आपल्या भोवतालची संपूर्ण सजीवसृष्टी “आहार, निद्रा, भय मैथुनं च” या चार प्राथमिक प्रेरणांच्या चौकटीत वावरत असते. मानवही त्याला अपवाद नाही. परंतु त्या चौकटीबाहेर पाऊल टाकून आजूबाजूच्या सृष्टीची ओळख करून घेणे विकसनशील बुद्धी असलेल्या मानवालाच जमले आहे. सर्व सृष्टीची माहिती करून घेण्याच्या उत्सुकतेपोटी त्याने अनेक ज्ञानशाखा विकसित केल्या. प्रत्येक शाखा वेगवेगळ्या विषयांचा वेध घेण्याचा प्रयत्न करीत असते. अशाच एका ज्ञानशाखेने विषय निवडला, “सजीवांची निर्मिती आणि विकास.” सजीवांच्या उत्पत्तीविषयींचे कुतूहल माणसाला फार प्राचीन काळापासून वाटत आले आहे. अनेक संस्कृतींनी , तत्त्ववेत्त्यांनी, धर्मग्रंथांनी ह्या विषयाचा वेध घेणाचा प्रयत्न केला आहे.