गोमांस आणि पाच प्रकरणे

गोमांस, पोर्क, गांधी, सावरकर, जिना
—————————————————————————
गोमांस ह्या सध्याच्या वादग्रस्त प्रश्नाशी संबंधित इतिहासाची काही महत्त्वाची पाने कोणत्याही टिप्पणीविना उलगडून दाखवत आहेत आधुनिक भारताच्या इतिहासाचे एक तरुण अभ्यासक
——————————————————————–
प्रकरण 1: 10 डिसेंबर 2015 जागतिक मानवाधिकारदिनी तेलंगणातील ओस्मानिया विद्यापीठाचा परिसर युद्धभूमी बनला होता. निमित्त होते गोमांस विरुद्ध वराहमांस विवाद. गोमांसबंदी व त्यासंदर्भात देशभर होत असलेल्या हल्ल्यांच्या निषेधार्थ डेमोक्रॅटिक कल्चरल फोरम या डाव्या विचारांच्या विद्यार्थीसंघटनेने उच्च न्यायालयाच्या स्थगितीला न जुमानता विद्यापीठपरिसरात गोमांसउत्सव साजरा करण्याचे ठरविले. यास प्रतिक्रिया म्हणून ओ.यु.जॅाईंट अॅक्शन कमिटी या दुसऱ्या संघटनेने वराहमांस उत्सवाचे आयोजन करण्याचे जाहीर केले. भाजपाचे आमदार श्री. राजा सिंग यांनी त्यांच्या गौसंरक्षण समितीद्वारे ‘चलो ओस्मानिया’चा नारा दिला. बजरंग दल व भाजपाच्या काही कार्यकर्त्यांनी विद्यापीठात गौपूजा व यज्ञाचे आयोजन करत असल्याचे जाहीर केले. सकाळपासूनच विद्यापीठाला पोलिस छावणीचे स्वरूप प्राप्त झाले. सर्व प्रवेशद्वारांवर बॅरिकेड्स लावण्यात आले. तणाव वाढत गेला. राज्यपरिवहन मंडळाच्या बसेसवर काहींनी दगडफेक केली. पोलिसांनी 330 जणांना ताब्यात घेतले आणि विविध संघटनांचे नियोजित कार्यक्रम उधळून लावण्यांत आले.(सौजन्य ‘दि हिंदू’11/12/2015)
प्रकरण 2:मोहम्मद अली जिन्ना पाकिस्तान-संकल्पनेचे समर्थक बनवण्याआधीची एक घटना, तेव्हा ते कॉंग्रेसचे एक राष्ट्रवादी नेते होते आणि बॅाम्बे म्युनिसिपल कॉर्पोरेशनच्या निवडणुकीत उभे होते. मतदानाचा दिवस होता. जिन्ना टाऊन हॅाल, आताची एशियाटिक सोसायटी ऑफ मुंबई येथील मतदान केंद्रावर आपले सहकारी एम.सी. छगला यांच्यासोबत उपस्थित होते. दुपारच्या भोजनावकाशाच्या वेळी साधारणत: 1 वाजता मिसेस जिन्ना त्यांच्या आलीशान लिमोझिनमधून टाऊन हॅालला आल्या. त्यांनी सोबत जिन्नांसाठी जेवणाचा डब्बा आणला होता. डब्यात पोर्क सॅडविचेस होते. जिन्ना पोर्क खात असत. परंतु त्यावेळी पोर्क सॅडविचेस बघताच त्यांचा चेहरा खाडकन उतरला आणि ते वैतागून मिसेस जिन्नांना म्हणाले, “ओह गॅाड! तू हे काय केले आहेस? मी निवडणूक हरावे असे तुला वाटते काय? मी मुस्लिम विभक्त मतदार संघातून निवडणूक लढवत आहे, हे तुला कळत नाही काय? जर माझ्या मतदारांना कळले, की मी दुपारच्या जेवणात पोर्क सँडविचेस खात आहे, तर स्वप्नातसुद्धा ही निवडणूक मी जिंकू शकणार नाही”.(पृ.117-118, रोझेस इन डिसेंबर, ऑटोबायोग्राफी, एम.सी.छगला, भारतीय विद्याभवन, बॅाम्बे, 1973)
प्रकरण 3:हिंदुत्वाचे जनक स्वातंत्र्यवीर वि.दा.सावरकरांनी 1935-36 साली महाराष्ट्रात खळबळ उडवून देणारे गायीवरील निबंध लिहिले. “गाय एक उपयुक्त पशु! माता नव्हे! देवता तर नव्हेच नव्हे!” या निबंधात ते लिहितात, “प्रश्न एका फुटकळ प्रकरणाचा नाही, तर एका सर्वस्पर्शी राष्ट्रीय प्रवृत्तीचा आहे. पोथीनिष्ठ की प्रत्यक्षनिष्ठ, पुरातन की अद्यतन, प्रश्नशून्य विश्वासशील “धर्म”की प्रश्नशील प्रयोगक्षम विज्ञान? ह्या दोन प्रवृत्तींपैकी अद्यतन, प्रत्यक्षनिष्ठ नि प्रयोगसिद्ध विज्ञानच आजच्या परिस्थितीत नि आजच्या जागतिक प्रतिस्पर्धेस आमच्या राष्ट्राचा वेद झाला पाहिजे! आणि ह्या प्रवृत्तीला जर गोपूजा तुमची न पटली तर ती टाकावूच ठरली पाहिजे… एक वेळ राष्ट्रात थोडी गोहत्या झाली तर चालेल, पण उगवत्या राष्ट्राची बुद्धी हत्या होता कामा नये.” (पृ.24-25, क्ष किरणे, वि.दा. सावरकर, रिया पब्लिकेशन, कोल्हापूर 2012)
पुढे ते लिहितात, “…….. कोणते मांस खाद्य ते धर्मग्रथांच्या टिपणीत न पाहता वैद्यकाच्या कोष्टकात पाहावे. वैद्यकदृष्ट्या कोणास डुकराचे मांस हितावह असेल, तर त्याला तेच धर्म्य. मनुस्मृतीत वराहाचे मांस खाण्याचा ब्राह्मणांनादेखील जवळजवळ आग्रहच केलेला आहे. जे डुक्कर खात नाहीत त्यांचे म्हणणे असते की, डुक्कर घाण खाते यासाठी ते धर्मत: निषिद्ध मांस! पण गायही घाण खाते। गाय, बैल, म्हैस हे दूध नि शेतीकाम या दृष्टीने मनुष्याच्या अत्यंत उपयोगी माणसाळू असे पाळीव पशू, त्यांना शक्य त्या दयेने पाळावे, पण तरीही ज्या परिस्थितीत त्यांच्यावर दया केल्याने मनुष्याच्या जिवावर बेतते, त्या परिस्थितीत काही ती दया उक्त ठरणार नाही….” (पृ.131-तत्रैव)
प्रकरण 4 : 13ऑक्टोबर 1972 रोजी रग्बी युनियन टीम, त्यांचे मित्र, कुटुंबीय आणि सहकारी अशा 45 जणांना घेऊन जाणारे उरुग्वेयन एअर फोर्स लाईट क्र.571 दक्षिण अफ्रिकेतील बर्फाच्छादित अॅन्डीज पर्वतावर कोसळले त्यात 18 जणांचा जागीच मृत्यू झाला. 27 जण बचावले. परंतु ते 11800 फूट उंचीवर जीवघेण्या थंडीत अन्नपाण्यावाचून अडकून पडले. सात दिवसांच्या प्रयत्नानंतर शासनाने शोधमोहीम थांबवल्याचे त्यांना रेडिओवरून कळाले. उपलब्ध अन्नाचा साठा संपला होता. खचून न जाता त्यांनी यातून मार्ग काढण्याचा निर्धार केला आणि सभ्य समाजाला घृणा वाटेल असा एक निर्णय सामूहिकरीत्या घेतला. त्यांनी आपल्या आप्तमित्रांच्या मृत शरीरमांसाचे सेवन केले. त्यांतील दोघांनी 10 दिवसांचा प्रवास करून पर्वत ओलांडला आणि ते जिवंत असल्याची बातमी बाहेरील जगाला कळवली. एकूण 72 दिवसानंतर त्या सर्वांची सुटका करण्यात आली. त्यातील एक डॉ. कॅनेसा हे आज एक प्रख्यात बालरोगतज्ज्ञ आहेत. त्यावेळी ते मेडिकलच्या दुसऱ्या वर्षात शिकणारे 19 वर्षीय तरुण होते. ते त्या क्षणाची आठवण सांगतात, “”मला माझ्या आईची आठवण आली, आणि मला कोणत्याही परिस्थितीत तिला भेटायचे होते. मी माझ्या प्रिय मित्राच्या मृत शरीराचा एक तुकडा उचलला व खाल्ला “जगण्यासाठी”. (मेल ऑन लाईन न्यूज 13/10/2012)
प्रकरण 5:नवी दिल्ली दिनांक 25 जुलै 1947, गांधीजी प्रार्थनासभेत म्हणतात, “…..भारतामध्ये गोहत्याबंदी करणारा कोणताही कायदा होऊ शकत नाही. मी जाणतो की हिंदूंसाठी गोहत्या निषिद्ध आहे. मी स्वत: अनेक वर्षांपासून गाईची सेवा करण्यास प्रतिबद्ध आहे. परंतु माझा धर्म हा इतरांचाही धर्म कसा होऊ शकेल? तसे करणे म्हणजे हिंदू नसलेल्या इतर भारतीयांवर जबरदस्ती करणे होईल… या देशात फक्त हिंदू राहत नाहीत. येथे मुस्लीम, पारसी, ख्रिश्चन आणि इतर धार्मिक समूह देखील राहतात. हिंदूची अशी धारणा की आता हा फक्त हिंदूचा देश आहे, चुकीची आहे. हा देश येथे राहणाऱ्या सर्वांचा आहे. येथे गोहत्याबंदी कायदा केला तर त्याविरुद्ध पाकिस्तानात घडेल. समजा त्यांनी असे म्हटले की शरीयतच्या विरुद्ध असल्याने हिंदू मंदिरात जाऊन मूर्तिपूजा करू शकत नाहीत, तर? मी दगडातसुद्धा देव पाहतो. परंतु या भावनेच्या आधारे मी इतरांना हानी पोहचवू शकत नाही.” (समग्र गांधी वाङ्मय खंड 96)

तुमचा अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published.