गुजरात मॉडेल, अभिव्यक्तिस्वातंत्र्य
देशातील नामवंत साहित्यिक, शास्त्रज्ञ, व कलाकार ह्यांनी केलेल्या ‘पुरस्कार वापसी’वरून अभिव्यक्तिस्वातंत्र्याचा प्रश्नावर सध्या देशभर वादंग माजला आहे. ह्या संदर्भात अभिव्यक्तिस्वातंत्र्य व गुजरात मॉडेल ह्या दोन महत्त्वाच्या मुद्द्यांवर गुजराथचे रहिवासी असणाऱ्या एका सर्जनशील साहित्यिक व भाषातज्ञाचे हे वैचारिक मंथन..
जोपर्यंत भीती व आभास या दोन गोष्टी देशाची नजरबंदी करत राहतील, तोपर्यंत वेगवेगळ्या प्रकारे प्रश्न विचारला जात राहीलच. कधी साहित्यिकांकडून, कधी चित्रपटकलाकारांकडून, कधी शास्त्रज्ञांकडून, कधी विद्यार्थ्यांकडून, आणि एके दिवशी संपूर्ण देशाकडून..
गेली साडेतीन दशके माझे वास्तव्य गुजरातमध्ये आहे. त्यातील पंधरा वर्षे, अलीकडे अलीकडे भारतभर गाजत असलेल्या ‘गुजरात मॉडेल’ला जवळून अनुभवण्यात मी घालवली आहेत. त्या मॉडेलचे एक खास वैशिष्ट्य होते. स्वतःवरून स्तुतीची आरती ओवाळून घेत राहण्याचे.
विसाव्या शतकात गुजरातमध्ये फारशी राजकीय होर्डिंग्ज नसायची. पोस्टर्स असायची, भिंतींच्यावर चुन्याने अथवा कोळशाने लिहिलेल्या राजकीय घोषणा असायच्या, पण मोठ्ठाली होर्डिंग्ज मात्र गुजरातमध्ये एकविसाव्या शतकात, खासकरून 2002 नंतर दिसू लागली. त्यात वेगवेगळ्या पोझेसमध्ये एकाच व्यक्तीचे चित्र असायचे. त्या चित्रातल्या व्यक्तीचा जगात कुठे कुठे उदो-उदो झाला, ते त्या होर्डिंगवर लिहिलेले असायचे. प्रत्येक शहरातल्या प्रत्येक प्रमुख रस्त्याच्या प्रत्येक नाक्यावर ही डझनावारी रंगीत चित्रे पाहत पाहतच गुजरातची एकविसाव्या शतकाच्या आरंभीची पिढी मोठी झाली.
जर कधी छोटामोठा विरोध झाला, तर त्या होर्डिंगवरचा चेहरा अत्यंत त्वेषाने ‘गुजरात’वर परकीय आक्रमण झाले आहे अशा आवेशात बोलू लागायचा. ‘गुजरातवरचा हल्ला सहन केला जाणार नाही’, ‘एकेकाला वेचून वेचून खलास करू’ अश्या तंब्या देऊ लागायचा. गुजरातच्या लोकांना याचे फार आकर्षण वाटायचे. ह्याला शरण गेलो, तर हा आपले रक्षण करेल असे वाटायचे. त्या आशेने ते ती शेकडो होर्डिंग पाहत शांतीचा आभास अनुभवायचे.
गुजरातमॉडेलचे आणखी एक वैशिष्ट्य होते. ते म्हणजे समृद्धीची चिन्हे ‘रोवणे’. उदाहरणार्थ, जिल्ह्यांच्या मुख्य शहरांपासून तालुक्यांच्या गावांकडे जाणाऱ्या जेवढ्या सडका आधीच बनलेल्या होत्या, त्या साऱ्यांना ‘विकास मार्ग’, ‘प्रगती मार्ग’ अशी नावे देण्यात आली. सडका आधीच्याच, नावांचे बोर्डस् मात्र ‘गुजरात मॉडेल’चे. धरणावरचे बंधारे आधीपासूनचे, त्यांची उद्घाटने व त्यांसाठीचे भव्य भपकेबाज ‘लोकार्पण’ कार्यक्रम मात्र ‘मॉडेल’चे!
एखाद्या मंत्रालयीन विभागाचे अंदाजपत्रक बनवायचे असेल, तर त्यात अनेक अन्य मंत्रालयांचे आकडे आणून सोडायचे. उदाहरणार्थ, आदिवासी विकास विभागाचे त्यापूर्वीचे बजेट 100 रुपये असेल, तर मॉडेलचे बजेट 2000 रुपयाचे असायचे, कारण त्यात शिक्षण विभागाचे 300 रुपये, पाटबंधारे विभागाचे 600 रुपये, सार्वजनिक बांधकाम विभागाचे 800 रुपये आणि सार्वजनिक आरोग्य विभागाचे 100 रुपये मोजले जायचे. प्रत्येक विभागाचा हिशेब असाच. मग हे सारे आकडे होर्डिंग्सवर वेगवेगळ्या पोझेसमधल्या त्या मनोहारी व्यक्तिचित्रासह दाखविले जायचे.
यामुळे सगळ्यांनाच छान छान वाटत राहायचे. शिवाय मधूनमधून ‘गुजरात’च्या शत्रूंना धडे शिकवले गेले असल्याने, एकंदरीत फारच छान वाटत राहायचे. आता यात सत्तर लाख वस्तीच्या संपूर्ण आदिवासी पट्ट्यात एकही विद्यापीठ नाही, तेथे लोकांना व्यवसाय नाहीत, लाखो लोक स्थलांतर करतात, ते कर्जात बुडून गेले आहेत, असल्या किरकोळ बाबींकडे छान छान आयुष्य जगणाऱ्या स्थितिशील-वर्गीय शहरी लोकांना फारशी रुची नव्हती.
आता हे मॉडेल देशाचे झाले आहे. शेतकऱ्यांनी स्वतःला गळफास लावून घेणे, अल्पसंख्यकांनी भीतीच्या अंमलाखाली राहणे, मंत्र्यांनी त्यांना ‘कुत्री’ म्हणून हिणवणे, महिन्यागणिक दोन-चार चर्चेस तोडली जाणे, विद्यापीठांच्या व प्रशिक्षणसंस्थांच्या प्रमुखपदी योग्य व्यक्ती नसणे, असल्या ‘क्षुल्लक’ बाबी सोडल्यास, देशात सर्वकाही छानछानच असताना, जर लेखक, कलाकार, वैज्ञानिक वगैरे उगाचच आवाज उठवायला लागले, तर ते ‘भारत मॉडेल’चे शत्रू आहेत हे सांगायला नको का ?
गुजरात मॉडेलचे तीन आधारस्तंभ होते: भक्ती, भीती व आभास. सुबत्तेच्या आभासाने मंत्रमुग्ध झालेले, भव्य कार्यक्रम व शेकडो होर्डिंग यांच्या माऱ्यामुळे ‘छान छान’ वाटून घेऊन बिनशर्त आत्मसमर्पण करणारे आणि ‘देशद्रोहा’च्या हकनाक आरोपापासून सुरक्षित राहण्याच्या खटाटोपात स्वतःचा आवाज विसरून गेलेले लोकच आता संपूर्ण देशात दिसणार आहेत.
हे मॉडेल भारतात स्वीकारले गेले आहे. त्याच्यासमोर प्रश्न विचारायचा असेल, तर तुम्हाला पाकिस्तान किंवा चीन वगैरे देशांचे तुम्ही कैवारी आहात असे सांगितले जाणार. तुमचा प्रश्न योग्य असला तरीही, तुम्ही तो दुस्वासाने विचारत आहात, तुम्ही देशाचे शत्रू आहात, ढोंगी आहात, अप्रामाणिक आहात, हे आधी तुम्हाला मान्य करावे लागणार. एखाद्या गरीब निरपराध्याला समाजात त्रास होत असेल, जातीच्या, धर्माच्या, राहणी-सरणीच्या विचारांच्या वेगळेपणामुळे त्याचा छळ होत असेल, आणि ते तुम्हाला बोलून दाखवावेसे वाटले, तर तुम्ही एका महान नेत्याचे, त्याच्याभोवती प्रदक्षिणा घालणाऱ्या पक्षाचे आणि संपूर्ण भारत देशाचे शत्रू आहात हे स्वीकारूनच तुम्हाला ते बोलावे लागणार.
गेल्या दोन महिन्यांत जो नवा उन्मेष निर्माण होताना दिसतोय तो ह्या भक्ती, भीती, आभास ह्यांच्या आधारावर उभ्या राहत असलेल्या मॉडेलकेन्द्री सत्ताप्रणालीला प्रश्न विचारण्याच्या हेतूने आलेला सत्यशोधक उन्मेष आहे अशी माझी समजूत आहे. आणि तो प्रश्न, जोपर्यंत भीती व आभास देशाची नजरबंदी करत राहतील तोपर्यंत, वेगवेगळ्या प्रकाराने विचारला जाणार. कधी तो साहित्यिकांकडून येईल, कधी चित्रपटकलाकारांकडून, कधी शास्त्रज्ञांकडून, कधी विद्यार्थ्यांकडून, आणि एके दिवशी संपूर्ण देशाकडून.
हा उन्मेष तसा आपल्या देशाला नवा नाही. तुकाराम, नानक, मीरा, कबीर, अरविंद, रवींद्रनाथ, गांधी यांच्यातून तो अत्युच्च प्रमाणात देशाने अनुभवला आहेच; आणि तीन-चार दशकांपूर्वी दुर्गा भागवतांच्यातही त्याचे दर्शन झाले आहे. पुन्हा एकदा तो सर्वसामान्यांतून उफाळून वर येताना दिसत आहे. त्याचे आकलन पुष्कळ काळानंतर.. भविष्यात होऊ शकेल. तूर्तास नाही!
(लेखक साहित्यिक, समीक्षक व भाषाशास्त्रसंशोधक आहेत.)