज बनजाडे यांच्या हत्येच्या तपासावरती ‘तलवार’ हा मेघना गुलजार दिग्दर्शित आणि विशाल भारद्वाज लिखित चित्रपट बेतला आहे. चित्रपटाविषयी बोलण्याआधी या खटल्याची पार्श्वभूमी समजावून घेऊ या.

खटल्यासंबंधी
आरुषी ही नुपूर आणि राजेश तलवार ह्या दांपत्याची एकुलती एक मुलगी होती आणि हेमराज हा त्या कुटुंबाचा त्यांच्याकडेच राहणारा नोकर होता.

पुढे वाचा

गांधींनी भगतसिंगला वाचवण्यासाठी काय केले ?

गांधी, भगतसिंग, फाशीची शिक्षा
—————————————————————————————

महात्मा गांधींनी भगतसिंगला वाचवायला पुरेसे प्रयत्न केले नाहीत किंवा त्यांना भगतसिंगला वाचविण्यात फारसे स्वारस्य नव्हते अशी टीका अनेकदा केली जाते. ह्या लेखातून असे स्पष्ट करण्याचा प्रयत्न केला गेला आहे की गांधींचा सशस्त्र क्रांतीला जरी विरोध असला तरी त्यांनी भगतसिंगला वाचवायचा अखेरपर्यंत प्रयत्न केला होता.

—————————————————————————————

भगतसिंग, राजगुरु आणि सुखदेव ह्या तरुण क्रांतिकारकांना २३ मार्च १९३१ रोजी फाशीची शिक्षा देण्यात आली.  त्याबरोबरच गांधी ह्यांना वाचवतील असे वाटणाऱ्या लोकांची निराशा झाली आणि त्या अनुषंगाने गांधीवर बरीच टीकाही करण्यात आली.

पुढे वाचा

डावे पक्ष आणि जातीचा प्रश्न

डावे पक्ष, जात, डॉ. आंबेडकर
———————————————————————————-
गेल्या नव्वद वर्षांत अनेक ऐतिहासिक घोडचुका करून व त्यातून काही न शिकून भारतातील डाव्या पक्षांनी आपली वैचारिक दिवाळखोरी वारंवार सिद्ध केली आहे. पहिल्या सार्वत्रिक निवडणुकीनंतर प्रमुख विरोधी पक्ष असलेले कम्युनिस्ट आता अस्तित्वाच्या संकटात सापडले आहेत. अशा वेळी भारतीय समाजव्यवस्थेतील ‘जात’ ह्या मूलभूत घटकाचा पुनर्विचार करण्याचा संकेत दोन्ही कम्युनिस्ट पक्षांनी दिला आहे. त्यांच्या ह्या समीक्षेची समीक्षा करणारा हा लेख.
—————————————————————————

इसवी सन २०१६ मध्ये होणारी पश्चिम बंगाल विधानसभेची निवडणूक ही भारतातील डाव्या पक्षांसाठी अस्तित्वाची लढाई असणार आहे.

पुढे वाचा

पुस्तक परिचय : क्रिएटिव्ह पास्ट्स (२)

सर्जक भूतकाळ , मराठी इतिहासलेखन

इतिहास हा विषय असा आहे के जो कधी बदलत नाही, असे (नेमाडेंच्या कादंबरीतील इतिहासाच्या प्राध्यापकाला) वाटण्याचे दिवस केव्हाच संपले. मराठीतले इतिहासलेखन म्हणजे तर विविध अस्मितांनी भारलेल्या इतिहासकारांचा आविष्कार. महाराष्ट्र राज्य निर्मितीपूर्वीच्या २६० वर्षांच्या इतिहासलेखनाचे जातीय-राजकीय ताणेबाणे उलगडण्याचे महत्त्वपूर्ण  कार्य  केलेल्या महत्त्वाकांक्षी पुस्तकाचा नंदा खरेंनी करून दिलेल्या परिचयाचा उत्तरार्ध.

एक इतिहासकार मात्र सरकारी नोकरीत असूनही राजवाडेपंथी होते. हे होते त्र्यं.शं. शेजवलकर. ते भाइसंमंच्या चिपळूणकरी वळणाच्या राष्ट्रवादी इतिहासाला विरोध करत; आणि सरदेसायांच्या नानासाहेब पेशव्याच्या चरित्रालाही विरोधी प्रस्तावना लिहीत.

पुढे वाचा

पैशाने श्रीमंती येत नाही (२)

श्रम, संपत्तिनिर्माण, तंत्रज्ञान
—————————————————————————
आपण बहुतेक वेळी संपत्तीचा संबंध पैशाशी लावतो. पण त्याचा संबंध तंत्रज्ञानाच्या वापरातून माणसाला मिळणाऱ्या फुरसतीशी आहे, अशी अभिनव मांडणी करणारा; भारतात तंत्रज्ञानातील नवसर्जन का घडत नाही, उत्पादन, चलनवाढ व उपभोग ह्यांचा परस्परसंबंध कसा असावा अशा महत्त्वाच्या प्रश्नांचा वेध घेणाऱ्या लेखाचा उत्तरार्ध
—————————————————————————

भारतीय माणसाचा स्वभाव पाहिला असता तो कमी श्रमांत जास्त उत्पादन करण्याचा नसून तो कमी श्रमांत जास्त पैसा मिळविण्याचा आहे. आमच्या अशा स्वभावामुळे आम्ही आमच्या विहिरींवर खिराडीसुद्धा बसवत नाही. ‘वेळ वाचणे आणि श्रम वाचणे म्हणजे श्रीमंती येणे’ ही व्याख्या जर मान्य केली तर आपल्याला वस्तूंच्या किंमती पैशात न मोजता त्यांच्यासाठी किती श्रम करावे लागले यामध्ये मोजाव्या लागतील असे मला का वाटते ते समजेल.

पुढे वाचा