गांधी, लंडन, लोकशाही, वसाहतवाद
गांधीजी हे एक सातत्याने उत्क्रांत होत गेलेले व्यक्तित्व होते. त्यामुळे एखाद्या विशिष्ट संदर्भबिन्दूवरून त्यांची भूमिका ठरविण्याने नेहमीच गफलत होते. इंग्रजी राज्य, वसाहतवाद, पाश्चात्त्य सभ्यता ह्या सर्वांविषयीची त्यांची भूमिका कशी बदलत गेली व बदलाची ही प्रक्रिया त्यांच्या एकूण जीवनदर्शनातील स्थित्यंतराशी कशी समांतर होती, ह्याचा एका युवा अभ्यासकाने घेतलेला हा अनोखा शोध.
महात्मा गांधी दक्षिण आफ्रिकेतून भारतात आले त्याला ह्या वर्षी शंभर वर्षे पूर्ण झाली. यानिमित्ताने देशात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. त्यायोगाने गांधींच्या कारकीर्दीचे पुनर्विलोकन करण्याचा प्रयत्न चालू आहे. गांधींचे विचार हे देशविदेशांतील नागरिकांसाठी नेहमीच मार्गदर्शक व प्रेरणादायी राहिले आहेत. त्यामुळे ब्रिटनमध्येसुद्धा गांधींचा सन्मान करण्यात आला. ब्रिटनचे पंतप्रधान डेव्हिड कॅमरून आणि भारताचे अर्थमंत्री अरुण जेटली यांनी मिळून दि. 14 मार्च 2015 रोजी ब्रिटिश पार्लमेंट समोर गांधींच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण केले.
भारताच्या स्वातंत्र्याच्या विरोधातील कन्झर्व्हेटीव्ह पक्षाचे नेते डेव्हिड कॅमरून याप्रसंगी केलेल्या भाषणात म्हणाले, “हा पुतळा म्हणजे जागतिक राजकारणाच्या इतिहासातील सर्वोच्च अशा व्यक्तीला देण्यात आलेला सर्वोत्तम सन्मान आहे. या सुप्रसिद्ध चौकात हा पुतळा उभारून आम्ही महात्मा गांधींना आमच्या देशात एक शाश्वत निवासस्थान देत आहोत. दक्षिण अफ्रिकेतील वर्णद्वेषाविरुद्धच्या लढ्याचा पाया गांधींच्या लंडनमधील कायद्याच्या अभ्यासादरम्यान घातला गेला. अनेक वर्षांनंतर आणि भारतीय स्वातंत्र्य-चळवळीतही या देशातील नागरिकांप्रति गांधींचा आदर कायम राहिला. ते म्हणाले होते की त्यांना भारताबाहेर रहावे लागले, तर ते लंडनमध्ये राहतील. शेवटी कॅमरून म्हणाले, “आम्हाला या गोष्टीचा अभिमान वाटतो आणि आम्हाला गांधींचा अभिमान वाटतो” कॅमरून यांचे हे शेवटचे विधान खूप महत्त्वाचे आहे.
खरोखर गांधींच्या आयुष्यात लंडनला महत्त्वाचे स्थान होते. त्यांनी लंडनला पाच वेळा भेट दिली. आपल्या 78 वर्षांच्या आयुष्यातील 4 वर्षे गांधींनी लंडनमध्ये व्यतीत केली. आयुष्याच्या महत्त्वपूर्ण वळणांवर गांधी पुनःपुन्हा लंडनला येत राहिले. लंडन हे त्यांच्यासाठी आत्मचिन्तनाचे व गतायुष्याचा आढावा घेण्याचे स्थान होते. गांधींच्या व्यक्तिमत्त्वाच्या जडणघडणीत त्यांच्या लंडनमधील वास्तव्याचा मोठा वाटा आहे. गांधीचे व्यक्तिमत्त्व हे प्रगमनशील होते. लंडनच्या साक्षीने गांधींच्या आयुष्यात आलेल्या स्थित्यंतरांचा अभ्यास करणे हा या लेखाचा उद्देश आहे.
इ.स. 1888 मध्ये लंडनला कायद्याच्या अभ्यासासाठी निघण्यापूर्वी राजकोटमधील अल्फ्रेड हायस्कूलने दिलेल्या निरोप-समारंभात तरुण गांधी मोठ्या बढाईखोरपणे म्हणाले, “मी आशा करतो की तुमच्यातील काही जण माझ्या पावलांवर पाऊल ठेवून लंडनला जातील”. तरुण गांधी मोठे महत्त्वाकांक्षी होते. बॅरिस्टर बनून ऐश्वर्यसंपन्न आयुष्य जगण्याची महत्त्वाकांक्षा त्यांना लंडनला घेऊन आली. त्यावेळी गांधी लंडनला आधुनिक सभ्यतेचे केंद्र आणि तत्त्वज्ञ व कवी यांची भूमी मानत. इ.स. 1888 ते 1891 दरम्यान 32 महिन्यांच्या वास्तव्यात गांधींनी ब्रिटिश जेंटलमन बनण्याचा आटोकाट प्रयत्न केला. त्यासाठी सुरुवातीला त्यांनी नृत्य, व्हायोलीन, फ्रेंच भाषा आणि वक्तृत्व ह्यांचे धडे गिरविले. नंतर पैशांच्या अडचणींमुळे त्यांनी हे प्रयोग बंद केले. त्याकाळात गांधी फॅशनेबल कपडे घालत असत. गांधी ब्रिटिश जेंटलमनच्या अनेक गुणांनी प्रभावित झाले होते. उदा. अपार कष्ट करण्याची वृत्ती, वक्तशीरपणा, वेळेचा सदुपयोग, वैयक्तिक व सार्वजनिक स्वच्छतेचे पालन करण्याची वृत्ती हे सद्गुण गांधींनी लंडनमधील वास्तव्यात आत्मसात केले व अखेरपर्यंत आचरणात आणले. ब्रिटिशांकडून मिळालेल्या या सद्गुणांबद्दल ते सदैव कृतज्ञ राहिले तसेच, सर्व भारतीयांनी त्यांचा अंगीकार करावा असा त्यांचा आग्रह असे. जानेवारी 1920 ला एस.एम. कलेम्स यांना दिलेल्या मुलाखतीत गांधी म्हणाले, “पाश्चिमात्यांच्या वैयक्तिक निरीक्षणातून दोन अत्यंत महत्त्वपूर्ण गोष्टी मी शिकलो. एक म्हणजे स्वच्छतेचे पालन आणि दुसरी म्हणजे कार्यमग्नता. माझे लोक स्वच्छतेशिवाय आध्यात्मिक प्रगती करू शकणार नाहीत, मला याची पूर्ण खात्री पटली आहे. तुम्ही लोक आश्चर्यकारकरीत्या उत्साही व कार्यमग्न आहात. भारतीयांमध्येसुद्धा तसा उत्साह आला, तर ते त्यांच्यासाठी वरदान ठरेल”. (समग्र गांधी वाङ्मय खंड 16)
लंडनला जाण्यापूर्वी गांधी वडिलधाऱ्यांच्या व परंपरेच्या दडपणामुळे शाकाहारी होते. लंडनमध्ये ते लंडन व्हेजिटेरिअन सोसायटीच्या संपर्कात आले व तिचे सदस्य बनले. हेन्री सॅाल्टलिखित A Plea for Vegetarianism या पुस्तकाच्या वाचनानंतर ते स्वखुषीने व श्रद्धापूर्वक शाकाहारी बनले. पुढे आयुष्यभर चालत राहिलेल्या त्यांच्या आहाराविषयक विविध प्रयोगांना लंडनमध्येच सुरुवात झाली.
गांधींची आध्यात्मिक जडणघडणदेखील लंडनमध्येच सुरू झाली. तेथे ते थिऑसॅाफिस्टांच्या संपर्कात आले. मॅडम ब्लाव्हॅट्स्की आणि अॅनी बेझंट यांना भेटले. ब्लाव्हॅट्स्कींच्या Key to Theosophy या ग्रंथाच्या वाचनांतून त्यांना सर एड्विन अरनॅाल्ड यांच्या भगवद्गीतेचा अनुवाद The Song Celestial आणि बुद्धांच्या आयुष्यावरील काव्य The Light of Asia वाचण्याची प्रेरणा मिळाली. लंडनमध्ये गांधींना भारतीय संस्कृतीची थोरवी कळली. परंतु त्यावेळी गांधी भारतीय धर्म व संस्कृती ह्यांकडे पाश्चात्त्यांच्या दृष्टिकोनातून पाहत होते. The Sermon on the Mount ने गांधींना अतिशय प्रभावित केले. ख्रिश्चनधर्माच्या नैतिक तत्त्वांचा गाढ प्रभाव गांधींच्या अध्यात्मावर अखेरपर्यंत राहिला.
स्वत:मधील आत्मशक्तीची जाणीव गांधींना लंडनमध्येच झाली. या 32 महिन्यांच्या काळात त्यांनी आईला दिलेला शब्द पाळला आणि मद्यमांसाचे सेवन केले नाही. या काळात त्यांनी स्वावलंबनाचे धडे गिरविले. स्वत:च्या घरापासून, देशापासून दूर राहून मनात ठरविलेले उद्दिष्ट पूर्ण केल्याने त्यांचा आत्मविश्वास वाढला.
लंडनमधील वास्तव्याच्या या काळात गांधी स्वदेशाच्या पारतंत्र्याने व्यथित झाल्याचे वा कोणत्याही राजकीय घडामोडींमध्ये भाग घेतल्याचे आपणास दिसत नाही. गांधी लंडनच्या प्रेमातच पडले होते. अत्यंत दु:खी अंत:करणाने 1891 साली त्यांनी लंडनचा निरोप घेतला. परंतु येताना ते ब्रिटिश जीवनपद्धती आपल्याबरोबर घेऊन आले. चहा, कॅाफी, ओटमील, पॅारिज, कोको, युरोपियन वस्त्रप्रावरणे आणि बूट या पाश्चात्त्य गृहोपयोगी वस्तूंची ओळख त्यांनी आपल्या कुटुंबाला करून दिली. इ.स. 1893-94 साली भारतातून लंडनमध्ये शिक्षणासाठी जाणाऱ्या तरुणांसाठी त्यांनी A Guide to London ही पुस्तिका लिहिली. त्यात त्यांनी ऑक्सफर्ड व केंब्रिज विद्यापीठांतील सरस शिक्षणाची प्रशंसा केली आहे. तसेच, इंग्लंडमधील उत्साहवर्धक हवामानाची भारतातील थकवून देणाऱ्या हवामानाशी तुलना केली आहे. लंडनमध्ये प्रथमच जाणाऱ्या तरुणांना उपयोगी पडतील अशा अनेक लहानसहान बाबींची चर्चा त्यांनी या पुस्तिकेत केली आहे.
बॅरिस्टर व ब्रिटिश जेंटलमन बनून सन्मानपूर्वक जगण्याचे गांधींचे स्वप्न 1893 साली दक्षिण अफ्रिकेत भंग पावले. ट्रेनने प्रिटोरियाला जाताना वर्णद्वेषातून त्यांना पहिल्या श्रेणीच्या डब्यातून सामानासह बाहेर फेकून देण्यात आले. हा गांधींच्या आयुष्यातील सर्वांत महत्त्वाचा क्षण आणि एका महात्म्याच्या निर्मितिप्रक्रियेची सुरुवात होती. श्वेतवर्णीयांकडून भारतीयांवर झालेल्या ह्या अन्यायावरून दक्षिण अफ्रिकेत त्यांना भारताच्या पारतंत्र्याची जाणीव झाली. या पारतंत्र्यामुळेच दक्षिण अफ्रिका आणि भारत या दोन्ही देशांत भारतीयांची स्थिती दयनीय असल्याचे त्यांना समजून चुकले. या प्रसंगानंतरच स्वयंकेंद्रित गांधीना अन्यायग्रस्त भारतीयांप्रति असलेल्या त्यांच्या जबाबदारीची जाणीव झाली.
दक्षिण अफ्रिकेतील वर्णद्वेषाविरुद्धचा हा लढा 1914 सालापर्यंत चालला. यादरम्यान दक्षिण अफ्रिकेतील भारतीयांचे प्रतिनिधी म्हणून गांधी 1906 व 1909 साली लंडनला येऊन गेले. दक्षिण अफ्रिकेतील लढ्यातही गांधींचा ब्रिटिश साम्राज्यावर व न्यायव्यवस्थेवर जो विश्वास होता तो पुढे 1919 पर्यंत टिकून राहिला. इ.स. 1906 साली गांधी लंडनमधील सर्वांत आलिशान व महागडया “दि सेसिल’ हॅाटेलमध्ये थांबले होते. त्यावेळी त्यांना वाटे की योग्य तो सन्मान मिळवण्यासाठी भारतीयांचे प्रतिनिधी म्हणून त्यांची राहणी ब्रिटिशांसमोर पहिल्या दर्जाची असली पाहिजे. इ.स. 1906 च्या लंडन कोर्टात गांधींनी नेमस्त राजकारण्यांच्या मार्गाचा वापर केला व ब्रिटिश न्यायावर विश्वास ठेवून डेप्युटेशन, निवेदनांद्वारे आपली गाऱ्हाणी मांडली. या मवाळपद्धतीच्या मर्यादा त्यांना लवकरच लक्षात आल्या. यावेळी त्यांची भेट दादाभाई नौरोजी व जहालवादी श्यामजी कृष्ण वर्मा यांच्याशी झाली. तसेच, तत्कालीन अंडर सेक्रेटरी ऑफ स्टेट फॅार द कॅालनीज विन्स्टन चर्चिल ह्यांनाही गांधी पहिल्यांदा व अखेरचे भेटले. आपल्या राजकीय हक्कांसाठी भांडणाऱ्या ब्रिटिश महिलांच्या सफ्रजेट चळवळीची माहिती गांधींना पहिल्यांदा या भेटीदरम्यान मिळाली. इ.स. 1907 ते 1909 या काळात दक्षिण अफ्रिकेत भारतीयांनी वर्णद्वेषी अन्याय्य कायद्यांविरोधात प्रत्यक्ष संघर्षाला सुरुवात केली. गांधींसह अनेक भारतीयांनी कारावास सोसला. यातूनच “सत्याग्रह’ या संकल्पनेचा विकास झाला. इ.स. 1909 साली दक्षिण अफ्रिकेतील चार वसाहतींचे एकीकरण करून दक्षिण अफ्रिका या राष्ट्राची निर्मिती करण्याचे घाटत होते. दक्षिण अफ्रिकेतील सर्व मातब्बर राजकारणी लंडनला जमले होते. अशा वेळी होऊ घातलेल्या नवीन राष्ट्रात भारतीयांना त्यांचे न्याय्य हक्क मिळावे यासाठी गांधी 1909 साली पुन्हा एकदा लंडनला गेले.
गांधींची ही तिसरी लंडनवारी अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. यावेळीदेखील गांधी वेस्टमिन्स्टर पॅलेस या उच्चभ्रू हॅाटेलमध्ये थांबले होते. परंतु हे होटेल दि सेसिलपेक्षा कमी खर्चिक होते. गांधींनी आपल्या अहिंसात्मक सत्याग्रहाच्या संकल्पनेला तात्त्विक बैठक याच काळात दिली. दि 16 जुलै 1909 ला लंडनला पोहोचण्याच्या काही दिवस आधी लंडनमध्ये मदनलाल धिंग्राने कर्झन वायलीचा खून केला. गांधींनी त्यांच्या इंडियन ओपिनियन या वृत्तपत्रात धिंग्राच्या या कृत्याची निंदा केली. ही हिंसात्मक क्रांतिकारक चळवळींशी पुढे सतत होणाऱ्या गांधींच्या वैचारिक संघर्षाची सुरुवात होती. गांधींसाठी अहिंसात्मक सत्याग्रह ही एक श्रद्धा होती व तोच स्वातंत्र्यप्राप्तीसाठीचा सर्वोत्तम मार्ग असल्याचा त्यांचा दृढविश्वास होता. त्यामुळेच क्रांतिकारकांच्या हिंसात्मक चळवळीवर त्यांनी सतत टीका केली आणि तिच्या नैतिक व व्यावहारिक मर्यादा जनतेला दाखवून दिल्या. धिंग्राच्या या कृत्याची त्यांनी “भ्याड’ “अनैतिक’ अशा शब्दांत निर्भर्त्सना केली. तसेच त्यास क्रांतिकारक न म्हणता “खुनी’ म्हटले.
याच लंडनभेटीत गांधी स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकरांनाही भेटले. दि 24 ऑक्टोबर 1909 रोजी सावरकर व त्यांच्या मित्रांनी लंडनमध्ये आयोजित केलेल्या विजयादशमी-उत्सवाचे अध्यक्षपद गांधींनी भूषविले. सावरकर व त्यांच्या इंडिया हाऊसमधील मित्रांच्या क्रांतिकारक विचारसरणींची गांधींना कल्पना होती. तरीदेखील आपल्या स्वभावानुसार गांधींनी त्यांच्याशी वैचारिक सामना करण्याचे ठरविले. याप्रसंगी केलेल्या भाषणात गांधी म्हणाले की रामाने सहन केलेला 14 वर्षांचा वनवास, सीतेचा त्याग आणि लक्ष्मणाची कठोर तपश्चर्या यांसारख्या सद्गुणांमुळेच भारताला स्वातंत्र्य मिळेल. याउलट सावरकरांनी आपल्या भाषणात रामायणाच्या संदर्भात अन्यायाविरुध्द लढताना हिंसा कशी अपरिहार्य असते, हे स्पष्ट करण्याचा प्रयत्न केला. पुढील काळातसुद्धा हे दोन नेते दोन धुव्रांप्रमाणे एकमेकांविरुद्ध राहिले व त्यांच्यात कोणत्याही मुद्द्यावर कधीही मतैक्य झाले नाही.
इ.स. 1909 च्या लंडनभेटीतील आणखी एक महत्त्वाची बाब म्हणजे गांधींनी सफ्राजेट चळवळीचे प्रत्यक्ष केलेले निरीक्षण व विश्लेषण. ही चळवळ इंग्लंडमधील महिलांनी समान राजकीय हक्कांसाठी चालविली होती. ब्रिटिश महिलांनी मोठ्या हिंमतीने चालविलेल्या या चळवळीमुळे गांधी खूपच प्रभावित झाले होते. इ.स. 1909 च्या लंडनवास्तव्यात इंडियन ओपिनियनला पाठविलेल्या प्रत्येक बातमीपत्रात त्यांनी सफ्राजेट चळवळविषयक घडामोडींचे वृत्त पाठविलेले दिसते. सफ्राजेट महिलांनी उपयोजिलेल्या अनेक अहिंसात्मक तंत्रांचा समावेश गांधींनी पुढे आपल्या सत्याग्रहात केला. सफ्राजेटांच्या सभांना ते उपस्थित राहिले. त्यांच्या नेत्या श्रीमती पँकहर्स्ट यांची भेट घेतली. आपले सहकारी हेन्री पोलॉक यांना पाठविलेल्या पत्रात गांधी लिहितात की आपणास या महिला व त्यांच्या चळीवळीपासून खूप काही शिकण्यासारखे आहे. 1909 साली या चळवळीला 5 वर्षे पूर्ण झाली होती. तरीही या महिला चिकाटीने चळवळ चालवीत होत्या. शासनावर दबाव आणण्याकरिता न घाबरता तुरुंगात जात होत्या. यांतील काही महिलांनी स्वत:ला पूर्णवेळ चळवळीसाठी वाहून घेतले होते. त्यांनी कोणत्याही परिस्थितीत विजय मिळविण्याची शपथ घेतली होती. ही शपथ तोडण्यापेक्षा मृत्यूला कवटाळण्याचीही त्यांची तयारी होती. या महिलांचा दृढ विश्वास, संघटनकौशल्य, नियोजनबद्ध कार्य करण्याची शैली, कष्ट सहन करण्याची चिकाटी या गुणांचे अनुकरण करण्यास गांधींनी आपल्या अनुयायांना सांगितले.
त्याचबरेाबरच जेव्हा यातील काही महिलांनी हिंसेचा वापर सुरू केला तेव्हा गांधींनी त्यांच्यावर टीकासुद्धा केली आणि सत्याग्रहात अशा हिंसेला काहीही स्थान नाही हे स्पष्ट केले. महिला या अबला नाहीत, त्यांच्यामध्ये प्रचंड शक्ती आहे याची जाणीव गांधींना या चळवळीच्या निमित्ताने झाली. यामुळेच 1913 साली दक्षिण अफ्रिकेतील सत्याग्रहामध्ये त्यांनी महिलांचा समावेश केला. पुढे भारतात परतल्यानंतर प्रत्येक आंदोलनात महिलांना सामावून घेतले. गांधींनी नेहमीच महिलांना समान राजकीय, सामाजिक आणि आर्थिक अधिकार देण्याचे समर्थन केले. याचे मूळ त्यांना लंडनमध्ये आलेल्या सफ्रजेट चळवळीच्या अनुभवातच दडलेले आहे.
इ.स. 1909 च्या लंडनभेटीदरम्यान गांधींच्या राजकीय विचारसणीत एक महत्त्वाचे स्थित्यंतर झाले. ते म्हणजे, त्यांचा नेमस्तांच्या विनंतीअर्जांच्या व निवेदनांच्या राजकारणपद्धतीवरचा विश्वास उडाला. गांधींचा संपूर्ण दिवस महत्त्वपूर्ण व्यक्तींना भेटीची वेळ मागण्यासाठी अर्ज करणे, उत्तराची वाट पाहणे व भेटीसाठी त्या व्यक्तीने सांगितलेल्या दूर अंतरांवरील ठिकाणांवर जाणे, दक्षिण अफ्रिकेतील भारतीयांची गाऱ्हाणी मांडणे व त्यासाठी त्या व्यक्तीचे समर्थन मिळविणे, अशा कामांत जात होता. अशा प्रत्येक भेटीनंतर गांधींना निराशा वाटत असे कारण या वजनदार व्यक्तींना भारतीयांच्या न्याय्य मागण्यांबद्दल सहानुभूती वाटत नसे. त्याऐवजी त्यांना स्वत:च्या अधिकाराच्या जागांचीच जास्त काळजी वाटत असे. वेळ आणि पैसे वाया घालवणाऱ्या या मार्गाचा गांधींना मनस्वी तिटकारा आला. याचवेळी त्यांना हे जाणवले की, ब्रिटिश लोक भारतीयांनी आपल्या मागण्यांसाठी तुरुंगवास सोसल्याचे ऐकून प्रभावित होत. गांधी इंडियन ओपिनियनला पाठविलेल्या एका बातमीपत्रात लिहितात की फक्त विनंतीअर्ज, भाषणे करून न्याय मिळविण्याचा काळ आता संपला आहे. ते लिहितात की आता आत्मिक शक्ती म्हणजे प्रत्यक्ष कृती व अहिंसात्मक सत्याग्रह यानेच न्याय मिळू शकतो. यानंतरच्या काळात दक्षिण अफ्रिका व पुढे भारतीय स्वातंत्र्य चळवळीत गांधींनी प्रत्यक्ष कृती म्हणजेच सत्याग्रहालाच महत्त्व दिले.
इ.स. 1909 च्या लंडनमधील वास्तव्यात गांधींनी केलेल्या आत्मचिंतनाची फलश्रुती म्हणजे हिंद स्वराज ही पुस्तिका. हिंद स्वराज म्हणजे गांधींच्या तत्त्वज्ञानाचा पाया. गांधींनी ही पुस्तिका लंडनहून दक्षिण अफ्रिकेला परतताना प्रवासात लिहिली. लंडनमध्ये असताना गांधींच्या वाचनात जी.के. चेस्टरटन या ब्रिटिश लेखकाचा एक लेख आला. या लेखामुळे गांधींना त्यांनी तोपर्यंतच्या आयुष्यात केलेल्या चिंतनाला शाब्दिक रूप देण्याची प्रेरणा मिळाली. या लेखात चेस्टरटन यांनी असे लिहिले होते की, आजचे भारतीय तरुण ज्या स्वातंत्र्याची चर्चा करत आहेत, त्या स्वातंत्र्याचा खरा अर्थ त्यांना कळत नाही. ते फक्त पाश्चात्त्यांचे अनुकरण करतात. स्वदेशातील तत्त्वज्ञानाच्या वारशाकडे दुर्लक्ष करून ते हर्बर्ट स्पेन्सरसारख्या विदेशी विचारवंतांचे अनुकरण म्हणजे त्यांचा पराभव करणाऱ्या पाश्चात्त्य संस्थांची मागणी करणे आहे. ते असे लिहितात की या तरुण राष्ट्रवाद्यांचा राष्ट्रवाद फसवा आहे.
हा लेख वाचल्यानंतर गांधींच्या मनात जे वैचारिक अभिसरण झाले, ते त्यांनी लंडनमध्ये The Peace and Arbitration Society च्या सभेत East and West या भाषणात व्यक्त केले. पुढे हेच विचार त्यांनी हिंद स्वराज मध्ये अधिक सविस्तरपणे मांडले. हिंद स्वराज ही पुस्तिका गांधींनी हिंसक कृत्ये करणारे क्रांतिकारक व पाश्चात्यांचे अंधानुकरण करणाऱ्या व्यक्ती ह्यांचा प्रतिवाद करण्यासाठी लिहिली होती. गांधी त्यांच्यावर टीका करताना लिहितात की या लोकांना ब्रिटिशांशिवाय ब्रिटिश शासन हवे आहे, एवढेच. ब्रिटिश सांसदीय पद्धत ही काही अनुकरणीय गोष्ट नव्हे. ज्या ब्रिटिश संसदेचा गौरव संसदीय पद्धतीची माता म्हणून केला जातो, ती एक वेश्या आणि वांझोट्या स्त्रीप्रमाणे आहे. गांधींच्या या विधानावर आज देखील टीका होते. हे वाक्य काही अंशी स्त्रियांचा अपमान करणारे आहेही. परंतु ते आपण 1909 च्या संदर्भात अभ्यासले पाहिजे. तेव्हा ब्रिटनमध्ये संपूर्ण लोकशाही नव्हती, स्त्रियांना मताधिकार नव्हता. गांधींनी ब्रिटिश संसदेची वांझोट्या स्त्रीशी तुलना केली कारण त्यांच्या मते तिने तोपर्यंत कोणतेही चांगले कार्य केले नव्हते. तसेच त्यांनी ब्रिटिश संसदेची एका वेश्येशी तुलना केली कारण ती सतत बदलत राहणाऱ्या स्वार्थी व ढोंगी मंत्र्यांच्या नियंत्रणाखाली असते. गांधींच्या मते ब्रिटिश प्रधानमंत्र्याला संसदेपेक्षा स्वत:च्या अधिकाराची व पक्षाची अधिक काळजी असते. ज्या ब्रिटिश संस्कृतीमुळे पूर्वी गांधी संमोहित झाले होते, त्या संस्कृतीची ते Satanic Civilization अशा शब्दांत निंदा करतात. त्यांच्या मते या तथाकथित आधुनिक संस्कृतीमुळे युरोपची दिवसेंदिवस अधोगती होत होती. गांधींनी औद्योगिक क्रांतीच्या झगमगाटामागे लपून राहिलेल्या कामगारांच्या विशेषत: महिला कामगारांच्या दयनीय स्थितीचे वर्णन या पुस्तिकेत केले. गांधींच्या मते जनसामान्यांची स्थिती औद्योगिक क्रांतीपूर्वी अधिक चांगली होती. औद्योगिक क्रांतीमुळे निर्माण झालेल्या शहरातील झोपडपट्ट्या व रोगराईला कारणीभूत ठरलेल्या संसदेला गांधी गुलामगिरीचे प्रतीक मानतात. हिंद स्वराज मध्ये गांधी भारताच्या पारतंत्र्याच्या मूळ कारणावर बोट ठेवतात. ते लिहितात की ब्रिटिश भारतावर केवळ त्यांच्या सामर्थ्यामुळे राज्य करीत नाहीत तर आपणच त्यांना स्वत:हून राज्य करू देतो. भारताच्या या अवस्थेसाठी ते आधुनिक संस्कृतीला दोषी ठरवितात. भारतीयांना त्यांच्या हस्तोद्योगांचे पुनरुज्जीवन करण्यास सांगतात. बॅरिस्टर बनण्याच्या ज्या महत्त्वाकांक्षेने गांधी पहिल्यादा लंडनला आले होते, त्या वकिली व्यवसायाला ते गोरगरिबांचे रक्त शोषण करणाऱ्या जळवांची उपमा देतात.
ज्या लंडनमध्ये गांधींनी सुरुवातीला ब्रिटिश संस्कृतीचे अंधानुकरण करण्याचा प्रयत्न केला, त्या संस्कृतीच्या काळोख्या बाजूची जाणीव त्यांना 1909 च्या लंडन भेटीदरम्यान झाली. तेव्हा त्यांचे विचार पुष्कळ बदललेले दिसतात. गांधी लिहितात की, खरी संस्कृती तिला म्हणावे, जी मनुष्याला कर्तव्याच्या व नैतिकतेच्या मार्गावर चालण्यास उद्युक्त करते, त्याला स्वत:च्या मनावर, वासनांवर विजय प्राप्त करण्यास सहाय्य करते. त्यांच्या मते या कसोटीवर भारतीयांना आधुनिक पाश्चात्त्यांकडून काहीही शिकण्यासारखे नाही कारण भारतीय संस्कृती मनुष्याला नैतिकता शिकविते तर पाश्चात्त्य संस्कृती ही अनैतिकता पसरवते. गांधी लिहितात की खरे स्वराज्य म्हणजे मनुष्याने स्वत:वर राज्य करण्याची प्राप्त केलेली शक्ती. गांधींच्या मते भारताच्या सध्याच्या निरस्त्र अवस्थेमुळे फक्त त्याग हाच भारतीयांना स्वराज्य मिळवून देईल. मदनलाल धिंग्राने केलेल्या हत्येला गांधी भ्याडपणाचे कृत्य म्हणतात आणि निक्षून सांगतात की आत्मशक्ती व सत्याग्रह हाच स्वराज्यप्राप्तीचा योग्य मार्ग आहे.
ज्या इंग्रजी भाषेवर प्रभुत्व प्राप्त करण्यासाठी विद्यार्थिदशेत गांधींनी अथक प्रयत्न केले त्या भाषेस ते भारतीयांच्या गुलामगिरीचे एक कारण म्हणतात. या विषयावर त्यांनी महत्त्वपूर्ण विचार व्यक्त केले आहेत. जसे की –
सुशिक्षित भारतीय मातृभाषेपेक्षा इंग्रजी भाषेला श्रेष्ठ समजतात व आत्मसन्मान घालवून बसतात.
हिंदी हीच भारताची राष्ट्रभाषा असावी.
कृती न करता फक्त अर्जविनंती करणे हे अपमानास्पद आहे.
ब्रिटिश शासनास कोणताही पर्याय नाही असे समजणे म्हणजे परमेश्वरावर श्रद्धा नसणे होय.
जुलै 1914 मध्ये गांधी चौथ्यांदा लंडनला आले. दक्षिण अफ्रिकेतील सत्याग्रहाची यशस्वी सांगता झाली होती. गांधी दक्षिण अफ्रिकेचा कायमचा निरोप घेऊन भारताला परतण्यापूर्वी लंडनला आले होते. पहिल्या महायुद्धाला नुकतीच सुरुवात झाली होती. यावेळी गांधींच्या जीवनपद्धतीत 1906 व 1909 च्या तुलनेत झालेले प्रचंड स्थित्यंतर दिसून येते. यावेळी गांधी पूर्वीप्रमाणे प्रथम दर्जाच्या होटेलमध्ये न थांबता केनसिंग्टन भागातील एका साध्या लॅाजमध्ये उतरले होते. श्रीमती सरोजिनी नायडू मोठ्या प्रयत्नाने त्यांचा पत्ता शोधून या लॅाजच्या पायऱ्या चढून वर गेल्या तेव्हा त्यांना गांधींची लहानशी मूर्ती जमिनीवर बसून तुरुंगातील लाकडी वाडग्यातून स्मॅश टोमेटो व अॅलिव्ह ऑईलचा आहार घेताना दिसली. त्या लहानशा खोलीत गांधी कस्तुरबांसोबत भारतीय पद्धतीने राहिले. या लंडन-भेटीच्या वेळी गांधींनी घरातील पुरुष महायुद्धात लढण्यासाठी गेल्यानंतर मागे राहिलेल्या माता, भगिनी व पत्नींची विह्वल स्थिती पाहिली. अशा परिस्थितीत ब्रिटिश साम्राज्याचे नागरिक म्हणून युद्ध प्रयत्नांना साहाय्य करण्याचे आपले कर्तव्य त्यांनी ओळखले व लंडनमधील भारतीयांच्या सहाय्याने वैद्यकीय पथक उभारून स्वत:चा वाटा उचलला. 1915 साली भारतात आल्यानंतरदेखील स्वत:च्या तब्येतीची पर्वा न करता तरुणांना सैन्यात भरती करण्यासाठी गुजरातमध्ये दौरा काढला. गांधींचा ब्रिटिश साम्राज्यावरचा विश्वास 1919 पर्यंत कायम राहिला. परंतु जालियाँवाला बाग हत्याकांडानंतर मात्र तो सपशेल उडाला.
इ.स. 1931 च्या सप्टेंबर महिन्यात पाचव्यांदा गांधी लंडनला आले. ही त्यांची शेवटची लंडन भेट. परंतु यावेळी ते पूर्वीप्रमाणे ब्रिटिश साम्राज्याचे जबाबदार नागरिक नव्हते. त्यांच्याच शब्दात सांगायचे तर तेव्हा ते एक बंडखोर होते. इ.स. 1914 ते 1931 दरम्यान अनेक महत्त्वाच्या घडामोडी झाल्या होत्या. आता गांधी भारतीय स्वातंत्र्य-चळवळीचे सर्वोच्च नेते व एक जगप्रसिद्ध व्यक्ती होते. रौलेट सत्याग्रह, असहकार आणि सविनय कायदेभंगाच्या चळवळीमुळे ब्रिटिश साम्राज्याचे ते शत्रू नंबर एक बनले होते. ते लंडनला भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेसचे एकमेव प्रतिनिधी म्हणून दुसऱ्या गोलमेज परिषदेत भारतासाठी संपूर्ण स्वातंत्र्याची मागणी मांडण्यासाठी आले होते.
इ.स. 1931 मध्ये लंडनला येणारे गांधी हे बॅरिस्टर मिस्टर गांधी किवा दक्षिण अफ्रिकेतील भारतीयांचे नेते गांधी नव्हते तर ते `महात्मा गांधी’ होते. पूर्वीचा ब्रिटिश जेंटलमेंनचा सुटाबुटाचा पेहराव त्यांनी केव्हाच उतरवला होता. आता ते भारतातील गोरगरीब शेतकऱ्यांचे प्रतिनिधी म्हणून पंचा नेसून लंडनमध्ये पाऊल ठेवणार होते. वाटेत मार्सेमध्ये कस्टम अधिकाऱ्याने गांधींना विचारले की त्यांना त्यांच्याजवळील काही मालमत्ता घोषित करायची आहे काय? त्यावर गांधींनी उत्तर दिले की ते एक भिक्षू आहेत. त्यांच्याकडे सामान म्हणून सहा चरखे, कैद्यांची ताटे, बकरीचे एक कॅन दूध, हाताने विणलेले सहा पंचे आणि एक टॅावेल आहे. तसेच स्वत:च्या प्रतिष्ठेसंबंधी सांगण्यासारखे काही नाही. इ.स. 1906 व 1909 साली आलिशान होटेलमध्ये आणि 1914 साली एका साध्या लॅाजमध्ये राहिलेल्या गांधींनी यावेळी लंडनच्या पूर्वेकडील झोपडपट्ट्यांचा भाग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बॅावमधील किंग्जले हॅालमध्ये राहण्याचे ठरविले. किंग्जले हॅाल हे गांधींची एक प्रशंसक म्युरीअल लेस्टर या महिलेने गोरगरिबांसाठी काम करण्यासाठी स्थापन केले होते. ते एका ख्रिश्चनधर्मीय आश्रमाप्रमाणे होते.
गोलमेज परिषदेतून काही फलनिष्पत्ती होईल का याबद्दल गांधी सुरुवातीपासून साशंक होते. त्यामुळे या लंडनभेटीत त्यांनी भारतीय स्वातंत्र्य-चळवळीबद्दल ब्रिटिश जनतेच्या मनातील गैरसमज दूर करून त्यांची मने जिंकून घेण्यावर लक्ष केंद्रित केले. दि टाईम्स ला दिलेल्या मुलाखतीत 14/9/1931 गांधी म्हणाले की शांती स्थापित करण्याच्या ज्या उद्देशाने ते इंग्लंडमध्ये आले आहेत, त्यामध्ये त्यांना प्रत्येक ब्रिटिश स्त्रीपुरुषाची सदिच्छा हवी आहे. या भेटीत गांधींनी झोपडपट्टीत राहणारे गोरगरीब, कामगार तसेच मध्यमवर्गीय, उद्योगपती, कलाकार, ऑक्सफर्ड व केंब्रिज विद्यापीठातील विद्यार्थी, प्राध्यापक आणि लहान मुले ह्यांच्याशीसुद्धा संवाद साधला. त्यांना आपला कट्टर शत्रू मानणाऱ्या विन्स्टन चर्चिल यांना भेटण्याचाही गांधींनी प्रयत्न केला. परंतु चर्चिल यांनी या भेटीस नकार दिला.
यावेळी गांधींच्या विचारांमध्ये एक तात्त्विक स्थैर्य आले होते. तरीदेखील सर्वसामान्यांमध्ये मिसळून, संवाद साधून व निरीक्षण करून भारतीयांच्या कल्याणासाठी यातून काही शिकता येईल काय असा त्यांचा सतत प्रयत्न असे. त्यांची अनुयायिनी मीरा त्यांना दररोज पहाटे तीन वाजता उठवत असे. त्यानंतर गांधी एक तास बॅाव मधील रस्त्यांवर चालण्याचा व्यायाम करत. अश्याच एका पहाटे त्यांनी इगलिंग रोड झोपडपट्टीत येथील रहिवाशांचे जीवन जाणून घेण्यासाठी जाण्याचे ठरविले. तेथील घरांना भेटी देऊन त्यांनी तेथील स्त्रीपुरुष काय काम करतात, घर व परिसराची स्वच्छता कशी करतात, घरभाडे किती आहे, इतर खर्च कसा चालतो, तसेच, बेकार असताना कशी तजवीज केली जाते ह्या गोष्टी जाणून घेतल्या. गांधींनी कापड-उद्योगाचे एक केंद्र असलेल्या लँकेशायरला भेट दिली. त्यांनी तेथील कामगारांच्या उद्योगपतींच्या मनांतले गैरसमज दूर करून त्यांना 30 कोटी भारतीयांच्या दारिद्र्याची जाणीव करून दिली. जागतिक मंदी आणि वसाहतींतील स्वदेशी चळवळ ह्यांमुळे तेथील अनेक कामगार बेकार झाले होते. त्यांचे कष्ट बघून गांधीचे हृदय हेलावले व त्यांनी आश्वासन दिले की स्वातंत्र्यप्राप्तीनंतर जर भारतीयांना अधिक कापडाची आवश्यकता भासली तर लँकेशायरमधील कपड्याच्या आयातीला प्राधान्य दिले जाईल.
गांधींनी आपल्या मनमोकळ्या वागण्याने लंडनमधील गोरगरीब व कामगारांची मने जिंकून घेतली. गांधींना लंडनच्या पूर्व भागातील हे सामान्य लोक भावले. त्यांनी सर्वसामान्यांच्या आयुष्यातील सकारात्मक विकासाचे निरीक्षण केले. त्यांना प्रत्येक घरात किमान जीवनावश्यक वस्तू दिसल्या. लंडनमधील गरीब व श्रीमंत यांच्यातली दरी कमी होत असल्याचे पाहून त्यांना आनंद वाटला. भारतातील गोरगरिबांच्या कल्याणासाठी यांतील कोणत्या गोष्टीचे अनुकरण करता येईल याचा त्यांनी सतत विचार केला. गांधींना विरोध जाणवला तो लंडनच्या मध्यमवर्गामध्ये. परंतु त्यांना खात्री होती की या वर्गालाही भारतीयांची भूमिका एक दिवस समजेल. नॅशनल लेबर क्लबमधील कार्यक्रमात एका व्यक्तीने त्यांना असा प्रश्न विचारला की भारताला स्वातंत्र्य देऊन आम्ही चूक तर करणार नाही? गांधींनी उत्तर दिले की कोणीही कुणाला स्वातंत्र्य भेट म्हणून देऊ शकत नाही. स्वातंत्र्य हे स्वत:चे रक्त सांडवून मिळवायचे असते आणि भारतीयांनी 1919 सालापासून आवश्यक तितके रक्त सांडवले आहे. ऑक्सफर्डमधील विद्वज्जनांनी जेव्हा भारतीयांच्या स्वातंत्र्य उपभोगण्याच्या क्षमतेबद्दल शंका उपस्थित केली, तेंव्हा गांधींनी संयमाने सांगितले की भारतीयांना चुका करण्याचे व त्या चुकांमधून शिकण्याचे स्वातंत्र्य मिळाले पाहिजे.
इ.स. 1931 च्या लंडनभेटीतील एक अत्यंत नाट्यपूर्ण घटना म्हणजे वस्त्रविषयक शिष्टाचाराला बाजूला सारत, पंचा नेसून, गांधींचे राजा पंचम जॅार्जने आयोजित केलेल्या चहापानाच्या कार्यक्रमाला जाणे. याप्रसंगी राजे जॅार्ज यांनी गांधींना धमकीवजा सूचना केली, की माझ्या साम्राज्यावर केलेले कोणतेही आघात सहन केले जाणार नाहीत. यावर गांधींनी शांतपणे उत्तर दिले, “माननीय राजांच्या राजवाड्यात त्यांचा पाहुणचार घेतल्यानंतर मला कोणत्याही राजकीय वादविवादात ओढले जाऊ नये.”
गोलमेज परिषदेच्या अपयशी सांगतेनंतर रॅाईटरला दिलेल्या निवेदनात गांधींनी ब्रिटिश नागरिकांना संदेश दिला की भविष्यातील संघर्षात भारतीयांच्या मनात ब्रिटिशांबद्दल द्वेष नसून प्रेमच राहील. या काळात लिहिलेल्या एका लेखात गांधींनी या शेवटच्या लंडनभेटीचा अनुभव सांगताना लिहिले की, मानवी स्वभावाच्या सर्वोत्तम बाजूचे दर्शन त्यांना पूर्व लंडनमधील वास्तव्यात झाले. ज्यामुळे जगातील सर्व मानव एक आहे; पूर्व व पश्चिम असा भेद नसतो; तसेच लंडनमधील सर्वसामान्य नागरिकांच्या मनात भारतीय स्वातंत्र्याबद्दल सदिच्छा आहे ह्या गोष्टींचा त्यांना साक्षात्कार झाला. या अनुभवामुळे त्यांच्या मनातील लंडनबद्दलचा जिव्हाळा वाढला. खरोखर गांधीचे लंडनशी भावनिक ऋणानुबंध होते. आयुष्याच्या विविध वळणांवर लंडनने त्यांना खूप काही शिकवले. गांधींनी वेळप्रसंगी औद्योगिक क्रांती, इंग्लंड, विशेषत: लंडनमधील आधुनिक संस्कृती, त्यांची संसद ह्यांच्यावर कटु शब्दांत टीका केली. परंतु मनातून त्यांनी कायम लंडनवर प्रेमच केले. त्यांच्या भावविश्वाचा एक कप्पा या शहराच्या आठवणींनी व्यापलेला होता.
इ.स. 1939 साली दुसरे महायुद्ध सुरू झाल्यानंतर जर्मन बॉंबवर्षक विमानांचे हल्ले लंडनवर सुरू झाले. सप्टेंबर 1939 मध्ये गांधी व्हॉइसरॉय लिनलिथगो यांना भेटण्यास गेले. यावेळी झालेल्या चर्चेत जर्मन बॉंबवर्षावामुळे नष्ट होत चाललेल्या ब्रिटिश पार्लमेंटची इमारत व वेस्टमिन्स्टर अॅबे यांचे चित्र त्यांच्या डोळ्यांसमोर येऊन गांधींची स्थितप्रज्ञता ढळली आणि ते मान खाली घालून हुंदके देऊन रडू लागले. या महायुद्धात गांधींची सहानुभूती इंग्लंड व मित्र राष्ट्रांबरोबर होती. कारण त्यांच्या मते हे महायुद्ध लोकशाही व हुकूमशाही यांच्यातील संघर्ष होता. यावेळी गांधींना वाटत होते की, भारतीयांनी इंग्लंडला बिनशर्त पाठिंबा द्यावा. परंतु जवाहरलाल नेहरू व अखिल भारतीय कॅाग्रेस कमिटीच्या तीव्र विरोधामुळे त्यांना माघार घ्यावी लागली. जुलै 1942 मध्ये दि डेली एक्स्प्रेस ला दिलेल्या मुलाखतीत गांधी म्हणाले की त्यांना लंडनचा प्रत्येक भाग माहीत आहे. लंडनबद्दल त्यांच्या मनात विशेष भावना आहेत. त्यांना कायद्याचा अभ्यास करताना इनर टेंपल लायब्ररीत व्यतीत केलेला काळ आणि डॅा.पार्कर यांची टेंपल चर्चमधील व्याख्याने स्पष्टपणे आठवत होती. लंडनमधील नागरिकांसाठी आपला जीव कळवळतो. लंडनच्या ऐतिहासिक वास्तूंचा विनाश आपल्याला बघवत नाही… असेही ते म्हणाले.
तसे पाहता गांधींची दृष्टी वैश्विक होती. अद्वैतवादावर श्रद्धा असल्याने, त्यांना सर्व मानव व सृष्टी आपलीशी वाटे. परंतु त्यातूनही त्यांच्या मनातील लंडनचे विशेष स्थान आपल्याला जाणवत राहते. जॅार्ज वुडलॅाक त्यांच्या Who Killed the British Empire या पुस्तकात लिहितात की ब्रिटिश साम्राज्याच्या अंतासाठी कोण्या एका व्यक्तीला जबाबदार धरायचे असेल तर ते गांधीच असतील. भारत स्वतंत्र झाल्यानंतर दोन दशकांत एक एक करत सर्व ब्रिटिश वसाहती स्वतंत्र झाल्या आणि ब्रिटिश साम्राज्य कोसळले. पण दुसरीकडे, गांधींनी स्वातंत्र्य-चळवळीदरम्यान इंग्लंडविरुद्ध भारतीयांच्या मनात कधीही द्वेषभावना उत्पन्न होऊ दिली नाही हेही तितकेच खरे. जेम्स हंट या लेखकाच्या मते गांधींचे सर्वांत मोठे यश म्हणजे त्यांनी ब्रिटिशांना त्यांच्या सदसद्विवेकबुद्धीची आणि साम्राज्यवादाच्या प्रभावामुळे ते विसरत चाललेल्या नैतिक मूल्यांची जाणीव करून दिली. त्यामुळेच आज लंडनवासीयांना गांधी आपले वाटतात. यातच गांधीच्या तत्त्वज्ञानाचा विजय आहे. या तत्त्वज्ञानाने माणसे जोडण्याचे काम केले. त्यामुळेच कॅमेरून म्हणाले की इंग्लंडच्या नागरिकांना गांधींचा अभिमान वाटतो.
पार्लमेंट स्क्वेअरमध्ये गांधींचा पुतळा उभारणाऱ्या ब्रिटिश नागरिकांच्या वैचारिक परिपक्वतेची प्रशंसा करावीशी वाटते. त्यांनी याबाबतीत कोणेतेही संकुचित राजकारण केले नाही. याउलट भारतात मात्र स्वातंत्र्यानंतर कोणत्याही थोर विदेशी महापुरुषांचा असा सन्मान केल्याचे दिसून येत नाही. विदेशी व्यक्ती तर दूरच राहिल्या, आपण तर आपल्याच देशातील महापुरुषांना जात, धर्म व प्रांतवादांच्या संकुचित राजकारणात अडकवून ठेवले आहे. आपल्याच देशातील मध्ययुगीन मुस्लिम शासकांच्या नावाच्या शहरांचे, तसेच ब्रिटिश वास्तूंचे नामांतर केले जात आहे. खरे तर याबाबतीत आपण ब्रिटिश नागरिकांकडून बरेच काही शिकायला हवे.
shyam_pakhare@yahoo.com
●●●