आर्थिक प्रगतीसाठी सहिष्णुता आवश्यक

आर्थिक प्रगती, सहिष्णुता, अभिव्यक्तिस्वातंत्र्य

प्रश्न विचारणे आणि पर्यायी दृष्टिकोन मांडणे यांतच नवीन संकल्पनांचा उगम असतो. म्हणूनच भारताला आर्थिक प्रगती करायची असेल तर येथील समाजजीवनात प्रश्न विचारण्याचे स्वातंत्र्य अबाधित राहायला हवे. देशाच्या आर्थिक विकासाची सहिष्णुता ही पूर्वअट आहे. एकविसाव्या शतकात मानाने जगायचे असेल तर आपल्याला आपल्या परंपरेतील विमर्श व खुली चिकित्सा ह्या प्राणतत्त्वांची जोपासना करावी लागेल. आय आय टी दिल्ली येथील पदवीदान-समारंभात भारतीय रिझर्व बँकेच्या गव्हर्नरांनी केलेले महत्त्वाचे प्रतिपादन.

मला या संस्थेमध्ये पदवीदानाचे भाषण देण्यास बोलाविल्याबद्दल मी आपला आभारी आहे. तीस वर्षांपूर्वी मी याच संस्थेतून विद्युत्-अभियांत्रिकीची पदवी मिळविली होती. त्यावेळी, माझ्यासमोर भविष्यात काय वाढून ठेवले आहे या विचाराने मी अतिशय चिंताग्रस्त झालो होतो. पण या संस्थेने मला भविष्याचा सामना करण्यासाठी किती उत्तम तऱ्हेने घडविले आहे याची मला जाणीव नसल्याने असे घडले असावे. आमचे प्राध्यापक हे व्यावसायिक वृत्तीचे होते आणि त्यांनी आपल्या कामाला वाहून घेतले होते. मी कोणा एकाचा उल्लेख करणार नाही, कारण असे केल्यास इतरांचा उपमर्द केल्यासारखे होईल. त्यांच्या आमच्याकडून खूप जास्त अपेक्षा होत्या. कारण त्यांना हे ठाऊक होते की आमच्यासमोर आह्वाने खडी केल्यानेच आम्हाला आमच्या क्षमतांची जाणीव होईल. त्याचबरोबर, तितकीच महत्त्वाची बाब म्हणजे, त्याकाळी आय आय टी दिल्लीच्या विद्युत्-अभियांत्रिकीच्या अभ्यासक्रमात संगणक-विज्ञानाचाही समावेश होता. आमच्या वर्गात काही अतिशय चलाख विद्यार्थी होते. असे सहाध्यायी लाभणे ही फार विशेष बाब होती असे मला वाटते. अशा सहाध्यायांबरोबर मला काम करायला मिळाले आणि ग्रेड मिळविण्यासाठी त्यांच्याशी स्पर्धाही करावी लागली. यातूनच मला हे शिकायला मिळाले की अत्यंत खडतर परिस्थितीत यशस्वी होण्यासाठी कठोर परिश्रम, दोस्ती आणि प्रचंड नशीब या गोष्टी लागतात. मला मिळालेला हा धडा आजतागायत माझ्या डोक्यात पक्का बसलेला आहे.
त्या दिवसांत-आणि माझी खात्री आहे आजही तशीच परिस्थिती असेल- आय आय टी दिल्लीमध्ये फक्त अभ्यासाचेच माहात्म्य होते असे नाही तर सर्वांगीण वाढीला महत्त्व असे. काही सन्माननीय अपवाद वगळता, आमच्या शालेय जीवनात आम्ही सारे खुळचट आणि गावंढळच म्हणावेत असे होतो. मैदानी खेळांत आमची कधी वर्णी लागली नव्हती. आमच्यातल्या जवळपास प्रत्येकाची हीच परिस्थिती होती. आम्हाला कोठेतरी लांबवर उभे केले जायचे. आमच्यातल्या स्टार खेळाडूंनी सिक्सर मारल्यावर चेंडू परत आणणे एव्हढेच आमच्या नशिबात आजवर होते. त्यामुळे, आम्हाला मैदानावर सरावाच्या जाळ्यामध्ये चक्क बॅटिंग आणि बोलिंग करण्याची संधी आयुष्यात पहिल्यांदा, आय आय टी मध्ये मिळाली. आमच्यातला प्रत्येक जण काही ना काही उद्योग करायचा. कोणी फोटोग्राफी, तर कोणी पुस्तकप्रकाशन. खरे म्हणजे, आम्हा सर्वांचीच इच्छा नाटकात भाग घ्यावा अशी असायची. कारण तिथेच तर मुलींबरोबर खूप वेळ घालवायला मिळायचा. पण मला अभिनयात मुळीच गम्य नव्हते. त्यामुळे मला माझ्या सुप्त गुणांच्या विकासासाठी अन्य क्षेत्रे धुंडाळावी लागली आणि अशी अनेक क्षेत्रे होतीही.
आय आय टी मधील विद्यार्थि-राजकारण हे योजना-प्रतियोजना, डावपेच, फसवेगिरी यांनी बुजबुजलेले असे क्षेत्र होते. वेळ घालविण्याचे ते एक बौद्धिक साधन होते. हां, आपल्या देशात सगळीकडे आढळून येणाऱ्या हिंसा आणि भ्रष्टाचार या गोष्टी मात्र येथे नव्हत्या. संख्येने लहान असणाऱ्या पण बुद्धिमान विद्यार्थ्यांच्या मतदारसंघाला तुम्हाला मत का द्यावे हे पटवून देणे, मते कशी मिळवावीत याचे मार्ग शोधणे अशा गोष्टींमुळे आम्ही मन वळविण्याच्या कलेमध्ये तरबेज झालो.
अशा तऱ्हेने वर्गांमध्ये, आरसीएच्या स्क्वॉशच्या मैदानांवर, सुसंस्कृत आचरणाचे धडे देणाऱ्या स्पिकमॅकेच्या (SPIC MACAY- Society For Promotion of Indian Classical Music Amongst Youth) रात्रभर चालणाऱ्या मैफिलीत आणि ओएटी (OAT) मध्ये गर्दीने तुडुंब भरून वाहणाऱ्या रॉक कॉन्सर्टमध्ये आम्ही लहानाचे मोठे झालो. आम्हांपैकी काहीजण कैलाश होस्टेलच्या बाहेर आशाळभूतपणे बसलेले असायचे. कधीतरी त्यांच्या प्रयत्नांना यश मिळायचे, आणि मग कॉन्वोकेशन हॉलच्या गच्चीवर शरद ऋतूतील चांदण्या रात्री मैत्रिणींबरोबर तारे न्याहाळत गप्पा मारायच्या. इन्स्टिट्यूटने आम्हा भाबड्या पोरांना आत्मविश्वास देऊन परिपक्व बनविले. आम्ही इन्स्टिट्यूटमध्ये आलो ते चलाख पोरे आणि पोरी म्हणून. पण बाहेर जाताना आम्ही अधिक शहाणे झालेले तरुण आणि तरुणी झालो होतो. माझी खात्री आहे इन्स्टिट्यूटने तुम्हालाही तसेच शहाणे बनविले आहे आणि तुम्ही याबद्दल इन्स्टिट्यूटचे कायम ऋणी राहाल.
आज येथे उभे राहून बोलताना मला याची जाणीव आहे की बहुतांश पदवीदान समारंभात केलेली भाषणे लवकरच विसरली जातात. ही तर वक्त्यासाठी एका प्रकारची नैतिक दुर्घटनाच म्हटली पाहिजे. आज मी जे काही सांगणार आहे ते जर तुम्ही विसरून जाणार असाल तर माझे व्याख्यान उत्तम व्हावे यासाठी मी प्रयत्न करावेत यासाठी प्रोत्साहनच नाही असे म्हणावे लागेल. त्यामुळे, याचे फलित म्हणजे अर्थशास्त्रज्ञ ज्याला वाईट संतुलन (bad equilibrium) असे म्हणतात असे असेल. असे होणार असेल तर मी माझे उरलेले व्याख्यान न दिलेलेच बरे. आपण सगळे आपापल्या उद्योगांना जाऊया कसे! पण तरीही, मी माझ्या व्यक्तिगत नफानुकसानीचा विचार न करता आजचा प्रमुख पाहुणा म्हणून माझ्या धर्माचे पालन करणार आहे. भारत देशाची विमर्श आणि खुलेपणाने प्रश्न विचारण्याची परंपरा हे आर्थिक प्रगतीच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण का आहेत यावर मी आज बोलणार आहे.

नवीन कल्पना:
रॉबर्ट सोलो (Robert Solow) हा एक नोबेल पुरस्कार विजेता अर्थशास्त्रज्ञ आहे. त्याने असे दाखवून दिले की आर्थिक वाढ ही श्रमशक्ती आणि भांडवल यांसारख्या उत्पादनाच्या घटकांत वाढ करून होत नसते, तर उत्पादक घटकांचा अधिक अक्कलहुशारीने वापर करूनच ती होते. यालाच सोलो संपूर्ण घटकांच्या उत्पादकतेतील वाढ (total factor productivity growth) असे म्हणतो. दुसऱ्या शब्दांत सांगायचे तर नव्या कल्पना, नव्या उत्पादनपद्धती, अधिक चांगल्या पुरवठा-यंत्रणा (logistics)- यांतूनच शाश्वत आर्थिक वाढ (sustained economic growth) घडून येते. अर्थात, आपल्यासारख्या गरीब देशाला येता काही काळ तरी जास्त लोकांना काम पुरवूनच उत्पादन वाढ साध्य करावी लागणार आहे. तुटपुंजी उत्पादकता असलेल्या कृषिक्षेत्रातून बाहेर काढून त्यांना जास्त मूल्यवृद्धी (value addition) असलेल्या उद्योगांकडे वळवावे लागेल. तसेच त्यांना आपले काम करण्यासाठी अधिक चांगली आयुधेही द्यावी लागतील. तुम्हापैकी अनेकांनी अर्थशास्त्र हा विषय अभ्यासासाठी घेतला असेल. त्यांनी हे चांगलेच ओळखले असेल की आपण भारतीय लोक उत्पादन-शक्यता-सीमेपासून (production possibility frontier) सहसा खूप दूर असतो. म्हणून आपली वाढ होते ती औद्योगिक देशांच्या पद्धती अनुसरून. पण यापेक्षा काम करण्याचे अधिक चोखंदळ मार्ग अनुसरून आपल्याला जुन्या पद्धती ओलांडून उत्पादन-शक्यता-सीमेच्या निकट जाता येईल. उदाहरणार्थ, आपण हे सॉफ्टवेअर उद्योगामध्ये साध्य केले आहे. आणि अर्थातच, एकदा तुम्ही वर म्हटलेल्या शक्यतेच्या आघाडीवर पोचलात आणि जर तुम्ही जगात सर्वोत्कृष्ट अशा पद्धतींचा वापर करत असाल तर याहून मोठे होण्याचा एकाच मार्ग असतो. तो म्हणजे जगातील इतरांपेक्षा अजून काहीतरी नवीन शोधून काढणे. आपल्या सॉफ्टवेअर कंपन्या नेमक्या ह्याच प्रयत्नात आहेत.
आपल्या इन्स्टिट्यूटचे माजी विद्यार्थी, ज्यांच्या रांगेत तुम्ही सामील होणार आहात, शक्यतेच्या सीमेपर्यंतच नव्हे तर त्याच्याही पलीकडे धडक मारण्याच्या मोहिमेत अग्रेसर आहेत. वानगीदाखल इ-कॉमर्सच्या क्षेत्रात होणाऱ्या घडामोडींचे उदाहरण घ्या. यात इलेक्ट्रॉनिक बाजारपेठेपासून ते नवीन पुरवठा-यंत्रणांचे जाळे आणि पैशांचे प्रदान (payment) करण्याच्या पद्धतींचा समावेश आहे. आज महानगरात मिळणारे कपड्याच्या फॅशन्सचे सारे पर्याय एखाद्या लहान गावातील उपभोक्तीलासुद्धा उपलब्ध होऊ शकतात. कारण आंतरजालाच्या (internet) सुविधेमुळे सर्व दुकाने थेट तिच्या घरात पोचली आहेत. तिच्या गावातील स्थानिक दुकाने आता बेंगरूळ पोशाख विकत नाहीत. उलट ते आता तिला तातडीने लागणाऱ्या नाशवंत पदार्थांवर लक्ष केंद्रित करू लागले आहेत. इतकेच नव्हे तर तिला माल घरपोच देण्याच्या साखळीतील शेवटच्या टप्प्याचीही जबाबदारी ते उचलत आहेत. आपल्या इन्स्टिट्यूटच्या प्राध्यापकांनी आणि माजी विद्यार्थ्यांनी केलेल्या संकल्पनांमधील आणि उत्पादनपद्धतींमधील नवनवोन्मेषशालिनी योगदान ह्यामुळे ही आर्थिक वाढ घडून येत आहे.
तर मग, नित्यनूतन संकल्पनांचे धुमारे फुटत राहावे यासाठी एखाद्या शैक्षणिक संस्थेने किंवा एखाद्या राष्ट्राने काय करायला हवे? पहिली अनिवार्य गोष्ट म्हणजे बाजारपेठेत कल्पनांमधील स्पर्धेला उत्तेजन देणे. याचाच अर्थ सर्व परंपरा आणि अधिकार यांना आह्वान देण्यासाठी उत्तेजन देणे. पण कोठलाही दृष्टिकोन अनुभवजन्य चाचणी केल्याशिवाय फेटाळू नये हे मान्य करायला हवे. यामुळे केवळ बलाचा किंवा सत्तेचा वापर करून एखादी कल्पनाप्रणाली लादणे शक्य होत नाही. उलटपक्षी सर्व संकल्पना चिकित्सक पद्धतीने तपासून बघायला हव्यात. मग त्यांचा उगम आपल्या इथेच झालेला असो वा परदेशात. त्या सहस्रावधी वर्षे मुरलेल्या असोत वा दोन मिनिटे, त्या अशिक्षित विद्यार्थ्याने सुचविलेल्या असो वा जगप्रसिद्ध प्राध्यापकाने.

पर्यायी दृष्टिकोन:
माझी अशी खात्री आहे की तुम्हापैकी अनेकांनी रिचर्ड फेनमनची पदार्थविज्ञानावरील व्याख्याने वाचली असतील. आम्ही आय आय टी मध्ये असताना तर ही व्याख्याने अनिवार्य अशीच समजली जात. नोबेल पुरस्कार विजेता असलेला फेनमन विसाव्या शतकातील महान शास्त्रज्ञांपैकी एक मानला जातो. त्याने आपल्या आत्मचरित्रात, प्रिन्स्टन येथील इन्स्टिट्यूट ऑफ अॅडव्हान्स‌्ड स्टडीजमधील वातावरण कसे निरुत्साहित करणारे होते हे सांगितले आहे.
तुम्हाला हे माहीत असेलच की या इन्स्टिट्यूटमध्ये जगभरातून अतिशय ज्ञानी आणि विद्वान अशी मंडळी एकत्र येतात आणि बहुविद्याशाखीय (multi-disciplinary) वातावरणात विविध समस्यांवर विचारविनिमय करतात. पण असे असूनही फेनमनला तेथील वातावरण अनुत्पादक वाटले कारण तिथे त्याला प्रश्न विचारणारे विद्यार्थीच नव्हते. असे प्रश्न की ज्यामुळे त्याला आपले विश्वास, आपल्या धारणा पुनः एकदा तपासून पाहणे भाग पडेल. प्रश्न विचारणे आणि पर्यायी दृष्टिकोन मांडणे यांतच नवीन संकल्पनांचा उगम असतो, भलेही ते सकृद्दर्शनी मूर्खासारखे भासले तरी. जर एखादा प्रकाशाइतक्या वेगाने प्रवास करत असेल तर त्याचा अनुभव कसा असेल?- या विक्षिप्त प्रश्नावर विचारविनिमय करण्यात आइन्स्टाइनच्या सापेक्षतेच्या सिद्धान्ताचा श्रीगणेशा होता. चर्चा करण्यासाठी आणि सतत पडताळा घेत राहण्यासाठी कोठलाही विषय वर्ज्य नाही. ज्यासंबंधी प्रश्न उपस्थित केले गेले नाहीत अशा विषयांवर कोणाला घोषणा करू देता कामा नये. संकल्पनांमध्ये स्पर्धा नसेल तर वातावरणात तुंबलेपणा, साकळलेपणा येईल. असे होऊ द्यायचे नसेल तर दुसरी अनिवार्य गोष्ट म्हणजे संरक्षण देणे, आणि तेही काही विशिष्ट संकल्पना किंवा परंपरा यांना नव्हे तर प्रश्न विचारण्याला आणि आह्वाने द्यायला. इतरांना गंभीर इजा होणार नाही अशा बेताने वेगळे वागायला. असे संरक्षण देण्यामुळे सामाजिक स्वहित (societal self-interest) साधले जाते. त्यामुळे समाजातील नवनवोन्मेषशाली बंडखोरांना आह्वाने उभी करण्यासाठी उत्तेजन मिळते. अशी आह्वाने उभी राहिली की त्यातून सोलोला अभिप्रेत असलेली संपूर्ण घटकांच्या उत्पादकतेतील वाढीला गती मिळते.
सुदैवाने आपल्या भारत देशात वादचर्चेला आणि मतभिन्नतेच्या अधिकाराला नेहमीच संरक्षण मिळाले आहे. मंदिरे, शिल्पे यांसारख्या स्थापत्यांमधून (structures) या दृष्टिकोनाची अभिव्यक्ती आढळून येते. उदाहरणार्थ, चोल राजांनी तंजावर येथे बांधलेल्या अत्यंत भव्य अशा बृहदीश्वराच्या शैवमंदिरात विष्णूची व ध्यानस्थ बुद्धाची शिल्पे आढळतात. यातून पर्यायी दृष्टिकोनाचा स्वीकार हाच विचार दिसून येतो. शहेनशहा जलालुद्दीन अकबर यानेही भिन्न विचारांचा पुरस्कार करणाऱ्या विद्वज्जनांना आपल्या दरबारात एकत्रितपणे आमंत्रित केले व त्यांच्यात अंतिम सत्याचे स्वरूप यावर चर्चा घडवून आणली. आपले चिकित्सेच्या तत्त्वाला उत्तेजन व संरक्षण देण्याची प्राचीन हिंदू व बौद्ध राजांची परंपरा आहे. अकबर याच परंपरेचा कित्ता गिरवीत होता.
पण मग एखाद्या गटाच्या भावनांचे काय करायचे? ज्या कल्पनेमुळे किंवा वर्तनामुळे एखादी विशिष्ट बौद्धिक भूमिकाकिंवा एखादा गट दुखावला जातो, त्या कल्पनेवर किंवा वर्तनावर बंदी आणावी का? कदाचित असे करावे लागेल. पण तात्काळ बंदी घातल्यामुळे चर्चा होणेच खुंटेल. कारण प्रत्येकजण त्याला न आवडणाऱ्या संकल्पनांमुळे क्रुद्ध होईल. त्यामुळे, सहिष्णुता आणि परस्पर आदर या दोन गोष्टींचा अवलंब करून संकल्पनांसाठी वातावरण अधिक पोषक करणे हे जास्त चांगले.

परस्पर सहिष्णुता :
परस्पर सहिष्णुता म्हणजे काय हे मी स्पष्ट करतो. कोणालाही शारीरिक दुखापत पोचविणे किंवा शब्दांच्या माध्यमातून एखाद्या गटाचा अवमान करण्यामुळे कल्पनांच्या बाजारपेठेत त्या व्यक्तीने किंवा गटाने सहभाग घेण्यावर वाईट परिणाम होतो. त्यामुळे असे अजिबात घडू देता कामा नये. उदाहरणार्थ, शारीरिक किंवा मानसिक लैंगिक छळ… तर, अशा गोष्टी आपल्या समाजातून हद्दपार व्हायला हव्यात. त्याच बरोबर, भावना दुखविल्या जाणे या साठी, एखाद्या गटाने निमित्ताला टेकलेले असणेही श्रेयस्कर नाही. मानसशास्त्रातील confirmation of bias हा सिद्धान्त असे सांगतो की एकदा का आपण अपमानित होण्यासाठी सबब शोधू लागलो की आपल्याला अशा सबबी पैशाला पासरी सापडतात. अगदी एखाद्या निरुपद्रवी टिप्पणीतही. अलबत, जर तुमच्या एखाद्या कृतीमुळे मी दुखावला जात असेन पण त्यामुळे मला विशेष अशी इजा होत नसेल लगेच तुमच्या त्या कृतीवर बंदी घालताना शंभरदा विचार करायला हवा. कारण अशा बंदीमुळे आणि विशेषतः बंदीची अंमलबजावणी करणाऱ्या ‘जागल्यां’च्या कारवायांमुळे (vigilante acts), मी जेव्हढा दुखावलो गेलो होतो त्यापेक्षा जास्त तुम्ही दुखावले जाण्याची शक्यता असते. राजकीयदृष्ट्या आत्यंतिक बरोबर असण्याचा आग्रहामुळे प्रगतीच्या मार्गात जेव्हढी विघ्ने येतात तेव्हढीच अति-परवानग्या (excessive licensing) लागण्यामुळे आणि अति-अनादरामुळेदेखील येतात.
दुसऱ्या शब्दांत सांगायचे तर मी ज्यामुळे दुखावला जाईन अशी माझी कळ तुम्ही शक्यतो काढायची नाही. पण एखाद्या वादचर्चेत असा एखादा मुद्दा येणे अगदीच गरजेचे असू शकते. अशा वेळी तो मुद्दा मांडण्याआधी, वादचर्चा पुढे नेण्यासाठी असे करणे कसे आवश्यक आहे आणि तो माझ्यावर केलेला व्यक्तिगत हल्ला असा त्याचा अर्थ मी का घेऊ नये हे तुम्हाला काळजीपूर्वक स्पष्ट करता आले पाहिजे. तुम्ही अशा वेळी अत्यंत आदरपूर्वक पद्धतीने, मी उराशी कवटाळलेल्या कल्पनांना आह्वान देणे हे प्रगतीच्या दृष्टीने कसे अनिवार्य आहे, याबद्दल माझी खात्री पटवून दिली पाहिजे. काही कल्पना माझ्यासाठी इतक्या कडोनिकडीच्या असू शकतात की त्या थेट माझ्या व्यक्तिमत्त्वातच खोलवर भिनलेल्या असतात. अशा कल्पनांना आह्वान दिले गेले तर तो मला असह्य व्यक्तिगत अपमान वाटू शकतो. मीसुद्धा असा प्रयत्न केला पाहिजे की माझ्यासाठी अशा कडोनिकडीच्या कल्पनांची संख्या अत्यल्प असली पाहिजे. सहिष्णुता म्हणजे आपल्या कल्पनांबद्दल इतकेही असुरक्षित वाटून न घेणे की त्यांना कोणी आह्वानच देऊ नये. सहिष्णुतेमध्ये अलिप्तता अभिप्रेत आहे, किंबहुना अलिप्तता ही सहिष्णुतेसाठी अत्यंत आवश्यक गरज आहे. अलिप्ततेअभावी परिपक्व वादचर्चा घडणे शक्यच नाही. अखेरीस, एखाद्या दुर्मिळांतली दुर्मिळ अशा परिस्थितीत—जिथे एखादी कल्पना एखाद्या गटाच्या अंतरात खोलवर रुजलेली असते-आह्वान देताना खूपच काळजी घेतली पाहिजे. असे करण्याने आपल्या मनातील त्यांच्याप्रति आदर व्यक्त होतो.
सहिष्णुतेमुळे वादचर्चेतील विखार निघून जातो, आणि त्याची जागा सन्मान घेतो. जर माझी कळ काढल्यावर प्रत्येक वेळी जर माझा तोल जात असेल तर बंडखोर लोकांना पुनःपुन्हा तसे करण्याचा मोह होईल. खोडसाळ वृत्तीचे लोक तर तसेच करतील. पण समोरच्याला एकदा कळून चुकले की मी त्यांना अभिप्रेत असलेली प्रतिक्रिया देत तर नाहीच, उलट त्यांना सताविणारा मुद्दा कोणता असे विचारतो आहे, तर त्यांना गुद्द्यांवरून मुद्द्यांवर उतरणे भाग पडते. अशाने माझ्या बंडखोर प्रतिस्पर्ध्यांचा माझी कळ काढण्याचा छचोरपणा बंद होतो आणि त्यांच्यात जे गुंडगिरी आणि खोड्या काढणारे असतात — आणि असे लोक सगळ्या गटांमध्ये मोठ्या संख्येने असतात — त्यांना कळ लावण्याची फारशी संधी मिळत नाही. सहिष्णुता आणि सन्मान हे एकमेकांना बळकटी देतात आणि त्यातून उत्तम संतुलन निर्माण होते.
याचे उदाहरण द्यायचे तर अमेरिकेतील राष्ट्रध्वज जाळणाऱ्या बंडखोर तरुणांचे देता येईल. ज्येष्ठ पिढीतल्या लोकांसाठी राष्ट्रध्वज हे एक प्रतीक होते. त्यासाठी त्यांनी युद्धे केली होती. बंडखोर तरुण त्यांना फूस लावण्यासाठी मुद्दाम असे करत. पोलिसांमध्ये माजी सैनिकांचा समावेश असे. ते तरुणांच्या कारवायांवर चिडून हिंसक प्रतिक्रिया देत. तरुणांना नेमके हेच हवे असायचे. परंतु, काळाच्या ओघात अमेरिकन समाज राष्ट्रध्वजाच्या बाबतीत अधिक सहिष्णु बनला. अशा प्रसंगावर प्रतिक्रिया उठणे आता बंद झाले आहे. परिणामी असे प्रसंग धक्कातंत्र म्हणून घडत नाहीत. सारांश, गटाची वृत्ती अधिक सहिष्णु झाल्याने ते इतके सहजी दुखावले जात नाहीत व त्यांच्या भावना दुखविण्याच्या उद्देशाने केल्या जाणाऱ्या कृतींचे प्रमाणही कमी होते. महात्मा गांधी असे म्हणत की, ‘वागण्यातील सर्वात महत्त्वाचा नियम हा की एकमेकांप्रत सहिष्णुता बाळगा. आपण सारे कधीही एकसारखा विचार करू शकणार नाही. आपल्याला सत्य हे नेहमी तुकड्यातुकड्यांमध्ये आणि जिथून बघत आहोत त्यानुसारच दिसेल.
आता मी समारोप करू इच्छितो. तुमच्यासारखे आयआयटीयन्स भारतीय वंशाच्या संकल्पनांचे नेतृत्व करणार आहेत. आम्ही ज्या भारतात पाऊल टाकले होते त्यापेक्षा तुम्ही पदार्पण करत आहात त्या भारताची, तुमच्या तांत्रिक कौशल्याचा उपयोग करून घेण्याची क्षमता खूप जास्त आहे. मी अशी इच्छा करतो की तुमची ध्येयासक्ती अनंत असावी. तुमच्यापैकी जे विचार करणे आणि आह्वाने देणे सुरू ठेवतील ते निश्चित यशस्वी होतील असे भविष्य मी वर्तवतो. तुम्ही जगाला सामोरे जाल तेव्हा सहिष्णुता आणि सन्मान याच्या वातावरणात जोपासली गेलेली आपली वादचर्चेची परंपरा विसरू नका. या परंपरेची गुढी उंच उभी ठेवून आणि तिच्यासाठी लढा देऊनच, या श्रेष्ठ अशा संस्थेतील गुरुजनांच्या आणि ज्यांनी तुम्हाला इथे पाठविण्यासाठी अत्यंत कष्ट केले त्या तुमच्या जन्मदात्यांच्या ऋणातून तुम्ही उतराई व्हाल. असे केल्याने तुम्ही आपल्या महान राष्ट्राची भक्तियुक्त सेवाही कराल. धन्यवाद आणि शुभेच्छा.

अनुवाद – विश्वास सहस्रबुद्धे
Vishvas56@gmail.com

तुमचा अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published.