पुस्तक परिचय : क्रिएटिव्ह पास्ट्स (१)

सर्जक भूतकाळ , मराठी इतिहासलेखन

—————————————————————————इतिहास हा विषय असा आहे के जो कधी बदलत नाही, असे (नेमाडेंच्या कादंबरीतील इतिहासाच्या प्राध्यापकाला) वाटण्याचे दिवस केव्हाच संपले. मराठीतले इतिहासलेखन म्हणजे तर विविध अस्मितांनी भारलेल्या इतिहासकारांचा आविष्कार. महाराष्ट्र राज्य निर्मितीपुर्वीच्या २६० वर्षांच्या इतिहासलेखनाचे जातीय-राजकीय ताणेबाणे उलगडण्याचे महत्वपूर्ण  कार्य  केलेल्या महत्त्वाकांक्षी पुस्तकाचा खास परिचय नंदा खरेंच्या शैलीत …

—————————————————————————      ‘फक्त महाराष्ट्रालाच इतिहास आहे. इतर प्रांतांना केवळ भूगोल असतो’, हे अनेक महाराष्ट्रीयांचे मत अनिल अवचट आपल्या बिहारमधल्या ‘पूर्णिया’ जिल्ह्याबद्दलच्या पुस्तकात सुरुवातीलाच नोंदतात. नंतर मात्र गौतम बुद्ध बिहारमध्येच वावरून गेला हे आठवून महाराष्ट्रीय मत किती उथळ आहे हे अवचटांना जाणवले! एकूण एखाद्या समाजाचा स्वाभिमान, स्वतःचे वैशिष्ट्य काय यावरील मत, स्वतःची ‘ओळख’ यांचा इतिहासाशी जवळचा संबंध असतो. महाराष्ट्रात तर तो फारच जवळचा आहे.

त्र्यंबक शंकर शेजवलकर लिहितात, ‘‘इतिहास माणसाला शहाणा करतो असे बेकन समजत होता. पण आज इतिहास माणसाला पागल बनवताना दिसतो.’’ पुढे ते म्हणतात, ‘‘अनेक हुशार डोकेबाज माणसे खरा इतिहास जाळून टाकण्यात, निदान दडपण्यात, किमान विकृत करण्यात, गुंतलेली, गढलेली आहेत.’’ लेख 1940 सालचा आहे त्यामुळे ‘हुशार डोकेबाजां’च्या यादीत पहिले नाव मार्क्सवाद्यांचे आहे. मग इतरांच्या राष्ट्रांना कमी लेखणाऱ्या, आपापल्या संस्कृतींना श्रेष्ठ ठरवणाऱ्या अशा अनेकांची यादी आहे. मग महाराष्ट्राकडे येत शेजवलकर म्हणतात, “… मराठ्यांचा इतिहास म्हटले तरी कोणी त्याचा अर्थ मराठे क्षत्रियांचा इतिहास असे समजतात; कोणी कुणब्यांनाही त्यात गोवतात; कोणी ब्राह्मणांचा पेशव्यांचा इतिहास म्हणजेच मराठ्यांचा इतिहास असे समजतात.” अनेक जाती-पोटजातींचा उल्लेख करून ते म्हणतात, “…आज मराठीत पांढऱ्यावर काळे करून लिहिलेल्या इतिहासांपैकी तीन-चतुर्थांश भाग एकांगी, अतिशयोक्तीपूर्ण, विपर्यस्त, खोटा आहे असे म्हणण्यास प्रत्यवाय नाही.” हे सारे एका जेमतेम दोन पानी लेखात शेजवलकर  सांगतात. लेख आहे, ‘महाराष्ट्राच्या मानगुटीचा समंध’ (नवयुग, 21 जाने. 1940). चुकीच्या इतिहासाची अनेक उदाहरणे देत ते तसे करण्याच्या प्रयत्नांची “उत्तरक्रिया झाल्याशिवाय महाराष्ट्राला बरे दिवस दिसण्याची आशा नको! तोवर इतिहासाच्या क्षीराऐवजी दुरभिमानाचे काळेकुट्ट नीरच हाती येणार!” असा सज्जड इशारा देतात.

            य. दि. फडकेही मराठी भाषक शरीराने विसाव्या शतकात राहताना मनाने मात्र मराठा कालखंडात राहतो, असे शेजवलकरांनंतर सुमारे पन्नास वर्षांनी नोंदतात (1989).

            आज त्यालाही पाव शतक होऊन गेले आहे आणि दुरभिमान, पागलपणा वगैरेंमध्ये वाढच झाली आहे.या दोन्ही ज्येष्ठ इतिहासकारांची मते वाचून बरेच प्रश्र्न तपासावेसे वाटतात.

            ‘खरा’ इतिहास म्हणजे नेमके काय? एखाद्या प्रदेशात एखाद्या काळी काय काय घडले याचा घटनाक्रम वेगवेगळ्या पुराव्यांनी ठरवता येईलही. पण जे घडले ते का घडले? त्यात भाग घेणा-यांच्या कृतींमागचे हेतू काय होते? त्या हेतूंमागे कोणत्या आशा, आकांक्षा, अपेक्षा होत्या? प्रत्यक्षात केलेल्या कृतींना पर्याय उपलब्ध होते का? मग त्यांमधून हीच कृती का निवडली? अशा प्रश्र्नांना उत्तरे देणारे पुरावे कोणते? इतिहासलेखनामागे कोणकोणत्या प्रेरणा असतात? एक प्रेरणा ‘मला कळलेले सत्य इतरांसाठी नोंदणे’ ही असणारच. मग ‘व्यक्ती तितक्या प्रकृती’सारखे ‘व्यक्ती तितके इतिहास’ असे म्हणावे का? मग वेगवेगळ्या व्यक्ती, त्यांचीच ‘ओळख’ असणारे समाजगट, हे ‘आमचाच इतिहास खरा’ असे म्हणणारच ना? सोबतच ‘त्यांचा इतिहास विपर्यस्त, खोटा’ असेही म्हणणारच ना?

            एक प्रेरणा आपल्याभोवतीच्या समाजाला विशिष्ट दिशेला वळवण्याचीही असू शकते. मग इतिहासातल्या घटनांच्या वर्णनांत एकांगीपणा, अतिशयोक्ती हेही येणारच. या समाज ‘सुधारण्या’च्या प्रेरणा इष्ट समजायच्या की अनिष्ट?

            मराठी वाचक बहुतेक अकादमीय इतिहासकारांपेक्षा ऐतिहासिक चरित्रे, कादंबऱ्या, चरित्रात्मक कादंबऱ्या वगैरेंकडे जास्त वळतात. मराठी समाजाच्या मनांतील इतिहासात काय घडले याबाबतच्या आठवणी अशा त-हेने कमीजास्त अनैतिहासिक रचनांमधून, साहित्यकृतींमधून घडतात. सिनेमे, नाटके, दूरदर्शनमालिका वगैरेंमधून तर हे जास्तच प्रभावीपणे घडते. आणि अखेर ‘मराठी माणूस’ याची व्याख्याही अशा आठवणींमधूनच घडते. इतर माणसांपेक्षा मराठी माणूस वेगळा कसा याची ओळखही अखेर ‘अनैतिहासिक’ आठवणींमधून घडते!

            या प्रक्रियेचा महाराष्ट्रापुरता अभ्यास करणारे पुस्तक आहे ‘क्रिएटिव्ह पास्ट्स’ (Creative Pasts, प्राची देशपांडे, Permanent Black, 2007). पुस्तकाच्या नावात जे ‘सर्जक भूतकाळ (अनेकवचनी!)’ आहेत ते महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या लोकांनी वेगवेगळ्या वेळी लिहिलेल्या इतिहासांमधून आणि ऐतिहासिक साहित्य, नाटके, चित्रपट वगैरेंमधून घडलेले आहेत. पुस्तकाचे उपशीर्षक आहे ‘पश्चिम भारतातील ऐतिहासिक स्मृती आणि ओळख 1700-1960’. लक्ष्य आहे महाराष्ट्र हे.

            आधी होत्या बखरी. त्यांना पाल्हाळीक, पक्षपाती, बेभरवशाच्या म्हणतच ग्रँट डफने आपली ‘मराठ्यांची बखर’ मात्र त्यांच्याच मदतीने लिहिली. दृष्टिकोन होता मराठ्यांना हरवणाऱ्या इंग्रजी वसाहतवादाचा.

            मग ग्रँट डफचे दोष दाखवत, त्याचा प्रतिवाद करत मराठी इतिहाससंशोधक दप्तरखाने धुंडाळत आपला इतिहास लिहू लागले. अनुभवसिद्ध (empirical) संशोधनाची शिस्त मराठी नसून इंग्रजी वळणाची होती. हेतू मात्र होता मराठ्यांना एक वेगळी ‘ओळख’ देण्याचा, मराठी अस्मिता जागवण्याचा. यासाठी दप्तरखान्यांपेक्षा कथा-कादंबऱ्या, नाटके, चित्रपट, पोवाडे, लावण्या, शिवजयंती उत्सवातले मेळे वगैरे जास्त उपयोगी होते.

            सुरुवातीला हे सगळे उद्योग करणारे मुख्यतः ब्राह्मण होते. तेव्हा ब्राह्मण अखेर शिवाजीलाही ‘चोरतील’ या भीतीने ब्राह्मणेतर या उद्योगांत उतरले.

            मग ब्राह्मणेतरांमध्ये तट-गट पडू लागले.

            हे सर्व सामने, ही सर्व रस्सीखेच, हा मूलभूत मानवी व्यवहार देशपांडे जिवंत करतात. सोबतच आणि आपोआपच या व्यवहारांपासून दूर ढकलले गेलेल्यांची कैफियतही त्या मांडतात. प्रत्येकच ‘तथ्या’वर झगडे उभे करण्यातले धोके, पागलपणा, दुरभिमान, सारे देशपांडे सादर करतात; आणि तेही संशोधनपर लिखाणातून!

            सोबतच देशपांडे एका नाजुक मुद्द्यालाही हात घालतात. महाराष्ट्राभिमान आणि भारताभिमान यांच्या तणावपूर्ण संबंधावर लिहिताना त्यामागील लिंगविचारी (gender) भूमिका त्या उलगडून दाखवतात. एकूणच मूलभूत बंडखोर (radical) भूमिका न घेताच ती कशी सुचवता येते याचा हा वस्तुपाठ आहे.

            इतिहासाचे आकलन ही ‘चल’, dynamic प्रक्रिया आहे; थिजलेला फोटो-अल्बम नव्हे की एकाच कॅमेऱ्याने टिपलेले आंशिक चलचित्र नव्हे. त्या आकलनातूनच व्यक्ती आणि समाज आपण कसे घडलो यावरची ‘आठवण’ घडवतात. इतर व्यक्ती आणि समाजांपेक्षा आपण वेगळे कसे व का, ते ठरवून ती आपली ‘ओळख’ म्हणून सांगतात. ही सर्व प्रक्रिया महाराष्ट्रापुरती, मराठी माणसांपुरती कशी घडली ते देशपांडे सांगतात. हा मराठी इतिहासलेखनाचा इतिहास तर आहेच; पण सोबतच मराठी अस्मितेचाही इतिहास आहे. पण अस्मितेत जो गर्वाचा, दुरभिमानाचा भाव असतो, तो मात्र पुस्तकाच्या वाचनाने नष्ट होतो!

            दोष दाखवायचा तर येवढाच, की हा इतिहास 1960 पर्यंतचे लेखनच तपासतो. यामुळे नंतरच्या इतिहासलेखनाचा, कादंब-यांचा, नाटक-सिनेमांचा यात समावेश नाही. एखादवेळी असा लेखन आणि त्याचे विश्र्लेषण यांच्यात कालावकाश ठेवणे देशपांड्यांमधल्या संशोधकाला आवश्यक वाटले असावे.

            वाचकाने मात्र मराठी माणूस म्हणूनच ही कहाणी आजपर्यंत, जेम्स लेन-गोविंदराव पानस-यांपर्यंत, पुरस्कार वापसी व दिनानाथ बात्रांपर्यंत आणावी.

            त्यासाठी आवश्यक असा पुस्तकाचा परिचय यापुढे देत आहे.         

वसाहतपूर्व काळातले इतिहासलेखन

            अत्ताअत्तापर्यंत नागालँडचे प्रशासन गाव-बुढा व दुभाष (बोलीभाषेत ‘जीबी’ व ‘डीबी’) यांच्या मदतीने चालत असे. प्रत्येक गावाच्या किंवा जमातीच्या अलिखित नियमांची आठवण-साठवण गावातला वृद्ध सांभाळत असे आणि स्थानिक बोली आणि शासकीय भाषा यांच्यात संवाद दुभाष्या साधून देत असे. आजही कुठेकुठे ही जीबी-डीबी दुक्कल वापरात असेल, पण मुख्य प्रवाह मात्र भारतीय कायदे जाणणाऱ्या स्थानिक साक्षरांच्या हाती आहे. असे बदल वेगवेगळ्या काळांत भारतभर झाले आहेत. महाराष्ट्रात तरी सतराव्या शतकापासून गाव-बुढ्यांचे काम लिखित दस्तावेज करू लागले होते.

            वेगवेगळे सामंत-जमीनदार आपले मालकीचे व वहिवाटीचे हक्क कसे उपजले याचे वृत्तांत लिहून घेऊ लागले. स्थानिकांना माहीत असलेल्या या घटना घडतेवेळी आसपास काय महत्त्वाचे घडत होते हेही या वृत्तांतांत नोंदले जाई. जरी सामंतांचे लेखनिक हे वृत्तांत लिहीत तरी अनेकदा त्यांचे जाहीर वाचन होऊन त्यांना समाजमान्यता मिळवून दिली जाई.

            पुढे सतराव्या शतकाच्या उत्तरार्धात मराठी सैन्ये आसपासचे प्रदेश जिंकून घेऊ लागली. अशा कमावलेल्या प्रदेशांमधील हक्क व वहिवाटी, कर-आकारणीची प्रमाणे यांचेही वृत्तांत लिहून घेतले जात व संदर्भासाठी शेजारच्या क्षेत्रांतील समकालीन घटनाही नोंदून ठेवल्या जात. होता होता या नव्या प्रदेशांतही सामंती राज्ये किंवा संस्थाने घडू लागली. ह्यांचे संस्थानिक एकमेकांच्या दरबारांत वकील नेमू लागले. हे वकील आपापल्या धन्यांना आपल्या कार्यक्षेत्रांतील घडामोडींचे वृत्तांत लिहून पाठवू लागले. या अखबारांमध्ये घडामोडींमागील ताणतणाव, शत्रुता-मित्रतेच्या नव्या शक्यता व संधी वगैरेही नोंदले जाई. यांचा नमुना चाकराचे मालकास पत्र असा असे; पण हा इतिहासही असे आणि त्याचे विशिष्ट हेतूने केलेले मूल्यमापनही असे.

            होता होता ‘कायदेशीर मान्यतेसाठीचे वृत्तांत’ याच्या पलिकडची, गुंतागुंतीची इतिहासलेखने घडू लागली व त्यांना ‘बखरी’ हे नाव पडले. कधीकधी राजघराण्यातली माणसे एखाद्या घटनेत, मोहिमेत वा कालखंडात नेमके काय घडले हे जाणून घेण्यासाठी बखरी लिहवून घेत. जसे, 1694 च्या सुमारास शिवाजीचा धाकटा मुलगा राजाराम याने कृष्णाजी अनंत सभासद याला शिवकालाचा वृत्तांत लिहायला सांगितले, जो वृत्तांत आज ‘सभासद बखर’ म्हणून ओळखला जातो.

            अशा बखरींमध्ये वाचनीयता आवश्यक असे. म्हणी, पौराणिक दाखले, आलंकारिकता, पुढच्या प्रसंगांचे मूळ मागच्या प्रसंगांत शोधणे वगैरेंचा उपयोग सढळ हाताने केला जाई. सोबतच बखरकार आपल्या लिहवित्या धन्याला सोयीस्कर घटनांवर जोर देत तर गैरसोयीचा भाग पुसट करत. दावा मात्र असे की स्वानुभव, तपासलेलले दस्तावेज, छाननी केलेले साक्षीपुरावे अशा सा-यांतून ‘यथातथ्य’ इतिहासच नोंदलेला आहे. जसे; एकोणिसाव्या शतकाच्या सुरुवातीला लिहिलेली ‘पेशव्यांची बखर’ असा सूर लावते की शिवाजीचा नातू शाहू याने आपला सर्वांत विश्र्वासू सेवक म्हणून पेशव्यांना जणु काही आपला उत्तराधिकारी नेमले व ते पद वंशपरंपरेने दिले जाऊ लागले. साधारण याच सुमाराला दुसऱ्या शाहूने लिहवून घेतलेली ‘चिटणीस बखर’ मात्र पेशवे मुळात शिवाजीचेच धोरण पुढे चालवत असत यावर भर देते. पेशव्यांचे बहुतेक निर्णय सातार-छत्रपतींच्या मार्गदर्शनानेच घेतले जात यावरही ‘चिटणीस बखर’ भर देते. ‘पेशव्यांची बखर’ पेशवाईत धर्मकार्ये करत ब्राह्मणांना सुखात ठेवले होते हे ठसवते. ‘चिटणीस बखर’ राजकीय व युद्धकौशल्याने धर्म राखण्यात आला, तोही सातार-गादीचे आदेशाने, असे ठसवते.

            कधीकधी तर एखादी बखर दुसऱ्या बखरीच्या खंडनासाठीच लिहवून घेतली जाई. ‘भाऊसाहेबांची बखर’ पानिपतच्या मोहिमेत शिंद्यांच्या भूमिकेची भलावण करते. तिच्यानंतरची ‘होळकरांची कैफियत’ मात्र होळकरांचा दोष कसा नव्हता यावर भर देते व काही दोष शिंद्यांवर टाकते.

            बखरी वाचणा-यांमध्ये, वाचवून घेणा-यांमध्ये राजकारणी, मुत्सद्दी, फडणीस वगैरे विविध लोक असत. लिहिणारे मात्र नेहेमीच लेखनपेशा लोक असत जे बहुशः ब्राह्मण, प्रभू वगैरे जातींचे असत. अर्थातच बहुतेक बखरी लेखनपेशा लोकांचे धोरणे ठरवण्यातले व अंमलात आणण्यातले योगदान आडवळणाने पण सातत्याने बखरींमध्ये नोंदत असत.

            एकूण बखरींचे वाचन दाखवते की महाराष्ट्राच्या राजकारणात विविध सत्ताकेंद्रे असत व ती एकमेकांवर कुरघोडी करण्याच्या प्रयत्नांत असत. पण तरीही सर्व बखरींमध्ये काही सूत्रे सापडतात जी काही समान बाबी ठसवू पाहतात.

            जसे, ‘सभासद बखर’ शिवाजीचा मुघल सत्तेशी संघर्ष नोंदतानाच शिवाजी इतर मराठी सामंतांपेक्षा कसा वेगळा होता ते ठसवते. जुनी, ‘यावनी’ पद्धत मोडून ‘नवी’ मराठी पद्धत बसवली जात होती. या नव्या पद्धतीचा जाहीरनामा म्हणजे ‘आज्ञापत्र’. त्यात वर्णन केलेली शिस्त सामंती व्यवस्थेत कितपत आली हे विवाद्य आहे. पण शिवाजी काय घडवू पाहत होता याचे चित्र आज्ञापत्रात स्पष्ट आहे.

            याचीच बदललेली आवृत्ती असावी असा सूर ‘पेशव्यांची बखर’ व नंतरच्या काही बखरी लावतात. मुख्य शत्रू अजूनही मुघल सत्ता हाच आहे; पण आता उत्तर भारतातील हिंदू सामंतही मराठी सरदारांना विरोध करत आहेत. यामुळे ‘पेशव्यांची बखर’ एक ‘महाराष्ट्र धर्म’ ही संकल्पना सुचवते, जी हिंदुस्थानी, किंवा खरे तर उत्तर हिंदुस्थानी धर्माला पर्याय पुरवते. महाराष्ट्र धर्म नेमका काय याचे उत्तर फारतर काही राजकीय व सैनिकी तंत्रे, वागणुकी यांतूनच देता येते. सर्व महाराष्ट्रीय समाजाला लावता येईल असा काही ‘धर्म’ नाही. पण पेशवे व सातारकर, नागपूरकर, शिंदे, होळकर इत्यादींमध्ये कुरबुरी व संघर्ष असतानाही काही एक समान सूत्रही होते, असे बऱ्याच बखरी सुचवतात.

            तरीही एकसंधतेची, ‘महाराष्ट्र हा माझा मायदेश (इंग्रजीतल्या patria या संकल्पनेसारखा) आहे’ ही भावना घडलेली दिसते. सी.ए.बेली (C.A.Bayly) हा इतिहासकार मायदेश ही भावना रुजवायला तीन घटक आवश्यक असतात असे मानतो; आणि तीन्ही घटक महाराष्ट्रात सतराव्या शतकापासून भेटतात.

            एक म्हणजे सर्व समाजघटकांत बऱ्याच प्रमाणात भाषा व संस्कृती एकच होती. याचे श्रेय मुख्यतः संतकवींच्या (वारकरी) भक्तिपरंपरेकडे जाते. इथेही थोडेफार अंतर्गत ताण आहेत, अगदी आजही ते जाणवतात. जसे, ‘चिटणीस बखर’ रामदासाने शिवाजीला लिहिलेले काव्यपत्र उद्धृत करते. चिटणीसांना यातून शिवाजीच्या प्रयत्नांना भक्तिपरंपरेचे समर्थन होते असे सुचवायचे असावे. पुढे मात्र (इतिहासाचार्य) राजवाड्यांनी यातून शिवाजीचा गुरू रामदास होता असा निष्कर्ष काढला, ज्यातून बराच वाद उपजला. संतकवींइतकेच श्रेय पोवाडे व लावण्या लिहिणा-य गाणाऱ्या तंतकवींना द्यायला हवे. सर्व समाजाला एकीची भावना पुरवण्यात शौर्याच्या गाथा (पोवाडे) आणि बहुतांशी शृंगारिक समाजवर्णने (लावण्या) यांचा मोठाच वाटा आहे. इथेही (पुन्हा!) अंतर्गत ताण भेटतात, कारण रामजोशी हा ब्राह्मणकवी राज्याचे वर्णन करताना ‘ब्राह्मणी राज्य जोरदार’ असे सांगतो. [ संतकवी आणि तंतकवी यांमधली पंडिती पंतपरंपरा मात्र जास्त ब्राह्मणी होती, आणि भाषिक-सांस्कृतिक एकीच्या भावनेत ती महत्त्वाची नाही.  – खरे ]

            मायभूमीच्या संकल्पनेला राजसत्तेचा आधारही लागतो. ‘नवी’ पद्धत, ‘महाराष्ट्र धर्म’ या संकल्पना बखरींमध्ये नोंदल्या जात होत्या तशाच त्या दैनंदिन व्यवहारांतही ठसवल्या जात असत. राजपूत धर्म, मोगलाई मसलत यांसारखे सार्वत्रिक शब्दप्रयोग दाखवतात, की ‘आपण’ आणि ‘ते’ अशा तुलना सततच्या होत्या.

            आणि मायभूमीबद्दल आस्था वाटायला लावणारा तिसरा मुद्दा म्हणजे ‘आपण विरुद्ध ते’ ही भावना समाजाच्या सर्व थरांत रुजणे. पोवाडे-लावण्या, आख्याने-कीर्तने, यांतून वेळोवेळचे शत्रू सामान्य लोकांना माहीत होत असत. विजापुरकर, दिल्लीकर, निजाम, जाट, रोहिले-अफगाण, टिपू, सा-यांची सामान्य लोकांनाही ओळख असे. आक्रसत्या राज्याच्या काळात तर तो स्वानुभव असे. [ विसाव्या शतकाच्या शेवटच्या चरणात मी परतूरजवळ काम करत होतो. एकदा कामावर उल्लेख झाला, की पानिपताची मोहीम परतूरपासून सुरू झाली. उल्लेखाला आधार म्हणून शेजवलकरांचे ‘पानिपत-1761’ मी दाखवले. पुढील काही महिन्यांत लोहार-सुतारांपासूनच्या मराठी कामगारांनी पुस्तकाच्या वाचून पत्रावळी केल्या, कारण पानिपतचा पराजय सर्वांना माहीत होता. – खरे ].

वाघिणीचे दूध

            युरोपातली इतिहासलेखनाची पद्धत वेगळी होती. काय घडले ते नोंदण्यावर न थांबता ती पद्धत घटनांचे नैसर्गिक आणि सांस्कृतिक कोंदणही तपासत असे. आणिकही पुढे जाऊन युरोपीय पद्धत एखाद्या समाजाची ‘संस्कृती’ म्हणून अवस्था काय होती तेही ठरवत असे. या दार्शनिक इतिहासलेखना (philosophical historiography) चा महाराष्ट्रातला पहिला मोठा पुरस्कर्ता होता पुण्याचा पोलिटिकल एजंट (आणि पुढे मुंबई इलाख्याचा आयुक्त) माऊंटस्टुअर्ट एल्फिन्स्टन. त्याने आपला सहकारी जेम्स कनिंगहॅम ग्रँट डफ याला या नमुन्याचा महाराष्ट्राचा इतिहास लिहायचे सुचवले.

            पेशवाई बुडल्यानंतर (1818) इंग्रजांनी प्रतापसिंह या शिवाजीच्या वंशजाला सातार-गादीवर बसवले. सातारचा पोलिटिकल एजंट म्हणून ग्रँट डफला नेमले गेले. पाच वर्षे ग्रँट डफ मराठी बखरींचा अभ्यास करत होता. प्रतापसिंहाने त्याला तीन दरबारीही मदतीस म्हणून दिले होते. सोबतच या मदतनीसांना मूळ कागदपत्रे जपूनच द्यावी, बखरी एकेक करूनच द्याव्या अशा सूचनाही दिल्या होत्या. अखेर ग्रँट डफच्या इतिहासाची दृष्टी जरी दार्शनिक असली तरी साधने म्हणून बखरीच प्रमुख होत्या!

            ग्रँट डफने शिवाजी, थोरला माधवराव यांचे बरेच कौतुक केले; परंतु शिवाजीच्या प्रजेत देशप्रेम, मायभूमीचे प्रेम वगैरे होते हे नाकारले. त्यानेही महाराष्ट्र धर्मासारखी ‘मराठा वृत्ती’ (Maratha character) नावाची संकल्पना रचली व सर्व व्यक्तींचे मूल्यमापन ही वृत्ती त्या व्यक्तींत कितपत होती-नव्हती यावरून केले. आधीही अशा वृत्तीची चर्चा होत असे. ‘भाऊसाहेबांची बखर’मध्ये मराठ्यांच्या, राजपुतांच्या लढवय्या वृत्तीची चर्चा आहेच. पण अशी चर्चा ठरावीक संदर्भापुरती सीमित असे. डफच्या आधुनिक मांडणीत ती संपूर्ण मराठी समाजाला लागू झाली. राष्ट्रीय अथवा जातीय सरसकटीकरणासाठी हे पायाभूत होते. हे बखरींमधील दृष्टिकोनाविरुद्ध होते. पण या सरासरीकरणामुळे पुढील इतिहास जास्तजास्त जातीयवादी होत गेले. ग्रँट डफ स्वतःला ‘मराठा माणूस’ म्हणवून घेत असे. पेशव्यांची वृत्ती मात्र ‘ब्राह्मणी’, असंस्कृत व सैन्याला लुटारू बनवणारी होती असे ग्रँट डफचे मत होते. त्याचा महाग्रंथ ‘द हिस्टरी ऑफ द मराठाज’ 1826 मध्ये प्रकाशित झाला, आणि 1912 पर्यंत त्याच्या आवृत्त्या निघत राहिल्या. त्याचे एक संक्षिप्त भाषांतर ‘ग्रँट डफकृत मराठ्यांची बखर’ या नावाने 1830 मध्ये प्रकाशित झाले, व कैक वर्षे ते विद्यापीठांत क्रमिक पुस्तक म्हणून वापरात होते. आश्र्चर्य म्हणजे, एकोणिसावे शतक संपेपर्यंत हा मराठी समाजाचा एकुलता एक इंग्रजी इतिहास राहिला. अखेर ग्रँट डफच्या पुस्तकाने मराठा-ब्राह्मण वाद जास्तच तीव्र केला.

            इंग्रजांनी औपचारिक शिक्षणव्यवस्थाही सुरू केली. तत्त्वतः ती सर्व वर्ण-जातींच्या लोकांना खुली होती, पण एक वेगळाच ‘वर्णभेद’ त्या पद्धतीचा भाग होता. सातवीपर्यंतचे (व्हर्नाक्युलर फायनल, व्ह.फा.) सर्व शिक्षण मराठीतून असे, तर नंतरचे सर्व इंग्रजीतून. इंग्रजीचे ज्ञान ही वैयक्तिक उत्कर्षाची गुरुकिल्ली ठरली. हे (अर्थातच!) आधीच साक्षर असलेल्या जातींनी ओळखले; व या ब्राह्मण, प्रभू आदी जातींनी सत्ताशिडीच्या मधल्या व वरच्या पायऱ्या भरल्या जाऊ लागल्या. व्ह.फा. फारतर खालच्या पायऱ्या गाठू शकत.

            पेन्शनींवर जगणारे संस्थानिक अजूनही बखरी लिहवून घेत, पण त्यांचा हेतू केवळ शौर्यगाथा नोंदून भविष्यातील पेन्शने पक्की करण्याचा उरला. इतर सर्व इतिहासलेखन मुख्यतः इंग्रजी पुस्तकांच्या भाषांतरांमधूनच होत असे. ही भाषांतरेही बहुतेककरून संक्षिप्त, क्रमिक पुस्तकांच्या दर्जाचीच असत. इंग्रजी अंमलाआधीचे सर्व इतिहासलेखन मात्र ‘मराठा हस्तलिखिते’ या वर्गीकरणात लोटले जाऊन दप्तरखान्यांत बंदिस्त केले गेले. एकूणच स्थानिक बौद्धिक परंपरा खुंटली व तिची जागा इंग्रजी दृष्टिकोनाने घेतली.

            मराठी भाषाव्यवहारातही मोठे बदल होत होते. जरी मोडी लिपीतली काही मराठी पुस्तके छापली गेली, तरी छपाईसाठी बाळबोध (नागरी) लिपी जास्त सोईची ठरली. मूळ मराठी बखरींचे व कागदपत्रांचे लिप्यंतर आवश्यक होऊ लागले, आणि मूळ कागदपत्रे तपासून घेणे हे विशेषज्ञांचेच काम उरले. मराठी भाषा संस्कृत, अरबी व फारशी या भाषांमधून, आणि वर स्थानिक प्रभावांमधून घडली असे मानले जात होते. फारशीलाही संस्कृतसारखाच ‘अभिजात भाषे’चा दर्जा दिला गेला व ती विद्यापीठीय अभ्यासक्रमांतही पोचली. प्रत्यक्ष व्यवहारांत मात्र दोन डगरींवर हात ठेवणे अवघड झाल्याने मराठीचे अभ्यासक जास्तजास्त संस्कृतकडे वळू लागले.

            मराठीसह सर्व भाषांना विद्यापीठांत जागा मिळत असतानाच मराठी नियकालिकांना मात्र चालढकलीनंतरच परवानगी मिळत असे.

            बौद्धिक परंपरा जरी खुंटली तरी अभ्यासाची, विश्र्लेषणाची वृत्ती होतीच. या वृत्तीच्या लोकांना एक नवेही काम मिळाले; समाज-प्रबोधनाचे. सुमारे पन्नास वर्षे ब्रिटिश राजवट भोगल्यानंतर ‘विविध ज्ञानविस्तार’ (1867) आणि ‘काव्येतिहास संग्रह’ (1878), ही मराठी नियतकालिके सुरू झाली. यांच्या मजकुरात इंग्रजीतून भाषांतरित लेखांसोबतच जुन्या मराठी बखरी, पोवाडे, लावण्या, कविता वगैरेंना स्थान मिळू लागले.

            सोबतच नव्या नमुन्याच्या इतिहासाच्या अभ्यासालाही सुरुवात झाली. एक महत्त्वाचे अभ्यासक होते रा.गो.भांडारकर. जुन्या संस्कृत हस्तलिखितांचा अभ्यास करण्याचे मापदंड त्यांनी घालून दिले. प्राच्यविद्या व भारतविद्या (Orientology व Indology) यांची ही भारतीय सुरुवातच होती. भांडारकर चमत्कृतिपूर्ण, अतिशयोक्त लिखाणाचे ऐतिहासिक महत्त्व फार मानत नसत. तसल्या लेखनाच्या काळातील लोकमानसाचे प्रतिबिंब, एवढेच महत्त्व त्यांना मान्य होते. इतिहासाची साधने म्हणूनही पुराणे, महाकाव्ये इत्यादींना ते महत्त्व देत नसत. ‘इतिहास’ आणि ‘साहित्य’, ‘राजकारण’ आणि ‘संस्कृती’ यांच्यातल्या सीमारेषा भांडारकरांनी फारच ठळक केल्या. परंतु प्राचीन शिलालेख, ताम्रपट, नाणी वगैरेंना त्यांनी प्रथमच इतिहासाच्या अभ्यासात स्थान दिले. ग्रीक आणि संस्कृत भाषांतील साम्य ठसवत अत्यंत अनाग्रही सुरात भांडारकरांनी भारतीय विद्वानांचे युरोपीय विद्वानांशी समकक्ष असलेले स्थान ठसवले. भारतीय अभ्यासक परक्या अभ्यासकांपेक्षा भारतीय इतिहासाचा जास्त चांगला अभ्यास करू शकतील, हेही मत त्यांनी मांडले.

            विष्णुशास्त्री चिपळुणकरांच्या ‘निबंधमाले’तील मांडणीत मात्र काहीही अनाग्रही नव्हते. त्यांना मराठ्यांचा इतिहास मराठ्यांनीच लिहून हवा होता आणि त्याचा हेतू लोकांमध्ये स्वाभिमान जागवणे हाच हवा होता. वसाहतवादी इतिहासलेखनाप्रमाणेच त्यांना राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक इतिहास हवा होता; पण स्वाभिमान-देशाभिमान मात्र मराठ्यांच्या राजकीय व सैनिकी व्यवहारांतूनच जागवायचा होता. शिवाजीच्या कर्तृत्वाला केंद्रस्थान देण्याचा चिपळुणकरांचा आग्रह ही मराठी राष्ट्रवादाची अगदी सुरुवातीची सूचना होती. चिपळुणकरांना देशाभिमान जागवायचा असल्याने त्यांना इतिहास आणि साहित्य यांतले विभाजनही मान्य नव्हते. कोरडे वस्तुनिष्ठ घटनाक्रमाचे वर्णन त्यांना नको होते. इतिहासाने वाचकांच्या मनांत इतिहास ‘जागवला’ पाहिजे, असे त्यांचे मत होते. इतिहास हे त्यांच्या दृष्टीने काव्य आणि तत्त्वज्ञान यांच्यातून घडलेले रसायन होते!

            चिपळुणकरांपासून प्रेरणा घेतलेले वि.का.राजवाडे मात्र असे मानत नसत. त्यांना काटेकोर दार्शनिक इतिहासच लिहिला जाऊन हवा होता आणि त्यासाठी पुरेशी साधने उपलब्ध करून घेणे हे त्यांना पहिले कर्तव्य वाटत असे. 1898 ते 1922 या दीर्घ काळात त्यांनी अनेक इंग्रजपूर्व कागदपत्रे तपासून ‘मराठ्यांच्या इतिहासाच्या साधनां’चे बावीस खंड रचले. सोबतच त्यांचे इतर लेखनही तेरा खंड भरते.

            त्यांना केवळ कालानुक्रम ठसवणारा इतिहास नको होता, तर ‘समाज’ हा मूळ घटक मानून पुढे जायचे होते. ‘राष्ट्र’ व ‘देश’ हे मूळ घटक त्यांना सुरुवातीला मोहवून गेले, परंतु नंतर मात्र ते ‘कौलिक’ ऊर्फ कुलाधारित इतिहासाकडे वळले, ज्याचा अंतिम हेतू मानवेतिहास हा होता.

            समाज, त्यांनी रचलेल्या संस्था यांना राजवाडे केंद्रस्थानी मानत हे खरे; पण अखेर समाजाचे यशापयश, त्यांची प्रगती-अधोगती, याचा निकष मात्र राष्ट्रपातळीवरच ठरत असे. एकूणच इतिहासाला केवळ राजकीय न मानणे हे राजवाड्यांचे नावीन्य आहे, पण राष्ट्र (Nation), राज्य (State), कुल/समाज (social group), लोक (people) या संकल्पनांच्या सीमारेषा राजवाड्यांनी कधीच फार नेमकेपणाने पाळल्या नाहीत.

            भांडारकर जातिव्यवस्था कशी उपजली याचा अभ्यास करताना दिसतात, परंतु ते व महाराष्ट्रातले इतर सुधारक त्या व्यवस्थेवर थेट टीका मात्र करत नाहीत. इथे ही सुधारक मंडळी बहुतकरून ब्राह्मण होती हे लक्षणीय आहे.

            इतिहासाचा वेगळाच वापर जोतीबा फुल्यांनी केला. ब्राह्मण हे भारताला परके, आर्यवंशीय होते असे त्यांनी मानले; राजवाड्यांसारखेच. यामुळे त्यांनी ब्राह्मण भारताचे प्रतिनिधित्व करतात हे नाकारले. फुले भाषाप्रभू होते, आणि प्रतीक म्हणून व्यक्ती आणि विचारांचे महत्त्व जाणत होते. त्यांचा शिवाजीचा पोवाडा संस्कृत शब्द टाळून ब्राह्मणांपासूनची फारकत अधोरेखित करतो आणि शिवाजीला ‘गोब्राह्मण प्रतिपालक’ किंवा ‘क्षत्रिय कुलावतंस’ न मानता त्याचे शेतक-यांचा राजा हे रूप ठसवायला ते त्याला ‘कुळवाडी भूषण’ म्हणतात. पण जोतीबांचा पोवाडा अनैतिहासिक ठरवला गेला.

            राजवाड्यांची धर्माचे महत्त्व नाकारणारी सेक्युलर वृत्ती विसरून केवळ मूळ साधने शोधण्याची चिकाटी वाखाणली गेली. इतिहासलेखन, इतिहाससंशोधन हे जास्त जास्त कागदपत्रे शोधणे व टीकाटिप्पणीसह त्यांना प्रकाशित करणे यांतच अडकून बसले.

            आता इतिहासलेखनात दोन तट पडले; एक राजवाड्यांच्या अनुयायांचा, जे मुख्य दप्तरापासून सरकारने दूर ठेवले होते; आणि दुसरा सरकारमान्य, दप्तरापर्यंत पोचू शकणाऱ्या जदुनाथ सरकार व गो. सी. सरदेसायांचा. या दुसऱ्या पक्षाला पूना रेसिडेन्सीचे कागदपत्र दिले गेले, तर भारतीय इतिहाससंशोधन मंडळातले (भाइसंमं) राजवाडेपंथी लोक बाहेरच्या कागदपत्रांपुरते मर्यादित झाले. दोन्हीकडे प्रामुख्याने ब्राह्मणच होते. फुल्यांसारखे मूलभूत वेगळा विचार करणारे दोन्ही पक्षांसाठी गावकुसाबाहेरचेच राहिले.

(क्रमशः)

तुमचा अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published.