प्रतिसाद

‘आसु’मधील दिवाकर मोहनी ह्यांचा ‘आमच्या देशाची स्थिती’ हा लेख वाचला. आमचे स्नेही प्रमोद सहस्रबुद्धे यांनी या लेखावर मोकळेपणाने चर्चा व्हावी आणि त्याबद्दलची प्रतिक्रिया पाठवावी असे आवाहन केले होते. अनेकवेळेला हा विषय वैचारिक चर्चेपेक्षा भावनिक अंगाने अधिक मांडला जातो म्हणून सर्वप्रथम श्री. मोहनी ह्यांनी केलेल्या ‘वैचारिक विवेचनाचे’मन:पूर्वक स्वागत. मी दोन टप्यांमध्ये या लेखावर प्रतिक्रिया देऊ इच्छितो. पहिल्या टप्प्यात लेखातील काही मुद्द्यांवर माझे मत आणि दुसऱ्या टप्प्यात सद्यःपरिस्थितीतील व्यवहारातील अनुभव.
जातीच्या उतरंडीवरून असे लक्षात येते की उच्चवर्णीयांनी – शूद्रातिशूद्रांवर जसे अन्याय केले आहेत, तसेच या सर्वांनी मिळून स्त्रियांवर अन्याय केले आहेत, अजून करत आहेत. ब्राह्मणी संस्कृतीतसुद्धा पुरुषप्रधान संस्कृतीचा मिलाफ आहे. प्रत्येक समाजातील स्त्रीवर अन्याय झाला आहे. म्हणून ‘मुलीबाळींना त्यांनी शिकविले नाही’ यात काही वेगळेपणा नाही. हा मुद्दा सर्व समाजासाठी लागू होईल, फक्त ब्राह्मणवर्गासाठी नाही.
त्या काळात ते काय शिकत होते? आजच्या घडीला ‘ते शिक्षण’ निरर्थक असेलही. पण तत्कालीन परिस्थितीत तो मान-सन्मानाचा विषय होता. उदा. पूर्वी गावातील पोस्टमन हा आदराचा विषय असे. कारण पत्र पोचवणे आणि प्रसंगी वाचून दाखवणे हे वेगळेपण त्याच्याकडे होते. आधुनिक जगात मुदलातील ‘पोस्ट’ ही संस्थाच कालबाह्य होत आहे. राजमान्य बोलीभाषा आणि लिखाण येत असल्यामुळे सत्ताधीशांच्या जवळ राहून ‘जागा-जमिनी-स्थावर मालमत्ता’ यावर ताबा मिळवणे सोयीचे होते. दिवसभर अंगमेहनत करून जो मोबदला मिळे, त्याचे मूल्य कमी आणि काही तास मंत्रतंत्र म्हणून कोणतेतरी कर्मकांड करून ‘दान’ स्वरूपात मिळालेले मूल्य जास्त, अशी तफावत होती. कष्टाला प्रतिष्ठा नव्हती. त्यामुळे श्लोक, वेद इत्यादी (इतरांना न बोलता येणाऱ्या) गोष्टी जर एखादा समाजघटक बोलत असेल तर तो आदरणीय आणि मुख्य म्हणजे समाजमान्यतेचा महत्त्वाचा घटक ठरला होता. कारकुनी, आचारी, पाणक्ये ही उच्चवर्णीयांना उपलब्ध असलेली आणखी काही कमी श्रमाची कामे होती.

‘ब्राह्मणेतर समाज अशिक्षित राहिला याला फक्त ब्राह्मण समाज जबाबदार आहे’, हे विधान राजकीय सोयीचे सुलभीकरण दर्शविणारे आहे. कष्टकरी, व्यापारी यांनीसुद्धा शिक्षणाला प्राध्यान्यक्रम दिला नव्हता. (त्याची अनेक कारणे आहेत.) कष्टकरी समाजात शिक्षणाचा प्रसार होणे याचा संबंध समाजप्रबोधनापेक्षा ‘औद्योगिकीकरणाशी’ अधिक आहे. तुम्ही म्हटल्याप्रमाणे यंत्रसामुग्री नसल्यामुळे किमान उत्पादनासाठी कमाल मानवी श्रम खर्ची घालावे लागत असत आणि शासनकर्ते यांची प्राथमिकता ‘महसूल’ गोळा करणे ही असल्यामुळे त्यांच्या सोयीनुसार शैक्षणिक साधने उपलब्ध असत. अर्थात अनेक शासनकर्ते हे ब्राह्मणेतर समाजातील होते त्यामुळे तेही तितकेच दोषी म्हणायला हरकत नाही.

परंतु ब्राह्मणवर्गाने हे जाणीवपूर्वक केले होते का? उत्तर ‘होय’: कारण प्रत्येक मानवी समूहामध्ये आपल्याच वारसाला/नातेवाईकांना आपल्याजवळचे ज्ञान अथवा संपत्ती देणे ही ‘सर्वसाधारणपणे’ रीत/पद्धत चालत आलेली आहे. लोहार समाजातील किती जणांनी सुतारकाम करणाऱ्यांना ‘लोहारकाम’ शिकवले? हा प्रश्नही वरील मुद्द्याला समांतर आहे. कष्टकरी समाज ‘शिक्षणापासून’ वंचित राहिला त्यासाठी ब्राह्मण समाजाची तत्कालीन मानसिकता हे एक कारण आहे, एकमेव नाही.

सद्यः परिस्थितीतील व्यवहारातील अनुभव:

आधुनिक काळात जातपातविरहित अनेक रोजगारसंधी उपलब्ध झाल्या आहेत, त्यामुळे ‘इतिहासातील’ चुकांचे पाढे वाचण्यात फारसे हशील नाही हे ठाऊक असूनदेखील फक्त राजकीय सोयीसाठी हा ‘ब्राह्मण–ब्राह्मणेतर’ वाद सतत ‘जागृत’ अवस्थेत ठेवला जातो आणि वैचारिक चर्चेपेक्षा भावनिक चर्चा अधिक होत असते.

काही काळासाठी ‘ब्राह्मण–ब्राह्मणेतर’ किंवा ‘बहुजन-अभिजन’ अशी गटवारी करणे सोडून, फक्त मानवीसमूह म्हणून आपण वस्तुनिष्ठ अवलोकन केले तर असे लक्षात येते की, ‘प्रत्येक जाती-धर्मात बदमाषागणिक असतो एकसाधुचरित पुरुषोत्तमही, स्वार्थी राजकारणी असतात जगात, तसे असतात अवघं आयुष्य समर्पित करणारे नेतेही. टपलेले वैरी तसे जपणारे मित्रही! त्यामुळे विशिष्ट जात-जमात चांगली अथवा वाईट असे ठरवणे चुकीचे आहे.

मी स्वतः बहुजन समाजातील आर्थिक आणि सामाजिक निम्नस्तरीय कुटुंबात जन्मलो. कुटुंबातील आर्थिक आणि वैचरिक दारिद्र्याचा सामना केला पण त्यासाठी ज्यांच्या विचाराची साथ लाभली असे अनेकजण ब्राह्मण कुटुंबात जन्माला आले होते हा त्या व्यक्तींचा दोष म्हणावा का? कारण जगन्मान्य असलेली ‘लोकशाही, स्वतंत्र, समता, बंधुता, विवेकी विचारधारा आणि प्रत्यक्ष जीवनात रोटी-बेटीच्या व्यवहारात जाति-धर्माला अजिबात थारा न देणाऱ्या ह्या व्यक्ती फक्त त्यांचा जन्म कुठे झाला आणि आडनाव काय होते यावरून त्यांचे मूल्यमापन करणे ‘हा काळावर केलेला’ अन्याय असेल. बरं त्यातील एकजण (सध्या हयात नाहीत), की ज्यांनी जागतिक पातळीवरील अंधश्रद्धा-निर्मूलनाचे काम केले आहे. दुसरे पन्नाशीच्या आसपास आणि IIT Bombay मधील उच्चविद्याविभूषित आणि खाजगी कंपनीमध्ये संचालक, तिसरा ३० वर्षांचा तरुण एका खासगी कंपनीत उच्चपदस्थ आहे, की जो पुरोहितशाहीचा खरपूस समाचार घेतो, तसं म्हटलं तर बहुजनसमाजाला यांनी दिशाहीन केले पाहिजे पण व्यवहारात यांचे सामाजिक योगदान सकारात्मक आणि नोंद घेण्यासारखे आहे. त्यामुळे हॉटेलमधील मेनूकार्डप्रमाणे आधी उजव्या बाजूला (की, जिथे त्या पदार्थाची किंमत छापलेली असते) बघून माणसाची किंमत ठरू नये.

आगरकर-कर्वे-देशपांडे-लागू ते थेट दाभोलकर असे फक्त नावाच्या उजवीकडे असणारी ‘आडनावे’ न पाहता आधुनिक मूल्यांच्या कसोटीवर त्या विचारांचा स्वीकार अथवा धिक्कार केला पाहिजे.

तुमचा अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published.