ख्रिश्चन धर्म, डावा विचार, समाजपरिवर्तन, भांडवलशाही
—————————————————————————
सध्याचे दिवस धर्माला अफूची गोळी मानून त्याच्यापासून दूर राहण्याचे नाहीत. ख्रिश्चन धर्माची मूलतत्त्वे डाव्या विचारांच्या खूप जवळची आहेत. त्याचे नाते भांडवलशाहीशी जोडणे ही धनदांडग्यांची चलाखी आहे. धर्मातील पुरोगामी प्रवाहाशी नाते जोडले तर डाव्या चळवळींना अमेरिकन राजकारणातील कोंडी फोडता येईल असे प्रतिपादन करणारा लेख.
—————————————————————————
गेल्या काही दशकांत अमेरिकेत झडलेल्या सांस्कृतिक वादविवादांमध्ये तसेच दैनंदिन जीवनाच्या विविध अंगांवर धर्माचा पगडा स्पष्टपणे दिसून येतो. त्याच्या अनुषंगाने अनेक प्रश्न पुढे आले आहेत. उदा.; सरकारी शाळांमध्ये धार्मिक प्रार्थना सक्तीची केली जाईल का? शाळांमध्ये उत्क्रांतीच्या सिद्धान्ताऐवजी बायबलप्रणीत निर्मिती (क्रिएशन)चा धडा शिकविला जाईल? शाळांमधून अमेरिकन ध्वजाला विधिपूर्वक नमन सक्तीचे केले जाईल? दूरचित्रवाणीवर लैंगिक समस्या, गर्भपात, समलैंगिकता, तसेच चाकोरीबाहेरील परिवार दाखविले जातील? बहुसंख्य अमेरिकन लोक, भविष्याचे कोणते स्वप्न पाहतील- धर्मनिरपेक्ष, पुरोगामी चौकटीतले की गतकालीन ख्रिश्चन धर्माच्या सुवर्णकाळाचे? अमेरिकेतील अद्यापही न संपलेल्या ह्या सांस्कृतिक संघर्षाचे चित्र जसजसे स्पष्ट होत जाते, तसे आपल्या लक्षात येऊ लागते की धर्माची अर्थउकल हादेखील ह्या संघर्षात महत्त्वाचा मुद्दा होता.
इतिहासकार केविन क्रूस ह्यांनी देवसत्तेखालील राष्ट्र – भांडवलशाही प्रेरित ख्रिश्चन अमेरिका (One Nation Under God – How Corporate America Invented Christian America) ह्या पुस्तकात असा विचार मांडला आहे की भांडवलशाही ही ख्रिश्चन धर्माच्या मूलतत्त्वांना पूरक आहे हा प्रचार अमेरिकन उजव्या गटांच्या धोरणाचा एक भाग होता. हा विचार पसरवण्यामागे ह्या गटांचे स्वार्थ होते आणि त्याचा परिपाक उजव्या आधुनिक ख्रिश्चन राजकारणात झाला. परंतु, ख्रिश्चन भांडवलशाही ही ख्रिश्चन धर्माच्या राजकारणाची अपरिहार्य परिणती आहे असे मानणे हा ख्रिस्ती धर्म व डावी विचारसरणी दोघांचाही अपमान करण्यासारखे आहे. मुळात ख्रिश्चन धर्माची मूलतत्त्वे डाव्या विचारसरणीच्या मूलतत्त्वांच्या संपूर्ण विरोधात आहे असे समजणे ऐतिहासिकदृष्ट्या चुकीचे ठरेल. १९३० च्या दशकात आलेल्या आर्थिक महामंदीनंतर भांडवलशाहीला ख्रिश्चन धर्माच्या विचारसरणीवर प्रभुत्व मिळविण्यात यश मिळाले. परंतु अमेरिकेतील ख्रिश्चनधर्माच्या अनुयायांनी प्रशासन किंवा समाज ह्यांवरील भांडवलशाहीचा पगडा कधीही मान्य केला नव्हता. इतिहासकार हीद कार्टर (Heath Carter)ह्यांच्या Union Made: Working People and the Rise of Social Christianity in Chicago ह्या अभ्यासातून असे लक्षात येते की, न्याय व श्रमप्रतिष्ठा ह्या मुद्द्यांवर कामगारांना संघटित करताना डाव्या कार्यकर्त्यांना ख्रिश्चन धर्मातील तत्त्वांचा बराच उपयोग करता आला. अमेरिकेतील कामगार चळवळीला ख्रिश्चन धर्मातील सर्व पंथांची सहानुभूती लाभली हा इतिहास आहे.
कामगारसंघटनांच्या वर्तुळाबाहेरील अन्य डाव्या सामाजिक चळवळींवर-देखील ख्रिश्चन धर्मशास्त्राचा प्रभाव होता. त्यात ब्लॅक पॉवर (Black Power) या कृष्णवर्णीयांच्या चळवळीचा तसेच मुक्तीचे धर्मशास्त्र (Liberation Theology) ह्या दक्षिण अमेरिकेतील चर्चप्रणीत चळवळीचा समावेश होतो. अमेरिकन असहकार चळवळीचे प्रणेते मार्टिन ल्यूथर किंग यांनी मुक्तीच्या धर्मशास्त्राचे हे तत्त्वज्ञान लोकांना वांशिक न्याय, सामाजिक तसेच आर्थिक समानता ह्यांच्या बाजूने लढ्यात उतरविण्यासाठी प्रभावीपणे वापरले. आज पोप फ्रान्सिस यांच्या वक्तृत्वात आणि लिखाणात प्रामुख्याने हाच विचार दिसून येतो. पोप फ्रान्सिस ह्यांनी त्याची पर्यावरणरक्षणाशी सांगड घालण्याचाही प्रयत्न केला आहे, ज्यामुळे समानतेच्या चळवळीला बळ मिळेल असा त्यांचा विश्वास आहे.
या घटनांवरून एक गोष्ट लक्षात येते की ख्रिश्चन धर्म हा इतर कोणत्याही विचारसरणीपेक्षा मुक्त बाजारपेठ व अनिर्बंध भांडवलशाही यांना अधिक अनुकूल आहे असे समजणे चुकीचे ठरेल. ख्रिश्चन धर्माला गरिबांच्या समस्यांविषयी नेहमीच सहानुभूती वाटत आली आहे. ख्रिश्चन धर्म अमेरिकेतील पुराणमतवादी विचारांशी जोडले जाणे हा ऐतिहासिक अपघात नसून त्यामागे धनदांडग्यांनी आपल्या हितसंबंधांच्या रक्षणासाठी जाणीवपूर्वक केलेले प्रयत्न होते हेही आपल्या लक्षात येते. अर्थात ख्रिश्चन धर्म पूर्णपणे धर्मनिरपेक्ष डाव्या विचारांकडे झुकला आहे असे मानणेही चुकीचे ठरेल. कुटुंबसंस्था, लैंगिक प्रश्न, कुटुंबनियोजन ह्यांसारख्या सामाजिक प्रश्नांच्या बाबतीत डावी चळवळ आणि ख्रिश्चन धर्म ह्यांच्या मांडणीत नेहमीच तणाव राहणार आहे. पुराणमतवादी डाव्या विचारांचे अनुयायी आणि धर्मनिरपेक्ष डाव्या विचारांचे अनुयायी ह्यांत अशा प्रश्नांवर मतभेद आहेत. तसे असले तरीही ख्रिश्चन धर्माचे समर्थन डाव्या चळवळीला कायम राहणे हे दोन कारणांसाठी महत्त्वाचे आहे. त्यातील पहिले कारण ख्रिश्चन धर्माच्या अनुयायांचे संख्याबळ हे आहे. जगभरात जवळपास २०० कोटी लोक ख्रिश्चन धर्माचे पालन करतात. डाव्या चळवळीला मोठ्या संख्याबळाचे समर्थन मिळवायचे असेल तर त्यांना ह्या धर्माची सहानुभूती मिळवणे अपरिहार्य आहे. दुसरा भाग असा की सध्याच्या अनिर्बंध बाजारपेठेच्या युगात मालमत्ता, गरिबी व सरकारी धोरण ह्या मुद्द्यांवर नव-उदारमतवादी मतांच्या वरचष्म्याला आह्वान देण्याचे महत्त्वपूर्ण कार्य ख्रिश्चन धर्म करू शकतो.
ह्याचे उदाहरण म्हणजे पोप फ्रान्सिस यांनी वाढत्या पर्यावरणीय संकटाला उद्देशून काढलेले लोडेतो सी (Laudeto Si) हे पत्रक. ह्या पत्रकातून पोप फ्रान्सिस ह्यांनी असा विचार मांडला आहे की ‘सार्वजनिक वापरासाठी, समाजातील सर्वांच्या भल्यासाठी, वैयत्तिक मालमत्तेचाही त्याग करणे हे सकल नैतिक व सामाजिक रचनेचे मूल तत्त्व आहे.’ पुढे त्यांनी असे नमूद केले आहे की ‘ख्रिश्चन धर्माच्या शिकवणीनुसार व्यक्तीचा वैयत्तिक मालमत्तेवरील अधिकारहा केव्हाही अपरिवर्तनीय व निखालस नव्हता, उलट सर्व प्रकारच्या खाजगी मालमत्तेला सामाजिक उपयुक्ततेच्या परिघातच अर्थ मिळतो.’ पोपचे हे विधान ख्रिश्चन धर्मशास्त्राच्या ऐतिहासिक परंपरेला साजेसे आहे. अगदी सुरुवातीच्या काळापासून ख्रिश्चन धर्मातील विचारवंतांनी आपल्या लिखाणांतून असे स्पष्ट केले होते की जमिनीचा मालकीहक्क हा संपूर्ण समाजाच्या विकासाला पूरक असला पाहिजे, केवळ वैयक्तिक स्वार्थासाठी नाही. पोप फ्रान्सिस द्वितीय ह्यांच्यानुसार वैयक्तिक मालमत्ता हे समाजाचे ऋण असून समाजाच्या जमिनीला जो वैयत्तिक स्वार्थासाठी वापरतो तो अशा वापरासाठी समाजाचे देणे लागतो.
ह्या तत्त्वांचा ख्रिश्चन राजकारणावर व्यापक व सखोल परिणाम होऊ शकेल. कारण उदारमतवादी राजकारणाचे अस्तित्व हे वैयक्तिक मालमत्तेच्या अभंगत्वावर व व्यक्तीने स्वतःला मत्ता समजण्यावर अवलंबून आहे. अमेरिकेच्याउदारमतवादी राजकारणात वैयक्तिक मालमत्तेचा अनादर करणे ही एक अत्यंत अवघड गोष्ट आहे. साहजिकच अमेरिकन राजकारणात सामाजिक गरज आणि वैयक्तिक गरज ह्यांची सांगड घालणे हा एक बिकट प्रश्न बनला आहे. व्यक्तिगत संपत्तीवरील टीका कितीही आवश्यक असली तरी अशा वातावरणात ती शक्यतो टाळली जाते.
परंतु उदारमतवादी राजकारणाच्या उदयापूर्वीच्या काळापासून ख्रिश्चनधर्मात अश्या टीकेची परंपरा आढळून येते. ह्याच परंपरेनुसार पोप फ्रान्सिस हे उदारमतवादी वैयत्तिक मालमत्तेच्या धोरणावर टीका करू शकतात.भांडवलशाहीप्रेमी पुराणमतवादी लोकांना मात्र हे पचवणे अवघड जाईल. त्यातल्या काहींना तर सामाजिक योजनांसाठी लावलेला करही ही वैयक्तिक मालमत्तेची चोरी आहे, म्हणून तो अनैतिक आहे असे वाटते.
ख्रिश्चन धर्म हा आजही अमेरिकेत व अमेरिकेच्या बाहेर करोडो लोकांच्या जीवनाचा अविभाज्य भाग आहे. त्यामुळे ख्रिश्चन धर्माने व्यक्तिगत मालकी-हक्कावर केलेल्या समीक्षेला त्यांच्या दृष्टीने खूप महत्त्व आहे, कारण तो त्यांच्या जीवनमूल्यांचा व त्यांना अभिप्रेत असलेल्या सत्याचा भाग आहे. यावरून असे लक्षात येते की ख्रिश्चन धर्माची तत्त्वे ही डाव्या राजकीय कृतीसाठी कार्यक्रम पुरवू शकतात. त्याचप्रमाणे कोणत्याही शोषण-विरोधी लढ्याला आवश्यक असणारी असणारी ऊर्जाही त्यातून मिळू शकते. ख्रिश्चन धर्माचा हा पुरोगामी वारसा हा आजच्या डाव्या चळवळीने लढा देऊन मिळविलाच पाहिजे.
(’Dissent’ नियतकालिकाच्या Arguments on the Left विशेषांकातून साभार अनुवादित)
मूळ लेखक : जॉन बोह्नर